बोका - लगेचच सुवर्णसंधी

Submitted by बेफ़िकीर on 27 December, 2010 - 03:16

संध्याकाळी आठ वाजता जुनेजांच्या जालना रोडवरील अवाढव्य बंगल्याच्या टेरेसवर एक गंभीर मीटिंग चाललेली होती.

स्वतः जुनेजा भेदक नजरेने सर्व आमंत्रितांकडे पाहात होते. जुनेजांचा पार्टनर कम मित्र कम सबकुछ असलेला लाल बेदरकार नजरेने सगळ्यांकडे पाहात मार्लबोरोचे कश मारत होता.

कुणाचाच खरे तर कुणावर विश्वास नव्हता. पण पर्यायही नव्हता भेटण्याशिवाय!

वेताच्या सहा खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्यापैकी दोनवर जुनेजा आणि लाल बसलेले होते. तिसरीवर इर्रिगेशनच्या नगर डिव्हीजनला असलेले कांबळे होते. त्यांच्याकडे पाहूनच समजत होते की सरकारी अधिकारी भ्रष्टच असतात. चौथीवर त्यांचे बिझिनेसमधील मित्र आणि त्यांच्यावर पैशाची खैरात करणारे मल्हारराव जमदाडे बसलेले होते. पाचव्या खुर्चीवर एक माणूस होता ज्याच्याकडे पाहूनच भीती वाटावी. कल्लेदार मिश्या त्याच्या काळ्याकभिन्न चेहर्‍याला झाकत होत्या. त्याचा आहारही प्रचंडच असावा. तो त्या खुर्चीत मावतच नव्हता. त्याचा एक पंजा एखाद्या माणसाचे अख्खे डोके ग्रिप करू शकेल इतका प्रचंड होता. तो अत्यंत रागीट नजरेने सगळ्यांकडे पाहात होता. पण ते त्याचे पाहणे नॉर्मल होते. तो तसाच बघायचा. मुहम्मद खान! मुंबईचा एक गाजलेला पठाण होता तो! त्याची स्वतःची संघटना होती. एकेक माणूस एकदम घातक असा पारखून त्याने संघटनेत समाविष्ट केलेला होता. आणि त्या संघटनेचे कार्य तर फारच पवित्र होते. डॉक्टर पळवून खंडणी मागायची. किंवा मग डॉक्टरांचे कुटुंबीय पळवून! हल्लीच त्यांनी डायव्हर्सिफिकेशन करून डॉक्टरांसमवेतच बिल्डर्स लॉबीचेही कुटुंबीय पळवायला सुरुवात केलेली होती. या संघटनेकडून डिपार्टमेन्टला दर महिना अवाढव्य रक्कम जायची. काळा पैसा पुन्हा काळाच व्हायचा. फक्त मधल्यामधे एखादा माणूस पळवला जायचा आणि परत देऊन टाकला जायचा इतकेच! परत घरी येताना मात्र तो अत्यंत व्यथित असायचा. कारण जीवाची इतकी भीती त्याला यापुर्वी वाटलेली नसायची कधीच!

मुहम्मद खानला खास पाचारण करण्यात आले होते जुनेजांकडून!

सहावी खुर्ची रिकामी होती आणि म्हणूनच मुख्य डिस्कशन अजून सुरू होऊ शकत नव्हते. जुजबीच चर्चा झालेली होती. जुनेजांचे आजवर त्रेचाळीस लाख लुटले गेले होते. ही सर्वांच्याच मते एकाचवेळी लुटण्यात आलेली सर्वाधिक रक्कम होती. कांबळेंचे दोन कामगिर्‍यांमध्ये सोळा लाख तर एकट्या मल्हाररावांचे एकाच कामगिरीत बत्तीस लाख गेलेले होते. मुहम्मद खान कोंबडी ढकलत होता. मल्हारराव त्यांची आवडती रम घेत होते. लाल फक्त सूप आणि मार्लबोरो! जुनेजा तर फक्त ताकच पीत होते. कांबळे मात्र मल्हाररावांना रमची बाटली रिकामी करण्यात महत्वाचा हातभार लावत होते. तेवढ्यातच राजू वर आला.

राजू - सर... ते साहेब आलेत...

जुनेजा - पाठव...

आधीच त्या सहाव्या माणसाला झालेल्या विलंबामुळे लाल आणि खान भडकलेले होते. पण निदान तो आला होता. आता चर्चा तरी सुरू होणार होती.

तो माणूस आत आला आणि बिनदिक्कत सहाव्या खुर्चीवर बसला. घर जुनेजांचे असल्यामुळे जुनेजांनीच चौकशी करणे योग्य होते.

जुनेजा - तू कोण??

कव्वा - ... कव्वा

जुनेजा - कशावरून??

कव्वा - म्हणजे??

जुनेजा - तू बोकाही असू शकशील...

कव्वा - शक्य आहे... हल्ली मलाही तसं वाटतं मधूनच...

जुनेजा - म्हणजे??

कव्वा - आपण सगळेच बोके असू असाही विचार आला माझ्या मनात इथे आल्या आल्या..

जुनेजा - नीट आणि व्यवस्थित बोलणारे इथे जमलेले आहेत...

कव्वा - अभिनंदन... मला तसले काहीही जमत नाही... मी समोरचा जसा वागतो तसाच वागतो...

जुनेजा - खान .. या माणसाला तू ओळखतोस??

खान - बकवास माणूस आहे हा... भुरटा चोर आहे भुरटा...

कव्वा - ओके... निघतो मी...

जुनेजा - खाली बस... तू जाऊ शकत नाहीस...

कव्वा - खाली माझी चार माणसे आहेत.. मी शिट्टी वाजवली तर अर्ध्या तासात बंगल्याचे स्वरूप बदलेल..

जुनेजा - असल्या धमक्या मी इयत्ता पहिलीत ऐकायचो... बस तिथे.. खान.. हा कव्वा आहे का??

खान - हो.. हाच कव्वा आहे...

जुनेजा - कव्वा... हे कांबळे...

कव्वा - माहितीय.. याच्या सोळा पेट्या उडल्यात... बोका लठ्ठ झालाय..

जुनेजा - हे जमदाडे... मल्हारराव...

कव्वा - मला सगळे माहितीयत.... परिचय नंतर करू आपण...

जुनेजा - तू काय घेणार??

कव्वा - दारू आणि यायचा जायचा खर्च... बोका मी पकडला तर मला तीस पेट्या पाहिजेत...

जुनेजा - ती चर्चा सुरू व्हायचीय... त्यासाठीच खान आलाय...

कव्वा - खानाला ते काम जमणार नाही...

खान - ए कव्व्या... तू तुझ्याबाबत बोल.. बाकीची बडबड करू नकोस..

जुनेजा - तुम्ही अर्ग्युमेन्ट्स करू नका... चर्चा महत्वाची आहे... लाल... तू सुरू कर...

लालने सूपचा एक मोठा घोट घेतला. एक नवी मार्लबोरो शिलगावून त्याने तीन झुरके मारले आणि सगळ्यांकडे एकेकदा पाहात घसा खाकरत त्याने बोलायला सुरुवात केली.

लाल - आमचे त्रेचाळीस, मल्हाररावांचे बत्तीस, कांबळेसाहेबांचे सोळा असे एक्याण्णव लाख बोक्याने उचलले आहेत. त्याने ते कुठे ठेवले असतील आणि त्या पैशांचे त्याने काय केले असेल ते समजत नाही. इतकेच काय तर तो राहतो कुठे हेही माहीत नाही. मात्र, आपल्याला हे पैसे तर परत पाहिजे आहेतच, वर पुन्हा यानंतर असलं काहीही होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आज आपण सगळे इथे जमलो आहोत. ही एक गुप्त स्वरुपाची सभा आहे. या सभेबाबत कोणत्याही प्रकारची वाच्यता आपण कुठेही केलेली नाही. कांबळेसाहेबांमुळे आपण सगळे एकत्र येऊ शकलो. आपल्यासारखेच अजून अनेक लोक असतील ज्यांना बोक्याने लुटलेले आहे. पण ते नंतर पाहू. आता आपल्यातील प्रत्येकाने बोका या विषयावर उपाय सुचवायचे आहेत. कांबळेसाहेब, तुम्ही सुरू करा...

कांबळेंनी रमचा एक मोठा घोट घेतला.

कांबळे - पहिली गोष्ट म्हणजे ही बाब गुप्तच ठेवावी लागते हा मुख्य प्रॉब्लेम आहे. डिपार्टमेन्ट ऑफिशियली यात काहीही करू शकत नाही. जे काही प्रकार झाले ते सरळ सरळ दरोडा या स्वरुपाचे आहेत. माझी कॅश दोनदा गेली आणि दोन्ही वेळा ती गाडी लुटूनच नेण्यात आली. गाडीतील माणसांची वर्णने भिन्न आहेत. एका गाडीतील लोक म्हणतात की एक जाडजुड म्हातारा होता लुटणारा! दुसर्‍या गाडीतील लोक म्हणतात त्याच्या अंगावर आर्मीचा वेष होता आणि तो तरुण होता. शस्त्राचा धाक दाखवून त्याने कॅश नेली. शस्त्रे आमच्याही माणसांकडे होती. ती वापरायला त्यांना वेळच मिळाला नाही. हा बोका अत्यंत वेगाने हालचाली करत असावा. तेव्हा माझ्या मनात जो उपाय आहे तो असा! की आपण एक कुभांड रचायचे. ज्यात वास्तविक फारशी कॅश नसेल! पण रक्कम बरीच मोठी आहे असा गवगवा करायचा. नीट लक्ष ठेवायचं! मुख्य म्हणजे... कॅश लुटू जाऊ द्यायची. नेहमीप्रमाणे किरकोळ विरोधाचे नाटक करायचे. मात्र पळून चाललेल्या बोक्याच्या मागे किमान दहा माणसांनी लागायचे. तो कुठे जातो, काय करतो ते सगळे तपासायचे. आणि एक दिवस संधी साधून बोका धरायचा.

सगळे गंभीर झालेले होते. प्लॅन तर चांगला होता. पण कव्वा पोचलेला माणूस होता.

कव्वा - ही भंकस आहे....

कव्व्याचे वाक्य कानात शिरल्यावर सगळ्यांनाच कव्व्याचा राग आला. तो स्वतःला अत्यंत शहाणा समजत आहे हे कुणालाच पाहवत नव्हते. कांबळे तर रागारागाने काहीतरी बोलण्याच्या मूडमध्ये आलेही होते. तेवढ्यात लाल बोलला.

लाल - भंकस आहे म्हणजे??

कव्वा - तुम्हाला कुणाला काही माहीत आहे का?? बोका तुमच्यापैकी कुणी बघितलाय का??

जुनेजाने नकारार्थी मान हालवली. कव्वा ज्या माणसाकडे पाहील तो तशीच मान हालवू लागला.

कव्वा - मी बघितलाय. आणि नुसता बघितला नाही आहे तर दोन तास तो माझ्याशी आणि माझ्या सगळ्या माणसांशी चक्क बोलत बसला होता.

लाल - मग धरला का नाहीस त्याला?? की माहीतच नव्हते हा बोका आहे??

कव्वा - माहीत होते... माहीत होते म्हणजे काय?? बोका आहे म्हणूनच त्याला किडनॅप केला होता..

मल्हाररावांना शॉकच बसला.

मल्हार - पळवलावतास त्याला?? मग??

कव्वा - तो आमच्यातच भांडणे लावून निघून गेला..

मल्हार - मूर्खा...

कव्वा - तोंड सांभाळा.. तो आत्ता इथेही असू शकेल... काहीही करतो तो...

मल्हाररावांना स्वतःची केस आठवली.

मल्हार - हे मात्र खरं आहे... माझ्या बंगल्यात तर माझ्याच मागे झाड बनून उभा होता चार तास! सकाळी पाहतो तर झाड गायब... कॅशही गायब...

जुनेजा - मग तुझ्यामते उपाय काय आहे??

कव्वा - कांबळे म्हणतायत त्या प्रमाणे खोटी केस जरूर करा... पण केवळ दहा माणसे त्याच्यामागे धावून काहीही होणार नाही....

जुनेजा - मग??

कव्वा - त्या रस्त्याच्या प्रत्येक वळणावर आपली दोन दोन माणसे हवीत.. प्रत्येक हॉटेल, हॉस्पीटल, थिएटर आणि शौचालयात आपला एकेक माणूस हवा.. आपल्या प्रत्येक माणसाकडे एक शस्त्र हवे.. एक वाहन हवे स्वतंत्र....

खान - इतकं सगळं त्या एका माणसासाठी...???

कव्वा - खान.. तुला कल्पना नाही.... तो अ‍ॅक्टिंग तर असे करतो की आपला विश्वासच बसतो...

खान - तुझा बसत असेल...

कव्वा - जुनेजा साहेब.. या प्रकरणात खान असेल तर मला उडी घ्यायची नाही...

जुनेजा - खान... एक मिनिट.. कव्व्याने बोका पाहिलेला आहे... त्याला बोलूदेत...

कव्वा - मुख्य म्हणजे त्याच्या नुसत्या पाठलागावर राहायचे नाही.. कारण तो जागा बदलतही असू शकेल... त्याला धरायचा...

मल्हार - बरोब्बर... माझेही तेच म्हणणे आहे...

जुनेजा - पण... धरला तरी.. करायचे काय त्याचे??

कांबळे - करायचे काय म्हणजे?? आपला सगळा पैसा परत मिळवायचा.. त्याला अद्दल घडवायची...

कव्वा - पुन्हा चुकताय तुम्ही कांबळे... बोक्याला अद्दलबिद्दल काहीही घडवायची नाही.. त्याला सरळ उडवायचाच.. एकदा बोका हाती आला की ठेचायचाच त्याला..

गांभीर्य पसरले. कव्व्याचा मुद्दा सगळ्यांनाच मान्य होता खरे तर! एखादा चोर मारला तर पोलीसखाते मॅनेज करणे जुनेजा आणि खानला शक्य होते. मल्हारराव आणि कांबळे यांची भिस्त त्याबाबतीत या दोघांवर आणि कव्व्यावरच होती. खून! बोक्याचा खून!

आपापल्या परीने प्रत्येक जण विचार करत बसला होता. एकटा कव्वा सगळ्यांकडे पाहात दारू ढोसत होता. बर्‍याच वेळाने लाल म्हणाला...

लाल - कव्वा म्हणतो ते खरे आहे... त्याला जिवंत सोडले तर करामती दाखवतच राहणार... डिपार्टमेन्ट त्याला पकडू शकणार नाही... आणि आपण लुटले जात राहणार... आपल्या सगळ्यांचे धंदेच मुळी ब्लॅकमनीवर अवलंबून आहेत...

खान ऐसपैस बसत म्हणाला..

खान - बोका सापडला तर माझ्याकडे द्या!

कव्वा - बोक्याला पकडण्याच्या कामातही तुझा सहभाग पाहिजे खान!

जुनेजा - एक्झॅक्टली!

जवळपास दोन तास चर्चा चाललेली होती. पुन्हा एकदा मल्हाररावांकडे चाळीस लाखांचे ट्रॅन्झॅक्शन होणार आहे अशी हूल उठवायचे ठरले. आता सगळे समाधानाने हासत होते. बोका पकडला गेल्याचाच आनंद आत्ता होत होता जणू!

आणि.... पार्टीनंतर सगळे उठले आणि आपापल्या गाडीने आपापल्या ठिकाणी जायला निघाले. कव्वाने मात्र आठ हजार घेतले जुनेजांकडून! डिझेल आणि वरखर्चाचे!

दोन गाड्या नगरला, एक सातार्‍याला आणि एक मुंबईला चाललेली होती. प्लॅन केवळ आठ दिवसांनीच करायचा होता. त्यामुळे आज लुटले गेलेले सगळेच आरामात झोपणार होते.

=============================================

पुण्यापासून सत्तर आणि नगरपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या, पण पुणे जिल्ह्यात असलेल्या शिरूर या गावातील सूर्या एक्झिक्युटिव्ह या हॉटेलच्या पार्किंगमध्ये दोन गाड्या नव्यानेच लागल्या! दुपारचे दोन वाजलेले होते.

एका गाडीतून तीन माणसे उतरली आणि त्यांच्यापैकी एकाच्या हातात एक बॅग होती. दुसर्‍या गाडीतून चार माणसे उतरली. त्यांच्या हातात काहीही नसले तरी त्यांचे चालणे अवघडल्यासारखे होते. त्या क्षेत्रात असलेल्या माणसाला समजले असते की या चार माणसांनी काही ना काही शस्त्रे त्यांच्या पोषाखात दडवलेली आहेत.

सूर्याच्या स्टाफपैकी एकालाही हे मात्र माहीत नव्हते की दर एक किलोमीटरवर यांच्यापैकी दोन दोन माणसे आहेत ज्यांच्यातील प्रत्येकाकडे एक मोटरसायकल, एक सेलफोन आणि एका सुरा आहे. नगरच्या बाजूला दहा किलोमीटरपर्यंत आणि पुण्याच्याही बाजूला तेवढ्याच अंतरापर्यंत हे लोक होते. कव्वाने सांगीतल्यापेक्षा कितीतरी जास्त माणसे मल्हारराव आणि जुनेजांनी मिळून लावलेली होती. कॅशचा आकडा पन्नास लाख आहे असे सांगण्यात आले होते. वास्तविक पाहता फक्त अडीच लाख बॅगेत ठेवण्यात आले होते. चाळीस माणसे रस्त्यावरची आणि सात माणसे सूर्यामधली अशा सत्तेचाळीस जणांना वाटलेले पैसे मिळून टोटल खर्च फार तर साडे तीन लाखापर्यंत गेला असता. रिस्क होती साडे तीन लाखांची! आणि बोका सापडल्यास होऊ शकणारी गेन होती कित्येक लाखांची! तसेच, जरी साडे तीन लाख घालवले तरी बोका सापडल्यास त्याला अपंग तरी करण्यात येणारच होते ज्यामुळे किमान पुढचे कित्येक लाख वाचणार होते.

स्वतः मल्हारराव, खान, कांबळे हे मल्हाररावांच्या बंगल्यावर होते. कव्वा रांजणगावला, म्हणजे पुण्याला जाण्याच्या दिशेला उभा होता. जुनेजांची तीन माणसे नगर औरंगाबाद रोडवर एक कार घेऊन उभी होती.

आणि आत्ता सूर्यामध्ये सेलफोनवरून 'ऑलवेल' असल्याचे संदेश सगळ्यांनी सगळ्यांना पास ऑन केल्यानंतर ट्रॅन्झॅक्शन करण्यात आलेले होते.

बीअरच्या लागोपाठ सात बाटल्या कचाकच फुटल्या आणि 'चीअर्स'च्या घोषणांनी सूर्याचे रेस्टौरंट दुमदुमले. स्टाफला काहीही समजले नसले तरीही ती बॅग टेबलच्या एका बाजूच्या ग्रूपने दुसर्‍या बाजूच्या ग्रूपला दिलेली होती.

आता चालू असलेल्या गप्पा निरर्थक होत्या. हिंदी पिक्चर, क्रिकेट आणि राजकारण हे भारतीयांना अतीप्रिय असलेले विषय बरळले जात होते. कोंबड्यांचे विविध खाद्यपदार्थ येऊन संपतही होते. एकमेकांना भेटून जणू ब्रह्मानंद झाल्यासारखे भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते.

पुन्हा काही वेळाने सगळ्यांना सेलफोनवरच काही ना काही संदेश मिळाले. भर रंगात आलेद्ली पार्टी एकदम का आवरती घेण्यात आली हे स्टाफला समजले नाही. जाताना बॅग दुसर्‍या गाडीत गेली. आता बॅग नसलेली गाडी पुण्याच्या दिशेने तर बॅग असलेली गाडी नगर - औरंगाबादच्या दिशेने धावू लागली. कव्वाला त्याच्या फोनवर मेसेज आला की कॅशवाली गाडी नगरच्या दिशेला निघाली आहे तसा तोही शिरूरकडे धाव घेऊ लागला.

कॅशची गाडी इन्डिका होती. कॅश नसलेली फियाट!

आता फियाटकडे कुणाचेच लक्ष नव्हते. इन्डिकाकडे मात्र टप्याटप्यावरची माणसे डोळ्यात तेल घालून बघत होती. त्यांच्या नजरेतून इन्डिका लांब गेल्यावर ते आपल्या मोटरसायकलला किक मारून इन्डिकाच्या मागून जायला सुरू करत होते.

परिणामतः, केवळ अर्ध्याच तासात अशी परिस्थिती आली की इन्डिका सगळ्यात पुढे, जवळपास सुप्याला पोचलेली, मागून वीस मोटरसायकली एक विशिष्ट अंतर ठेवून आणि त्यांच्याही खूप मागून पुण्याच्या साईडला असलेल्या वीस मोटरसायकली आणि त्यांच्याही मागून कव्वा गॅन्ग त्यांच्या इन्डिकामध्ये!

मल्हाररावांना सेलफोनवर ही परिस्थिती समजली तसे ते खान आणि कांबळेंकडे पाहून समाधानाने हासले. तिकडे जुनेजा आणि लाल त्यांच्या बंगल्यावर बसून हालचालींची अपेक्षा करत होते.

ही कॅश औरंगाबादला न्यायची ठरलेली होती.

नगरचा पूल ओलांडून तीन किलोमीटर आल्यावर तारकपूर स्थानकापाशी इन्डिकाला दुसरी इन्डिका दिसली. ही इन्डिका नगर औरंगाबाद रोडवर जुनेजांनी ठेवलेली इन्डिका होती. आता ती जुनेजांची इन्डिका पुढे, मागून कॅशवाली इन्डिका साधारण दोनशे मीटर्सवरून आणि जवळपास चारशे मीटर्सवरून मोटारसायकली एकामागोमाग एक! कव्वा त्याच्याही मागून सेलफोनवर सतत मल्हाररावांशी बोलत नगरकडे सरकत होता. वरवर पाहणार्‍याला हा सापळा आहे हे लक्षात येणे शक्यच नव्हते. फार तर एकदम खूप मोटारसायकली गेल्या इतकेच वाटले असते. पण तीन इन्डिकांचा संबंध डोक्यात आलाच नसता.

काहीच होत नसल्यामुळे खरे तर रस्त्यावरची वरात आनंदात होती पण खान, कांबळे, मल्हारराव, कव्वा आणि जुनेजा वैतागलेले होते. एवढा मोठा सापळा लावल्यानंतर बोका सापडायलाच हवा होता.

आणि... नगर ओलांडल्यानंतरच्या लहानश्या घाटावरील वळणावर ... बोका प्रकटला..

पुढची इन्डिका उतारामुळे काहीशी पुढे पोचलेली होती. मागचे मोटरसायकलस्वार डोंगराच्या एका प्रोजेक्शनच्या मागेच राहिलेले होते. आणि धाडसी बोक्याने कॅशवाली इन्डिका साधारण पंचाहत्तर मीटरवर असताना डोंगराच्या एका जमीनीलगतच्या सुळक्यावरून थेट हायवेवर उडी घेतली.

नैसर्गीक प्रतिक्षिप्त क्रियांचा अभ्यास आवश्यक असतो अशा हालचाली करताना! आपल्यालाच मारायला सगळे टपलेले आहेत हे माहीत असूनही बोक्याने असे करण्याचे कारण हा अभ्यास हेच होते. अचानक भुतासारखा एक माणूस समोर आला की बावचळून ड्रायव्हर तीव्र ताकदीने ब्रेक्स मारतो हा बोक्याचा अंदाज अचूक ठरला.

इन्डिका अगदी पुढ्याच येऊन थांबली. हाच बोका आहे आणि आपल्याला यालाच मारायचे आहे हे गाडीतल्या चौघांना समजेपर्यंत बोका ड्रायव्हरच्या मागच्या खिडकीकडे सरकलाही! आता मात्र हालचाली जोरदार सुरू झाल्या. हे सगळे क्षणार्धात घडत होते. बोक्याने अचानक एक पाते मागच्या माणसाच्या खांद्यावरून फिरवले आणि त्याच्याच पुढच्या क्षणी ड्रायव्हरच्या कानाखाली एक मूठ दणकवली. तोवर बाकीचे दोघे गाडीबाहेर उतरून उलट्या बाजूने बोक्यापर्यंत पोचले होते. बोक्याने त्यांच्यावर सुरा उगारला आणि गाडीत सुरा फिरल्यामुळे किंकाळणार्‍या माणसाच्या हातातली बॅग हातात घेतली.

पण तितक्यातच ते सगळे संपले. मागून आलेल्या मोटरसायकलच्या धाडी तेथे पोचल्या.

आजवर झाली नसेल अशी धुलाई झाली बोक्याची! बोका किंचाळत होता. मार खाताना कोणते अवयव हातांनी झाकून ठेवायचे याचे त्याला ज्ञान होते. पण आजची परिस्थितीच वेगळी होती. इतके जण तुडवतायत म्हंटल्यानंतर काहीच करणे शक्य नव्हते. ज्याला वाटेल तो येऊन लाथा घालत होता. तरी त्यातल्यात्यात बोक्याने बहुतांशी लाथा पाठीवर झेलल्या पडल्या पडल्या!

तेवढ्यात कुणीतरी वर्दी दिली. 'बोका सापडला'!

त्यानंतर आलेल्या संदेशांप्रमाणे बोक्याला इन्डिकात घालून सगळे औरंगाबादला निघाले.

वेदनांनी बोका तळमळत होता. गाडीतील तीन जण त्याला त्याही परिस्थितीत शिवीगाळ करत बडवत होते. मात्र त्यांना इन्स्ट्रक्शन होती. बोका 'बोलण्याच्या परिस्थितीत' औरंगाबादला पोचायला हवा.

काही काळाने बोक्याची धुलाई थांबली. सगळे सेलफोनवरून एकमेकांना आनंदाने सांगायला लागले. 'बोका सापडला'! त्यातच मल्हारराव, कांबळे आणि खान एका गाडीतून औरंगाबादला निघाले. त्यांची गाडी आणि कव्वाची गाडी आता एकमेकींच्या बरोबरच औरंगाबादला जाऊ लागल्या.

=======================================

संध्याकाळी पाच वाजता चाळीस जण प्रत्येकी दोन हजार घेऊन बंगल्यावरून कुठेतरी पार्टी करायला निघून गेले.

टेरेसवर 'खाश्या' पार्टीची तयारी चालू झाली होती. भरपूर आराम करून समाधानाने सगळे खासे सात वाजता टेरेसवर जमले.

जुनेजा, लाल, कांबळे, मल्हारराव, खान आणि कव्वा! सगळे खुर्च्यांवर बसले होते. कव्व्याची गॅन्ग मात्र तळघरात होती. त्यांच्या तावडीत बोका होता. बोका बांधून ठेवलेला होता. त्याला मारहाण झालेली होती. पाण्याचा थेंबही दिलेला नव्हता. तो विव्हळतच होता. पण तरीही त्यातल्यात्यात इकडेतिकडे बघून दिसेल तेवढे टिपत होता. कव्वाच्या गॅन्गला एकदा येडे बनवल्यामुळे पुन्हा लगेच त्याच शैलीने येडे बनवणे शक्य नाही हे त्याला माहीत होते. त्यातच सुलेमान त्याला अधूनमधून जमेल तसे ठोकत होता. सुलेमानचा मार त्या दिवशी रघ्याने खाल्लेला होता. त्यामुळे रघ्याही एखाददुसरा फटका टाकत होता. गोरा सुतारही एखाददुसरा फटका टाकत होता. डेक्कन मात्र बोक्याला पकडल्यापासून हसतच बसला होता. आठवून आठवून सुलेमान आणि रघ्याच्या मारामारीचे उल्लेख करून जोरजोरात हासत होता. त्याचे हासणे बघून 'स्वतःच येडे ठरलो' हे कळत असूनही बाकीचे हासत होते. साडेसात वाजता वरून आज्ञा आली.

'बोक्याला सादर करा'!

बोक्याचे बॉलपेन, बेल्टमधील ब्लेड्स, सुया आणि सॉक्समधील किरकोळ वस्तू आधीच काढून घेतलेल्या होत्या. त्याला सोडून ओढतच टेरेसमध्ये आणण्यात आले.

सगळ्यांच्यासमोर एका भिंतीपाशी त्याला एका स्टूलवर बसवण्यात आले. तेथेही सुलेमान आणि रघ्याने त्याला फटके देत धरूनच ठेवले. आता मुहम्मद खानही पुढे झाला. त्याने बोक्याला नीट निरखले आणि जागेवर येऊन बसला.

डेक्कन आणि गोरा सुतार यांना आता प्रत्येकी एकेक हाफ मिळाली. त्यांनी ती ढोसायला सुरुवात केली. रघ्या आणि सुलेमानला नंतर मिळणारच होती. पण आत्ता त्यांना बोका धरून ठेवण्याचे काम होते.

जुनेजाने तोंड उघडले.

जुनेजा - तर मित्रांनो... हा हरामखोर आता आपल्याला मिळालेला आहे... याला जालना रोडवर पंचवीस किलोमीटरवर नेऊन... गाडीखाली घाला... अपघाती मृत्यू अशी बातमी मी छापून आणेनच... त्यापुर्वी... आपापल्या लुटलेल्या पेट्यांचे हिशोब समजून घेऊयात.. बाळ बोका?? कोण तू?? नाव काय तुझे?? कुठे असतोस?? का लुटतोस?? सांग बरं सगळं???

त्याही परिस्थितीत बोका अक्कल काढणारे हासला हे पाहून मात्र सगळेच दचकले. सुलेमानने तर बोक्याचा एक कान इतका जोरात पिरगाळला की बोका जीवाच्या आकांताने ओरडला. त्यानंतर जुनेजा...

जुनेजा - सुलेमान... अक्कल आहे का तुला?? इथे आजूबाजूला दोन बंगले आहेत.. हा किंचाळला तर लोक संशय घेतील आपल्यावर...

सुलेमान - गुस्ताखी माफ...

जुनेजा - बोक्या.. बोल.. पैसे कुठेयत???

बोका अचानक मगाचपेक्षा जोरात किंचाळला. सगळेच दचकले.

जुनेजा - का ओरडून राहिलाय बे???

बोका आणखीनच किंचाळला.

कव्वा - शेठ... त्ये ब्येनं आहे... तुम्ही बाजूला बंगले आहेत म्हणालात ना?? आता ते ओरडतच बसेल..

मुहम्मद खान खदखदून हासला. तोवर बोक्याने आणखीनच मोठी किंचाळी मारली.

जुनेजा - ए.. ए.. त्याला खाली ने... खाली बसू आपण सगळे...

निघाली वरात तळघरात!

बोका ओरडतच खाली चालला होता. मुहम्मद खान जोरजोरात हासू लागला होता.

सगळे तळघरात आले. दहाच मिनिटात टेरेसवरचा सगळा सरंजाम तळघरात आला.

आता बोक्याला बिनधास्त फटके लावत होता सुलेमान! बोका ओरडत होता.

जुनेजा - थांब रे... हां... ए बोक्या... नाव काय तुझं..???

बोका - मगनशेठ जुनेजा...

मुहम्मद खान तोंडावर हात धरून पठाणी हासू लागला. त्याचे हसणे पाहून कव्वा आणि मल्हाररावही हासू लागले.

जुनेजा - अच्छा... तू पण मगनशेठ जुनेजा काय??

बोका - छे... तू मगनशेठ जुनेजा...

जुनेजा - मी तुझं नाव विचारलंय.. तुझं नाव काय??

बोका - बोका...

जुनेजा - पैसे कुठेयत??

बोका सुलेमाकडे पाहू लागला.

सुलेमान - काय बघतो??

बोका - याने माझ्या खिशातून सगळं घेतलंय... यालाच विचार...

जुनेजा - अच्छा.. हे सरळ होणार्‍यातलं नाही दिसत... सुलेमान .. लाव एक फटका..

बोका आधीच किंचाळला. मनोरंजन होत असल्यामुळे सगळे हासत होते.

बोका - पैसे वेल्ह्यात आहेत...

दचकलाच जुनेजा! लालही दचकला.

वेल्ह्यात तोरणा गडाच्या पायथ्याशी लाल एक फार्म हाऊस बांधत होता. वेल्हे या गावाचा दुसरा काहीही संदर्भ जुनेजा आणि लालला माहीत नव्हता.

लाल - वेल्ह्यात कसे काय??

कव्वा - लालसाहेब.. त्याच्या बोलण्यावर जाऊ नका.. खरे तर त्याला बोलूच देऊ नका.. सरळ उडवा...

बोका - या लालच्या बंगल्यात पुरलेत मी...

बोक्याला प्रत्यक्ष भेटलेल्यांमध्ये फक्त कव्वा गॅन्गच होती. त्यामुळे त्यांना माहीत होते की हा बोलता बोलताच घोळ करतो. बाकीच्यांना बोक्याचा तो रंग ठाऊक नव्हता. कव्वा परोपरीने सांगत होत की याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.

लाल - अबे हट?? जुनेजाजी... हा झूठ फेकतोय...

जुनेजा - आणि या जमदाडेंचे पैसे कुठेयत???

बोका घाबरून इर्रिगेशनच्या कांबळेंकडे पाहायला लागला. कांबळेंना काही समजलेच नाही.

बोका - सांगू का??

कांबळेंनी चक्रावल्यासारखा चेहरा करत विचारले.

कांबळे - ... काय???

बोका - चंगेडियांचे अन तुमचे काय ठरले होते ते...

अचानक बोका रडू लागला. विलाप करू लागला. त्याचे रडणे अत्यंत शुद्ध होते.

बोका - मला सगळे वापरतात, नंतर पकडतात आणि मग ठोकतात... आता मरणार मी लाल.. तुझी साथ नाही देऊ शकत मी.. आपले जे ठरले होते ते अर्धेच सोडून जाणार आहे मी..

इकडे लाल दचकला आणि तिकडे कांबळे!

कव्वा आता उभा राहिला.

कव्वा - मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही याच्याशी जितके जास्त बोलाल तितके अधिक घोळात जाल. याला सरळ तुडवा आणि विचारा पैसे कुठे आहेत ते! बोलत बसू नका अजिबात!

सुलेमान आणि रघ्याने पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानून बोक्याला बुकलले. बोका किंचाळ्या फोडू लागला. अचानक किंचाळता किंचाळताच म्हणाला...

"लाल... अजून फोन करून बघ तू वेल्ह्याला.. मी जाऊन मूर्ती पुरली की नाही ते वास्तूपुरुषाची..."

लाल आणखीनच चमकला. काहीच दिवसांपुर्वी एक पुरोहित वेल्ह्याला जाऊन वास्तूपूजा करून त्याच्या बंगल्यात कुठेतरी मूर्ती पुरून आला होता हे त्याला माहीत होते. त्याला वास्तूपूजा किंवा वास्तूशांत या कोणत्याच गोष्टीला वेळ नसल्याने त्याने परस्पर कुणाच्यातरी हस्ते ही पूजा अ‍ॅरेंज करून घेतली होती. त्याचा आत्ता उल्लेख येणे त्याच्या दृष्टीने धक्का होता. आणि सर्वात वाईट बाब ही होती की अशी अशी पूजा झलेली आहे हे जुनेजाला माहीत होते.

जुनेजा चमकून लालकडे पाहू लागला.

लाल - काय झालं??

जुनेजा - हा काय म्हणतोय???

लाल - तो बेअक्कल आहे... त्याचे आपल्यावर लक्ष आहे.. त्यामुळे त्याला समजले की तिकडे पूजा झाली..

कव्वा पुन्हा उठला.

कव्वा - शेठ... अहो तुम्हाला मी सांगून पटणार नाही... तो एकमेकांच्यातच भांडणे लावतो..

पुन्हा मुहम्मद खान हसू लागला.

बोका शांतपणे अंदाज घेत बघत बसलेला होता. जुनेजाने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुन्हा रडू लागला.

जुनेजा - बाळ बोका... तू आता रात्रभर इथेच खितपत पड... मी गाडी पाठवतो वेल्ह्याला.. त्यांना पैसे मिळाले... तर तू एक दिवस जास्त जिवंत राहशील... आणि नाही मिळाले... तर तसा फोन आल्याआल्याच मेलास तू...

बोका रडता रडता थांबला...

बोका - जुनेजा... अक्कल वाटप चालले होते तेव्हा रजा काढली होतीस का तू???

हा इतका मार खाऊनही असा कसा बोलतो हेच कुणाला समजेना! मुहम्मदखान मात्र सतत हासत होता.

जुनेजा - नीट बोलला नाहीस तर प्रत्येक वाक्याबरोबर तुझा एक दात काढून या तळघरात पुरेन मी...

बोका - त्यापेक्षा या लालचे दात काढ... याने मला दहा टक्के कबूल केलेले होते... त्यामुळे लुटले मी तुला..

जुनेजा आता मुहम्मदखानबरोबर हसू लागला.

जुनेजा - बेटा.. गेली वीस वर्षे आम्ही पार्टनर आहोत... समजले??

आता कव्वाही हसू लागला. कव्वा हसतोय हे पाहून रघ्याने आणि सुलेमानने दोन दोन फटके आणखीन दिले बोक्याला! बोका किंचाळला.

मधेच थांबून म्हणाला...

बोका - हा बैल कोण आहे???

मुहम्मदखानचा असा उल्लेख जगात कुणीही केलेला नसेल. आता कव्वाही हसू लागला आणि सगळेच!

खान उठला आणि बोक्यापाशी आला. मुहम्मद खानने काही हालचाल करायच्या आतच बोका जीवाच्या आकांताने किंचाळू लागला. बोक्याची ती ससेहोलपट पाहून आता खानही पुन्हा हसू लागला.

बोक्याने हवी ती परिस्थिती निर्माण केलीच. सगळे हसत आहेत ही परिस्थिती त्याला बर्‍याच काळापासून हवी होती.

सगळे अत्यंत बेसावध असताना त्याने ते वाक्य टाकले.

"मी एकटा जेवढे कमवतो त्याच्या दसपट आपण सगळे एकत्र आलो तर कमवू शकू"

आणखीनच हसायला लागले सगळे! पण इर्रिगेशनच्या कांबळेंना हसावेसे वाटत नव्हते.

कांबळे - ऐका... ऐका... एक मिनिट ऐका... हा काय सांगतो ते ऐकून तर घ्या...

अजूनच हशा पिकला. कांबळेंना स्वतःचे गेलेले सोळा लाख तर हवेच होते. पण आणखीन काही मिळू शकत असले आणि परत नावानिराळे राहता येत असले तर हवेच होते.

कांबळे - काय रे बोक्या... काय म्हणतोयस तू...

बोका - मी आत्तापर्यंत साडे पाच कोटी रुपये जमवलेले आहेत...

या आकड्याबाबत मात्र कुणालाही संदेह नव्हता. कारण एक कोटीच्या आसपास रक्कम तर इथल्याच तिघांची मिळून गेलेली होती.

कांबळे - मग??

बोका - आज दुपारपासून तुम्ही मला मारताय... त्या नगररोडवर तर मला दहा पंधरा जणांनी मारले... जीवे मेलो असतो मी....

कांबळे - मुद्याचे बोल..

बोका - याचाच अर्थ तुमच्याकडे पन्नास तरी माणसे आहेत सगळ्यांकडे मिळून...

कांबळे - मग??

बोका - ही पन्नास माणसे मला मिळाली तर मी साडे पाच कोटीच्या ऐवजी पन्नास कोटी नाही का कमवू शकणार???

कव्वा तिरीमिरीने उठला.

कव्वा - खल्लास करा... खल्लास करा याला... हे बडबडतं फार...

पण वातावरण गंभीर झालेले होते. अचानक बोका सुलेमानकडे बघत हात झटकत म्हणाला..

बोका - हात सोड बे नरसाळ्या... महत्वाचे बोलतोय आम्ही...

सुलेमानने त्याला मारायला हात उचललाच होता तोवर जुनेजा ओरडला..

जुनेजा - थांब... थांब... त्याला इथे बसव...

गपचूप सुलेमानने बोक्याला सगळ्यांमध्ये आणून एका खुर्चीवर बसते केले.

कव्वा पुन्हा उभा राहिला.

कव्वा - जुनेजाशेठ... तुम्हाला वाटतंय मी च्युत्या बनवतोय.. हे पहा.. ए रघ्या दाखव बे?? हे पहा.. हे पहा याला सुलेमानने मारले... कारण काय?? तर बोक्याने आमच्यात भांडणे लावली... ही पहा.. या इथे एक बारीक जखम... हे काय आहे माहीत आहे???? या *****ला संधी मिळाल्यावर त्याने मला काहीतरी गुप्तपणे मारले.. हा गोरा सुतार... ए सुतार.. तुझा खांदा दाखव... हे बघा... बघा बघा... अशीच जखम इथे... हे सगळे याने केले आहे... सगळे.. असाच आमच्याही तावडीत सापडला होता... आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला.. त्याचा परिणाम आहे हा... हा माणूस भयंकर आहे.. तो मार खाऊ शकतो... पुन्हा उठू शकतो...

बोका - कव्व्या, तुला अक्कल नाही म्हणून जुनेजालाही अक्कल नाही असे वाटते का तुला???

जुनेजा खरे तर भडकला होता. पण बोक्याचा चेहरा इतका इनोसन्ट होता की त्याला बोक्याला बोलावेसे वाटलेच नाही.

बोका - जुनेजा... हा माणूस एक नंबरचा बिनडोक आहे... आणि याची माणसे याच्यापेक्षा... आ... आईगं... किती दुखतंय माझं सर्वांगं... जुनेजा... मला एक घोट हवाय...

बघता बघता बोक्याने बाटली तोंडाला लावली आणि किमान नव्वद एम एल घशात ढकलूनच खाली ठेवली. वर घटाघटा पाणी पिऊन कबाब चघळू लागला. शांतपणे तो जुनेजाकडे बघत होता.

जुनेजा - मगाशी काय बकलास ते परत बक...

जणू काही आपण एखाद्या प्रस्तावावर निर्णयच देत आहोत या थाटात बोका सगळ्यांकडे पाहू लागला. अचानक खानला म्हणाला..

बोका - ए बैला... तू जरा बाहेर बस....

मुहम्मद खानला काही सिक्वेन्सच समजेना! तो संतापाने उठला बोक्याला मारायला. जुनेजाने त्याला पुन्हा रोखले.

जुनेजा - याचा काय संबंध आहे??

बोका - हा डिपार्टमेन्टला सामील आहे..

मगाचच्या क्षणापर्यंत खाल्लेला मार, आपली येथल्या सर्वांच्या तुलनेत असलेली भीषण परिस्थिती वगैरे सर्व कही बाजूला ठेवून बोका तोंडाला येईल ते बोलत होता. जणू काही त्याच्याच दरबारात सगळे जमले आहेत.

खान - शेठ... मै इसकी खाल खेचनेवाला हूं...

जुनेजा - तू माझ्याशी बोल बोका..

आता मल्हारराव उठले.

मल्हार - शेठ.. हे सगळे तिसरेच चाललेले आहे... आपले एवढाल्ले पैसे या माणसाकडे आहेत ते सोडून आपण याच्याशी चर्चा कसली करतोय???

कव्वा - मी तेच सांगतोय...

लगेच सुलेमान आणि रघ्या पुढे झाले तसा बोका उगाचच किंचाळला.

जुनेजा - मला फक्त ऐकायचंय की हा काय म्हणतोय...बोल रे तू...

बोका - मी सगळं सांगतो... पण आधी ज्यांना यात दिलचस्पी नाही त्यांनी बाहेर जा...

कव्वा - तुझ्या बापाचा बंगलाय काय बे???

बोका - कव्वा.. तुला अक्कल नाही हे तू सातार्‍याला एकदा सिद्ध केलेले आहेस... परत परत तेच करू नकोस..

जुनेजा - कुणीही बाहेर जाणार नाही... बोका.. बोलायला तुला मी फक्त पाच मिनिटे देतोय...

बोक्याने जुनेजाकडे शांतपणे पहिले आणि तो बोलू लागला.

बोका - तुम्हा सर्व बेअक्कल माणसांना हा प्रस्ताव मी फक्त इतक्याचसाठी सांगतोय की मला माझा प्राण वाचवायचा आहे.

बोक्याच्या स्वरात एखादे भयंकर रहस्य सांगीतल्याचा, त्याचे दु:ख होत असल्याचा आणि आत्ताही गुप्तता पाळत असल्याचा असे संमिश्रे स्वर होते.

बोका - मी आजवर अनेकांना लुटले. तुमच्यातल्या प्रत्येक मूर्खालाही लुटले. माझ्याकडे पुढच्या सात पिढ्या आरामात जगू शकतील इतका पैसा आहे. कधीतरी मी पकडला जाणारच किंवा कधीतरी मी मरणारच हे मला माहीत आहे. पण तोवर मी केवळ गंमत म्हणून अशी साहसे करत आहे जसे आज केले. त्याचा परिणाम म्हणून मला मार खावा लागतो. वेदना सहन कराव्या लागतात. पण मी ते तरीही करतो कारण मी आता कोणतीही नोकरी करायला लायक राहिलेलो नाही. मी अनेकांना हवा आहे. खरे तर अनेकांना कोण हवा आहे हेही त्यांना समजत नाही. पण काहीजणांना बोका हे नाव माहीत आहे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की त्या दिवशी तुमची याच बंगल्याच्या टेरेसवर पार्टी चाललेली होती तेव्हा मी तिथेच होतो. आजच्या कारमध्ये फक्त अडीच लाखच आहेत हेही मला माहीत होते. तरीही मी हे धाडस केले ते केवळ इतक्याचसाठी की तुम्हाला माझे म्हणणे खरे वाटावे. या कव्व्याला वाटते की मी कुणाशीच प्रामाणिक नाही. पण तसे नाही. मी पैशाशी प्रामाणिक असलेल्या प्रत्येकाशी प्रामाणिक आहे. मला तुमच्यापर्यंत तसेही पोचता आले असते. मी प्रत्येकाला वेगळेही गाठले असते. पण कर्मधर्मसंयोगाने तुमची एक मीटिंग इथे झालीच! मीही विचार केला की असे अस्थिर आयुष्य जगण्यापेक्षा... ए नरसाळ्या.. ती पाण्याची बाटली दे जरा इकडे... असे अस्थिर आयुष्य जगण्यापेक्षा एखादी संघटना तयार करू.. ज्याच्यात मी प्रमुख नसेनच... उलट मी केवळ कर्तृत्व दाखवण्यासाठी असेन.. मला आता पैशाचे काहीच वाटत नाही इतका पैसा माझ्याकडे आहे... मी तुमचा सगळा पैसा परत द्यायलाही तयार होईन जर आपण सगळ्यांनी संघटना काढली तर.. नाहीच काढली तर मला हवे तर मारून टाका.. कारण मी माझ्या बुद्धीमत्तेवर मिळवलेला पैसा तुम्हाला केवळ धाकदपटश्याच्या मार्गाने परत कधीच देणार नाही... हिम्मत असेल तर तोही बुद्धीनेच मिळवा तुम्ही परत... हां.. तर प्रस्ताव... प्रस्ताव असा आहे की डिपार्टमेन्टपासून तुम्ही मला वाचवायचेत.. कोणतीही शारिरीक इजा होण्यापासून मला वाचवायचेत... मला एक स्थिर आयुष्य मिळावे यासाठी कोणत्यातरी एका गावात माझ्यासाठी लहानशी स्थावर मालमत्ता तयार करायचीत.. या सर्वाच्या बदल्यात मी महिना चाळीस लाख इतका ऐवज आणून देत जाईन.. मला त्यातले फक्त चार लाख मिळाले तरी चालतील.. जुनेजा, लाल, कांबळे, जमदाडे, कव्वा आणि खान या सर्वांनी त्यातले सहा सहा लाख प्रत्येकी घ्यावेत... समजा मी तीसच लाख आणले तर मी पैसेच घेणार नाही... चाळीस लाखाच्या खाली मी एक पैसा घेणार नाही.. चाळीस लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेत माझा सहभाग दहा टक्के असेल.. पहिल्याच कामगिरीच्या वेळेस, रक्कम मिळाली की माझा भाग घ्यायच्या ऐवजी मीच त्यात तुमचे सगळे पैसे एकरकमी घालेन आणि तुम्हाला परत करेन... यात मला धोका असा आहे की तुम्ही जर मला वाचवलेतच नाहीत तर मी पकडला जाईन.. अर्थात, मी पकडला जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करत राहेनच... पण तुम्हाला धोका असा आहे की तुमचे लुटलेले पैसे मी कदाचित देणार नाही.. आता हे लक्षात घ्या की आज जर मी अडीच लाखांसाठी या भागात आलोच नसतो तर मी तुम्हाला सापडलोच नसतो... पण मी मुद्दाम आलेलो आहे.. बघा... हा असा प्रस्ताव आहे.. घरबसल्या तुम्हाला प्रत्येकी किमान सहा लाख कॅश मिळत राहील.. आवडत असेल तर बघा... नाहीतर मला इथून सोडून द्या आणि बुद्धिच्या जोरावर येत्या एक महिन्यात माझ्याकडे असलेले तुमचे पैसे घेऊन टाका.. बुद्धीच्या जोरावर जर ते घेतले नाहीत तर मी तुम्हाला ते देऊ लागत नाही... आणि आत्ता मला मारलेत काय किंवा मारहाण केलीत काय.. ते पैसे मला मारून तुम्हाला मिळणारच नाहीत..

एक मात्र सांगतो... कांबळे साहेब काय, हे लाल साहेब काय.. सगळे प्रामाणिक आहेत... कव्वाने जर प्रसंगावधान दाखवले नसते तर आज मी तुमच्यात नसतोच... मी तुम्हाला सगळ्यांना आधीच लुटलेले आहे.. पण त्यानंतर स्वतः इथे दाखल कशाला झालो असतो मी?? मार खायला??? जरा विचार करा..

बराच वेळ सन्नाटा पसरलेला होता. बोका भकस करत आहे हे सगळ्यांना माहीत होते. पण त्याच्यावर विश्वास टाकला आणि त्याने जर तो सार्थ ठरवला तर त्याना बसल्याजागीच श्रीमंत होता येणार होते. आणि त्याने विश्वास सार्थ नाही ठरवला तर त्याला पुन्हा पकडता येणार होते.

जुनेजा - तू मागच्या मीटिंगला इथे होतास म्हणतोस.. कुठे होतास नेमका??

बोका - या बाथरूमच्या मागच्या सापटीत... सगळे ऐकले मी...

जुनेजा - पण... नुसताच प्रस्ताव का टाकला नाहीस?? मार खायची काय गरज??

बोका - शेठ.. सरळ आहे.. मी जर नुसताच प्रस्ताव मांडला असता तरी तुम्ही मला मारलेच असतेत...

जुनेजा - का??

बोका - आधीचे पैसे मिळवायला..

जुनेजा - असं थोडीच आहे?? आम्ही विचारही केला असता...

बोका - आत्ता तरी कुठे करताय विचार?? मी एवढा मार खाऊन बोलतोय तरी...

जुनेजा - बोका... तू शब्द पाळला नाहीस तर तुझी हाडेसुद्धा कुणाला मिळणार नाहीत...

कव्वा पुन्हा मधे बोलू लागला.

कव्वा - मला वाटलंच.. अजून याने येडं कसं बनवलं नाही सगळ्यांना... जुनेजा शेठ... नका हो... नका असं करू.. याला आमच्या ताब्यात द्या..

बोका - कव्व्या.. तू जरा शांत बस.. इथे मोठे व्यवहार चाललेले आहेत..

कव्वा - चामडी सोलेन तुझी आता... शेठ.. नेतो आम्ही याला जालनारोडला..

जुनेजा - पण पैशाचं काय आपल्या??

बोका - त्याचे कुठे पैसे पळवलेत मी?? पैसे तुमचे अन या कांबळे, जमदाडेंचे अडकलेत... त्यामुळेच तर तो मला मारायला घाई करतोय.. चल कव्व्या.. चल मला ने मारायला...

जुनेजा - ए थांब... कव्वा.. तू जरा एक मिनिट शांत बस... बोक्या.. जरा नीट बोल तू...

बोका - हे बघा.. नीट सांगतो आता.. नीट ऐका.. मी तसाही लुटेराच आहे... मी आजही पब्लिकला लुटतोच आहे.. माझी प्रतिमाच ती आहे.. आज मी एकटाच आहे.. तुम्ही माझी साथ दिलीत तरी मी एकटाच राहीन...

जुनेजा - हां! मला याच विषयावर यायचंय... तुला डिपार्टमेन्टने पकडले तर आम्ही नाही होय गोवले जाणार??

बोका - डिपार्टमेन्ट मला कोणत्या आरोपाखाली पकडणार??

जुनेजा - लुटीच्या...

बोका - पण फिर्यादी पक्ष कोण??

जुनेजा - नाही... ते ठीक आहे.. पण एखादवेळेस डिपार्टमेन्टने अनऑफिशियली पकडले तर??

बोका -मग अनॉफिशियली तुम्हीही माझ्या मागे नसाल का??

जुनेजा - आम्ही कसे काय येणार पिक्चरमध्ये??

बोका - पिक्चरम्ध्ये कशाला यायचंय?? पर्सेन्टेज दिले की डिपार्टमेन्ट आपल्याच बाजूने...

जुनेजा - पण आमचे आधीचे पैसे कधी देणार तू??

बोका - आपली सलग तीन ट्रॅन्झॅक्शन्स झाली की मी तुम्हाला तुमचे पैसे आणून देणार...

जुनेजा - तीन का??

बोका - एकमेकांचा एकमेकांवर विश्वास बसायला तेवढी तरी व्हायलाच पाहिजेत...

जुनेजा - तुझा आमच्यावर विश्वास बसण्याचा प्रश्नच कुठे आहे पण??

कव्वा - मी तेच म्हणतोय मगाचपासून...

बोका - गप रे कव्व्या तू... जुनेजाशेठ... तुम्ही मला आज अडकवलत तसं परत अडकवलंत तर..??

जुनेजा - आम्हालाच पैसा मिळणार असेल तर आम्ही कशाला अडकवू..???

बोका - तसंच मला सिक्युरिटी मिळणार असेल तर मी कशाला तुमचे पैसे डुबवू??

जुनेजा - मग तुझं म्हणणं काय आहे???

बोका - आज आहे डिसेंबर.. मार्च महिन्यात तुमचे एक्याण्णव लाख तुम्हाला परत.. तोवर मी एक कोटी वीस लाख मिळवेन फ्रेश.. त्यातले वाटून घ्यायचे...

जुनेजा - पैसे आम्हाला आधी पाहिजेत.. त्याशिवाय आमचा विश्वास नाही...

बोका - ठीक आहे... पैसे आणण्यासाठी मला पुण्याला जावे लागेल..

जुनेजा - एवढी दगदग करू नको रे... आमची माणसे जातील.. तू फक्त ठिकाण सांग..

बोका - माणसे पाठवाच! पण बरोबर मी राहीन...

जुनेजा - नाही नाही.. असा आततायीपणा नाही करायचा हं?? तब्येत सांभाळायला हवी...

बोका - ठीक आहे... मी प्रत्येकाला त्याचे पैसे कुठे आहेत ते खासगीत सांगेन...

जुनेजा - ते का बरं??

बोका - माझे बाकीचेही पैसे उडवतील ती माणसे...

जुनेजा - हे चिकनचे लेग पीस पाहतोस का?? असे तुझे पाय भाजून पार्टीत ठेवेन मी... आता मुहम्मद खान तुझी सेवा करणार आहे... आम्ही जरा टेरेसवर बसतो हां?? आम्हाला अशा आर्त किंकाळ्या सहन होत नाहीत...

बोका - तर तुम्हाला प्रस्ताव मान्य नाही...

जुनेजा - बेटा बोका... मी तुझी हुषारी फक्त ऐकून घेत होतो... मला कव्वाने तुझ्या सगळ्या कहाण्या आधीपासूनच सांगीतलेल्या आहेत बरं??

बोका - ठीक आहे..

सगळे उठले. सगळ्यांबरोबर शांतपणे बोकाही उठला आणि जिना चढू लागला. त्याला सुलेमानने खाली ढकलला. खाली मुहम्मद खान उभा होता. त्याने बोक्याची मान धरली आणि त्याला ओढत पुन्हा तळघरात आणले. वर तळघराचा दरवाजा बाहेरून बंद झाल्याचा आवाज आला आणि...

.... दिवसभर मार खाऊन कंटाळलेला बोका अचानक चवताळला..

खाली पडल्यापडल्याच त्याने उजव्या पायाची लाथ खानच्या सेन्टरमध्ये घातली... कळवळत खान दोन्ही हात मांड्यांमध्ये दाबत गुडघ्यावर बसला तोवर बारक्या बोक्याने जवळची एक लाकडी खुर्ची त्याच्या टाळक्यात हाणली. खानाची किंकाळी तळघराबाहेर पोचली नसावी. पुढची किंकाळी त्याने फोडू नये म्हणून लागोपाठ पाचवेळा तीच खुर्ची बोक्याने त्याच्या डोक्यात मारली. खानाच्या कवटीतून रक्त येऊ लागलेले होते. एखादे जनावर ठेचावे तसा खान पडल्यापडल्याच वळवळत होता. तोंडातून आवाज मात्र येऊ शकत नव्हता त्याच्या!

पाच मिनिटे त्याची तडफड पाहून बोक्याने खुर्चीचा आणखीन एक वार त्याच्या डोक्यात केला आणि तो जिना चढून धावत वर आला.

तळमजल्यावर असलेल्या नोकराला माहीत होते. मुहम्मद खान मारून मारून दमला की आतून दार वाजवेल. पण इतक्या लवकर कसे दार वाजले. त्याने दार उघडले तर कुणीच नाही. अचानक तेच दार त्याच्याच तोंडावर फाडकन आपटले. तो वेदना सहन करत ओरडणार तेवढ्यात बोक्याने त्याला खेचले आणि मधे पाय घालून हात पुढे ओढला. तळघराच्या आठ पायर्‍यांवरून नोकर आडवा तिडवा आपटत खाली जाऊन पडला तेव्हा बोक्याने तळघराचे बाहेरचे दार बंदही केलेले होते. टेबलवर कुणाचा तरी सेलफोन होता. त्याने तो पटकन स्विच ऑफ करून खिशात टाकला. बाहेर नजर टाकली. वर टेरेसवर कव्व्याच्या हासण्याचा आवाज येत होता. बाहेर तीन गाड्या होत्या. सगळ्या बंदच होत्या. पण एक मोटरसायकल मात्र अंगणात होती आणि तिला किल्ली असावी. बोक्याने जवळ जाऊन पाहिले. खरच किल्ली होती. ती त्याने पटकन खिशात टाकली पुन्हा बंगल्यात येऊन त्याने तीन ते चार मिनिटात जमेल तेवढी शोधाशोध केली. त्याला त्यात एक चांगला सुरा आणि दुपारचे अडीच लाखही मिळाले. वेदनांनी दुखरे झालेले शरीर घेऊन त्याने मोटरसायकल ढकलत कशीबशी बाहेर आणली आणि तशीच चालवत शंभर एक मीटरवर नेली. सर्वांग दुखत होते पण पर्यायच नव्हता. लांबून टेरेसवर सहा मुंडकी दिसत होती.

मोटरसायकलला किक मारून पाहिले तर फ्युएल भरपूर असल्याचे समजले.

बरोब्बर दहा मिनिटांनी पुणे रोडला लागला बोका... त्याने पहिले म्हणजे तो स्विच ऑफ केलेला फोन ऑन करून कव्वाचा नंबर स्मरणशक्तीला ताण देऊन आठवला. इतर कुणाचाच आठवत नव्हता.

कव्वाला त्याने तो भयंकर धक्का दिला.

आणि टोल नाक्यापाशी बोका पोचला तेव्हा...

.... खूपच गर्दी होती... पोलीसही होते...

कुणालातरी बोक्याने विचारले.. "काय झाले हो???"

"टोलनाका लुटलाय... सहा लाख कॅश गेलीय...."

ती सुवर्णसंधी ऐकून रोमांचीत झालेला बोका ताबडतोब पुण्याच्या दिशेने भरधाव जाऊ लागला..

गुलमोहर: 

बेफिकीरजी,

तुमच्या लिखाणाचा मी पंखा आहे, पण मला नाहि आवडला हा भाग. स्पष्ट लिहिल्याबद्द्ल माफ करा, पु.ले.शु.

अमित अरुण पेठे

कव्वा - शेठ... त्ये ब्येनं आहे... तुम्ही बाजूला बंगले आहेत म्हणालात ना?? आता ते ओरडतच बसेल.. >>> Lol

मस्त सिरीज सुरू झालीय ही. कॉलेजला असताना सुशिंच पुस्तक आधी कोण वाचणार यावरून आम्हा भावांत नेहमी भाडणं व्हायची. तीच उत्सुकता या बोक्याने निर्माण केलीय.

भयंकर रित्या रंगला होती कथेचा भाग मध्यंतरा पर्यत
पण शेवट थोडा हटके असता (तुमचा वकूब पाहून हे विधान करतोय ) तर मजा आली असती .

माझा पहिलाच प्रतिसाद मी फॅन झालो बोक्याचा सगळा एरिया माझ्या जवळपासचा असल्याने संपूर्ण परिसर डोळ्यासमोर तरळून जातो नगर पुणे हायवे त्यातल्या त्यात.