पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम झालेला होता. बोक्याला त्याने केलेली चूक भोवली होती. नगर राहुरी रोडवर पोलिसांशी पंगा घ्यायला नको होता. आता औरंगाबादचेच नाहीत तर सर्व पश्चिम महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये खबर होती की बोका हाती सापडून पळून गेलेला आहे. चौकशीआधीच पळून जाणे हा गुन्हा असल्यामुळे आता बोक्याला पकडण्याचे समर्थनीय कारण त्यांना मिळालेले होते. आणि त्यामुळेच बोका अस्वस्थ झालेला होता. लवकरात लवकर डिपार्टमेन्टमध्ये एक चांगला कॉन्टॅक्ट निर्माण करणे ही त्याची गरज बनलेली होती. त्या दृष्टीने पावले उचलतानाच त्याची संभाजी बेके नावाच्या सबइन्स्पेक्टरशी जानपछान झाली होती. आणि गेल्या वीस दिवसात बोक्याने संभाजीला स्वतःच्या कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती दिलेली होती. 'मला आत घ्यायचे नाही' या अटीवर 'डिपार्टमेन्टला हवी ती मदत करेन' असे आश्वासन बोक्याने दिलेले होते. संभाजी घरचा बडा होता. त्याला नोकरीपेक्षा कामातील समाधान महत्वाचे होते. बोक्याचा अगाध इतिहास ऐकून त्याने हसत हसत हात जोडले होते. 'काहीही बेकायदेशीर करताना पकडला गेलास तर तुझी माझी ओळखही नाही' असे त्याने बोक्याला सरळ सांगीतलेले होते.
या प्रकारामुळे बोक्याच्या आयुष्याची दिशा काहीशी बदलली. आता तो 'पैसे मिळवणे' इतकेच कार्य करू शकत नव्हता. लुटलेल्या पैशातील काही भाग शासनापर्यंत पोचवून 'मी कायद्याला मदत करतो आहे' अशी इमेज त्याला आता बनवावी लागणार होती.
पण तशी इमेज झाल्यास मात्र त्याला प्रचंड सहकार्य मिळण्याची शक्यता होती. आणि बोका नेमका त्याचाच विचार अनेक दिवस करत होता. काहीही झाले तरी कधी ना कधी पोलिसी जाळ्यात आपण सापडणारच याची त्याला कल्पना होती. तेव्हा मिळवलेल्या पैशावर मस्त गुजराण करून आता काही काळ कायद्याला मदत करू अशा निर्णयापर्यंत तो आला होता. आणि नेमकी यामुळेच त्याची काकदृष्टी अधिकच तीव्र झालेली होती. आता तो मुद्दाम प्रकरणे शोधू लागला होता. खबर्याप्रमाणे हिंडू फिरू लागला होता.
आणि आज त्याचाच परिणाम म्हणून...
बोका दवाखान्यात बसून पेशंट्सची वाट पाहात होता. काही दिवसांपुर्वीच त्याला कळले होते.
सासवड - जेजुरी भागात एक टोळी वावरते. हे लोक डॉक्टरांना किडनॅप करून खंडणी मागू लागले आहेत. इतक्या ग्रामीण भागातील डॉक्टर काय देणार हा प्रश्नच होता. पण नंतर समजले की ती टोळी जरी ग्रामीण विभागात असली तरी चांगले पुण्याचे वगैरे डॉक्टर्स पळवायची.
मग बोका पत्रकार असल्याचा बहाणा वगैरे करून दोन 'पळवून सुखरूप आलेल्या' डॉक्टर्सना भेटला. सुरुवातीला त्यांनी माहिती द्यायला काचकूच केली. नंतर 'त्यांचे नाव छापले जाणार नाही' या अटीवर त्यांनी काही जुजबी माहिती सांगीतली. ती अशी! एक 'टिप्या' नावाचा तरुण पेशंट म्हणून येतो. तो लक्ष नसताना मोबाईलवर फोटो काढत असावा. कारण टोळीकडे फोटो असतो खरा आपला! मग काही दिवसांनी तीन चार जण येतात. दवाखान्यात इतर पेशंट्स नसताना येतात! आपल्याला दमबाजी करून आणि आपल मोबाईल बंद करून गाडीत बसवतात. ती गाडी सुरू झाल्यावर आपल्याला कसेतरी बेशुद्ध करत असावेत. त्यानंतर शुद्ध येते ती थेट त्यांच्या अड्यावरच! तिथे ते आपल्याला बांधून ठेवतात आणि काही फटके लावतात. जीवाची भीती दाखवतात. नंतर आपल्यालाच घरी फोन करायला सांगतात. मग आपण आपल्या घरच्यांना जमतील तेवढे पैसे घेऊन ते सांगतील त्या ठिकाणी यायला सांगतो. पैसे त्यांना मिळाले की पैशांची मोजदाद होते. मग दोन चार फटके आणखीन लावतात. मग गाडीत बसवतात आणि पुन्हा बेशुद्ध करतात. मग कुठेही सोडतात. अगदी बारामती, फलटण, मंगळवेढा, कुठेही!
तिथून आपले आपण परत यायचे. खिशात दिडशे रुपये मात्र ठेवतात घरी पोचायला!
बोका ही मेथडॉलॉजी ऐकून खदाखदा हासला होता. यात पोलिस काहीच का करत नाहीत असे विचारल्यावर डॉक्टर म्हणाले की 'पुढच्या वेळी पुन्हा किडनॅप करू आणि त्यावेळेस शरीर हप्त्याहप्त्यांनी घरच्यांना पाठवू' अशी धमकी देतात.
यापुढे नेमका कोणता डॉक्टर पळवला जाईल याची बोक्याला कल्पना नव्हती. तसेच ही टोळी कुटली असावी ते डॉक्टरांनाही माहीत नव्हते. त्यामुळे बोक्यालाही माहीत नव्हते. पण त्याच्या जवळचाच एक डॉक्टर पळवला गेल्याचे त्याला समजले. डॉक्टर दोन दिवसांनी परत आल्यावर बोका धावला. त्याने डॉक्टरला प्रचंड कन्व्हिन्स करून माहिती काढली. डॉक्टर हुषार होता. यायच्या वेळेस गाडीत बेशुद्ध व्हायच्या आधी त्याने कोणत्यातरी दुकानावर 'तालुका पुरंधर' असे वाचल्याचे त्याला स्मरले. तसेच सुरुवातीला पेशंट म्हणून आलेला माणूस कुणाशीतरी फोनवर बोलताना 'हा टिप्या बोलतोय' एवढे म्हणाल्याचे त्या डॉक्टरला आठवत होते.
इतकी माहिती बोक्यासाठी खूपच होती. त्याचदिवशी दुपारी बोका एका भाड्याच्या स्वयंचलीत दुचाकीवरून ग्रामीण पोषाख करून फुरसुंगी क्रॉस करून दिवे घाटाला लागला. आज सहलीचा मूडही होता. बोका निवांत चालला होता. घाट चढून झाल्यावर एका टपरीपाशी तो थांबला! तालुका पुरंदर सुरू झालेला होता. बोक्याने टपरीपासूनच 'टिप्या कोण' अशी चौकशी सुरू केली. अस्सल ग्रामीण भाषेत! आणि पुढील चार तासात सासवड ते निरा अशा तीन फेर्या झाल्या तरी काहीच माहिती मिळत नाही म्हणून निराश झालेला बोका जेजुरीमधील एका टुकार बारवर झिंगारो बीअर पीत होता. एकतर झिंगारो खरच चढण्यासारखीच बीअर! त्यात बोक्याला अभिनय करायचा होताच! त्याने मालकाबरोबरच संवाद चालू केला.
बोका - उन्हात लय चढतीया...
मालक नुसताच मंद हासला.
बोका - तुम्ही सवता घेताय काय? का आपली पाजतायच पब्लिकला??
मालक - आमीच घ्याया लागल्यावं धंदा काय हुनार??
बोका - हा! खरं हाय! त्यी काय त्यी म्हन?? घोडाच गवत खाया लागलान तर ... का काय त्ये??
मालक - घोडा गवताचा मित्र झाला तर खानार काय..
बोका - हा ना! आता मीच डाक्टर झालोन तर पळिवनार कुनाला??
बोका खदाखदा हासत चढल्याच्या आविर्भावात म्हणाला.
मालक गच्चकन हादरून बोक्याकडे पाहू लागला.
मालक - म्हन्जे??
बोका - अरारारारा.. ग्येलंच तोंडातून.. काय न्हाय.. तुम्ही इसरा.. मी इसरतो..
मालक आता मधूनच बोक्याकडे निरखून पाहात होता. बोक्याने टोटल दोन झिंगारो लावल्या आणि कसाबसा उठला. उठला अन पुन्हा बसला. जबरदस्त दारू चढल्याचा अभिनय करणे मस्ट होते. टिचक्या वगैरे वाजवून पोर्याला बोलावू लागला. दाणे, कांदा, फरसाण, सिगारेट, काहीही मागू लागला. त्याच्या बोलण्यावरून आणि बघण्यावरून दिलीपकुमारलाही वाटले असते, याला अती झालीय!
दहा मिनिटांनी बोका कसाबसा उठला अन गल्यापाशी गेला. खिशातून पाचशेची नोट काढून गल्यावर आदळली. मालकाने मुकाट तीनशे साठ रुपये परत दिले.
बोक्याने ते खिशात टाकले अन घड्याळात बघू लागला. तिथेच घुटमळला. दोन तीन मिनिटांनी म्हणाला..
बोका - टिप्या आलान तर म्हनाव पर्करन गळ्याशी आलयन..
मालकाने नुसतीच मान होकारार्थी डोलावली. त्यावरून त्याला टिप्या माहीत आहे की नाही हे समजू शकत नव्हतं!
बोका - काल आलावतान काय??
मालक - कोन??
बोका - टिप्या??
मालक - कोन टिप्या??
बोका - हयातभर पेशंट असतोय त्यो..
मालक - हितं नाय येत टिप्या बिप्या...
बोका - समदे आत जानारेत... समदे.. मी यकटाच भाईर..
मालक वचकलेला दिसत होता. त्यालाही माहिती काढायची हौस दिसत होती.
मालक - का?? समद्ये का आत जानारेत??
बोका - बडा डाक्टर पळिवलाय यंदा..
मालक खरच चपापला.
बोका - म्हाईत असंल तर अगुदरच सांगा... वाचवंल तरी मी त्यांना...
मालक - अवो आम्हाला न्हाई म्हाईत..
बोका - आन म्हाइती सांगनार्याला बक्षिस पन हाये..
मालक - आम्हाला न्हाई काय म्हाईत...
बोका - आन म्हाइती अडवून ठिवणार्याला आतबी घेनारेत...
मालक - हितं हुबं र्हाऊन आमालाच धमकवताय व्हय??
बोका - एक आपलं सांगून ठिवलं... त्येवढा आलान त्यो तर सांगा त्याला..
मालक - आमी काय टिप्याबिप्याला ओळखत नाय..
बोका - अवो नुसता निरोप लक्षात ठिवा... अचानक सामने आलान तर???
मालक - काय नांव सांगायचं??
बोका - म्हनाव पांडा शोधीत हुता..
मालक - पांडा...
बोका - हा..
मालक - कुठलं तुम्ही??
बोका - लोणंद..
मालक - ठीक्के..
बोका बाहेर पडला आणि पंधराव्याच सेकंदाला आत आला. मालक स्वतःच्या मोबाईलवरून कुणाला तरी फोन करत होता. बोक्याने चपळाईने मोबाईल ओढला आणि स्वतःच्या चालूच ठेवलेल्या मोटारसायकलला किक मारून निरेच्या दिशेने सुटलाही!
दहाव्या मिनिटाला जेजुरी एम आय डी सी मध्ये जाऊन त्याने मोबाईलवरचा तो नंबर वाचून पाठ केला आणि मोबाईल बंद करून गवतात फेकला. एका आडबाजूला जाऊन कपडे बदलले आणि आता फॉर्मल वेश धारण केला. मोटार सायकल गवतात आडवी टाकली अन शांतपणे चालत उलट्या दिशेला निघाला.
जणू एखाद्या कंपनीतला एखादा असिस्टन्ट मॅनेजर काम संपवून घरी परत चाललेला असावा.
मेनरोडवरच त्याला एक शेअर जीप मिळाली. त्यात बसून बोका हडपसरला आला आणि तिथून सरळ रिक्षा घेऊन घरी!
मात्र त्याने आज एक काम केलेले होते. टिप्याचा मोबाईल नंबर शोधून काढला होता. इतकेच नाही तर टिप्याशी तो बोललाही होता. आता फक्त बी एस एन एल च्या शिंदेला नैवेद्य दाखवून हा नंबर कुठला अन कुणाचा ते काढून घ्यायचं होतं!
दुसर्या दिवशी बोक्याने ते कामही केले. पण त्याचवेळेस त्याला हेही समजले की तो नंबर नेमका आजच बंद करण्यात आला. बोक्याला समजले. टिप्या आवश्यक ती काळजी घेतोय! पण आता टिप्याचा पत्ता समजलेला होता. टिप्या सासवडला राहणारा होता.
त्या दिवशी बोका टिप्याच्या घराच्या बाजूला भिकारी होऊन उभा राहिला. आणि त्यानंतरचे सलग आठ दिवस तसाच उभा राहिला. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा! बोक्याचा पेशन्स वाखाणण्यासारखा होता. या दिवसांमध्ये टिप्या कोण ते त्याच्या लक्षात आले होते. त्याने टिप्याचा एक फोटो हळूच मोबाईलवर घेतलेला होता. मात्र टिप्या घरात शांतपणे बसूनच होता.
आणि नवव्या दिवशी सुराग मिळाला. तीन चार जणांबरोबर टिप्या कुठेतरी गेला. भिकारी हळूच शेअर जीपमधून त्या दिशेला गेला. खूप वेळ त्या वाटेवर शोध घेतल्यानंतर समजले. एका टिनपाट खोलीत काही लोक जमलेले होते. भिकारी हळूहळू त्या खोलीकडे सरकला. धड काहीच ऐकू येत नव्हते. पण अर्धवट पत्ता समजला. पुण्यातल्या वानवडी विभागात बहुधा पुढचा बकरा असावा. इतके समजल्यावर भिकारी सुसाट वेगाने मूळ जागी आला आणि तिथून पुण्यात!
तो संपूर्ण दिवस बोका वानवडीतील सर्व दवाखाने डोळ्याखालून पाहात होता. एकंदर सहा दवाखाने दिसले. त्यातील दोन तर चक्क बारकी हॉस्पीटल्सच होती. ती बोक्याने रद्द केली. उरलेल्या चार दवाखान्यांपैकी एक आयुर्वेदिक डॉक्टर होता. त्याच्याकडे घसघशीत खंडणी मिळण्याची शक्यता बोक्याला कमी वाटली. मग उरलेल्या तीन दवाखान्यात त्याने जायचे ठरवले. घरी येऊन व्यवस्थित आणि अत्यंत तिसराच वेश धारण करून तो पुन्हा वानवडीला आला. आणि दुसर्याच दवाखान्यात त्याला यश मिळाले. डॉक्टर सिंग यांच्यासमोर बोका तोंड पाडून बसला होता.
सिंग - काय होतंय??
बोका - काहीही होत नाही आहे...
सिंग - मग??
बोका - पण होणार आहे..
सिंग - काय??
बोका - तुमच्याकडे हा पेशंट आला होता का गेल्या काही दिवसात??
बोक्याच्या या अचानक प्रश्नामुळे काय उत्तर द्यावे या विचारात असतानाच सिंगने तो फोटो नीट निरखून पाहिला होता आणि अनवधानाने 'हो' असे उत्तर दिले होते. ही बोक्याची नेहमीची यशस्वी खेळी होती. भलत्याच गोंधळात माणूस असताना त्याला तिसराच प्रश्न विचारला की तो नॅचरली खरे उत्तर देतो, ही ती खेळी!
सिंग - पण तुम्ही कोण??
बोका - मी डॉक्टर सिंग...
सिंग - म्हणजे??
बोका - तुम्हाला या माणसाची टोळी पळवून नेणार आहे.
सिंग - व्हॉट??
बोका - हो... आणि म्हणूनच आत्तापासून तुमच्या या खुर्चीत मी बसणार आहे.. डॉक्टर सिंग म्हणून.. तुम्ही उरलेले पेशंट्स उरकून घ्या.. मग मी बसतो... सांगतो की नेहमीचे डॉक्टर गावाला गेलेले आहेत.. आज किंवा उद्याच ती टोळी येईल...
सिंग - आय विल गो टू पुलीस..
बोका - कोणत्या कारणास्तव म्हणे??
सिंग - म्हणजे?? तुम्ही मला पळवण्याची धमकी देताय म्हणून.. गेट लॉस्ट..
बोका - डॉक्टर... मी तुम्हाला वाचवतोय.. पळवत नाही आहे.. मी स्वतःच पळवला जाणार आहे..
सिंग आणि बोका यांच्या जवळपास वीस मिनिटांच्या त्या चर्चेनंतर सिंग यांना असे वाटू लागले की पोलिसात गेल्यास घात होईल आणि इथेच बसल्यास आणखीनच घात होईल! त्यापेक्षा हा समोरचा माणूस डॉक्टर म्हणून इथे बसला तर काहीतरी भरीव घडू शकेल! बाहेरचे पेशंट्स ताटकळत होते. सिंग कन्व्हिन्स्ड झाल्यानंतर बोका उठून बाहेर जाऊन बसला. बाहेरचे दोन पेशंट्स डॉक्टरांनी तातडीने उरकले.
सिंग यांच्याकडे पोचल्याच्या पंचेचाळीसाव्या मिनिटाला बोका डॉक्टरचा अॅप्रन घालून आणि गळ्यात स्टेथोस्कोप लावून त्यांच्याच खुर्चीवर बसलेला होता. डॉक्टर सिंग दवाखान्यापासून डायगोनली ऑपोझिट असलेल्या एका सुमार टपरीत बसून चहा ढोसत होते.
पावणे आठ वाजले तरीही बोका वैतागला नाही. कदाचित आजच्याऐवजी उद्या यावे लागेल असेही त्याला वाटत होते. आठ, सव्वा आठला दवाखाना बंद करायला हवा होता. मुख्य प्रश्न होता टिप्याच्या सेलफोनमधील फोटोचा! तो सेलफोन बंद असला तरीही हॅन्डसेट चालूच असणार होता. तो हॅन्डसेट घेऊन ते लोक आले असते अन फोटो तपासला असता तर गल्लत झाल्याचे त्यांना समजले असते. पण आता पर्याय नव्हता. आजवरच्या इतिहासात 'अॅक्च्युअल कामगिरीच्यावेळेस' टिप्या येत नाही असे दिसत होते. पण आला तर?? किंवा त्याचा हॅन्डसेट घेऊन हे लोक आले तर?? बोका विचार करत होता. फोटो उगीचच काढत असतील. एकदा नाव पत्ता मिळाल्यावर काय प्रश्न आहे डॉक्टर न सापडण्याचा! नशीबावर हवाला ठेवून बोका बसून राहिला. मधेच एक म्हातार्या बाई येऊन गेल्या. बोक्याने त्यांना 'नेहमीचे डॉक्टर आज नाहीत' असे सांगीतले. त्या त्यांना काय होते आहे याची टकळी सुरू करणार तेवढ्यात बोक्याने सांगीतले.
"मी लहान मुलांचा डॉक्टर आहे.. मोठ्या माणसांना काय झाले असेल याचा मला यत्किंचितही अंदाज येऊ शकत नाही"
असले विचित्र विधान ऐकून ती बाई वैतागून निघून गेली. आता बोका दवाखाना बंद करायला उठणार तेवढ्यात बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज झाला. लगेच बोक्याने हातात फोन घेतला अन बोलायला सुरुवात केली.
"अंबिके माझेच पेशंट आहेत... ओपीडीमध्ये घ्या त्यांना.. इसीजी नीट नसला तर सीसीयूमधे अॅडमीट करा.. मी सकाळी येईन.. हो हो... ओके.. "
आत आलेली चार माणसे बोक्याची बडबड ऐकत होती. बोक्याने त्यांना बसायला सांगीतले होते. 'फोन झाल्यावर' बोक्याने समोर पाहिले.
"बोला??"
"बॅग घेऊन चलायचं... आमच्याबरोबर.."
"म्हणजे?"
"म्हणजे काय ते **त मोजून दहा लाथा बसल्यावर विचारायचं... मोबाईल दे.."
"ओ.. कोण तुम्ही???"
"तुझे अनैतिक बाप आहोत आम्ही सगळे.. उठ.. धर रे त्याला..."
बोक्याने अतीभयंकर घाबरल्याचा अन गळाठल्याचा अभिनय केला. डोळे फाडून तो स्वतःलाच उचलले जाताना बघत होता.
"दवाखान्याच्या बाहेर पडल्यावर तुला उभा करणार आहोत.. सरळ चालत गाडीत जाऊन बसायचं... आवाज केलास तर आतडी बाहेर काढीन.... हे बघ..."
ते दिड वित लांबीचे पाते पाहून तर बोक्याने 'लागल्यासारखाच' चेहरा केला. तोवर वरात दवाखान्याच्या दारात आली होती. अचानक बोका सरळ उभा करण्यात आला. त्याला तर भीतीने पायही टाकवत नव्हता. पण दोन चार सेकंदातच तो ढकलला गेल्यामुळे गाडीत गेला. दवाखाना उघडाच ठेवून ती महिंद्रा आर्मडा जमेल तितक्या वेगाने सुटली. बोक्याला असलेली शेवटची संवेदना! डोक्यात कसलातरी प्रहार झाला. आता बेशुद्ध पडायलाच हवे होते. बोक्याने मान घरंगळू दिली स्वतःची! मागे बोका आणि तिघे, पुढे एक जण आणि ड्रायव्हर अशी वरात सोलापूर रोडला लागली तेव्हा डॉक्टर सिंग स्वतचा दवाखाना बंद करून घरी पळत सुटला होता.
बोका बेशुद्ध आहे की नाही याची खात्री नसल्यामुळे त्याला एक इन्जेक्शन देण्यात आले. तेव्हा मात्र बोक्याचा चेहरा कसनुसा झाल्यामुळे त्या लोकांना 'आत्तापर्यंत तो शुद्धीवर होता की काय' अशी एक भीतीही वाटून गेली.
=============================================
अस्पष्ट आवाज कानात शिरत होते बोक्याच्या! अत्यंत प्रयत्नपुर्वक नियमीत व्यायाम करून शरीर दणकट बनवलेले असल्यामुळेच त्याला अपेक्षेपेक्षा जरा आधीच शुद्ध आली होती. पण शुद्ध आल्यानंतरचा मनातला पहिला विचार! 'डोळे उघडायचेच नाहीत आपण'!
आपल्याला बांधून ठेवलेले आहे इतके बोक्याला कळले. रग लागलेली होती. डोक्यात कळा येत होत्या त्या वेगळ्याच! डाव्या हाताला इतक्या मुंग्या आलेल्या होत्या की आता आपल्याला डावा हातच नाही आहे असे वाटू लागलेले होते. त्यातच शर्ट भिजलेला होता. शर्ट का भिजला ते काही बोक्याला समजेना! पण न कण्हता बोका डोळे मिटून ऐकत होता.
टिप्या - अबे डुप्लिकेट डॉक्टर उचललायन या ** राज्याने
राजा - तू यायचंस ना बरूबर... तिच्यायला उंटावरून शेळ्या हाकतंय..
टिप्या - फोन बंद न्हाय होय माझा??
राजा - **** बी एस एन एल ची सर्व्हीस बंदय.. फोन बंदय होय??
टिप्या - आप्पा... झालं त्यात माझा दोष न्हाई.. मी पत्ता दिला तिथनंच हा डाक्टर आनलाय यांनी..
आप्पा - मग येगळाच माणूस कस्काय आलान???
टिप्या - काय रे दादू??
दादू - अरे व्हता बसलेला त्योच उचललान आनलाय... थितं येगळाच बसला आसंल ह्ये कुनाला म्हाईत??
टिप्या - ह्याच्याकडंच मागा अन काय खंडणी...
आप्पा - पर हा हाये कोन??
टिप्या - काय रं संज्या... काय काय नंबर हायेत त्याच्या मोबाईलवर??
संज्या - कोरा करकरीत हाये मोबाईल.. एक येसेमेस न्हाय का येक कॉल न्हाय...
टिप्या - आप्पा.. ह्यं डिपार्टमेन्टचं तर नसेल??
बहुधा आप्पाने टिप्याच्या कानाखाली मारली असावी. कारण मारण्याचाही आवाज झाला अन टिप्याच्या ओरडण्याचाही! बोक्याला जाणवले. आप्पा टोळीचा प्रमुख असावा!
आप्पा - शुद्धीत आण रं गण्या त्याला...
गण्या! बहुधा हा माणूस अगदीच निकट बसलेला असावा. अचानक बोक्याच्या तोंडावर पाण्याचा एक सपकारा बसला. चांगलाच जोरात होता. बोक्याने तो सहन केला. आता समजले शर्ट का भिजला आहे.
गण्या - हालत न्हाय ब्येनं... म्येलं का काय ह्ये??
आप्पा - इडी ठेव जळती थोबाडावं... मंग किंचाळतंय की न्हाई बघ..
बोका ते ऐकूनच हादरलेला होता. कसलीच हालचाल झाली नाही काही क्षण! बोक्याला काही समजेना! पण तितक्यातच काडी ओढल्यासारखा आवाज झाला. लगेचच बिडीचा गंध दरवळला जवळपास! आता मात्र चटका बसणार हे त्याच्या लक्षात आले. जणू काही शुद्धीतच येतो आहोत अशा आविर्भावात बोक्याने डोळे किलकिले करत कण्हल्यासारखे केले.
गण्या - हाललं हाललं.. मढं हाललंन..
आपा - अजून पानी मार...
आणखीन एक सपकारा बसल्यावर मात्र बोक्याने डोळे छानपैकी उघडले. जणू आपल्याच घरात आहोत आणि काही मंडळी चौकशीला आलेली आहेत अशा पद्धतीने शांतपणे सर्वांकडे पाहू लागला. त्याला एक धक्काच बसला. त्या माणसांमध्ये एक बाईपण होती. असेल तिशीची!
आप्पा - काय रं?? ... कोन तू???
बोका - अंबाजी...
आप्पा - कोन अंबाजी??
बोका - अंबाजी भोलानाथ धोत्रे, वय पस्तीस, मूळ गाव वडूज.. राहणार पुणे...
आप्पा - त्यो डॉक्टर कुठंय??
बोका - ते घरी गेले...
आप्पा - अन तू कोन??
बोका - कंपांउंडर!
आप्पा - तिच्यायला कंपांऊंडर उचलून आनलाय *****नी... सोडा त्याला.. अन लावा फटके..
दादू आणि गण्या बोक्याला सोडायला लागले. टिप्या आणि ती बाई हसायला लागले.
आप्पा - हसू नको रं... तुझ्यामुळं घोळ झालाय..
टिप्या - माझ्यामुळं?? यकतर मला कामगिरीवर जाऊ देत न्हाई... फोटू मी काढायचा.. अन त्यो फोटू हितंच इसरून जानार ह्ये... आन कंपांउंडर उचलून आननार...
बोका - आSSSSSSSS
बोका अचानक किंचाळला.
आप्पा - काय रे??
बोका - हात किती दुखतोय... नालायकांनो.. मला पळवून आणले आहेत... कुठे फेडाल हे पाप??
आप्पा - तू काय द्रौपदीय का??
आता ती बाई अधिकच जोरात हसू लागली.
दादू - आरं पन तू त्या डाक्टरच्या खुर्चीवर कस्काय बसलावता??
बोका - तो माझा प्रश्न आहे.. तू कोण विचारणारा??
दादूने हत उगारला तसा बोका किंचाळत दूर झाला.
दादू - ह्यं बोलत बी डाक्टराटाईपच व्हतं बरका?? तिच्यायला छंद दिसतोय डाक्टर व्हायचा...
बोका - कुठे आणलयंत मला??
आप्पा - लंडन...
बोका - डोकं... आSSSSSSS ... आईगं... डोकं किती दुखतंय... मला जाऊद्यात...
आप्पा - असा कसा जाशील??
बोका - मला कशाला मारताय??
बोका रडू लागला.
बोका - घरी एकटी आई आहे म्हातारी... काय होईल तिच्या काळजाचं...
दादू - आता ह्याचं काय करायचं??
आप्पा - धुवून वाळत टाक.. म्हने ह्याचं काय करायचं... च्यायला हा दिसतोय तरी का डाक्टर??
दादू - ह्ये बघा... आता आनल्या आनल्या ह्ये काय म्हनाले?? बरा आला हातात डाक्टर...
आप्पा - गप ****च्या... त्याची शुद्ध घालीव अन नेऊन सोड थितंच पुन्ना..
गण्या उठला! त्याच्या हातात एक इन्जेक्शन होते. बोक्याने ते पाहिले आणि एकदम ओरडत म्हणाला..
बोका - तुम्हाला त्या नालायकाला पकडायचे होते?? मग माझीच मदत का नाही घेतलीत??
आप्पा - तुझी??
बोका - अत्यंत नालायक माणूस आहे तो.. दिवसाला दोन ऑपरेशन्स करतो... छत्तीस हजार तर त्याचेच होतात... दोन दवाखाने वेगळे.. बाकीचे पेशंट आणखीनच वेगळे.. एवढं करून मला फक्त चार हजार.. बोनस नाही... पगारवाढ नाही.. सुट्टी नाही... आणि ठीक आहे.. हे सगळं करून पेशंट बरे होत असते तर कुणीच काही म्हंटले नसते... पण याच्या दहापैकी तीन पेशंट वाचणार... बाकीच्यांच्या श्राद्धाला मलाच जायला सांगतो... मला फक्त हो म्हणा... उद्याच्या उद्या मला आणलंत तसंच त्यालाही इथे आणू...
बोक्याचा उद्विग्न झालेला आणि अत्यंत तीव्र आवाज ऐकून काही क्षण सगळे नुसतेच त्याचा चेहरा निरखत राहिले. बोका तर जोरजोरात हातवारे करतच बोलत होता.
आप्पा - तू कशी मदत करशील??
बोका - कशी म्हणजे काय?? सरळ या उद्या दवाखान्यात... अन धरा त्याला..
आप्पा - त्ये तर आमीच करू की... तुझा काय संबंध??
बोका - मूर्खानाम शिरोमणी आहेस तू...
बोक्याला असे बोलल्याबद्दल फटके बसायचेच! आत्ताही बसला. पुढचा फटका बसायच्या आतच बोका म्हणाला..
बोका - माझा नातेवाईक पेशंट म्हणून यायचं... मी आग्रह करीन त्याला.. सांगायचं.. हे गाव कुठलंय??
दादू - सासवड...
आप्पाने दादूला आईबहिणीवरून शिव्या दिल्या.
बोका - हां.. सांगायचं.. सासवडच्या शासकीय रुग्णालयात ऑपरेशन आहे... तुम्हीच चला.. आम्हाला अंबाजीने तुमच्याबद्दल खूप सांगीतलंय..
आप्पा - अबे हट??? तुला आणला तसा त्यालाही आणू आम्ही...
बोका - टिप्या... या माणसाला या जन्मात तरी अक्कल येईल का रे??
आता मात्र आप्पा स्वतःच पुढे आला आणि त्याने बोक्याला मोजून चार फटके लावले. किंचाळत बोका म्हणाला...
बोका - अक्कलशुन्य माणसा... आज मला पळवले आणि दवाखाना उघडाच आहे म्हंटल्यावर उद्या तो सावध नसेल का??
आप्पा गोंधळून बोक्याकडे निरखून पाहायला लागला.
बोका थोडा दूर पळाला.
बोका - आता ऐक.. आज तुम्ही मला उगाचच पळवलंत... आता दवाखाना उघडाच आहे.. त्या नालायकाला दवाखाना उघडा आहे हे कुणी सांगीतलंच नाही तर रात्रभर उघडाच राहील.. अर्थात, तुम्ही मला कधी सोडताय त्यावर ते अवलंबून आहे.. आत्ता किती वाजलेत?? हां.. रात्रीचे दहा.. आत्ता जरी आपण निघालो तरी साडे अकराला तिथे पोहोचू... तोपर्यंत त्याला समजेलच की दवाखाना उघडाच ठेवून मी कुठेतरी गेलो.. उद्या मी दिसलो की तो मला वाट्टेल तसा बोलेल.. त्यातच दवाखान्यात लपवलेली कॅश गेली तर मग तर प्रश्नच संपला.. मग तर तो मला मारेलच... अशात उद्या पुन्हा तुम्ही उपटलात तर तो इकडे येईल तरी का??
आप्पा - दवाखान्यात.... कॅश हाये???
बोका - तेरा लाख आहेत तेरा लाख...
आप्पा - टिप्या.. संज्याला आणि दादूला घेऊन तू सूट पुण्याला.. ए बाजीराव... सांग यांना कॅश कुठे लपवलीय ते...
बोका - आत गेले की डावीकडे बाथरूमचे दार आहे त्याच्यावर माळा आहे ना?? त्या माळ्यावर एक लाकडी खोकंय त्याच्यात एक लाल हॅन्डबॅग आहे.. त्या हॅन्डबॅगेत एका भिंतीतल्या कपाटाची किल्ली आहे.. ते कपाट उघडलं की आतमध्ये तो कप्पा लगेच दिसत नाही... पुढच्या सगळ्या वस्तू खाली काढल्या की एक चीर दिसेल भिंतीत... त्यातच एक की होल आहे.. त्यात ती किल्ली फिरवली की एक भाग बाज्ला सरकतो... आतमध्ये कॅश आहे...
आप्पा - टिप्या.. ताबडतोब निघ..
बोका - माझा मोबाईल दे...
राज्याने मोबाईल बोक्याकडे फेकला. बोक्याने तो झेलला अन खिशात टाकला.
दादू, संज्या आणि टिप्या त्याचक्षणी बाहेर पडले.
बोका - तू काय तेरा लाखावरच समाधान मानणारेस का??
आप्पाला त्याचे ते 'अरे तुरे' मानवत नव्हते. त्याने बोक्याला धरले आणि हात पिरगाळला. किंचाळत बोका म्हणाला..
बोका - मला का मारतोयस????
आप्पा - परत मला अरे तुरे क्येलंस तर हित्तं पेटवून देईल तुला...
बोका - पण उद्या त्या नालायकाला इथे आणलंत तर तो अजून कितीतरी पैसे देईल.. आणि त्यासाठी मी दवाखान्यात असण्याची नितांत गरज आहे...
आप्पा - काय जरूर नाय.. आम्ही त्याला उद्याच उचलतोय.. गण्या... याला हित्तंच बांध..
बोका पुन्हा बांधला गेला. आता राज्या, गण्या, ती बाई आणि आप्पा असे चौघे त्या खोलीत होते.
बोका - मी आईला एक फोन करू का??
आप्पा - आई अन बाप इसर आता.. तिच्यायला ....
आता बोका शांत झाला होता. इतक्यात कोणत्याही प्रकारची मारहाण होणार नव्हती. आता फक्त मजाच बघायची होती. ते तिघे एक स्वस्तातली बाटली काढून पिऊ लागले. आप्पा त्या बाईची स्तुती करू लागला. तशी ती मुरके मारू लागली.
बोका - या किती छान दिसतात नाही??
आप्पा - भन हाये तुझी... पाया पडायला लावंल.. **त बांबू सारंल पुन्हा मधी बोललास तर...
मात्र ती बाई बोक्याकडे पाहून अगदी स्वच्छ हासली. बोक्यानेही तिला डोळा मारला. ती हादरलीच! गालातल्या गालात हासत ती घुटके घेऊ लागली.
आप्पा - रंगे... एवढी दोन चार कामं आटापली की मंग इंदापूरच्या बंगल्यावं फक्त तू अन मी...
बांधलेल्याच अवस्थेत बोका बडबडत होता.
बोका - अन हा गण्या काय करणार मग??? काय रे गण्या?? तू असाच सडणार का??
गण्याने बसूनच एक लाथ घातली बोक्याला! ती रंगी नावाची बाई आता मात्र स्पष्टपणे हसू लागली.
बोका - आपण कुठे असता??
बोक्याने डायरेक्ट रंगीला प्रश्न विचारला हे पाहून आप्पाने उठून त्याच्यासमोर येऊन त्याला शिवीगाळ केली. ती शिवीगाळ थांबल्यावर रंगीने मागून उत्तर दिले..
रंगी - सासवड जेजुरी निरा लोणंद... कुटंही विचार.. रंगी कशी नाचते... दिल थडथड उडतंय...
बोका - ते तर न नाचताही उडतंय माझं...
ही गावरान काँप्लिमेन्ट फारच आवडली रंगीला! ती जोरात हासली, पुरुषासारखी!
आप्पा आणि गण्या मात्र भडकले होते.
बोका - तो टिप्या परत येईपर्यंत नाचा की जरा इथे?? बिडि जलाईले जिगरसे पिया..
गण्याने बोक्याला फार धुतला या वाक्यावर! आत्ता बोका किंचाळला कसा नाही हे मात्र त्याला समजले नाही. मगाशी तर तो नुसता मारण्याच्या कल्पनेनेही ओरडत होता.
रंगीला मात्र हा सर्व प्रकार फार मजेशीर वाटत होता.
आप्पा - टिप्या कधी पोचेल रं??
गण्या - आत्ता तर निघालाय... अजून सव्वा तास लागंल...
बोका - ह्या! काहीतरी काय बोलतोस?? दहा मिनिटात पोचेल तो...
गण्या - याड लागलं का??
बोका - अरे इथे तर आहे सासवडची चौकी....
'म्हन्जे' असा प्रश्न प्रत्येकाच्या चकीत थोबाडातून बाहेर पडतानाच बोक्याने घातलेली शीळ ऐकून सहा जण आत आले. युनिफॉर्म!
एकाने बोक्याला सोडवले. बाकीचे आप्पा आणि गण्याला धूत होते.
आता बोक्याने दोघांनाही जालीम फटके घातले. त्यांनी ऐकल्या नसतील अशा शिव्या घातल्या. रंगीला मात्र सोडून द्यायला हवे असे त्याने पोलिसांना सांगीतले. अर्थातच तिला सोडणे शक्य नव्हते. पण तिच्याबाबत विचार करू इतके तरी पोलिस म्हणाले.
संभाजी बेके हसत हसत आत आला.
संभाजी - टोळी घावली की??
बोका - हो ना! पण...
मागे वळून तगड्या संभाजीने हासत हासत बोक्याकडे पाहिले...
बोक्याचा प्रश्न ऐकून मात्र तो खो खो हासला...
"मला कुठे काय मिळालं?? ... नाव तुझंच होणार"
पहिला!!
पहिला!!
छान! हा भाग पण
छान! हा भाग पण आवडला!
येऊद्यात पुढचा भाग.... आणि novels पण....
महाबोका !!
महाबोका !!
आवडला!
आवडला!
बेफिकीर साहेब गुन्हेगारी कथा
बेफिकीर साहेब गुन्हेगारी कथा हा प्लॉट तुम्ही अगदी सहजतेने हाताळता. बोका छान झाला आहे. फ़क़्त एक खटकल, गुन्हेगारी कामासाठी जर कोणी मोबाईल वापरत असेल तर तो त्याचा खरा पत्ता कसा देईल? बाकी नेहमीप्रमाणे छान.
फ़क़्त एक खटकल, गुन्हेगारी
फ़क़्त एक खटकल, गुन्हेगारी कामासाठी जर कोणी मोबाईल वापरत असेल तर तो त्याचा खरा पत्ता कसा देईल.....अनुमोदन.
छान आहे, छोट्या कथा पण बर्यापैकी सुसंगत आणि वेगवान.
chan
chan