समशेर!

Submitted by विनायक_पंडित on 22 January, 2011 - 08:33

शांत चेहेरय़ाच्या वसुधा अल्मेडा.चर्चच्या बाकावर बसलेल्या.शनिवार संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर.त्यांचे दोन्ही हात पुढ्यातल्या डेस्कवर कोपरापासून उभे.दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफलेली.हनुवटीचं टोक गुंतलेल्या त्या पंज्यांवर अलगद टेकवलेलं.नजर आधीच शांत.त्या नजरेत अस्पष्टशी दैवी चमक.नेहेमीप्रमाणे त्यांचे डोळे लागलेले चर्चमधल्या संगमरवरी मूर्तीकडे.मेरीआई आणि तिच्या कडेवरचा गोंडस येशू.खाली, जमिनीवर उतरू बघणारा.ह्या मूर्तीमुळेच हे चर्च वसुधा अल्मेडांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलेलं.

बराच वेळ नेहेमीप्रमाणे त्या एकटक बसून राहिल्या.मेरीआईच्या जणू नजरेत नजर मिसळून.मग त्यांच्या शांत चेहेरय़ावर स्मित उमटू लागलं आणि डोळ्यातून झरझर अश्रू.सहसा या वेळी कोणी त्याना डिस्टर्ब करत नसे.नंतरही त्यांच्या या ध्यानसमाधीबद्दल सहसा कोणी विचारत नसे.एखाद्यानं विचारलंच तर त्या सांगायच्या, आनंदाश्रू आहेत हे.माझ्या मेरीआईने दिलेले.

हळूहळू सगळा हॉल रिकामा झाला.उंचच्या उंच मेणबत्त्या जळत राहिल्या.त्या अखंड तेवतच रहाणार होत्या.संध्याकाळच्या या वेळानंतर कुठलाही कृत्रिम प्रकाश असण्याला मज्जाव होता या चर्चमधे. पूर्वापार चालत आलेला प्रघात.बाहेर पूर्ण अंधार झाला.चर्चचं आधीच काळोखी असलेलं वातावरण अगदीच कुंद झालं.भवताली लावलेल्या उंचच उंच मेणबत्त्यांमुळे आधीच उंचावर असलेली मेरीआई, तिच्या कडेवरचं बाळ अधिक तेजस्वी दिसू लागलं.दैवी प्रकाश पाझरत असलेला जणू त्या मूर्तीमधूनच. वसुधा अल्मेडांना आता अगदी कठीण कठीण होऊन जायचं बसल्या बाकावरून उठणं.उठून बाहेर पडण्यासाठी मूर्तीकडे पाठ फिरवणं.कधी तरी उठावं लागणारच.शिवाय रात्री बिछान्यावर पडल्यावर हे सगळं चर्च आपल्या आतच तयार होतं.ते रात्रभर सोबत करतंच की…

वसुधा अल्मेडा उठल्या.वंदन केलं.पाठ न वळवता मागे चालत राहिल्या. निकरानं मग त्यानी पाठ वळवली.चर्चच्या भल्यामोठ्या द्वारातून बाहेर पडल्यावर पुन्हा वळल्या. मेरीआईला डोळ्यात साठवून त्रिवार वंदन केलं.निर्मळ हसत आवारात आल्या.गवतंच गवत पसरलेलं छान लांबलचक आवार.चर्चला प्रदक्षिणा घालणारं.

वसुधाबाईंची वाट बघत असल्यासारखी गावातली नेहेमीची कुटुंबं होती बाहेर.कुणी एकटे दुकटेही होते.वसुधाबाईंना बघताच समोरच्या चेहेरय़ावर लगेचच निर्व्याज हसू पसरत असे.वसुधा अल्मेडा सगळ्यांची प्रेमाने विचारपूस करत.खरं तर दर आठवड्याला भेटल्यावर विचारपूस करण्यासाठीचे प्रश्नं काही वेगळे नसत.पण वसुधाबाईंनी विचारल्यावर ते कधीच औपचारिक वाटत नसत.समोरचा लगेच आठवडाभर साठवलेली आपली पोतडी त्यांच्यासमोर रिकामी करायला लागे.सगळ्यांचं समाधान झाल्यावर वसुधा अल्मेडा शांतपणे चालत चर्चच्या लाकडी गेटजवळ आल्या.पुन्हा वळल्या.चर्चच्या घुमटाकडे किलकिल्या नजरेनं त्यानी पाहिलं.उजवा हात डाव्या उजव्या खांद्यावर, मग छातीवर, नंतर कपाळावर मग ओठाशी नेत त्यानी क्षणभर डोळे मिटले.वळल्या आणि त्या पायवाटेला लागल्या…

महानगरापासून दूर असं ते गाव.गावाचं रेल्वेस्थानकही या भागापासून दूरच.इथली वस्ती मात्र खूप जुनी.हिरवाई, जंगल, झरे, ओढे या सगळ्यानी वेढलेलं हे गाव.जुनी खोपटं, वाड्या नाहीश्या होत गेल्या.त्या जागी आली अपार्टमेंट्स आणि बंगले.महानगरातल्या आधुनिकतेशी स्पर्धा करणारे.तरीही ठायी ठायी आपला गावंढळपणा जपणारे.जवळच्या जंगलात आदिवासी पाडे होते.ते मात्रं तसेच राहिले.अजून.
जोसेफ अल्मेडा काम करून करून दमले त्यांच्यासाठी आणि एक दिवस ख्रिस्तवासी झाले.फार वय नव्हतं गेले तेव्हा.पासष्टं.आजारही नव्हता.प्रकृतीही काटक.पण वेळ आली की…

वसुधाबाईनी सुस्कारा टाकला.आजूबाजूच्या हिरव्यागार उंच गवतावरून नजर फिरवली.मग ती पुढ्यातल्या वाटेवर लांबलचक पसरली.अर्धापाऊण तासाचा वॉक होतो शनिवारी.त्या मनात म्हणाल्या नेहेमीसारख्या.
चर्चमधनं बाहेर पडणारं सगळं जग जातं एका बाजूला आणि आपण एका बाजूला.जोसेफला एकांताची आवड.गाव एका बाजूला वाढलं आणि जोसेफ अल्मेडाचं घर दुसरय़ाच बाजूला उभं राहिलं.टूमदार पण आकर्षक बंगला.महानगरातल्या बंगल्यांसारखा.आधुनिक.गावातल्या इतर बंगल्यापेक्षा वेगळा.

जोसेफच्या मुख्य स्वप्नांपैकी हे एक.पूर्ण झालं.त्यानं पूर्ण केलं.त्याजागी अल्मेडांचं खोपटं होतं.आजूबाजूला अल्मेडा कुटुंबाचं शेत होतं.आठ भाऊ, दोन बहिणी असं मोठं कुटुंब.काही गेले, काही राहिले.एक दोन गावात असतात अपार्ट्मेंटमधल्या फ्लॅट्समधे.काही चार दिशांना वाट फुटेल तसे निघून गेले.जोसेफचा नंबर मधला कुठला तरी.त्यानं आयुष्यभर महानगरातल्या खाजगी कारखान्यात आयुष्य काढलं.तीन तीन पाळ्या करून.हेल्पर पासून मॅनेजरपर्यंत चढत गेला.आपल्या कर्तबगारीवर.रिटायर्ड झाला.तोपर्यंत शेतात बंगला उभा केला.गाव सोडायचंच नाही या इराद्यानं.आधी जमेल तेवढ्या सगळ्या भावाबहिणींचं निगुतीनं केलं.वसुधाला कधीही नाराज केलं नाही.रिटायर्ड होतोय असं दिसल्यावर आदिवासी पाड्यांवर काम चालू केलं.चालता बोलता असताना, कार्यरत असतानाच जग सोडून गेला.हे मात्रं त्यानं चांगलं नाही केलं, वसुधाबाई नेहेमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वत:शी म्हणाल्या.

आणखी एक बरं झालं नाही आयुष्यात.मूल नाही झालं.कारणं शोधली पण कुठलंच ठोस कारण हाती नाही लागलं.जाऊदे! असं म्हणत वसुधाबाई शेवटच्या वळणावर आल्या.समोर अल्मेडा हाऊस त्यांची वाट बघत होतं.त्यानी बारकाईनं पाहिलं.आणखीही कुणी तिथे आज त्यांची वाट बघत होतं.अगबाई! तलवार फॅमिली आली वाटतं! त्या लगबगीनं पुढे झाल्या.त्या पुढे होताएत नाही होताएत तोपर्यंत आवारात उभा असलेला पस्तिशीचा देखणा इसम पुढे झालाच.

“नमस्ते! मी योगेंद्र तलवार! मी तुम्हाला-”
“नमस्ते! मी वसुधा अल्मेडा.माफ करा, चर्चमधून यायला थोडा-”
“इट्स ओके मॅडम!...” असं म्हणून योगेंद्र तलवार अदबीनं झुकला आणि त्यानं आपल्या पत्नीची प्रकाशकौरची ओळख करून दिली आणि मग अचानक भांबावून आजूबाजूला शोधू लागला.मग ओरडायला लागला.
“शमशेर! ओ बेटे शमशेर!” झालं… तो ओरडायला लागल्यावर त्याची जरा थोराड पण सुंदर बायको- जिला तो प्रकाश म्हणायचा.ती सुद्धा ओरडायला लागली.खरं तर वाढलेल्या पोटामुळे ते तिला अगदी कठीणच जात होतं.वसुधाबाईच मग प्रेमाने तिच्याजवळ गेल्या.तिला त्यानी जवळ घेतलं.योगेंद्र तलवारनं तोपर्यंत एका लालगोबरय़ा मुलाला त्यांच्या पुढ्यात आणून ठेवलं.
“हे म्हणजे आमचं कार्टं आहे कार्टं अल्मेडाबाई!”
“तुम्ही मराठी अस्खलित बोलता अगदी”
“दहा वर्षं काढली या प्रदेशात - काय म्हणू तुम्हाला- दादी म्हणू? हा कार्टापण म्हणायला लागेल मग.नाहीतर सरळ नावाने हाका मारेल तुम्हाला!”
“मला काहीही म्हणा! पण प्लीज याला कार्टा म्हणायचं बंद करा! सॅमी, शम्मी काहीही म्हणा पण-”
“कळेल! कळेल तुम्हाला!” असं म्हणत योगेंद्र खो खो करून हसला.प्रकाश अवघडल्यासारखी झालीए हे वसुधाबाईंच्या लगेच लक्षात आलं.तिला आधार देत त्यांनी सगळ्या तलवार कुटुंबाला अल्मेडा हाऊसमधे आणलं.

दारात सावरीबाई हजर होती चक्कं! वसुधाबाईंना हायसं वाटलं.तलवार कुटुंबासाठी सावरीबाई सकाळ-संध्याकाळचं जेवण तयार करणार होती.वसुधाबाईंनी तलवार पतीपत्नीला तिची ओळख करून दिली.सावरीबाई तिच्या सवडीप्रमाणे हे सगळं करणार होती आणि आपल्या आदिवासी पाड्यातल्या घरी परत जाणार होती.योगेंद्र व्यवस्थापनतज्ज्ञ होता.त्यानं फ़ोनवरंच बरय़ाच गोष्टी या आधीच नक्की केलेल्या होत्या.घरात पोटभाडेकरू म्हणून रहाणं एवढा औपचारिक व्यवहार बाकी राहिला होता.

अल्मेडा हाऊस दुमजली होतं.तळमजल्यावर वसुधाबाई रहाणार आणि वरचा सगळा मजला तलवार कुटुंबाच्या हातात असणार होता.वसुधाबाईंनी दिवस भरत आलेल्या प्रकाशला प्रेमाने हात ध्ररून वरच्या मजल्यावर आणलं.योगेंद्र प्रत्यक्ष येऊन जागा बघू शकला नव्हता.तो वरचा ऐसपैस मजला बघून खूष झाला.तोपर्यंत सावरीबाईंनी तलवार कुटुंबाच्या किचनचा ताबा घेतला होता.तलवार कुटुंबाला आत्ता ऑम्लेटब्रेड, कॉफी चालणार आहे ना? याची वसुधाबाईंनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली.

जराश्या विश्रांतीनंतर सगळ्या पाहुण्यांना वसुधाबाईंनी आपला बंगला, आवार, गच्ची सगळं सगळं दाखवलं.समशेर दादी, दादी करत त्यांच्या अवतीभवती पिंगा घालायला लागला.कार्टं द्वाड असेल पण लाघवीही आहे.वसुधाबाई स्वत;शीच म्हणाल्या आणि स्वत:शीच हसल्या.

सावरीबाईला फार रात्र व्हायच्या आत तिच्या आदिवासी पाड्यातल्या घरी परतायचं होतं.पुन्हा सकाळी लवकर पाहुण्यांच्या सरबराईला रूजू व्हायचं होतं.उद्यापासून आता रोज.वसुधाबाईंनी आणि तलवार कुटुंबियांनी रात्रीच्या जेवणाचा बेत ठरवला. वसुधाबाईंनी सावरीबाईला तशी ऑर्डर दिली.सावरीबाई हुशार होती.वसुधाबाईंच्या हाताखाली तयार झाली होती.तिनं तिचं काम चोख केलं.उद्या सकाळची येण्याची वेळ विचारून घेतली आणि ती गेली.

तलवार कुटुंबाची, विशेषत: पोटुश्या प्रकाशची सर्व सोय लाऊन दिल्यावर सगळं आवरून वसुधाबाई खालच्या मजल्यावर आपल्या बेडरूममधे आल्या.दमून बिछान्यावर अंग टाकलं.सवयीप्रमाणे डोळे मिटल्यावर मेरीआई, येशू, चर्च, प्रार्थना सगळं वसुधाबाईंच्या वस्तीला आलं.पण आज सगळ्यांनी लवकर निरोप घेतला आणि वसुधाबाईंचं मन आलेल्या पाहुण्यांच्या प्रतिमांनी भरून गेलं.त्यांच्यासाठी काय काय करता येईल या विचारात त्यांना गाढ, शांत झोप लागली.

खरंतर जोसेफ अल्मेडा असतानाच वसुधाबाईंना एवढ्या मोठ्या घरात कुणीतरी
भाडेकरू ठेवता येईल हा विचार अनेकदा येऊन गेला होता पण योग आला नव्हता.महानगरापासून एवढ्या दूर सहसा कोण कश्यासाठी येणार? पण जोसेफ गेल्यावर वसुधाबाईंना सोबत असणं ही एक मानसिक गरज वाटायला लागली.नात्यातले कुणी न कुणी वस्ती करून जायचे पण असं कुणी कायम येणं वेगळं.शिवाय वसुधाबाईंसाठी जोसेफ अल्मेडाचं पेन्शन मागे असलं तरी जागा भाड्याने दिल्यावर होणारं अर्थाजनही गरजेचं होतंच.

योगेंद्र तलवार सकाळी लवकरच उठला.त्याचं आवरून होईपर्यंत प्रकाश उठली.ती नाश्त्याची तयारी करत असतानाच सावरी आली.योगेंद्र राष्ट्रीयकृत बॅंकेत मॅनेजर होता.ग्रामीण शाखेचा स्वतंत्र भार स्वीकारण्यासाठी त्याला इथे पाठवलं गेलं होतं.शाखा गावात म्हणजे कारनं हाकेच्या अंतरावर पण बस अजूनही तासाभरातून एकदा.बॅंकेने दिलेली कार घेऊनच योगेंद्र सामानसुमान घेऊन आला होता.त्या कारने तो आठ वाजताच कामावर रवाना झाला.

वसुधाबाईंनी स्वत;चं सगळं आवरलं आणि उत्साहाने त्या वर गेल्या.प्रकाश दिसत होती त्यापेक्षा चांगलीच चटपटीत होती.जागा फर्निचरसकट तयारच होती पण तरीही आणलेलं सामान लावलंच पाहिजे.प्रकाशनं ते बरचंसं लावत आणलं होतं.दादीला ती अजिबात कशाला हात लावू देत नव्हती.बसा, बसा नुसत्या आणि गप्पा मारा- एवढंच तिचं सांगणं.वसुधाबाईंच्या या गावातल्या आणि तिच्या चंडीगढच्या गोष्टी सुरू झाल्या.नवीन खेळणी बॅगबाहेर काढून इकडे तिकडे लावून झाल्यावर समशेर कंटाळला.दोघी गप्पात रंगल्रेल्या बघून वैतागला.त्याचं प्रकाशला त्रास देणं सुरू झालं.प्रकाशची आंघोळ बाकी होती.वसुधाबाईंसाठी कुणी सावरी येणार नव्हती.त्यांचा स्वैपाक त्यानाच करायचा होता.समशेरला बंगल्याभोवतीची बाग दाखवते, त्याला खेळू दे, मी लक्षं ठेवीन.तू तुझं आवर असं प्रकाशला म्हणून वसुधा अल्मेडा समशेरला घेऊन खाली आल्या.फुलांनी भरलेली, डवरलेली बाग बघून समशेर हरवला.दादी, ममा सगळं विसरला.

आपल्या खोलीत आल्यावर वसुधाबाई जेवणाच्या तयारीला लागल्या.ते काही फार असणार नव्हतं.ते करता करता नेहमीसारखं स्टुलावर बसून हातातल्या रोझरीचे मणी ओढत त्याचं जप करणं सुरू झालं.त्या नेहेमीप्रमाणे गुंग झाल्या आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं समशेर बागेत आहे.त्याच्या खिदळण्याचा आवाज बराच वेळ आलेला नाही.त्या लगबगीने उठल्या बाहेर आल्या.समशेरला शोधत त्याना बंगल्याच्या मागच्या दारी यावं लागलं.एका झुपकेदार फुलाच्या कुंडीजवळ समशेर पाठमोरा उभा होता.एकाग्र झाल्यासारखा.

त्या त्याच्यामागून येऊन पुढ्यात आल्या तरी समशेरचं त्यांच्याकडे लक्षं गेलं नाही.समशेर फुलं ओरबाडून घेत होता आणि ती कुस्करून टाकत होता.त्याला काटे टोचतील म्हणून वसुधाबाईंना काळजी वाटली.”शम्मी” त्यांनी हलकी हाक मारली.दोन-तीन हाकांनंतर तो जागा झाला.नजर वर करून त्यानं वसुधा अल्मेडांकडे बघितलं.वसुधाबाई अवाक झाल्या.त्यांना समशेरच्या नजरेत हिंस्रतेची विचित्र चमक दिसली.त्यांच्या नजरेशी त्याची नजर मिळाल्यावरही त्याच्या नजरेतली ती चमक कमी होईना तेव्हा त्याना जास्तच आश्चर्य वाटलं.त्यांनी त्याला समजवायला सुरवात केली.फूल म्हणजे तुझ्या सारखंच एक लहान मूल असतं.त्याला कुस्करलं की त्याचं आयुष्य संपतं.“उसका खून हो जाता है!” तो खिदळला.वसुधाबाई समजावत असलेल्या प्रत्येक वाक्यावरचं त्याचं भाष्यं वसुधाबाईंना कोड्यात टाकत तर होतंच पण त्यांना समशेरची काळजी वाटायला सुरवात झाली.

वसुधाबाईंचे दिवस नेहेमीपेक्षा व्यस्त जात होते.प्रकाशकौरचा बराचसा वेळ झोपण्यात जाई.झोपून उठल्यावर तिला आपल्या जास्त वेळ झोपण्याबद्दल संकोच वाटे पण वसुधाबाई तिच्या या दिवसात हे तिला कसं आवश्यक आहे ते सतत समजवून सांगत.प्रकाशचा उरलेला वेळ खाण्यात जात असे.प्रचंड भूक लागायची तिला.त्यावरही वसुधाबाई तिला समजावत.मग तिचा उरलेला वेळ वसुधाबाईंशी गप्पा मारण्यात जाई.

योगेंद्रचं हे लॉजिंगबोर्डिंग झालं होतं.सकाळी नाश्ता करताना पेपर वाचण्याइतपत आणि रात्री जेऊन झोपण्याइतपत तो घरात असे.समशेर या जूनमधे प्लेग्रूपमधे जाणार होता.महिना दोन महिने बाकी होते त्याला.तो सकाळी उशीरा उठे, टिव्ही बघता बघता ब्रश करे, नाश्ता, दूध पिई.आंघोळ करून दादीच्या बागेत जाई.जेवण, टीव्ही, बाग, खेळणी, बाग, संध्याकाळी पुन्हा बाग, मग झोपेपर्यंत टीव्ही.उरलेल्या वेळेत वसुधा अल्मेडा आवर्जून त्याचा ताबा घेत.त्याच्या कलाकलाने घेऊन त्याला गोष्टी सांगत.त्याच्याबरोबर खेळत.त्याला आजूबाजूला बाहेर घेऊन जात.

शनिवारी योगेंद्र-प्रकाशच्या परवानगीने त्या त्याला चर्चमधेसुद्धा घेऊन गेल्या.त्याला आपल्याबरोबर त्यांनी आपल्यासारखं शांत बसायला लावलं.कार्टं शांत बसता बसत नव्हतं.आपण मनातल्या मनात त्याला कार्टं म्हणतोय हे उमजून वसुधाबाईंना स्वत:चच हसू आलं.आपण प्रयत्न सोडायचा नाही असं त्यांनी तेंव्हाच ठरवलं.

वसुधाबाईंनी कितीही समजवायचा प्रयत्न केला, लहान मूल म्हणून दुर्लक्ष करायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या दृष्टीने समशेरचं वागणं दिवसेंदिवस अधिक अधिक काळजीचं होऊ लागलं.तो फुलं कुस्करून हसत हसत इतस्तत: फेकून देई.पानं चुरगळून पायाखाली तुडवत राही.मुंग्यांची रांग बघून उकीडवा बसे आणि एकेकीला हाताने दाबून मारून टाकी.मग तो फुलपाखरांमागे धावू लागला.त्याना पकडून त्यांचे एक एक अवयव वेगळे करून फुलपाखराचं धड जमिनीवर तडफडताना बघून त्याला आसुरी आनंद होई.त्याच्या नजरेतली ती चमक तर जाता जातच नव्हती.वसुधाबाईंनी समजवल्यावर तो हां हुं करत मान खाली घालून हसत राही.

खरं तर प्रकाशला हे काही सांगू नये असं वसुधाबाईंना वाटलं पण मग गप्पा मारता ते त्यांच्या तोंडून निघालंच.”मुंडे का क्या करूं?” असं निकरानं तिनं त्यानाच विचारल्यावर वसुधाबाई निरूत्तर झाल्या.

मग तो दिवस आला.सकाळीच प्रकाशच्या कळा सुरू झाल्या.योगेंद्र तरीही ऑफिसला जाऊन येतो म्हणायला लागला.वसुधाबाईंनी त्याला वेळीच समज दिली आणि तडक तिला कारमधे घालून गावातल्या, तलवार कुटुंबानं नाव घातलेल्या हॉस्पिटलात घेऊन गेल्या.निकड समजून योगेंद्र गंभीर झाला.कॉम्प्लिकेशन्स नव्हती पण वाट पहायला लागणार होती.योगेंद्र वाट बघत तिच्याशेजारी बसला.

वसुधाबाईंना अल्मेडा हाऊसमधे परतणं भाग होतं.समशेर हॉस्पिटलमधे स्वस्थं बसेना, तो दादी दादी करत त्यांच्याच मागे लागला आणि त्यांच्याबरोबर अल्मेडा हाऊसमधे परतला.घरी परतल्यावर वसुधाबाईंची चांगलीच लगबग सुरू झाली.त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ती अर्थातच वाढवली.वरच्या मजल्यावर जाऊन काय काय तयारी करावी? सामान काय काय आणून ठेवावं? दोन दिवसासाठी सावरीला रहायलाच बोलवावं का? अश्या विचारात आणि स्वत:चं जेवण बनवण्याच्या कामात त्या इतक्या व्यग्र झाल्या की समशेर बाहेर वागेत खेळतोय हे सुद्धा त्या विसरल्या.

समशेर बागेतल्या एका घनदाट झुडपाआड दडून बसला होता.एक मोठ्ठी, नक्षी असलेली पाकोळी एका टवटवीत मोठ्या फुलावर स्थिर होण्याची वाट बघत.टक लाऊन.अचानक सात आठ केसाळ पाय तो बसला होता त्या झुडपापलिकडच्या पायवाटेवरून बंगल्याकडे जाताना त्याला दिसले.विचित्र काहीतरी दिसलं म्हणून त्याचं लक्ष वेधलं गेलं.त्याची नजर त्या पायांवर खिळली.पाय बंगल्याला वळसा घालून मागच्या बाजूला जात होते.

समशेर भानावर येऊन पुन्हा त्या पाकोळीकडे पहातो तर त्या पाकोळीने वेळ साधून पोबारा केलेला.आता त्याचं मन त्या सात-आठ केसाळ पायांचा मागोवा घेण्यासाठी त्याच्या मागे लागलं.तो हळूच झुडपातून वर उठला.दबकत दबकत मागच्या बाजूला आला.इथेच ती खिडकी होती.मोठ्या कोनाड्यासारखी. दादीच्या किचनच्या एका बाजूला असलेली.समशेरचं ’किलींग’ मिशन जर लवकर आटपलं, तोपर्यंत जर दादीनं त्याला डिस्टर्ब केलं नाही, तर तो गुपचूप याच खिडकीत चढून आत कामात असलेल्या दादीला हाक मारून दचकवत असे.

गालातल्या गालात हसत नेहेमीसारखा हळूच तो त्या खिडकीत चढला आणि समोर किचनच्या ओट्याजवळचं दृष्यं बघून सर्द झाला.तोंडावर काळा फडका बांधलेले दोन दांडगट दादीला धरत होते.त्यातला एकानं दादीचं तोंड दाबलं.दुसरा लखलखता चॉपर बाहेर काढत होता.तोंडावर हात दाबल्यामुळे दादी घुसमटली तरी तिनं जोरदार प्रतिकार चालू ठेवला.समशेरला काही कळायच्या आत चॉपरवाल्यानं दादीच्या उरात जोरात वार करायचा प्रयत्न केला.दादीनं तीव्र प्रतिकार केल्यानं तो वार तिच्या ओटीपोटात बसला.समशेर बघत बसला.

दादीनं जखमेवर हात दाबून धरला.तरी रक्तानं उसळी घेतली आणि दादी! म्हणून ओरडण्यासाठी समशेरनं आ वासला पण त्याच्या तोंडातून आवाज फुटेना.त्याचा गोबरा चेहेरा लालबुंद झाला.डोळे रक्ताळले पण आवाज काही फुटेना.

तो पांढराफटक पडायला लागला.त्याची नजर दादीच्या पोटातून वहाणारय़ा रक्तप्रवाहावरून हलेना.तोपर्यंत आतल्या खोलीतून तसलेच दोघे दांडगट भलं मोठं गाठोडं घेऊन बाहेर आले.दादीला धरलेल्या दोघांनी दादीला अक्षरश: तसंच ढकलून दिलं.ते दरवाज्यातून बाहेर पडले.समशेर खिडकीला आणखी घट्टं चिकटला.
ते सात-आठ केसाळ पाय तो उभा होता त्या खिडकीच्या विरूद्ध दिशेने ढुंगणाला पाय लाऊन पळाले.

समशेरच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागला.त्याने खिडकीतच बसकण मारली.मग भानावर येऊन दादी दादी करत तो कसाबसा धडपडत किचनमधे शिरला.दादीजवळ गेला.दादीचे डोळे विचित्र दिसत होते तरी तिनं त्याला ओळखलंय हे त्याला समजलं.तो तिच्या डोळ्यात बघत राहिला आणि त्याला आठवू लागली ती दादी.मुंग्या मारू नको, फुलं कुस्करू नको, पानं तुडवू नको, फुलपाखरांना मारू नको म्हणून सतत कळवळून पण प्रेमाने सांगणारी.तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो तिला म्हणाला “सॉरी दादी”- “आत्ता कळलं नं तुला!” दादी नजरेनेच त्याला सांगत होती आणि तो लहानगा पोर ते समजून तिला घट्ट धरून हमसाहमशी रडत राहिला…

पूर्वप्रकाशनः
http://diwaaliank.blogspot.com/2010/10/blog-post_374.html

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विनायक पंडित, मदतपुस्तिकेतील, लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे विभागात, 'कथा/लेख दिसत नाही' या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार लेखनात योग्य ते बदल केले असता लेखन दिसू लागेल.

नेमका शेवट ! आवडली Happy पुलेशु म्हणजे पुढील लेखनास शुभेच्छा ...
तेव्हा पुलेशु...अगदी मनापासुन Happy