डॉक्टर ड्राईव्ह करत होता एका मेंटल असायलमकडे.एका वर्दळ नसलेल्या रस्त्याने.रहदारी नसलेल्या वेळी.अशा शांत वेळी त्याच्या मनात ते दृष्य वारंवार प्ले होई.सगळा पट मनात फिरताना त्याला अजिबात आवेश चढत नसे.आवेग येत नसे.मॅटर ऑफ फॅक्टली-वस्तुनिष्ठपणे ते सगळं त्याच्या मनाकडून पाहिलं जाई.ही चित्रफित त्याला जाणीवेच्या पलिकडे ढकलणं सुतराम शक्य नव्हतं म्हणून ते पाहिलं जाई आणि प्रत्येक वेळी आपण यापेक्षा वेगळं काय केलं असतं हीच भावना मनाला व्यापून राही.दरवेळी दुजोऱ्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंची ग्वाही मन देत राही.निर्विकार असणं आणि ही चित्रफित लागल्यावर पैलू उलगडणं ह्या व्यतिरिक्त भरपूर व्याप,प्रॅक्टिस,पेशंट्स्,मिटिंग्ज,सेमिनार्स आणि सततचं हितसंबंधांचं जाळं विणत रहाणं होतं.आपलं वैद्यकिय कौशल्यही हितसंबंधांच्या महाजालानंतर येतं हे त्याने इंटर्नशीपपर्यंत आत्मसात केलं होतं.प्रॅक्टिकली.भरपूर पैसे = इमानी हितसंबंध.
…नंतरचा गदारोळ माध्यमं, त्यांच्या पडद्यावर पोलिसांच्या गराडयात घुसळत रहाणं, कधी अधिकृत ठिकाणी कधी अज्ञात जागी…
पक्का इमोशनल ग्राफ आणि प्लान यामुळे नंतर काहीच कठीण गेलं नाही.शेवटी काय होणार, जे होणार ते योजल्याप्रमाणे होणार याबद्दल खात्री होती.
अधेमधे जरा राड, चिखल उडाला, उडवला गेला पण वैश्विक नागरिकत्वाला कसली तमा.कसले अनैतिक संबंध आणि काय! हॅ…
आपला समाज हे नैतिक-अनैतिकाचं घोंगडं कधी फेकून देणार?खरंतर हा माझा समाज नव्हेच.बस्तान बसलंय म्हणून या समाजात रहायचंय.आणि तरीही मी मुक्त आहेच ना?मी आणि माझ्यासारखे जे आहेत ते.काय घेणं देणं आहे कुणाला कुणाशी?हे नसते प्रोटोकॉल कुणी ठरवायचे?त्याना कोणी दिला हा अधिकार?आणि कोणी वॉचमनगीरी करायची?ज्याना प्रत्यक्ष अनैतिक करावसं वाटतं आणि ते करण्याचं धाडस नाही त्यानी?
सुरूची मात्र गेली.पोटची पोर.वय लहान होतं.कसं समजवायचं तिला हा तिढा पडला आपल्याला.आयुष्यात पहिल्यांदा.तिला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सांगून बघितलं.माझ्या आणि डॉक्टर सोनाली कामदारच्या मैत्रीबद्दल.सोनाली माझा मित्र डॉक्टर योगेशची बायकोच.माझ्या बायकोनं, आनंदीनं सांगून बघितलं डॉक्टर योगेशच्या आणि तिच्या मैत्रीबद्दल.तो सोनियाचाच तर नवरा.सगळं सुरळीत चाललं होतं.कुणाचीच कुणाबद्दल तक्रार नव्हती.मुक्त मैत्रीचे संबंध असतानाही कुठलेच दरार कधीच आडवे आले नाहीत.वेगवेगळ्या विवाहातले वेगवेगळे भागीदार असूनही आमच्यात जबरदस्त अंडरस्टॅंडिंग होतं.या आमच्या अंडरस्टॅंडिंगलाच कुणाची तरी नजर लागली.
मी डॉक्टर असताना नजर लागली असं मी म्हणणं खरं तर शोभत नाही मला.पण दुसरं काय म्हणणार.सुरूची जशीजशी मोठी व्हायला लागली तसंतसं तिच्या नजरेतला शोधकपणा वाढायला लागला.मला कल्पना आहे, आधी एक डॉक्टर म्हणून, मग एक माणूस म्हणून आणि सरतेशेवटी तिचा जबाबदार पिता म्हणून काय झालं असेल तिचं याची.या भंगार परंपरागत समाजानं तिला काय काय विचारलं असेल आडून आडून, प्रत्यक्ष.तिच्या आईवडलांच्या, दोघांच्याही, परंपरागततेला खुपणारय़ा संबंधाबद्दल.मला कळत होतं.माझ्या बायकोला, सुरूचीच्या जन्मदात्रीला डॉक्टर आनंदीलाही कळत होतं सगळं.पण… या पणनंच- आयुष्यात आजवर आम्ही कधीही न जुमानलेल्या- पण, परंतूनंच आम्हाला अभिप्रेत होता त्यापेक्षा वेगळा रस्ता दाखवला.
आम्ही दोघंही अर्थातच प्रचंड बिझी होतो.सुरूचीला ती पाळण्यात असल्यापासूनच यशपालनं सांभाळलं.कोण कुठचा यशपाल.कुठल्या देशातून पोटासाठी आमच्यापर्यंत पोचलेला.हरप्रकारे त्याची परिक्षा घेऊन आम्ही त्याला आमचा डोमेस्टीक हेल्प बनवलं.त्याला धड आमची भाषा बोलता येत नव्हती तो आम्हाला पहिल्यांदा भेटला तेव्हा.पण त्याच्या डोळ्यातला प्रचंड प्रामाणिकपणा आमच्या दोघांच्या सराईत नजरेने कधीच टिपला.तो सुरूचीचा बेबीसीटर झाला.सुरूची बोलायला लागली तसातसा तो आमची भाषा शिकून घेऊ लागला.तिला शिकवू लागला.
यशपाल… आम्हा दोघा नवराबायकोंपेक्षा पाच-सात वर्षानी मोठा असेल.मुलखातल्या कुटुंबकबिल्याला सांभाळण्यासाठी आमच्या घरात राहिला आणि आमच्या घराचाच एक भाग बनून बसला.आम्हा परस्पर मित्र असलेल्या जोडप्यांमधल्या परस्परसंबंधांचा त्याने कधी बाऊ करून घेतला नाही.आमच्याशी एकनिष्ठ राहून त्याला त्याची नोकरी टिकवायची होती.त्याची पोरं-बाळं मोठी करायची होती.दुसरीकडे सुरूचीला मोठं करता करता तो तिच्यात अडकून गेला.सुट्टीच्या दिवशी मी पेग लावत घराच्या टेरेसगार्डनमधे बसलेला असायचो आणि यशपालला सुरूचीला सांभाळताना बघायचो तेव्हा मलाच हळूहळू त्या दोघांमधे बापलेकीचं नातं निर्माण झालेलं दिसायला लागलं आणि माझ्या बायकोला, आनंदीला मायलेकीचं.आनंदीनं तिच्यासाठी काही धडपड करायच्या आधीच यशपालनं सुरूचीचं सगळं सगळं सांभाळून ठेवलेलं असायचं…
…मग एक दिवशी मी असाच बसलेलो असताना ’शाएबजी’ ’शाएबजी’ करत माझ्या पायाशी येऊन तो बसला.अश्यावेळी मी कितीही सांगितलं तरी तो माझ्या पायाशी उकीडवा बसून राही.ऐकत नसे.घरात मी एकटा आहे.मला कामाचा व्याप, ताप नाही.सुरूचीला तो स्वीमिंगला सोडून आलाय.माझी बायको आनंदी आणि तिचा मित्र योगेश (सोनियाचा नवरा) यांचं या वीकएंड्लाही नेहेमीप्रमाणे एक्सकर्शन आहे.मुख्य म्हणजे माझं आणि सोनिया, डॉक्टर सोनिया कामदारचं गेटटूगेदर काल आमचे कामाचे अवर्स संपल्यानंतर झालंय.आज सोनिया तिच्या सेमिनारला पण रवाना झालीए असं सगळं बघून त्या दिवशी यशपाल माझ्या पायाशी उकीडवा होऊन बसला…
अगदी सट्ली त्याने मला सुरूची आता मोठी झालेय असं सांगितलं.मग तो जरा रेंगाळला.तुम्ही आणि बीबीजी काळजी घ्या असं खालच्या आवाजात म्हणाला.मला मी चाणाक्ष असूनही तो आत्ता असं काही म्हणेल याचा अंदाज नव्हता.खरंच! मनापासून सांगतो! मी मनातल्या मनात दचकलोच.सवयीनं हे दचकणं माझ्या डोळ्यात प्रतिबिंबीत झालं नाही.मी अर्थातच लगेच नजर वळवली नाही.तो करूण होऊन माझ्याकडे बघतोय हे मला माझ्या नजरेच्या कोपरय़ातून दिसत होतं.मग मी त्याच्यावर उपकार केल्यासारखं मंद हसत त्याच्याकडे बघितलं.तो इतका निष्ठावान की माझी मान पुन्हा त्याच्याकडे वळते आहे हे दिसताच त्याने आपली मान खाली घातली.मी माझ्या स्मरणाच्या कुपीत त्यादिवशी एक महत्वाची नोंद करून ठेवली.
लांबून जरी बघत असलो तरी सुरूचीला आता मी अधिक बारकाईने पाहू लागलो.तिची वाढ झपाट्याने होऊ लागली होती.वयात येऊ लागल्यावर सगळ्याच मुलांची- विशेषत: मुलींची- सामान्यत: होते तशी.आम्ही दोघंही संस्कार करण्याएवढे तिच्याजवळ नव्हतोच- मी आणि माझी बायको आनंदी.नाईलाजच होता.पण दिवसेंदिवस ती एखाद्या प्रौढालाही लाजवेल असे संस्कार आपल्यात मुरवते आहे असं माझ्या लक्षात येत होतं.
बायकोशी, आनंदीशी बोलताना याचं गुपितही कळलं.सुरूची तासनतास यशपालच्या मागेमागे असे.त्याला ती दादू म्हणायची.खरं तर तो दादू म्हणायच्या वयाचा नव्हता पण त्यालाही ते आवडत असावं.आनंदीच्या एकदा असं लक्षात आलं की सुरूची तासनतास यशपालला दिलेल्या स्वतंत्र खोलीत त्याच्याबरोबर गप्पा मारत असते.तो त्याचं घरातलं काम संपवून आराम करत असेल किंवा स्वत:ची खोली आवरत असेल तेव्हा.आनंदीला शेवटी आई म्हणून काळजी वाटणारच.ती त्या दोघांना कळणार नाही अश्या पद्धतीनं त्यांच्या मागावर राहू लागली आणि तिच्या संशयी डोळ्यांमधे पाणीच यायला लागलं.सुरूची वाढत होती तसे तिच्याभोवती अनेक प्रश्नं जमा होत होते.ती ते सगळे यशपालला विचारायची.यशपाल अडाणी खरा पण तो तिचे प्रश्न आश्चर्यकारकरित्या सोडवायचा.तिला त्यानं ऐकलेल्या, वाचलेल्या देवादिकांच्या कथांचे दाखले द्यायचा.सुरूचीचं त्यानं समाधान झालेलं दिसायचं.
हळूहळू सुरूची माझ्या आणि आनंदीच्या जवळ जवळ घोटाळू लागली.राहू लागली.आमच्या सेमिनार्सची, महत्वाच्या पेशंट्सची नोंद ठेवू लागली.मुली केवढ्या लवकर मोठ्या आणि जबाबदार होतात नाही?
आमचं दोघांचही रूटीन आणखी निर्धास्त झालं आणि एक दिवस सुरूचीनं तो बॉम्ब टाकला.आम्ही तिघंही घरापासून दूर आमच्या फार्महाऊसवर वीकएंडवर कधी नव्हे ते गेलेलो असताना तिनं हसीमजाक करता करता आम्हा दोघांनाही आमच्या ’तश्या’ प्रकारच्या संबंधाबद्दल थेट विचारलं.न घाबरता.एवढे श्रूड असलेल्या आम्हा दोघांना याची कल्पना या आधी कधीच आली नाही? आमची ती पहिलीवहिली सहकुटुंब टूर आम्हा दोघांच्या तोंडाची चवच घेऊन पार पडली हे मात्र आम्हाला कबूल करायला पाहिजे.भले आम्ही दोघांनीही तसं एकमेकाना आणि सुरूचीला दाखवलं नसेल.सुरूची शांतपणे आम्हा दोघांचं मौन न्याहाळत होती.
आम्ही गुळमुळीतपणे एकमेकांच्या गाढ्या मैत्रीविषयी बोलत राहिलो.एकमेकांच्या म्हणजे सेकंडलाईन एकमेकांची मैत्री.फर्स्टलाईन आम्हा औपचारिक लग्नं झालेल्या जोडप्यांचा अगाध विश्वास पार्श्वभूमीला होताच.सुरूचीचे डोळे आता आमचं बोलणं, हावभाव, आमची देहबोली न्याहाळत होती.मग तिच्या डोळ्यात आम्हाला कळेल न कळेल असा एक तिरस्कार आला.आम्हा दोघा म्हणजेच या संबंधात असलेल्या आम्हा चौघांच्या संबंधाबद्दलचा तिरस्कार.तो, मी आणि माझ्या बायकोनं आनंदीनं नोट केला.विषय तिथेच संपला.सुरूची पुन्हा एकदम स्वीच ऑफ झाल्यासारखी नॉर्मल झाली.परफेक्ट नॉर्मल.
त्या टूरनंतर डॉ.आनंदी, माझी लग्नाची बायको, सावध झाल्यासारखी झाली.मी आतून सावध झालो होतो पण माझी आणि डॉक्टर सोनियाची इंटिमसी, माझं कुठलाही प्रश्न सोडवण्यातलं कौशल्य मला पुन्हा पुन्हा निर्धास्त करत होतं.कसं असतं, निर्धास्तपणा आणि निर्ढावलेपणा यातसुद्धा एका बारीक रेषेचं अंतर असतंच हो! आनंदीला तिच्या पार्टनरनं, डॉक्टर योगेशनं समजावलं असावं.त्यांच्यामधले दृढ शारिरीक बंध मला चांगल्याच परिचयाचे होते.
निर्धास्त जरी झालो असलो तरी धूर्त असल्यामुळे जे केलंय आणि पुढे चालूच ठेवायचंय त्याबद्दल बॅक ऑफ द माईंड माझी व्युहरचना चालूच झाली असणार याची आता मला खात्री वाटते.या व्युहरचनेचा पहिला भाग होता.यशपालला हळूहळू दूर करणं.मी ते अति सौम्यपणे कधी चालू केलं हे माझं मलाच कळलं नाही.आपल्या नकळत आपलं सुप्त मन काम करत असतं ते असं.आनंदीला ते जसं न सांगता कळू लागलं तसं ते यशपाललाही कळू लागलं.सुरूची किती सेंसेटिव आहे याचा ठाम प्रत्यय मला आला.माझी ही चाल आधीच ओळखल्यासारखी ती यशपालला डिफेंड करू लागली.माझं माथं हळूहळू गरम होऊ लागलंय असं एक दिवस माझ्या लक्षात आलं- पेग चढवता चढवता.
लोक माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या, माझ्या बायकोच्या इतरत्र संबंधाबद्दल खाजगीत काय बोलतील याची मला कधीच पर्वा नव्हती पण माझी, माझ्या पोटची सुरूची काय करेल याची भीती माझ्या मनाच्या कुठल्यातरी कोपरय़ात अदृश्यपणे उभी असलेली मला दिसू लागली.याचं एक कारण कधी नव्हे ते माझं आणि माझ्या बायकोचं, डॉ.आनंदीचं या विषयावर डिसकशन व्हायला लागलं.मला आश्चर्य वाटतं आणि मी खरोखर कबूल करतो की आयुष्यात कधी कुठल्याही विषयावर आम्ही दोन ओळींपेक्षा जास्त बोललो नाही ते या विषयावर… मी उत्सुकच नव्हतो खरं तर बोलायला पण आनंदी इतकी केविलवाणी व्हायची की मला तिला समजवायला काहीतरी बोलायलाच लागायचं.शेवटी काही का असेना आम्ही एकत्र तर रहात होतो.आणि… हे सगळं आम्ही दोघांनी परस्परसंमतीनंच तर चालू ठेवलं होतं…
सुरूचीचा पुढचा बॉम्ब हा आमच्यासाठी, आम्हा चौघांसाठी रॉकेट लॉन्चरच म्हणायला पाहिजे.तिने सरळ एक दिवस ’मी तुम्हा चौघांचे हे परस्परातले घाणेरडे संबंध माध्यमांमधून जाहीर करेन’ असं डोळ्यातल्या प्रचंड त्वेषाने पण तितक्याच शांत चेहेरय़ाने सांगितलं.हे म्हणजे माझ्यासारख्या अतिधूर्त माणसाच्या स्वप्नातही आलं नव्हतं.ती हे सांगते न सांगतेय तोपर्यंत डॉ.योगेशचा आनंदीला आणि त्याच्या बायकोचा, सोनियाचा मला कॉल आलाच.दोघेही प्रचंड हादरले होते.कितीही झालं तरी आम्ही प्रतिष्ठित डॉक्टर्स होतो.देशातल्या अतिमहत्वाच्या शहरातल्या एलीट म्हणवल्या जाणारय़ा वस्तीत रहात होतो.माध्यमात हे गेलं म्हणजे…
मग मी माझ्या क्लिनीकला टाळंच ठोकलं.चौघांनी आपापल्या क्लिनीक्सना टाळं ठोकणं शक्य नव्हतं.पुढे मागे ते नजरेत येण्यासारखंही होतं.सुरूची शाळेत गेली आहे हे बघून मी यशपालला काट्यावरच घेतलं मग.पहिला चालता हो म्हटलं तुझ्या मुलखाला.बस्स झालं तुझं एकनिष्ठव्रत.तो हो हो म्हणत राहिला.त्याच्याकडून उद्याचा अल्टिमेटम घेतला.सुरूची आल्यावर तिच्यावर उद्यापासून तुला दूर हिलस्टेशनवरच्या एका बोर्डिंगस्कूलच्या हॉस्टेलमधे जावं लागणार असल्याचं रॉकेट लॉन्चर सोडलं.कितीही झालं तरी मी तिचा बाप होतो.
यशपालला अल्टिमेटम दिल्यानंतर आणि सुरूची शाळेतून परत येण्यादरम्यानच्या छोट्याश्या अवधीत मी नेटवरच ते होस्टेल बुकींगचं काम करून टाकलं होतं.मला माझ्याबद्दल पूर्ण खात्री होती.अनेक अडचणींचे प्रसंग मी आयुष्यात झेलले होते.परतवलेही होते.अश्यावेळी माझं आधीच हाय असलेलं इंटलेक्ट वायुवेगानं किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर वैश्विक महाजालापेक्षा जास्त वेगानं काम करतं असा आत्मविश्वास मला होता.वैश्विक महाजालासाठी जलद ब्रॉडबॅन्ड इत्यादी सारखं कनेक्शन लागतं.आपल्या देशातलं असलं कनेक्शन किती वेळा ढेपाळत असतं हे काय मी सांगायला नको.मी स्वत:च माझा सर्वर होतो.मीच परममहासंगणक.मीच माझा सर्वर.
सुरूची माझीच मुलगी होती.होस्टेलचं सांगताच तिच्या डोळ्यात प्रचंड तिडीक गेली.ती फक्त मलाच दिसली.माझीच मुलगी असल्याने तिनं ती सहज लपवल्याचं माझ्या लक्षात आलं.माझ्या आईनं माझ्या डोळ्यातली असली प्रचंड तिडीक माझ्या लहानपणातच ओळखली होती.मी जगावेगळा खुनशी दिसतो अश्यावेळी असं ती गमतीनं गप्पा मारता मारता सांगायची.मी ती तिडीक लपवण्याचा यशस्वी प्रयत्न केला कधी आणि ती तिडीक दिसण्यावर मात केली कधी हे माझ्या आईच्याही लक्षात आलं नव्हतं.तर सुरूचीची तिडीक माझ्या लक्षात येईपर्यंत नाहीशी झाली.
यशपाल मूकपणे काम करत आमच्या घरात वावरत होता.सुरूची आपल्या रूमचं दार बंद करून राहिली.ट्यूशन क्लासेसची वेळ आल्यावर गेली.मी शांतपणे दोन पेग लावले.नेहेमीप्रमाणे यशपालच्या हातचं मनसोक्त जेवलो.माझ्या बेडरूममधे जाऊन शांत झोपलो.
जाग आली तेव्हा अंधार पडला होता.सुरूची क्लासेसमधून आली.मी कॉफी घेईपर्यंत माझी बायको आनंदी आली.पुन्हा सगळं शांत झालं.मी नेहेमीप्रमाणे माझ्या स्टडीतल्या नेटवर बसलो.बरीच रात्र झाल्याचं मला आनंदीनं माझ्या स्टडीचं दार नॉक केल्यानंतरच कळलं.मी घरी असल्यावर रात्रीचा जेवत नाही हे सगळ्यांना माहित होतंच.आनंदी आली.तिनं मी नेटवरून दूर होण्याची वाट बघितली.मग मला मुसमुसण्याचा आवाज यायला लागला.माझी नेटवरची तंद्री भंगली.तोपर्यंत आनंदी माझ्या खांद्यावर कोसळलीच.किती वर्षांनी होणारा तिचा स्पर्श मला अनोळखीच वाटत होता.मग हळूहळू त्या स्पर्शाची ओळख पटू लागली.सुरूची आणि ती कश्या गळ्यात गळा घालून रडल्या.यशपालच्या बायकोमुलांना आनंदी काय काय घेऊन आली.ते दिल्यावर तो कसा ढसाढसा…
आनंदी सगळं सांगत राहिली.मी ढिम्म होतो.अश्यावेळी कसं रिऍक्ट करायचं असतं? ती शांत झाल्यावर मी तिला थोपटलं.मनात म्हटलं चला हिला सोडून येऊया हिच्या बेडरूमपर्यंत.ती उठतंच होती माझा निरोप घेण्यासाठी.मी तिच्या खांद्यावर हात ठेवला.तिनं स्वत:च्या तोंडावर हात ठेऊन आतून येणारा कढ दाबला.तिच्या बेडरूमच्या दारापर्यंत गेलेलो आम्ही तिथेच थबकलो.
सुरूचीचा आवाज येत होता.जोरजोरात.तिच्या बेडरूममधून.ती तावातावाने कुणाला तरी आमच्याबद्दल सांगत होती.आम्हा चौघांबद्दल.कुणीतरी तिची समजूत काढत असावं पलिकडून.तिची समजूत पटत नव्ह्ती काही केल्या.त्वेष वाढतच चालला होता.माझी बायको आनंदी तिथेच थिजली.डोळे विस्फारून.मला कोण जाणे काय बुद्धी झाली.मी यशपालच्या खोलीकडे सरकलो.
आयुष्यात माझ्या धूर्तपणाने माझा कधीच घात केला नव्हता.सुरूचीशी पलिकडून बोलणारा यशपालच होता.त्याच्या ’बेबी’ ला तो कळकळून सांगत होता.सगळे विचार काढून टाक तुझ्या मनातून.आईबाप म्हणून त्यांच्याकडे बघ.ते तुला काही कमी पडू देणार नाहीत.आयुष्य कठीण असतं.तुझं इतर पोरांपेक्षा आता, या घडीला जास्त कठीण असेल.पण तुझे आईबाप म्हणून ते तुला काही कमी पडू देणार नाहीत.’बेबी’ ऐकण्याच्या पलिकडे पोचली होती.तिनं आधीच तिच्या संपूर्ण क्लासला एसेमेस केले होते.आईबापांच्या संबंधांबद्दलचे…
मी पूर्णपणे शांत झालो.बायकोच्या, आनंदीच्या खोलीपर्यंत आलो.ती पिंजरय़ातल्या मैनेप्रमाणे त्या अंधारात घुटमळत, घुसमटत होती.मी तिच्या खांद्यावर हात ठेवला.तिनं माझ्या चेहेरय़ाकडे पाहिलं आणि ती दचकली.अंधारात तिनं काय पाहिलं असेल माझ्या चेहेरय़ात? माझ्या डोळ्यातली ती खुनशी तिडीक? ती गपचूप आत गेली.मी माझ्या बेडरूमकडे वळलो.मला माहित होतं आनंदीनं, माझ्या बायकोनं स्वत:च्या बेडरूमचं दार बंद केलं नसणार.ती आधी बेडरूममधल्या अंधारात घुटमळत राहिली असणार.मग तिची धाव सुरूचीच्या बेडरूमच्या दारापर्यंत पोचली असणार.पण काही केल्या तिला सुरूचीच्या बेडरूममधे शिरण्याचा धीर झाला नसणार.
मी माझ्या बेडरूममधे शिरलो.काही वस्तू घेण्यासाठी मला मंद दिवा लावावा लागला.मी बारकडे गेलो.रमची अख्खी बाटली काढली.टीपॉयवर ठेवली.क्षणभरच मला रेंगाळावं लागलं.मग मी माझा वॉर्डरोब उघडला.एका ड्रॉवरमधे माझी सर्जरीच्या लास्ट इयरपर्यंत मी सांभाळून ठेवलेली, माझ्या खाऊच्या पैशातून घेतलेली, डिसेक्शन बॉक्स होती.परवा कधीतरी चाळा म्हणून मी ती उघडली तेव्हा पुन्हा एकदा असं लक्षात आलं की त्यातला चाकू अजून गंजलेला नाही.नुसतं तेच नाही तर त्याची धारही जरासुद्धा गेलेली नाही.मी तो उचलला.माझ्या नाईट गाऊनच्या खिशात सारला.डिसेक्शन बॉक्स बंद केली.ठेवली.वॉर्डरोबचं दारं बंद केली आणि माझी नजर दारावरच्या आरश्यावर पडली.
माझा मीच शहारलो.मला आजवर कधीही न दिसलेली हिच ती तिडीक? मी प्रयत्न करायला लागलो पण ती जाता जाईना.वाढतेय की काय असं वाटायला लागल्यावर मी कबूल करतो मी घाबरलो.माझ्या बुद्धीनं मला आजवर कधीच दगा दिलेला नाही.मी फटाफट हालचाली करत पुन्हा बारजवळ आलो.सोड्याचा फवारा असलेली बाटली होतीच.मी फर्रर्रर्र.. करत ती माझ्या चेहेरय़ावर रिकामी करून घेतली.काय त्रास होतो हो! डोळे बंद केले होते म्हणून त्रास जीवघेणा झाला नाही हे काय कमी? पुन्हा आरश्याजवळ.तिडीकबिडीक कुछ नही.चेहेरा शांत.मला हवा तसा.डोळे निवांत.मी फायनली निघालो.रमची बाटली हातात घेऊन.
बायकोच्या बेडरूमचं दार बंद होतं.सुरूचीच्या बेडरूमजवळ जाऊन कानोसा घेतला.थोड्या थोड्या वेळाने उमटणारा उचकीसारखा हुंदका असावा असा आवाज आतून येत होता.लाईट बंद झाला होता.यशपालचं दार अर्धवट उघडं.लाईट चालू.मी दारावर अगदी हलकेच टकटक केलं.तो त्याची गावाला जाण्याची बॅग भरत होता.नोकरी मागायला आला तेव्हा जितका केविलवाणा दिसत होता तितकाच आताही दिसायला लागला होता.त्या अवस्थेतही माझं आगतस्वागत केलं त्यानं.मी त्याला घेऊन आमच्या गच्चीत आलो.त्याच्याबरोबर पीत बसलो.वर्षातून एकदा मध्यरात्री कधीतरी आम्ही बसायचो तसाच.बोलण्यासारखं काही उरलेलं नव्हतंच.मी आग्रह करून त्याला भरपूर प्यायला लाऊन रिलॅक्स केलं.मग खिश्यातून चाकू काढला.चाकूनं आपलं काम कधी केलं हे यशपालला कळलंच नाही.माझं हे कसब बघून मीच आश्चर्यचकीत झालो.
तसाच खाली आलो.सुरूचीच्या बेडरूमवर नॉक केलं.आत मंद दिवा लागला.दार उघडतंय तर समोर आनंदी.माझी लग्नाची बायको.जरा धक्काच होता तो मला.तिनं माझ्या चेहेरय़ाकडे बघितलं.मी यावेळी कॉन्फिडंट होतो.तिचा चेहेरा शांत राहिला.तिनं माझ्या उजव्या हाताकडे बघितलं.ती काय ते समजली.मी शांत झोपलेल्या सुरूचीकडे बघत होतो.मी तिला झोपेची गोळी दिलीए.बायको म्हणाली.तिच्या नकळत तिनं माझं आणखी एक काम सोपं केल्याचं तिच्या लक्षातच आलं नव्हतं.आता ती शांत झोपलेल्या आमच्या मुलीच्या चेहेरय़ाकडे बघत राहिली.मी पुढे झालो.शांतपणे चाकू चालवला.माझ्या मुलीचं शरीर उसळ्या मारायचं अचानक कसं थांबलं हे माझ्या लक्षातच आलं नाही.जेव्हा आलं तेव्हा मला तिची आई तिचं शरीर बेडवर दाबून ठेवताना दिसली.काय झालं असेल आमचं? कुणी कल्पना करू शकेल? केवढ्या मोठ्या बदनामीपासून आम्ही आमची सुटका करून घेतली आमचं आम्हाला माहित…
…नंतरचा गदारोळ माध्यमं, त्यांच्या पडद्यावर पोलिसांच्या गराडयात घुसळत रहाणं, कधी अधिकृत ठिकाणी कधी अज्ञात जागी… पक्का इमोशनल ग्राफ आणि प्लान यामुळे नंतर काहीच कठीण गेलं नाही.शेवटी काय होणार, जे होणार ते योजल्याप्रमाणे होणार याबद्दल खात्री होती.अधेमधे जरा राड, चिखल उडाला, उडवला गेला पण वैश्विक नागरिकत्वाला कसली तमा.कसले अनैतिक संबंध आणि काय! हॅ… आपला समाज हे नैतिक-अनैतिकाचं घोंगडं कधी फेकून देणार?खरंतर हा माझा समाज नव्हेच.बस्तान बसलंय म्हणून या समाजात रहायचंय.आणि तरीही मी मुक्त आहेच ना?मी आणि माझ्यासारखे जे आहेत ते.काय घेणं देणं आहे कुणाला कुणाशी?हे नसते प्रोटोकॉल कुणी ठरवायचे?त्याना कोणी दिला हा अधिकार?आणि कोणी वॉचमनगीरी करायची?ज्याना प्रत्यक्ष अनैतिक करावसं वाटतं आणि ते करण्याचं धाडस नाही त्यानी?...
या सगळ्यातून मुक्त होताना एक चरा उमटला.माझ्या बायकोचं आनंदीचं मानसिक संतुलन ढळू लागल्याचं माझ्य़ा लक्षात येऊ लागलं.एक दिवस तिनं माझा गळाच धरला, मी सुरूची आहे, सुरूची! असं काही बाही ती बरळू लागली तेव्हा मला तिला असायलममधे ठेवणं भाग पडलं.तसं केलं नसतं तर कॉम्प्लिकेशन्स वाढली असती.केलेल्यावर नस्तं पाणी फेरलं गेलं असतं… आता मी ड्राईव करतोय ते तिलाच भेटायला.तिला ठेवलेल्या असायलममधे.माणसानं आपली कर्तव्य न चुकत पार पाडायला पाहिजेत.दुर्दैवानं तिच्यात काही फरक पडेल असं दिसत नाही.काही उपचारांनी ती शांत मात्र झाली आहे.तिचं बोलणं पूर्णपणे बंद झालं आहे…
काय काय असतं एकेकाचं आ-आ-युष्य-आ-आ-… अरे हे काय? माझ्या शेजारच्या सीटवर सुरूची? सुरूची? आफ्टरऑल? न-न-ना-नाही- हे कसं शक्य-शक्य- ए- ए सुरू-सुरूची- हे-हे काय कर- कर- करतेस!- अगं-सोड-सोड- स्टेअरिंग सोड माझं- माझं स्टेअरिंग व्हील- हलवू- हलवू- दरी आहे गं दरी समोर-सोड-सो…..ड!...
माध्यमं कार्यरत व्हायला वेळ लागला नाही.डॉक्टरचं प्रेत खोल दरीत मिळालं.ते ओळखण्याच्या पलिकडचं होतं.पण त्या शरीराच्या गुंडाळीत डॉक्टर आणि त्याची डॉक्टर मैत्रिण सोनिया यांचा कॉम्प्रोमायझिंग पोझिशनमधला फोटो इन्टॅक्ट राहिलेला होता.तो कसा कसा काय राहिला, मुळात तो डॉक्टरनं आपल्याजवळ का ठेवला होता हे गूढ मात्र कायम राहिलं…
पूर्वप्रकाशनः
http://diwaaliank.blogspot.com/2010/10/blog-post_1190.html
this seems symbolic to arushi
this seems symbolic to arushi case details.. isn't it?
>>this seems symbolic to
>>this seems symbolic to arushi case details
हेच लिहायला आले होते!!