इन्स्पेक्टर , क्ल्यू दिलाय !!

Submitted by Kiran.. on 31 December, 2010 - 11:52

मी ढ..!

ढ म्हणजे हे माझं नाव आहे. तसं शाळेतलं नाव काहीतरी होतं पण ते शाळेतच राहीलं आणि शाळेत मिळालेलं हे नाव मला चिकटलंय. माझं आडनाव ही ढ वरून ढमढेरे आणि ढ वरून मला ढेरी देखील आहे. माझा भाऊ म्हणतो घरात बसत नको जाऊ. ढेर वाढते.

मग मी काय करू ?

बाहेर तो माणूस ढोल वाजवतो.. ढम ढम ढम.

भावाला ऐकू येत नाही.
मला ऐकू येतं.

ढ शी माझं असं नातं आहे. मला ढोलाची भीती वाटते.

तर मी ढ ढमढेरे !

मी आणि माझा भाऊ इथं राहतो. तो माझी सगळी काळजी घेतो. पण तो जरा अती करतो. मी लहान नाही. आणि वेडा तर नक्कीच नाही.

मला वेडा म्हटलेलं आवडत नाही. ढ म्हटलं तर ठीक आहे. कारण आहेच मी ढ !

माझ्या भावाचं नाव ?

मी त्याला दादाच म्हणतो..

नावाचा काय प्रश्न आला ? ज्याचा वापर होत नाही ते नष्ट होतं असं डार्विन म्हणाला. शाळेत सांगत होते एकदा. तर आमच्या दोघांचीही नावं छू झालीत.
दादाला ऑफीसला जावं लागतं तिथं त्याला सगळे ढमढेरेच म्हणतात..
आणि मला ढ !!

मी नाही जात त्यांच्या ऑफीसला.
ती दादाच्या ऑफीसातली घारी मुलगी भाऊशी बोलत बसते. दादा मग माझ्याशी बोलत नाही. तिला माझा राग येतो आणि मला तिचा..

मला हल्ली सीआयडी बघायचा कंटाळा आलाय. त्यांना माझ्याइतकं भन्नाट सुचत नाही. मी विचार करत बसतो ना घरात.
सीआयडीला डेड बॉडी मिळाली पाहीजे आणि ती पण अशी कि त्यांना काहीच कळायला नाही पाहीजे.

नाहीतरी त्यांना काय अक्कल असते ?
मी पोलीस टाईम्स नियमित वाचतो. दक्षता पण वाचतो.

सीआयडीची पोस्टींग ही पनिशमेंट पोस्टींग असते. मला माहीत आहे. टीव्ही वाले काही पण दाखवतात. इनकम बंद होतं म्हणून मग कुणी इथं काम करायला तयार नसतं.

माझ्या डोक्यात खुनाचा प्लॅन तयार आहे.

कुणाचा खून करू ?

दादाचा ?
साला मला लहान समजतो. जादाच आहे जरा. करू का खून ? गंमतच येईल.
पण फेल झाला तर. ?

मग त्याला कळेल मी हुषार आहे ते. मग तो मला ढ नाही म्हणणार..

कि त्या घारीचा करू खून ?

या कानाचा त्या कानाला पत्ताही नाही लागणार.

खुनाचा हेतू काय ?
पोलीस इथंच बोंबलतील . बोंबला म्हणावं.

मला काय ?

हेतू मला माहीताय..

दादाचं लक्ष नसतं माझ्यावर. परत गाडी रूळावर येईल..

कि आत्महत्याच करू सरळ ?

................

दादा चिडला होता. पण शांत रहायचा प्रयत्न करत होता.

मी त्यालाच हे सगळं विचारलं होतं.

दादाने मला मारलं नाही. उलट मला डॉक्टरकडे चल म्हणत होता.

मला म्हणाला.. डॉक्टरकडे चल मग मला मार

मी म्हणालो
"दादा तुला कसा मारू ? तूच सांग. तुला वेदना पण नाही झाली पाहीजे आणि पोलीसांची पण पळापळ झाली पाहीजे."

दादा मला जवळ घेऊन थोपटत होता.

माझ्या कमरेला चाकू होता. आत्ता या क्षणी मी निकाल लावू शकत होतो.

पण मग मी वेगळा कसा ?

इथं लाईट जात होती सारखी.
घरात जनरेटर होता..

मीच डिझेल भरायचो. नंतर माझ्या नाकात डिझेलचा वास भरला. मी दादाला सांगितलं.
आता दादाच डिझेल भरतो.

मला डिझेलचा वास आला.

दादा जळून मरणार होता...!!

........................

डॉक्टर माझी डायरी वाचत होते. माझ्याशी छान बोलत होते.

मी त्यांना घरीच रहा म्हटलो. असं मोठ्या माणसांशी महत्वाचं बोललं कि बरं वाटायचं. त्यांनी माझ्या म्हणण्यावर विचार केला. मला खूप बरं वाटलं..

यांनी घरात रहायला हवं..

दादाला का मारू मी ?

यांना मारायला हवं.. छान आहेत.

डिझेलचा साठा लक्षात आला नाही. सिगारेट पेटवायला गेले आणि माचीस / लायटर खाली पडला..

कित्ती मस्त.

पण ते राहीलेच नाहीत.

दादा सॉरी रे..

पण तू चांगला आहेस.

घारी हल्ली घरी येत नाही.

पोलीसांची मज्जा करायचीय.

..................

ढमढेरेंच्या घरी पोलीस चौकशी चालू होती. सचिन ढमढेरे याने आत्महत्या केली होती. त्याचा मोठा भाऊ शरद कपाळाला हात लावून बसला होता. एक घा-या डोळ्यांची मुलगी त्याला धीर देत होती.

डायरी वाचून इस्पेक्टर जाधव बुचकळ्यात पडले होते.

ती एक गगनचुंबी इमारत होती. ढमढे-यांचा फ्लॅट २२ व्या मजल्यावर होता. वर आणखी दहा मजले होते. आत येण्या जाण्याचा एकच मार्ग होता. खिडक्यांना पॅरापीट, छज्जा असं काहीही नव्हतं. खाली कुणी ग्रील बसवलेलं नव्हतं. गच्चीवर दोर लावल्याचे निशाण नव्हते.

सचिन च्या बेडरूम मधे बेडच काय कसलंच फर्निचर नव्हतं. साधं स्टूलही नव्हतं.

फक्त एक फॅनम. त्याला लटकणारा सचिनचा पाच फूट दोन इंचाचा नव्वद किलोचा देह. पाय जमिनीपासून वर तीन फूट तरंगत होते. फ्लॅटची उंची जुन्या निकषाप्रमाणे साडे दहा फूट होती.

पोलीस आले तेव्हां दार आतून लावलेलं होतं.

खिडक्या घट्ट बंद होत्या..

नाही म्हणायला हॉलमधे एक घोडा होता.

पण त्याच्यावरचे ठसे सचिन चेच होते. फारतर फॅनला दोर बांधायला घोड्याचा वापर झाला असावा असं म्हणता येत होतं.

फाशी घेतल्यावर घोडा हॉलमधे आणून बेडरूमचा दरवाजा आतून बंद करणं..

छे !!

त्यात ती डायरी.

ते भयानक विचार..

एक गोष्ट सारखी खटकत होती. बेडरूमचा दरवाजा तोडला तेव्हां आतून एकदम पाणी बाहेर आलं. गुडघाभर पाणी. फ्लॅट वॉटर टाईट होता. कुठंच लीकेज नाही. इतक्यात पाऊसही नाही. दार उघडेपर्यंत ओघळदेखील बाहेर आलेला नव्हता.

रूम मधे बादलीही नव्हती .

समजत नव्हतं..

पाणी आलं कुठून..

हे ढ चढलं कसं ?

आत्महत्येच्या केस मधे खुर्ची / स्टूल वर चढून मग त्याला लाथ मारली जाते.

आणि डायरीत लिहीलेलं होतं

इन्स्पेक्टर , क्ल्यू दिलाय !!

........

एनी गेस ?

मर्डर ऑर सुसाईड ?

सुसाईड असल्यास कशी ?
मर्डर असल्यास कसा ?

प्लीज हेल्प !!

( पुढचा भाग वाचण्यासाठी...
http://www.maayboli.com/node/22346/edit)

गुलमोहर: 

आत्महत्या ... बर्फाची लादी पायाखाली घेऊन. खुप जुनी आहे ही कल्पना. पण कथा चांगली लिहिलीये. पुलेशु.

बेडरूमचा दरवाजा तोडला तेव्हां आतून एकदम पाणी बाहेर आलं. गुडघाभर पाणी. फ्लॅट वॉटर टाईट होता. कुठंच लीकेज नाही. इतक्यात पाऊसही नाही. दार उघडेपर्यंत ओघळदेखील बाहेर आलेला नव्हता.>>> हा क्ल्यु जरा ऑब्वियस होतोय..
चांगला प्रयत्न!:)

खरय मामी. पायाखाली बर्फाची लादी घेउन आत्महत्या करण्यापेक्षा, डोक्यावर बर्फाची लादी ठेवून संसार करण खूप कठीण असतं नै ? Happy

छान प्रयत्न आहे. लेखनशैली आवडली.

अरे ! आवडलं तुम्हाला..

धन्स Happy

सहज आपलं टाईमपास म्हणून लिहीलं होतं
आता सिरीयसली विचार करायला पाहीजे..

एसीपी प्र्द्युम्नमामींनी लगेच ओळखलं. डॉ साळुंखेंची गरज पण नाही लागली त्यांना ..

मस्त

!

बर्फाची लादी पायाखाली घेऊन. खुप जुनी आहे ही कल्पना. पण कथा चांगली लिहिलीये. पुलेशु.>> मामी मोदक!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

खुप पुर्वी सुरेंद्र मोहन पाठक आणि त्यानंतर सुशिंनीदेखील कुठल्यातरी कथेत हि क्लुप्ती वापरली होती. पण तुमची शैली मस्तच! आवडली Happy

पुढचा भाग का काय आहे ते सार्वजनिक नाहीये का?
वाचायला म्हणून उघडला, पण मुभा नाही असं लिहून आलं!

आणि मला मज्जा आली हे वाचायला किरण..सामान्य वगैरे माहिती नाही!

पुढचा भाग का काय आहे ते सार्वजनिक नाहीये का?
वाचायला म्हणून उघडला, पण मुभा नाही असं लिहून आलं!
मलापण

सामान्य नाही पण नियमित रहस्यकथा वाचणाऱ्याला नवीन काही नाही असे वाटते

खूप जुनी क्लुप्ती आहे +१
पुढच्या भागासाठी जी लिंक दिलीये त्यावर या पानावर जायची मुभा नाहीये असा संदेश येतो.