प्रतिमा, ती आणि कथा

Submitted by nikhilmkhaire on 5 January, 2011 - 16:34

"माय बिलव्हेड इन द बिझनेस सूट"

तो:

मी तिला अनेकदा सांगितलं की आपण हिंदू 'सायकलिक- चक्राकार संस्कृति' मानणारे आहोत.
'म्हणजे कसं?' ती अनेकदा विचारायची.
''म्हणजे बघ, आपण म्हणजे सर्वसाधारण माणसं जन्माला येतो ती मागच्या जन्मातून, मग हा जन्म भोगतो आणि पुढच्या जन्माला निघून जातो. सर्वसाधारणपणे हे चक्र असे फिरत राहते. त्यामुळे आपलं आयुष्य, कथा, महाकाव्यं, कादंबर्‍या या काहिशा गोल असतात.''
"उदाहरणार्थ?"

रामायणाची एक कथा आहे. अगदी शेवटाकडची. रामाचं अवतार कार्य संपलेलं असतं म्हणून काळ त्यांना घ्यायला आलेला असतो. पण तो आयोध्येच्या बाहेरच थांबून राहतो. वेळ जात राहतो, पण काळ काही आयोध्येमध्ये प्रवेश करीत नाही. ब्रम्हदेवांना प्रश्न पडतो की काळ असं का करतोय. ते त्याला विचारतात. काळ म्हणतो, "हनुमान राखी राम, जाऊ कसा आत, जीवाचे गा भय, जीवाहून थोर!" ब्रम्हदेव काय समजायचे ते समजतात आणि रामाकडे जातात. ते रामाला सांगतात ''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ".

प्रभू श्रीराम विचारांती, हनुमानाला जवळ बोलवतात. नकळतच त्यांचे डोळे भरून येतात. युगायुगाच्या या सोबत्याला सोडून जाणं त्यांच्यासाठी अवघड असणार असतं. हनुमानाला त्याच्या धन्याची ही अवस्था का झाली ते कळू शकत नाही. तो प्रश्न विचारायला तोंड उघडणार एवढ्या रामाच्या हातातली एक अंगठी जमिनीवर पडते आणि हळुहळू घरंगळत जमिनीतील एका फटीमध्ये नाहीशी होते. हनुमानाच्या हे लक्षात येत नाही. राम त्याला सांगतो, तेवढी अंगठी घेऊन ये बाबा! हनुमान निरखून बघतो, भेग चांगलीच खोल असते. तो सूक्ष्म रूप धारण करतो आणि त्या भेगेमध्ये प्रवेशतो. तो खोल खोल जात राहतो.

अगदी धरणीच्या अंतापर्यंत आता हा प्रवास होणार, असं वाटत असतानाच, हनुमान नागलोकांत येऊन पोहोचतो. तिथलं गूढ वातावरण अधिकच गूढ वाटू लागतं. भलाथोरला नागराज हनुमानासमोर येतो. तो हनुमानाला म्हणतो, त्या पलिकडच्या खोलीमध्ये पडली आहे अंगठी. दोघेही त्या खोलीकडे चालू लागतात. दाराखालच्या फटीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडू पाहत असतो. हनुमान खोलीचं दार ढकलतो. दाराखालून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश आता दोघांच्याही अंगावर पडू लागतो. हनुमान समोर बघतो तर एकसारख्या असंख्य अंगठ्यांची एक रास समोर पडलेली असते. नागराज हनुमानाला म्हणतो, शोध तुझी अंगठी!

हनुमान पुढे होऊन एक एक अंगठी उचलू लागतो. प्रत्येक अंगठीमध्ये त्याला त्याचा राम जाणवत असतो! प्रत्येकीला रामाचा स्पर्श झालेला असतो. तो बुचकळ्यात पडतो आणि पाताळाच्या स्वाम्याकडे बघतो. तो हसत असतो. तो हनुमानाला सांगतो, "प्रवेशला काळ, संपला अवतार, रघुरामाचा!" हनुमान पळतच दारकडे जाऊ लागतो. नागराज त्याला थांबवतो "उशिर जाहला, त्याने गाठ्ली गा वेळ! कसा रे फसशी, युगांचा हा खेळ! मारुतीराया युगांयुगे हे असंच चाललं आहे. दरवेळेस आंगठी पडते आणि दरवेळेस तू फसतोस!"

हनुमानाचे डोळे पाणवतात. त्याच्या डोळ्यासमोर असतो तो त्याच्या प्रभूचा चेहरा. त्या चेहर्‍याला नमस्कार करून हनुमान म्हणतो "नाही फसणार पुढच्या वेळी, नाही सोडणार राम"

मी परवा एका कॉलेजात गेलो होतो. विद्यार्थी म्हणून नाही. एक इव्हेन्ट कव्हर करायचा होता म्हणून. कसलासा सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला होता कॉलेजात आणि मला शिक्षा म्हणून तिथं पाठवण्यात आलं होतं. कुणीतरी प्रख्यात लेखिका त्या दिवशी तिथं बोलणार होती. मी अत्यंत निरूत्साहानं कॉलेजामध्ये शिरलो.

टिंब टिंब कॉलेजचा परिसर उत्साहानं भरून गेला होता. चोहीकडे तरूणाईचं सळसळतं चैतन्य होतं. महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्‍या अनेक विविध प्रकारच्या उपक्रमांविषयी टिंब टिंब कॉलेजच्या प्राचार्यांनी माहिती दिली. कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुण्या त्यांच्या लेखनाविषयी आणि आजपर्यंतच्या प्रवासाविषयी बोलल्या. महाविद्यालयीन जीवनामध्ये सांस्कृतिक महोत्सवांचं महत्व सांगितलं. विद्यार्थी प्रतिनिध्यानं आभार मानले.

कॉलेजात सिगारेट पिऊ नये अशा आशयाच्या पाट्या सर्वत्र लावल्या होत्या. मी कॅन्टिनकडे वळलो. जुनाट इमारतीपेक्षा हे कोपार्‍यातलं कॅन्टिन बरंच सुसह्य होतं. गर्दीही फारशी नव्हती. मी कोपर्‍यातील एका टेबलावर जाऊन बसलो. तिथून बहुतेक सगळं कॅन्टिन व्यवस्थित दिसत होतं. काही मुलं सिगारेट पित होती. मग मी पण हिंमत करून सिगारेट पेटवली. एक वेटर माझ्या दिशेनं आला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं केलं. पण माझं त्याच्यावर लक्ष होतं. मला वाटत होतं तो मला सिगारेट विझवायला सांगेल, मग मी त्याला माझं आयकार्ड दाखवेन. पण तसं काही झालं नाही. तो आला आणि त्याने ऑर्डर विचारली. मी एक चहा मागवला आणि शांतपणे सिगारेटकडे बघत राहिलो. कॅन्टिनमध्ये एक अनाऊन्समेंट झाली "प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले असून, सांस्कृतिक महोत्सव थोड्याच वेळात सुरू होईल. तरी सर्वांना विनंती आहे, की त्यांनी सभागृहात यावं'. चहा आला. मी एकाआड एक असे चहा आणि सिगारेटचे झुरके घेत राहिलो.

"तू हे सगळं का सांगतोयस? फोकस, तो विसरू नकोस. कथा काय आहे आणि तू लिहितोयस काय?" आत्ताच माय बिलव्हेड इन बिझनेस सूट येऊन मला सांगून गेली.

खरं तर हे मी जे लिहितोय, ती माझी कथा आहे. म्हणजे मी पत्रकार नाही, पण लेखक आहे. पोटापाण्यासाठी मी कथा लिहितो. तसं पहायला गेलं तर पत्रकाराचंच काम करतो मी कारण कुणी तरी म्हंटलंच आहे "इतिहासाचं डॉक्यूमेंटेशन वर्तमानपत्रांपेक्षा कथा कादंबर्‍यांमध्ये चांगलं होतं". ते असो! तर या कथेचा नायक एक पत्रकार आहे. (का कुणास ठाऊक पत्रकाराची प्रतिमा मला जास्त जवळची वाटते). तर हा पत्रकार चिडचिडा झाला आहे. त्याला खरं तर लेखक व्हायचं आहे, पण पोटापाण्यासाठी पत्रकाराचं काम करणं भाग पडतं आहे. पुण्यामध्ये राहण्याची सोय नुकतीच झाली आहे त्याची! आगदी सिनेमात असतं तसं एका तरुण सुंदर मुलीसोबत तो राहतो. तो तिच्यावर आणि ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते.

"अगं, अशी डायरेक्ट प्लॉटला सुरुवात नाही करता येत! काहीतरी वातावरण निर्मिती व्हायला नको का?"
" ते काय असेल ते असो, मला संध्याकाळपर्यंत ही कथा पूर्ण व्हायला हवी, नाहीतर घराबाहेर काढेन!"
ती हलकेच माझ्या गालावर ओठ ठेवत म्हणाली! मी तिला आणखी जवळ खेचायचा प्रयत्न केला. पण ती त्याआधीच निसटली.
"संध्याकाळच्या आत... नाहीतर ..." ती दाराकडे बोट दाखवत म्हणाली.

मी खुर्चीतून उठून तिला मुजरा केला. ती छानशी हसली आणि निघून गेली. तिच्याकडे बघताना जाणवलं किती जपते ही स्वतःला, स्वतःच्या प्रतिमेला. दाराच्या आत एक आणि दाराच्या बाहेर दुसरी. प्रतिमांचा खेळ आहे हा सगळा! छान कल्पना आहे ही कथेसाठी. पत्रकारासोबत राहणारी मुलगी एक कॉलगर्ल असते. कॉलगर्ल नको, मसाज पार्लरमध्ये काम करते. बिझनेस सूटमध्ये घराबाहेर पडते आणि मग पार्लरमध्ये जाते! एवढा मेक-अप करते की स्वतःचा खरा चेहरा कुणालाही कळू नये. त्यालादेखील ते माहित असतं, पण तो काही करू शकत नाही!

ती:
तो अजूनही घरी आला नसेल, त्याचा फोन येतो नाही तर. मी इथेच थांबते आणखी थोडा वेळ. नेहमीचं आहे हे त्याचं. तो घरी यायच्या अर्धा तास आधी मी पोहोचते आणि सगळा मेक्-अप धूवून काढते. त्याला मला मेक्-अपमध्ये बघायला आवडत नाही. त्याची चूक नाही. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही.

तो आता बाहेरच जेवून येईल. क्लायंटसोबतच्या त्याच्या डिनर मिटिंग्ज अशाच असतात, असं त्याने मला सांगीतलंय. पण मला माहितीये त्याचं क्लायंट सर्विसिंगचं काम कसं असतं ते. त्यानिमित्तच तर तो पहिल्यांदा भेटला होता मला.

मी सांगीतलं का, की मी एका मसाज पार्लरमध्ये काम करते? विसरलेच मी. हा आमचा पार्लर. अतिशय अप मार्केट एरियामध्ये आहे आमचा पार्लर. मोठे मोठे लोक आमचे क्लायंट आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आम्हाला. ते माझं काम आहे आणि मला ते आवडतं!

त्याचा एक क्लायंट होता मुंदडा नावाचा. त्याच्या अ‍ॅड एजन्सीसाठी सर्वात महत्वाचा क्लायंट होता तो आणि याच्यासाठीही. अतिशय घाणेरडा, ओंगळ आणि बाईलवेडा माणूस. एकदा हा म्हणाला होता की कुठल्याही स्त्रीलिंगी वस्तूविषयी मुंदडाला आकर्षण आहे. मी खूप हसले होते यावर कारण तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते आणि आम्ही दोघे बेडमध्ये होतो. तर त्या मुंदडाने याच्या एजन्सीसोबत काम करावं म्हणून याच्याकडे बाई मागितली होती. तेव्हा याची एजन्सीमधली इमेज यथातथाच होती. ती टिकवण्यासाठी याला हा क्लायंट गमावून चालणार नव्हतं. कोणाच्या तरी ओळखीने दोघं आमच्या पार्लरमध्ये आले होते. तेव्हा मी याला पहिल्यांदा भेटले.

मुंदडा स्वतः एका आडदांड मुलीसोबत गेला आणि हा माझ्याकडे आला. हा दिसायला काही खास वगैरे नाहीये. माझ्याकडे आला. मी दुरूनच त्याला न्याहाळत होते. टायची गाठ सैल करून एक कोचवर तो बसला. मी मुद्दाम काही बोलले नाही. तोही काही बोलला नाही. माझ्यासाठी हे नवीन नव्हतं पण त्याच्यासाठी नक्कीच होतं. थोड्या वेळाने तो अस्वस्थ झाला. मला कीव आली त्याची आणि त्याच क्षणी तो आवडला मला. मग सर्वसाधारण स्त्री आणि पुरुष यांच्यात जे होतं ते सगळं झालं आमच्यात. मला वाटलं होतं की त्या इच्छा मेल्याबिल्या आहेत माझ्या, पण असं नव्हतं. आय एन्जॉयिड इट थरोली!

अ‍ॅम आय साऊंडिंग लाईक अ व्होर? मी बहुतेकदा टाळते हा विषय. उगाच मी अबला वगैरे आहे असं माझं मलाच वाटू लागतं. पण तसं नाहिये. त्यानेही मला अनेकदा सांगितलं की सोड हे काम. पण मी नाही सोडलं. आणि आय डोन्ट फील गिल्टी अबाऊट इट. पण कधीकधी तो एखाद्या लहान मुलासारखं चिडतो माझ्यावर आणि सांगतो, काम सोड नाहीतर घराबाहेर काढेन! अजून तरी मी त्याच्यासोबतच राहते आणि कामही करते.

कॉलेजात असताना एका मुलीवर त्याचं प्रेम होतं असं तो सांगतो. तिचंही त्याच्यावर प्रेम होत. उत्साही आणि उत्सवी मुला-मुलींची एक फौज तयार असते प्रत्येक कॉलेजात असते. त्यांना आपण सांस्कृतिक वल्ली असं म्हणूयात. त्यांपैकी प्रत्येकाला महारास्ट्राच्या सांस्कृतिक भविष्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे, असं वाटत असतं. तशी या दोघांनाही वाटत होती. तिथेच त्यांची जोडी जमली. एकत्रित फिरणं आलं आणि शेवटी दोघे एकत्र राहू लागले. दोघेही पुण्याबाहेरचे त्यामुळे घरच्यांना काहीच माहित नव्हतं या बाबतीत. पण एकदा तिच्या घरच्यांना कळालं आणि आले ते त्याच्या खोलीवर. लग्न कर म्हणाले हिच्याशी! तो तयार होता, पण त्याला ते शक्य नव्हतं.

पैसे आणि जबाबदारी पेलायची क्षमता दोनीही नव्हतं त्याच्यात. घेऊन गेले तिच्या घरचे आणि लग्न लाऊन टाकलं तिचं. ती गोष्ट लागली याच्या मनाला. तेव्हापासून याने हिंदी सिनेमाच्या हिरोसारखं एकच ध्येय ठेवलं आयुष्यात- पैसा! सांस्कृतिक कार्य वगैरे सगळं सोडून नोकरीला लागला. पण कॉन्फिडन्स कुठे होता? मग खातोय तिथेही धक्के!

आपली स्वतःची अशी एक इमेज असावी असं त्याला फार वाटतं. आणि ती बनवायचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे त्याचा. मला कधी कधी खूप भिती वाटते ती याच गोष्टीची! त्याच्या या इमेजमध्ये मी कधीच नसते. फक्त तो असतो. मला माहितीये की, तो मला सोडणार नाही. पण मन हे असं वेडं असतं. बाकी तो सगळीकडे मला घेऊन जातो, त्याची पार्टनर म्हणून. परवाच सांगत होता तो, आमच्या लिव्ह इन रिलेशनशिपचं सगळ्या ऑफिसमध्ये कौतुक होतं म्हणून. मला काय बरंच आहे. गम्मत म्हणजे हल्ली मलाही वाटू लागलंय, सोडून द्यावं हे सगळं आणि मस्तपैकी या "माय बिलव्हेड इन बिझनेस सूट"ची बायको म्हणून राहवं! त्याच्यासाठी त्याच्या आवडीची शेपूची भाजी करावी, त्याचा संसार सांभाळावा! बघू, बोलेन त्याच्याशी!

कथा
पत्रकार जागा होतो. थोडा वेळ लोळल्यावर तो घड्याळात बघतो. दुपारचे तीन वाजलेले असतात. ती अजूनही आलेली नसते. तो फ्रेश होतो. चहाचं भांड ठेवतो आणि सिगारेट शिलगावतो. त्याच काडीने मग तो एक उदबत्ती पेटवतो. सिगारेट आणि उदबत्ती यांचा एक वेगळाच वास तयार होतो. चहा कपामध्ये ओतून घेऊन तो टेबलाजवळ येतो. लिहिण्यासाठी कागद, शाईपेन यांची जमवाजमव करून तो लिहायला बसतो. त्याच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून एक कथा रेंगाळत असते. प्रतिमांमध्ये अडकलेला एक लेखक, स्वतःची प्रतिमा लपवू पाहणारी एक वेश्या आणि स्वतःची प्रतिमा घडवू पाहणारा एक मार्केटिंगवाला ही तीन पात्रं त्याच्या मनामध्ये घोळत असतात. त्यांची बांधणी कशी करावी हे त्याला समजत नसतं.

समोर तिचा एक फोटो एका स्वस्तशा फ्रेममध्ये ठेवलेला दिसतो. तो बराच वेळ त्या फोटोकडे बघत बसतो. सहा महिने झाले एकत्र राहतोय आपण तरी हा फोटो कसा दिसला नाही, याचं त्याला नवल वाटतं. तो फ्रेम उचलून घेतो. तिच्या गावाकडचा फोटो असतो तो. मेक-अपशिवाय किती छान दिसते ही, त्याच्या मनामध्ये विचार चमकून जातो. तिचा हा फोटो, आत्ताची ती आणि मेक-अप थापल्यावरची ती - एकच माणूस, तीन प्रतिमा! त्याला स्वतःवरच हसू येतं. आपण प्रतिमांमध्ये अडकलेल्या लेखकासारखा विचार करू लागलो आहोत.

दार वाजतं तो पटकन उठतो आणि दार उघडतो. दारामध्ये ती उभी असते. तिचा मेक-अप तसाच असतो आणि बिझनेस सूटही. तो बाजूला होतो. ती आत येते. तो तसाच उभा राहतो. अचानक त्याला आठवतं, ती पहिल्यांदादेखील अशीच आली होती. मला रहायला जागा हवी म्हणत! आपली आणि तिची फारशी ओळख नव्हती, म्हणजे दोन-तीनदा ती रात्री आली होती आपल्यासोबत. तेवढंच आणि आपण तिला इथं राहू दिलं.

तो वळतो आणि तिच्याकडे बघून प्रसन्नपणे हसतो.
"आज लवकर आलीस..."
ती काहीच उत्तर देत नाही. तिची नजर घरभर ती काहीतरी शोधत असते.
"चहा घेणार?" तो
"नको... बस जरा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. "
"काय?" तो पाठीमागून तिच्या गळ्याभोवती हात टाकत विचारतो.
ती त्याचे हात तसेच ठेवते.
"काय ठरवलं आहेस तू?"
"कशाचं?"
"तुला माहितीये.."
"नाही" तो नाटकी स्वरात म्हणतो.
"हे बघ... मला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे, किती दिवस हे असं राहणार आहोत आपण?" ती त्याचे हात सोडवत उभी राहते.
"मी तुला सांगीतलं ना, थोड्याच दिवसात मला दुसरी नोकरी मिळेल आणि मग..."
"सहा महिने झाले मी ऐकतीये हे"
"वेळ लागतो आहे खरं, पण मी तरी काय करू"
ती काहीच बोलत नाही. तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो.
"तू काही नको करूस! मी काय करायचं ते ठरवलं आहे!"
"म्हणजे"
"म्हणजे, मला दुसरं कुणीतरी आवडू लागलं आहे आणि मी त्याच्यासोबत रहायला जातीये!"
"वेड लागलंय का तुला?"
कॉटखालची तिची बॅग ती ओढून काढते. तो तिला थांबवू लागतो. ती त्याला झिडकारते.
"कंटाळलीये मी" ती भडकते, "तुझं वांझोटं लिखाण, तुझी स्वप्नं आणि तुझा खोटा आशावाद, तुझा आळस या सगळ्यांनाच!"
"चूक तुझी नाही! तुझ्या जातीची, तुझ्या धंद्याची आहे!" त्याचा ताबा सुटतो.
ती त्याच्याकडे बघत राहते. आता तो तिला थांबवू शकत नाही!

ती बॅग घेऊन निघून जाते! तो क्षणभरानं भानावर येतो आणि तिला थांबवायला तिच्या मागे पळतो.
पण ती कुणाच्या तरी टू व्हिलरवर बसून निघून जाते! तो हताशपणे लांब जाणार्‍या तिच्याकडे बघत उभा राहतो. मागून कुणी तरी त्याला आवाज देतं. तो पोस्टमन असतो. एक पाकीट तो त्याच्या हातमध्ये देतो आणि निघून जातो. तो खिन्न मनाने ते पाकीट उघडतो. आतमध्ये त्याचं अपॉईन्टमेंट लेटर असतं! पण आता खूप उशिर झालेला असतो!
'हिज बिलव्हेड इन बिझनेस सूट'

"कशी वाटली?"
"किती हलकट आहेस तू! माझ्याविषयी तू असा विचार तरी कसा करू शकतोस?" मी कागद बाजूला ठेवताच ती मला येऊन बिलगली.
"मग सकाळी राहिलेलं..."
ती काही न बोलता बेडरूमकडे जाऊ लागली.
'माय बिलव्हेड इन बिझनेस सूट'

--
निखिल

गुलमोहर: 

रूनी ला अनुमोदन..अमेझ्ड!!!!!!!! Happy

कथा छान, वेगळी म्हणुन खुपच आवडली. दोन वेळा वाचुनही रामायण व पुढचा भाग याचा संबंध लागत नाही अस वाटत. ही टीका नाही माझ मत आहे.

कथा फॉर्मॅट मस्त! लेखनशैली मस्त! रामायणाचा आणि बाकी कथेचा संबंध मला पण बाउन्सर गेला.>>
दरवेळेस आंगठी पडते आणि दरवेळेस तू फसतोस>> या वाक्याचा संदर्भ आहे असं दिसतंय... लेखकमहाशय यावर प्रकाश पाडावा!!!

पुलेशु. Happy

सगळ्यांचे आभार!

रामायणाविषयी बोलायचं झालं तर ड्रीमगर्ल ने पकडलेला धागा योग्य आहे, एवढेच मी म्हणेन! तिथे मारुती पुन्हा पुन्हा फसतो आणि इथे दुसरं कुणीतरी! आता कोण ते मी नाही सांगू शकत. रसभंग (रस असेल तर!) होण्याची शक्यता आहे!

फसण्याच्या मुद्द्यामधे/ प्रकारामधे पॅरलल जाणवलं नाही तितकंसं असं म्हण मग.
हनुमानाच्या उदाहरणातली अपरीहार्यता तितक्या तीव्रतेने नाही दिसत इथे. असो, जाउदे. मीच मठ्ठ!

खुप दिवसानी काहीतरी छान वाचायला मिळाले Happy
.... पण इतरांप्रमाणे काही ठीकाणी मलाही बाउन्सर गेला Sad

वेगळी शैली आहे, छान आहे. विषयही वेगळा.
पण अजूनही मला गोष्टं कळली असं नाही म्हणवतै. विशेषतः रामायणाचा संदर्भ... अंगठी?

निखिल, कल्पना छान आहे - कथेतील लेखकाच्या कथेतील लेखकाची कथा अशी काहीतरी वाटतेय, पण मला पूर्ण कळली नाही. ही रामायणातली गोष्ट तू कुठून शोधून काढलीस? त्या ओवीसारख्या ओळी कुठल्या? सुरेख आहेत!

प्रज्ञाताई,

रामायणातली गोष्ट मी अशीच कुणाकडून तरी ऐकली होती आणि त्या ओळी मी स्वतःच लिहिल्या आहेत. (ओवी वगैरे नाहीये ती, फक्त शब्द मागेपुढे केले आहेत.)

छान लिहिलं आहेस पण कथा मधेच बिचकते.. मला वाटतं कथेचा आकृतीबंध जरा वेगळा आहे म्हणून वाचकाला ही कथा दोन तीन वेळा वाचून मग अधिक कळेल.

Pages