आदि शङ्कराचार्यांच्या 'षट्पदी' स्तोत्राचा मराठी अनुवाद.
हरि मम अविनय विष्णो, दमन मना करि हरि विषयी तृष्णा ।
भूतदया वितरी रे, तारी संसारसिंधुतुनी ॥१॥
दिव्य जया मकरंदू, परिमळ ज्या एक सच्चिदानंदू ।
सकलभवभयच्छेदू, हरिपदकमळासि त्या वंदू ॥२॥
जरि 'मी-तू'पण गेले, तरि मी नाथा तुझा, न तू माझा ।
लाट महोदधिपासुनि, न च लाटेचा कधी उदधी ॥३॥
गिरिधर हे इंद्रानुज, दैत्यकुलारे, रवि-शशि नेत्र तुझे ।
कृपाकटाक्षे तव भव-बंधन माझे तुटे सहजि ॥४॥
मत्स्यादिक अवतारी, अवतरुनी रक्षिलेस विश्व सदा ।
त्वा मजसी भवतप्ता, रक्षावे सदैव परमेशा ॥५॥
मनरमणा गुणसदना, सुंदरवदना दयाघना कृष्णा ।
भवजलधी मंथाया, तू मेरुगिरी हरि भवभीतीला ॥६॥
नारायण, करुणाकर, तुझिया चरणी शरण मती राहो ।
ही षट्पदी सदा मम वदनसरोजामधें राहो ॥७॥
मूळ स्तोत्राचा दुवाः http://www.sanskritdocuments.org/all_pdf/vishnu6padi.pdf
-चैतन्य दीक्षित.
फारच छान . वाचावयास खूप छान
फारच छान . वाचावयास खूप छान वाटले