आमच्या ऑफिसमध्ये ट्रेनिंगची जबाबदारी माझ्याकडे असते. आजच्या सेल्स ट्रेनिंगचा विषय होता “ How to be open minded and think outside the box”. मी आखून दिलेली activity माझ्याच अंगाशी आली होती. ऑफिसातील लोक मला नेहमीपेक्षा वेगळी situation देणार होते आणि तसे झाल्यास मी काय करेन याचा विचार करून तो मला सगळ्यांसमोर मांडायचा होता.
तू बास्केटबॉल आणि लॉस अॅन्जेलेस लेकर्सची मोठ्ठी फॅन आहेस ना? मग समजा साशा बुय्याचीच या लेकरशी तुझे लग्न जमले तर तुझ्या आयुष्यात काय बदल येतील आणि तू काय करशील?
मला हसूच आले. त्या साशाच्या मागे अर्ध्या LA मधील मुली मरतात तो माझ्या मागे कशाला येणार आहे? This is impossible, मी माझी सुटका करून घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला. अगं हे खरं थोडीच आहे! तू विचार तर कर.
तो साशा त्या सुंदर टेनिसपटू मरीआ शारापोवाला सोडून माझ्या मागे येईल हे माझ्या बुद्धीला गंमत म्हणूनही पटत नव्हतं. मी स्वतःला समजावले, असेल तो सौंदर्यापेक्षा तुमच्या स्वभावाला आणि कलागुणांना महत्व देणारा. छे! तो लग्न करत असेल तर शेकडो मुली त्याला हवा तसा त्यांचा स्वभाव करून घ्यायला तयार होतील. माझं शिक्षण किंवा मला नेटका आणि काटकसरीने संसार करता येईल याचं त्याच्या लेखी काय महत्व? स्वयंपाक तर त्याचे पर्सनल शेफच करत असतील. असं सारं असताना कुणी कशाला अशी भज्यासारख्या नाकाची बायको करील? असो, कसं याचा विचार न करता आपण विनोदी सिनेमा बघतो तसा मी विचार करण्याचे ठरवले.
तर समजा आमचं लग्न जमलं, आता पुढे बघू काय होईल? मी अगदी आनंदाने माझ्या मैत्रिणींना सांगू म्हटलं तर माझ्या अर्ध्याधिक मैत्रिणींना हा इसम कोण असा प्रश्न पडलाय. मी इमेल करून आईला माझा विचार कळवला. तिने लगेच फोन केला. “हा कोण वूजाकिक शोधलास?” "अगं आई वूजाकिक नाही बुय्याचीच. ‘v’ ला 'b' म्हणायचं, 'j' ला 'y' म्हणायचं आणि 'c' चा उच्चार “च” असा करायचा. तो स्लोवेनिआचा आहे ना, तीथे असच म्हणतात"; मी माहिती पुरवली. "आता आम्हाला काय स्वप्न पडणार का? जे म्हणतात तेच का नाही लिहीत? आणि एवढी आपल्या देशाची लोकसंख्या आणि तरी तुला एकही भारतीय मुलगा नाही मिळाला?" – इति आई.
"अगं star प्लेयर आहे तो बास्केट बॉलचा, त्याला नुसतं बघायला मुली जीव टाकतात", मी पुन्हा माझी बाजू मांडली. "ते काही नाही, तू पुन्हा एकदा विचार कर. त्यातून तुझा विचार नाहीच बदलला तर आम्ही बोलू त्याच्या घरच्यांशी. मुहूर्त वगैरे काढू. म्हणा त्यांना काय मुहूर्ताचं"; आईने तिची नाराजी दर्शवत फोन ठेवला.
मलाही घाईच होती. आज लेकर्सचा गेम होता.मलाही जायचं होतं.खुद्द कोबी ब्रायन्टच्या बायको सोबत बसणार होते मी. त्यात आज प्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहम ची बायको विक्टोरिआ बेकहम पण येणार होती. बापरे! माझे असे झिपरे केस कसे चालतील तेथे? हल्ली मला भरमसाठ पैसे खर्च करून माझे केस सरळ करून घ्यावे लागतात. कपडे पण कोण कुठल्या डिझायनर्सचे घालावे लागतात. जीव अगदी मेटाकुटीस येतो ते ६ इंची स्टेलेटोज घालून; पण साडे सहा फुटी माणसासोबत फिरायचं म्हणजे एवढं तर करावच लागणार. हळूहळू सवय होइल या सर्वांची. कालच साशाने मला फेरारी गिफ्ट दिली. ऑफिसात सगळे दंग होतील माझी नवीन गाडी बघून. कसलं काय, माझा साधा जॉब त्याच्या multi million dollar प्रोफाइलला साजेसा नसल्याने मी तो कधीच सोडलाय. एका star ची होणारी बायको या व्यतीरिक्त माझी काहीच ओळख उरली नाही आहे सध्या. जी काही ओळख आहे ती काही कमी त्रासदायक नाही. सगळ्या ब्लॉग्सवर तरूण मुली, त्या साशाच्या निर्णयाने किती दुःखी आहेत हे लिहीत आहेत. मी कशी average दिसते, माझं नाक कसं बुचं आहे याचा कोणीही सोम्या गोम्या हल्ली पंचनामा करीत असतो.
मी या सर्व विचारात असताना साशाने मला विचारले –" I hope you got along with Vanessa Bryant? are you enjoying your new company?" त्याला काय सांगू मी? त्या घोळक्यात कोण तो Christian Dior आणि Louis Vuitton यांच्या बद्दल गप्पा करायला माझ्याकडे काहीच नसतं. अजूनपर्यंत JC Penny मद्ध्ये सुद्धा डील शोधून शॉपिंग करणारी मी अत्यंत साधी मुलगी आहे रे. आणि हो तुझा तो अजून एक लेकर प्लेयर लमार ओडम आहे ना त्याची ती रियालिटी टीवी star बायको, क्लोई कर्दाशिअन; ती पण आली होती. ती मला फार चोंबडी वाटली. हे मी साशाला सांगणार होते पण चोंबडी या शब्दासाठी चपखल इंग्रजी शब्द न सापडल्याने मी गप्पच राहिले.
मी कॉफी घेत विचार करीत बसले होते. आई साशाच्या घरच्यांशी काय बोलेल बरं? माझ्या मुलीला छान पोळ्या करता येतात, काळजी करू नका असं ठसक्यात त्याच्या बाबांना सांगण्याचं समाधान तिला मिळणार नाही. त्यांना कुठे माहिती पोळी अन् काय. ते तिथे Slovenia मध्ये काय खातात हे मलाच नीट माहीत नाही तर माझ्या आईला बिचारीला काय माहीत असणार. लग्नात कंगन नको, तोडे करा असा हट्ट पण धरता येणार नाही सासुबाईंकडे! आणि इथे परदेशात त्यांच्या मुलाला गरम चकल्या करून घातल्या म्हणून कौतुकपण करून घेता येणार नाही त्यांच्याकडून.
साशाच्या text ने माझी तंद्री मोडली. उद्या अजून एका लेकर star, 'Pau Gasol' सोबत डीनरला जाण्याचं आमंत्रण आहे. तो आमच्या जवळच रहातो. साशाचा चांगला दोस्त आहे.
मी माझा Prada चा नवीन ड्रेस घातलाय. आम्ही बेवर्ली हिल्सला SLS Hotel मधील बझार येथे खास स्पॅनिष डीनरसाठी गोळा झालोय. Pau ने खूप अगत्याने माझं स्वागत केलं. हा तर साशा पेक्षा पण अर्धा फुट उंच आहे. या सर्व उंच लोकांसोबत मला मी लिलिपुट असल्यासारखं वाटतं. साशासोबत भारतात फिरण्याचा तर विचार सुद्धा करवत नाही मला. एखद्या विजेच्या खांबाला बरोबर घेऊन फिरत असल्यासारखे बघतील लोक मला. असो बझारचा प्रसिद्ध शेफ होजे आंद्रेस त्याच्या modern कुकिंगचे नमुने पेश करतोय. यातील काही पदार्थ केवळ साबणाच्या फेसासारखे आहेत, पण त्याला चिकनची चव आहे. सगळं आटोपून आम्ही निघालोय. तो चविष्ट फेस खाऊन माझं पोट काही भरल्यासारखं वाटत नाही आहे. मी साशाला म्हटलं, "मला ना मस्त पिठलं भाकरी खायची इच्छा होते आहे". पुढचा बराच वेळ मी 'पिठलं' म्हणजे काय हे त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आहे. पिठ्ल्याची हि तऱ्हा तर याला झणझणीत ठेच्याबद्दल काय सांगू? very very spicy असे म्हणून झणझणीत या शब्दाचा खरा अर्थ कसा कळावा? इतकं तिखट, की खाऊन डोक्यात झिणझिण्या आल्या पाहिजेत. आता परत झिणझिण्यांसाठी काय बरं इंग्रजी शब्द वापरावा या विचाराने माझ्या मेंदूला झिणझिण्या आल्यात. "Would you like to hav some dessert?" साशाने विचारले. मी म्हटलं, "How about पुरणपोळी with लोणकढं तूप?" त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. मी 'never mind' म्हणून विषय संपवला. असंही हल्ली काही खायचं म्हटलं कि आपण जाड होऊ आणि या fashionable जगात मावणार नाही किंवा याला दुसरी एखादी बारीक ललना आवडेल अशी मला सतत भीती असते. मी हिरमूसल्याचं साशाच्या लक्षात आलं कि नाही कोणास ठाऊक. तो हि असं बरचसं बोलायचं टाळत असावा, 'भाषांतराची कटकट नको' म्हणून!
आमच्या गाड्या घराकडे निघाल्या. मनात आलं आशाताईंची गाणी ऐकावी, पण ती याला काय कळणार? काय हे, आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचय आणि आपल्याला एकमेकांचे देश पण कसेबसे नकाशावर दाखवता येतात. मनाच्या खास कप्प्यात साठवून ठेवलेल्या लहानपणीच्या आठवणी एकमेकांना सांगू म्हटलं तर भाषा, संस्कृती याच्या अज्ञानामुळे त्या समोरच्याला कळतच नाहीत. बऱ्याच गोष्टी भाषांतरात हरवून जातात. त्याच्या त्या झगमगत्या दुनियेत आपलं स्वत्व पूर्णपणे गुदमरून जातं आणि आपल्या जिव्हाळ्याच्या लोकात त्याला अगदीच परकं वाटतं. मला नाही बुवा असा संसार आवडायचा. अगदी त्याला दर वर्षी अनेक मिलियन डॉलर्स मिळत असले तरीही नाही. मी हे लग्न मोडण्याचा विचार पक्का करून टाकला.
खरंच आपण कुठे वाढतो,काय पहातो, काय खातो आणि अगदी काय वाचतो ह्या साच्यातून आपण घडत जातो. आपली या जगात काय ओळख असेल ते हि त्यावरून ठरत. एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर एखाद चित्र सजीव होत जावं ना तसं. आणि आपण चित्रही त्याच्या थीमला साजेश्या ठिकाणीच लावतो. Victorian Mansion मध्ये modern art थोडीच शोभून दिसतं? कदाचित म्हणूनच इथे लांब परदेशातही आपण सारेच आपापल्या लोकांना शोधून त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो. ज्याला बरेचदा गृपिझम म्हटलं जातं ते तसं नसेलही. केवळ आपल्याला काय म्हणायचय हे सहज समजावण्याची हि सोय असावी. एक भाषा आली तरी जीवनातले सामाईक अनुभवच काही गोष्टी समोरच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतात.
अचानक प्रश्न विचारून ऑफिसातील लोकांनी माझ्या विचारांची शृंखला मोडली. So, what is the moral of the story? मी हासून सांगितलं, एक म्हणजे मला माझ्या आई – बाबांना कळवायचय कि त्यांनी मला आमच्या संस्कृतीचे धडे इतके छान दिलेत कि अगदी स्वप्नरंजन म्हणूनसुद्धा मला परदेशी मुलाचा विचार नाही करवत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एखाद्या millionaire star शी लग्न करण्याच ऑपशन असलं तरीही मी हिमांशुशीच लग्न करेन.
मी घरी येऊन हिमांशुला विचारलं, "तुला त्या मरिया शारापोवाशी लग्न करायला आवडेल का रे?" त्याने मी करत असलेल्या थालीपीठाचा घास घेत विचारलं, "ती असं थालीपीठ करेल का माझ्यासाठी?" मी नकारार्थी मान हालवली. "मग नको ती शारापोवा मला".
आम्ही दोघे थालीपीठ हाणत होतो. (thank god, याला हाणत म्हणजे काय हे समजवावे नाही लागत.) ओनलाईन रेडीओवर गाणं लागलय – “ चाँदसी मेहबुबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हॉं तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था.”
मस्त, आवड्ला कथालेख...विचार
मस्त, आवड्ला कथालेख...विचार ही पट्ला...!
"मग नको ती शारापोवा मला". >> अगदी अगदी..!
कूल आवडली कथा
कूल
आवडली कथा
सही
सही
आवडली, विचारांची मालिका
आवडली, विचारांची मालिका आवडली.....
आइशप्पथ या चकल्या, पुरणपोळ्या आणि थालिपिठानि सगळ्यांचिच गोची केल्येय तर, मी सुद्धा म्हणुनच १०-१२ आवडत्या सेलिब्रेटिजना सोदुन माझ्या बायकोशी लग्न केलं
(No subject)
मस्तच्..खुप आवडली..
मस्तच्..खुप आवडली..
मस्तच....
मस्तच....
गुड वन...
गुड वन...
(No subject)
सही..
सही..
मस्त लहानपणीची एक गोष्ट
मस्त
लहानपणीची एक गोष्ट आठवली. एक ऋषि एका उंदरीचे मंत्राने रूप पालटवून तिला सिंह , वाघ ई मोठ्या प्राण्यांशी लग्न करणार का विचारतो. पण रूप जरी बदललेले असले तरी त्या नव्या रुपातही ती उंदरी उंदरालाच पसंत करते.
थोडक्यात आपल्या योग्यतेचाच जोडीदार आपल्याला बरा. वरचा नको आणि खालचा पण नको
(No subject)
सही कथानक! मस्त लिहलय!
सही कथानक! मस्त लिहलय!
वेरी
वेरी प्र्याक्टिकल्.....मस्त...
खुप आवडला मला ..... व पु
खुप आवडला मला .....
व पु काळेंच्या तूच माझी वहीदा या कथेची आठवण आली.
मस्त ...
आवडली कथा..
आवडली कथा..
अगदी आपली वाटली ... . एकदम
अगदी आपली वाटली ... . एकदम पटेश
झक्कास........
झक्कास........
छान आहे कथा . short n sweet .
छान आहे कथा . short n sweet . आवडली.
मस्तय...
मस्तय...
अय्ययो थालीपीठ विथ लोण्याचा
अय्ययो थालीपीठ विथ लोण्याचा गोळा, पुरणपोळी विथ साजूक तूप, उकडीचे मोदक विथ कणीदार लोणकढं तूप, जाळीदार लुसलुशीत घावण विथ झणझणीत ओल्या खोबर्याची हिरवी चटणी... असा स्वर्ग नवर्याचा ताटात दिला तर सगळ्या कुर्नीकोव्हा, शारापोव्हा सोडून नवरा बायकोलाच कुर्निसात करेल
मस्तंय कथा