रत्ननगरी "रत्नागिरी" – (१० – अंतिम) - एक खाद्य भ्रमंती

Submitted by जिप्सी on 30 December, 2010 - 23:30

=================================================
=================================================
कोकण हे जसे स्वच्छ,सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार झाडांतुन धावणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे, हिरवागार निसर्ग, प्रेमळ कोकणी माणसे या गोष्टींसाठी जरी प्रसिद्ध असले तरी ते प्रसिद्ध आहे ते इथल्या खाद्यसंस्कृतीसाठीही. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे, हापूस आंबे, फणस, करवंद न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. तेंव्हा रत्ननगरी रत्नागिरीच्या शेवटच्या भागात आपण "कोकणी खाद्यभ्रमंती" करूया. Happy
=================================================
=================================================

प्रेमळ इशारा – ENTER AT OWN RISK Proud

=================================================
=================================================
व्हेज थाळी
कोकणची प्रिती......वडे सागुती Happy
मांदेली ताट
मांदेली फ्राय
चिकन बिर्याणी
सुरमई ताट
सुरमई फ्राय
स्वीट डिश
कोकण सफर आणि कोकणी मेव्याशिवाय कशी पूर्ण होणार???

कोकम सरबत
हापूस आंबा (जुना फोटो)
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
फणस (जुना फोटो)
रानमेवा – करवंद (जुना फोटो)

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – समाप्त Happy
=================================================

गुलमोहर: 

वैभु, डोळे मिटा आणि जिप्सीचे फोटो आणि दिनेशदानी केलेल वर्णन आठवा. बघा ताबडतोब कोकणात पोहोचाल. पोहोचल्यावर तुम्ही पण प्रचि टाका. Lol

पर्यटकांनी आग्रह धरला तर हे पदार्थ नक्कीच मिळू लागतील.
खरे तर हे पदार्थ अगदी साधे, स्थानिक घटाकांपासुनच तयार होणारे.
शोभा, मी महाराष्ट्राच्या अनेक भागांशी या ना त्या नात्याने जोडलेला आहे.
आता नावच काढता आहेत तर आणखी एका अनोख्या पदार्थाचा उल्लेख करतो, याचे नाव तवली, अक्षरशः कोंड्यापासूनच करतात.
हातसडीच्या तांदळाचा कोंडा, त्यात थोड्या कण्या घालून ते सगळे भोकराच्या रसात भिजवायचे, आणि त्यात गूळ घालायचा. मातीच्या खापरात अगदी मंद आचेवर हे भाजून काढायचे. मी फक्त एकदाच खाल्लाय हा प्रकार..

योगेश.. योग्या.. योगल्या.. योगुटल्या कु फे ही पा..
योडी म्हणाली तसंच झक मारली नी हा फोटो बघितले
>>काय अत्याचार चालवलाय..!>> चातक यालाच ईमोशल अत्याचार म्हणत असावेत. Proud
दिनेशदा आता लगे हात शाकाहारी सोडून पदार्थांची जंत्री पण टाकून द्याच. Happy

दिनेशदानी म्हटल्याप्रमाणे अगदी स्थानिक साधे पदार्थ त्या वातावरणात अवीट चवीची अनुभूती देतात. उदा. उकड्या तांदळाचे पोहे, भाजीच्या परड्यातील चवळीच्या शेंगांतील सुकवलेल्या चवळीची उसळ, न्हाणीघरातल्या शेगडीच्या राखेत भाजलेल्या चवळीच्या शेंगा, करांदे, कणग्या इ., काजूच्या झाडावरून बोंडू काढून तिथल्या तिथेच तिखट-मीठ लावून केलेली करमट, उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर खोबर्‍या-मिरचिची चटणी व कच्च्या फणसाची भाजी , तांबड्या भोपळ्याच्या [डागर] ताज्या,कोवळ्या पानांची भाजी,
लसणीची झणझणीत फोडणी दिलेली कुळथाची गरमागरम पिठी , नदीच्या कांठावरच्या खोपटात मिळणारीं कांदा भजी व लाडू इ.इ.इ.
माझं मलाच मग भान रहात नाही म्हणून मी "मासे" या विषयाला तर हातच नाही घालत हल्ली !

उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर खोबर्‍या-मिरचिची चटणी
लसणीची झणझणीत फोडणी दिलेली कुळथाची गरमागरम पिठी >>>>>>>>तोंपासु Happy

लसणीची झणझणीत फोडणी दिलेली कुळथाची गरमागरम पिठी>>>>> माझ्या मुलाला हि कुळथचि पिठि खूप आवडते. म्हणून मी बर्‍याचवेळा करते. व माझा मुलगा सुद्धा माझ्या सुगरणपणाला Happy योग्य न्याय देतो.
भाऊ नमस्कर तुम्हि छान आठवण करून दिलीत. आणि त्या घरी कांडलेल्या पोह्यांचि चव आणि तो तजा ताजा वास ...... आहाहा!

योग्या गावाची आठ्वण करुन दिलीस....
मी चाललो गावाला..... या निमित्ताने पुढच्या महीण्यात आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेलाही जाता येईल....

गिरिविहार, आंगणेवाडीच्या भराडी देवीला मझा नमस्कार सांगा. आणि हो, मिळाला तर मालवणी खाजा आपल्या मायबोलिकरांसाठि आठवणीने आणा. तसेच तिथले फोटो पण आणा.

बिर्याणी, गुलाबजामं,चपाती हे कोकणी पदार्थचं नाही आहेत आणी मांदेली तर कोकणात मिळतच नाही.कोंबडी असली तरी बरोबर लिंबु,कांदा,टोमॅटो खाण्याची पद्धत कोकणात नाही.
खरचं, कोकण आवडलं म्हणुन कोकणात फिरायला जाणे आणी कोकणात हक्काच्या(स्वताच्या) गावी-घरी जाणे यात जमिन- आसमानाचा फरक आहे.कोकणातले खरे खाद्यपदार्थ तुम्हाला कोकणातल्या घरी मिळतील कुठल्यातरी हॉटेलात नाही.
ही कुठल्याच अँगलने"कोकणी खाद्यभ्रमंती"वाटत नाही आहे.

मी सासरी गेले की सासूबाई अगदी आठवणीने माझ्यासाठी उकडीचे मोदक करतात. माझ्या आवडीचे म्हणून Happy त्याचबरोबर आडसराचे वडे, पातोळ्या, अळूची भाजी, फणसाची भाजी हे प्रकार होतातच.

पण माझ्या अत्यंत आवडीचा कोकणी प्रकार म्हणजे ओल्या काजूगराची उसळ. सकाळ सकाळ गाडी घेऊन गोखले नाक्यावर जावं. माम्याशी हाज्जतहुज्जत करून आंबे, काजूगर, कवळे फणस, वगैरे सर्व विकत आणावं. दुपारचं ऊन ओसरलंकी मित्र मैत्रीणीबरोबर जाऊन करवंदं जांभळं वगैरे शोधत फिरावे. कुठे मिळालेच तर रातांबे काढावेत. घरी येऊन दिवसभर या सर्वाचा आस्वाद घेत उन्हाळी सुट्टी घालवावी. अयाई गं... कधी येणार ते दिवस आता!!!!!

यावर्षीपासून आमच्या दारच्या झाडाला फणस यायला लागले आहेत. कुणी रत्नागिरीत गेलं तर जाताना भेट म्हणून आमच्याकडून घेऊन जा Happy

जिप्सीचे फोटो हे "टूरिस्ट फोटो"आहेत. या पर्यटकाच्या निमित्ताने का होइना, कोकणचे पदार्थ लोकाना समजत आहेत, हेही नसे थोडके. नाहीतर आधी लोकाना कोकण आणी भात एवढंच माहित होतं की!

मालवणी जेवण म्हणून जे काही हल्ली मिळतं ते भरपूर तिखट आणी तेलकट असतं. प्रत्यक्षात कोकणी जेवण खूप सौम्य आणि तेलातुपाशिवाय असतं. कित्येक पदर्थ तर उकडून किंवा भाजूनच करायचे असतात. तळण फार कमी आणि त्यातही रोजच्या रोज नाहीच. ओल्या खोबर्‍याचा भरपूर वापर असल्याने तेल जास्त वापरायची गरज नसतेच. साखरेपेक्षा गूळ जास्त. आणि विकत आणाव्या लागणार्‍या गोष्टीपेक्षा घरच्या घरी उपलब्ध असणार्‍या गोष्टीचा वापर करायची वृत्ती. (तांदूळ्,पोहे, नाचणी, कुळीथ, दारच्या भाज्या, फणस, आंबे, केळीची पानं, हळदीची आणि अळूची पानं, नारळ, सुपार्‍या यापैकी काहीही विकत न आणता घरीच वापरणारे लोक मी पाहिले आहेत.)
दिनेशदा, तुमच्या लिस्टमधल्या पदार्थाची रेसिपी फोटोसकट माहिती येऊ द्या Happy

आणी जिप्सी,
हॉटेल आमंत्रण मारूती मंदिरजवळ नाही, माळनाक्याला विहार डिलक्सच्या समोर आहे.

मिथिला उडप्याचं हॉटेल आहे, अस्सल गावरान चव हवी असेल तर मिथिलाच्या अलिकडेच साईश्वरी वडापाव सेंटर आहे, तिथली मिसळ अप्रतिम. त्याच्याच जवळ हॉटेल गोपाळ म्हणून आहे, तिथले ब्रेड पॅटिस, मिसळ आणि चहा!!!! Happy

नंदिनी आली. रत्नागिरी पेशल थांबे आता ऐकायला मिळतील.
नंदु, घरी सांगुन ठेव. मी जाणार आहे तेव्हा फणस घेऊन येईन. Wink

@ सर्वांना
धन्यवाद Happy

@ नंदिनी
जिप्सीचे फोटो हे "टूरिस्ट फोटो"आहेत. या पर्यटकाच्या निमित्ताने का होइना, कोकणचे पदार्थ लोकाना समजत आहेत, हेही नसे थोडके. नाहीतर आधी लोकाना कोकण आणी भात एवढंच माहित होतं की! >>>>>नंदिनी "टूरिस्ट फोटो" ला अनुमोदन आणि तुम्हाला १०० उकडीचे मोदक (तुपाच्या धारेसकट :-))
मी मूळचा कोकणातील नाही. कोकण भटकायला गेलो, त्यामुळे हॉटेलात जे काही पदार्थ आले तेच कोकणी पदार्थ म्हणुन संपवले आणि या सिरीजमध्ये त्याचे फोटो सामाविष्ट केले. :-).

@ हर्षदा
आणी मांदेली तर कोकणात मिळतच>>>>>>कोकण म्हटलं कि मस्त्याहार आलाच. जसे मी वर लिहिले आहे कि "कोकणात जाणे आणि मासे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवणे". मांदेली हा माश्याचा प्रकार असल्याने Happy आणि तो या कोकण भटकंतीत खाल्याने मी या सिरीजमध्ये त्याचा फोटो टाकला. Happy

रच्याकने (एक भाप्र), कोकणात मांदेली मिळत नाही???????? (दापोली, गुहागर, निवती, मालवण, वेंगुर्ला अशी कोकण भटकंती केली असता मला तर सर्वत्र मिळाली होती. हा "एकच" मासा मी आवडीने खात असल्याने चांगलंच लक्षात आहे. :फिदी:)

बिर्याणी, गुलाबजामं,चपाती हे कोकणी पदार्थचं नाही आहेत आणी मांदेली तर कोकणात मिळतच नाही.कोंबडी असली तरी बरोबर लिंबु,कांदा,टोमॅटो खाण्याची पद्धत कोकणात नाही.>>>>>बिर्याणी, गुलाबजाम, चपातीबद्दल मान्य, पण अजुनही कोकणात कोंबडीबरोबर लिंबु,कांदा,टोमॅटो खात नाहीत???? (पुन्हा एक भाप्र) आणि "फक्त" या गोष्टी फोटोत असल्याने हे कोकण खाद्यभ्रमंतीत समाविष्ट होऊ शकत नाही.????
(रच्याकने, कोंबडीच्या ताटात (फोटोत) लिंबु,कांदा,टोमॅटो यापैकी फक्त लिंबाची एक फोड आहे. :-))

ही कुठल्याच अँगलने"कोकणी खाद्यभ्रमंती"वाटत नाही आहे.>>>>>>असेलही. पण मी जे जे या कोकण भटकंतीत अनुभवले तेच सगळे मायबोलीकरांसमोर मांडले असे "माझे" प्रामाणिक मत आहे.

तवशांचे गुळ घालून धोंडसे करतात त्याला सिंधुदुर्गात तवसोळीदेखिल म्हणतात. 'आटवल' म्हणजे घाटावरच्या भाषेत साधारण 'गुरगुट्या भात'. साधारणपणे तांदळात १ वाटीला ५ पट पाणी घालून रटरटत ठेवायचं. खिरीप्रमाणे होतं. त्यांत मेतकूट, तूप घालायचं नि आंब्याच्या करकरीत लोणच्यासोबत ओरपायचं. सकाळी न्हेरीसंय ह्याच चलतां! दुपारींव फणसाच्या भाजीसोबत. याच्यावरच राहिलात तर उन्हाळा अजिबात बाधणार नाही. तोंड आलेलं असल्यास दिड दिवस फक्त आटवलावर रहा. माझा स्वानुभव आहे. यांत बी काँप्लेक्स भरपूर आहे.(चूभू देणे घेणे).

जिप्सीजी, अप्रतिम !
कांही वर्षांपूर्वी रत्नागिरी बाजारातून बंदराकडे जाणार्‍या रस्त्यावर एका खाणावळ टाईपच्या हॉटेलात जेवलो होतो [ 'समाधान', 'सत्कार' असं कांहीतरी नांव होतं त्या हॉटेलचं]. मासे ताजे असतील तर अगदी साध्या पद्धतिने केलेले माशाचे प्रकार किती उत्तम होतात याची प्रचीती तिथे आली होती .

जिप्सी.. स्लर्प!!!!!!!!!!!!!
मांदेली खाऊन,बघून सुद्धा जमाना झाला.. Sad
दिनेश दा ची लिस्ट वाचून तर फारच जीके वाढलं.. अर्धे सुद्धा पदार्थ खाल्ले नाहीत कधी

<< मांदेली हा माश्याचा प्रकार असल्याने आणि तो या कोकण भटकंतीत खाल्याने मी या सिरीजमध्ये त्याचा फोटो टाकला. >> हर्षदा, पूर्वी कोकणात मांदेली अजिबात मिळत नसत , हे खरंय. पण आता हे मासे रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मिळूं लागले आहेत, हेंही खरं आहे. << कोकणातले खरे खाद्यपदार्थ तुम्हाला कोकणातल्या घरी मिळतील कुठल्यातरी हॉटेलात नाही. >> हे मात्र बव्हंशी खरं. पण, आतां " त्या हॉटेलात अगदीं घरच्यासारखं जेवण मिळतं " यापेक्षा, " ह्या रेसिपेने अगदीं हॉटेलसारखाच पदार्थ घरीं बनवतां येतो " , हेंच अधिक ऐकू येतं ना !! Wink

जिप्सी तुम्ही कोकण भटकंती केली आहे म्हणजे फक्त हॉटेलात कोकणी पदार्थ खाल्ले असतील. हॉटेलात मांदेली मिळत असेल कदाचित पण कोकणातल्या घरात तुम्हाला कधीच मांदेली मिळणार नाही.माझं घरच कोकणात असल्यामुळे हॉटेलमधे खाण्याची कधी वेळ आली नाही,त्यामुळे कोकणातल्या हॉटेलात काय मिळतं याबद्द्ल मला काहिच माहिती नाही.
<<ही कुठल्याच अँगलने"कोकणी खाद्यभ्रमंती"वाटत नाही आहे.>>>>>>हे माझे सुद्धा प्रामाणीकच मत आहे.
<<" ह्या रेसिपेने अगदीं हॉटेलसारखाच पदार्थ घरीं बनवतां येतो " >> हे मी कोकणात तरी कधी ऐकलेल नाही भाऊ काका.
<<तवशांचे गुळ घालून धोंडसे करतात >> आमच्या गावी त्याला "टोपातलं"म्हणतात.

Pages