आक्काताईची ओळख हा एक पुसला गेलेला अनुभव आहे. एक मात्र खरे की मी तेव्हा ७वीत असेन आणि आम्ही घर बदलून नव्या घरी राहायला गेलो.एकदा सरकारी नळावर (त्याला तेथे चावी म्हणतात) पाणी भरत असताना आक्काताईने मला हाळी घातली .. ए पोरा हिकडं ये. नवीन आलास व्हय गल्लीत ? मी आपले होय म्ह्टल आणि गप्प झालो. मला कळेना हिला कसे कळले मी नवीन आहे. ती फिस्स्कन हसली आणि म्हणाली म्या हतच रहातो .. त्या वैद्यबुवाच्या शेजारी.. ये दुपारी . मी थक्क झालो. कपाळावर मळवट.. नउवारी साडी.. गळा आणि हात ओकेबोके. पण सतत हसरा चेहरा. मी एकदा दुपारचा तिच्या घरी गेलो म्हटलं बोलावलो आहेच तर बघु तर खर. मला कळल तिचा नवरा वयाने बराच थोराड.. कुठल्याशा फोटो स्टुडियोत फोटोग्राफर म्हणून कामाला. संसार जिकीराचा होता हे दिसतच होते. तिने कुठुनतरी दुध आणून चहा केला एकच कप आणि ४ बिस्किटांचा पार्ले पुडा समोर ठेवला. मी एकट्यानेच चहा घेतला. तिला विचारले तर म्हणाली नाही जेवायचं आहे अजून.. त्यावेळी मला हे कळल नव्हत की ती एक काटकसर् होती. कारण दुध उसनवारी ने आणले होते.
मी आक्काताइच्या घरी गेलो ही गोष्ट गल्लीत पसरली आणि गरत्या बायकानी एका दुपारी सांगितले तिच्याकडे जात जाउ नकोस्.मला त्याचा अर्थ कळला नाही. कळण्याचं वयही नव्हते. पण ही एक वेगळी वल्ली आहे अस वाटल. तरी तिच्याकडे गप्पा मारण्याचा मला लळा का लागला ते आजही ४०वर्षानंतर कळलेले नाही. एकदोनदा घरच्यानी सांगायचा प्रयत्न केला पण फरक पडला नाही. हळूहळु माझे तिच्याकडे जाणे कमी झाले तेव्हा एक्दा तिने मला रस्त्यात आडवले आणि विचारले .. का येत नाहिस माझ्याकडे? ती तंबी किंवा धमकी होती हे कळले नाही. मी झालेला प्रकार सरळपणे सांगितला .. तुझ्याकडे आले की गल्लीतल्या बायका बोलतात आणि आईला सांगतात आणि आई रागावते. ती भडकली आणि तू जा संध्याकाली बघते आणि मग सांजच्यावेळि खास कोल्हापुरी भाषेत सार्या गल्लीतील बायकांचा हिशोब झाला. झालं गल्लीतील बायका मला टाळू लागल्या. नंतर कळले की आक्काताइला मूल बाळ नव्ह्ते म्हणून तिचा सर्वजण रागराग करीत. मी गॅलरीत उभा असलो की ती खालुनच मोठमोठयाने माझ्याशी गप्पा मारत असे. सगळ्यांना ह्या नात्याचे कोडे पडले होते. मी देखील तितक्याच शांतपणे तिच्याशी गप्पा मारत असे. यथावकश तिला दोन मुले झाली. मला दोन्ही बारश्याना हक्काचे आमंत्रण होते मी देखील गेलो. पुढे मुलगा मोठा झाला तसे त्याचे नाव 'बटाटा' ठेवले. मी म्हटले .. हे गं काय आक्काताई हे कसले नाव? ती म्हणाली पोर नवसा सायसानं झालंय असलं नाव ठेवलं की जगतं ते. माझं एक मुल मागे गेलं होते. मी सुन्न झालो. मी वयात येउ लागलो तसं एकदा पुन्हा एकदा दुपारचं सेशन घेतलं. म्हणाली पोरा ..'तू बामणाचा, गोरा,गोमटा पोरगा हायेस. या पोरी लई वंगाळ असत्यात मी सांगितल्याशिवाय लगीन करायचं नाही. ' मला आश्चर्य वाटायचं. माझ्यावर अधिकार सांगणारी ही कोण बया? पण आज जाणवतं तिची माझ्यावर लेकरासारखी निर्मळ माया होती.
एकदा गल्लीच्या कोपर्यावर मी एका तरुण मुलीशी बोलत होतो. तेवढ्यात आक्काताई कडमड्ली .. तिने त्या मुलीला आपदमस्तक न्याहाळले आणि तिच्या तोंडावर विचारले ही कोण रं बया? लग्न करणार हायेस का काय हिश्याशी.? आम्ही दोघे गार.. संद्याकाळि सार्या गल्लीत वार्ता पोरगा एका फटाकडी बरोबर बोलत होता. आइने घरी शाळा घेतली. पण सुटका झाली. दुसर्या दिवशी पाण्याच्या चावीवर पुन्हा आक्काताइ तोंडाला पदर हसत उभी ... काय रं पोरा कालची बाहुली कुठाय? मी जाम भडकलो होतो. मी तिला म्हटले आक्काताई तुला कोणी सांगितलं चौकश्या करायला? तशी ती डायरेक्ट जवळ आली आणि माझ्या कानशिलावर थोपटत म्हणाली .. पोरा या वयात काळजी वाटते रे कुठ पाय वाकडा पडायला नको. तू लई भोळा हायेस या बाहुल्या संसार न्हायी करायच्या निस्त्या उंडारतील. मी गप्प झालो.
दिवस जात होते. मला पुण्याला नोकरी लागली तशी माझी भेट कमी झाली. कधिमधी घरी गेलो तर ती आपुलकीने विचारपूस करायची.यथावकाश लग्न झालं आणि आक्काताई रस्त्यातच भेटली. पोरा मला विसरलास? लग्नाला बोलावलं नाहीस ? दुपारी ये घरी तुझ्या लक्ष्मीला घेउन ओटी भरू या. आम्ही दोघेही दुपारी तिच्या घरी गेलो चा प्यायलो आणि ओटी भरून झाली तशी तिनं डोळ्याला पदर लावला. का ते अजुन्हि कळल नाही. मला म्हणाली पोरा माझ्या मुलांकडं बघत रहा. मी म्हटल आक्काताइ असं का बोलतीस? ती फक्त हसली. म्हणाली .. मला तुझ्याशिवाय कोण हाय हक्काच? नंतर काही महिन्यातच तिच्या निधनाची बातमी कळली मी सुन्न झालो. आज मागे वळून पाहतो तेव्हा अजुनही मला हे कळत नाही की तिचं आणि माझं नात कोणते होते?
आक्काताई
Submitted by सुनिल जोग on 17 December, 2010 - 01:46
गुलमोहर:
शेअर करा
जोग साहेब काही नात्यांचा
जोग साहेब काही नात्यांचा धांडोळा घेताच येत नाही. काही माणस नात नसताना का जीव लावतात आणि काही माणस नात असुन कोरडी का असतात याचा संबंध मागील जन्माशी असावा.
तिचं आणि माझं नात कोणते होते?
तिचं आणि माझं नात कोणते होते? >>> कदाचित हे तिला माहिती असावं. साधी सरळ वाटली आक्काताई. जोगजी, योगायोग म्हणा, व्यक्तिमत्व, स्वभाव वेगळे असले तरी नावं सेम आहेत. मी सेम नावाची कथा लिहीणार आहे.
मनापासून लिहिलेत... आवडले..
मनापासून लिहिलेत... आवडले.. पण एक प्रश्न पडला.. तुम्ही तिला तुमच्या लग्नाचे आमंत्रण दिले का नाही ??
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
छान लिहिलंय...आपल्याकडे
छान लिहिलंय...आपल्याकडे बायकाच बायकांना जीव नकोसा करून सोडतात...केवळ मुल लवकर किंवा झालेच नाही म्हणून...
आवडलं सुनिल .
आवडलं सुनिल .
काही माणसं अशीही असतात !
काही माणसं अशीही असतात !
याला रक्ताच्या नात्यापलिकडील
याला रक्ताच्या नात्यापलिकडील नातं म्हणावं की अजून काही नाही सांगता येत.
छान लिहिलेय.
बाकी अविवाहित असणे किंवा निपुत्रिक असणे
यांच्याकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो हे नक्की.
कधी कधी त्यांना जीवन नकोस करून टाकतात.
ह्म्म्म्म्म!! तुम्ही आक्काला
ह्म्म्म्म्म!! तुम्ही आक्काला लग्नाचं आमंत्रण का बरं नाही दिलं??
आक्कांच वर्णन छान लिहिलय..आवडलं
छान लिहिलय..आवडलं. तुम्ही
छान लिहिलय..आवडलं.
तुम्ही आक्काला लग्नाचं आमंत्रण का बरं नाही दिलं?? >>>> हा प्रश्न तर मलाही पडलायं.
ग्रेट .
ग्रेट .
छान लिहिलय. आवडली कथा.
छान लिहिलय. आवडली कथा.
काही व्यक्तींचा आपल्याशी
काही व्यक्तींचा आपल्याशी कुठल्या जन्माचा ऋणानुबंध असतो समजत नाही. लिहिलंय छान.