बायको : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 10 January, 2011 - 02:25

बायको : नागपुरी तडका

थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥१॥

सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडीशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥२॥

सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्पा तिले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥३॥

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पेऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥४॥
.
गंगाधर मुटे
-------------------------------------------------
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
-------------------------------------------------

गुलमोहर: 

प्रतिसादाबद्दल आभार सर्वांचे.

तडका नागपुरी असला तरी बायको प्रातिनिधीकच वाटते !!

खरेय. ग्रामीण स्त्रीचे प्रतिनिधीक दर्शन जरी या कवितेतून घडले, तरी ही कविता यशस्वी झाली समजायची.
आणि या पिढीसोबतच ही संस्कृती लयास जाण्याची दाट शक्यता आहे.

मजेदार कविता.

--------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :
सौ. मुटेंनी ही कविता वाचली तर .....
खास करून या ओळी :
“थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको .”
तर, गंगाधरजी तुम्हाला त्यांच्या तडक्याला सामोरं जावं लागेल.

मुटेजी,
लई भारी !
ग्रामीण भागात स्त्रियांची अवस्था,राहणीमान ही अशीच असते,
कारण बहुतेकांना माहित असेल कि कसलीही चैन ही शेतकर्‍यांच्या घरात राहुन मुळात परवडतच नाही !
यावरुन मला तरी खेड्यांमधल्या (प्रमाण जास्त) स्त्रियांमध्ये कुटुंबातल्या इतरांप्रती केलेला खुप मोठा त्याग,संस्कार अगदी ठासुन भरले आहेत हेच दिसतं

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पेऊन तशीच झोपी जाते

खायले का बंदी आहे का ? सांगुन ऐकतच नाही !
Wink