बोका - म्हाळसाई काळूबाई एक झाल्या

Submitted by बेफ़िकीर on 21 January, 2011 - 06:29

खळदहून परिंच्याला आज पालखी निघालेली होती. इतिहासात पहिल्यांदाच! असे कधी झालेले नव्हते आधी! खळदची ग्रामदेवी काळूबाई अत्यंत कडक! ती आणि परिंच्याच्या आपल्या बहिणीकडे म्हणजे म्हाळसाईकडे? हे कसे काय झाले?

त्या रस्त्यावर जी काही किरकोळ वाहतून असायची तीसुद्धा खोळंबत होती. चक्क दिडशे लोकांचा जमाव चाललेला होता. मध्यभागी पालखी! पुढे एक ढोल आणि दोन ताशे! त्याच्या पुढे टाळ कुटत जयघोष करत जाणारी काही माणसे! सगळ्यात पुढे काळूबाई अंगात आलेल्या खळद गावातील काही सुवासिनी! त्या बेभान नाचत होत्या. पालखी आठ जणांनी खांद्यावर पेललेली होती.

पालखीच्या मागेही खूप माणसे होती. प्रामुख्याने बायका होत्या खळदमधल्या! नुसता जयघोष चाललेला होता. काळूबाईचा उधं.... काळूबाईचा उधं...!

पब्लिकला हे समजेना की आज काळूबाई इकडे कुठे??

कुणी थांबून विचारलं की पालखी नेणार्‍यातला एखादा जोरात सांगायचा...

"भनी भ्येटनारेत अन काय??? व्हा सामील पावनं तुमी बी पालखीत.. झै काळूबाई..."

"पर आजवर न्हाई भ्येटल्या त्या??"

"त्योच झगडा मिटनार है आज... झै काळूबाई..."

विचारणार्‍याच्या कपाळावर गुलाल फासला जात होता. येणारे जाणारे मनापासून नमस्कार करत आपल्या वाटेस निघत होते. अख्खं खळद म्हणजे पन्नास उंबरा, त्यातल्या तीनशेपैकी निम्मे तर रस्त्यावरच होते पालखी घेऊन!

रस्त्यात अधेमधे एखादी वस्ती आली की बायाबापड्या आपल्या पोरांना पालखीपुढे आडवं करत होत्या. नंतर स्वतः डोकं टेकवत होत्या. अगदीच एखादा श्रीमंत असला तर नारळ फोडत होता. नारळ फुटल्याच्या दुसर्‍या क्षणी खोबरं खायला पोरांची ही झुंबड! अंगात आलेल्या सुवासिनींना ओवाळून त्यांना कुंकू लावून बायका नमस्कार वगैरे करत होत्या. त्यामुळे त्या बायका आणखीनच बेभान होऊन नाचत होत्या. आता तर त्यांच्यात 'कुणाच्या अधिक अंगात आले आहे' याची जणू स्पर्धाच सुरू झालेली होती.

भर दुपारच्या उन्हात सगळे घामाघूम होऊन ही पालखी मिरवत मिरवत वीस किलोमीटर लांब असलेल्या परिंच्याला निघालेले होते. फक्त एकच व्यक्ती घामाघूम नव्हती. घामाघूम कसली आलीय? उलट मस्त मजेत होती.

बोका!

बोकाही त्या मिरवणुकीत सामील झालेला होता, पण तो नाचत वगैरे नव्हता, तो होता पालखीमध्ये बसलेला!

'म्हाराज' होता तो 'म्हाराज'!

एक महिना झाला होता त्याला इथे येऊन! आला तो सरळ खळद गावाच्या वेशीवरच येऊन बसला. हातात फक्त एक बोचकं! ते आजवर कुणी उघडून पाहिलं नाही हे नशीब! कारण त्यात होता मोबाईल, चार्जर, टूथ ब्रश, पेस्ट, बॅटरी, विड्या, देवादिकांचे फोटो, वस्तरा आणि कात्री! याशिवाय दोन धोतरे आणि दोन बंड्या, शेव फरसाण आणि लाडवाच्या पुड्या... आणि....

..... आणि वीस हजार रुपये आणि एक लाखाचे जुनाट प्रकारचे दागिने!

बोक्याचा वेश मात्र अचाट होता. कंबरेला धोतर, अंगात काहीही नाही, गळ्यात भीती वाटावी अशा मण्यांच्या माळा, तुळतुळीत टक्कल, डाव्या हातात मोठा जाडजूड आणि दोन हात लांब दोर, उजव्या हातात एकाच हाताने वाजवता येईल अशी टणटण आवाज करणारी छोटी घंटा!

अत्यंत मळके आणि घाणेरडे धोतर नेसून आणि तितकेच मळके बोचके खांद्याला लटकवून बोका वेशीवर बसल्यावर घुमू लागला होता.

सुरुवातीला कुणीही त्याच्याकडे लक्ष देईना! पोरे बाळे लांबून विस्मयाने बघू लागली होती. पाणी भरणार्‍या आणि धुणे वगैरे धुणार्‍या बायका चकीत होऊन या नवीन आलेल्या ध्यानाकडे लांबूनच बघून आपापसात चर्चा करू लागल्या होत्या. बापये लोक दोन मिनिटे त्याच्यासमोर उभे राहून 'हा माणूस घातकी तर नसेल ना' याचा आढावा घेत निघून जात होते.

अर्धा पाउण तास घुमून झाल्यावर बोक्याने झाडाखालीच बसून देवांचे फोटो काढले आणि मांडले. नंतर त्या देवांसमोर काहीतरी पुटपुटण्यात अर्धा तास घालवला. तो निरुपद्रवी माणूस आहे याची खात्री पटल्यावर मात्र एक म्हातारा जवळ येऊन बोलू लागला.

"कंचे तुम्ही??"

"उस्मानाबाद... भुत्ये आम्ही"

हा माणूस 'भुत्या' आहे म्हंटल्यावर म्हातार्‍याने आधी काळूबाईच्या नावाने हात जोडले.

"हितं कसं??"

"या गावात काळूबाई हाय काय??"

"हाय की?"

"हा... म्हून कामगिरीवर आनलया आम्हास तिनं.."

"कंच्या??"

"फेरा हाय गावात.."

आता म्हाताराही हबकला. गावात भुताचा फेरा असेल याची त्याला कल्पना नव्हती. पण आता मात्र त्याला वाटू लागले की गेल्या काही महिन्यात घडलेल्या वाईट घटना या त्या फेर्‍यामुळेच झालेल्या असणार!

विचार करत निघून गेलेल्या म्हातार्‍याभोवती आता गावकरी जमले. दहा मिनिटात सगळ्यांनाच समजले की एक भुत्या आलेला असून तो गावावर संकट असल्याने काळूबाईनेच बोलवलेला भुत्या असल्याचे सांगत आहे. यात काही गैर प्रकार तर नाही ना याची शहानिशा करण्यासाठी चार जाणत्या माणसांना बोक्यासमोर धाडायचे ठरले. चर्चाच संपेना! शेवटी ती माणसे बोक्यासमोर आली तेव्हा सकाळचे साडे अकरा वाजलेले होते. ऊन चढत होते. तुळतुळीत टकलावर कापडाची चिंधीही न धरता बोका मन लावून फोटोंसमोर काहीबाही पुटपुटत होता.

एकाने विचारले.

"आपन कुठलं??"

बोक्याने हिंस्त्र नजरेने वळून पाहिले आणि पुटपुटतच हाताने 'जा, जा' अशी खूण केली. मंडळ परत आले. आपल्याच गावात आपणच या नवीनच आलेल्या माणसाचे का ऐकायचे हा प्रश्न त्यांना परत आल्यावर पडला. तसे ते चवताळलेच! पुन्हा बोक्याकडे आले.

"ओ म्हाराज... कुठलं तुम्ही?? ... आ???"

बोक्याने ढुंकूनही न बघता सरळ स्वतःचा डावा अंगठा एका फोटोवर धरला. दुसर्‍या हातात वस्तरा घेऊन अंगठ्यावर फिरवला. हे असले प्रकार बोकाच करू जाणे! रक्ताची धार फोटोवर लागली तसे मंडळ चपापलेच. बोक्याने अचानक काहीतरी गर्जना करत तोच अंगठा स्वतःच्या तोंडात धरला आणि सात आठ सेकंदांनी त्यावर हळद ओतून त्याला एक फडकं बांधलं!

आता बोका उठून उभा राहिला. धोतराची सवय नव्हती. ते सुटायला लागलं होतं! त्यामुळे अभिनय करत बोका पुन्हा खाली बसला, पण यावेळेस ग्रामस्थांकडे तोंड करून!

आत्ताच झालेला रक्तरंजित प्रकार पाहून काहीश्या चपापलेल्या एका माणसाने विचारले..

"हिकडं कसं काय??"

"गावात काळूबाई हाये??"

"हाये की..??"

"म्हूनच हित्तं आलूय... फेरा आलाय गावात... जिथं फेरा थित्तं भुत्या..."

"आपन भुत्या हाय का??"

"तसला भुत्या नाय... आम्ही फक्त फेरा घालवायच्या कामगिरीवर आस्तोय..."

"... पर... फेरा..... फेरा आलाय कशावर्नं???"

"गेल्या चार म्हैन्यात कित्ती जीव ग्येले खळदात??"

"आ?? ... चार म्हैन्यात व्हय?? ... किती रं??"

मंडळाने आपापसात चर्चा करून एक आकडा ठरवला.. बोक्याने हा काहीही प्रश्न फेकलेला होता.

"चार जन म्येल्यात..."

"चार... आन मरायला कित्ती फाईजेल व्हतं??"

"म्हन्जी??"

"फकस्त दोन... चार म्येलेच कसे??"

".........."

"कोन कोन म्येलंय??"

"आबाची म्हातारी... सोमा... आनि..."

"सोमा कस्काय ग्येला??"

"हिरीत पडलान..."

"ह्योच फेर्‍याचा पर्ताप हाये..."

बोका तोंडाला येईल ते फेकत होता. अभिनय रक्तातच असल्याने कसली शंका येण्याचे प्रयोजनच नव्हते. गावकरी बिचारी अडाणी भोळे होते.

"ह्यो कस्ला फेरा म्हनायचान??"

"हित्त आसपास म्हाळसाई हाये??"

आत बोबडीच वळली पब्लिकची! काळूबाई हे अत्यंत कडक दैवत समजले जायचे. इतके की त्या गावात दुसर्‍या कोणत्याही देवाला अथवा देवीला रिझर्व्हेशन नव्हते. आणि हा भुत्या तर सरळ काळूबाईची पहिली आणि सर्वात मोठी शत्रू म्हाळसाईचं नाव घेतोय??

"... हाये... पर्.. हित्तं नाय... परिंच्याला हाय.."

"त्येच म्हन्तोय... तिच्चाच कोप झालेलाय"

"पर का पर??"

"का म्हन्जी?? ... सर्व्या बाबी सांगण्यागत नस्त्यात... काळूबाई कुठाय??"

"त्यो काय कळस द्येवळाचा..."

"आम्ही काही दिस थित्तच हावोत... गावाचा घास बी नगं आम्हाला.. ह्ये भारित गाव हाये..आमी आमचं करून खातू... फकस्त इस्तू लागंल... आनि पूजंपुरतं तांदूळ.. त्याचंबी पैसे द्येवू..."

आता आली का पंचाईत? हा माणूस म्हणतोय मी इथे राहणार काही दिवस! बर अपेक्षा तर काहीच नाही. म्हणजे हा आहे कोण? निदान खायला तरी मागेल की नाही एखादा? तेही नाही.. भानगड काय आहे ही??

मंडळाने लांब जाऊन पुन्हा चर्चा केली. काही वेळाने येऊन म्हणाले..

"र्‍हा तसं?? .. र्‍हायाचा सवाल न्हाई... पर... गावाला काय भ्या नाय ना??"

जळजळीत कटाक्ष टाकून बोक्याने त्या माणसाला घाबरवले.

"भुत्याय आमी... गावाचं संरक्सन करत्यो... गावाला भ्या दावत नाय...थिकडं म्हाळसाई कोपलीया ती कोपलीयाच.. हितं काळूबाईबी कोपंल असलं वंगाळ बोलशीला तर..."

बोक्याचा पहिला दिवस असाच गेला. शांतपणे लोक त्याचे नुसतेच निरीक्षण करत होते. बोका निरुपद्रवी आहे की नाही हे सतत तपासत आणि अभ्यासत होते. बोका रात्री देवळातच झोपला. उपाशीच! कारण खायला कुणीच काही देणार नव्हतं! पूजेचे तांदूळ पूजेलाच वापरायला लागलेले होते. रात्रीच्या भयंकर थंडीपासून बचाव करण्यासाठी देवळाच्या ओसरीतील एक मोठे लाकूड त्याने पेटवले आणि दोन दोन धोतरे अंगावर घेऊन लाकडाशेजारी पडून राहिला. त्यातच डास चावत होते. थंडी कमी होतच नव्हती. पण बोका ते सहन करत होता. मध्यरात्री मात्र त्याने कुणाचेही लक्ष नाही हे पाहून हळूच जवळची शेव खाऊन टाकली.

खळद गावाच्या शेजारून एक मस्त मोठा ओढा वाहायचा. जणू मुद्दाम काढलेला कालवाच! सकाळी उठल्यावर बोक्याने ओढ्यावरच आवरले. तिथून परत येऊन पूजा करायला बसला.

बोक्याचे असे तीन दिवस गेल्यावर मात्र गावकर्‍यांनी ठरवले. की याला विचारायचे. फेरा आहे की गेला??

मंडळ पुन्हा दबकत दबकत तिथे आले.

"म्हाराज.. पूजा कवर??"

केव्हापर्यंत पूजा चालणार हा प्रश्नच बोक्याला समजला नाही.

"काय??"

"कवर चालायची पूजा म्हंटलं??"

"गावाला अक्कल येईतोवर..."

अचानक असला तिरकस प्रतिसाद ऐकून मंडळ बिचकले.

"म्हन्जी??"

"गावात सर्व्यात जुना जान्ता म्हातारा कोन??"

"आ??... सर्व्यात व्हय??... कोन्डा..."

"कुठाय त्यो??"

"आ??.. का??.. त्यो हाये की खोपटात त्याच्या.."

"बोलवा त्याला..."

"काय झालं काय पर??"

"बोलवा त्याला..."

बोक्याने दरडावले तसा एक जण म्हणाला..

"ओ म्हाराज.. त्यो पिऊन पडल्येला अस्तूय... त्याला न्हाय आन्ता यायचन.."

"मी सांगतोय.. बोलवा त्याला.."

बराच विचार करून पब्लिकने अर्धवट नशेत असलेल्या कोंडाला कसाबसा धरून बोक्यासमोर उभा केला.

"काय रं म्हातार्‍या??.. खळदात चोरी कधी झालीवती??"

बोक्याचा हा भेदक प्रश्न ऐकून सगळेच चपापले. अगदी कोंडाही! आता कोंडाला तोंड फुटले.

"कन्ती चुरी??"

"काळुबाईची आन कसली??"

"मूर्ती व्हय??"

"स्वान्याची..."

"स्वानं व्हतं कधी काळुबाईवर तवा चुरी हुनार???"

"नीट आठव.. प्येताड कुठला.."

"दागिने व्हय???"

"हा..."

"न्हाय बा ... मी तर काय ऐकल्यालं न्हाय..."

"तुझ्याहून जुना कोने??"

"मीच समद्यात वरिस्त.."

"बेअक्कल गाव हाये झालन..."

"का वं??"

"झर्‍यापाशी काळुबाईनं गावासाठी खजिना ठिवलाय आन तुमची प्वारं नागडी फिरतायत व्हय??"

"खजिना??"

किमान दहा जणांनी तो प्रश्न एकदम विचारला.

"जा त्या वढ्यावं.. आन खंदा म्होरच्या अंगाला.. तिसरा वड हाय थितं... "

बसल्या जागी खजिन्याचा पत्ता सांगणारा माणूस पाहून गावकरी चाट पडले. चार तरुण लगबगीने फावडी कुदळी घेऊन धावले. बोका जागेवरच! त्या तरुणांच्या मागे आता गाव धावले.

आणि केवळ दोन तासांनी अख्खे खळद बोक्यावर नमस्कारांचा वर्षाव करत होते. जवळच्यापैकी फक्त निम्मेच दागिने बोक्याने पुरून ठेवले होते. म्हणजे बांगड्या असतील तर निम्याच, कानातली असतील तर त्यातले एकच! असे!

मिळालेल्या पोझिशनचा फायदा बोक्याला असा झाला की पहिल्यांदा त्याची खाण्यापिण्याची ददात मिटली आणि थंडीचा प्रश्न राहिला नाही. पण प्रॉब्लेम असा झाला की खळदच्या आजूबाजूलाही ही बातमी पसरल्यामुळे अचानक माणसांची रीघ लागू लागली. मग दोन दिवसांनी बोक्यानेच जाहीर करून टाकले.

आता 'फेरा घालवायची' खरी पूजा सुरू होणार आहे. तेव्हा आता गावाबाहेरील कुणालाही प्रवेश देऊ नका. माझे दर्शन आता फक्त गावातल्यांनीच द्यायचे. हे तंतोतंत पाळले जाऊ लागले.

दिवस दिवस बोका पुटपुटत बसलेला असायचा. कधी जोरजोरात घंटाच वाजवायचा, कधी हातातला दोर कडकलक्ष्मीप्रमाणे स्वतःलाच मारायचा तर कधी खळद गावातून वाट्टेल तसा नाचत आणि भयावह चेहरा करत ओरडत फिरायचा. काही लहान मुलांना तर त्याची भीतीच बसलेली होती.

खळद गावात लाईटच नसल्यामुळे मोबाईल कधीच बंद पडलेला होता. अचानक गावात खजिना मिळाल्यामुळे जवळचा एक पोलिस पाटील दोघा तिघांना घेऊन चौकशीसाठी येऊनही गेला. पण नंतर खळद गावचीच एक मुलगी त्याच्या घरी नांदत असल्यामुळे आणि मिळालेला खजिना देवीचा असल्याचे सर्वानुमते ठरल्यामुळे तो चूपचाप परत गेला. जाताना मात्र मानाच्या बोकडावर भरपूर ताव मारून गेला.

बोकड मारल्यावर त्या मटणाच्या रश्याच्या झणझणीत वासाने बोक्यालाही कसेसे होऊ लागले. त्याने जाहीर केले, गावकर्‍यांनी स्वतःहून मारलेला हा मानाचा पहिल बोकड आहे. त्याचा प्रसाद भुत्याला द्यायला लागेल. त्या दिवशी बोका मस्तपैकी सूस्त होऊन झोपला होता.

पंचक्रोशीत आता 'म्हाराज' गाजू लागले होते. स्थानिक वर्तमानपत्रांनी स्तुतीचा व टीकेचा असे दोन्ही सूर लावून पाहिलेले होते. इकडे 'म्हाराज' अनेकांना रोगमुक्त करण्यासाठी औषधे सुचवत होते, मंत्र म्हणत होते! बरेच काय काय चाललेले होते. बोक्याला खळदमध्ये येऊन आता पंधरा दिवस लोटले होते.

हा 'म्हाराज' प्रकार आहे तरी काय हे पाहण्याची आता पंचक्रोशीचे राजकीय पुढारी अंबादास घुले यांना उत्सुकता लागली. ते दोन दिवसांनी येणार हीबातमी समजल्या समजल्या बोक्याने निराळाच अवतार धारण केला. बोक्याचा हा अवतार मात्र महाभयानक होता.

त्याने पहिल्यांदा रात्रभर जागून आणि विड्या ओढून डोळे लालभडक होतील याची खात्री केली. डोळे ताणून तो आता बघायला लागला. कंबरेचे धोतर सोडून त्याने कंबरेला चार केळीची पाने बांधली. उग्र चेहरा केला. जाळ वगैरे तयार केला. भाताच्या मुदी, कुंकू, हळद, लिंबे, काड्यांनी कवट्यांचा आकार वगैरे प्रकार करून एक रिंगण तयार केले. कुणी चौकशी केली की म्हणायचा...

"आजपासून पंधरा दिस काळूबाई खुद्द गावात येनाराय.... आन पंधराव्या दिसी पालखी हाय.. ती कुट्टं न्यायची ते ती आम्हाला सांगल.. तवर आमची पुजा हाय.. महाकडक पूजा... बाईबापड्याने यायाचं न्हाय हित्तं.. ल्हान पोरास्नी दूर ठिवा.. दर्रोज कोंबडं लागतंय.. सकाळ संध्याकाळ.. त्या सगळ्याचा हा खरीच बी घ्या हजार रुपयं.."

एवढ्या मोठ्या 'म्हाराजां'नी स्वतःच्या जेवणाचे पैसे द्यावेत हे कुणाला पटेना! 'लय फाइजेल तश्शी कोंबडी घालू की पायाशी द्येवीच्या' म्हणत गावकर्‍यांनी 'म्हाराजां'ना खुष केले. पण गेले पंधरा दिवस इथे पडीक असलेल्या माणसाकडे हजार रुपये आले कुठून हा विचार केला नाही.

इकडे बोका महाभयानक अवतार करून नाचू लागला. स्वतःभोवतीच घुमू लागला. गोल गोल फिरण्याचा त्याचा वेग चक्रावणारा होता. त्याला चक्कर कशी येत नाही हेच कुणाला समजत नव्हतं! सलग दोन रात्री बोका झोपलाच नाही, दुपारचा मात्र 'दमून पडल्यासारखा' दोन दोन तास पडून राहात होता. तेवढी विश्रान्ती त्याला पुरे व्हायची. गावकरी बिथरून बोक्याचे ते रूप बघत होते.

बोका कधी उंच उड्या मारायचा तर कधी लोळायचा. अनेकदा त्याने लोळतच देवळाला प्रदक्षिणा घातली. दोन हातांवर चालण्याचा प्रयोगही त्याने करून दाखवला. मात्र तो प्रयोग करण्याआधी तेवढे केळीची पाने काढून टाकून धोतर नेसलेले होते. त्यानंतर बोका तोंडातून अनेक अभद्र आवाज काढू लागला. मधेच एखाद्या गावकर्‍याला बोलावून त्याच्यावरून काहीतरी ओवाळायचा वगैरे! स्वतःभोवती गिरक्या तर शेकदो वेळा घेतल्या त्याने!

ही एनर्जी मानाच्या कोंबड्या आणि बोकड यांच्यामधून मिळत होती. नेता उद्या येणार हे समजल्यावर बोक्याने आज मद्याची मागणी केली. आता रोज तेरा दिवस भुत्याला मद्य लागेल हे त्याने स्पष्ट केले. त्यातच त्याने तीन तासांची सुट्टीही मागीतली देवीकडे!

देवी सुट्टीच देत नाही असे दाखवून बोका अत्यंत अभद्र स्वरात रडू लागला. अनेक गावकर्‍यांनी देवीसमोर करुणा भाकली. शेवटी अचानक बोक्याने आनंदाने आरोळी ठोकली. स्वतःच 'देवीने सुट्टी मान्य केल्याचे' जाहीरही केले. भर रात्रीच्या अंधारात तो गावातून गायब झाला. एकटाच! आणि भल्या पहाटे आला तेव्हा सगळे गावकरी जागेच होते.

तारवटलेल्या नजरेने दमलेला बोका पुन्हा घुमू लागला.

हे 'म्हाराज' नक्की कुठे जाऊन आले काही समजेना!

सकाळी दहा वाजता आलेल्या घुलेसाहेबांनी ते भयानक रूप पाहिले आणि डायरेक्ट हातच जोडले. घुलेला पाहून मात्र बोक्याचे घुमणे प्रमाणाबाहेर वाढले. माणूस अशा हालचाली करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसणेच शक्य नव्हते.

नेता आता समोर आला हात जोडून!

"काळूबाSSSSSSSSSSSSSSSSSय.. काळूबाSSSSSSSSSSSSय"

अशी गर्जना करून बोका भयानक उड्या मारत एका रिंगणाभोवती अती वेगाने गोल फिरू लागला. नेता आणि सगळेच गावकरी हादरलेले होते. अचानक नेत्यावर आणि गावकर्‍यांवरही नजर रोखत बोका हिसक नजरेने अर्वाच्य शिवीगाळ करू लागला. बावचळलेला नेता सगळ्यांकडे आणि बोक्याकडे बघत हात जोडू लागला.

"महाराज.. कोप झाला आस्संल तर माफी द्या.. काळूबाईला सोन्याचा गुलाब देईन मी..."

आजवर बोक्याला इतके हिडीस हासताना कुणी पाहिलेले नसेल!

अत्यंत हिडीस हासून बोका डोळे फिरवत म्हणाला...

"करताय त्ये करू नका.. करत न्हाई त्ये करा.. करताय त्ये करू नका.. करत न्हाई त्ये करा..."

दोन ज्येष्ठ गावकरी आणि नेता पुढे झाले.

"काय झालं काय म्हाराज??"

"काळूबाय संतापलीन... "

"का पर??"

"सात खोल्या बास... सात खोल्या बास.. आनि नगं ... आनि नगं..."

बोक्याचे ते बोल जमलेल्या सगळ्यांनाच असंबद्ध वाटले. पण त्याच्या चेहर्‍यावरचे पिशाच्चासारखे भाव आणि ते आकाशात पाहून डोळे गरागरा फिरवत घुमणे बघून काही बोलणेच शक्य नव्हते.

काही वेळाने प्रसादाचे मटण वगैरे हादडून नेता आणि त्याचे सहकारी निघून गेले.

अचानक बोक्याने जाहीर केले.

"भनी भ्येटनार म्हन्त्यात... आसलं आक्रीत कधी पाहिलं न्हाय म्या.. भुत्या आसून बी... अग अयायायायायायायाया... ह्ये काय ह्ये?? अयायाया..."

काय झालं तेच कुणाला समजेना!

बरीच चौकशी केल्यावर समजले.

पंधरा दिवसांनी येणार्‍या द्वादशीला काळुबाईला परिंच्याच्या म्हाळसाईला, म्हणजे आपल्या बहिणीला भेटायला जायचंय अस 'म्हाराज' म्हणतायत!

हसावं का रडावं तेच कळेना कुणाला!

हळूहळू त्या विचारावर खलबते होऊ लागली. बोक्याने किंकाळ्या फोडत पटवून दिले की काळुबाईची इच्छा डावलणे हा किती भीषण प्रकार आहे.

अत्यंत भयप्रद मनस्थितीत त्या रात्री लोक झोपले. त्या रात्री मात्र अतीश्रमाने बोकाही झोपला.

आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच एक समीती परिंच्याला गेली. आणि ती समीती परत आली तीच मुळी उजळलेले चेहरे घेऊन! अती कोपिष्ट काळूबाईला आपल्या गावात यायची इच्छा झाली हे पाहून परिंच्याच्या गावकर्‍यांच्या डोळ्यात भक्तीयुक्त पाणी आले होते. कधी एकदा काळूबाईची पालखी येतीय असे होऊन गेले होते. इतकेच काय, आजपासूनच त्यांनी म्हाळसाईला नटवायला सुरुवातही केलेली होती. आपल्या गावची म्हाळसाई ही काळुबाईपेक्षा कनिष्ठ आहे हे त्यांना माहीत होते. काळुबाई मोठी देवी! त्यामुळे परिंचा सजू लागला होता.

मात्र! बोक्याने सक्त ताकीद दिली होती. दोन बहिणींची भेट होईपर्यंत परिंचामधली शेळीसुद्धा चरतचरत खळदात येता कामा नये! आणि इथली तिकडे जाता कामा नये. माणसाची तर बातच सोडा!

आणि आज हा विलक्षण दिवस उगवलेला होता. बोक्याला साडी नेसवण्यात आली. काळूबाईनंतर बोक्याचीही आरती झाली. त्याला फुले वगैरे वाहिली. मानाचे दोन बोकड खळदातच पडले सकाळी सकाळी!

आणि एक ऐतिहासिक पालखी परिंच्याला निघाली. परिंच्याच्या ग्रामस्थांनी परिंच्याच्या वेशीवरच पालखीचे स्वागत करायचे होते. रस्त्यावर नाही.

या विलक्षण अभुतपुर्व सोहळ्याला आपण साक्षीदार असावे म्हणून घुलेसाहेबांचे सगळे कुटुंब आणि त्यांच्या मातोश्रीही परिंच्यात जातीने हजर होत्या.

मस्तपैकी पालखीत बसून बोका निघाला. कोण उत्साह त्या मिरवणुकीचा! 'आपण लग्न केलं असतं तर आपली अशीच मिरवणूक निघाली असती' हे बोक्याला समजलं! पालखीत काळूबाईची संतापी चेहर्‍याची मूर्ती ठेवलेली होती.

चार तासांनी वाजत गाजत पालखी परिम्च्यात काय पोचली आणि अक्षरशः रेटारेटी झाली. काही वेळ तर बोक्याला वाटले की आपल्यालाच खाली खेचून मारतात की काय? पब्लिक अक्षरशः आंधळं होऊन नमस्काराला झुंबड उडवत होतं!

आणि म्हाळसाइच्या मंदीरात काळूबाईने प्रवेश केला आणि फटाक्यांच्या माळा लागल्या. रेकॉर्डवर देवीची आरती सुरू झाली. खळद आणि परिंचे दोन्ही गावातील बायकांच्या भयानक अंगात आले. सगळेच थिजून तो सोहळा पाहात होते.

अचानक बोका विषण्ण झाला.

'काय झालं काय म्हाराज' हा प्रश्न पंचवीस वेळा विचारल्यावर त्याने उत्तर दिले..

"म्हाळसाई थोरल्या भनीला इचारतीय आहेर कुट्टं हाय??"

"आ?? पर आपन काय आनलंच न्हाई ना??"

"येडे का खुळे?? गावात सर्व्यात शुद्ध मनाची बाई कोन??"

"म्हन्जी?? समद्याच असतील की??"

"न्हाय... हितं दर्शनाला बोलावा बायांना.. आम्ही शुधतो..."

झालं! आता बायकांचीच रांग लागली. महत्वाच्या असल्यामुळे तिसर्‍या की चौथ्याच घुलेंच्या मातोश्री होत्या. त्यांना पाहूनच बोक्याने आनंदाने डरकाळी फोडली. त्या दचकल्याच!

"आई.... आई... आई..."

बोंबलत बोक्याने काळूबाई आणि म्हाळसाई या दोघींनाही घुले यांच्या मातोश्री दाखवल्या.

"ह्याच.... ह्याच... ह्याच त्या..."

शेवटी समजले. सर्वात शुद्ध अंतःकरणाची बाई 'म्हाराजां'ना लगेचच दिसलेली आहे.

तेवढ्यात बोक्याने सूचना दिली.

"हित्तं बी वढाय क्काय??"

"हाये की?? खळदाचाच वढा हित्त येतुय न व्हं??"

"थित्त जाऊदेत ह्यांना... आन खंदा थित्त बी...बाई.. तुम्ही हात लावून आरांब करा..."

काय होणार ते सगळ्यांनाच समजलं. घुलेंच्या आई तर देव भेटल्यासारख्याच तरातरा ओढ्याकडे निघाल्या.

घुलेंच्या आईंनी पहिली कुदळ घातली आणि दुसर्‍या तासाला पुन्हा जल्लोष झाला. उरलेले अर्धे दागिने घेऊन जनता आरोळ्या ठोकतच देवळात आली. तोवर 'म्हाराज' देवळातच घुमत होते. घुलेंच्या आई आणि बायकोने अक्षरशः लोटांगण घातले दोन्ही देवी आणि म्हाराजांच्या पायावर!

बोक्याने गर्जना केली.

"म्हाळसाईचा सम्दा आहेर देऊन टाकलाय काळूबाईने... "

पुन्हा जल्लोष झाला. मात्र बोका अचानक भेसूर रडू लागला.

काय झाले, काय झाले, विचारून पब्लिक दमलं तेव्हा बोक्याने भीषण आवाजात सांगीतले ...

"सात खोल्या हाईत काय राहत्या घरामंदी?????? आ???????"

त्या आवाजाने दचकून दोघी आधी पाहातच बसल्या. मग आईंनी मान डोलावली. होकारार्थी!

"मंग तितक्याच बास हाईत... हित्त नवीन घर बांधायचं काम न्हाई म्हणते म्हाळसाई... आन ते काळूबाईलाबी मंजूर हाये...ताबडतुब थांबवा त्ये... वंगाळ काम हाई त्ये..."

घुले परिंच्यात फार्म हाऊस बांधून त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओढ्याचे चक्क पात्रच बदलणार होते. ज्यामुळे दोन्ही गावांमध्ये पाण्याची वानवा झाली असती. पण घुलेंसमोर बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण खळद हे संभाजी बेके या सबइन्स्पेक्टरचे मुळगाव होते. म्हणजे त्याचे वडील तेथे जन्माला आलेले होते. त्यामुळे संभाजीने बोलता बोलता हा प्रॉब्लेम बोक्याला सांगीतलेला होता. बोक्याने दोन्ही गावांची माहिती काढून प्लॅन करून संभाजीला इतकेच सांगीतले होते..

"वेट फॉर अ मन्थ... आय शॅल मॅनेज इट"

'म्हाराजां'च्या आज्ञेमुळे मात्र तो निर्णय तिथल्यातिथे घेऊन टाकला मातोश्रींनी!

गावात जल्लोष चालूच होता. घुले मात्र निराश झालेले होते. पण त्यांची बायको आणि आई आनंदी झाल्या होत्या. तसेच सगळे गावकरीही!

आज रात्री 'म्हाराजां'ची पूजा होती परिंच्यात सगळे खळद परिंच्यातच जमलेले होते.

पण झाले काय ते कुणालाच समजले नाही. एक लाख रुपयांपैकी एक रुपयाही वापरावा न लागलेल्या बोका म्हाराजांनी परिंच्यातून कधी पळ काढला हे कुणालाच समजले नाही.

मात्र 'दिवे' पाशी येऊन त्यांनी पंधरा मिनिटे मोबाईल चार्ज केला एका टपरीवर...

आणि मग संभाजी बेकेला फोन केला..

"बोका बोलतोय... काळूबाई अन म्हाळसाई एक झाल्या....फार्महाऊस कॅन्सल..."

गुलमोहर: 

जबरी ...

बेफिकीर,

मला अजिबात नाही आवडली हि कथा, अतिशय far-fetched आणि बालिश वाटली. स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा.

पु.ले.शु.

अमित अरुण पेठे

mala vaatale yetheel ekaa vishishhTa sharaatalyaa vyaktinvar liheele aahe kaa?
pan naahe he vegaLe nighaale.

बेफिकिर जि
मस्तच ....खुप छान लिहिता तुम्हि.
य्हा वेलि बोका ला खुप उशिर केला.
अस करु नका लिन्क रहात नाहि.
टुमचे मनापासुन आभार!

धन्यवाद!!!:) Happy Happy

खुपच आवड्ली कथा. ३ वेळा वाचली. बोका खटयाळ आहे. मस्त युक्ती , आणी कल्पनाशक्ती आहे बेफीकीर तुमची.

बोकाssss