दिर्घकथा : जलजीवा (भाग- ५)

Submitted by निमिष_सोनार on 6 January, 2011 - 22:29

अमेय जीप घेवून निघाला. आजचा दिवस महत्त्वपूर्ण होता. त्याने रस्त्याने जातांना शूटींग करायला सुरुवात केली. अर्थात शूटींग करण्यासाठीचे परवाने व कायदेशीर बाबींची पूर्तता योग्य ठिकाणी केल्यानंतरच त्याने शूटींगला सुरुवात केली होती.

कालच्याच रस्त्याने तो जीप नेत होता. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. सकाळचे दहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता. त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते. जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता.

वर आकाशात पाहील्यावर त्याला फक्त थोडेसेच ढग दिसले. त्यातले काही काळे आणि काही पांढरे.

कालच्यासारखे ते डोळे आज काही दिसत नव्हते. काल मात्र तो खुप घाबरला होता.

त्याने जितिनला फोन लावला - "जितू, येतोस का?"

जितिन -"नाही ना यार. महत्त्वाचं काम आहे. उद्या नक्की येतो. तू काय एकटा चाल्ल्यायस का?"

अमेय- " होय रे. जावू जरा म्हट्लं. पूर्वतयारी करूया."

जितिन -" तसे भितीदायक असे काही नाही तेथे! गरज पडली तर मला फोन कर. मी कुणाला तरी मदतीला पाठवीन."

अमेय -" ओके. थॅंक्स! चल बाय!"

या जंगलाचे एक वैशिष्ट्य अमेयच्या लक्षात राहीले होते ते म्हणजे तीन पंखांचा एक छोटा पक्षी. स्थानिक लोक त्या पक्ष्याला नामातुआ म्हणायचे. शास्त्रीय भाषेत त्याला "एरिन्होटा टेस्कावोया" असे नाव होते. त्याला तीन पंख असतात आणि तो तुआआ तुआआ असा आवाज करत जंगलात उडत असे. जंगला जवळची लोकवस्ती संपल्यानंतर तो पक्षी उडतांना त्याला दिसला. त्याने अर्थातच लगेच त्या पक्ष्याच्या प्रत्येक हालचाली शूट केल्या.

जस जसा तो जंगलात आत जात होता तसा त्या मुलीची त्याला आठवण झाली....

तो स्वत:शी हसला.

बीप बीप बीप करत त्याचा मोबाईल वाजला. अ‍ॅनाचा कॉल होता. साधारण अकरा वाजले होते. तेथे लंडनमध्ये अजून सकाळी सात वाजले होते.

"हाऊ आर यु, माय डियर. आय लव्ह यू"

"लव्ह यु टू. आज लवकर उठलीस?"

"होय रे. तुझी प्रकर्षाने आज आठवण आली, म्हणून केला फोन. कुठे आहेस. पोहचलास वाटते त्या जंगलात?"

"हो. शेवटी सुरु झाली शूटींग. पण आज मी एकटाच आहे. उद्या सगळेजण जॉईन होतील मला. आता मी त्या पक्ष्याची शूटींग करतोय ज्याला तीन पंख आहेत- नामातुआ."

"वाव. ग्रेट. चल बाय्. कीस यु. कॉल मी अगेन. आय वील वेट फोर योर कॉल."

"या. बाय. कीस यु लॉट. बाय."

अमेयचे लक्ष वर आकाशाकडे नव्हते तेव्हा एका ढगातले ते दोन डोळे त्याचा माग घेत होते.

तो ढग त्याच्या मागोमाग येत होता. पण अमेयचे तिकडे लक्ष नव्हते.

आतापर्यंत जीपच्या जवळ उडणारा नामातुआ गर्द झाडींमध्ये दिसेनासा झाला.

तसे या जंगलात हिस्त्र प्राणी नव्हते. पण काही वेगळ्याच प्रकारचे प्राणी होते. जसे रानमांजरासारखे दिसणारे - एक वेगळेच मांजर- त्या मांजराचे डोळे अंधारात हिरवे न दिसता पिवळे दिसत.

अजून तो प्राणी दृष्टीस पडला नव्हता.

पूर्वी ज्या तळ्याकाठी अमेय ने तंबू ठोकला होता ते ठीकाण आले.

तेथे त्याने तंबू ठोकला. जागा सेफ होती.

तेथे थोडी झाडी आणि थोडे मोकळे मैदान होते. त्याच्या थोडे पुढे गेले की होता जार्वार पर्वत. त्या पर्वताचे वैषिष्ट्य म्हणजे तो पर्वत हिरवट होता. त्यावर गवत वगैरे नव्हते तर मातीचा रंग हिरवा होता.

अंधारून आल्यासारखे वाटत होते. आकाशात विविध आकाराचे ढग गर्दी करत होते.

सोबत आणलेल्या सर्व वस्तू जागच्या जागी सेट केल्यावर तो थोडा पहुडला.

दहा मिनिटे डोळा लागल्यावर त्याला नामातुआ च्या जोरा जोरात ओरडण्याने जाग आली. पुन्हा त्या पक्ष्याची फिल्म शूट केल्यावर त्याने सोबत आणलेला टीफिन संपवला.

समोरच्या तळ्यातले पाणी तसे शांत होते. तो तळ्याकडे एकटक बघत बसला. जार्वार पर्वताच्या टोकावर पाऊस पडायला सुरुवात झाली.

त्याला काकांचा फोन आला, " बेटा, पाऊस सुरु झाला आहे. लवकर निघून ये घरी संध्याकाळच्या आत. बाकी तुझं शूटींग वगैरे कसं चाल्लंय?"

अमेय - "ठीक आहे. व्यवस्थित. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. बरं ठेवतो."

बराचसा भाग शूटींग करून झाल्यावर दुपारी एक वाजता त्या जार्वार पर्वतावरच्या पडणार्‍या पावसाकडे तो पहात होता.

ढगांतून पडणारे विविध थेंब आता एकत्र येत होते. नैसर्गिकरित्या जेव्हा पाऊस पडतो तेव्हा थेंब सरळ पडतात. आता ते अनेक थेंब एकमेकांकडे आकर्षले जावून आकाशातच अधांतरी एके ठीकाणी एकत्र येत होते.
त्या अनेक थेंबाचा एक मोठा थेंब झाला. असे अनेक मोठे थेंब एकत्र आले. त्यातून मानवी डोक्याचा आकार तयार होत होता.

तेच ते. पूर्वी बघितले होते तसे. तेच. तेच....

इकडे तळ्यात मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळीपाळीने डोके वर करत होते.
त्याचा आवाज एवढा मोठा होता की अमेयचे तिकडे तळ्याकडे लक्ष गेले. अंधारलेले तळे आणि त्यातून मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळी पाळीने डोके वर खाली करत होते.
दृश्य मोठे अद्भुत आणि भीतीदायक होते. त्या प्रत्येक डोक्यामध्ये दोन मोत्यासारखे चमकणारे डोळे होते.

तिकडे पर्वतावरच्या पावसातून डोके आणि मानेपर्यंतची स्त्री- मानवाकृती तयार होत होती.
मग माने पासूनचा खालचा भाग दिसायला लागला. चेहेरा अजून ओळखीचा वाटत नव्हता. पण ती आकृती खुपच सुंदर होती.
पावसाच्या थेंबाथेंबांपासून हळूहळू एक स्त्री तयार होत होती.

अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला.
कॅमेरा घेवुन याची शूटींग केली पाहीजे असा विचार त्याच्या मनात आला. पण त्या दृश्याकडे पाहून तो इतका हरखला होता की डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता.

अ‍ॅनाचा कॉल आल्याने अमेयचा तंबूतला मोबाईल वाजू लागला.
(क्रमश: )

गुलमोहर: 

Good