माझे इम्प्रॉव्ह खतखते

Submitted by नीधप on 16 December, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

खतखत्याच्या विविध रेसिपी आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा, भट आणि सारस्वत आणि मराठा अश्या प्रमाणे फरक होतात. मी आपला माझ्यापुरता सुवर्णमध्य इम्प्रॉव्ह केलाय.

साहित्य
सर्व प्रकारचे कंद - सुरण, रताळी, अर्वी, करांद (वेलावरची आणि जमिनीतली दोन्ही),
चिना आणि माडी (हे दोन्ही कंद मी गोव्यात आणि वाडीत पाह्यलेत. त्याला मराठी नाव आहे का माहित नाही.)
अजून आठवतील ते कंद.
मक्याचं कणीस तुकडे करून (दाणे काढायचे नाहीत), कच्ची पपई, कच्चं केळं, दुधीभोपळा, थोडा कच्चट तांबडा भोपळा, नीर / विलायती फणस (याचे अक्षरशः बटाट्यासारखे तुकडे होतात.)
भरपूर ओला नारळ.
थोडासा गुळ.
आमसुल
मसाल्याचे पदार्थ - हळद, धणे, तिरफळं, हिरवी मिरची नसल्यास. लाल सुकी मिरची.
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. सर्व कंद पाण्यात घालून माती काढण्यासाठी ठेवावेत. वेलीवरची करांदं छोटी असतील तर अजिबात चिरू नयेत. तशीच राहू द्यावीत. बाकी वस्तूंचे तुकडे करावेत. आपण कुकरमधून शिजवून काढणार असल्याने अगदी बारीक चिरू नये. कच्ची पपई, कच्चं केळं आणि कच्चट भोपळ्याची साले काढून तुकडे करावे. मक्याच्या कणसाचे एक-दीड इंच जाडीच्या चकत्या करायच्या. दाणे काढत बसायचे नाही. बेबी कॉर्न वापरणार असलो तर आख्खेच.

२. तिरफळं घ्यायची आणि एका वाटीत भिजवत ठेवायची,

३. ओला नारळ, हळद, धणे आणि लाल सुकी मिरची वापरणार असल्यास ती असं सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हिरवी मिरची वापरणार असाल तर ती या वाटणात घालायची नाही.
कोरडं खोबरं जे वापरतात ते हे सगळं मिक्सरमधून काढून मग किंचित परतून घेतात. त्याने एक वेगळा खमंगपणा येतो. कोरडं खोबरं वापरायचं असेल तर लाल सुकी मिरचीच बरी.

४. हे वाटण प्रेशर पॅनमधे ओतायचं. थोडं पाणी, गूळ, आमसुल आणि हिरव्या मिरच्या आख्ख्या टाकून जरा उकळी येऊ द्यायची. मग सगळे चिरलेले कंद बिंद, भाज्या बिज्या सोडायच्या त्यात. पाणी घालायचं. पॅन बंद

५. एक शिट्टी-गॅस लहान-दोन शिट्ट्या-गॅस बंद- वाफ गेली की उघडून त्यावर तिरफळाचं पाणी ओतायचं. मीठ घालायचं आणि सारखं करत एक उकळी आणायची. (कुकर कंपनीप्रमाणे शिट्या बदलतील पण बेसिक डाळ-तांदूळ-बटाटा शिजायला जे सेटिंग लागतं ते वापरावे.)

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

khatakhate.jpg

वाढणी/प्रमाण: 
हा प्रकार १-२ लोकांसाठी होतच नाही कधी.
अधिक टिपा: 

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

भाताबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरही मस्त लागतं.
तांदळाच्या भाकरीबरोबरही चांगलं लागत असावं असा अंदाज आहे.

माहितीचा स्रोत: 
ओळखीपाळखीचे लोक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु रेसिपी.
मला तिरफळं कोणीतरी आणून द्या पाहू...>>>
मला तिरफळं, सुरण, करांद, चिना, माडी, दुधीभोपळा, नीर/विलायती फणस द्या कुणीतरी Proud
मलाही अल्पनाबरोबर तुझ्याकडे येऊन खावं लागेल Happy

आज मी केलंय पण इतकं सांग्रसंगीत नाही त्यामुळे त्याच्या फोटो मधे मजा नाही. परत केल्यास टाकेन.
फोडणी अजिबात नसते. एवढा नारळ घातल्यावर अजून तेल कशाला? Happy
अगं अल्पने, यातले सगळे प्रकार सिंधुदुर्ग-गोवा भागातले आहेत.
मंजू, मासे खाणे-बनवणे एक्स्पर्ट ला विचार. ठाण्यात नक्की मिळत असणार तिरफळं.

मस्त आहे रेसिपी..
मला ख आणि फ दोन्हीही जीवापाड प्रिय आहेत Happy
मंजे, तिरफळे मिळतील की ठाण्यात. मालवणी मसाल्याचे एक्स्च्लुसिव दुकान असेल तर मिळतील. नाहीतर मी आहेच की....

आम्हि गोव्याचे भटजि लोक ह्यात मुळा ,नवल्कोल सोलाणे पण घालतो. तसेच कान्दा सुके खोबरे व धने जिरे भाजुन वाटुन लावतो. कान्दा खोबरे ग्यास वर भाजतो सरळ. काळे होइपर्यन्त.

सोप्पे आहे कि. मी किनै पर्वाच एक क्यूट प्रेशर पॅन घेतले आहे. दोन लोकांसाठीचे. स्टील ब्वाडीवाले त्यात करून बघता येइल. नुसते वाटीत घेउन खायला पण मस्त आहे. धन्स

होय.. मी तरी अशीच करते. तिरफळे घातल्यामुळे एक वेगळीच मिरमिरीत चव येते. तिरफळांशिवाय ख हे ख वाटत नाही.

अय्यो!! साधनेला विसरलेच की.. ठाण्यात बघते गं तिरफळं, नाही मिळाली तर एन्व्हलपमध्ये घालून पाठवून दे मला Wink

तुम्हि सान्गितल्याप्रमणेच सर्व क्रुति. पण २ कान्दे + अर्धि वाटि खोबरे घेउन ग्यास वर चक्क जाळतो. काळे होइपर्यन्त. मग त्यात का़ळि मिरि तिन किन्वा ४ व थोडि लाल सुकि मिर्चि, व ते पाणि घालुन वाटतो. मस्त चव येते त्याचि. ह्याशिवाय ओला नारळ असतोच. मुळा आणि नवल्कोल च्या मोठ्या फोडि घाल्तो शिवाय. तोहि छान लागतो.

नी.......मी पण यातले अर्धे अधिक पदार्थ कधीच वापरले नाहीयेत. माझी पण एक डिश राखून ठेव Happy

आमच्याकडे अंगारकी चतुर्थी ला हा प्रकार असतोच असतो. वरण भात आणि मोदकाबरोबर छान लागतो.
यावेळचा निकष म्हणजे गणपतीला आवडणार्‍या / चालणार्‍या (?) भाज्याच वापरायच्या. त्या कमीत कमी सात लागतात.
लाल भोपळा, अरवी, गवार, तोंडली, सुरण, ओले शेंगदाणे, मटार असतात सहसा. आणि दुसर्‍या दिवशी जास्तच छान लागते. वाटण मात्र गंधासारखे बारिक हवे.

तुझी पाककॄती लिहिण्याची पद्धत एक्दम धांसू आहे..सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं.

हे वाटण प्रेशर पॅनमधे ओतायचं. थोडं पाणी, गूळ, आमसुल आणि हिरव्या मिरच्या आख्ख्या टाकून जरा उकळी येऊ द्यायची. मग सगळे चिरलेले कंद बिंद, भाज्या बिज्या सोडायच्या त्यात. पाणी घालायचं. पॅन बंद>> हे स्पेशली आवडलं..
जास्तंचा गोंधळ नं घालता सांगितलेली पाककृती..:)

माझी मुळ रेसिपी अशीच आहे जवळपास पण मी कुकरला लावत नाही. झाकण उघडल्यावर कधीकधी वाटण वेगळे आणि कंद वेगळे झाल्यासारखे वाटतात. मी मंदाग्नीवर शिजत ठेवते. अर्थात घाईच्या वेळी असले नखरे जमत नाहीत. तिथे कुकरच हवा.

मंजु, ठाण्यात जांभळी नाक्याला के जी वनगे आहेत त्यांच्याकडे त्रिफळ मिळतील. ते साधनाच्या म्हणण्याप्रमाणे मालवणी मसाल्याचे एक्स्च्लुसिव दुकान आहे. मी माझा मालवणी स्टॉक तिथुनच भरते.

मंद आचेवर शिजत ठेवल्यावर त्याचे चवही मस्त येत अस्णार. जास्त मुरलेली.
ते मंद आचेवर ठेवल्यावर शिजताना जो खदखद आवाज येतो त्यावरून खतखते असं नाव पडलं असं मी कुठेतरी वाचलं होतं नुकतंच.

तिरफळं आता कुठल्याही मोठ्या वाण्याकडे मिळतात. आमच्या घरी पण मंदाग्नीवर थेटच शिजवतात. (आईच्या मते गणपतिला कूकर आवडत / चालत नाही. )

आमच्याकडे हे खतखते गणपतीला नैवेद्य म्हणून करतात. बाप्पाचा नैवेद्य म्हणून २१ भाज्या घालायच्या. नीरजाने सांगितलेल्या भाज्या झाल्याच. शिवाय बांबूचे कोंब, पावट्याचे दाणे, डबल बी, चवळीचे दाणे, मुळा, तोंडली, वांगे, सिमला मिरची,गवार, मटारचे दाणे,शेवग्याच्या शेंगा पण घालतो.
कृती नीने लिहिल्याप्रमाणेच आहे, असे आईने सांगितले. फक्त धणे आणि आमसुल घालत नाही आई.

हा प्रकार १-२ लोकांसाठी होतच नाही कधी. >>>> अगदी अगदी. बनवतानाच दोन दिवस पुरेलसा बनवायचे. दुसरे दिवशी मुरलेले अजूनच मस्त लागते. त्यातली कणसं तर यम्मी लागतात अगदी. Happy

मस्त ग नी. क्या याद दिला दी तुमने!!!! Happy
आईच्या मागे लागून लगेच उद्या करणार आहे. Happy मग अजून काही वेगळे असल्यास लिहीन.

Pages