टी व्ही वरच्या चित्रपटातला गलका एकदम वाढला तशी मला दचकून जाग आली. हातातला रिमोट केव्हाच गालिचावर गळून पडला होता.एकाच कडेला इतका वेळ झोपल्याने मान अवघडून दुखायला सुरुवात झाली होती.
सोफ़्यावरून पाय हळूच खाली घेत मी स्लिपर्समधे सरकवले. आळस कसा अंगात भरून राहिला होता.केसांचा हलकासा सैलसर अंबाडा बांधून घेत मी स्वैपाकघरात आले.
मायक्रोवेव्ह च्या घड्याळात एक वाजत आला होता.
'अजून आला नाहीय हा. आज काय ऑफ़िसमधेच झोपणार आहे वाटतं.....'
मनातल्या मनात चरफ़डतच मी जेवायच्या टेबलावर येऊन बसले. आता भुकेची जाणीव झोपेवरही मात करू लागली होती. काचेच्या भांड्यांवरची झाकणं उगाचच उघडून पहात मी एक निसटता निश्वास सोडला.
'हं....वाटली डाळ,आम्रखंड,पुर्या, बटाट्याचा रस्सा...सगळं त्याच्या आवडीचं. वाढदिवस आपला अन जेवण मात्र नवर्याच्या आवडीचं बनवलंय. अन त्याला काही आहे का त्याचं? एक वाजला तरी अजून घरी यायचा पत्ता नाहीय....'
प्लेटमधे चमचाभर श्रीखंड नि दोन पुर्या वाढून घेत मी खुर्ची सरकवली तोच लॅचचा आवाज आला.
'अग, हे काय...जेवली नाहीस अजून? मी कित्तीदातरी तुला सांगितलय..मला उशीर असला की जेवून घेत जा म्हणून...'
'मग तर महिन्याचे वीस दिवस मला एकटीलाच जेवावं लागेल..' मनात नसतानाही तीर सुटलाच.
'राणी, मी थकून आलोय. आता वाद जाऊ देना. चल, आपण दोघं जेवू या छान. अन मी मस्त सुट्टी घेतलीय उद्या. तुझ्या आवडीप्रमाणे सारा कार्यक्रम ठरव तू...खूप फ़िरूया बाहेर. हवं तर आत्ताच बुक करतो सिनेमाची तिकिटं मी. ऑनलाईन...'
'काही नको. दिवसाला महत्व असतं. दर वर्षी हेच. कध्धी कध्धी म्हणून वेळेवर येत नाहीस तू....' आता माझे डोळे भरून आलेले.कोणत्याही क्षणी धारा बरसणार असतात.
'इथे मी दिवसभर खपून घरची कामं करतेय. नि एक वाढदिवसाला पण घरीच. कंटाळा आलाय अगदी मला. अन तुझ्या माणसांना वाटतं की मी इथे किती आरामात आहे... नुसती लोळतेय महाराणीसारखी...'
नवर्याच्या चेहर्यावर हलकंसं हसू पसरलं.
'गॉट इट. फोन केला होतास वाटतं घरी आज. अग तुला कितीदा सांगितलंय. कोणी काहीही म्हटलं तरी आपण लक्ष देऊ नये. अन इतका मनस्ताप तुला होतोय तर करतच नको जाऊस फोन तू.मी बोलतोच नाही तरी दर आठवड्याला....'
माझ्याशी बोलता बोलता तो हात धुवून जेवायला येऊनही बसला होता.
माझ्या डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने पुसून त्यानं माझ्या प्लेटमधेही वाढायला सुरुवात केली होती.
'राणी, कोणाच्या बोलण्याचा असा परिणाम नाही करून घ्यायचा मनावर. शांत पाण्यात दगड पडला ना, तर तरंग उठणं अगदी साहजिक, पण पाणी गढूळ नसतं होऊ द्यायचं असं. तितका संयम हवाच मनावर आपल्या...'
'पुरे तुझं साहित्यिक बोलणं. जेव आता...'
मला खुदकन हसू फ़ुटलं.
दुसरा दिवस अगदी आनंदात उजाडला.माझ्या मनासारखा थुईथुई नाचतच. सकाळपासूनच दोघं घराबाहेर पडलो. खूप खूप भटकंती झाली. मनासारखी खरेदी झाली.सिनेमा बघून झाला अन छानशा हॉटेलमधे जेवणही झालं.घरी परतण्याआधी जवळच्याच तलावाच्या काठावर दोघं जाऊन बसलो.
'खरं सांग,तू मलाच का पसंत केलंस? इतक्या मोठ्या घरातला तू. काय पाहिलंस माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, साध्यासुध्या मुलीत?...'
गेल्या वर्षभरात अनंत वेळा विचारलेला प्रश्न मी पुन्हा विचारला.
'सांगितलंय की मी तुला. आकाशवाणी झाली होती ना... हीच तुझी बायको म्हणून...' नवर्याच्या चेहेर्यावर मिष्कील हसू.
'अहं... नेहेमीसारखं थट्टेत उडवू नकोस ना. खरं खरं सांग अगदी...' माझा आवाज रुसका.
नवरा आता मात्र गंभीर झाला.
'तुला मी कितीदा सांगितलंय. अशी वेळ येते, एखादं माणूस समोर येतं नि वाटतं की हीच.. हीच ती व्यक्ती. हिच्यासाठीच थांबलो होतो मी इतका वेळ. तो क्षण जणूकाही तिथेच थबकून रहातो. पण त्या थांबलेल्या एका क्षणाने आयुष्याचे सारे प्रश्न सोडवलेले असतात. सगळं कसं स्पष्ट होतं डोळ्यांसमोर. फ़क्त एकच जाणीव उरते, ती म्हणजे आयुष्याचा जोडीदार मिळालाय....सगळा शोध संपलाय. मग मनात उरतात फ़क्त सहजीवनाची तरल स्वप्नं......'
नकळत माझाही आवाज कातर झाला.
'पण या सार्याबरोबरच घरच्या माणसांच्या नापसंतीला झटकून टाकणारी एखादी जादूची कांडी असती तर...? किती बरं झालं असतं रे...'
'हं. अजून कालचं फ़ोनवरचं संभाषण गेलं नाहीय वाटतं बाईसाहेबांच्या डोक्यातून... चल, इतक्या सुरेख दिवसाला गालबोट नको लावूस राणी आता. विसरून जा बरं ते....'
'खूप प्रयत्न करते मी विसरायचा. पण मन विसरूच देत नाही रे. मान्य आहे. तुझ्या माणसांच्या मनात काही वेगळीच प्रतिमा असेल सुनेची. पण आता आलेय ना मी तुझा हात धरून या घरात...मग त्यांनी नेहेमी असं खोचक बोलायची काय गरज आहे?....'
माझ्या पापण्यांवरचे थेंब सर्रकन गालावर उतरले.
'राणी.. राणी..मला अगदी मान्य आहे त्यांचं चुकतंय ते. पण एक कळत नाहीय मला. याआधी तर आपण भारतात एकत्र कुटुंबात रहात होतो.या सार्याशी तर तुझा रोजच सामना होता. मग तेव्हा तू कधी इतकी खिन्न झाली नाहीस. अन गेले सहा महिने बघतोय....फोनवरच्या एखाद्याच बोचर्या शब्दानं इतका मनस्ताप का करून घेतेस तू? इथे तर आपण दोघंच आहोत. तसाही फ़ारसा संबंध येतच नाही घरच्यांचा...'
आता मात्र मी खरंच विचारात पडले. हे काय होतंय मला सारखं? खरंतर हा माझा स्वभाव नाहीच. सगळं आयुष्य कसं समरसून जगायला आवडतं मला.गेल्या काही दिवसात हे असं सतत भरून आल्यासारखं, मनावर मोठ्ठं दडपण असल्यासारखं का वाटतंय?....'
घुसमटून टाकणारी ती जाणीव पुन्हा तळापासून वर येऊ लागली तशी मी झटकन उठले.
'अरे, किती उशीर झाला...घरी नाही का जायचं? उद्या ऑफ़िस आहे म्हटलं...'
दुसर्या दिवशी नवरा ऑफ़िस मधे निघून गेला. सारी कामं उरकून मी बाल्कनीत येऊन बसले. मनात विचारांचं काहूर सुरूच होतं.या वेळी भारतात मी संस्थेत असायचे. मतिमंद मुलांच्या संस्थेत मी नोकरी करीत होते तेव्हा. नंतर एक तास मी तिथेच थोडी मदत करीत असे. विनापगारी..समाजसेवा म्हणून.
हेमंतचं स्थळ आलं तेव्हा खरंतर लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता माझ्या. संस्थेतल्या मुलांसाठी आपल्या पुतण्याचे जुने कपडे नि खेळणी द्यायला तो आला होता. त्याच्या बहिणीबरोबर.त्यानं माझ्यात काय बघितलं ते तोच जाणे, पण पुढच्याच आठवड्यात त्याच्या घरच्यांचा फ़ोन आला. आईबाबा एकदम खुशीतच आले. आपोआप असं सुरेख स्थळ पोरीनं पटकावलं म्हणून. पण मी जरा संभ्रमातच होते. हेमंतच्या घरचे लोक फ़ार बडे होते. बंगला, गाडी, समाजात प्रतिष्ठा...सारंच होतं. हेमंतचा मोठा भाऊ सुमंत विवाहित होता. हेमंत मधला नि धाकटी कांचन.
हेमंतच्या मोठ्या भावाला नि वडिलांना माझं स्थळ पसंत नव्हतं ते आमच्या मध्यमवर्गीय परिस्थिती मुळे. आईंचा माझ्या साध्यासुध्या राहाणीवर आक्षेप होता. माझी मोठी जाऊ,अनिता, तोलामोलाच्या घरातून आलेली, फ़ॅशनेबल होती. सासरच्या इतमामाप्रमाणे रहाणं तिला जमत होतं, नव्हे त्यातच ती लहानाची मोठी झालेली होती.
'खरंच, किती सुरेख रहातात अनितावहिनी...' माझ्या मनात आलं.
'नीट सेट केलेले केस, वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस,दागिने...' त्यांच्याकडे बघून मला सिरियल मधल्या बायकांचीच आठवण होत असे.मेक अप सुद्धा इतक्या सफ़ाईनं करीत की त्यांच्या मूळच्या देखणेपणात त्यामुळे भरच पडत असे.
याउलट मी अगदी साधी. त्यांच्या नि आईंच्या मते बावळटच.केसांचा एक लांबसडक शेपटा नि कॉटनचे सौम्य रंगातले सलवार कमीज इतपतच माझी फ़ॅशन मर्यादित होती. नाही म्हणायला गजरे नि फ़ुलं यांची फ़ार आवड होती मला. कामावर जायचं म्हणून मंगळसूत्र देखील छोटसंच घालायचे मी. अनामिकेत चमकणारी तेजस्वी हिर्याची अंगठी इतकीच काय ती बाबासाहेब सरपोतदारांची सून असल्याची खूण.
मी सिल्कचे, जरीकामाचे ड्रेसेस घालून बाहेर जावं असं कितीदातरी आईंनी मला सुचवून बघितलं होतं. पण मी ज्या वातावरणात, ज्या ठिकाणी नोकरी करत होते तिथे ते कमालीचे विशोभित दिसले असते. अन नोकरी मी सोडणार नाही हे मी हेमंतकडून कबूल करून घेतलं होतं आधीच.
'जाऊ दे ग आई. तिला आवडतं तसं राहू दे तिला... अन एरवी तुझ्या किटी पार्टीत येते ना ती तुझ्याबरोबर तुला हवे तसे कपडे घालून?..'
हेमंतनंच एकदा माझी बाजू घेतली होती.
'तेच सांगते मी आईंना. अहो भाऊजी, सवय असावी लागते अशा कपड्यांची आधीपासून...'
दुसर्याला लागट बोलण्यात अनितावहिनींचा हात कोणी धरत नसे.
'जाऊ दे बाई..' आई म्हणाल्या...
'तुझ्या नवर्यालाच चालतंय, तर मी कोण बोलणारी?'
'अगदी अर्ध्या वचनात आहेत हो ते तुझ्या. भाऊजी, बायकोनं अगदी भुरळ पाडलीय बघा तुम्हाला...'
अनितावहिनींचं छद्मी हास्य.
'म्हणजे काय वहिनी? अहो नवर्याला भुरळ घालता येत नाही ती बायकोच कसली?'
गडगडाटी हसून हेमंतनं कोपरखळी मारली होती. वहिनींच्या चेहर्यावरच्या रागानं मलाच वरमल्यासारखं झालं होतं.
वरवर हसून उडवलं, तरी मला मनातून खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. पण नंतर आम्ही दोघेच असताना हेमंतनं माझी खूप समजूत काढली होती.
'जाऊ दे ग. वहिनीची सवयच आहे असं बोलायची...'
अन त्याच्या प्रेमळ समजावणीनं मी ही पटकन सारं विसरले होते तेव्हा.
मग आता सातासमुद्रापलिकडे हे बोचरे शब्द, या जुन्या आठवणी का वारंवार घायाळ करताहेत मला? का दिवस दिवस अशी उदास बसून राहतेय मी?
दाराचा आवाज आला तशी मी उठले. बाल्कनीतून घरात येताना माझे पाय किंचित कापत होते. दार उघडायला जाताना घड्याळाकडे बघितलं. चक्क दुपारचे चार वाजले होते. म्हणजे? चार तास मी बाहेर बाल्कनीत बसून होते?
आश्चर्याच्या अन विचारांच्या भोवर्यात हेलपाटतच मी दार उघडलं.दारात हेमंत उभा होता.
'तू इतक्या लवकर कसा काय आलास आज?'
'अग,जरा काम उरकलं लवकर. चल, फ़िरवून आणतो तुला....पण तुझे डोळे इतके लालसर का दिसताहेत? रडलीबिडली होतीस वाटतं?'
'छे, रडायला काय झालंय... अन कालच फ़िरलो की बाहेर एवढे. आज घरीच बसू या. हवंतर एखादा पिक्चर घेऊन येऊ...'
उसन्या उत्साहाने मी बोलून गेले खरं,पण माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं.
'हे काय झालंय आपल्याला...इतक्या कडक उन्हात बाहेर बसलो होतो आपण. ए.सी. चालूच होता अन बाल्कनीचं दारही उघडंच. वेड्यासारखेच वागतोय आपण. सगळं ठीक चाललंय, अन हे गोंधळलेपण, ही सतत मनाला जाळणारी खंत कसली? इतके मोठे प्रश्न कोणते आहेत आपल्यासमोर? आई म्हणते तेच खरं असेल का? सुख दुखतंय तसंच काहीसं?...'
विचार करतच मी तयार झाले.जीन्स वर हाताला आला तो कुर्ता चढवला, अन केसांचा एक साधासा अंबाडा बांधून निघाले.
'हे काय, मला वाटलं होतं तू कालचा नवा ड्रेस घालशील. अन केस असे काय कंटाळल्यासारखे बांधलेत? आजकाल नेहेमीसारखी मस्त हेयरस्टाईल वगैरे करतच नाहीस तू?'
हेमंत मृदू स्वरात म्हणाला.
एक क्षणभरच मी त्याच्याकडे बघितलं अन एकदम सारं रक्त डोक्यातच उसळल्यासारखं झालं मला. हातातली पर्स मी दाणकन टीपॉयवर आदळली.
'सरळ सांग ना, तुला माझ्याबरोबर यायला लाज वाटतेय म्हणून....'
अन ताड ताड पावलं टाकत मी बेडरूममधे गेले. उशीत डोकं खुपसून माझ्या संतापाला मी वाट करून दिली.
हतबुद्ध झालेला हेमंत माझ्या माघारी खोलीत आला असावा.त्याची चाहूल मला लागली, पण नंतर तो काहीही न बोलताच बाहेर गेला.
थोड्या वेळाने मी उठून बाहेर आले तर तो सोफ़्यावर मान मागे टेकवून नुसताच बसला होता. डोळे मिटून. पायातले बूटही न काढता. मला एकदम भरून आलं. बिचारा किती मन राखायचा प्रयत्न करतो आपलं. काय झालंय या सहा महिन्यात आपल्याला?'
त्याच्या जवळ जाऊन मी त्याच्या कपाळावर हात ठेवला.
'सॉरी. खरंच सॉरी. चुकले मी. रागावू नकोस ना. उगाचच राग आला मला... चल जाऊ या बाहेर...'
नेहेमी सॉरी म्हटलं की उडवून लावणारा हेमंत आज हसला नाही.
डोळे उघडून, सावरून बसत त्याने माझा हात हातात घेतला.
'तुला बरं नाहीय का?काही त्रास होतोय का? नाहीतर असं करतेस का? भारतात माहेरी जाऊन येतेस का काही दिवस?....'
'असं रे काय विचारतोस? सॉरी म्हटलं ना एकदा?...' माझे डोळे आता काठोकाठ भरून आले.
'नाही ग, तसं नाही...' हेमंतचा आवाज एकदम कातर झाला.
'मी घरी का आलो लवकर सांगू तुला? ...' घुटमळतच तो म्हणाला.
'शेजारच्या नूतननं फ़ोन केला मला ऑफ़िसमधे. तू केव्हाची उन्हात, बाल्कनीत बसली होतीस. रडक्या चेहर्यानं. तुला तिनं बाल्कनीतून हाकाही मारल्या. पण तू अगदी स्तब्ध होतीस. म्हणून तिनं फ़ोन करून बोलावून घेतलं मला.....'
अवाक होऊन, मी त्याच्याकडे बघतच राहिले. डोळ्यांतून गालावर उतरणारं पाणी पुसायचेही कष्ट न घेता....
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. नूतननं हाका मारल्या? कधी? अन मला का ऐकू नाही आल्या? कडक उन्हात बसून बसून डोकं दुखतंय आता. पण तेव्हा अशी पुतळ्यासारखी का बसून होते मी? काय, काय चाललंय हे सारं?'
भीतीनं थरथरत, विलक्षण घाबरलेल्या मनानं मी हेमंतकडे बघितलं अन पुढच्या क्षणी रडत रडत त्याला घट्ट मिठी मारली.
'हे काय होतंय हो मला? मी आजारी आहे का? वेड तर लागलं नाही मला? पण मग हे बाकीचं सारं कसं समजतंय? काय करू मी, देवा.... '
हुंदके देत मी रडत होते. अन हेमंत माझी समजूत घालत होता.
'घाबरू नकोस. आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊन येऊ. काही व्हायरल तापाची वगैरे सुरुवात असेल. अग, या देशात तर कित्ती प्रगत अन पुढारलेलं आहे सगळं. उद्याच डायग्नोसिस होईल बघ. अन अगदी टुणटुणीत होशील तू.मी घेऊन जाईन तुला दवाखान्यात. आता हास बघू छानशी....'
बराच वेळ तो माझं सांत्वन करत होता. मी जराशी शांत झाले. मग तो मला बाहेरही घेऊन गेला. येताना माझं मन बरंच थार्यावर आलं होतं. पण शरीर मात्र अगदी प्रचंड थकल्यासारखं झालं होतं. घरी आलो अन मी पडूनच राहिले. हेमंतनंच खिचडी लावली. त्या बिचार्याला तेवढंच यायचं स्वैपाकातलं. चार घास खाऊन मी झोपूनही गेले. दिवसभराच्या मन स्तापानं मला लगेचच गाढ झोप लागली.
दुसर्या दिवशी हेमंतनं सकाळीच फोन करून महत्प्रयासानं डॉक्टरची अपॉइंटमेंट ठरवली. वेळेवर मी तयार झाले अन ऑफ़िसमधून तो मला न्यायला आला.
क्लिनिकमधे बाहेर वाट पहाताना मी जरा चिन्ताक्रांतच होते. हेमंतच मधून मधून मला हसवायचा निष्फ़ळ प्रयत्न करत होता.
सोनेरी केसांच्या, हसर्या डॉक्टर एलिसनं स्मितहास्यानं आमचं स्वागत केलं. माझ्या सगळ्या तक्रारी, बाल्कनीत बसण्याचा प्रसंग, सारंकाही तिनं नीट लक्ष देऊन ऐकलं. मला नीट तपासलं.
तिच्या प्रसन्न चेहर्यावर नेमके कोणते भाव होते ते मला कळण्याआधीच तिनं किंचित गंभीर होऊन मान हलवली.
'यंग मॅन, आय एम रेफ़रिंग युवर वाइफ़ टु समबडी एल्स....फ़िजिकली शी लुक्स ओके टु मी....'
तिनं हातात दिलेल्या कार्डाकडे आम्ही दोघंही डोळे फ़ाडून बघतच राहिलो.....
'डॉ. मायकेल ब्राऊन, सायकियाट्रिस्ट...'
गाडीत जाऊन बसलो, अन मला पुन्हा एकदा अनिवार रडू कोसळलं.
'कुठल्या दिशेने चाललाय प्रवास माझा? वेडी ठरवली जाणार होते मी? चार पाच महिन्यांनी भारतात जायचं आहे. तिथे सगळ्यांची काय प्रतिक्रिया होईल हे सारं ऐकून? आधीच आपण नावडती सून आहोत...त्यात आता हे...'
'ए बाई, आता रडू नकोस ना. कालपासून किती रडतेस? तू रडलीस ना, की माझं घर रडवं होतं ग. अजून त्या डॉक्टरने सांगितलय का काही? मग कशाला इतका महापूर?'
हेमंत बिचारा समजावून थकला तसं आम्ही दोघं घरी आलो. सगळा दिवस असा उदासवाणा गेला.
पुढच्याच आठवड्यात माझ्या मानसोपचार तज्ञाच्या अपॉइंटमेंट्स सुरू झाल्या. डॉक्टर ब्राऊन अगदी म्हातारा, समजूतदार माणूस होता. त्याचा दवाखाना मनोरुग्णांचा दवाखाना वाटतच नव्हता मुळी. सगळीकडे प्रसन्न वातावरण, मोठमोठ्या खिडक्या अन तर्हेतर्हेच्या फ़ुलांनी सजलेले फ़्लॉवरपॉट्स.
आम्ही आत गेल्यावर त्यानं मनमोकळं हसत आमचं स्वागत केलं. मलातर तो अगदी सांता क्लॉज सारखाच वाटला. 'या प्रेमळ शुभ्र मिशांबरोबर याला पांढरी लांब दाढी असती तर फ़क्त एका लाल टोपीचीच कमी होती' असा मजेशीर विचार माझ्या मनात चमकून गेला.
डॉक्टर ब्राऊननं मला अगदी काळजीपूर्वक तपासलं. बर्याच टेस्ट्स करून घ्यायला सांगितल्या. प्रश्नांची तर भलीमोठी यादीच त्याच्याकडे तयार होती. त्या प्रश्नांना उत्तरं देता देता मी थकूनच गेले.
'वेल, माय डिअर, टेस्ट्स चे रिपोर्ट्स येऊ दे आधी. मला खात्री आहे तू यातून अगदी नीट बरी होशील. चीअर अप....'
'पण मला झालंय काय?...' धडधडत्या ह्रदयानंच मी प्रश्न केला.
'बोलू आपण त्याविषयी. काळजी करण्यासारखं काहीच नाहीय हे नक्की. हं, अन अजून दोन अपॉइंटमेंट्स अन सारे रिपोर्ट्स हे होऊन जाऊ दे आधी. मग बघू या. टेक केअर....'
माझ्या खांद्यावर हलकेच थोपटत त्याने जणूकाही वेळ संपल्याची सूचनाच दिली आम्हाला.
घरी आलो अन मनातले अप्रिय विचार झटकून टाकायचा अयशस्वी प्रयत्न करत मी स्वैपाकाला लागले. दोन आठवडे होऊन गेले तरी या गडबडीत भारतात फ़ोन करायला झालाच नव्हता.
'मी लावतोय ग घरी फ़ोन. तुझा स्वैपाक झाला की तुझ्याही घरी लावू या...' हेमंतनं बैठकीतूनच ओरडून सांगितलं.
फ़ोन त्यानं स्पीकरवरच ठेवला होता. आईंनीच घेतला.
'अरे, किती वाट बघायची? दोन आठवडे झाले की. सगळं ठीक आहे ना रे?'...
' अग, हिला बरं नाहीय जरा...'
'अरे देवा, मग तुझ्या जेवणाखाण्याचं काय रे?....'
मी हतबुद्धच झाले. बाहेरच्या खोलीत येऊन काहीतरी बोलण्यासाठी मी तोंड उघडणारच होते तोच पाठमोर्या हेमंतचा किंचित धारदार आवाज माझ्या कानी आला...
'अग आई, माझ्या जेवणाची काळजी करण्यापेक्षा ती कशी आहे हे तरी विचारायचंस.....'
'तसं नाही रे... तुम्ही दोघं एकटेच राहता ना तिथे, म्हणून म्हटलं बरं का. कशी आहे तिची तब्येत आता...?
'ताप आलाय थोडा... बाकी काही नाही. तुम्ही सगळे कसे आहात?'
हेमंतनं चतुराईनं प्रश्नाला बगल दिली.
'भाऊजी, गोड बातमी असेल तर सांगा हं मोकळेपणी. बॅग भरून तयारच आहोत आम्ही. तेवढीच अमेरिकाही बघता येईल. मी करीन हो बाळंतपण....'
हा आवाज अनितावहिनींचा. 'एक दिवस स्वैपाकाची बाई आली नाही तर लगेच फ़ोन फ़िरवून हॉटेलमधे ऑर्डर करणार्या ह्या. बाळंतपण कसलं करणार डोंबल्याचं?....'
एव्हाना हेमंतचं माझ्याकडे लक्ष गेलं होतं. डोळ्यानंच मला गप्प बसायची त्याने खूण केली. थोडावेळ बोलून, मी झोपलेय असं सांगून त्यानं फ़ोन आवरता घेतला.
' मी झोपलेय असं का सांगितलंस ...?'
' मुद्दामच...'
मला जवळ घेत त्यानं सोफ़्यावर बसवून घेतलं.
'माझ्या घरच्यांचे स्वभाव माझ्याइतके नसले तरी थोड्याफ़ार प्रमाणात तुलाही माहीत आहेत राणी. तू आहेस साधी. उगाच मानसोपचारतज्ञ वगैरे बोलून जाशील असं वाटलं मला. माकडाच्या हाती कोलीत नको...'
त्याच्या म्हणीचं मला हसूही आलं अन त्याचं सांगणंही पटलं.
दोन आठवड्यानी आम्ही डॉक्टर ब्राऊनकडे परत गेलो.
जास्त न बोलता त्यानं विषयालाच हात घातला.
'यू आर सफ़रिंग फ़्रॉम डिप्रेशन...'
पुढचं ऐकायच्या आधीच खोली आपल्याभोवती फ़िरतेय असं वाटल्याने मी बसल्या बसल्याच टेबलाचा काठ घट्ट धरला.
दवाखान्यातून घरी आले अन माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. डिप्रेशन मला का अन कसं आलं हे कळेनाच.काय कमी होतं माझ्या आयुष्यात? देखणा, प्रेमळ पती, पैसा, मानमरातब कशालाच कुठे कमतरता नसताना हे काय भलतंच आक्रीत देवानं माझ्यापुढे वाढून ठेवलं होतं? केवळ घरच्यांच्या बोलण्याने हे इतकं व्हावं हे माझ्या मनाला सयुक्तिक वाटत नव्हतं. कितीतरी घरी अशा घटना घडतात. सून अन सासरचे यांच्यात अगदी पराकोटीचे वादही असतात, पण म्हणून काय सगळे मानसिक नैराश्याने ग्रासतात थोडेच?माझ्यातच काहीतरी दोष असला पाहिजे. त्याशिवाय हे झालंच कसं?
विचार करकरून डोकं फ़ुटायची पाळी आली होती.तशी मी लहानपणापासून मनस्वीच. सकाळ झाली की आधी पायरीवर नुसतीच बसून राहणार. बागेत उमललेली इवलीइवली फ़ुलं, पानांआडून डोकावणार्या कळ्या,हिरव्यागार गवतावर डुलणारे दवबिंदू... हे सारं अगदी मनात साठवून घेत कितीतरी वेळ मी बसून असायची. आईचा ओरडा सुरुच असायचा दूध घे,काही खा म्हणून. पण मी आपल्याच विश्वात हरवलेली असायची.दोघं मोठे भाऊ तर मला कायम वेडाबाई.. म्हणूनच हाक मारायचे. पण ते गमतीनं.
पण ही गंमत अशा क्रूर स्वरुपात नियतीनं सत्यात उतरवायची ठरवली होती तर...
डॉक्टर ब्राऊननं मला गोळ्या लिहून दिल्या होत्या. रोज एक गोळी पुरेशी आहे. त्यानं सगळे त्रास कमी व्हायला लागतील असं तो बोलला होता.
हेमंतनं जाऊन लगेच त्या गोळ्या आणल्या.
'मला काहीही झालेलं नाहीय.. मी हे औषध मुळीच घेणार नाहीय...'
मी अगदी ठामपणे त्याला सांगितलं.
'वेडी की काय तू?...'
शब्द तोंडातून निघून गेले अन हेमंतनं जीभ चावली.माझी नजर त्यानं चुकवल्याचं लगेच माझ्या लक्षात आलं.
'म्हण ना बोल बोल.थांबलास कशासाठी? मला नकोत या गोळ्या. माझ्या वेडेपणावर शिक्कामोर्तबच होईल मग. नियमितपणे औषध घ्यायला लागले तर...'
मी काय बरळत होते माझं मलाच कळत नव्हतं.
'एक शब्द न बोलता ही गोळी घे तू आधी.पुरे झाला हट्टीपणा...'
माझा हात घट्ट धरून त्यानं ती गोळी मला घ्यायलाच लावली. लग्नानंतरच्या इतक्या दिवसात प्रथमच मी त्याचा राग बघत होते. त्याला घाबरूनच की काय मी मुकाट्यानं ती गोळी गिळून टाकली अन आत येऊन निजून राहिले.
पडल्या पडल्याच माझा डोळा लागला असावा. मधूनच स्वैपाकघरातून भांड्यांचे, फ़्रीज उघडल्याचे आवाज येत होते. पण मी अर्धवट झोपेतच होते. उठावसं मनात होतं पण शरीरानं पार असहकार पुकारला होता. माला, माझी मैत्रीण मानसोपचार तज्ञ होती. तिच्याबरोबर एकदा मी दवाखान्यात गेले होते. तिथल्या भान हरपलेल्या, शून्यात नजर लावून बसलेल्या बायका माझ्या स्वप्नांमधे थैमान घालत होत्या. मधूनच हेमंतचा प्रेमळ हात डोक्यावरून फ़िरतोय असा भास होत होता. आईच्या लाडानं मारलेल्या हाका आठवत होत्या. सारं कसं सरमिसळ झालं होतं मनाच्या पडद्यावर...
काचेचा ग्लास खळकन पडून फ़ुटल्याच्या आवाजाने मी खडबडून, पूर्णपणे जागी झाले.
'काय फ़ुटलं रे....' असं विचारतच मी स्वैपाकघरात गेले अन माझी उरलीसुरली झोपही पळाली.
डोकं घट्ट धरून हेमंत जेवायच्या टेबलाजवळ खाली जमिनीवरच बसला होता. अंगात त्राण नसल्यासारखा...
'काय होतंय तुला? चक्कर येतेय का..?' विचारतच मी त्याच्या कपाळावर हात ठेवला अन चटकाच बसला मला.
'अरे, तुला किती ताप आहे... फ़णफ़णलायस अगदी..'
'सकाळपासूनच जरा कोमट वाटत होतं ग अंग. आता मात्र...' पुढचे शब्दही त्याला बोलवेनात. गळून गेल्यासारखा तो जागेवरच बसून राहिला.
हेमंतला हाताला धरून आधार देत देतच मी आतमधे नेऊन निजवलं. ताप उतरवायची औषधं त्याला आधी दिली. गुंगीत तो बराच वेळ कण्हत होता. फ़ॅमिली डॉक्टरला फ़ोन केला.
'ताप किती आहे बघ आधी...' तिनं सांगितलं.
'एकशेतीन आहे. थोडा जास्तच...'
'आत्ता तू ताप उतरवायचं औषध दिलंयस न. तीन चार तास वाट बघ. पुन्हा चढायला लागला तर घेऊन ये दुपारी...'
फ़ोन बंद करून मी हेमंतकडे वळले. त्याला एव्हाना झोप लागली होती. डोक्यावरचे विस्कटलेले केस नि तापानं लालसर झालेला चेहरा यानं तो अगदीच बापुडवाणा दिसत होता बिचारा.
त्याच्या अंगावर हलकेच पांघरूण टाकून मी स्वैपाकघरात आले.
काय अवस्था होती स्वैपाकघराची. जागोजागी पडलेली खरकटी भांडी, भाज्यांच्या साली, भरून वाहणारी कचर्याची बास्केट... शी.. माझ्याच्याने बघवेचना. माझ्या मनाच्या भावनिक आंदोलनांमधे किती किती दुर्लक्ष झालं होतं घराकडे.....
बाकीच्या खोल्यांमधे जाऊन बघितलं. थोड्याफ़ार फ़रकाने अगदी हीच अवस्था होती. फ़ुलदाण्यांमधली सुकलेली फ़ुलं,अर्धवट उघडे ड्रॉवर्स,कपाटांवर साचलेली धूळ...देवा देवा......
आत जाऊन एक जुना शर्ट चढवून आले मी, अन साफ़सफ़ाईला सुरुवात केली. एकेका खोलीपासून सुरुवात करत सार्या घराचा कायापालट करायला सुरुवात केली. सगळं पूर्ण झालं तोवर अगदी घामाघूम झाले होते. पण घर मात्र एकदम सुरेख दिसत होतं. गॅलरीतून गुलाबाची दोन टवटवीत फ़ुलं काढून आणली,अन फ़्लॉवरपॉटमधे सजवली. एकदम फ़्रेश वाटायला लागलं होतं मला आता.
हेमंतच्या खोलीत डोकावले. त्याचा ताप उतरला नव्हताच.उलट तो अजूनच गळून गेल्यासारखा दिसत होता. झटपट आंघोळ करून तयार झाले, अन गाडी काढलीच. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. औषध, अन थोडं सामान, भाजी, येतानाच आणली.
घरी आलो अन औषध देऊन त्याला झोपायला लावलं मी. किती असहाय, थकलेला वाटत होता तो या क्षणी. माझे डोळे भरून आले.
तेवढ्यात फ़ोन खणखणला. भारतातून आईंचा फ़ोन होता. थोडं बोलून, मी कॉर्डलेस हेमंतच्या हातात नेऊन दिला.
'अग हो, आता बरा आहे मी. तिनं औषधं आणलीत आज. .... अग, थोडा वीकनेस आलाय ना, म्हणून आवाज थकलेला वाटतोय....'
'अं, नाही, कांचनच्या लग्नाला येणं नाही जमणार आई. मला सुट्टी मिळणं अशक्य वाटतंय.... अग दादा नि वहिनी आहेत ना....काळजी कशाला करतेस?'
थोडं इकडचं तिकडचं बोलून त्यानं फ़ोन ठेवला.
'हे काय, कांचनच्या लग्नाला नाही जाणार आपण?...'
हातानं त्याच्याजवळ थोपटत त्यानं मला जवळ बसायची खूण केली...
'राणी, आधी तुला नीट बरं वाटू दे. तुझं दुखणं काय आहे याचा थोडा जरी सुगावा घरी लागला ना, तर तुलाच खूप त्रास होईल. विश्वास ठेव माझ्यावर. मी पूर्ण विचार करूनच घेतोय हा निर्णय....'
एवढं बोलून, थकून जाऊन त्यानं डोकं उशीवर टेकवलं.
'बरं. ते पाहू नंतर. झोप बघू तू आता....'
त्याचं पांघरूण सारखं करून मी बाहेर आले. हातात वाफ़ाळत्या कॉफ़ीचा कप घेऊन बाहेर बाल्कनीत जाऊन बसले खरी, पण मन विचारात गढून गेलं होतं.
'किती गोष्टी घडून गेल्या होत्या या काही दिवसात. अन या सार्यात हेमंत किती काळजी घेत होता माझी. केवळ माझं दुखणं कोणाला कळू नये म्हणून तो एकुलत्या एका बहिणीच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेत होता. माझ्या काळजीनं किती बेजार झाला होता तो. ऑफ़िस, घरचं सगळं बघून वर माझे मूड्स सांभाळत होता. नवा देश, नवं वातावरण, याचं त्याच्या मनावर दडपण नसेल का येत?'
'लहानपणापासून आपल्याकडे पुरुषाला खंबीर व्हायचंच शिक्षण दिलं जातं. त्यानं बायको मुलांची काळजी घ्यावी म्हणून. घराचा आधारस्तंभ व्हावं म्हणून. पण त्याच्या मनाची काळजी नको का घ्यायला कुणीतरी? आपलं दुखणं तो जगापासून लपवतोय. त्यावर पांघरूण घालतोय सतत. आपण वेळ आली की चिडचिड करतो त्याच्यावर. त्यानं कोणाजवळ बोलायचं हे? किती त्रास होत असेल त्याच्या मनाला. कितीही खंबीर असला, तरी जीवघेण्या वादळात कोसळायचा धोका अगदी मोठ्या वृक्षालाही असतोच की.'
'आपल्या या दुखण्यानं, या सततच्या मानसिक दडपणानं तर आजारी नसेल ना पडला तो? छे.... फ़ारच चुकतंय आपलं. आपल्यालाही खंबीर व्हायला हवंय आता. डॉक्टर ब्राऊननं सांगितलंय, 'मनात उदासवाणे विचार आले की बाहेर फ़िरायला जायचं, आपलं मन रमेल, आपल्याला आवडेल अशा कामात स्वत ला गुंतवून टाकायचं..'.
'येऊ नये ते दुखणं आलं खरं, पण आता त्यावर उपाय करायला हवाय. हा सुखाचा संसार, असा समजून घेणारा नवरा हे सारं उध्वस्त होण्यापासून वाचवायला आपणही प्रयत्न करायला हवेतच.'
'आयुष्यात नेहमीच मनासारखं दान पडतं असं नाही. पण एक दान मनाविरुद्ध गेलं म्हणून हताश व्हायचं नसतं, उलट उरलेला डाव कसा सावरता येईल हे बघायचं असतं. पुढचं दान मनासारखं पडण्याची वाट बघायची असते..'
'आपल्याला जिवापाड जपणार्या नवर्याला आपणही साथ द्यायला हवी. खंबीर होऊन, या वादळातून बाहेर पडण्यासाठी दोघांनी एकमेकांना हात द्यायला हवा.....'
किती तरी दिवसांनी मन जरा शांत वाटत होतं. हातातल्या कॉफ़ीसारखाच माझ्या मनावर समाधानाचा हलकासा तवंग पसरला होता.
तीनचार दिवसात ताप उतरून हेमंत ऑफ़िसला जाऊ लागला. यावेळी डॉक्टर ब्राऊनच्या अपॉइंटमेन्टला मी एकटीच जाईन असं त्याला सांगितलं होतं. एरवी तो मला कधीच एकटं जाऊ देत नसे. पण त्यादिवशी त्यालाही खूप काम होतं, नि सुट्टी घेतल्याने झालेला बॅकलॉग भरून काढायचा होता. म्हणून त्यानंही जाऊ दिलं मला.
डॉक्टर ब्राऊनशी मी अगदी मनमोकळं बोलले. मनातले सारे प्रश्न विचारून टाकले. सगळ्यात मुख्य म्हणजे माझं मन दुबळं असल्याने हे झालं का हा प्रश्न होता माझा.
'नो नो डिअर. स्वतः ला मुळीच दोषी समजू नकोस... मेंदूच्या काही भागातलं केमिकल द्रव्य कमीजास्त झाल्याने घडतं हे. त्याची परिणिती आहे ही. अन डिप्रेशन मधे पेशंटचा दोष काहीच नाही. शरीराच्या दुखण्यासारखंच हे मनाचं दुखणं. नियमित औषधानं अगदी पूर्ण बरी होशील तू...'
बराच वेळ त्यानं मला समजावलं. माझं मन आता पिसासारखं हलकं झालं होतं.
घरी येऊन मी छान तयार झाले. अगदी नव्या पद्धतीची केशरचना, नवा ड्रेस. हेमंत घरी आला तेव्हा मी त्याची वाटच बघत होते. त्याची आवडती साबुदाण्याची खिचडी नि वेलची घातलेली कॉफ़ी तयार ठेवून.
माझ्याकडे बघून आश्चर्याचा धक्काच बसला त्याला.
'खाऊन घे नि लवकर तयार हो. आपल्या नेहमीच्या तळ्याकाठच्या जागी फ़िरायला जाऊया...'
'आज अचानक काय झालं...?' वाक्य अर्धवटच ठेवून त्यानं माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
त्याचं माझ्यावरचं प्रेम, माया, याची अनुभूती नव्यानेच झाल्यासारखं वाटत होतं मला.
'मला बरं व्हायचंय हेमंत... गोळ्याही नियमित घेतेय मी.. नि यापुढेही घेणार आहे. मला अगदी नीट बरं व्हायचंय. तुझ्यासाठी... आपल्या दोघांसाठी...'
वाक्य अर्धवटच सोडून मी त्याच्या कुशीत शिरले.
फ़ुलदाणीतली गुलाबाची फ़ुलं मजेत डुलत होती.
समाप्त.
तुम्ही लिहिलेल्या चारी कथा
तुम्ही लिहिलेल्या चारी कथा खूप खूप आवडल्या.एकापेक्शा एक अप्रतिम आहेत.तुमच्या आणखी कथा असतिल तर पोस्ट करा ना. फार आवड्लं.
मधू, जुन्या माबोवर वाचली होती
मधू, जुन्या माबोवर वाचली होती ही कथा, प्रतिसाद दिलेला की नाही आठवत नाहीये पण आत्ता आवर्जून पोस्टतेय... अप्रतिम! काही काही वाक्य तर पुन्हा पुन्हा वाचावीत इतकी छान! नकळत डोळे भरून आले... नवर्याची प्रकर्षाने आठवण आली. खूप गोड रिलेट केलीत नवरा-बायकोची काळजी, संवाद... सुंदर! खूप आवडली नवीन काही नाही लिहीलं???
कथा सगळ्या छान आहेत खुपच
कथा सगळ्या छान आहेत खुपच आवडल्या पण एक तक्रार - एवढ्या पट पट आपण अपलोड करण्याने आमच्या सारख्यांचे हाल होतात. कारण एवढा एकदम वेळ मिळत नाही प्रत्येक कथेचा अस्वाद घ्यायला. अजून असे की कधी कधी वेळ न मिळाल्या मुळे आपली कला कृती मनात नसताना सुद्धा दुर्क्षीत केल्या सारखी परिस्थीती येऊ शकते.
बाकी आम्ही आपले फॅन आहोत.
खुप छान कथा , जुन्या
खुप छान कथा , जुन्या मायबोलीवर वाचली होती , तरी पुन्हा वाचून काढली
तुम्हि पात्र छान रन्गवता !!
तुम्हि पात्र छान रन्गवता !!
छान अनुभूती. आवडेश.
छान अनुभूती.
आवडेश.
मस्तच.
मस्तच.
मस्त.. छान रंगवलेत सगळे
मस्त.. छान रंगवलेत सगळे संवाद.
पॉझिटीव्ह नोट वर थांबणं पण आवड्लं.. नाहीतर दोघांच्या संसारात तिसर्याची चाहुल लागली आणि मग सगळं पुर्वीसारखं झालं असा शेवट नाही केला हे उत्तम!
सुरेख कथा. खूप आवडली
सुरेख कथा. खूप आवडली
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
फारच सुरेख कथा.
फारच सुरेख कथा.
नकळत डोळे कधी भरुन आले कळलच
नकळत डोळे कधी भरुन आले कळलच नाही. इतकी सुरेख तरीही सहज कथा.
ही वाक्यं आत कुठेतरी स्पर्ष करुन गेली -
'आयुष्यात नेहमीच मनासारखं दान पडतं असं नाही. पण एक दान मनाविरुद्ध गेलं म्हणून हताश व्हायचं नसतं, उलट उरलेला डाव कसा सावरता येईल हे बघायचं असतं. पुढचं दान मनासारखं पडण्याची वाट बघायची असते..'
'आपल्याला जिवापाड जपणार्या नवर्याला आपणही साथ द्यायला हवी. खंबीर होऊन, या वादळातून बाहेर पडण्यासाठी दोघांनी एकमेकांना हात द्यायला हवा.....'
नवीन लिहिलेल वाचायला पण आवडेल
मधुरिमा! होतीस कुठे? सुमॉ? ही
मधुरिमा! होतीस कुठे? सुमॉ?
ही गोष्टं आठवली.... किती सुरेख उतरलेत विचार... अप्रतिम फ्लो आहे.
जुन्या मायबोलीवरलं इथे आणतेयस असं दिसतय.... मस्तच.
मस्त!
मस्त!
अप्रतीम.......
अप्रतीम.......
अप्रतीम...खुपच सुंदर....
अप्रतीम...खुपच सुंदर....
मस्त कथा.
मस्त कथा.
छान !
छान !
अहाहा कित्ती सुंदर हळुवार
अहाहा कित्ती सुंदर हळुवार !!
मस्तच !!
(अवांतर :उमेश कोठीकरच्या " तु नसतास तर ..." ह्या कवितेची आठवण झाली )
स्वतःच डिप्रेशन विसरायला
स्वतःच डिप्रेशन विसरायला लावणारी कथा.