(कथालेखनाचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.)
पहाट अंगावर घेतच आनंद बसमधून उतरला. पौषातली प्रचंड थंडी पडलेली होती. त्याने घड्याळात पाहिलं तर अजून पाचच वाजत होते. आता घरी जायला रिक्षा केली तर रिक्षात अजून थंडी वाजेल हा विचार करुन तो पायीच घराकडे जायला निघाला.
आनंद निशाणदार, एक संगणक अभियंता. पुण्यातल्या एका संगणक प्रणाली बनवणा-या कंपनीत काम करत होता. आता त्याला नोकरीला लागून जवळपास तीन वर्षं होऊन गेले होते. जबाबदारी म्हटली तर तशी काहीच नव्हती. तेव्हा आई-बाबांनी विचार केला की करून टाकूया याचे आता दोनाचे चार! सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या ब-या! आनंदपण तसा नाकासमोर चालणारा मुलगा. कॉर्पोरेट क्षेत्रात असला तरी प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच होता.खरं तर आत्ताच्या मुली खूप स्वार्थी आहेत असा त्याचा मित्रांची प्रेमप्रकरणं पाहून ग्रह झाला होता. त्यामुळे त्या वाटेला न गेलेलंच बरं ,असा त्याने स्वत:पुरता एक नियम बनवून टाकला होता. त्यामुळे आईबाबा म्हणतील ती मुलगी बघायला तो तयार झाला होता.
आई-बाबांनी त्याचं नाव गावातल्या वधूवर सूचक मंडळात नोंदलं होतं. ते नावनोंदणी करायला गेलेले असतानांच तिथे आलेल्या दोन बायकांनी त्याचे पत्रिका आईबाबांकडून मागून नेली होती. त्यांचाच फोन आला होता की पत्रिका उत्तम जुळते आहे, दाखवण्याचा कार्यक्रम कधी करायचा? त्यासाठीच आज आईबाबांनी त्याला बोलवून घेतलं होतं.
घरी पोचला तेव्हा आई बाबा चहाच घेत होते.
"आलास! चल तोंड धू मी चहा ठेवते.आणि हा काय अवतार केलायेस? पुण्यात न्हाव्यांची दुकानं नाहीयेत का? आधी कटींग करून ये. दाढी किती वाढलीये! तुला दाढी करायला पण वेळ मिळत नाही का? अरे जरा व्यवस्थित रहावं, उद्या लग्न झालं म्हणजे असा चांगला वाटशील का? काय म्हणतील तुझ्या सासरचे लोक? ती मुलगी काय म्हणेल?" -आई.
"आई, अगं आधी चहा तर पिऊ दे, बाकी सगळं नंतर!"
चहा पिऊन तो न्हाव्याकडे जाऊन आला. आणि आंघोळ करून जे झोपला ते जेवायलाच उठला.
जेवण झाल्यावर आईने त्याला मुलीचा फोटो दाखवला. फोटोवरुन तर मुलगी ठीकठाक वाटतेय, बघूया उद्याचं उद्या! असा विचार करून तो परत झोपला.
संध्याकाळी चहा घेऊन तो मित्राकडे गेला.
"काय साहेब असे अचानक गावी? काही खास कारण? काय मुलगी वगैरे बघायला आलायेस की काय?"
"हो ना यार! उद्या आहे कार्यक्रम!"
अच्छा, कुठली आहे मुलगी?"
"इथलीच आहे, आपल्या गावातलीच!"
"कुठे राहते?"
आनंदने पत्ता सांगताच मित्र,संतोष म्हणाला, "अरे यार मी हिला ओळखत असलो पाहिजे. हिच्या घराजवळ माझी ताई राहते. ताईकडे शिवणकामाच्या क्लासला येणा-या मुलींपैकी एकीचं नावपण हेच आहे!"
आनंद लगेच म्हणाला,"चल आधी माझ्या घरी!".
दोघंही आनंदच्या घरी आले. आनंदने संतोषला तिचा फोटो दाखवला. संतोष जवळजवळ ओरडलाच,"अरे हीच ती मुलगी! एकदम शंभर नंबरी सोनं! आता हा चान्स कुठल्याही परिस्थितीत गमावू नकोस! आणि आत्ता लगेच चल माझ्याबरोबर!"
"कुठे?"
"मूर्खासारखे प्रश्न काय विचरतोयेस? ताईकडे!"
लगेच दोघेजण ताईकडे पोचले. संतोषने ताईला सांगितल्यावर ताई म्हणाली,"अरे आनंद संतोष अगदी बरोबर सांगतोय! अगदी लाखात एक मुलगी आहे." चला. म्हणजे एक बाजू तर क्लिअर झाली. बघूयात!
दुस-या दिवशी आनंदराजे उठले ते मुळी डोक्यात विचारांचं वादळ घेऊनच! आईबाबांनी त्याला ताबडतोब तयार व्ह्ययला सांगितलं. ते लोक दहा वाजेपर्यंत येणारच होते. बाबांनी आज खास या कार्यक्रमासाठी आबाकाकांना, म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाला बोलवून घेतलं होतं. ते नऊ वाजता आले. आता आनंदराजे चकाचक तयार होऊन तिच्या येण्याची वाट बघत होते.
सव्वादहा वाजला मुलीच्या मामांचा फोन आला की आम्ही तुमच्या घराच्या जवळपासच आहोत, पण नेमकं घर सापडत नाहीये. मग बाबा त्यांना घ्यायला गेले. इकडे आनंदरावांचा श्वास पार समेवर येऊन पोचला होता.
.......आणि सभेत महाराणींचा प्रवेश झाला. तिने आंबा कलरची साडी नेसलेली होती. चेहे-यावर टिपिकल स्त्रीसुलभ लज्जा. मान खाली.आनंदराव तर "वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली" अशा अवस्थेत होते. ती दारात असतांना आनंदने एकदा डोळ्याच्या कोप-यारून तिच्याकडे चोरुन बघून घेतलं. "आईशप्पथ! साला मी तर हिच्यापुढे काहीच नाहीये! काय बोलू राव! वाचाच बसलीये".आनंदरावांची मनातल्या मनात बडबड चालली होती. "यार, टिपिकल बायको मटेरिअल! आपण तर साला फर्स्ट बॉलमधे बोल्ड!". तिच्याबरोबर तिचे मामा , आई आणि लहान भाऊ आले होते. वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते बेडवरून उठू शकत नव्हते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराणी खुर्चीत बसल्या तर ते पण आनंदच्या काटकोनात! म्हणजे आनंदला तिच्याकडे बघायचं असेल तर ते पण मान वळवूनच बघावं लागत होतं. आई तिच्या आईला आणि तिला घेऊन किचनमध्ये गेली. आता आनंद जरासा रिलॅक्स झाला. मग मुलीच्या मामांनी आनंदला काही प्रश्न विचारले. नोकरी कुठे, नक्की काय काम करतात वगैरे वगैरे! आनंदने नेहेमीच्या या रुक्ष प्रश्नांची तितकीच रुक्ष उत्तरं दिली. तेव्हड्यात आई तिला किचनमधून बाहेर घेऊन आली. हातात पोह्यांचा ट्रे! तिने सगळ्यांना डिशेश दिल्या आणि शेवटची डिश घेऊन ती आनंदजवळ आली. आनंदने जसं आपल्याला ह्या व्यक्तीशी काही कर्तव्यच नाहीये अशी तिच्या हातातून डिश घेतली. एकदम थंडपणे. जराशी मजा! ती तिच्या खुर्चीत जाऊन बसले तसं आनंदने तिच्याकडे एकदम मिश्किल नजरेने पाहीलं. तिने एकदम कृतककोपाने आनंदकडे बघितलं. आनंदराव एकदम अबाऊट टर्न!
मग आबाकाका म्हणाले,"तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला!"
.............आणि याच आणि याच प्रश्नाची आनंद वाट बघत होता. त्यानं अपेक्षेने तिच्याकडे पाहिलं, तिनं अपेक्षेने तिच्या मामांकडे पाहिलं. मामांनी तिला आनंदने परवानगी दिली. दोघं किचनमधे गेले. आनंद आणि ती, दोघंही किती प्रचंड दडपणाखाली आहेत हे कुणीही न सांगता कळत होतं.
"रिलॅक्स! बी रिलॅक्स! हा काही इंटरव्ह्यू नाहीये! मुळीच दडपण घेऊ नका! तसं मी पण घेत नाहीये". आनंद तिला सांगत होता की स्वत:ची समजूत घालत होता कुणास ठावूक? "तुम्हाला वाचन आवडतं का?"
"हो."
"काय काय वाचलं आहे आतापर्यंत?" (च्यायला हा काय पुस्तकी किडा आहे की काय? -ती मनातल्या मनात )
"अभ्यासाची" (-बोंबला!)
"तुम्ही एम.ए.सायकॉलॉजी ना? मग त्यातले कुठले लेखक वेल-नोन आहेत?" (इथे माहितेये कुणाला? आणि याला काय करायचंय? आपापली कॉम्प्युटरची पुस्तकं वाच म्हणावं! की याला ते पण माहिती नाहीत.)
"डॉ. सो ऍण्ड सो,सो ऍण्ड सो,सो ऍण्ड सो," (आयला आपल्याला खरंच माहित नाहियेत हे हिला समजलं की काय?)
"डॉ. फिजॉफ काफ्फा, डॉ. दीपक चोप्रा!" (अरे, याला तर खरंच माहितीये!)
"ते पी.एच.डी साठी आहेत." (असेनाका!आपल्याला काय करायचंय?)
"ओके ओके"!(चला संपला इंटरव्ह्यू!)
"तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा!" (काय विचारू याला कप्पाळ!)
"तुमची पोस्ट काय आहे हो?" (काय सांगावं?)
"मी आमच्या कंपनीत सर्व्हर साईड डेव्हलपमेंट आणि युजर इंटरफेस डेव्हलपमेंटचं काम बघतो!"(मारला की नाही सिक्स!)
"अच्छा अच्छा!" (काय बोलला राम जाणे!)
आनंद पुण्यात परत आला. दोन-तीन दिवसांनी त्याच्या मित्राचा, रघूचा त्याला फोन आला. रघू त्याचा शाळेपासूनचा मित्र होता. सध्या तो मुंबईला नोकरी करत होता. मधून मधून दोघांचे एकमेकांना फोन होत असत.
"काय रे काय चाललंय सध्या?" -रघू.
"काही नाही यार! रुटिन लाईफ!"
"काय मुलगी वगैरे बघितलीस की नाही?"
"अरे आत्ताच बघून आलो, आपल्या गावातलीच आहे!".
आनंदला पुढे बोलू न देता रघूने त्याला काय काय घडलं ते सगळं सांगितलं! इकडे आनंद भुईसपाट!
"तुला कसं कळलं?"
"अरे साल्या ती माझी आतेबहिण आहे!"
"आयला रघ्या! सहीच ना!"
"अरे काय तू नुसता पुस्तकी किडा आहे असं तिला वाटतंय!"
"अरे यार एकतर मी प्रचंड टेन्शनखाली होतो. काय काय विचारलं देव जाणे!"
"जाऊ दे! मी बोलेन आत्याशी!"
त्यानंतर जवळजवळ एक आठवडा उलटला. त्यांचा फोन आलाच नाही. शेवटी मग आनंदच्या बाबांनीच त्यांना फोन केला.
"अहो आम्ही करणारच होतो फोन! अजून मुलीच्या काकांशी बोलणं झालेलं नाही. त्यांचाशी चर्चा करून तुम्हाला कळवतो."
"ठीक आहे" -बाबा.
त्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांचा फोन आला. "आपले योग नाहीत!"
"धन्यवाद!" -बाबा.
बाबांनी आनंदला फोनवर हे सांगून टाकलं. त्यांना वाटलं आनंद हे मनाला लावून घेईल, म्हणून त्यांनी त्याची समजूतपण काढली.
"जाऊ द्या ना बाबा... त्यात काय विचार करायचा?" म्हणून आनंदने तो विषयच बंद करुन टाकला. त्याने रघूला याबद्दल विचारलं, रघूला पण हे सगळं चमत्कारिकच वाटलं. त्याने आत्याचा बरेच दिवस पिच्छा पुरवला, पण शेवटी आनंदच्या सांगण्यावरुनच तो गप्प बसला.
त्यानंतर सहा महिने उलटले. आनंदने त्या काळात बरीच स्थळं पाहिली. कुणी आनंदला रिजेक्ट केलं तर आनंदने कुणाला! आनंदच्या एक पुस्तकात मात्र तिची जन्मपत्रिका जपून ठेवलेली होती. प्रत्येक वेळेस पुस्तक उघडलं की ती पत्रिका बाहेर पडायची. आनंदला माहीती होतं की या पत्रिकेचा आता काहीच उपयोग नाहीये. पण ती फेकून द्यायची पण त्याच्या जीवावर यायचं. तो परत परत ते पत्रिका बघत बसायचा!काय झालं असावं, असा विचार परत परत त्याच्या मनात यायचा, तो परत परत तो विचार दूर ढकलायचा.
नंतर एकदा रघूने त्याला फोन केला.
"अरे आन्द्या माझं लग्न ठरलंय!"
"सहीच!"
मग दोन्ही बाजूंनी माहितीची देवाणघेवाण झाल्यावर रघूने आनंदला विचारलं,"तू कधी करतोयेस साल्या लग्न?"
"अबे काय जखमेवर मीठ चोळतो! तुझ्या बहिणीने नाही सांगितलं ना राव!"
"अरे यार अजून तिचं पण लग्न जमलेलं नाहीये!"
"मग मी काय करू?"
"अरे चिडतोस काय?"
"मग काय करू?"
"जाऊ दे! तुला काय वाटतं?"
"मला वाटून काय उपयोग?"
"मी तुला दहा मिनिटांनी फोन करतो" -रघू.
"ओक्के."
दहा मिनिटांनी रघूचा फोन आला तेव्हा त्याचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता.
"अबे आंद्या, मी आता डायरेक्ट तिला फोन लावला होता."
"काय सांगतोस? काय म्हणाली ती?"
"अबे ती म्हणे मी नाही म्हटलंच नव्हतं! घरचे नाही म्हणाले तर मी काय करू?"
"आयला रघ्या, हे नवीनच!"
"आन्द्या मी तुझी गॅरेंटी घेऊ का? बेटा जर का फेल गेला तर लक्षात ठेव. माझ्याहून वाईट कोणी नाही मग!"
"बिन्धास्त घे रे! ही घे दिली तुला गॅरेंटी!"
आनंदचा आवाज आता खूप खुलला होता.
"आन्द्या, आता सगळं माझ्याकडे लागलं!"
"पण रघ्या, अरे एक प्रॉब्लेम आहे."
"आत्ता काय झालं?"
"अरे यार आता आईबाबा तिच्याकडे परत विचारायला जाणार नाहीत.आणि ते पण परत येणार नाहीत. दोन्ही घरचे इगो आडवे येतील. साला आणि जीव जाईल आमचा!"
"अबे तू थांब, आणि मजा बघ!".
तीन दिवस उलटून गेले तरी रघूचा फोन नाही. इकडे आनंदचा जीव खालीवर! शेवटी एकदाचा रघूचा फोन आला.
"आन्द्या, तुला या रविवारी घरी यायला जमेल का?"
"जमवू! पण तुला तुझं काम जमलं का?"
"तू फक्त सांग, जमेल की नाही!"
"अरे येतो ना!"
"बस तर मग! मला शनिवारी कॉल कर".
"ठीक आहे."
ठरल्याप्रमाणे शनिवारीच आनंद घरी आला. आईबाबांना आश्चर्य वाटलं. हा असा अचानक घरी? त्याने सांगितलं सहज आलो.
शनिवारी संध्याकाळी रघू आनंदच्या घरी आला. आनंद आला आहे हे त्याने त्याला माहितच नव्हतं असं आनंदच्या आईबाबांना भासवलं.
"काका-काकू, उद्या माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे. तर तुम्ही दोघं आणि आनंद आमच्या घरी सकाळी जेवायला यायचंय." रघू म्हणाला.
"अरे पण...."
"पण नाही अन बीण नाही. यायचंच! आन्द्या ये रे!" - रघू साळसूदपणे सांगून निघून गेला.
"अहो, काय करायचं?" आई.
"जाऊयात ना!" -बाबा.
"अहो पण तिथे ती मुलगी पण असेल ना!"
"मग असू दे ना! आपण रघूकडे जातोय! त्यानं कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हा त्याचा प्रश्न आहे. आपण काय त्या मुलीला भेटायला थोडीच जातोय!".
"ठीक आहे!"
रविवारी सकाळी आनंद आणि आईबाबा रघूच्या घरी पोचले. ते बसताहेत न बसताहेत तोच आतल्या खोलीतून ती मुलगी आणि तिचे आईबाबा बाहेर आले. दोन्ही कुटुंब एकमेकांकडे चित्राकडे बघावं तशी बघू लागली. अक्षरश: विचारशक्ती गोठली होती सर्वांची! कुणालाच कळेना आता काय प्रतिक्रिया द्यावी! या अवघड परिस्थितीतून रघूच्या आईने सुटका केली.
अचानक रघूची आई तिथे आली. तिने सगळ्यांना बसायला सांगितलं. आणि म्हणाली,
"तुमचा परिचय तर आहेच. पण तो नात्यात बदलला नाही. तो बदलावा असं मला वाटतं. तुम्ही आनंदला नकार देण्याची काही कारणं असतील, त्यांचं निराकरण करता येईल....कुणाबद्दल काहीही सांगणारे विघ्नसंतोषी लोक या जगात असतातच. त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या बोलण्यावर आपण शंभर टक्के विश्वास ठेवावा! सांगणा-याची विश्वासार्हता आपणच तपासून पहायला हवी. या सगळ्यात आनंदला आणि तिला काय वाटत होतं किंवा अजूनही वाटतंय याचा कुणी विचार केला की नाही मला माहीत नाही. पण आपल्या मुलांचं सुख कशात आहे हे त्यांना विचारलेलं बरं असतं. मला नाही वाटत हा निर्णय देतांना तुम्ही तुमच्या मुलीला विश्वासात घेतलं असेल! आणि तुमच्या काही शंका असतील तर हा सूर्य आणि हा जयद्रथ! विचारा काय विचारायचं ते! आनंदने तिला प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता.तेव्हा समोरासमोर बसून या शंकाचं निरसन का नाही केलंत?"
सगळेजण नुस्ते दिग्मूढ होऊन बसून होते. कुणालाच काहीच सुचत नव्हतं. तेव्हढ्यात रघू बोलला,"मला या दोघांशी बोलायचंय,एकत्र आणि आम्ही तिघंच असू!" दोघांच्याही आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि.............. परवानगी दिली.
रघू, आनंद आणि ती जवळजवळ तासभर एका बंद खोलीत चर्चा करत होते आणि बाकी सगळ्यांचं लक्ष ऑपरेशन थिएटरबाहेर वाट बघणा-या नातेवाईकांसारखं बंद दारावर लागलं होतं. तासाभराने तिघं बाहेर आले तेव्हा आनंद आणि तिचे हातात हात गुंफलेले होते. आता............. दोघांच्याही आईवडिलांनी जल्लोष केला. आत त्यांचा आणि बाहेर आईवडिलांचा पॅच अप झाला होता.
चांगला प्रयत्न. स्वताची कथा
चांगला प्रयत्न. स्वताची कथा आहे का?
मित्राची आहे. पण सत्यघटना
मित्राची आहे. पण सत्यघटना आहे. धन्यवाद!
आनंदला नकार देण्याची काही
आनंदला नकार देण्याची काही कारणं समजतील का?
कारण कथा छान आहे पण कारणं समजले तर कथा सुसंगत वाटेल असे वाटते.
अर्थात व्यक्तिगत असतील तर जाऊ द्या.
पण प्रयत्न छान आहे. थोडी अजुन खुलवता आली असती
छाने कथा...छान रंगवलंय...
छाने कथा...छान रंगवलंय... विशेषतः दाखवायच्या प्रोग्रॅममध्ये मुला मुलीच्या मनातील विचार... सही सही उतरले आहेत सत्यकथा असेल तर रघू आणि त्याच्या आईचे खरंच कौतुक!
खरंच चांगला प्रयत्न आहे. पुढील कथेच्या प्रतिक्षेत. पुलेशु.
कथा छान आहे... पण याआधी
कथा छान आहे...
पण याआधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते आहे...
चिमुरी, ही कथा तुम्ही इथे
चिमुरी, ही कथा तुम्ही इथे वाचली असेल.
http://aadityawrites.blogspot.com/
हा माझाच ब्लॉग आहे. ही मी माबोवर पुन:प्रकाशीत केली आहे! धन्यवाद चिमुरी आणि deramgirl!
पहीला प्रयत्न चांगला आहे.
पहीला प्रयत्न चांगला आहे.
धन्यवाद prafullashimpi, जागू!
धन्यवाद prafullashimpi, जागू!
छानै प्रयत्न..अजून खुलवता आली
छानै प्रयत्न..अजून खुलवता आली असती का??
कथा आवडली. पुलेशु. कथा छान
कथा आवडली. पुलेशु.
कथा छान आहे पण कारणं समजले तर कथा सुसंगत वाटेल असे वाटते. >>> अनुमोदन
अर्थात व्यक्तिगत असतील तर जाऊ द्या. >> यालाही अनुमोदन
अफलातुन कथा छान आहे..........
अफलातुन कथा छान आहे..........
वर्षू नील , निंबुडा , सचिन
वर्षू नील , निंबुडा , सचिन राव धन्यवाद! पुढल्या लेखनात जरूर कथा खुलवण्याचा प्रयत्न करेन!
मस्त
मस्त
पहीला प्रयत्न चांगला
पहीला प्रयत्न चांगला आहे.....
कारणं समजले तर कथा सुसंगत वाटेल असे वाटते. >>> अनुमोदन
अर्थात व्यक्तिगत असतील तर जाऊ द्या. >> यालाही अनुमोदन
रोहित, चातक मनःपूर्वक
रोहित, चातक मनःपूर्वक धन्यवाद!
कथेतले संदर्भ नीट कळले नाहित.
कथेतले संदर्भ नीट कळले नाहित. मुलीच्या घरच्यांनी नकार का दिला? आनंद आणि मुलीमध्ये काय बोलणे झाले? कसं काय पॅच अप झालं? काहिच कळलं नाही.
पहिला प्रयत्न असेल तर ठिक आहे.
पुलेशु.
धन्यवाद चंदन!
धन्यवाद चंदन!
झकास्स्स्स्स्स.........
झकास्स्स्स्स्स.........
चांगला प्रयत्न आहे
चांगला प्रयत्न आहे