नगरपाशी बोक्याने पुन्हा मोटारसायकलचा टॅन्क फुल्ल करून घेतला. बरीच रात्र झालेली होती. सगळे अंग ठणकत होते. थंडीने कुडकुडल्यासारखे होत होते. पण पाठीवरच्या एका रेक्झिनच्या पिशवीत असलेल्या अडीच लाखांची उब भरपूर होती. खिशातला सेल फोन ऑफ न करताच त्याने केव्हाच घोडेगावपाशी फेकूनही दिलेला होता. जुनेजा आणि सर्व जण आता औरंगाबादहून वारंवार त्या फोनवर कॉल देत असतील आणि कुणीतरी तो फोन कोणत्या टॉवरच्या रेंजमध्ये आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्नही सुरू केलेला असेल हे त्याला माहीत होते.
बोका इतक्या थंडीतही हासतच होता. भरपूर मार खाल्लेला असल्यामुळे आता कुठेतरी पडावेसे वाटत होते. पण मगाशीच औरंगाबाद टोलनाका लुटून पुढे गेलेल्या तरुणांना भेटल्याशिवाय बोक्याला झोप येणार नव्हती. आज याच रस्त्याने तो दुपारी पळवून आणण्यात आलेला होता उलट्या दिशेने! आणि आत्ता अनेक तासांनी तो परत पुण्याच्या दिशेने चाललेला होता. त्याला पळवून आणणारे आता कंप्लीट येडे होऊन त्याचा शोध घेत होते. पण बोका निसटलेला होता.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बोका पेट्रोल भरणार्याशी बोलू लागला.
"इथून डिपार्टमेन्टची व्हॅन गेली ना आत्ता??"
"काय माहीत..."
"कारण हा पंप लुटणार आहेत पहाटे.."
"... क्काय????"
"हं... त्यांना टीप लागलीय... पण ते बहुतेक पुढे गेले..."
"तू कोण?"
"मी एक माणूस आहे.. व्हॅन कुठे गेली??"
"साहेबांना भेट आतमध्ये.."
"हो.. भेटायलाच पाहिजे.. उद्या भेटू म्हंटलो तर आकाशात जावे लागेल त्यांना भेटायला.."
तो माणूस बोक्याला घेऊन केबीनमध्ये आला.
"साहेब.. हा माणूस काय म्हणतोय बघा... इथे पेट्रोल भरलं आत्ता... आणि म्हणतोय पंप लुटणारेत पहाटे.."
"काय रे?? ... कोण तू??"
"खबर्या आहे मी... जीव सांभाळा... मी निघतोय... ए.. अरे ती व्हॅन कुठे गेली??"
"साहेब.. हा म्हणतो तुम्हाला पण मारणार आहेत उद्या..."
"काय रे??... ए.. तू चौकीवर फोन लाव.."
"चौकीवर काय फोन लावताय?? पोलीस आधीच विखुरले आहेत पंपाच्या इकडे तिकडे.. व्हॅन कुठे गेली ते सांगा.."
त्या माणसाने बोक्याकडे निरखून पाहिले. कपडे अस्ताव्यस्त, केस अस्ताव्यस्त!
"तू कोण??"
"मी कव्वा... सातार्याचा.. मगाशी औरंगाबाद टोलनाका लुटलाय त्यांनी... ते आता पळून गेलेत... म्हणून विचारतोय व्हॅन कुठे गेली??"
"व्हॅन राहुरीरोडकडे गेली... तू इथेच थांब.. मी हवालदार बोलवतोय.."
"त्यापेक्षा शववाहिकेला फोन लाव... हल्ली शववाहिका वेळेत येत नाहीत... मी निघतो.."
आला तसा वादळी वेगात बोका मोटरसायकल घेऊन पसारही झाला. दोघे त्याच्यामागे धावत काही अंतर गेले आणि पंपावर परत आले. तिथून साहेबाने चौकीवर फोन केला.
"कव्वा म्हणून एक आला होता... तो राहुरीरोडला गेला.. पंप लुटण्याची खबर आहे त्याच्याकडे"
इकडे बोका सुसाट वेगाने राहुरीरोडला लागलेला होता. सुनसान वाट होती. बोक्याने मधेच थांबून मगाशी घेतलेल्या सिगारेट्सपैकी एक पेटवली. एखादा ट्रक गेला तर तेवढाच! राहुरी तर ४० किलोमीटर लांब होते. इतक्या रात्री जाऊन टोलनाका लुटणारे भेटतीलच आणि भेटले तरी पोलिसांच्या तावडीत नसतील ही बोक्याला खात्री नव्हती.
काय करावे?? पुण्याला जावे निघून?? नकोच! पुण्याला परत गेलो की जुनेजाचा ससेमिरा मागे लागणार होता. त्यापेक्षा राहुरी श्रीरामपूर विभागात काही काळ काढावा शांतपणे! २५०००० रुपये आहेत आपल्याकडे! आरामात राहता येईल आठवडाभर!
आता बोका निवांत चाललेला होता. राहुरीकडे गेलेल्या तरुणांकडचे साडे सहा लाख ढापण्याची त्याला आता घाई नव्हती. काही दिवस नुसताच आराम करायचा होता.
वा वा! लाइट दिसले लांबवर! ढाबाच असणार! काही नाही तर निदान दोन रोटी आणि दाल तर मिळेल! मस्तपैकी दोन ड्राय मारून त्यावर जेवण करू आणि पुढे निघू!
बोका ती सहल एन्जॉय करत होता. लाईट दिसल्यामुळे त्याने वेग वाढवला. पाचच मिनिटात तिथे पोचला तो!
अरे तिच्यायला! व्हॅन इथेच थांबलीय की!
आता?? बरं! मोटरसायकल पार्क केल्यावर लगेच त्याचक्षणी पळून जाणे योग्य होणार नव्हते. कारण मग पोलीसांचे वाहन पाहून पळाला असे कुणालातरी वाटले असते तर ते एक वेगळेच प्रकरण झाले असते.
बोका आत आला. एका टेबलवर युनिफॉर्ममधले दोन आणि साध्या वेशातले दोन पोलिस बसलेले होते. बोका त्यांच्याकडे ढुंकून न पाहता तिसर्याच टेबलवर जाऊन बसला. ढाब्याचा मालक आला..
बोका - एक बिसलरी... ड्रिन्क मिळतं का??
मालक - काय लागतंय??
बोका - रम..
मालक - थ्री एक्स आहे...
बोका - दे... आणि सोडा.. जेवण आहे का??
मालक - हाये ना.. चिकन, मटन, मच्छी??
बोका - हंडी दे हाफ.. चिकन... तीन रोटी...
मालक - हा.. लगेच लावू??
बोका - नाही... मी सांगीतल्यावर..
पाचच मिनिटात सोडा, बिसलरी आणि रमची क्वार्टर असा सरंजाम टेबलवर आल्यावर बोक्याने आधी अर्धा पेग घेतला आणि मग त्या टेबलकडे पाहिले.
चुकलेच त्याचे!
तो जरी पोलिसांकडे ढुंकून पाहात नसला तरी एक पोलिस मात्र त्याच्याकडे टक लावून पाहात होता.
बोक्याच्या मनात चलबिचल झाली. आता तो अधिकच आरामात असल्यासारखा पिऊ लागला. पण व्हायचे ते झालेच! तो पोलिस सरळ उठून बोक्यासमोर येऊन बसला.
पोलिस - काय?? इकडे कुठे आज??
बोका - मी इकडेच असतो...
खदाखदा हासल्यावर पोलीस म्हणाला..
पोलिस - असं?? तुला कुठेतरी पाहिलंय मी... कुठे रे??
बोका - न्युझीलन्डला असेल
पोलिस - असेल.... परमिट आहे का??
बोका - कसलं??
पोलिस - ही दारू नरड्यात ओततोयस त्याचं??
बोका - होतं... पण जप्त झालं
पोलिस - का??
बोका - जिथे दारू विकायचं परमिट नाही तिथे प्यायल्यामुळे..
पोलिसाला तो काय बोलला ते बरोबर समजलं! या ढाब्यालाच दारू विकायचं परमिट नव्हतं! आणि तरीही ते विकत होते. त्यावर पोलीस काहीच करत नव्हता.
पोलिस - टायरमधे मुटकुळं टाकून फिरवल्यावर कसं वाटतं ते माहितीय का??
आता बाकीचेही पोलीस तिथे येऊन बसले. टोलनाका लुटणारे भेटले नसले तरी काही ना काही हाताला लागले इतकाच त्यांना आनंद झाला होता.
बोका - साधारण कल्पना आहे.. माणूस किंचाळतो... माफी मागतो.. सोडवा म्हणतो...
पोलिस - चांगलीच कल्पना आहे की... आता तू पण तेच करणार आहेस...
बोका - असं?? का म्हणे??
पोलिस - रात्री बेरात्री एकटाच संशयितासारखा भटकतोयस...
बोका - लोकशाही आहे भारतात...
पोलिस - दंडुकेशाही पण आहे.. पिशवीत काय आहे??
बोका - कॅश..
पोलिस - कसली??
बोका - पिक्चर काढतोय मराठी...
पोलिस - असं??? काय नाव पिक्चरचं??
बोका - दरोडेखोर पुण्याला अन पोलिस राहुरीला..
गचकन चौघे बोक्याकडे पाहू लागले.
पोलिस - तू कोण??
बोका - अमोल पालेकर...
पोलिस - याला आत घ्या.. आणि कुत्र्यागत मारा...
बोका - थांबा... जेवून घेतो... मग जाऊ...
पोलिस - तुझा बाप जेवेल आता.. ऊठ...
पोलिसाने सरळ बोक्याला धरलेच!
दुसर्या एका पोलिसाने विचारले...
"हा कोण आहे रे??"
पोलिस - माझ्यामते हा बोका आहे... काय रे?? बरोबर ना??
बोका - धडधडीत माणूस आहे मी..
पोलिस - ए याची कॅश जप्त कर...
बोका - रम घेणार का??
खण्णकन कानाखाली वाजली तसा बोका खुर्चीवरून खाली आपटला.
पोलिस - ****... आता आत घेतो तुला.. मग आई आठवेल *****
आज मार खायचाच दिवस होता. बोका आक्रोश करू लागला. जितके लागले होते त्यापेक्षा बराच जास्त!
त्याच्या त्या धाय मोकलून रडण्याकडे काही क्षण बघतच राहिले चौघे! ढाब्याचा मालक अवाक झाला होता.
बोका - अक्कलशुन्य आहात सगळे.. तुमच्या मागे धावत धावत मी इथे आलोय.. ही कॅश परत द्यायला.. ते गेलं कुठेच.. मलाच मारतायत... चला.. चला सगळे पुण्याला .. मी सांगतो उरलेली कॅश कुठे गेली आहे ते..
पोलिसांनी आधी एकेक फटका लावून घेतला बोक्याला! मग त्याच्याकडचे अडीच लाख जप्त केले. कुणीतरी औरंगाबादला फोन करून 'टोळी सापडल्याचे' सांगीतले. बोका रडत होता. ढाबेवाल्याला त्याची रमची क्वार्टर फुकट गेली याचे वाईट वाटत होते.
मग चर्चा झाली. बोक्याला दोन पोलिसांनी धरून ठेवलेले होते. सगळे चर्चा करत होते. शेवटी बोक्याला विचारण्यात आले..
"काय झाले ते सांग.. नीटपणे.."
"मी औरंगाबादहून पुण्याला निघालो.."
"तू कोण आहेस??"
"खरच माझं नाव अमोल पालेकर आहे.. हे बघा लायसेन्स.."
लायसेन्सवरचे नाव खरच अमोल पालेकर होते.
"औरंगाबादला कशाला गेला होतास??"
"मुहम्मद खानचा मर्डर होणार हे समजल्यामुळे.. मी फ्री लान्सर आहे.. "
'मर्डर' हा शब्द ऐकून पाचावर धारणच बसली पोलिसांची!
"कुणाचा मर्डर??"
"मुहम्मद खान"
"कोण मुहम्मद खान?? तो मुंबईचा??"
"हो.."
"कुणी मारलं त्याला???"
"जुनेजाने... त्याच्याच बंगल्याच्या तळघरात"
फटाफटा फोन लावण्यात आले. या बातमीची शहानिशा करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले गेले.
"तुला कसे कळले हे??"
"मला मल्हारराव जमदाडे म्हणाले की आज मर्डर होणार आहे.."
"कोण जमदाडे??"
"नगरचे बांधकाम व्यावसायिक.. पण ते जिवंत आहेत.."
"ते जिवंत आहेत म्हणजे??"
"डेक्कन जिवंत नाही आहे.."
"कोण डेक्कन??"
"कव्व्याचा साथीदार..."
"कव्वा?? ... कोण कव्वा??"
"सातार्याचा.. कांबळेंनी त्याला औरंगाबादला बोलावलं होत... लालच्या उपस्थितीत खानला मारायला"
"कांबळे कोण??"
"श्रीरामपूरचे माजी आमदार.."
बोका तोंडाला येईल ते फेकत होता.
"तू पाहिलंस???"
"काय??"
"मर्डर होताना??
"माझ्यासमोरच तर मर्डर करायचा होता त्यांना.."
"का?? "
"कारण त्यांना वाटले मीच लाल आहे.."
"लाल कोण??"
"जुनेजाचा पार्टनर..."
"मग त्यांना तू लाल कसा वाटशील??"
"ती कॅश नीट तपासा... सगळी उत्तरे मिळतील... उगाच मोटरसायकलवर आलो काय इथे??"
कॅश तपासण्याचा 'बोका इतरांना लाल वाटण्याशी' सुतराम संबंध नव्हता. तरीही एक पोलिस कॅश नीट तपासायला लागला. बोक्याचा अभिनयच अफाट होता. तो इतका सलगपणे प्रश्नांची उत्तरे देत होता आणि इतका उद्वेग चेहर्यावर दर्शवत होता की प्रश्न काय होता आणि उत्तर काय आले याचे तारतम्यच लागत नव्हते तरीही सगळे ऐकत होते.
"मर्डर कुणाचा झाला..??"
"मुहम्मद खान, डेक्कन, गोरा सुतार, रघ्या आणि सुलेमान..."
"पाच???"
"यांचे सगळ्यांचे होणार होते.. पण फक्त मुहम्मद खान आणि डेक्कनचा झाला..."
"बाकीचे??"
"मी होतो तोवर जिवंत होते... कव्वा मात्र हासत होता.."
"का??"
"कारण टोलनाका लुटणार हे त्याला एकट्यालाच माहीत होते..."
"कव्व्याला ते माहीत होते??"
"हो.. तरीही मला अंधारात ठेवण्यात आले म्हणून त्याचे आणि सुलेमानचे भांडण झाले.. "
"मग??"
"मग काय?? .. गोरा सुतार वेदनांनी तळमळत होता...
"का??"
"माजी आमदारांनाही हाच प्रश्न पडला.. की हा का तळमळतोय..."
"मग??"
"तर जुनेजा म्हणतो कसा... कव्व्याने मुळात हसायचेच कशाला??"
सण्ण!
पुन्हा एक कानाखाली बसली बोक्याच्या!
बोका कर्कश्श आवाजात किंचाळून रडू लागला.
"बेटा अमोल पालेकर... आता निवांत आत चल... तुझ्या गोट्यांना चिमटा लावला की सांगशील तू कोण आहेस ते... आम्हाला चुत्या बनवतो काय??"
बोका व्हॅनमधून पुन्हा औरंगाबादच्या दिशेला चालला होता. त्याची मोटरसायकल त्या ढाब्यावरच राहिलेली होती. पोलिस हासत होते. बोका रडत होता.
मधेच बोक्याने रडणे थांबवले अन प्रामाणिकपणे म्हणाला..
"माचिस आहे का??"
दोघे अधिकच हसू लागले.
"दे बे... दे त्याला माचिस.. औरंगाबादला पोचेपर्यंत मजा करूदेत..."
एकाने माचिस दिली. बोक्याने खिशातील एक सिगारेट काढून चालत्या व्हॅनमध्येच निरागसपणे पेटवली. आणि जळती काडी सरळ स्वतःच्या शर्टच्या डाव्या बाहीला लावली. भक्ककन पेटली बाही. किंचाळत बोका चालत्या व्हॅनमध्येच थयाथया नाचू लागला.
हा काय प्रकार ते कुणाला समजेना! बोका जळू शकेल हे लक्षात आल्यावर व्हॅन थांबवली. आपल्याला आग लागू नये म्हणून पोलिस बाहेर पडले. बोक्यालाही बाहेर ओढले. त्याच्या अंगावर वाळू टाकली. खरे तर बाही केव्हाच विझलेली होती. पण बोका अफाट किंचाळत होता.
अचानक तो सटपटल्यासारखा उठला.
"पाणी.. पाणी द्या..."
कुणीतरी पाण्याची बाटली आणली. तेवढ्यात एकाने औरंगाबादला फोन करून असा असा प्रकार झाल्याचे व खुद्द बोका हातात आल्याचे सांगीतले.
बोक्याने गटागटा पाणी प्यायले.
बोक्याने सर्वत्र नजर फिरवली. आजूबाजूला झाडी होती. अंधार होता. एकही वाहन दृष्टीपथात नव्हते.
काही झालेच नाही अशा थाटात बोका चालत चालत पुन्हा राहुरीच्या दिशेला निघाला.
"काय रे??"
"आलो.. दोन मिन्टं..."
हा लघ्वी करायला चालला असणार असे ताडून एक पोलिस त्याच्यामागे काही अंतरावर चालू लागला. बोक्याने एकदा मागे पाहिले... आणि...
... सरळ झाडीत उडी मारली....
बोका पसार! ही गडबड उडाली. चौघेही त्या झाडीत मोबाईल फोन्स ऑन करून त्यांच्या प्रकाशात घुसले. काहीही दिसेना! भुतासारखा बोका नष्ट झाला होता तिथून!
वास्तविक तो तिथेच होता. झाडीत उडी मारल्यामारल्याच तो अचानक वेगात हालचाली करून वीस एक फुटावर पोचला होता. आणि तिथून खुरडत खुरडत एका शेताडीत पोचला होता. इथे मात्र उघड्यावर आहोत हे समजल्यावर तो पुन्हा झाडीत आला आणि त्याने एक दगड उचलून नेमका विरुद्ध दिशेला फेकला. हे चौघे दचकून तिकडे गेल्याचे जाणवल्यावर बोका रस्ता क्रॉस करून विरुद्ध दिशेच्या झाडीत जाऊन लपला. आता तो झाडीतूनच व्हॅनपाशी येत होता. पलीकडच्या बाजूला पोलिसांनी गिल्ला केलेला होता.
कुणाला काही कळायच्या आत व्हॅन चालू झाली आणि अॅक्सीलरेट होऊन सुसाट सुटलीसुद्धा! बोंबलत बाहेर आलेल्या पोलिसांना दिडएकशे मीटर्सवर आपलीच व्हॅन जाताना दिसत होती.
शिव्यांचा भडिमार करत पोलिसांनी नगरच्या पोलिसांना सावध केले. भाजलेला डावा हात गिअर्स बदलताना वाईट दुखत होता. पण 'सापडेल' तो बोका कसला??
चार किलोमीटर अती वेगात गेल्यावर बोक्याने व्हॅन थांबवली. लांबवरून त्याला एक ट्रक येताना दिसत होता. व्हॅनच्याच बाहेर येऊन व्हॅनला पोलिसी थाटात टेकत बोका उभा राहिला.
ट्रक जवळ आल्यावर बोक्याने हात दाखवला. ट्रक जवळ येऊन थांबला..
"कागद दाखव गाडीचे.. "
ट्रक चालवणारं पोरगं चोवीस पंचवीस वर्षाचं होतं. त्याने घाबरून कागद दाखवले. बोक्याने सरळ किन्नरच्या जागी बस्तान मांडले.
"चल... राहुरीला जायचंय..."
ट्रक निघाला.
"तुमची गाडी साहेब??"
"पंक्चर आहे... "
"यवढ्या रात्री?? "
"टोलनाका लुटलाय औरंगाबादचा.. चौघं समोरून येतील. युनिफॉर्ममध्ये आहेत.. पण ते पोलिस नाहीत.. गाडी थांबवायची नाही त्यांना पाहून... आणि मी खाली डोकं करून बसणार आहे.. राहुरीला गेल्यावर एक्स्ट्रॉ स्टाफ घेऊन येऊन त्यांना धरणार आहे.. मोबाईल दे जरा तुझा..."
पोराने मोबाईल दिला.
बोक्याने एक फोन लावला. तो त्याचाच डेड नंबर होता पुण्याचा!
"हां.. राहुरी स्टेशनला स्टाफ तयार ठेवायला सांग.. मी आत्ता राहुरीला पोचतोय.. नगरलाही स्टाफ ठेवायला सांग.... मी मुद्दाम व्हॅन हायवेवरच ठेवलीय... आणि ट्रकमधून चाललोय... "
बोक्याने फोन त्या मुलाला परत दिला.
पाचच मिनिटात लांबवर चार टाळकी दिसायला लागली तसा बोका खाली वाकला. मुलाने ट्रक सुसाट सोडला. दोनच मिनिटांत आजूबाजूने ओरडणारे आणि जोरजोरात हात करणारे पोलिस मागे पडले.
"लय ब्येकार दिसतीय टोळी... "
"फार वाईट टोळी आहे ती... पुढे ढाबा आहे तिथे थांबव दोन मिनिटं..."
"हा... "
मगाचच्याच ढाब्याला ट्रक थांबला तसा बोका खाली उतरला. त्याला पाहून ढाब्याचा मालक गार पडला.
"तू??? "
"ते कुठे गेले??"
"कोण??"
"ते पोलिस असल्याची बतावणी करणारे??"
"बतावणी??"
"आता आले तर सांग.. म्हणाव गेल्या अर्ध्या तासात इथून एकही वाहन गेलेलं नाही... आणि उद्यापासून विदाऊट परमिट दारू विकलीस तर खडी फोडशील.. "
बोक्याने बिसलरीच्या दोन बाटल्या आणि हाताला येतील ते कोरडे खाद्यपदार्थ उचलले आणि ट्रकमध्ये बसला. तिथूनच विचारले..
"राहुरीतली सगळ्यात मोठी गॅन्ग कुठली बे???"
"दादा काळे.. "
"कुठे असतो हा??"
"मारुती मंदीर चौकात कुणालाही विचारा साहेब..."
पहाटे तीन वाजता बोका मारुती मंदीर चौकात उतरला तेव्हा मगाचचे पोलिस व्हॅनपाशी उभे राहून नगरहून पंक्चरवाल्याला पाठवा असे फोनवर सांगत होते.
आणि बोका रस्त्यावरच्या एका कोपर्यात बसून डुलक्या घेत होता.
अडीच लाख तर गेलेच होते. पण विश्रान्तीही मिळाली नव्हती. त्यामुळे बोक्याने सकाळी पावणेसहापर्यंत त्या कोपर्यातच ताणून दिली.
सूर्याची किरणे छेडाछेडी करायला लागली तसा बोका हळूच उठला. एका सार्वजनिक शौचालयात प्रातर्विधी उरकून बाहेर आला आणि एका टपरीवर चहा प्यायला.
"ओ साहेब.. पैसे?"
"दादा काळे कुठे राहतो??"
हे नाव असं घेतलं जाण्याची मारुती मंदीर चौकात कुणाला सवय नव्हती. चहावाल्याने हाताने एक दिशा दाखवली अन म्हणाला..
"सरळ जाऊन पहिला लेफ्ट मारा... ज्योती नावाचा बंगलाय.. माझे चार रुपये झाले.. "
"पुन्हा पैसे मागीतलेस तर डावा हात उजव्या हातात देईन..."
बोक्याकडे एक पैसाही राहिलेला नव्हता. त्यामुळे त्याने त्याचा ठेवणीतला खर्जातला आवाज वापरला.
दादा काळेच्या घराची बेल बिनदिक्कत वाजवताना बोक्याला आपण कोणत्याही क्षणी मरू शकतो याची पूर्ण जाणिव होती. एकाने दार उघडले.
हा नक्कीच कामाला ठेवलेला माणूस असणार हे बोक्याने ताडले.
बोका दार उघडल्या उघडल्या आक्रोशू लागला. खाली बसून ऊर बडवून हंबरडे फोडू लागला. जणू कुटुंबातील एक जण वारला असावा. त्या माणसाला पहाटे पहाटे ही काय बलामत आली समजेना! इतक्या पहाटे पिंगळे येऊन भजन करतात इतकेच त्याला माहीत होते.
"ए... कोन तू??? "
"सदाशिवरावभाऊ... दादा कुठे आहेत?? कुठे आहेत आमचे दादा?? अयायायाया.. बोलवा त्यांना.. बोलवा... त्यांना धरायला ते नालायक पोलिस येतायत.."
नोकर हादरलाच! धावत वर गेला. तिसर्याच मिनिटाला डोळे चोळत एक भरभक्कम माणूस धावत खाली आला. त्याला पाहून तर बोक्याने त्याचे पायच धरले. त्या माणसाच्या पायाशी ऊर बडवून तो रडू लागला. पहाटे पहाटे कोण गेलं असावं हे दादा काळेला समजेना!
दादा - कोण गेलं रे??
बोका - कोSणी नाSSSSSSही....
दादा - मग खिंकाळतोस कशाला??
बोका - आवरा.. बाडबिस्तरा आवरा दादा... तुमचे अवतार कार्य संपले त्या दुष्टांमुळे...
दादा काळेने बोक्याच्या छातीत एक सौम्य लाथ घातली.
दादा - भडव्या... नीट उभा र्हाऊन बोल..
बोका रडत रडतच उभा राहिला.
दादा - कोन तू??
बोका - ओळखलं नाहीत?? मला ओळखलं नाहीत?? कसे ओळखणार?? एवढासा होतो मी तेव्हा..
दादा - अरे कोन तू??
बोका - वसंत चव्हाण आठवतोय??
राहुरीमध्ये निदान दहा तरी चव्हाण असतील आणि त्यतले दोन तरी वसंत असतील या अंदाजाने बोक्याने एक नांव फेकले. पण मात्रा लागू पडली नाही.
दादा - कोन वसंत चव्हान??
बोका - तोही आठवत नाही?? पवारांच्या शेतामागे तुकडा होता त्याचा तो...
दादा काळेला काही लक्षात येईना, पण एकदम पायाशीच पडणारा माणूस म्हंटल्यावर अरेरावी करणेही योग्य नव्हते.
दादा - हां.. मग??? त्याचं काय??
बोका - त्या चव्हाणाचा मुलगा मी.. सदाशिव... माझं शिक्षण तुमच्यामुळेच झालं.. अर्थात, इतक्या लहानसहान गोष्टी आठवणार नाहीतच तुम्हाला.. पण मी.. माझी म्हातारी आई, बायको आणि दोन्ही पोर तुम्हाला दुवा देतच आयुष्य जगतोय...
दादा - बस इथे..
बोका - मला बसायला वेळ नाही दादासाहेब... मी तुम्हाला सावध करायला आलोय... मला ती बातमी ऐकवलीच नाही... तुमच्यासारख्या माणसाला बदनाम करणार ते हरामखोर...
दादा - कोन??
बोका - डिपार्टमेन्ट...
दादा - डिपार्ट... का??
बोका - औरंगाबादचा टोलनाका तुम्ही लुटल्याचा आरोप ठेवणार आहेत...
टोटल हादरला दादा काळे! औरंगाबादचा टोलनाका लुटला जाणे, एक नवाच माणूस येऊन आपल्याला सावध करणे आणि काही वेळातच आपण गजाआड जाण्याची शक्यता व्यक्त करणे या सर्व गोष्टी इतक्या पहाटे सोसायची त्याची कपॅसिटीच नव्हती.
दादा - अबे काय बकतोस???
बोका - मला माहितीय दादासाहेब.. मला सगळं माहितीय... तुमच्या कर्तृत्ववान हातांनी हे घाणेरडे कृत्य होणे अशक्य आहे... पण बळीचा बकरा करणार कुणाला?? त्यामुळे त्यांनी तुम्हाला बळीचा बकरा करायचे ठरवलेले आहे..
दादा - तू कुठे असतोस???
बोका - नगर औरंगाबाद रोडवर माझा ढाबा आहे.. कधीही या.. कोंबडीचा असा रस्सा कधी खाल्ला नसेल तुम्ही.. आज पहाटे तिथे माझा औरंगाबादचा मित्र थांबला होता.. मला म्हणतो कसा.. तू राहुरीचा आहेस... तिथे कुणी दादा काळे आहे का?? मी म्हंटलं आदराने नाव घे... माझं अख्ख आयुष्य त्या माणसामुळे उभं राहिलंय.. तर म्हणे त्याला अटक करणारेत.. नाका लुटला म्हणून...
दादा - नाका कधी लुटला??
बोका - काल रात्री...
दादा - कृष्णा.. फोन दे...
नोकराने सेल फोन आणून दिला. दादा काळेंनी एक नंबर फिरवला.
दादा - मार्त्या... हे औरंगाबाद टोलनाका लुटण्याचं काय प्रकरण आहे??
मार्त्या हा दादा काळेंचा एक सहाय्यक होता आणि तोही दादागिरी करायचा.
मार्त्या - चौकशी करतो.. कुणी लुटला दादा??
दादा - ते मला माहीत असतं तर तुझा भिकारचोट आवाज इतक्या पहाटे ऐकला असता का मी??
मार्त्या - दहा मिनिटात सांगतो..
बोका सोफ्यावर निवांत बसला होता.
दादा - काय रे?? तुझं शिक्षण कुठं झालं??
बोका - पुण्याला...
दादा - काय शिकलास???
बोका - बी कॉम..
दादा - बी कॉम करून ढाबा टाकलास??
बोका - तुमचीच शिकवण आहे दादा.. आपण धंदा उभारावा आणि चार जणांना रोजगार द्यावा..
दादा - मला तू कधीच कसा भेटला नाहीस??
बोका - तुम्हाला न भेटलेले पण तुमच्यामुळेच उभे राहिलेले हजारो जण आहेत..
दादा काळेने आणखीन एक फोन लावला. तो राहुरी मतदारसंघाच्या माजी आमदारांना होता.
दादा - नानासाहेब.. काहीतरी लफडं आहे.. काल औरंगाबादचा टोलनाका कुणीतरी लुटलाय... अन मला धरणार आहेत...
नाना - अर्धा तास थांब... मी बघतो...
दादा - ओक्के नानासाहेब..
बोक्याला घेणे न देणे! पण पचकलाच
बोका - नानासाहेब म्हणजे आपले ते हे??
दादा - हा... माजी आमदार...
बोका - ए जरा चहा कर रे... पहाटेपासून धावतोय नुसता...
कृष्णा नावाच्या नोकराला बोक्याची आज्ञा पाळायला लागणारच होती कारण त्याने दादा काळेंसाठी अत्यंत महत्वाची बातमी आणलेली होती. दादा काळे बोक्याकडे बघतच बसले. हा डायरेक्ट आपल्या नोकराला कसे काय काम सांगतो...
दादा - मला आलं घालून कर रे...
बोका - मलाही चालेल आलं...
दादा काळेंच्या चेहर्यावर कडवटपणा पसरणार तेवढ्यात सेल फोन वाजला.
दादा - बोल...
दादा काळे ऐकत होते. ऐकतानाच त्यांच्या भुवया वर खाली होत होत्या, डोळे विस्फारत होते. मिनिटभराने त्यांनी फोन खाली ठेवला.
बोका - काय म्हणतोय मार्त्या...
हा फोन मार्त्याचा आहे हा बोक्याचा अंदाज बरोबर असल्याचा राग चेहर्यावर तसाच ठेवून दादा काळे म्हणाले..
दादा - नाका लुटलाय हे खरंय... पण डिपार्टमेन्टने माझा केसशी काहीही संबंध जोडलेला नाही.. तू कोण आहेस??
बोका - तो फोन द्या इकडे...
दादा - कशाला??
बोका - तुमच्या मार्त्याची अक्कल कशी काढतो ते ऐका...
दादाने आपला फोन बोक्याकडे दिला. बोक्याने रिडायल केले. मार्त्याचा नंबर बघून पाठ करून ठेवला.
मार्त्या - हा दादा...
बोका - मी सधाशिव बोलतोय... तुला अक्कल आहे का?? दोन तासात दादा आत असतील.. मला टिपा लागल्या तसा पहाटेचा धावत आलोय.. तू कुठून माहिती काढलीस??
मार्त्या - कोन बोलतंय???
बोका - सदाशिव... विचारतोय तेवढं उत्तर दे...
मार्त्या - डिपार्टमेन्टमधूनच..
बोका - असं?? कुठल्या??
मार्त्या - नगर...
बोका - नाका लुटला औरंगाबादचा... तू माहिती काढतोयस नगरहून..
मार्त्या - म्हन्जे??
बोका - औरंगाबादची टीम नगर राहुरी रोडवरच्या साई ढाब्यावर बसलीय.. चार जण आणि व्हॅन आहे.. तू काढत बस माहिती.. इकडे दादा जातील आत... आणि मग शेवटी तूही..
मार्त्या - तू कोण??
बोका - तुझा बाप.. कॅश कुठंय??
मार्त्या - गोडाऊनला...
बोका - आम्ही येतोय तिकडे.. दहा मिनिटात पोच तिथे..
मार्त्या - मी इथेच असतो की...???
बोका - मग तिथेच बस... दादा.. तुम्ही तयार व्हा.. तोवर मी जुनेजाशेठला फोन लावतो...
तिकडे मार्त्या होल्डवर!
दादा - कोण जुनेजाशेठ??
बोका - यातून तुम्हाला तोच वाचवू शकतो.. आवरा आवरा.. लवकर आवरा तुम्ही...
दादा काळेला 'आपल्याच माणसाने कॅश लुटली आहे हे बोक्याला कळले' याचा राग प्रदर्शित करायला वेळच मिळाला नाही. ते ताबडतोब वर गेले.
बोका - मार्त्या.. तू एक चार फूट लांबीचे अरुंद असे कापड तयार ठेव...
मार्त्या - कशाला??
बोका - आम्ही आलो की तुला शेपूट लावायला.. माकड आहेस तू...
मार्त्या - अय.. कोने तू???
बोका - बेअक्कल कुत्र्या... कॅश गोडाऊनला ठेवतात का?? आता हलवू नकोस तिथून...
मार्त्या - मी कसा हलवेन दादांनी सांगीतल्याशिवाय..??
बोका - कितीय कॅश...
मार्त्या - सात चाळीस..
बोका - उरलेले एक ऐंशी कुठेयत???
मार्त्या - कसले एक ऐंशी???
बोका - तुझे बारीक काप करून फोडणीला टाकीन.. टोटल कॅश पाहिजे आहे...
मार्त्या - अरे टोटलच आहे ना ही??
बोका - कव्वा कुठंय??
मार्त्या - कोण कव्वा??
बोका - डेक्कनला खलास करणारा??
मार्त्या - डेक्कन?? कोण डेक्कन??
बोका - तुझ्या गाडीखाली आला काल तो..
मार्त्या नखशिखांत हादरला..
मार्त्या - माझ्या गाडीखाली कोण आलं??
बोका - भोसडीच्या.. पैसे पळवण्याच्या नादात दोन कुत्री अन एक माणूस उडवलायस तू...
मार्त्या - ह्यॅ!
बोका - ह्यॅ तर बस... आणि एक लक्षात ठेव...
बोक्याचा तो कुजबुजता स्वर ऐकून मार्त्याने कानात प्राण गोळा केले.
बोका - दादा आत जाणार हे ठरलेले आहे.. तेव्हा वेळ आली की तू अन मी सरळ पळ काढायचा आहे.. कारण आपण बाहेर राहिल्याशिवाय दादांना बाहेर काढू शकत नाही.. सुरुवातीला हे कृत्य पळपुटेपणाचे आणि अप्रामाणिकपणाचे वाटू शकेल.. पण ते दादांच्याच चांगल्यासाठी आहे.. तिथे किती माणसे आहेत??
मार्त्या - सहा..
बोका - एकच माणूस ठेव विश्वासातला.. उरलेल्या पाचमधली दोन श्रीरामपूर रोडवर उभी राहुदेत.. वेपन नको त्यांच्याकडे.. उरलेले तीन नगर रोडवर उभे कर.. एका इन्डिकात.. इन्डिका आहे का??
मार्त्या - आहे..
बोका - पेट्रोल आहे का??
मार्त्या - डिझेलवर आहे ती...
बोका - ठीक आहे ना.. डिझेल तर डिझेल... पण डिझेल तरी भरलंय का??
मार्त्या - हो.. पण कशासाठी..
बोका - तुला अक्कल आली की तू असे प्रश्न विचारणार नाहीस.. पण त्यासाठी तुला अनेक जन्म घ्यावे लागतील..
मार्त्या - म्हन्जे??
बोका - तुला अन मला न्यायला काय पुष्पक विमान येणारे का तुकारामांसारखं??
मार्त्या - आपण इन्डिकातून जायचं??
बोका - मग तुझा काय विचार आहे?? हातगाडी वगैरे ठरवतोयस का??
मार्त्या - ठीक आहे... आपण इन्डिकातून जाऊ
बोका - हां...
मार्त्या - आणि बाकीची माणसे??
बोका - त्यातल्या प्रत्येकाने आपला प्रवास निर्विघ्न होईल याची काळजी घ्यायची आहे...
मार्त्या - अन मग दादा??
बोका - त्यांच्यासाठी व्हॅन थांबलीय ना साई ढाब्यावर...
मार्त्या - म्हन्जे ते आत??
बोका - काही वेळापुरते..
मार्त्या - आणि आपण कुठे जायचं??
बोका - ते निघाल्यावर सांगतो.. चल तयार रहा.. आम्ही चहा घेऊन निघतोय..
वरून जिन्यावरून दादा काळेंना उतरताना पाहून बोक्याने फोन बंद केला गडबडीत!
दहा मिनिटांनी एक इनोव्हा राहुरीतील मेन रोडला लागून दहा बारा मिनिटे फिरली आणि शेवटी राहुरीच्या एका एन्डला असलेल्या एका पडीक बांधकामापाशी पोचली.
कुणीतरी बाहेर आला.
दादा आणि बोका खाली उतरले.
बोका - हा कोण??
दादा - हाच मार्त्या...
बोका - तू जरा बाहेरच थांब रे... आत येऊ नकोस सांगीतल्याशिवाय...
आता मात्र दादा काळे भडकले.
दादा - अय हिरो.. तू कोन ऑर्डर सोडनारा?? आ?? मार्त्या.. आत ये तू..
बोका - बर चल आत ये...
तिघे आत गेले. मार्त्याने कॅश दाखवली.
दादा - माणसं कुठेयत रे बाकीची??
मार्त्याने स्टाईलमध्ये सांगीतले.
मार्त्या - दोन श्रीरामपूर रोडला.. तीन नगर रोडला..
दादा - का??
मार्त्या - मी आणि हा निघतोय... तुम्हाला आत घेणारेत...
दादांनी खण्णकन कानाखाली आवाज काढला मार्त्याच्या!
मार्त्या - अहो हाच म्हणाला मला असं... तुमच्याचसमोर बोलला की??
आता दादा काळे बोक्याकडे वळले.
बोका - हे तुमच्याच भल्याचं आहे.. जुनेजाशेठचं अन माझं बोलणं झालेलं आहे.. दहाव्या मिनिटाला तुम्ही बाहेर असाल आणि डिपार्टमेन्ट पेपरात जाहीर माफी पण मागणार आहे... मार्त्या कॅश इन्डिकात टाक...
बोका दादा काळेकडे सरळ दुर्लक्षच करत होता. जणू काही त्याच्याकडे सर्वाधिकार होते.
दादा - हे... हे काय चाललंय??
बोका - कॅश इन्डिकात भरतोय...
दादा - का??
बोका - कारण डेक्कन मेला..
दादा - कोण डेक्कन??
बोका - बघा आता.. म्हणे कोण डेक्कन... रामायण सांगून झालं अन म्हणे रामाची सीता कोण???
दादा - कोण रे डेक्कन मार्त्या??
मार्त्या - माझ्या गाडीखाली आला काल..
दादा काळेंनी आणखीन एक खाडकन वाजवली मार्त्याच्या कानाखाली!
दादा - माणूस आला गाडीखाली???
बोका - ते जाऊदेत.. गोरा सुतार तर अपंग झालाय... म्हणून म्हणतो कॅश इन्डिकात भरा..
दादा - कोण गोरा सुतार??
बोका - टोलनाक्यावरचा अधिकारी...
दादा - त्याला काय झालं??
बोका - पाय गेला त्याचा...
दादा - कसा काय??
बोका - ते आता जाउदेत.. बरच काय काय झालंय... ए उचल त्या उरलेल्या नोटा...
दादा - अरे पण गोरा सुतार अपंग झाला त्याचा कॅश इन्डिकात भरण्याशी संबंध काय??
बोका एकदम आक्रस्ताळेपणा करत किंचाळत म्हणाला...
बोका - संबंध काय, संबंध काय, संबंध काय! माझा तुमच्याशी, तुमचा मार्त्याशी, मार्त्याचा माझ्याशी, माझा मार्त्याशी काही संबंध आहे का?? तरीही जीव टाकतो आपण एकमेकांसाठी... काल हा मार्त्या कुत्र्यासारखा हायवेवर मेला असता डिपार्टमेन्टच्या एन्काउन्टरमध्ये! मी कशाला वाचवले याला?? तुमचा अन माझा संबंध आहे म्हणूनच ना??
मार्त्या आणि दादा बोक्याच्या त्या अवताराकडे बघतच बसले.
बोका - मार्त्या .. इनोव्हा पंक्चर करून ठेव...
दादा - का???
बोका - अहो तुम्ही गप्प बसा ना आता??? इथे मी जीव जाईस्तोवर एकेक गोष्ट करतोय.. आम्ही कॅश पळवली असे तुम्ही पोलिसांना सांगायचे ठरलेले आहे ना आता?? जाताना आम्ही इनोव्हा पंक्चर केली म्हणून सांगायचे असे???
दादा - हे कधी ठरले??
बोका हताशपणे खाली बसला. त्याच्या चेहर्यावर अत्यंत खिन्न भाव पसरले.
बोका - मलाच अक्कल नाही आहे. मूर्खासारखा प्लॅन करून मगाचपासून या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतोय..
आता मार्त्याला तोंड फुटले.
मार्त्या - दादा... हा प्लॅन तर बरोबर वाटतोय...
दादा - कुठला??
मार्त्या - कॅश आम्ही पळवलीत अशी तुम्ही बोंब मारायचीत... म्हणजे तुम्ही सुटलात!
गेल्या दहा मिनिटात ही तिसरी कानाखाली खाल्ली होती मार्त्याने!
दादा - अक्कलशुन्य भडव्या... मुळात माझ्याकडे कॅश आली कुठून हा प्रॉब्लेम नाहीये का??
बोका - अहो दादासाहेब काळे... तेच मगाचपासून घोकून घोकून सांगतोय मी तुम्हाला.. की मार्त्याला बाहेर थांबू देत... तर म्हणे तू कोण ऑर्डर सोडणारा..
दादा - त्याचा काय संबंध??
बोका - तुम्हाला आणि मला एकांत मिळाल्याशिवाय मी तुम्हाला प्लॅन कसा सांगू शकेन...
दादा - .... पण मग... बगल्यात होता की एकांत??
बोका - हे बघा डोकं यांचं! पोलिस येणार इथे अन प्लॅन बंगल्यात सांगू मी?? ए मार्त्या.. बस शेजारी..
बोका इन्डिकाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला होता.
मार्त्या - दादा.. जरा एक मिनिट.. आधी मला हे सांगा... की हा माणूस कोण आहे???
दादा - अरे मला तेच तर समजत नाहीये..
मार्त्या - म्हणजे?? अन तुम्ही याला घेऊन इथे आलात???
दादा - डोक्याचा भुगा केलाय याने पहाटेपासून माझ्या..
मार्त्या - ए... कोन बे तू??
तोवर बोक्याने गाडी स्टार्टही केलेली होती. मागे वळून पाहात लबाड हासत म्हणाला....
"बोका... बोका आहे मी... श्रीरामपूरहून नाशिकला जाणार आहे... आणि हो... पोलिस तुला नाही.. मला शोधतायत..."
व्वा पुन्हा बोका.........
व्वा पुन्हा बोका.........
काय गोंधळ माणुस आहे हा बोका.
काय गोंधळ माणुस आहे हा बोका.
आवड्ली कथा...!
आवड्ली कथा...!
अरे किती हा गोंधळ......
अरे किती हा गोंधळ......
बोक्याने धुमाकुळ घातलाय...
बोक्याने धुमाकुळ घातलाय...
पुन्हा १ बालकथा
पुन्हा १ बालकथा
आवडली.....मस्तच
आवडली.....मस्तच
boka....avadala.....tumhala
boka....avadala.....tumhala nagarchi ani aaspas chi barich mahiti ahe....
< सुनसान वाट होती. बोक्याने मधेच थांबून मगाशी घेतलेल्या सिगारेट्सपैकी एक पेटवली. एखादा ट्रक गेला तर तेवढाच! राहुरी तर ४० किलोमीटर लांब होते.>
ha road baherchya far kami lokana mahit ahe.... bahutek sagalyana ghodegoan sonai (shni shingnapur) rahuri road mahit ahe.....
ya cross roadvarch barech maghe yekda (some time in 1990...)aurangabad pune ashiyad bus lutali hoti....
बेफिकीरजी, वाह ! भन्नाट
बेफिकीरजी,
वाह ! भन्नाट स्टोरी (रहस्यकथा) !
हे तुम्हाला कसं सुचतं कि कुठुन माहिती मिळते ?
मला तरी वाटतं ,बोक्याशी तुमचा नक्कीच संबंध आला असणार !
लय भारी.....
लय भारी.....:D
भन्नाट मागच्या जन्मी बोका
भन्नाट
मागच्या जन्मी बोका होते की या जन्मी आहात?
सॉलिड....... मला तर आता खरच
सॉलिड.......
मला तर आता खरच या बोक्याची भिती वाटायला लागली आहे
झकास! कसला भयानक गोंधळ करून
झकास!
कसला भयानक गोंधळ करून टाकतो हा बोक्या... हसून हसून पुरेवाट होते...
बोक्याच्या बोलण्याने संभ्रमात पडलेल्या माणसाची स्थिती अगदी डोळ्यासमोर उभी राहते....
प्रसन्न करून टाकतात या बोका कथा!
जाम भारी. बोका सु
जाम भारी. बोका सु >>>>>>>>साटलाय.
भूषणजी बोक्याचं पुस्तक निघू
भूषणजी
बोक्याचं पुस्तक निघू शकेल.. भन्नाट आहे बोका. तुमची शैली उत्कंठावर्धक आणि फुल्ल टू एन्टरटेनिंग आहे.
या कथेतले लुटारूही खूप बावळट दाखवलेत ते रिपीटेशन झालं एव्हढं एक सोडलं तर कथा मस्तच आहे.
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
बोक्यातर्फे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
माय नेम इज बोका.. ढिशकँव
माय नेम इज बोका.. ढिशकँव
निव्वळ बालिशपणा आहे
निव्वळ बालिशपणा आहे
अन् हे लोक तुमची स्तुती
अन् हे लोक तुमची स्तुती करणारे तुमची मापे काढीत आहेत..!
सलिम जावेद सारखी वेगवान कथा
सलिम जावेद सारखी वेगवान कथा आहे बुवा.विचार करायला वेळच द्यायचा नाही की श्वास घ्यायला फुरसत नाही. काय चाललय असं वाटत.
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
@ तो मी नव्हेच... तुम्ही
@ तो मी नव्हेच...
तुम्ही तुमचा अभिप्राय कथेपुरताच मर्यादित ठेवावा असं मला वाटतं. इतरांच्या अभिप्रायाबद्दल अभिप्राय म्हणजे जरा जास्तच होतंय.
मला या बोका कथा आवडतात. सुहास शिरवळकरांच्या कथाही आवडायच्या. .या कथेत जी त्रुटी जाणवली ती प्रामाणिकपणे निदर्शनास आणून दिलीय फक्त.. कारण ही मालिका चालू रहावी आणि उणिवा निघून जाव्यात असं मला वाटतं.....
कळावे.. लोभ असावा
बेफिकीर यांचे या आधीचे लिखाण
बेफिकीर यांचे या आधीचे लिखाण मी वाचलेले आहे त्या मानाने हे फारच बालिश वाटले आणि इतरांच्या मतांबाबत जे लिहले आहे ते कृपया वैयक्तिक घेऊ नये. आभारी आहे. कळावे, लोभ असावा.
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्त.. परत परत वाच्तो
मस्त.. परत परत वाच्तो