केनयाबरोबर उल्लेख होतो तो मसाई मारा या भागाचा. या देशात येणारे बहुसंख्य पर्यटक त्याच भागात
जातात. बिग फ़ाइव्ह, म्हणजे हत्ती, गेंडा, जिराफ़, चित्ता आणि सिंह यांचे हमखास दर्शन त्या भागात
घडते (घडवले जाते.) हरिण, पक्षी, माकडे यांना खिजगणतीत धरले जात नाही.
केनयात अनेक वर्षे राहूनही मला तिथे जावेसे वाटत नाही. डोळ्यासमोर सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव
मारतय, हे बघण्याची माझी मानसिक तयारी नाही. याच कारणसाठी मी घराजवळच असलेल्या, नैरोबी
नॅशनल पार्कमधेही आजतागायत गेलेलो नाही.
पण मसाई माराला जायचा जो रस्ता आहे, तो रिफ़्ट व्हॅली मधून जातो. त्या रस्त्याचे मात्र मला
जबरदस्त आकर्षण आहे. यापूर्वी मी तो प्रवास एकदा केलेला आहे, आता १ जानेवारीला ती संधी परत मिळाली.
आणि या व्हॅलीचा मी मनमुराद आनंद लूटला.
(यापैकी मी आपल्यापर्यंत शब्दांच्या आणि फोटोंच्या मार्फ़त कितपत पोहोचवू शकेन याची शंकाच आहे, किंबहुना तो नाहीच पोहोचवू शकणार याची खात्री आहे. तरिही निदान उत्सुकता लावली तरी सार्थक झाले असे म्हणेन.)
मी नेहमीच या दृष्याचा आणि आपल्या महाराष्ट्रात दिसणा-या दृष्यांचा विचार करतो, तेव्हा काही जागा आठवतात.
उदाहरणार्थ, कशेडी घाटात एका वळणावरुन वसिष्ठी नदीचा प्रचंड विस्तार दिसतो. फोंडा घाटातून, कोकणात उतरताना, जिथे कोल्हापूर विभागाची हद्द संपते तिथूनची कोकणाचे असे विराट दर्शन घडते. शिवनेरी किल्ल्यावरुनची, मावळ प्रांताचे असेच दर्शन घडते. इथल्या रोहनच्या फोटोतही असे विस्तृत दर्शन घडत असते, पण या सगळ्या दृष्यांत आणि रिफ़्ट व्हॅली मधे एक महत्वाचा फरक असा आहे, कि महाराष्ट्रात आपल्याला खास उंचीवर आधी जावे लागते. आपल्याला जे दिसते ते एखाद्या पक्ष्याला उडताना जसे दिसेल तसे असते. तसे़च आणखी एक फरक म्हणजे, या दूष्याचा काही भाग, एखाद्या कड्यामूळे वा झाडामूळे अडलेला असतो.
मी भारतात, महाराष्ट्राबाहेर फारसा प्रवास रस्त्याने केलेला नाही, म्हणून आणखी काही उदाहरणे भारताच्या बाहेरची देतो.
युरपमधून पश्विम आफ़्रिकेत विमानाने प्रवास करताना, भूमध्य समुद्र आणि ट्यूनीशिया चा उत्तर भाग सोडला तर बहुतांशी प्रवास हा अल्जेरियाच्या सहारा वाळवंटावरुन होतो, त्यावेळी किंवा दुबईहून पश्चिम आफ़्रिकेत जाताना बराचसा प्रवास हा सौदीच्या वाळवंटावरुन होतो त्यावेळी असा अनुभव येतो. अर्थात ज्यांनी हे प्रवास केलेत, त्यांनाच हे समजू शकेल.
तर यावेळी माझ्या ग्रुपमधे भाविक मंडळी होती, आणि देवदर्शनाला जाण्याच्या हेतूने ते निघाले होते. मला निसर्गदेवाचे दर्शन घ्यायचे असल्याने, मी त्यांच्यात सामील झालो.
आम्ही सकाळीच सात वाजता बाहेर पडायचे म्हणून सज्ज झालो पण निघे निघे पर्यंत आठ झालेच.नैरोबीला नेहमीप्रमाणेच ढगाळ हवामान असल्याने, सूर्य दिसत नव्हताच.वाटेत पेट्रोल पंपावर माझे लक्ष एका गुलाबाने वेधलेच.
प्रदिर्घ रजा असल्याने, रस्त्यावर फ़ारच कमी वर्दळ होती. नैरोबी हून पश्चिमेला, म्हणजे नाकुरु किसूमू ला जायला एक हायवे आहे. हा हायवे, अगदी मंद उताराने व्हॅलीमधे उतरतो. पण आम्ही एक वेगळा
रस्ता घेतला, ह्या रस्त्याचा उतार जरा तीव्र आहे, आणि काही काळ तो मूळ हायवेला समांतर पण
खालच्या पातळीवरून जातो. तिथूनही व्हॅलीचे असे दर्शन घडते. (रस्त्यावर जी सावली दिसते आहे ती वरच्या पातळीवरच्या डोंगरावरील झाडांची, या भागात खास लाकडासाठी झाडांची लागवड केली आहे.)
आणि मग तो लिमुरु या गावी उतरतो. इथून आपण रिफ़्ट व्हॅलीमधे प्रवेश करतो.
जसजसे लिमूरु गाव जवळ यायला लागते तसे व्हॅलीचा अधिकाधिक भाग नजरेच्या टप्प्यात यायला लागतो. या डोंगरावर नजर ठेवा, हा पुढेही आपल्याला भेटणार आहे. (नैवाशाला ढगांची दुलई पांघरुन बसलेला तो हाच.)
जसजसे खाली उतरत जातो, तसा हा आपल्या डोक्याच्या वर जायला लागतो.
लिमुरु गावातून एक फाटा फूटतो, तिथे आपले असे स्वागत होते.
आणि मग सुरु होतो तो मारा नदीच्या खोर्यातला भन्नाट प्रवास. या लेखातले रस्त्याचे, डोंगराचे बहुतेक फोटो मी चालत्या गाडीतून काढलेले आहेत (गाडीचा वेग ताशी १२० ते १४० कि.मी.)
हे जे डोळ्यांना दिसत होते ते सगळे एका फोटोत येणे अशक्यच. मला अनेकदा वाटले, कि रावणासारखी मला दहा तोंडे असती, तर मला याचा थोडाफार आनंद घेता आला असता. मी वर जी उदाहरणे (महाराष्ट्रातील) दिली आहेत, त्या ठिकाणी मला असा अनुभव येतो. पण ते दृष्य डोळ्यासमोर काही काळच असते, या रस्त्यावर मात्र कायम असे दिसत राहते
वरच्या फोटोतले विजेचे खांबही मग दिसेनासे होतात. मानवी अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा दिसत नाहीत. मग कुठेकुठे बाभळीचे वाढत्या वयातले जंगल दिसू लागते.
दूरवरच्या डोंगराचे आकार बदलू लागतात. इथे गाडी बंद पडली तर !! असे भयानक विचार मनात यायला लागतात.
त्या ओळखीच्या डोंगराकडे नजर ठेवत चालत राहू म्हणालो, तरी ते अंतर सहज ३०/४० किमी असेल.
पण मग कुठेतरी असे जलाशय लागते, आणि मनाला दिलासा मिळतो. बारिक नजरेने बघितले तर या फोटोत एक मसाई गुराखी दिसतोय (या लोकांबद्दल पुढे लिहितोच) पशुपालन हा या लोकांचा मुख्य व्यवसाय.
पण इथले रस्ते मात्र सुरेखच आहेत. चढावावर ज्या गाड्या वेगानी जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी वेगळी लेन पण आहे. सर्वच भाग रुक्ष आहे असेही नाही, अधूनमधून अशी हिरवाई दिसतेच.
जिथे भुमिगत नदी वहात असते, तिथे जरा जास्तच हिरवाई असते. (आफ्रिकेतील नद्या, वाहत जाऊन समुद्राला मिळतील अशी खात्री देता येत नाही, त्या मधेच वाळवंटात लुप्त होऊ शकतात.)
असे बरेच अंतर गेल्यावर आम्हाला हवे ते नारोक, गाव लागले. मसाई मारा ला जायच्या वाटेवरचे हे शेवटचे मोठे गाव इथून १४० किमी पुढे मसाई मारा लागते. पण आमच्या मुक्कामाचे ठिकाण आले होते.
इथे प्रामुख्याने गुजराथी लोकांची वस्ती आहे.
इथे थांबून मी, सोबतच्या छोट्या दोस्तांना घेऊन या "जंगलात" शिरलो.
चित्रविचित्र फळे, फूले दिसू लागली, कशालाही हात लावायचा नाही, या अटीवरच मी त्यांना सोबत नेले होते.
हे केशरी गोंडे आपल्याकडेही दिसतात.
हि आहेत सूझन. खरे तर यातला केशरी प्रकार आता बागांतून लावतात, पण हे वाण जंगली
नारोक गावाच्या सीमेवरच हे हिंदु सनातन मंदीर लागते. आम्ही तिथे गेलो, तर आमचे हसून स्वागत करण्यात आले. हातपाय धूतल्यावर लगेचच गरमागरम चहा झाला. मग पूरी भाजी, कढी खिचडी चे रुचकर जेवण झाले. इथे रहायची पण उत्तम सोय आहे, पैश्याची अपेक्षा नसते, तूम्ही जे द्याल ते, स्वीकारले जाते. माझ्याबरोबरचे सोबती, इथेच पहुडले. पण मला आजूबाजूचा निसर्ग खूणावत होता.
मग मी छोट्या दोस्ताना घेऊन बाहेर पडलोच.
हा पिवळा धोत्रा आपल्याकडे पण दिसतो. पण इथला जरा रंगाने फिक्कट होता.
हा निळा पक्षी, इथेही होताच. अगदी थव्याने होता.
मग मी या वाटेने आणखी पुढे गेलो.
बाकिचे पुढच्या भागात.
http://www.maayboli.com/node/22394 इथे आहे
माझा नंबर पैला!!! मस्त आहे
माझा नंबर पैला!!!
मस्त आहे व्हॅली...
रच्याकने, माबोवर कोकणचं नाव दिसतंय हल्ली खूप...
फोटोतले हे घाट बघून मला आंबा घाटाची फार आठवण झाली...
(आणि मला आता गावी जाऊन फणसाची सांजणं, उकडगरे, फणसपार्याची भाजी, तांदळाच्या .
कण्यांची खांडवी वगैरे खावाशी वाटतेय....)
.
.
.
.
.
.
आत्ता जरा निवांत होउन बघितले परत एकदा फोटो...
धोतरा छानच दिसतोय! गुलाबाच्या ऐटीत आहे एकदम.
सगळेच फोटो छान आहेत.
नारोक गावाच्या सीमेवरच हे
नारोक गावाच्या सीमेवरच हे हिंदु सनातन मंदीर लागते. ......
तिथले फोटो पहायला आवडेल, अर्थात तुमची काही हरकत नसेल तरच.
पण एकंदरीत छान वर्णन आणि सुरेख प्र.चि., विशेषत; पहीला, गुलाबाचा
प्रफुल, देवळाचे आतून फोटो
प्रफुल,
देवळाचे आतून फोटो काढायला परवानगी नव्हती, म्हणून बाहेरुनच काढला आहे. तो देतो पुढच्या भागात.
छान वर्णन .
छान वर्णन .
व्वा... सुरेख वर्णन आणी
व्वा... सुरेख वर्णन आणी फोटो.. पुढचा भाग लवकर टाका
नमस्कार, तुमचे सर्व निसर्गपर
नमस्कार,
तुमचे सर्व निसर्गपर लेख मी वाचत असतो. तुमची लेखनशैली अगदी गप्पा मारतो तशी आहे - त्यामुळे तुमच्या लेखनाशी तद्रुपताही फार लवकर येते, अभ्यासपूर्ण लेखांमुळे माहितीही भरपूर मिळते. फोटो ही मस्तच असतात - एकंदरीत तुमचे लिखाण -डोळे निववणारे (किंवा) तृप्त करणारे, मन प्रसन्न करणारे व बुद्धीलाही चालना देणारे असे सर्व बाजूंनी परिपूर्ण असे वाटते. खूप आनंद मिळतो वाचताना. त्यामुळे तुमचे शतशः, सहस्त्रशः आभार. असेच सुंदर लिहून रसिकंना तृप्त करीत रहाणे - त्यासाठी तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो - ही प्रभुचरणी प्रार्थना.
शशांक
मस्त वर्णन फोटोतले हे घाट
मस्त वर्णन
फोटोतले हे घाट बघून मला आंबा घाटाची फार आठवण झाली...>>>>>अगदी अगदी
आभार शशांक, खुप छान वाटलं.
आभार शशांक,
खुप छान वाटलं. मलाही तितकाच आनंद मिळतो इथे लिहिण्यात.
==
नाही प्रज्ञा आणि योगेश, आपल्या आंबा घाटाची सर नाही याला. आपले घाट म्हणजे
डोंगराला गोल गोल वेढत जातात, तसा हा नाही. हा एकाच बाजूने उतरतो, आणि दुसरे म्हणजे, लांबीनेपण खूप कमी आहे, हा.
मस्त वर्णन
मस्त वर्णन नेहमीसारखंच.
शशांक, डिट्टो असंच होतं दिनेशदांचे लेख वाचताना.:)
<<चित्रविचित्र फळे, फूले दिसू लागली, कशालाही हात लावायचा नाही, या अटीवरच मी त्यांना सोबत नेले होते.>>
मला एकदम आईस एज -३ मधलं मॅनी आणि डिएगोला गिळणारं फूल आठवलं.
अजून आहेत का असले carnivorus plants?
दिनेशदा, इतकं भारी लिहिलयं कि
दिनेशदा,
इतकं भारी लिहिलयं कि हे वाचत असताना मी विसरलो होतो की मी ऑफीसमध्ये बसलो आहे
बाभळीची झुडुपे,डोंगर,मेंढरा बरोबर धनगर फक्त आपल्या देशातच आहेत अस नक्कीच नाही हे आज जास्ती पटलं बघा !
मी आता मित्रांना,गावाकडे नक्की सांगु (प्रत्यक्ष अनुभव कथन) शकतो की केनियामधाली रिफ़्ट व्हॅली ला भेट दिल्यावर मी काय काय पाहिलं !
चित्रविचित्र फळे, फूले दिसू लागली, कशालाही हात लावायचा नाही, या अटीवरच मी त्यांना सोबत नेले होते.
मी मात्र तुमची नजर चुकवुन हात लावुनच नाही तर खाऊन देखील पाहिली !
अनिल, इथून तिथून निसर्गाची
अनिल, इथून तिथून निसर्गाची लेकरे तशीच असतात रे.
रुणुझुणू, माणूस नाही, पण उंदीर वगैरे गट्ट्म करणारी फूले आहेत.
मस्तच! >> देवदर्शनाला
मस्तच!
>> देवदर्शनाला जाण्याच्या हेतूने ते निघाले होते
अरे बापरे... आफ्रिकेत पण का!
ग्रेट रिफ्ट व्हॅलीमधे मानवाच्या पुर्वजांची बरीच फॉसिल्स सापडली आहेत. त्याबद्दल काही संदर्भ/संग्रहालय वगैरे आहे का तिथे?
वर्णन आणि फोटो दोन्हीही मस्त.
वर्णन आणि फोटो दोन्हीही मस्त.