श्रावण आला की, सणवारांची गडबड सुरू होते. राखीपौर्णिमा, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा-दिवाळी सगळे एका पाठोपाठ हातात हात घालूनच येतात. कपडा-लत्ता, दागदागिने, गोडधोड यांची रेलचेल सुरू होते. कितीही काटकसरी गृहिणी असली तरी या दिवसांत हात सैल सोडण्यावाचून गत्यंतर नसते. पाहुणे-रावळे तसेच सणानिमित्त आलेल्या सुट्टीचे बोट धरून केलेले पर्यटन, सगळीकडे पैसा पाण्यासारखा खर्च होतो. खर्चाला कुठे कात्री लावावी तेच कळत नाही.
अशा वेळी दोन-तीन वर्षांपुर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
गणपती जाऊन नवरात्र दोन दिवसांवर आले होते. पावसाची रीपरीप चालू होती. सगळा बाजार चिखलाने गरगटलेला होता. अशा चिखलात पोते टाकून एक बाई घटासाठी लागणार्या टोपल्या विकत होती. चिखलातल्या पटकूरावरच तिचे दोन-तीन वर्षाचे मूल झोपलेले होते. त्याच्या अंगातोंडावर माशा घणघणत होत्या. दुसरं तान्हं मूल तिच्या फाटक्या पदराखाली होते.
दोन सधन कुटुंबातल्या बायका तिच्याशी टोपल्यांच्या भावावरून घासाघीस करीत होत्या. " पाच रूपयांना जरी एक टोपली असली तरी आम्ही दोन टोपल्या घेत आहोत म्हणून दोन रुपये कमी कर " असा काहीतरी वाद चालला होता. टोपलीवाली गयावया करून " मला परवडत नाही, ताई " म्हणत होती. पण त्या बायका आठ रुपये तिच्या हातावर ठेऊन टोपल्या घेऊन जाऊ लागल्या. बिचारी दोन रुपयांसाठी मांडीवरचे मूल खाली टाकून त्यांच्या मागे धावत गेली. त्या हिसक्याने तिची दोन्ही मुले भेदरून उठली व रडू लागली. तेव्हा कुठे त्या दोघींनी उरलेले दोन रुपये दिले.
असे प्रसंग नेहमी घडत असतात. सोनाराकडे गेले तर हजारो रुपयांचे बिल एक रुपयाही कमी न करता दिले जाते. हॉटेलमध्ये बील दिल्यानंतर प्लेटमध्ये उरलेले पैसे उचलणेही कमीपणाचे वाटते. पण समाजात ज्यांना खरोखरच गरज असते त्यांना मात्र नागवले जाते.
वास्तविक सण समारंभ, व्रतवैकल्ये यांचे आयोजन करताना संपत्तीचे मंथन व्हावे. वरच्या स्तरातील संपत्तीचा ओघ ताळागाळापर्यंत पोहचावा. भुकेल्याच्या मुखी घास पडावा. कष्टकरी हातांना काम मिळावे. हाच दृष्टीकोन आपल्या पूर्वजांचा असावा. पण प्रत्यक्षात उलटेच चित्र समाजात दिसते.
हम्म्म.. पट्लं. माझ्यापुरतं
हम्म्म.. पट्लं.
माझ्यापुरतं मी हे पथ्य पाळलंय.. भाजीवाले, चांभार, कचरेवाल्यांना दिलेली दिवाळी आणि रस्त्यावर विकल्या जाणार्या वस्तु .. शक्यतो घासाघीस करायची नाही.. वाचुन आपले १०-२० रु वाचतात.. पण तेच हॉटेलमध्ये गेल्यावर सहज म्हणुन उडवले जातात. मॉलमध्ये १००० रु चे कपडे घेतो आपण, तेव्हा नाही म्हणत कमी करा किंमत असं, पण तेच रस्त्यावर साधे हातरुमाल घेताना डझनभर घेतलेत तर ५ रु कमी करुन मागायचे कशाला..
पटल. मी परवा पुणे स्टेशनवर
पटल.
मी परवा पुणे स्टेशनवर नातेवाईकाला आणायला गेले होते, प्लॅटफॉर्म टिकिट काढताना एक अगदीच ५-६ वर्षाचा मुलगा सारखा माझी ओढणी ओढत होता. त्याला मी विचारल की पैसे देणार नाही खायला काय हव असेल तर सांग घेवुन देते.
तो खायला नको म्हणाला पैसेच द्या. लांब त्याची आई दिसली मांडीवर मृतवत पडलेले तान्हे पोर आणि ती पैसे मोजत होती. मला पैसे मागणारा मुलगा पुर्णपणे झोपेत होता.त्याव्या हातावर १०रु टेकवुन मी मनात असंख्य प्रश्न घेवुन तिथुन निघाले. मला अत्यंत कीव आली, पैसे कमवण्यासाठी स्वत:च्या पोटच्या गोळ्यांना अफु देणारी आणि तान्हया मुलांना रडवण्यासाठी सतत चिमटे काढणारी आई ही दुसरी बाजु आहे नाण्याची.
पण जिथे जमेल तिथे घासघिस न करता त्यांना मदतच करावी पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी पण घ्यावी
खरचं आहे निलिमा..... मला तर
खरचं आहे निलिमा..... मला तर बिलकुल आवडत नाही असे.... गरिब लोकांशी घासघिस करायची आणि श्रीमंतांना डोक्यावर घ्यायचे ही वृत्तीच झाली आहे लोकांची..... माझा अनुभव असा आहे एका लग्नात ला .... ज्याला मिळतं त्याला अजुन मोठ्या मोठ्या वस्तु द्यायच्या..... ज्याच्या घरात काहि नाही त्यला एखादे छोटी मोठी वस्तु द्यायची........ प्रचंड राग येतो मला या गोष्टींचा![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
छान आहे लिलित तुमचे हे
छान आहे लिलित
तुमचे हे दुसर
पहिलं मन हेलावणारे
अण दुसरे गंभीर विचार करायला लावणारे
लिहीत रहा
ह्म्म्म.. मीही चिंगीसारखे
ह्म्म्म..
मीही चिंगीसारखे घासाघिस करताना कोणाशी करतेय ते पाहुन मग करते.