बोका - हरभजन सकाळीच जाईल

Submitted by बेफ़िकीर on 7 January, 2011 - 05:35

"पैसा है क्या????"

वेटरच्या त्या उर्मट प्रश्नावर बोक्याने घाबरून होकारार्थी मान डोलावत खिशातून पाचशेचं संपूर्ण बंडल काढून त्याला दाखवलं!

चाटच पडला वेटर! या फाटक्याकडे पन्नास हजार?? एक रकमी?? आणि एवढे पैसे असताना इथे येऊन पितोय??

"अब क्या लाना है??"

"... नंबर वन..."

"थर्टी??"

"निप मंगताय..."

जगातील नववे आश्चर्य बघितल्याप्रमाणे वेटर काउंटरवर निघून गेला. बोक्याने गेल्या दिड तासात अघोरी वेगाने पिऊन दोन क्वार्टर्स संपवलेल्या होत्या. आणि आता तो तिसरी मागवत होता. रात्रीचे फक्त साडे नऊ वाजलेले होते. त्यामुळे 'अब बंद हो रहा है बार' असे सांगताही येत नव्हते. त्यात त्याच्याकडे किमान पन्नास हजार आहेत हे वेटरला दिसलेले होते. एखादा माणूस किती पिऊ शकतो याबाबत वेटरने अनेक उदाहरणे पाहिलेली होती. पण सात पेग लागोपाठ झाल्यानंतरही जीभ जराही अडखळत नसलेला मात्र हा पहिलाच माणूस त्याने पाहिला होता आज!

काउंटरवरून क्वार्टर आणून बोक्यापुढे आदळत वेटर दारात निघून गेला. दारात भीम उभा होता. भीम या माणसाचे नाव त्याच्या आकारामुळे ठेवण्यात आले होते. सहा फूट उंच आणि शंभर किलो वजनाचा भीम बारमधे 'क्षमतेपेक्षा जास्त पिऊन पडणारे' किंवा 'मारामारी स्वरुपाचा पुरुषार्थ दाखवण्यास सिद्ध होणारे' यांना उचलून बाहेर फेकण्याच्या कामी नेमलेला होता.

वेटर - सात नंबर पे ध्यान दे... दो निप होगयेल्या है पयलेच...

भीम - ओकून पडेल टेबलावर... आत्ताच उचलतो त्याला...

वेटर - आत्ता नको... पाचशेचं बंडल आहे... साध्या वेषात आलेला कोणतरी असायचा...

भीमने बोक्याकडे लांबूनच नजर फेकली.

भीम - कसला आलाय साधा वेष?? तिच्यायला झापडीचं नाहीये ते... जा तू... मी बघतो..

बोका ही तिसरी क्वार्टर मात्र हळू हळू घेत होता. ग्लास जरा खाली आला की पुन्हा पुन्हा सोडा ओतत होता. मधेच खिसे तपासत होता. वेटर, भीम आणि मालक त्याच्याकडे अधूनमधून बघत होते. बारमधील इतर सर्व गिर्‍हाईके नेहमीचीच असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायला एकटा भीम पुरेसा होता. पण हे नवीन आलेलं गिर्‍हाईक जरा विचित्रच होतं! पोषाख तरी 'टपोरी' किंवा 'छपरी' टाईपचा होता. पण नवलाई म्हणजे दोन निप्स होऊनही शांत होता, आवाजात गडबड अजिबात नव्हती आणि खिशात पैसे बरेच होते. त्यामुळे स्टाफ सारखाच त्याच्याकडे बघत होता.

दहा वाजता मात्र बोक्याला अपेक्षित असलेली हालचाल झाली. भीमने कुणालातरी 'या शेठ' अस तोंडभर हासत म्हंटलेलं बोक्याला ऐकू आलं! अगदी स्वाभविक प्रतिक्रिया म्हणून बोक्याने वळून पाहिले. बहुधा तोच असावा! कारण हातात एक पेटी होती. त्याच्याबरोबर आणखीन एक माणूसही आत आला. पहिला माणूस चाळिशीचा असावा. त्याच्या तोंडावर बेदरकारपणाचे भाव स्पष्ट होते. उर्मट चेहरा होता. मद्दड मेंदू असणार हे पाहूनच समजत होतं. त्याने राजकारण्याप्रमाणे पांढरा स्वच्छ शर्ट आणि पांढरीच पँट घातलेली होती. आत्ताही त्याच्या डोळ्यांवर डार्क गॉगल होता. तो मान ताठ ठेवून, जणू या विश्वाचा कारभार माझ्यामुळेच चालतो, असे भाव चेहर्‍यावर ठेवून आता आला होता. भीमच्या सलामाकडे त्याने ढुंकूनही पाहिलेले नव्हते. त्या माणसाला पाहून मालक अदबीने पुढे आला.

मालक - सर... इकडे बसा..

बोक्यापासून ते टेबल थोडेसेच लांब होते. बोक्याला फार श्रम पडणार नव्हते त्यांच्याशी संवाद साधायला!

दुसरा माणूस म्हणजे मवालीपणाचा कळस होता. लाल शर्ट, चॉकलेटी जीन्स, शर्टची पुढची तीन बटणे उघडी टाकलेली, हातात कडे, तीन अंगठ्या, गळ्यात चेन, कुठलातरी सुमार परफ्युम मारलेला, तोंडात गुटखा असणार हे फुगलेल्या गालांवरून समजावेच, घार्‍या डोळ्यांत 'सतत कसलीतरी संधी शोधतोय' असे भाव, त्यात आणखीन त्या डोळ्यांमध्ये सुरमा भरलेला आणि आत्ताच बुधवार पेठेत जाऊन आल्यासारखा चेहरा!

बुधवार पेठेच्याच बाहेरच्या बारमध्ये होते तिघेही, ते दोघे आणि ... बोका...!

"खान... गुटखा थूक"

त्या मवाल्याने खिडकीतूनच बाहेर रस्त्यावर गुटखा थुंकला. वेटरकडे बघत ऑर्डर सोडली.

"ओसी निप, बरफ, सोडा, विल्सचं पाकीट आणि चिकन लॉलीपॉप.. सुखा मटन आहे का??"

"आहे ना ..."

"एक सुखा मटन... कोरेसाब... तुम्हाला काय??"

"खजुराहो... थंड आण रे??"

"हा..."

वेटर ऑर्डर घेऊन निघून जाताना बोका शांत झाला होता. कारण नाव कन्फर्म झाले होते. दौलत कोरे! 'कोरेसाब तुम्हाला काय' या खानच्या प्रश्नामुळे हा माणूस कोरेच आहे हे बोक्याला समजले आणि बोक्याने अभिनय सुरू केला.

हातातला ग्लास आपटत त्याने मागे वळून पाहात टिचकी वाजवून डायरेक्ट मालकालाच बोलावलं!

मालकाला तो अपमान अर्थातच सहन होणार नसल्याने त्याने वेटरला सात नंबरकडे जायला सांगीतलं. वेटरनेही बोक्याचा तो उद्धट आविर्भाव पाहिलेला होताच. हे प्रकार नेहमीचेच होते त्याला! सुरुवातीला स्टाफशी अगदी हसून बिसून बोलणारे पेताड ग्राहक दारू चढल्यानंतर काही वेळा असेच वागतात हे त्याला माहीत होते. अशावेळेस काय करायचे हेही माहीत होते. तो हत्तीसारखा डुलत डुलत बोक्यापाशी आला!

बोक्याने 'खास बुधवार पेठीय' मवाली भाव आणि खुन्नस डोळ्यांत धारण करत वाक्य टाकले..

बोका - हे काय आहे??

वेटर - काय आहे म्हणजे??

बोका - मी नंबर वन मागवली होती...

वेटर - नंबर वनच आहे..

बोका - अरे पण ही रम आहे..

वेटर - मग रमच पीत होतात की आत्तापर्यंत..

बोका - पण तिसरी क्वार्टरही रमचीच आहे असे म्हणालो का मी??

वेटर - आता दोन क्वार्टर रम प्यायल्यावर तिसरी क्वार्टर कुणी व्हिस्की घेतो का??

बोका - तुझ्या बापाने कायदे केलेत का पिण्याचे??

वेटर - ओ साहेब.. जपून बोला..

बोका - ज्जा... व्हिस्की आण..

वेटर - या रमचं काय??

बोका - काय म्हणजे??

वेटर - याचं बिल द्यावं लागेल..

बोका - तुला काय वाटलं मी इथे बसून पितोय त्याचे पैसे देणार आहे??

वेटर - भीम... सात नंबर आला माजावर बघ..

भीम चालत चालत आला. बोक्यासमोर उभे राहात अत्यंत खुनशी शांतपणे म्हणाला..

भीम - काय झालं??

बोका - तू कोण??

भीम - तू कोण ते सांग.. मी कोण ते कळणारच आहे..

बोका - माझं नाव पंडू....

भीम - पंडू??? का पांडू??

बोका - पंडू... भीमाचा बाप..

भीम आता सरळ बोक्याच्या समोर बसला.

भीम - सत्या, बिल घेऊन ये...

वेटर दोन मिनिटात बिल घेऊन आला. तोपर्यंत भीम बोक्यासमोरच बसला होता. बोका त्याच्याकडे दुर्लक्ष करत सरळ रम पीत बसला होता.

बिल समोर आपटलं गेल्यावर बोक्याने ते भीमकडे सरकवलं.

भीम - तीनशे बावीस... काढ...

बोक्याने खिशातून तीन रुपये पंचवीस पैसे काढून समोर ठेवले अन म्हणाला..

बोका - तीन पैसे परत दे...

भीम - कंबरेत लाथ बसल्यावर आई आठवेल...

बोका - शक्य आहे.. अनेकांना होतं असं...

भीम - उठ...

बोका - जमणार नाही...

बोक्याचा आवाज आता खान आणि कोरेपर्यंत पोचत होता.

भीम - मच्छर... कोंबडी सोलतात तसा सोलतोच तुला आता तिच्यायला..

भीम संतापून उठला तसा मात्र बोका अत्यंत अ‍ॅलर्ट झाला. बोक्याजवळ पोचतानाच भीम कर्कश्श किंकाळी मारून खाली बसला आणि ओरडू लागला.

बोक्याच्या उजव्या मनगटातील सुई भीमच्या फोरआर्ममध्ये घुसली होती. भीम का ओरडतोय हेच समजत नव्हते कुणाला!

खान आणि कोरे धक्का बसून त्या दृष्याकडे पाहात होते. वेटर भीमला उठवायला धावला होता. मालकही आता त्या ठिकाणी आला..

मालक - काय बे?? ... काय केलंस याला??

मालक एकदम अंगावर येत दादागिरीच्या स्वरात म्हणाला आणि दुसर्‍याच क्षणी तो भीमच्या शेजारी कोसळला. आता दोन माणसे किंकाळत होती आणि बहुतेकांच्या डोक्यात प्रकाश पडत होता. या बसलेल्या माणसाने नक्कीच काहीतरी या दोघांना केलेले असावे. ही काय भुताटकी ते भीमला समजत नव्हते. तो आता सावरून उभा राहिला होता.

भीमने हाणलेली लाथ बोक्याने चुकवली आणि भीमचा उजवा पाय टेबलवरच आपटला. तसा भीम स्वतःचाच पाय हातात धरून नाचू लागला. वेटरने टेबलवरचा स्टीलचा पाण्याचा जग हातात घेतला आणि बोक्यावर उगारला. हे दृष्य पाहणार्‍यांना तिसरा धक्का बसला. आता वेटर मालकाच्या शेजारी कोसळला होता. ते पाहून मात्र दोन वेटर्स आणखीन आले. बोक्यापासून जरा लांबच राहून ते एखादी वस्तू त्याला मारता येईल का याचा विचार करू लागले. पण तोवर मालक उठलेला होता. त्याने सर्वांना हुकूम सोडला.

"याला धरा..."

भीमही किंचाळला..

"अबे पाचशेचं बंडल आहे त्याच्याकडे... ते काढून घ्या आधी..."

बोका शांतपणे बसून रम पीत होता. दोन वेटर्स हळूहळू त्याच्याकडे सरकत होते. अचानक बोक्याने खिशातील बॉलपेन काढून ते मागच्या बाजूने उघडले अन एका उडीत भीमपर्यंत पोचून त्याच्या कुल्यावर ते दाभणासारखे टोक खुपसले. भीम अक्षरशः जायबंदी झाला आता! भीमच्या त्या किंचाळ्या कुणालाच ऐकवत नव्हत्या. अख्खा बार तिथे जमा झाला होता. कुणीतरी मागून बोक्याच्या टाळक्यात काहीतरी घातले असावे. कारण किंचाळत बोका तिथून बाजूला झाला आणि त्याने मागे पाहिले.

मारणारा स्टाफपैकी नव्हताच. तो होता ग्राहक!

बोका तिरीमिरीत एक खुर्ची उचलून त्या माणसावर धावला. तो माणूस बोक्याचा तो आविर्भाव पाहून मागच्या मागेच सटकू लागला. बोक्याने त्या माणसाला दिले सोडून अन खुर्ची सरळ दोन फुटांवर उभ्या असलेल्या एका वेटरच्या पाठीत आपटली.

हे साडे पाच फुटी भूत सरळ कुणालाही काय मारतंय हे कुणाला समजत नव्हते. जो त्याच्या जवळ येईल तो मार खात होता. आणि बोक्याच्या हालचाली मात्र नेत्रदीपक होत्या. तो अचानक कुणावरही हल्ला करू लागला होता.

आता मात्र फार झाले. तिघांनी मिळून मागून त्याला धरले. बोका वर उचलला गेला. आता तो खाली आपटला जाणार होता. हवेत असतानाच बोक्याने एकाच्या नाकात ठोसा घातला. तो माणूस बोक्याला सोडून नाक धरत खाली बसला. आता उरलेल्यांना बोक्याला नीट धरताच येईना! बोका सुटला. कसातरी खाली पडत तसाच उठला आणि दोघातिघांना उगाचच फटके टाकले त्याने!

या माणसाला घाबरावे की त्याला तुडवावे हा निर्णयच होत नव्हता काहींचा! तेवढ्यात बोका दाराकडे धावला. तिथूनच ओरडला...

"हरामखोर साले सगळे... उद्याच माझ्याकडे दहा लाख येतील.. मग बघतो एकेकाला.. फक्त हरभजनची सेंच्युरी होऊदेत... नाही एकाचे दहा कमावले ना... माझं नाव अन्या नाही...."

झर्रकन निसटतानाच बोक्याने खान आणि कोरेचे चेहरे बघितले होते. कोरेचा कोरा चेहरा क्षणात पालटला होता. कारण त्याची सगळी गणितेच पालटणार होती. तो एका रात्रीत रस्त्यावर आला असता.

आणि खान ताडकन उठून उभा राहिला होता. एकदा बोका निघून गेला त्या दिशेला डोळे फाडून बघत होता आणि एकदा कोरेसाहेबांकडे!

तुफान वेगाने बोका बाहेर पळून गेलेला पाहून त्याच्यामागे धावणारे दोघे तिघे पुन्हा आत आले. पण तोवर कोरे आणि खान त्याच दारातून तीरासारखे बाहेर पडलेले होते. बोका गेलेल्या दिशेला तेही धावत सुटलेले होते. पन्नास एक मीटर्स पळाल्यावर त्यांना समजले. हातातली बॅग घेऊन इतक्या जोरात पळताही येणार नाही आणि तो माणूस तर दिसेनासाही झालेला आहे. एकमेकांकडे बघत दोघे एका पानाच्या टपरीवर आले. तिथे आधीच एक वेश्या उभी होती गुटखा खात!

"ए... बैठताय क्या??... पचास रुपयेमे एक साट लेले.."

त्या वेश्येने मांडलेला तो थोर प्रस्ताव कोरेने तिला शिवीगाळ करत नामंजूर केला. तिनेही काही शिव्यांची परतफेड करत तिथून काढता पाय घेतला.

कोरे - खान.. अब क्या करनेका??

खान - उलटा बोलना पडेंगा अब पब्लिकको...

कोरे - अब कहा टायम है उलटा बोलनेको???

खान - कितना लगाया है पब्लिकने??

कोरे - अरे एक के बीस देने पडेंगे..

खान - लेकिन ऐसे कितने है??

कोरे - ऐसेच पचास हजार लिये ना अपनने..

खान - भाग जाते है... बॉम्बे...

कोरे - यडा बनगया क्या?? मर्डर होजायेंगा अपना उधर.....

खान - वो तो इधर भी होयेंगाच...

कोरे - ये क्या नयाच लफडा होगया यार??

खान - रामनको फोन लगाओ... उसको बोलो ऐसा ऐसा है करके..

कोरे - हा..

कोरेने खिशातून मोबाईल काढला... रामन हा मुंबईला असायचा, त्याला फोन लावला...

कोरे - साब... कोरे...

रामन - क्या रे??

कोरे - लफडा होगया...

रामन - क्या??

कोरे - लोग बोलते है सरदार भांगडा करेंगा कल..

रामन - कोन बोलता है??

कोरे - एक आदमी था अभी इधर.. उसने एक पेटी लगायेला है..

रामन - कोन है वो??

कोरे - भाग गया..

रामन - क्यु??

कोरे - मारामारी हो रहेली थी उसकी सबके साथ..

रामन - कायको??

कोरे - वो सभी उसके पासका पैसा चुरारहेले थे..

रामन - क्या बोला वो आदमी??.. फिरसे.. उसीके अल्फाज बोल??

कोरे - कल देखलेंगा.. कल दस पेटी मिलेंगी मेरेको.... क्युंकी कल सरदार भांगडा करेंगा..

रामन - सरदार का नाम लिया??

कोरे - एकदम ओप्पन नाम लिया..

रामन - तुम उसे जानते हो???

कोरे - नाय.. पैली बार देखा है..

रामन - उसको ढुंढो.. पूछताच करो.. और अगर उसकी बात सही है तो मेरेसे तुम्हाला कोई रिश्ता नही..

खटकन कट झालेला फोन हातातून खिशात ठेवत खानकडे बघणारा कोरे नखशिखांत हादरलेला होता. रामनने संबंध सोडला तर पुण्यातील पब्लिक आपल्याला संपवणार हे त्याला माहीत होतं.

खान - क्या हुवा??

कोरे - ***** बोलता है के वो आदमी सच बोलरहा रहेंगा तो तुम्हारा मेरा वास्ता नही...

खानही भेदरला. आजवर ज्या मस्तीत आयुष्य काढलं ती आता राहिलेली नव्हती. डोळ्यासमोर होती उद्याची दुपार! तीन वाजेपर्यंतच पिक्चर क्लीअर होतं हे दोघांनाही माहीत होतं.

आजवर असं कधी झालेलं नव्हतं!

भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांग्लादेश या चार देशात जर वनडे इन्टरनॅशनल असली तर पन्टर्स आरामात संघांच्या टचमध्ये येऊ शकायचे. हे पन्टर्स दिल्लीचे होते. त्यांना जरी प्रत्यक्ष खेळाडू किंवा कोचशी बोलता येत नसलं तरीही इतर कित्येक संबंधितांशी बोलता यायचं! मुख्य म्हणजे फिटनेस पाहणारी माणसे यांच्या जाळ्यात पहिली सापडायची. त्या खालोखाल डाएटिशिअन्स, मॅस्युअर्स, एखादवेळेस कॉमेन्ट्रेटर्स तर कधी एखादा जुना खेळाडू! त्यांच्याशी हे लोक गप्पा मारल्यासारखे भासवायचे.

हॉटेल स्टाफ असायचाच!

हे पन्टर्स मग विविध आमीषे दाखवून माहिती जमवायचे. दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूचे हेल्थ स्टेटस, फिटनेस लेव्हल, त्या दिवशीचे तापमान आणि वातावरण, खेळाडूंचा असलेला वा नसलेला फॉर्म, कोण किती हजार धावांच्या किंवा कितीशे विकेट्सच्या उंबरठ्यावर आहे, कुणाचे किती कॅच झाल्यास कॅचचे एखादे शतक होऊ शकणार आहे, संघातील खेळाडू एकमेकांच्या परफॉर्मन्सबद्दल काय बोलत आहेत, आज रात्री कोण मजा करायला बाहेर जाणार आहे आणि काय काय काय काय!

ही सर्व माहिती एका अत्यंत तज्ञ असलेल्या समितीसमोर ठेवून त्यांचे आडाखे समजून घेतले जायचे. त्यात त्यांचेही वाद व्हायचे. एकदा एकमत झाले की पंटर्सना निष्कर्ष काढता यायचा.

उद्या एखादा गाजलेला फलंदाज लवकर बाद होणार असे समितीचे म्हणणे असले की पन्टर्स अर्ध्या तासात बातमी फिरवायचे. 'हा फलंदाज शतक ठोकणार असे म्हणणार्‍यांना एक रुपायाचे दहा रुपये द्यायला कबूल व्हा'! 'हा फलंदाज लवकर बाद होणार असे म्हणणार्‍यांना एक रुपयाचा सव्वा रुपया द्यायला तयार व्हा'!

असेच इतरही अनेक पन्टर्स असायचे. त्यांचेही जाळे विखुरलेले असायचे. एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रसंगही यायचे!

कॅश मोजून चार ठिकाणीच वापरात असायची, बँगलोर, पुणे, हैदराबाद आणि मुंबई! बाकी सर्वत्र केवळ शब्दावर विश्वास आणि चित्रे! प्राण्यांची लहान लहान चित्रे दिली जायची बोली लावणार्‍यांना! उदाहरणार्थ, गेंडा दिला याचा अर्थ भारत मॅच ड्रॉ करायला बघणार अशी त्या माणसाची बोली आहे. गेंड्याच्या चित्राच्या मागे त्याने लावलेली रक्कम हजाराने भागून लिहीली जायची. म्हणजे दहा हजार लावले असले तर '१०' असा आकडा! गेंड्याची बोली मटकेवाला जाहीर करायचा. गेंडा घेतल्यास एका रुपयाचे तीन रुपये मिळतील. पण चित्ता घेतला तर एका रुपयाचे एक रुपया दहा पैसे! म्हणजे भारत मॅच हारणार! ही चित्रे पाहून नंतर अत्यंत छुप्या पद्धतीने व्यवहार केले जायचे. प्रत्येक बोली लावणारा स्वतःचे असे एक रेकॉर्ड लिहूनच वावरत असायचा.

बँगलोर, हैदराबाद आणि मुंबईव्यतिरिक्त पुण्यातही कॅशचा व्यवहार चालण्याचे कारण मात्र विचित्र होते. त्या दिल्लीच्या पन्टर्सतर्फे या चारही जागांचा मटका रामनच्या हातात होता. रामनचा हिशोब सरळ होता. उद्या एखादा चित्रं छापणारा निघाला तर कुलूप लावायची वेळ येईल. माझ्या एरियात केवळ कॅश! आणि त्यात आणखीन एक फायदाही होता. इतर पन्टर्सतर्फे कार्यरत असलेली टोळी चित्रे वापरायची. त्यांचा आणि आपला घोळ होऊ नये हाही रामनचा उद्देश होता.

आणि पुण्यातले त्याचे काम कोरे आणि खान बघत होते.

आणि आत्ता दोघांना टेन्शन आले होते ते आठ लाख द्यायला लागले तर काय होणार याचे!

हा मटका टिकवला जायचा. समजा एक रुपायाला सव्वा रुपया द्यावा लागला, तर एक लाख जमले असले तर सव्वा लाख द्यावे लागायचे. पण ज्या लोकांना एक रुपयाला दहा रुपये कमिट केलेले असायचे, अशा लोकांचे जवळपास साठ सत्तर हजार खिशात पडायचे. कारण त्या लोकांना काहीच द्यावे लागायचे नाही.

त्यामुळे पंचवीस हजार गेले आणि सत्तर हजार आले या हिशोबात पंचेचाळीस हजार कोरे आणि खानच्या खिशात पडायचे. त्यातील तीस हजार रामनला पाठवले की उरलेल्या पंधरा हजारात आपापले वाटे घेऊन हे दोघे सुखा मटन खायला मोकळे!

हे आकडे केवळ प्रक्रिया समजण्यापुरतेच, वास्तविक आकडे लाखाच्या घरात असायचे.

या सर्व प्रक्रियेत सर्वचजण खुष राहायचे. अतर्क्य निकाल लागतील असे अजिबात न वाटणारे संख्येने कितीही असले तरीही 'काही वेळा आपल्याला तोटा सोसावाच लागणार' या पन्टर्सच्या तत्वावर मटका आरामात चाललेला असायचा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे..... काही वेळा सामन्यांचे निकाल .... या अशा मटक्यांमुळेही बदलायचे... पण ते कुणालाच समजायचे नाही...

एखादा रन आऊट सहज होऊ शकला असता असे मनात आले तरी 'थ्रो अचूक झाला नसला तरी क्षेत्ररक्षकाने मनापासून प्रयत्न मात्र केला' असेही प्रेक्षकांच्या मनात येऊ शकायचे. कारण खेळाडूंपैकी काही यात तयार झालेले होते. आणि अप्रत्यक्षरीत्या अशाच लोकांमुळे सामना पालटतो हे मात्र नीटसे कुणालाच जाणवायचे नाही.

कोरे आणि खानचा प्रॉब्लेम हा होता की पुण्यात कार्यरत असलेल्या इतर काही मटकेवाल्यांच्या प्रतिनिधींना जर काही आतली माहिती मिळाली असली अन ती यांच्या चॅनेलकडे नसली तर लॉस मोठा होऊ शकायचा. आणि आज नेमके तेच झालेले होते.

बोक्याने इतक्या तीव्र पद्धतीने त्या भावना व्यक्त केल्या होत्या की उद्या हरभजन नक्कीच शतक ठोकणार हे कोरे आणि खानला समजलेले होते. आणि याचा अर्थही त्यांना समजलेला होता. हरभजन हा अत्यंत देशप्रेमी खेळाडू असून तो स्वच्छ कारकीर्दीचा आहे याचाच अर्थ उद्या श्रीलंकेचे गोलंदाज सुमार गोलंदाजी करणार हे कोरे आणि खान यांनी ओळखले. सामना श्रीलंकेतच चाललेला होता. उद्या शेवटचा दिवस होता. भारतापुढे ४७४ धावांचे आव्हान होते आणि आधीच सहा बाद ३२१ अशी धोकादायक धावसंख्या झालेली होती. ज्या पद्धतीने श्रीलंकेची गोलंदाजी चाललेली होती, उद्या फार तर लंचटाईमपर्यंत भारत खेळेल असेच वाटत होते. मटक्यात आता कशावर पैसे लावायचे याचा काही चॉईसच कुणाला राहिलेला नव्हता. मटकेवाल्यांनाही आणि गिर्‍हाईकांनाही! फक्त भारत हारतो की सामना ड्रॉ होतो यावरच बोली लागलेली होती. 'हारणार' असे मानणार्‍यांना एका रुपायाला एक रुपया पंधरा पैसे मिळणार होते. मॅच ड्रॉ होणार असे म्हणणार्‍यांना एका रुपायाला अडीच रुपये! भारत जिंकणार असे म्हणणार्‍यांना एका रुपायाला चक्क विक्रमी वीस रुपये कमिट करण्यात आलेले होते. भारत जिंकणार म्हणणार्‍यांची संख्या विचारात घेण्यासारखी नसली तरी तसे झाले तर द्यावी लागणारी रक्कम मात्र जबरदस्त असणार होती. आणि बोक्याने नेमका हाच मुद्दा अप्रत्यक्षरीत्या जाहीर केलेला होता.

हरभजनने शतक ठोकले तर सरळ अर्थ होता. भारत जिंकण्याची शक्यता अफाट वाढणार होती. दुपारपासूनच ते लोक येऊन बसले असते. एक रुपया पंधरा पैसे आणि अडीच रुपये बोली लावणार्‍यांचे पैसे कोरे आणि खानकडे राहिले असते. पण ती रक्कम फार तर दोन लाख झाली असती. द्यायला लागले असते दहा लाख! आठ लाख द्यायला होते कुठे यांच्याकडे?? दुपारीच रामनला त्यांनी छातीठोकपणे सांगीतले होते की 'जिंकणार' म्हणणार्‍यांना आम्ही रेकॉर्ड वीस रुपये कमिट केलेले आहेत. रामनने त्यांना खूप झापलेले होते. त्याच्यामते इतकी रिस्क कधीही घ्यायला नको होती. पण कोरे आणि खान फोन संपवल्यावर हासत हासत रामनलाच शिव्या घालत होते. त्यांच्यामते तो मूर्ख होता. पण कोण मूर्ख आहे हे मगाशी चांगलेच समजलेले होते.

खान - पब्लिकको फोन करे क्या?? बोलते है बीस रुपया चेंज करके चार रुपया किया करके..

कोरे - कौन भरोसा रखेंगा आगे अपनेपर?? कुत्ता नही आयेंगा पैसा लगाने..

खान - तो अब??

कोरे - वो आदमी मिलनाच मंगता है... उसीसे समझलेते है ...

कोरेने पानवाल्याला विचारले.

कोरे - वो भागरहेला आदमी किधर गया??

पानवाल्याने एकदा कोरेकडे पाहिले आणि मानेनेच बोका पळाल्याची दिशा दाखवली. त्या दिशेला चक्क रेड लाईट एरिया होता.

कोरे - स्साला अभीसेच सेलिब्रेट कररहेला लगता... चल खान... चुहा निकालते है बाहर...

खान आत्ताच 'एरियात' जाऊन आलेला होता. त्यामुळे त्याच्या मनावर त्या एरियातील खोटे प्रेम करण्याच्या व्यावसायिक वृत्तीबाबतचा एक सात्विक संताप पसरलेला होता. याक्षणी त्याच्या दृष्टीने जगातील प्रत्येक स्त्री, अगदी त्याची स्वतःची बेगमही आईच होती. पण हा प्रकारच इतका भयंकर होता की कोरेबरोबर पुन्हा एरियात जाऊन त्या माणसाला शोधावे लागणारच होते.

दोघे गल्लीत शिरले ते कोणत्याही नटव्या चेहर्‍याला न बघता सरळ वडापावच्या गाडीवर गेले. वडापाव विकणारा मामा दोघांच्याही जुन्या ओळखीतलाच होता.

कोरे - मामा... एक आदमी भागा अभी यहांसे....

मामा - ............... हं....

कोरे - वो किधर गया??

मामा - किधरभी जानेदे...

कोरे - म्हणजे??

मामा - मेरेको पक्का मालूम नही... लेकिन वो आदमी डेंजर है...

कोरे - डेंजर है बोले तो??

मामा - बोका बोका कहते है वो यहीच है ऐसा लगता मेरेको.... एक बार मैनेभी मार खाया है उसका...

कोरे - अबे तू बोल ना किधर गया वो...

मामा - आराम की जिंदगी बसर कर कोरे...

कोरे - तू बोलेगा या मार खायेगा??

मामा - शांती के कोठेपे गया है...

कोरे - शां..........

कोरे आणि खानला शांतीचा कोठा व्यवस्थित माहीत होता. त्या कोठ्यावर जायचं म्हणजे खिशात किमान एकरकमी पाच हजार असायला हवेत ही कीर्ती खान आणि कोरे जाणून होते. तरीही दोघे निघाले. अरुंद आणि अंधारल्या जिन्यातून वर जाताना वाटणारच नाही, वर इतका पॉश हॉल असेल!

दारावरच हटकले गेले दोघे! एक धिप्पाड दलाल मग्रूरीने त्यांच्याकडे बघत होता.

दलाल - क्या होना??

कोरे - इधर जो मिलता है वहीच होना... बाजू हट..

दलालाला सरळ हाताने बाजूला करून कोरे आत आला. पाठोपाठ खानही!

आणि दृष्य पाहून त्यांना फार फार बरे वाटले.

शांताबाई भारतीय बैठकीवर बसलेली होती. तिच्या अखत्यारीतल्या सगळ्याच मुली आत्ता 'बिझी' असल्याने शांताबाईच्या चेहर्‍यावर एक अध्यात्मिक शांत स्मितहास्य पसरलेले होते. आणि....

.... शेजारच्या लोडाला टेकून.... बोका बसला होता...

... कोरेला पाहून काहीशी आनंदीत झालेली शांताबाई खानला पाहून मात्र नाराज झाली.

ती नाराजी स्वरांमधून व्यवस्थित डोकावेल याची काळजी घेत म्हणाली..

शांता - आवो सेठ... क्या होना.. ?????

कोरे - ए... तू जरा बाहेर ये...

आपल्याशी न बोलता कोरे आपल्याकडे पहिल्यांदाच आलेल्या मेहमानाशी डायरेक्ट बोलतोय हे पाहून शांताबाई मधे पडलीच!

शांता - मेरे साथ बात कीजिये सेठ... साहब यहांके मेहमान है...

कोरे - मेहमानची मुंडी कापून नाचवीन बुधवारात... मधे बोलू नकोस..

नाही म्हंटले तरी कोरेला शांताबाईच असे नाही तर अनेक कोठीवाल्या अन दलाल वचकून असायचे. कारण हा माणूस पैशात लोळतो अशी त्यांची कल्पना होती.

बोका - तू कोण??

कोरे - खाली ये... जरा बोलायचंय..

बोका - मगाशी झालेली मारामारी चुकून झाली.. माझ्या मनात काही नव्हतं...

आपण याला मगाचच्या मारामारीचा जाब विचारण्यासाठी आलो आहोत म्हणून हा घाबरलेला आहे हे कोरेला समजताच तो बराचसा शांत झाला.

कोरे - डरतो काय बे?? आम्हाला त्या मारामारीशी काय देणं घेणं??? आमचं कामच वेगळं आहे..

बोका - मला तुम्ही ओळखता??

कोरे - आधी ओळखत नव्हतो... आता ओळखू लागलो.. आपली बिरादरी एकच...

बोका - या बाई मला एक चांगली मैत्रीण देणार आहेत असं म्हणतायत...

कोरे - आधी खाली ये... कामाचं बोलू.. नंतर एक काय.. चार मैत्रिणी मिळव...

बोका - मी आलोच हां??

शांताबाईला नाराजच ठेवून बोका खाली उतरला. त्याला स्वतःलाच कोरेबरोबर जायचं होतं. त्यामुळे तो निर्धास्तच होता.

खाली आल्यावर कोरेने त्याला रिक्षेतून दुसरीकडे जायला कन्व्हिन्स केलं! बोका अगदी मानभावीपणे नाही नाही म्हणत कन्व्हिन्स झाला. तिघे रिक्षेतून सनराईजला आले.

बोक्याला भूक लागलेली होतीच! त्याने सटासटा स्वतःच ऑर्डर सोडली.

कोरे - मगाशी काय बोलला बे तू??

बोका - कुठे काय?

कोरे - ते.... हरभजनचं???

बोका - कोण हरभजन??

कोरे - हरभजन सिंग....

बोका - पुण्यात असतात का??

कोरेने खुनशी नजरेने बोक्याकडे पाहिले अन मग खानकडे!

आता खान मधे पडला.

खान - अबे तू मारामारी करके निकलरहा था तब क्या बक रहा था?? सेंच्युरी करेंगा हरभजन करके??

बोका - हा मग?? करणारच आहे...

खान - तुला काय माहीत??

बोका - आता तो खेळतोय म्हंटल्यावर तोच सेंच्युरी करणार ना??

खान - तू बोली घेतोस का??

बोका - नाही... ऑम्लेट मागवलंय मी... तुम्ही घ्या...

खान - अबे बोली... क्रिकेटची बोली....

बोका - छे छे... मी लावतो पैसे...

खान - कुणाकडे??

बोका - रामन...

हादरलेच दोघे! एकमेकांकडे पाहू लागले. रामनने आपल्याजागी इतर कुणाला नेमलंय की काय?? घात झाला.

कोरे - कोण रामन??

बोका - रामन हा एक बैल आहे...

कोरे - का??

बोका - कारण त्याला वाटतंय की उद्याची मॅच ड्रॉ होणार! तुम्ही कोण आहात??

कोरे - आम्ही पण पैसे लावतो... आजही लावलेत..

बोका - ड्रॉ होण्यावर???

कोरे - हा..

बोका - किती??

कोरे - दोन... लाख..

बोका - गेलात तुम्ही... भांडीकुंडी विकावी लागतील.. गुलाम म्हणून उभे राहावे लागणार तुम्हाला..

कोरे - आवाज कमी कर.. हे हरभजनचं नक्की आहे का??

बोका - अरे सेलेब्रेशन सुरू झालंय लंकेत आजच...

कोरे - तू रामनकडे कसे लावतोस पैसे???

बोका - कसे म्हणजे?? माणसं आहेत ना पुण्यात त्याची.. तुम्ही कुणाकडे लावता??

कोरे - आमचा वेगळाय एक जण... पण रामनची माणसं तुला कुठे भेटतात??

बोका - तुला विस्मरणाचा त्रास आहे का रे??

कोरे - म्हणजे??

बोका - आत्ता मगाशी हाणामारी काय उगाच झाली??

कोरे - म्हणजे??

बोका - त्या बारचा मालकच रामनचा माणूस आहे....

कोरे - हाड...

बोका - का पण?? तुला काय प्रॉब्लेम आहे तो रामनचा माणूस असण्यात??

कोरे - तो बोली घेतो??

बोका - त्याचा मुख्य धंदाच तो आहे.... बार हा साईड बिझिनेस आहे...

कोरे - मग आज काय झालं??

बोका - मल आधी टीप आली... शतक होणार ही..

कोरे - मग??

बोका - मग काय?? मी लावले तीन लाख...

पोटात गोळाच आला दोघांच्या..

खान - तीन??

बोका - चार लावणार होतो... हे बघ एक लाख तसेच ठेवलेत खिशात..

कोरे - का?? एक लाख का ठेवले??

बोका - तेवढ्यात त्याला फोन आला..

कोरे - कुणाचा??

बोका - पंटरचा... ऑम्लेट हवंय थोडं??

खान - नको... मग काय झालं??

बोका - त्यालाही टीप आली... मग लगेच म्हणाला चार लाख नाही घेणार.. आत्तापर्यंत दिलेस ते तीन पुरे

खान - तिच्यायला...

बोका - तोच तर वादाचा मुद्दा होता... मी म्हणालो टीप लागली म्हणून आता असं म्हणतोस तू...

खान - पण तो रामनचे काम करतो हे कशावरून??

बोका - रामनला फोन लाव की?? हा घे नंबर..

बोक्याने सरळ हातात फोन घेतला स्वतःचा!

कोरे - नको नको.. त्याला नको लावूस फोन...

बोका - मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय पण??

कोरे - तुझं नाव काय??

बोका - प्रसाद कोल्हे..

कोरे - प्रसाद... हे... हे खरच खरंय का??

बोका - हे बघ.. हे बघ लायसेन्स.. च्यायला.. मी कशाला खोटं नाव सांगू??

कोरे - ते नाही रे बाबा... हे हरभजनचं खरंय का??

बोका इकडेतिकडे बघत म्हणाला..

बोका - तुला म्हणून सांगतोय...

कानात प्राण आणून कोरे आणि खान बोक्याकडे पाहू लागले...

बोका - त्याची सेंच्युरी झाली तरीही मॅच ड्रॉच होणार आहे...

सनराईझच्या खुर्च्यांवर उभे राहून नाचत सुटावे असे वाटू लागले होते दोघांना! पण तो आनंद व्यक्त करणे हे धंद्याच्या नीतीविरुद्ध होते.

कोरे - कशावरून??

बोका - हरभजनची सेंच्युरी होणार आहे हे तुला कशावरून वाटतंय??

कोरे - ... तू.... तू म्हणालास म्हणून...

बोका - याचाच अर्थ तुझी स्वतःची अशी खबरी काढण्याची एकही यंत्रणा नाही.. मद्दड कुठला...

हा अपमान आत्ता तरी गोड वाटत होता.

कोरे - मग तू पैसे काय फक्त हरभजनच्या शतकावर लावलेस??

बोका - आत्ता कळलं??

कोरे आणि खान रुंद हासून एकमेकांकडे पाहू लागले.

खान - वो हरामी बारवालाभी बोली लेताय रामनकी..

कोरे - नाही नाही... मी तर आता सगळा विचारच करणार आहे...

खान - पण कोरेसाब.. या प्रसादच्या बोलीमुळे उद्या त्याला चांगलाच फटका बसणार...

कोरे - किती बोलीय रे रुपायाला??

बोका - हरभजनचे शंभर झाले तर तीन रुपायाला दहा रुपये..

कोरे - दहा?????? म्हणजे तुला किती मिळणार??

बोका - अर्थातच दहा लाख...

कोरे - मेलाच म्हणायचा बारवाला..

बोका - तुझ्याकडे आत्ता किती कॅश आहे??

कोरे - असतील तीन एक लाख... का रे??

बोका - तूही लाव की हरभजनवर... घ्या... चहा आला..

कोरे - मी?? मी कसा लावणार??

बोका - हे हल्ली साखर वेगळी द्यायला लागले वाटतं..

कोरे - .. होय रे?? मी कसा पैसे लावणार??

बोका - बारवाल्याकडे...

कोरे - आता थोडीच तो रेट असेल..

बोका - कसला??

कोरे - शतकाचा...

बोका - ए याला डोकंच नाही आहे का रे?

खान - नीट बोल.. कोरेसाब है वो...

बोका - शतकावर आता एक तरी पैसा घेईल का बारवाला??

कोरे - मग कशावर लावू म्हणतोयस??

बोका - हरभजन आऊट होण्यावर..

कोरे - आणि काय?? कफल्लक होऊन हिमालयात जाऊ??

बोका - जरा नीट विचार कर... तू आत्ता ३ लाख तो आऊट होण्यावर लावलेस तर बारवाला काय करेल???

कोरे - काय करणार??

बोका - शतक नक्कीच होणार आहे...

कोरे - मग??

बोका - शतक झालं तर त्याला तीन रुपयांचे दहा लाख द्यावे लागणार...

कोरे - मग??

बोका - शतक नाही झालं तर माझे तीन लाख त्याच्याकडेच राहणार...

कोरे - मग??

बोका - पण शतक झालं तर तुझे तीन लाख त्याच्याकडे राहणार..

कोरे - मग??

बोका - म्हणजे त्याला कुठून का होईना तीन लाख मिळणारच...

कोरे - मग??

बोका - आणि तुला किंवा मला दहा लाख मिळणारच...

कोरे - मग??

बोका - तुला 'मग' या शब्दाशिवाय इतर कोणताही शब्द येत नाही का??

कोरे - तुला म्हणायचंय काय??

बोका - आपण दोघं रिस्क विभागून घेऊ...

कोरे - कशी??

बोका - आत्ता मी तुला हे एक लाख द्यायचे..

बोक्याने सरळ नोटा टेबलवर ठेवल्या.

कोरे - आणि??

बोका - त्या बदल्यात तू तीन लाख बारवाल्याकडे शतक न होण्यावर लावायचेस...

कोरे - हं... मग??

बोका - आता उद्या जर मला दहा लाख मिळाले.. तर तुला मी दोन लाख द्यायचे..

कोरे - का?? तू का मला द्यायचेस??

बोका - हे एक आणि उद्याचे दोन असे तीन झाले ना?? म्हणजे तुझी रिस्क निल..

कोरे - हं..

बोका - तुझे तुझे पैसे आले तुझ्याकडे...

कोरे - हं..

बोका - आणि उद्या जर तुला दहा लाख मिळाले.. तर तू मला चार लाख द्यायचेस..

कोरे - कसे काय??

बोका - हे आत्ताचे माझे एक लाख.. आणि मी लावलेले तीन लाख..

कोरे - का पण??

बोका - म्हणजे माझी रिस्क निल होईल..

कोरे - हं..

बोका - म्हणजे प्रत्यक्षात काय होणार?? की मी दहा लाख जिंकलो तर त्याचा अर्थ मी चारच लाख जिंकले..

कोरे - कसे काय??

बोका - त्यातले तीन तुला द्यायचे आणि तीन मी लावलेच होते...

कोरे - हं..

बोका - पण तू जर दहा लाख जिंकलास तर तू मात्र तीनच लाख जिंकणार..

कोरे - का??

बोका - कारण तू मला चार देणार.. आणि तीन तू लावलेच होतेस..

कोरे - मग?? मी असं का करावं??

बोका - कारण तुला बसल्या बसल्या तीन लाख मिळणार आहेत...

कोरे - हो पण तुला तर बसल्या बसल्या चार लाख मिळणार आहेत..

बोका - हो पण त्याच्यासाठी मी हे एक लाख तू अनोळखी असतानाही तुला देतोय ना??

कोरे - ते नको देऊस.. या पैशांशिवायच आपण रिस्क विभागू..

बोका - कशी काय??

कोरे - मी तीन लाख लावतो.. मला दहा मिळाले तर तुला तीन परत करतो..

बोका - याच्यावर विश्वास कसा ठेवायचा??

कोरे - मी तरी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू??

बोका - अरे महामानवा.. म्हणून तर तुला मी हे एक लाख देतोय ना??? सिक्युरिटी...

कोरे - पण मी तुला काही नाही देणार..

बोका - मी कुठे म्हणतोय तू मला काही दे..

कोरे - पण हे सगळं तू का करतोयस??

बोका - आता बघा.. आपली चांगली ओळख झालीय.. एकाच व्यवसायात आहोत आपण.. मी विचार केला की दोघे मिळून एकमेकांची रिस्क कमी करू.. तर म्हणे हे कशासाठी सगळं?? आता काय बोलणार??

खान आणि कोरे स्तब्ध बसले. विचार वाईट नव्हता. या प्रसाद कोल्हेचे एक लाख आत्ता खिशात टाकायचे. उद्या वाटले तर परत द्यायचे आणि नाही वाटले तर याला थुका लावता येतीलच!

कोरे - मग हे मी घेऊ??

बोका - मग काय प्रदर्शनात ठेवल्यात काय नोटा??

कोरेने एक लाख खिशात टाकले. चहा वगैरे झालेला होता.

कोरे - ठीक आहे मग.. निघतो आम्ही.. उद्या कुठे भेटायचं??

बोका - उद्या मी नसेन एखादवेळेस पुण्यात! तू पैसे घेऊन ठेव माझे.. तू जिंकलास तर..

कोरे - मग कधी भेटायचंय??

बोका - नाहीतर असं करू... आत्ताच तिथे जाऊ... सरळ बारवाल्यालाच सांगू.. की आम्ही रिस्क डिव्हाईड करतोय... कारण त्यात तोही सेफ राहील..

कोरे - मी त्या हरामखोराशी शब्द बोलणार नाही.. तो रामनचं काम करतो..

बोका - मग तू पैसे कसे लावणार त्याच्याकडे?? दे बाबा माझे एक लाख..

कोरे - नाही नाही.. चल जाऊ.... व्यवहार तो व्यवहार..

खानला काही समजतच नव्हते.

खान - नक्की काय करताय कोरेसाब तुम्ही??

कोरे - बारवाल्याला सांगायचं की आम्ही रिस्क डिव्हाईड केलीय.. तो सेफ, आपण सेफ!

खान - पण कशासाठी??

कोरे - फायद्यासाठी ना शेवटी??

खान - फायदा कुणाचा??

कोरे - आपल्या सगळ्यांचाच...

खान - बारवाल्याचा फायदा नाही आहे यात..

कोरे - कसा काय??

खान - त्याचे चार लाख जाणारच ना? दोघांचे मिळून सहा लाख घ्यायचे अन एकाला दहा लाख द्यायचे..

कोरे - तो त्याचा व्यवसाय आहे... उलट आपण त्याला तीन लाख आणखीन देतोय..

खान - अहो पण हा माणू दहा लाख जिंकला अन आपल्याला भेटलाच नाही तर??

कोरे - तर एक लाख आहेत ना त्याचे आपल्याकडे..

खान - एक लाखासाठी तीन लाख सोडायचे??

कोरे - हरभजनचे शतक होण्याची शक्यता फार कमी आहे..

खान - पण त्याच्यावरच हा माणूस चार लाख लावत होता.. तीन लाख लावलेही..

कोरे - याचाच अर्थ हा जिंकण्याची शक्यता आहे असे त्याला वाटत आहे..

खान - मग??

कोरे - तरीही आपला विश्वास बसावा म्हणून तो एक लाख आपल्यालाच देतोय..

खान - अच्छा अच्छा... हंहं.. ओके...

कोरे - समजलं??

खान - ठीक आहे ठीक आहे..

बोका प्रसन्नपणे हासला.

बोका - चला... आता आपण तिघेही बारमध्ये जाऊ..

कोरे - तू कशाला येतोयस??

बोका - तुम्हाला मीच तीन लाख द्यायला राजी केलं असं बारवाल्याला सांगून त्याचं मन जिंकून मगाचची भांडणे मिटवण्यासाठी...

कोरे - ए... ते मगाशी लोक तुझ्याजवळ आले की आपटत कसे काय होते रे??

बोका - घसरडं होतं तिथे... बावळट होते सगळे.. मीच पाणी सांडून ठेवलंवतं...

कोरे खदाखदा हासला.

बोका - बारवाला चोवीस तास बुकिंग घेतो ते बरं आहे.. काही काही लोक घेत नाहीत... मला खरे तर बारवाल्याकडे बोली लावावीशी वाटतच नाही.... साला जुबानचा पक्का नाही... पण.. पर्यायच उपलब्ध नाही आहे.. काय करणार?? तुला... दुसरा एखादा माहितीय का रे?? बोल्या घेणारा?? माझ्याकडे अफलातून टीप्स येतात खरे म्हणजे.... पण बारवाला प्रामाणिक नाही आहे.. नाहीतर आपण तिघांनी मिळून कल्लाच केला असता...

पुन्हा कोरेला बारवाला रामनचेच काम करत असल्याची कटू आठवण आली आणि त्याचा चेहराही कडवट झाला.

आता कोरेमधील सावध बिझिनेसमन जागा झाला. आपणही बोल्या घेतो हे प्रसाद कोल्हेला सांगायची त्याला इच्छा झाली.

कोरे - प्रसाद.. तुला एक सांगू का??

बोका - अवश्य..

कोरे - बोल्या... मी पण घेतो..

बोक्याने अत्यंत गुप्त रहस्य ऐकल्यासारखा चेहरा केला आणि बावळटासारखा बघतच बसला. कोरे विजयोन्मादाने हासत होता. खान बोक्याचा अभिनय बघत होता. कोरे आणि खान या दोघांनाही 'आज आपल्याला एक रत्न सापडले' याचा आनंद झालेला होता.

बोका - तू??? तू ... बोल्या घेतोस??

कोरेने हसून मान हालवली.

बोका - मूर्खा.. मग... मग हेच आधी का नाही सांगीतलंस??

कोरे - तेवढी ओळख झालेली नव्हती आपली..

बोका - अरे... आपण उगाचच उठलो.. चला .. पुन्हा आत बसू..

कोरे - कशाला???

बोका - सगळं चित्रंच पालटलं नाही का आता??

कोरे - कसं काय??

बोका - आधी आत चला...

रस्त्यावरून टोळकं पुन्हा सनरईजमध्ये येऊन बसलं! मालक अन वेटर हे लोक चक्रम आहेत अशा थाटात बघतच बसले.

बोका - वेडाच आहेस...

कोरे आणि खान खुष होऊन स्माईल देत होते.

बोका - सगळं चित्रंच पालटलंय आता...

कोरे - कस काय ते सांग ना??

बोका - अरे तू बारवाल्याकडे बोली लावण्याऐवजी मीच तुझ्याकडे नाही का बोली लावू शकत??

कोरे - म्हणजे??

बोका - हे जे सिक्युरिटीचे एक लाख मी तुला दिले... ते शतक न होण्यावर लावून टाक..

कोरे - कितीने??

बोका - सेम रेट.. तीन रुपयाला दहा... म्हणजे एक लाख रुपयाला साधारण तीन लाख तेहतीस हजार काहीतरी होतील..

कोरे - आणि?

बोका - समजा उद्या मी जिंकलो.. तर प्रश्नच नाही... नुकसान बारवाल्याचं... तुझं काहीच नाही..

कोरे - आणि??

बोका - आणि मी हारलो तर हे एक लाख तुझ्याकडेच...

कोरे - मग??

बोका - आणि तू जे तीन लाख बारवाल्याला देणार होतास ते तू डायरेक्ट न देता इनडायरेक्ट द्यायचेस...

कोरे - म्हणजे??

बोका - फारच कमी रिस्क...

कोरे - म्हणजे??

बोका - अरे स्वतःच्या घरात भाजी लावल्यावर कुणी मंडईत जाईल का??

कोरे - म्हणजे काय म्हणतोयस??

बोका - आपल्याला आता काही रिस्कच नाही ना?? लक्षात घे.. मी तिकडे ३ लाख दिलेत.. दहा लाख होण्यासाठी... ती माझी रिस्क होती... ती एक मिनिट बाजूला ठेवू... आता तू हे एक लाख घे... याचे तीन लाख होण्यासाठी मी तुला देत आहे हे एक लाख असं गृहीत धर.. आता दोन्ही केसेस सेपरेटली कन्सिडर करू.. समजा मी दहा जिंकलो तिकडे.. तर हे एक तुझेच.. आणि मी तिकडे दहा हारलो.. दहा म्हणजे?? तीन हारलो.. तर मला तुझ्याकडून मी तुला दिलेल्या एक लाखाचे तीन लाख मिळणार.. वन अ‍ॅन्ड द सेम.. अगदी झालंच नुकसान तर बारवाल्याचंच.. म्हणजे मी तिकडे जिंकलो.. तर तुझा अन माझा काही व्यवहारच नाही.. हे एक लाख तुझे... आणि मी तिकडे हारलो अन तुझ्याकडे जिंकलो तर तू मला तीन लाख देणारच आहेस...

कोरे - हो पण मग ती माझी रिस्क नाही का??

बोका - कशी काय?? मी तिकडे हारलो याचा अर्थ तू तिकडे जिंकलास असा नाही का होत?? बारवाल्याकडे तू लावलेल्या तीन लाखांचे आत्ता नवीन बोलीप्रमाणे किमान सहा लाख तरी होतील की नाही??

कोरे - म्हणजे माझी त्याच्याकडची बोली तशीच ठेवायची??

बोका - अर्थातच... पण इनडायरेक्टली..

कोरे - म्हणजे??

बोका - एक मिनिट... आधी तू ते एक लाख तुझ्याकडे ठेवलेस का??

कोरे - हो...

बोका - आता ती पेटी इथे ठेव...

कोरे - हं...

बोका - आता हे जे पैसे आहेत... ते समजा शतक झाले नाही तर तू मला देणार.. वरचे तेहतीस हजार सध्या बाजूला ठेव...

कोरे - हो.. देणार...

बोका - आणि तू बारवाल्याला तीन लाख बोली लावण्याचे देणार..

कोरे - हो... देणार ना.. पण ते वेगळे..

बोका - वेगळेच वेगळेच.. ते वेगळेच.. आता ऐक.. तू त्याला जे पैसे देणार त्याचे शतक झाले तर किती होतील??

कोरे - काहीच नाही होणार...

बोका - आणि नाही झाले तर??

कोरे - नाही झाले तर होत्ल की सहा सात लाख..

बोका - हां! म्हणजे समजा सहा लाख धर... सहा लाख तुला तिकडे मिळणार आणि इकडे तू मला माझे एक लाख घेऊन तीन लाख देणार..

कोरे - हो...

बोका - म्हणजेच तू चार लाख प्लसमध्ये..

कोरे - हो...

बोका - आणि हे तीन लाख तू तिकडे हारलास, म्हणजे शतक झालं.. तर तू दोन लाख मायनसमध्ये.. कारण हे तीन गेले आणि माझे एक लाख आले..

कोरे - हो...

बोका - तर तेच नेमकं आपण करायचं नाही...

कोरे - मग??

बोका - हे तीन लाखही शतक होण्याच्या बाजूनेच लावायचे आपण..

कोरे - का??

बोका - कारण हारलो तर तू दोन लाख मायनस आणि मी तीन लाख मायनस...

कोरे - ................हं.... आलं लक्षात...

बोका - आणि जिंकलो तर सगळेच प्लसमध्ये..

कोरे - मग??

बोका - मग काय मग?? हे तीन लाख देऊन तू दोनच मायनस, मी सहा मायनस, किंवा दोघेही प्लस..

कोरे - तू सहा कसा काय मायनस??

बोका - आता हे तीन लाख शतक होण्याच्या बाजूने लावायचे म्हणजे माझ्या नावावर लावावे लागणार ना??

कोरे - हो...

बोका - मग जा आता... आणि लाव माझ्या नावावर...

कोरे - मी कसा काय तुझ्या नावावर लावू??

बोका - आपण तिघंही जाऊ.. आणि माझ्या नावावर लावू..

आता मात्र खान मधे पडलाच!

खान - एक मिनिट एक मिनिट.. मला काहीही समजलं नाही....

बोका - कोरेसाब, या माणसाला आता मी पुन्हा पुन्हा काहीही समजावून सांगत बसू शकत नाही... आधीच इतकी दारू प्यायलोय मी... डोकं सुन्न झालं होतं.. त्यात ती मारामारी...

कोरे - खान तू थांब जरा.. हे सगळं मला समजतंय...

वरात रिक्षेतून बारपाशी आली.

बोका - तुम्ही इथे थांबा.. ती बॅग द्या...

कोरे - का??

बोका - तुम्ही बोली लावता ते त्याला माहीत आहे ना??

कोरे - हो..

बोका - मग तुम्हीच पैसे लावायला आल्यावर तो बुकिंग घेईल का??

कोरे - अरे?? शक्यच नाही..

बोका - मग?? द्या इकडे बॅग.. आलोच मी..

बॅग घेऊन बोका सरळ बारच्या दारापाशी गेला. नेहमी दारात 'उभा' राहणारा भीम आज मात्र एक खुर्चीघेऊन कलून बसलेला होता. अजून त्याला वेदना होत असाव्यात! बोक्याला पाहिल्यावर तो चवताळलाच!

बोक्याने मागे वळून कोरे आणि खानकडे बघत बोंब मारली जोरात!

बोका - या या... लवकर या... हा मारतोय...

असं म्हणेपर्यंत भीम बोक्याच्या अगदी जवळ पोचला होता. आता पुन्हा मारामारी होणार आणि आपण प्रसाद कोल्हेला वाचवायला पाहिजे या उदात्त हेतूने कोरे आणि खान धावले. तोवर 'भीमला घाबरून पळत आहे' असा अभिनय करत बोका सुसाट सुटला होता. मागे भीम! मात्र तेवढ्यात भीमला समजले होते की 'कोरेशेठ' ज्यांना आपण रोज सलाम करतो, ते आपल्यालाच मारायला धावतायत! आता तो मागे वळला.

तीन लाख वाचवावेत की भीमला आवरावे हे न समजल्यामुळे दोघे बावचळलेले होते.

अर्ध्या तासाने बारवाला कोरेला सांगत होता..

"कायकी बोली शेठ?? मेरा कुछ वास्ताही नही वो बिझिनेससे....."

अवाक होऊन कोरे आणि खान बारवाल्याकडे बघत असतानाच कोरेचा मोबाईल वाजला...

"बोका बोलतोय... हरभजन सकाळीच २६ रन्सवर जाईल बर का??"

गुलमोहर: 

एक शंका आहे, ही कादंबरी नसल्याने कुठलीही कथा मधूनच वाचली तर समजेल का? की सगळ्या कथा इन्टरकनेक्टेड आहेत?

सानी, कुठलीहि वाचली तरी समजेल. मी सगळ्या वाचलेल्या नाहीत, तरी मला काही मिस केले असे वाटले नाही.

मी तुम्हाला आणि या कथेला मनापासून दाद देतो एवढा गोंधळ लिहिणे खरच अजब तरीही काही टिकाणी कथा बालिश वाटतेच.

अगदी वाटलंच की दोन्ही लिहावं तर कुठे अर्ज करावा लागेल??

मला अजून येथील प्रशासकीय कार्यप्रणाली माहीत नसल्यामुळे विचारतोय!

हा हा हा हा!

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

हा हा हा हा....
काय पण ध्यान आहे हा बोका..... जबरदस्त...
काहि ओळि परत परत वाचाव्या लागतात हे मात्र नक्कि. Happy