आयुष्य गोल आहे

Submitted by मिल्या on 6 January, 2011 - 23:20

थोड्या वेगळ्या वृत्तामधला एक प्रयत्न

टाळतो किती मी त्यांचा ससेमिरा पण, सायास फोल आहे
तीच तीच नाती भेटायचीच कारण... आयुष्य गोल आहे

टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे

रोजच्या झळांनी गेली सुकून स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे जराशी अद्याप ओल आहे

शेवटी मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे, किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या दुकानी इतकेच मोल आहे?

दर्शनास डोळे आतूरले कधीचे... पण पालखी दिसेना
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे

घेउनी भरारी... आव्हान अंबराला देशीलही मना पण
ठेव फक्त ध्यानी... सांभाळला तुझाही त्यानेच तोल आहे

गुलमोहर: 

मिल्या, पून्हा एकदा 'अनमोल' गझल वाचायला दिली याबद्दल धन्यवाद.

दु:ख सुद्धा माणसे पाहून येते , जिंदगी आणि कल्लोळ सारख्या गझला खरोखर अप्रतिम आहेत.

टाळतो किती मी त्यांचा ससेमिरा पण, सायास फोल आहे
तीच तीच नाती भेटायचीच कारण... आयुष्य गोल आहे

टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे>>> हे शेर आवडले.

१. तिसर्‍या शेरात डोळ्यांमध्ये चे डोळ्याम'धे' करावे लागेल असे वाटते.

२. एकाच ओळीत दोन यती असलेले हे वृत्त थोडे लांब आहे. गालगालगागा गागालगालगा गागालगागा

मिलिंद,

मला नीट म्हणता आली नाही गझल! पण मतला आणि दुसरा शेर खूप आवडले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'

टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे>>> हे शेर आवडले. >>> अगदी अगदी!! मस्तय रे मिल्या! Happy

भूषण धन्यवाद... तीच चूक पुन्हा केली मी Sad सुधारले आहे...

गागालगालगा * ३ >>> नाही हे वॄत्त ते नाहीये... आनंदकंद (गागाल गालगागा *२ ) च्या आधी एक गालगालगागा जोडले आहे... असे काही वॄत्त आहे का नाही ह्याची पण कल्पना नाही Sad

व्वा ! सगळेच शेर आवडले.

हा तर फार खलास

>>दर्शनास डोळे आतूरले कधीचे... पण पालखी दिसेना
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे

मिलिंद, मी नंतर माझा प्रतिसाद बदलला, आधी मला तसे वृत्त वाटले होते.

वृत्त आहे की नाही कल्पना नाही - काहीच प्रॉब्लेम नाही. आपण कोणतेही वृत्त तयार करू शकतोच की! हे पण छान वृत्त आहे. दोन यती आहेत.

(अवांतर - कवीवर्य म भा चव्हाण एकदा एका दुसर्‍या भटशिष्योत्तमांना म्हणाले होते...

रुबाईसाठी ५४ वृत्ते आहेत म्हणता, आम्ही म्हणतो त्रेपन्नावे तयार झाल्यावर चोपन्नावे आलेच कसे?? कुणीतरी निर्मण केले म्हणूनच ना??)

(गंमत म्हणून लिहीले.)

-'बेफिकीर'!

दुसरा शेर जबरदस्त आवडला मिलींद!! मतलाही सुंदर!!!

किरकोळ शंका:'ओरखडे' हे "ओरखाडे" असे वापरू शकतो का?

टाळतो किती मी त्यांचा ससेमिरा पण, सायास फोल आहे
तीच तीच नाती भेटायचीच कारण... आयुष्य गोल आहे

रोजच्या झळांनी गेली सुकून स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे जराशी अद्याप ओल आहे
सुंदर!!! मस्त!!

अरे बाबा!! किती अवघड वृत्त!!!
मी गझल सोडून २ मिन्टे हाच विचार करत होतो, की संपूर्ण गझलेमध्ये ही कारागिरी कशी निभावली असेल ह्या महाराजाने??
असे शब्द सुचणे खरंच अवघड आहे.. आणि त्यातूनही शेर वाचकाच्या मनाला भिडले पाहिजेत! वाह!!

वा..पहिला आणि रांजणाचा शेर सुपर्ब!!

फक्त "डोळ्यांमधे" वाचताना अडखळायला झालं...मलाच झालं का? Uhoh

मस्त गझल मिल्या Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांनाच अनेक धन्यवाद ...

विजय : ओरखडे असाच शब्द आहे त्याचा अपभ्रंश म्हणून ओरखाडे बोली भाषेत खूप वेळा वापरतात... तुमचा प्रश्न बघून 'ओरखाडे' गूगलून पाहिले बरेच रिसल्ट्स मिळाले... ती ओळ बदलायचा प्रयत्न करतो आहे पण मी

सुमेनिष : डोळ्यांवर अडखळायचे काही कारण नाही असे वाटते...

डोळे आहेत ते खाचा नाहीयेत काही Happy गंमत करतोय गं

मस्तच मिलींद, पण जरा फ्रिक्वेन्सी वाढवा ना राव! किती वेळ वाट पहावी लागते तुमच्या गझलांची Happy

मिल्या,
अप्रतिम आहे गझल... Happy

>>घेउनी भरारी... आव्हान अंबराला देशीलही मना पण
ठेव फक्त ध्यानी... सांभाळला तुझाही त्यानेच तोल आहे >> हा शेर विशेष आवडला..

पुलेशु!

मिल्या मस्त रे ! 'रांजण' विशेष आवडला..
(सवय नसल्याने वृत्त वाचायला अवघड गेले थोडे मला)

अहाहा... मिल्या, नियमीतपणे टाकत जा रे भाऊ Happy
असं काही अधुन मधुन वाचायला मिळालं की मस्त वाटतं....., आवडली हे सांगणे नलगे... Happy

विशेषतः हा शेर शॉल्लेट...

<<<दर्शनास डोळे आतूरले कधीचे... पण पालखी दिसेना
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे>>>