पहाटेचे पाच-साडेपाच झाले असतील तोच मोबाईल खडखड करत वाजू लागला.
"व्हुज धिस बास्टर्ड"
"ए जाड्या, मी आहे, शमी"
"पांडवांनी ढाल लुटली की काय"
"हे हे हे, आज नाही चिडणार मी, आज म्हण हवे ते"
"आयचा घो तुझ्या, झोपू दे, उगी डोक्याला का वात आणतेस?"
"ऐ ऐक ऐक ऐक.." अगदी काकुळता स्वर.
"बोल.."
"पक्या गेला.."
"कुठे?"
"गया वो, बाल्कनी का टिकट कटवाके"
"ए म्हशे, का खोबरं करतेस झोपेचं, मस्त सकाळ खराब केलीस साली"
"ए ऐक, पक्या गेला आत्ताच थोड्यावेळापुर्वी, ही इज नो मोर"
"व्हाट?"
"येस, मिहिरनेच दिली ही गोड न्युज"
"ये मुर्ख मुली, काहीतरी काय बरळतेस त्या सिंध्याला सोबत घेऊन? अन् यात गुड न्युज काय?"
"ओह.. वॉज ही युअर गुड फ्रेंड.. ओह सॉरी, सॉरी. बट आय अॅम हॅप्पी, यु नो व्हाय."
"या, आय नो.."
फोन कट करत एक अर्वाच्य शिवी घालत तिरमिरत उठलो. मोन्याला फोन केला.
"हॅलो,.. ऐकलं.. कसं? पण..?"
"मयताची तयारी करतोय.. दहापर्यंत.. त्याच्या घरचेही.."
"ओके.. आलो."
पक्या गेला? हॉऊ पॉसिबल? साला एवढा धटींग गेला? कसा? गेले तीनेक वर्षे बोलतही नव्हतो आम्ही.
"विक्षीप्त आहे मित्र तुझा" मन्याचे बोल आठवले.
अरे हो तीच्याशी बोलायला हवं. मोबाईल घेऊन फोन ट्राय केला.
दोन-चार फोन करून कंटाळलो, झोपली असेल मेबी.. असो.
पक्या यार, छ्या. एकदा बोलायला हवं होतं आपण. एखादी भेट हवी होती यार.. फक्त एखादी.
किमान तुझी आवडती दारू ढोसत तरी.
जुन्या आठवणींची धुळ झटकत नेहमीची कामे उरकू लागलो.
नवीन ओळख झालेली, एका एनजीओ.मधे काम करतानाची. ती एनजीओ नेहमीसारखीच गुंडाळली गेली काहीबाही कारणांनी. पण तिथे भेटलेले बरेच एकमेकांच्या जवळ आले, अगदी जिगरी यार वगैरे, पक्या त्यातलाच.
एकदा असाच संध्याकाळी फोन.
"काय कर्तोयस बे?"
"कै नै, मोकळाच, का?"
"भेट, दुर्गा समोर"
"दुर्गा? हे काय? कुठेय?"
"भडव्या, नाक्यावरचा बार आहे, ये लवकर."
"आलो.. पण.."
"ये झागीरदार, आल्यावर बोल, ये पटकन"
"आलो बे ***"
दुर्गासमोर स्वारी सिगारेटचे झुरके घेत उभी, एक मोठी शीळ हाणत मला इशारा केला. मीही हात हलवून येत असल्याची खूण करत रस्ता ओलांडला.
धप्पकन पाठीत गुद्दा हाणत बोलला,
"काय पार्टनर, दोन दिवस कुठं मेलेलास? चल आत चल"
गुद्द्यांची सवय झालेला मी गुमान आत गेलो, त्याच्या प्रश्नाला त्यालाच उत्तर नकोय हे नेहमीप्रमाणे कळून काहीच न म्हणता तो दाखवेल त्या टेबलावर बसलो.
"आज काय खूष एवढा, काय लॉटरी वगैरे"
"नाय बे प्रमोशन झालं, घसघशीत पगारवाढ, किती ते नको विचारू गप दारू पी माझ्या पैश्यानं"
"दारू नाही रे, बिअर मागव हवं तर.."
"काय शेळपट लेका, बिअर-टिअर सारखे बायकी षौक नाय बा पुरवायचो आपण, आणि कधीतरी मॅन हो.
यु नो डिफ्रंस बिटवीन मॅन अॅन्ड बॉय?"
त्याचं नेहमीचं वाक्य आठवून "माहित्येय रे.." म्हणत हसू आलं.
"मग?"
"ठीक, जशी आपली इच्छा"
"ओके"
पहीला घोट घेताच, कसंसंच तोंड करत पाह्यलं मी त्याच्याकडे.
स्वारी हसत हसत म्हणाली,
"ऐसा मूह मत कर मेरी जान,
जिंदगी बोहोत कडवी है, दारू उससे कई गुना मिठी!"
पक्या उर्फ प्रकाश चांदोडकर.
तो एकटाच म्हणजे एकुलता एकच. मोठ्या बहीणीच्या पाठीवर पाय देऊन आलेला. शेंडेफ़ळ म्हणून अजून एक बहीण. तर असा हा तो लाडात वगैरे वाढला असेल असेही नाही. लाड करायचे तर परिस्थितीही तशीच हवी याची अजाण वयात जाण आलेला. मनाविरुद्ध घडणार्या बर्याच गोष्टींना कुठेतरी मानणारा! मन मारायचं बाळकडू परिस्थितीसह सभोवतालकडून मिळवलेला. त्याला कधीच फ़ारसा आनंद होत नाही, कारण त्या आनंदातही दडलेली दुखा:ची दुखरी किनार बरोबर शोधून काढतो.
तर असा हा तो, वय वर्षे अमुक-तमुक. असंच पुन्हा एकदा म्हटला,
“बैस; माणसाला कुठेतरी जागा हवी असते, पोट मोकळं करायला. आत्ता जबरी ढोसलीये अन् तुझ्याशी खूप बोलावसं वाटतय यार. माझ्या काही आठवणी सांगतो, पटल्या तर हुंकारत जा नाही तर थांबव!
मी लहान असतानाची गोष्ट, बाप आत्ता मी आहे त्या वयाचा असेल . मी तेव्हा तीनेक वर्षांचा. आई चुलीपुढे काहीतरी रांधतेय अन बाप शिव्यांची लाखोली वाहत तणतणत येतो न तिच्या पेकाटात लाथ. मला म्हणे काहीच सुधरलं नाही. त्याच चुलीतलं जळतं लाकूड बापाच्या पोटरीवर हाणलं. टम्मकन पांढरा फ़ोड तरळला पोटरीवर. बाप हात वर करून धावतो तोच आज्जीनं पोटाशी धरलं. बापानं मारलं नसतंच.
त्यानं कधीच हात लावला नाही. शाळेत मास्तरांसमोर पोरं जशी उभी राहतात तसा वागायचा माझ्याशी. मला लाज वाटायची. तुझंच रक्त ना मग इतका हरल्यासारखा दीन का उभा असतोस तेही बाप म्हणून?
त्याला खुपायचं सतत, का केलं लग्न, का ही पोरं. कसे पुरवू त्यांचे हट्ट. त्यांच्या गरजा. मला शाळेत फी ला द्यायला पैसे नव्हते भरायला म्हणून आठवडाभर दारू पिऊन यायचा. माझ्याकडे न बघता काहीबाही खाऊन गप पडायचा. मी नसलो की आईवर मनसोक्त हात उचलायचा. सगळ्या जगाचा राग काढायची ती एकच जागा. तिथं तो मोकळा व्हायचा. मग पुन्हा तिच्याच जखमांवर मलम लावत, फ़ुंकरा देत तिच्याच कुशीत लहान होऊन रडायचा. आमच्यापेक्षा तिला तोच तिचं मूल वाटायचा.
कित्तीही प्यालेला असो, न जेवता त्याला झोपू द्यायची नाही. मला खूप राग यायचा तिचा. पण तिनं करुण नजरेनं माझ्याकडे पाहिलं की मी गप राहायचो. तिनं जाम बदडलंय मला. १२-१३ वर्षांचा होईपर्यंत रोज न चुकता मार खायचो. तिनंच बदडून बदडून शेपूची भाजी खायला शिकवलं. बराचसा स्वयंपाक शिकवला. प्रार्थना, श्लोक, रामरक्षा, १२ वा आणी १५ अध्याय तोंडपाठ करून घेतला. जेवणाधी ’यज्ञशिष्टा’ शिकवलं. ’लता’ अशी तर ’रफ़ी’ तसा ऐकावा इथपासून बोलताना कोणत्या शब्दांवर किती भर द्यायचा, स्वर, उच्चार सगळं सगळं शिकवलं.
शेजारच्या रघुची गोरीपान बायको भल्या पहाटे उघड्यावर अंघोळ करायची. मी चोरुन पहायचो. तिला सापडलो एकदा. काय धरुन तुडवलेलं तिनं!
तिनं इतकं मारलं पण तीच हवीशी वाटायची, बापाबद्दल काही काही नाही. “त्याचेच बरेच गुण आहेत तुझ्यात, माझे फ़ार कमीच!” नेहमी सुनवत असते. शेवटी सोडलं रे ते घर. कंटाळलो होतो. तसेही बाईला पोरापेक्षा नवरा जवळचा. त्या घराला माझ्यापेक्षा पैशाची गरज होती. दहावी झाली, घराबाहेर पडलो. असाच पार्टटाईम/फुलटाईम जॉब करत करत रात्री-अपरात्री कॉलेजच्या पायर्या चढल्या.
सगळं करत इथवंर आलो. हल्ली जातो घरी, पैसे देण्यापुरते. अन् काही म्हण, आईला पहावसं वाटतंच.
तीच्या ओच्याला असलेला वरणाचा, फोडणीचा वास आजही पागल करतो यार मला, मग ढसा-ढसा रडतोच!"
पक्या येड*वाच! कधीही रात्री एक-दिडला फोन करणार.
हॅलो वगैरे भानगडी नाहीतच, डायरेक्ट हेच पेटंट वाक्य.
"काय कर्तोयस?"
"अबे ***, रात्री या वेळी काय भजी तळणार?"
"हा हा हा.. चल लोहगडावर चाल्लोय"
"हम्म.. आलोच.."
"मग; मला माहित्येय रे आख्खी दुनियामे यही एक लंगूर हा कहेगा.. ये ये..."
"...."
रात्री कधीही फोन करूदे त्याने, ट्रेकिंग तीही त्याच्यासोबत तेही रात्रीअपरात्री.. माझ्याही प्रचंड आवडीचं!
मस्तपैकी बाईक काढायची, सुसाट पळवत दोन-अडीच तासात मळवळीत. गावातले बरेच ओळखीचे, कुणाच्याही अंगणात उभी करायची अन् गड चढायला सुरूवात. कधीकधी मागे सूर्य चढायची चाहूल सोबत आम्हीही.
कधी-कधी बाय ट्रेन लोणावळा मग लोहगड, विसापूर किंवा राजमाची. कधी हुक्की आलीच कि कामशेतवरून तुंगा, तिकोना. सगळा प्रवास रात्री. त्याला सापांची भीती वाटायची, मग हटकून मला म्हणायचा,
"ए कोकण्या हो पुढं, तुम्ही साले पैदा झालात की आधी साप मारायला शिकता मग ** धुवायला!"
एखादी बॅग सोबत त्यातही पाण्याची बाटली घेतली नाय घेतली. कधीमधी बिस्किटं. पण सिगारेटची चार-पाच पाकिटं आणी माचिसी असायच्याच. कितीही थंडी वाजूदे, पण शेकोटी नाय करायची. सिगारेटी ओढ हव्या तर नाहीतर गड चढ-उतर दहावेळा, पण शेकोटी नाही.
एकदा वलवण डॅमच्या डोंगरावर मित्रांसोबत तो गेलेला तेव्हा चूकून त्याने थोडे गवत जाळलेले. विझवु विझवु म्हणता आग वाढली न हाताबाहेर गेल्याने पळ काढावा लागला.
"त्या आगीत काय काय जळालं असेल रे?" खरंच असले प्रश्न फक्त त्यानेच विचारावेत.
त्याचे फण्डेच जबरी असायचे एकेक. त्याचं पहिलं वेड म्हणजे पुस्तकं. मग नाटकं.
"साल्या तुम्हाला काय माहिती रे श्याम मनोहर, एलकुंचवार किंवा सदानंद देशमुख काय लिहतात ते. अलका कुबल छाप कथा-कादंबर्यांचे फॅन तुम्ही, सोडा रे"
"लेका पुस्तकं विकतच घ्यावीत माणसानं, लायब्ररी वगैरे पेशन्स असणार्यांचे धंदे"
किंवा
"अबे, नाटकं बघायला नाही आवडत पण वाचायला आवडतात? अजबच! आणि गेलाबाजार चार-दोन नाटकं नाही रुचली म्हणून पाह्याचीच नाहीत या शपथा का म्हणून. अरे लेका, ती वाचायला आवडतात म्हणजे त्यातलं प्रत्येक पात्र तू हवं तसं तुझ्या कुवतीनुसार रंगवतोस, खरं ना? मग एक सांग जेव्हा एखादा नट वा नटी तेच पात्र तुझ्या कल्पनेच्या दसपटीनं उत्तम रंगवतं अन् त्यावेळी आपसूकच बोटं तोंडात घातली जातात ही महानच गोष्ट नाही का? शिंच्याओ, कोरं होऊन बघा कि दुनिया दरवेळी, बघ कशी आयटम दिसल ती!"
अशीच काहीशी वेगळी मतं पोरींच्या बाबतीत.
"साला बाई म्हणजे पिडा, टाळता आली तरी अन् नाही टळली तरी"
त्याची पहिली अन् शेवटची गर्लफ्रेंड म्हणजे शमी. कसे राहिले दोन वर्षे एकत्र देवाला ठाऊक?
हा म्हटला "खूप झालं, आता इतकं मर मर मरून घर घेतलं, वर्षभरात पजेशन मिळेल, आता लग्न करुयात"
हिची टाळाटाळ, घरी सांगते, जात, प्रांत, वगैरे वगैरे. जसा तू तसे ते. त्यांना दुखवून तुझ्याकडे कसं येऊ?
शेवटी मोडलंच. त्याच रात्री फोन,
"काय कर्तोयस बे?"
"आवरतोय, तीन-चार दिवसांसाठी टूर वर जाणारेय, तयारी चालूये"
"मला वेळ देता येईल का थोडा?"
"सोट्या, इतका नम्र? बापाने येऊन धुतला कि काय?"
"श्राध्द घालायचंय"
"काय? कुणाच?"
"शमीच"
"ह्म्म.. म्हणजे मोडलं वाटतं एकदाचं. ऐक, देवदास वगैरे नको होऊस, मी भेटतो रविवारी"
"ए, येतोस का नाय बोल, १२-१ पर्यंत जा लगेच"
भरपूर प्यायला त्या रात्री तो, खूप रडला अगदी लहान मुलासारखा. मी आउटच. माझेही डोळे भरले होते. बस्स तेवढंच! नंतर शमी या विषयावर एक थेंब घेतला नाही कि काढला नाही. अगदी खर्यार्थाने श्राध्द घातलं त्याने.
तिनेच दोन-तीनदा पुन्हा भेटायचा वगैरे प्रयत्न केला. त्याच शमीला आता सिंधी बॉयफ्रेंड चालतो, तिच्या घरच्यांनाही. १५ खोक्यांचा व्यवसाय आहे म्हणून? आणि हा गेला म्हणून इतका आनंद? का?
नंतर चार-सहा महिने बरा होता, बरा कसला मजेतच. मधेच भेटला एकदा,
"घरचे लय छळायला लागलेत बघ"
"का?"
"वंशाला दिवे हवेत म्हणे, दिवट्या दुसर्याघरी खपतील.
साले, बापाच्या आज्जाचं नाव कसंबसं सांगतील हे त्यापलीकडे अंधार अन् म्हणे वंशाला दिवा!
अरे नात्यातलं एक लग्न म्हणून दोन एक दिवस आधी बोलावलं. घरी एक पोरगी आणून ठेवलेली. दूरच्या नात्यातली कुणीतरी. चहा हवा हीच समोर, जेवणाला ही.. अरे काय? आईकडे पाहिलं की हसायची गालातल्या गालात. बापाला काय सुतंकच सगळ्याच. अन् ती बया तर अशी वागायची की जणू माझ्या नावाचं लायसन्स घेऊन नांदातेय इथं. कावलो यार जाम, कसा आलोय माझं मला माहीत्येय!"
"अरे पण लग्न कधी करणारच नाहीस का?"
"तसं नाही रे, पण ही कोण दहावी-बारावी नापास, बरं त्यात पुन्हा चार सहा वर्षे घरात बसून राहीलेलं(राहिलेलं) शेवाळ.
अरे दिसण्यापेक्षा असण्याला महत्व नको का? अन् लेका रात रंगावी वा वंश वाढावा म्हणून लग्न नकोच, पण नेमकं का तर तेही उत्तर पुसलं गेलंय बघ. पण आता नको वाटतं एकटं राहणं..."
"खरंय रे, मग तूच शोध की?"
"अरे, इथे आहेत काही नातेवाईक माझे, तेही पाहत आहेतच, घरही येईल हातात आता पाच-सहा महिन्यांत. तोवर थोडी सेवींग देखील होईल. अन् हो बायको कमावतीच हवी हे ही ठासून सांगून आलोय घरी."
मग बरीच बघाबघी झाली वगैरे. पण याच्या व्यसनांपायी कुणी पोरगी देईल तर शप्पथ.
मध्यंतरी असाच भरपूर पिऊन येऊन स्वगत बडबडून गेला.
"साला १६व्या वर्षी घराबाहेर पडलो. काहीतरी करायचं वगैरे जिद्द-बिद्द नाही तर उपाशी मरायचं नाही हेच ठरवून.
मग वाटेल त्या भेटेल त्या नोकर्या केल्या. अगदी भंग्यापासून सिक्युरिटीपर्यंत. साला त्या स्ट्रगल पिरीयड मधे जे काही शिकलो ना तेच शिक्षण! मुंबई ग्रेट रे! इधर दुनिअयादारी सीखता है आदमी, जो कही भी जिंदगी गुजारनेके लिये काफी है! एक भैय्या भेटलेला पहिल्यांदाच. त्याचा फेमस डायलॉग,
'बंबई मे ** और पैसा उडता रैताय, बस्स पकडनेवाला मंगताय'
आपल्याला दोन्ही गोष्टींशी फारसं देणं-घेणं नव्हतंच. अडमाप पैसा कमवावा वगैरे वाटलंच नाही कधी. जे काही ते स्वत:साठी. बस्स. साला पुढच्या सात पिढ्यांचा विचार करणारे चुतीयाच! अबे मी माझ्या पुढच्या पिढीचापण का करू विचार? त्यांना कमवू दे ना त्यांच्या हातांनी. त्यांच्या भविष्यासाठी मी माझा वर्तमान का उध्वस्त करावा? फार पूर्वी शेती, मळे, खळे सारं सारं होतं. वडिलोपार्जित काय मिळायचं तर त्यांनी पोटासाठी घेतलेलं शिक्षण. बाकी सगळं स्वतःच करावं लागायचं ना? तेव्हा माणूस सुखी नव्हता(?) अरे माकडांनो तोच मानवी इतिहासाचा सुवर्णकाळ!
बालपण असं लाभलंच नाही, तारुण्यही असंच निसटणार की काय कुणास ठाऊक?
झिजलोय रे मी स्वत:साठीच. पण समाज नावाच्या गोष्टीचा त्रास होऊ लागलाय.
अरे वयाची २५ शी ओलांडली. ह्यांच्या भाषेत बस्तान बसवता बसवता दमछाक झाली. साली कालची झ्याटभर पोरं पोरींना घेऊन गाड्यांवर फिरतात तेही बापकमाईवर. मग माझ्याच आपकमाईनं काय घोडं मारलंय?
म्हणे जात, घराणं हवं, घर हवं, नोकरी हवी. च्यायला माझ्या गोठ्यातला वळू बरा माझ्यापेक्षा! साला दोन शब्द सुखानं बोलणारं नाही कुणी की ऐकणारं. रात्र आली की नको नको होतं. अजून किती वर्षे फक्त कविताच लिहायच्या? मागे एक शाणा भेटलेला, चल म्हटला. मीही उत्सुकंच होतो, संधीच मिळत नव्हती अन् अशा जागी माहीतीशिवाय जाण्याची डेअरिंगही नव्हती. वाईट्ट अनुभव लेका! आईरक्ताशप्पथ, मित्रा उलटीच आली रे सगळं पाहून. बाईचं असलं रुप नाही पाहवंत. तो निव्वळ यांत्रिक भाग नाहीये. एकमेकांबद्दल प्रेम हवंच, किमान ओढ तरी! छ्या, वाईट वाईट्ट अनुभव.
असह्य कोंडमारा होतो रे हे सगळं आठवून. मग माझी सिगरेट लय प्यारी!"
नंतर पुन्हा भेटला,
"अरे हे लग्नाचं मार्केट म्हणजे जुगारच बघ. एक-दीड वर्षापूर्वी एक स्थळ पाह्यलं होतं मामेभावासाठी. पण पोरीचा बाप म्हणाला, पोराचं मुंबईत घर हवं नाहीतर अशक्य. साला, स्वत: व्ही.आर.एस. घेऊन झाल्यावर घर घेतलं अन् भावी जावयाकडून ही आशा? असो.
एक स्थळ आलंय म्हणे, बॅंकर आहे, गोड पण अन् हो एकदम बिंधास! अरे नातेवाईकांनी सांगितलेलं पोरगं चांगलय, कशाचं व्यसन वगैरे नाही. मला खटकलं. मनाचा हिय्या करून गाठलीच तिला बॅंकेतच.
म्हटलं, बाई गं, मी आहे व्यसनी माणूस. दारू अन् सिगारेटशिवाय पान न हलणारा.
काय हसली बे सॉल्लीड, एकदम 'अशोक सराफ' म्हणतो ना सॉल्लीड तश्शीच!
म्हणते कशी, माहित्येय मला, माझ्या घरच्यांनी तुझी गावाकडची पत्रिका
पण मला आवडलास तू, व्हाय कॉज यु आर सेल्फ मेड!
आयला अवघडच बे, कोण कसं काय घेईल पत्ताच लागत नाय."
एकंदरीत, स्वारी खुषीत होती तर.
पुढे तेही मोडलं.
सतत म्हणायचा, "मोडणारंच होतं"
"का?"
"माहीत नाही पण हे होणारंच होतं"
तिथंनंच सटकत गेला तो. एकटेपणा वाढू लागला. भेटणं टाळायचा. एक-एक धागे तोडतोय असं जाणवायचं आम्हा सगळ्यांना. बाकी इतरांशी काहीना काही वाकडं होतंच. नव्हतं त्यांच्याशी सुरू केलेलं. मनुलाही असंच काहीसं म्हटलेला. हिने विचारलं, 'काय रे पक्या किती ह्या सिगारेटी? दिवसाचं टार्गेट काय?' तर म्हणे 'अख्खी माचीस'
ही म्हटली 'काय?' तर बाजीराव उद्धटून म्हटले,'तुझ्या बापाला तरी माहीती आहेत का एका माचिसीत किती काड्यात त्या?'
झालं, हिनं 'विक्षिप्त' लेबल देऊन माझा एक दिवस नर्क करून सोडलेला.
मलाही दूर लोटतोय हे कुठेतरी जाणवू लागलेलं, पण त्यालाच ते त्रासाचं होत असावं बहुधा म्हणून शांतच होता.
तीही वेळ आलीच. अगदी सामान्य, क्षुल्लक गोष्ट. दोन-चार दिवसांची सुट्टी म्हणून मी गावी निघालेलो. हाही मोकळाच. म्हटलं चल जरा बरंही वाटेल. गुहागर, गणपतीपुळेही फिरून होईल. आला सोबत.
दोनेक दिवस खुष होता. एकदा सकाळी मी अंघोळ करतानाच वडिलांनी आवाज दिला.
"कसला रे हा तुझा मित्र? माझ्या ओसरीत बसून सिगारेटी फुंकतोय. मी ओरडलो तर म्हणे 'व्यसन' आहे.. अजून काहीकाही बोलला. आत्ताच्या आत्ता नीघ त्याला घेऊन. पुन्हा कुणाला आणशील तर याद राख"
गरम पाण्याने अंघोळ करणारा मी जागेवर गारच! आई-बापाच्या नजरेला नजर न देता कसेतरी सटकलोच.
खूप खूप राग आलेला.. नीट बोलताही येत नव्हतं.
"यु स्क्रूड मी मॅन"
फक्त बेरकी हसला. जाम राग आलेला माझा माझ्यावरंच! दुर्दैवाने तेच आमचं शेवटचं संभाषण. संपूर्ण प्रवास मुक्यानंच केला आम्ही. त्याच्या चेहर्यावर कसलीच खंत, दु:ख काही काही नव्हतं. त्याच्याकडे पाहिलं की संताप उसळू उसळू वाहायचा. संपूर्ण प्रवासात कितींदा डोक्यावर पाणी ओतलं असेल स्वतःच्या ते धड आठवतही नाही.
पण आज तो चेहरा येतो समोर. तेव्हाचा संताप, राग कुठच्या-कुठे गेलाय. अनुकंपा भरून राहीलीये. त्याला तसाचं मिठीत कोंबायला हवा होता. नको यार नको असं वागूस, नको दूर दूर जाऊस असं सांगायला, पटवायला हवं होतं. चुकलंच माझं. पक्या माफ कर रे!
एवढं सगळं होत असताना त्याचं काम मात्र ठीक चाल्लेलं. कामात हयगय नव्हती. वागण्यात हेकटपणा, रुक्षपणा आलेला. हाताखालच्यांशी प्रचंड अरेरावीनं वगैरे वागतो असंही ऐकलेलं. कंपनीच्या मालकाच्या खास मर्जीत असल्यानं कुणी बोलायला धजत नव्हतं.
प्रचंड आउटडोअर करायचा. मी चार-पाच वेळा भेटायला गेलोही नंतर न रहावून. एकदाही भेटला नाही. फोन, एसेमसला उत्तरं नाही. अगदी शिव्यांच्या लाखोल्यांपासून सेंटी मेसेजेस पर्यंत हजार उपाय झाले. गडी बधला नाही.
पक्या बदलला होता. माझ्यासाठी अनोळखीच झालेला. दुरावलेला.. कायमचाच!
माझंही ऑफीस बदलल गेलं. कामं वाढली, व्यापही.. मेबी त्याचेही. मग भेटणं खुंटलंच, बंदच!
मीही वर्षभरात विसरलो गेलो सगळं. अधेमधे यायचं कानावर तेही कमीच झालं.
अन् सकाळी ही बातमी.
हताशपणे केबीन बाहेर पाहीलं. ऑफीसात असल्याचं भान झालं.
म्हणजे या विचारांच्या गुंत्यातच आपण त्याला मूठमाती देऊन आलो? अगदी यांत्रिकपणे सकाळपासून वागत आलो? किती वाजलेत म्हणूनपाहिलं तर दुपारचे तीन!
अरेच्चा! कसला दिवस आजचा? फोन पाहिला, प्रचंड मिस्ड कॉलचं जाळं दिसलं. रेड कीने झटक्यासरशी साफ केलं. ही काय करतेय अजून पहाटे फोन केलेला.
"कुठेयस?" रागावर नियंत्रण ठेवंत विचारलं.
"मेसेज पाहिलेस? नसशीलंच. सकाळीच कामावर जाण्याधी केलेला, आज महत्वाची मिटींग आहे, तीन पर्यंत संपेल. संध्याकाळी नेहमीच्या जागी भेटू म्हणून."
"सॉरी"
"ओके पिल्ल्या, भेट लवकर"
"हो गं माऊ, ये लवकंर, वाट पाहतोय"
प्रचंड थकवा आलेला. म्हणजे आज अजून पोटात काहीच नाही? कसाबसा उठून पँट्रीत गेलो. एक सँडवीच मागवलं, एक कॉफी. थोडं बरं वाटलं.
काम तर काहीच नाही झालं आज, चला निघायची तयारी करूया. नेहमीच्या जागी म्हणजे तासभर आधी निघायलाच हवं. अन् साला मी एकटा सोडलो तर सगळेच नॉर्मल आहेत. बहुतेकजण खूषच.
त्या बहुतेंकात मन्याही असेलंच. आत्ता भेटेल, ढो ढो कॉफ्या घेईल. दोन-चार वाक्य फेकून मारेल. मग निघाली.
कधीमधी तिलांच वाईट वाटेल, मग थोडा रडका आवाज, सॉरी वगैरे. दुखंलं का माझ्या पिल्ल्याला? वगैरे वगैरे.
पुन्हा तेच. गेली चार वर्षे हेच! दोघेही सेटल आहोत आता. पण लग्न नकोच इतक्यात म्हणे. मलाही काहीतरी वेगळंच वाटतं लग्न म्हटलं की. साला आमचा ऑफीस्बॉय रवी भारी मग! ६-७ हजार पगार असताना लग्न काय करतो, ऐटीत डबा घरचा म्हणत आवडीनं काय खातो. जळते साली अशा प्रत्येक क्षणाला. तिला सांगितलं तर वेडगळ हसंतच सुटली. कुणाशी तुलना कर्तोयस तू वगैरे वगैरे.
जाऊ दे जे होईल ते होईल. घरचेही नमलेत आता, काशी कर म्हणून शांतच झालेत, पाहू!
नेहमीच्याच खुर्चीवर बसलेली दिसली.
"कधी आलीस?"
"जस्ट"
"कसा आहेस?"
"..."
"वाटलंच. सकाळीच झापलं शमीला. असो, फार वाईट झालं रे. पण काय करू शकतो आपण?"
"..." मी आपलं उगीच डोळ्यांच्या कडांना रुमाल टेकवंत शांतच.
"काय घेणार?"
"नेहमीचंच"
"काही खाल्लंस?"
"ब्ब..:" माझा बांधच फुटल्यासारखं झालं.
" ए वेड्या पिल्ला, मी आहे ना? हंम्म.. मग? शांत हो पाहू."
कसाबसा कढ आवरंत धुतल्या डोळ्यांनी पाहीलं(पाहिलं) तिच्याकडे.
"खरंच खूप आधार वाटला बघ तुझ्या नजरेनं"
हळूच मऊ तळव्यानं माझा हात दाबत थोपटलं तिनं.
काही क्षण असेच गेले.. शांत शांत. मैफील, टाळ्या सगळं सगळं संपलं की कसा एकच क्षण असतो अगदी श्वासांचाही ध्वनी न येणारा.. तसंच काहीसं.
कॉफी संपवता संपवता विचारलं तिनं.
"तुला आजंच कळलं?"
"म्हणजे..?"
"तू वेडा आहेस? नेम़कं काय झालं विचारलंस कुणाला?"
".. खरंच"
"मलाही आजंच कळलं, सगळी माहिती काढलीये. पण मोन्याला माहीत होतं. काल दुपारीच आणलेलं. तोच जवळ हॉस्पिटलात त्याच्या. लोहगडावरून पडला म्हणे. मोन्याने तुला फोन व एसेमस पण केलेत, नसशीलंच पाहीले!"
"आईग्ग.. काल त्याचा फोन येत होता दुपारी. क्लायंटसोबत होतो. उचलूही शकलो असतो पण त्याच्याशी नाही वाटत बोलावसं.. चुकलंच!" म्हणत फोन चेक केला. मोन्याचे ६ मिस्ड कॉल. २ एसेमस. एकात तो अॅडमीट तर दुसर्यात गेल्याची खबर.
"काय करतो यार मी हे.. असं कशानं झालं गं. खूप दमलेलो काल. नाही पाहिले एसेमस, अन्..."
"कूल डाऊन. होतं व्यापात बर्याचदा. स्वतःला दोष देणं बंद कर. बाय द वे, दुसरी गोष्ट माहीत्येय?"(माहित्येय)
"आता काय?"
"दॅट वॉज नॉट अॅन अॅक्सीडेन्ट ऑर सुसाईड.. इट्स प्री-प्लान्ड मर्डर!"
"व्हाट? व्हो आर दोज बास्टर्ड्स?"
"पोलिस चौकशी करतायत. माझी मैत्रीण आहे एक तिचा कुणी नातेवाईक आहे एका पेपरात. नेमकं फार नाही कळालेलं अजून पण पक्याच्या मोबाईलवरून शोध लागला म्हणे"
"कसं काय? तो कधी फोन न्यायचाच नाही ट्रेकिंगला. त्याला नाही आवडायचं. तुझ्यासाठी म्हणून माझा फोन खपवून घ्यायचा."
"तेच तर, याने त्याच्या एका कलीगला एसेमेस केलेला 'निघालोय' म्हणून. पुढे फोन घरीच हा गेला"
"म्हणजे त्याच्या कामातल्यांनीच..?"
'येस, अजुनतरी हेच दिसतंय, एक-दोन दिवसात कळेलच"
"पण का?"
"व्हु नोज? अन् हा छळायचा म्हणे त्यांना.. कदाचित.."
"सगळा पोरखेळ रे.. तो तर गेलाच आता हेही लटकले"
"असो.. निघूयात?"
"हं.. ओके."
तिच्या बिल्डींग जवळ पोहचलो. जवळ येत म्हटली, "सरळ घरीच जा. खाऊन घे अन् आराम कर. उद्या भेटतेच. अजून एक, त्याचं लोहगडावरचं ऐकून पोटात धस्स झालेलं माझ्या. खरंच खूप प्रेम करते रे तुझ्यावर. असा रात्री अपरात्री नाही ना जाणार आता?"
"नाही गं.. कधीचं नाही. मलाही हल्ली स्वतःबद्दल काळजी वाटू लागलेय. तो बेडरपणा कधीच निघून गेलाय.
आत्ताच सहा महिन्यांपूर्वी घरी गेलेलो. गाडीला खूप उशीर झाला. रात्रीची शेवटची एस्टी निघून गेलेली. तडक बॅग खांद्यावर अन १८ किमी चालत घरी. तब्बल तीन साडेतीन तास लागले त्या प्रचंड जंगलातून अंधारातून.
जाताना काहीच नाही वाटले. सकाळी नुसत्या विचाराने थरकाप झाला. आई तर चिडलेलीच. एकटाच आहेस म्हणून हा माज. हेच बाई घरात असती तर नसतास केलास. दिवसभर तूच डोळ्यांसमोर."
"थँक्स.. रे! उद्या भेट नक्की, वाट पाहतेय. अन् हो, मला माहित्येय तू कुठे जाणारेस ते. मी अगदी काहीही केलं ना तरी फरक पडणार नाहीच. कमी ढोसा. उद्या भेटा. कुणीतरी काळजी करतंय हे लक्षात असुद्या!"
"बाय.. बाय"
घरासमोरच एका बारमधे शिरलो. पक्याची आवडती ऑर्डर केली.
एक घोट घेतला. गिळला नाही, नुसता रेंगाळत ठेवला. पुन्हा पक्या आठवला.
"दारू चवी चवीनं प्यावी माणसानं. चढते म्हणून गटागट पिण्यात काय अर्थये? मस्त रेंगाळली पाहीजे. कडवटपणा एकदा रेंगाळला की त्याची धुंद वेगळीच! रसिक असणं अन् बनू पाहणं यात लय फरकये बेट्या!"
पक्या पक्या पक्या! दिवसभर डोक्यात हेच! मेला साला स्वत:च्या कर्माने, माजाने.. येस्स माजानेच!
त्याचंच वाक्यं होतं ना,
"माणूस साला त्याच्या माजावर जगतो, किमान तसं जगावं तरी.
ज्यादिवशी माज संपला, संपून जावं."
समाप्त!
मयूरेश चव्हाण, मुंबई.
२०.०१.१०, २३.२८.
छान मस्त....
छान मस्त....
आवडली!
आवडली!
भारी!
भारी!
छान रे.
छान रे.
आवडली
आवडली
आवडली
आवडली
आवडली. <<बापाच्या आज्जाचं नाव
आवडली.
<<बापाच्या आज्जाचं नाव कसंबसं सांगतील हे त्यापलीकडे अंधार अन् म्हणे वंशाला दिवा!>> हे फारच पटलं.
सर्वांचे मनापासून आभार!
सर्वांचे मनापासून आभार!
रसिक असणं अन् बनू पाहणं यात
रसिक असणं अन् बनू पाहणं यात लय फरकये बेट्या!>>>> सहीच.
साले, बापाच्या आज्जाचं नाव कसंबसं सांगतील हे त्यापलीकडे अंधार अन् म्हणे वंशाला दिवा!>>>> खूप हसले या वाक्यावर. जितकं पटतं तितंकंच हसूही येतं. मस्त पंच.
सर्वात जास्त काय आवडलं असेल तर कथेचं नाव. काही भाग खरंच अप्रतिम. ते स्वगत वगैरे प्रकार सुरेखंच.
तरीही बरंच काही खटकतं. असो, आवडली.
आवडली
आवडली
जबरी जबरदस्त पंचेस....
जबरी
जबरदस्त पंचेस.... साठवुन ठेवतो
वाहवत गेलो रे तुझ्या
वाहवत गेलो रे तुझ्या लिखाणाबरोबर........., कधी गुंतत गेलो कळलेच नाही ! आवडली
खुपच मस्त लिहीलीये...आवडली
खुपच मस्त लिहीलीये...आवडली
मस्त जमलीये..
मस्त जमलीये..
सर्वांचे मनापासून आभार. @
सर्वांचे मनापासून आभार.
@ विशालभाऊ,
कधीकाळी सलीम-जावेद
कधीकाळी सलीम-जावेद स्क्रीनप्ले लिहायचे आणि आजकाल नीरज व्होरा पण लिहितो...
दोघं आठवण्याचं कारण म्हणजे पिक्चर संपल्यावरसुद्धा डोक्यात तरळत राहणारी वाक्यं. फरक इतकाच की काही वाक्यं पुढची रीप्लेसमेंट मिळेपर्यंतच लक्षात राहतात आणि काही वर्षानुवर्षे.
तुला जर भेळ बनवायची होती तर झकास आहे! बंबई स्पेशल भेळ नावाला साजीशी! पण भेळेची चव पाणी पिल्यावर उरत नाही असेच काहीसे या कथेचे. जबरदस्त फ्लो आहे. मस्त मस्त वाक्यांची पेरणी आणि आजची, आपली भाषा हे सगळे प्लस पण तोच तोच बाप, तीच तीच आई, तेच तेच मित्र, ठोकळेबंद पोरी आणि सगळ्यात घुसमटणारा आणि तरीही सोडून बाहेर न पडू शकणारा नायक...
वेगळं करायचंय आणि तरीही वेगळी न होऊ शकलेली कथा एवढंच हाताला लागलं शेवटी...
जियो संदिप ...परफेक्ट कॅच..
जियो संदिप ...परफेक्ट कॅच..
संदीप, सही रे. कसलं युनीक
संदीप, सही रे. कसलं युनीक लिहतोस!
हे जे काही लिहलंय ना ते लिहून झाल्यावरही एक सल, बोच होतीच. ते फसलं, नाही फसलं कि उत्कृष्ट्/बेकार याचा विचार नाहीच. पण मोकळं वाटत नव्हतं काहीतरी रुख-रुख होतीच.
थोडंतरी बरं वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून! थँक्स यार!
सोनारानं टोचलं कान
सोनारानं टोचलं कान
आवड्या.....
आवड्या.....
वाचेन वाचेन म्हणता म्हणता
वाचेन वाचेन म्हणता म्हणता वाचली बाबा एकदाची. पण बरं झालं वाचली. नाहीतर एका चांगल्या कथेला मुकलो असतो.
पक्याचं पात्र जबरदस्त रेखाटलयं. आणि त्या शेवटच्या ओळी..
"माणूस साला त्याच्या माजावर जगतो, किमान तसं जगावं तरी.
ज्यादिवशी माज संपला, संपून जावं."
सह्ही...!!
नीधी म्हणतेय तशी अॅब्रप्ट
नीधी म्हणतेय तशी अॅब्रप्ट आहे थोडी पण पक्याची व्यक्तीरेखा लक्षात घेता तेच योग्य आहे. लेखनशैली जाम आवडली... पुलेशु. लिहीत राहा.
खुप छान
खुप छान
खुप छान
खुप छान
कधीपासुन वाचेन वाचेन करत
कधीपासुन वाचेन वाचेन करत होते...आज मुहुर्त लागला! अन कथेत कशी गुंतत गेले कळलच नाही...खिळवुन ठेवलस अगदी!!!
कथा आवडेश.
कथा आवडेश.
बरेच दिवस वाचायची रहात होती.
बरेच दिवस वाचायची रहात होती.
आवडली. फार भारी! (नेहेमीप्रमाणे) नाटकीपणा अजिबात नाही. सगळं धडाधड ..... मस्त !
जबरदस्त फ्लो भारी:)
जबरदस्त फ्लो
भारी:)
आवडली कथा पु ले शु
आवडली कथा
पु ले शु
आवडली.
आवडली.
Pages