जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)
राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट
मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥१॥
कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार
बोलीचालीत अंगार सखे, भरला गं
तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥२॥
राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते?
सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते
नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला
मुरलीचा मोह नच पाडी रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥३॥
कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग
वेणुच्या नादाने का न होशी दंग?
वेडीच्या वेडलगे, जिवीच्या जिवलगे
शुन्यात ब्रह्म कसा भरला गं?
तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥४॥
राधा : निळे-निळे आकाश, निळा माझा शालू रे
हिरवे हिरवे शिवार, हिरवी किनार रे
खोडीच्या खोडकरा, प्रितीच्या प्रियकरा
प्रितीची चाल नगं चाली रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥५॥
कृष्ण : ना निळे अंबर, ना हिरवी किनार गं
वितभर दुनियेचा, मोह पसारा गं
तन-मन मज देई, रज-तम दूर नेई
प्रितीने भोग सारा सरला गं
तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥६॥
राधा : तन-मन कृष्णा तुला, समर्पित केले रे
रज-तम मुरलीधरा, आज वर्ज्य केले रे
येरे येरे कान्हाई, प्रितीचा पंथ दावी
प्रणयाचा खेळ आज खेळी रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥७॥
कृष्ण : अशा रितीप्रितीने, शरण कुणी येईन
प्रितीचा खेळ खेळून, पंथ तया दाविन
अरविंद गीत गात, नाद घुमे गोकुळात
प्रितीने जीव सारा तरला गं
तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥१॥
गंगाधर मुटे
....................................................
(१९८० चे सुमारास लिहिलेली गौळण)
छान
छान
Romantic feel
Romantic feel
धन्यवाद, आपुलकीने भावना
धन्यवाद,
आपुलकीने भावना कळविल्या त्याबद्दल आभारी आहे.
१९८० चे दरम्यान मी लिहिलेल्या फ़क्त ६ गौळणी आहेत.
या निमित्ताने मला असे जाणवले की हा काव्यप्रकार तसा फ़ारच अपरिचित आहे. असो.
आज टाकली ती जुन्यापैकी शेवटली गौळण.