"चि. सुधीर, सौ. विद्या, अनेक आशीर्वाद.
आशा आहे की आत्तापर्यंत पोलिसाची चौकशी पूर्ण झाली असेल आणि माझ्या दोन ओळींची चिठ्ठीने त्यांचं समाधान झालं असेल. पण मी हे पाऊल का उचललं त्यामागचा हेतू तुम्हाला विस्तारानं सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचा हक्कदेखील. म्हणून हे पत्र.
माझ्या आयुष्यात मी अनेक वृद्ध पाहिले. मी स्वतःही ६२ वर्षाची आहेच, म्हणजे म्हातारीच की. पण ह्याहीपेक्षा म्हातारे लोक- तुझ्या बाबांची आजी, माझी आजी, तुझे दोन्हीकडचे आजी-आजोबा आणि ह्यांच्या आणि माझ्या अनेक मावशा, काका-काकू आणि अगणित नातेवाईक. अपवाद वगळता, सर्वांना भरपूर आयुष्य लाभलं, लाभतं आहे. पंच्याहत्तर, ऐंशीच्या घरात पोचेपर्यंत सगळ्यांना आयुष्य लाभलं. मात्र सगळ्यांनाच आरोग्यपूर्ण आयुष्य लाभलं असं म्हणता येणार नाही, हे नक्की. पहिली उभारी गेल्यावर, वय सरल्यावर सगळे लोक थकत थकत, हळूहळू खंगत, जीर्ण होत, शेवटी असाध्य रोग जडून, वेदना सहन करत, मुला-नातवंडांवर अवलंबून राहून शेवटी गेले. सुटले हा शब्द जास्त योग्य राहील. तुझ्या पणजीचं उदाहरण तुझ्या अगदी डोळ्यासमोर आहे. मी लग्न होऊन आले ह्या घरात तेव्हापासून त्या अंथरूणावर खिळलेल्या, त्या तू सुमारे बारा वर्षाचा होईस्तो जगल्या.. त्यांचं वय घरात नक्की कोणालाच माहीत नाही. पण कसलं ते आयुष्य त्यांचं? अक्षरशः पडून असायच्या. सगळं अंथरूणातच. त्यामुळे की काय, पण जीभ महातिखट आणि लक्ष चौफेर! एक क्षण त्यांनी सासूबाईंना चैन पडू दिलं नाही आणि मलाही. शेवटी शेवटी तर त्यांचे अगदी हाल झाले. सर्व अंगभर चिघळलेल्या जखमा, त्यामुळे त्यांची होणारी तडफड, ते सहन न होऊन त्या विव्हळायच्या, आणि म्हणून त्यांना देत असलेली गुंगीची औषधं! असं वाटायचं की देव त्यांना ह्यातून सोडवूदे एकदाचा. अत्यंत कृश झालेला देह, अंगात औषधाचा परिणामही होईल इतकी शक्ती नाही. शेवटी डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांची औषधंही बंद केलेली. असो.
तुझ्या आण्णाआजोबांच्या नशीबीही थोडेफार हेच भोग आले, पण एक बरं, की दोनच वर्ष बिचारे अंथरूणावर होते. सासूबाई त्यांचं करून करून थकल्या बिचार्या. त्यांच्या मनाला तुझ्या आजोबांचं आजारपण मानवलंच नाही. दु:खी, कष्टी होत त्यांची सेवा करत, हवं-नको बघत त्यांनी त्यांचं केलं. आजोबा आधीच तापट, त्यातून सासूबाईंच्या हातून काही कमी-जास्त झालं की फार संतापायचे, हात-पाय काम देत नव्हते, त्यामुळे अजूनच रागावायचे. तेही असेच मृत्यूशी दीर्घ झुंज देत गेले. त्यांच्यानंतर सासूबाईंनी फार दिवस काढले नाहीत, त्या खचल्याच होत्या. तीन वर्ष कशीबशी काढली त्यांनी, पण तीही भ्रमिष्टावस्थेत! त्या झोपून नव्हत्या, पण सतत लक्ष ठेवावं लागायचं.. सतत धसका असायचा- ह्या आता काय करतील?
माझ्या माहेरीही थोडीफार हीच कथा. माधवदादा-अलकावहिनी, मनोहरदादा-वसुधावहिनी ह्यांनी खूपच केलं आई-बाबांचं. उपचार, औषध, डॉक्टर, सेवा कशालाच कमी पडू दिलं नाही. पण निसर्गनियमानुसार दोघे हळूहळू विझत गेले. आपल्या घरी सतत एक आजारी माणूस होतंच, त्यामुळे माझ्याकडून त्यांची फारशी सेवा होऊ शकली नाही. तेही दोघे शेवटच्या दिवसात बरेच दिवस आजारी पडून, हॉस्पिटलचा वार्या करत, तब्येतीचे रोजचे उतार-चढाव सोसत गेले.
ही झाली अगदी जवळची नाती. ह्या सगळ्यांची आजारपणं अगदी जवळून पाहिलेली, अनुभवलेलीही अर्थातच. सर्वात अचंबा मला तेव्हाही, आणि आत्ताही ह्याचा वाटतो, तो त्यांची जीवनाची आसक्ती पाहून! कितीही आजारी असले, त्रासात असले, तरी वैतागातून आलेला एखादा सूर वगळता, यातले कधीही कोणीही एकदाही म्हटले नाही, की बास आता हे जीवन. तुझ्या पणजीबाई तर खरंच कळस होत्या ह्या बाबतीत. संपूर्णपणे परावलंबी होत्या त्या, शरीराचा बोळा झालेला, इतके त्रास व्हायचे, तरीही कोणती आसक्ती त्यांना जगवत होती काय ठाऊक?
हे सगळं कळत-नकळत माझ्या मनावर कुठेतरी बिंबत होतंच. हसतं खेळतं घर आजारी माणूस असलं की कसं बघता बघता कोमेजतं हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. आधी पणजीबाईंच्या आणि मग तुझ्या आजोबांच्या आजारपणामुळे आणि नंतर सासूबाईंवर लक्ष ठेवायच्या नादात माझं कितीतरी लक्ष त्यांच्याकडेच असायचं. ह्या भरात, तुझ्याकडे, सुनिताकडे, ह्यांच्याकडे माझं अनेकवेळा दुर्लक्ष झालं. अनेकवेळा त्यांच्यावरचे राग, दु:ख, अस्वस्थता तुमच्यावर मी काढत असे- तुम्हा मुलांवर रागावत असे, ह्यांच्यावर चिडत असे. हे चूक आहे, तुमच्यावर अन्याय आहे असं तेव्हाही उमजत होतंच, पण वळत नव्हतं. तुम्ही दोघंही खरंच गुणी पण. हेही. एका शब्दाने कधी उलटून बोलला नाहीत, की माझ्याशी अबोला धरला नाहीत. कोणताही छोटा-मोठा आनंदाचा क्षण असो, सण-समारंभ असो, त्यावर एक सावट सतत असे.. आजारी सावट. कुठेही जायचं असो, त्याची जमवाजमव कशी करता येईल, त्यासाठी घरी कोणाला बसावं लागेल, बाहेर काय सांगावं लागेल ह्यावर चर्चा आधी घडायची. स्वतंत्र, मोकळेपणाने, निर्भेळ आनंदाने कुठे गेलो आहोत, जिथे गेलो तिथे नि:शंक मनाने वावरलो आहोत, असे कधी घडले नाही, कारण निम्मं लक्ष घराकडे लागलेलं- तिथे सगळं आलबेल असेल ना? ही चिंता. पैशाची बाजू तेव्हा फारशी भक्कम नव्हतीच. कित्येकदा औषधांना, डॉक्टरच्या फीयांना पैसे द्यायचे म्हणून शाळेव्यतिरिक्त हौस म्हणूनदेखील तुमच्यावर खर्च करता आला नाही. तशा म्हटल्या तर छोट्या गोष्टी, पण खोल मनात घर करून बसणार्या.
अगदी तेव्हापासूनच मी निश्चय केला होता सुधीर, की आपण असं लोळागोळा होऊन आयुष्य फरपटत न्यायचं नाही. धडधाकट असताना, सर्व काही आलबेल असताना, समाधानाच्या शिखरावर असतानाच ह्या जगाचा निरोप घ्यायचा. मी आजारी आहे, म्हणून तू, विद्या, सुनिता, शेखरराव, मुलं सगळे चिंतातूर आहात हे मला कधीही सहन होणार नाही. जे माझ्या वाट्याला आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ नये असा माझा हट्ट आहे. ह्याबद्दल मी एका शब्दानेही कोणाकडेही, अगदी ह्यांच्याकडेही वाच्यता केलेली नव्हती. पण मी मनातून ठाम आहे. काय त्या मृत्यूला घाबरायचं? आज मी ६२ वर्षाची आहे. सगळं सुरळित झालेलं आहे. तुम्ही मुलं तर गुणी होतातच, पण विद्या, शेखररावही लाखात एक मिळाले. भरलेलं घर आहे, हुशार, गुणी नातवंडं आहेत. अजून काय पाहिजे? आई म्हणायची, "आयुष्यात जसा प्रत्येक गोष्टीचा योग असतो, तसा मृत्यूचाही योगच असतो. तो मागून येत नाही, यायचा तेव्हाच येतो"- हे मला कधीच पटलं नाही! जसं माझं जगणं माझ्या हातात आहे, तसा मी मृत्यूही मला हवाय तेव्हाच आणेन.
शेवटी नशीबानेही साथ दिलीच. ही वेळ अचानक, अनपेक्षितपणे आली. पण मी तिला हसतमुखाने आणि अगदी शांततेने सामोरी जात आहे. तुझ्या बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते दोनच दिवसांपूर्वी अचानकच काही कल्पना न देता गेले. खरंच सुखी जीव. आत्ता होते, आणि आता नाहीत! काही त्रास नाही, ना वेदना, ना दु:ख! एक क्षण मी स्तंभित झाले, चरकलेही. पण जाणीव होताच, सावरले. मी लोळागोळा होऊन पडलेय आणि हे माझ्या उशापायथ्याशी आहेत, ही कल्पना त्याहून भयंकर होती. त्यापेक्षा देवाने त्यांना योग्य वेळी नेले. त्यांचा तुम्हाला कधीच त्रास झाला नाही, आणि आता माझाही होणार नाही.
मी ठरवून आणि ठामपणे ह्या जगाचा निरोप घेत आहे सुधीर. मला वृद्ध होऊन तुमच्यावर ओझे होते जगणे अमान्य आहे म्हणून. मी अशी झाले असते, तरी तुम्ही माझा प्रेमाने सांभाळ केला असता, ही खात्री आहे. पण मीच असं जीवन नाकारत आहे. माझी कोणतीही इच्छा अपूर्ण नाही. अत्यंत समाधानाने मी हे जग सोडेन. हा आततायीपणा नाही. अगदी विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मला आशा आहे, तुम्ही ह्या निर्णयाचा स्वीकार कराल.
तू, सौ. विद्या, चि. सानिका, चि. सोनवी, सौ. सुनिता, श्री. शेखर, चि. आशिष ह्यांना माझे अनेक अनेक आशीर्वाद.
तुझी,
आई."
पत्र वाचता वाचताच सुधीरच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या होत्या. त्याचं रक्त गोठलं, हातीपायी थिजलाच तो. कोणत्याही प्रकारचा कसलाही विचार करायची क्षमताच गमावून बसला होता तो.
इतक्यात, आपल्याला कोणीतरी हाक मारत आहे अशी पुसटशी जाणीव झाली त्याला. ते डॉ. बुधकर होते. खाडकन तो भानावर आला, येता येता उभा राहिला. आईचं पत्र हातातच होतं.
"Are you all right Mr. Deshpande? Don't worry. आम्ही सगळे टॉक्सिन्स काढले आहेत त्यांच्या शरीरामधून. She'll survive. But there is one sad news. See, she had consumed a lot of drugs. Those are dangerous ones and I fear, that she will be paralysed for life. बघू आपण. तसं ठोस काहीच सांगत नाही आत्ता. त्यांना critical care मध्ये ४८ तास आपण observe करू. Then lets see. आणि घाबरून जाऊ नका. फिजिओथेरपीने बरंच काही होऊ शकतं, don't worry. एक कॉम्प्लिकेशन मात्र झालेलं आहे. त्यांनी suicide note लिहील्यामुळे आणि आता आपण त्यांना वाचवल्यामुळे पोलिस केसही होईल. You will have to deal with the police too.. केस फाईल होणार नाही असं काहीतरी पहा, नाहीतर त्यांनाच त्याचा त्रास होईल.."
त्याच्या खांद्यावर थोपटून डॉ. बुधकर निघून गेले. सुधीर तसाच सुन्न उभा होता.. 'paralysed for life' हे शब्द त्याच्याभोवती पिंगा घालत नाचत होते.. त्याच्या बोटांमधून आईचं पत्र हळूच निसटलं आणि वार्यावर हेलकावे खात हलकेच जमिनीवर टेकलं..
-समाप्त.
सुरेख लिहीलंय!!
सुरेख लिहीलंय!!
हम्म.. शेवट आवडला पण. देवाची
हम्म.. शेवट आवडला पण. देवाची इच्छा सर्वात श्रेष्ठ शेवटी..
पूनम,आवडली कथा. शेवटही मस्त..
पूनम,आवडली कथा. शेवटही मस्त..
पूनम चांगली कथा.. शेवट पण
पूनम चांगली कथा.. शेवट पण मस्त.
जबरदस्त लिहीलीयस कथा ,
जबरदस्त लिहीलीयस कथा , शेवटही मस्त
मस्त!! अतिशय ताकदीचं कथानक
मस्त!!
अतिशय ताकदीचं कथानक आहे. शेवटही अगदी खास झालाय.
आवडली.
आवडली.
वैनी .. मस्तच !
वैनी .. मस्तच !
मी आताच ह्.बा. च्या बीबी वर
मी आताच ह्.बा. च्या बीबी वर अशीच एक सत्यघटना लिहिलीय.
हमखास आत्महत्येचे उपाय असतील तर ते आता सर्वांना ज्ञात व्हावेत असे वाटतेय.
आवडली.
आवडली.
कथा आवडली! हा विषय खूपच
कथा आवडली!
हा विषय खूपच सेन्सिटीव्ह आहे.. दोन्ही बाजू पटतात!
अप्रतिम!!! ईच्छामरण हे सुद्धा
अप्रतिम!!!
ईच्छामरण हे सुद्धा एक वरदान आहे. ते प्रत्येकाला मिळत नाही. कर्म भोग हे भोगुनच पार करायचे असतात. त्यातुन कोणाची ही सुटका नाही.
ऊत्तम कथा. मनापासुन आवडली.
ओह! वेगळी कथा आणि समर्पक
ओह!
वेगळी कथा आणि समर्पक शिर्षक!
आवडली (?)
आवडली.
आवडली.
कथा आवड्ली ! शेवट
कथा आवड्ली ! शेवट परिणामकारक.
(खुप दिवसाने लिहलस पुनम!)
खूप आवडली. शेवट अगदी
खूप आवडली. शेवट अगदी परिणामकारक आणि सुन्न करणारा झालाय.
कथा आवडली. शेवटचा ट्विस्ट
कथा आवडली. शेवटचा ट्विस्ट वाचुन त्या नातेवाईकांना पुढे होणार्या त्रासाची कल्पना येउन वाईट वाटले.
बाय द वे,
स्वा. सावरकरानी शेवटच्या दिवसात अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला आणि देहत्याग केला.
आहे कोणात इतके धैर्य? .
आणि इच्छामरण हवेच असेल तर गाजावाजा कशाला करायला हवा? . अन्नपाणी , औषधे सोडली की काही दिवसात होईल की मनासारखे. मरताना सुद्धा प्रसिद्धीचा सोस सुटत नाही का आपला? असो.
हमखास आत्महत्येचे उपाय असतील
हमखास आत्महत्येचे उपाय असतील तर ते आता सर्वांना ज्ञात व्हावेत असे वाटतेय.
मला नाही वाटत के हे उपाय जाहिररीत्या माहित व्हावेत. १७ व्या वर्षी प्रेमभंग (?), अपेक्षाभंग (?) झालेली वेडी पोरं याचा दुरुपयोग करतील.
आत्महत्या मनाला नाहीच पटत. मनास्मि ची पोस्ट मात्र १००% पटते. प्रायोपाशनाचा स्विकार करणारी बरीच लोक होउन गेली आहेत. त्याला जबरदस्त मानसिक तयारी लागते.
कथा नि शिर्षक परिणामकारक !
कथा नि शिर्षक परिणामकारक !
सुन्न!
सुन्न!
(No subject)
बापरे! फारच घाबरवणारी आणि
बापरे! फारच घाबरवणारी आणि depressing!
म्हणजे कथा चांगली लिहीली आहे पण विचित्र फीलींग आलं वाचून ..
एक कथा म्हणून छानच लिहिलयस
एक कथा म्हणून छानच लिहिलयस पौर्णिमा.
पण असं एखादं सत्यात घडलं तर पटणार नाही, विश्वासही बसणार नाही.
हा सारासार विचार करूनही नैराश्यापोटी घेतलेला निर्णय वाटतो. (आणि म्हणूनच शीर्षकासाठी तुला पैकीच्या पैकी गूण)
अवांतर माहिती म्हणून
जैन लोकांमध्ये ईच्छामरण घेता येते, आजही! आणि तेही अगदी धडधाकट असतांना किंवा आजारी- अंथरुणाला खिळलेले असतांना. माझ्या कित्येक जैन मित्रांच्या आजी आजोबांनी असा 'संथारा' घेतला आहे.
जेव्हा एखाद्याची (शक्यतो साठी उलटलेलेच) अशी इच्छा होते तेव्हा कुटुंबातले त्यांचे मन वळवण्याचा थोडाफार प्रयत्न करतात. बळजबरी करतांना मी तरी कुणाला पाहिले नाही किंवा ऐकले नाही. मग शहरातले धर्मगुरू अशी ईच्छामरणाची दीक्षा देण्यासाठी घरी येतात आणि घरची एकंदर परिस्थिती बघून त्या व्यक्तीशी एकांतात छोटीशी चर्चा करून सल्ला देतात. परंतू याऊपरही अंतिम निर्णय त्या व्यक्तीचाच असतो.
मग असा निर्णय झाल्यास धर्मगुरू दीक्षा देतात आणि त्यानंतर अन्नपाणी, औषधं वगैरे सगळं ती व्यक्ती प्राण जाईपर्यंत वर्ज्य करते.
ह्याच दरम्यान ती व्यक्ती आपल्या मालकीच्या सगळ्या वस्तू मुलांमुलीत नातवंडात वाटून टाकते. (दागिने, मालमत्ता वगैरे). ज्याची लालसा वाटावे असा कुठलाही धागा मागे शिल्लक राहू नये अशी भावना.
ह्या दरम्यान जवळचे-लांबचे सगळे नातेवाईक येऊन भेटून जातात, पण बहूतेक रडारड होत नाही. जणूकाही एखाद्या लांबच्या प्रवासावर निघाल्यासारखा निरोप दिला जातो. त्यादरम्यान घरातले वातावरण अगदी खेळीमेळीचे नसले तरी खूप धीरगंभीरही नसते. मुले सुना सगळे आपापले रोजचे व्यवहार चालू ठेवतात आणि ती व्यक्ती आपला उरला सुरला वेळ (सहसा मौन व्रत घेऊन) नामस्मरणात घालवते. बहूतेक वेळा एकट्यानेच एखाद्या खोलीत वगैरे. भेटायला येणार्यांशी फक्त मूक संवाद.
मग संथारा घेतल्यापासून तो शिजण्यापर्यंतचा काळ दोन दिवसांपासून महिन्यापर्यंत कितीही असू शकतो, ज्याच्या त्याच्या शारिरिक आणि मानसिक शक्तीप्रमाणे.
मी तुझ्या कथेतल्या आईप्रमाणे तब्येतीने व्यवस्थित असतांना भरल्या घरात किंवा शस्त्रक्रियेला नकार देऊन असा निर्णय घेणारे बघितले आहेत. बहूतेक क्वचितप्रसंगी कुटुंबातल्या वयस्कर व्यक्ती मिळून एखाद्या हाताबाहेर गेलेल्या केससाठीही असा निर्णय घेऊ शकतात.
चमन, जैन धर्माबद्दल हे नवीनच
चमन, जैन धर्माबद्दल हे नवीनच कळलं .. पण असं हे संथारा व्रत घेतलं आणि लगेच मृत्यू आला तर ठीक .. महिने त्यात गेले तरी ते त्या कुटूंबाला क्लेशदायकच ..
पण असं सत्यात घडलं तर विश्वास बसणार नाही असं का म्हणतोस? म्हातार्या, आजारी माणसांची सेवा करणं हे फार फार डिप्रेसींग असतं मग त्यातून कोणाला ह्यातल्या बाईसारखं वाटणं साहजिकच नाही का?
सध्या "ट्युसडेज विथ मॉरी" चं
सध्या "ट्युसडेज विथ मॉरी" चं पारायण चाललय.. (प्रत्येक वेळा नवीन काहीतरी सापडतं त्या पुस्तकात!)
त्या माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा अॅटिट्यूड हा ह्या कथेतल्या बाईंच्या विचारावरचा उतारा वाटतोय मला..
म्र्युत्युयोग ठरवनारे आपण
म्र्युत्युयोग ठरवनारे आपण नाहीच आहोत ... हे सिध्द झाले..
शेवट एकदम मस्त..
पु.ले.शु.
छान लिहिलंय. शेवट मनाला चटका
छान लिहिलंय.
शेवट मनाला चटका लावून गेला
शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत...
प्रयत्न चांगला आहे... पण अशा
प्रयत्न चांगला आहे...
पण अशा type च्या ब-याच् कथा असल्याने खूपच् predictable झाली ही कथा..
All The Best for future..
मग संथारा घेतल्यापासून तो
मग संथारा घेतल्यापासून तो शिजण्यापर्यंतचा काळ दोन दिवसांपासून महिन्यापर्यंत कितीही असू शकतो>>> म्हणजे काय नक्की?
ह्या अशा (जैनांच्या) इच्छामरणाबद्दल एक गोष्ट वाचलेली आठवतेय.
सायो माझ्या माहितीप्रमाणे
सायो
माझ्या माहितीप्रमाणे संथारा घेण्यासाठी तयार झालेले लोक हळू हळू याची तयारी करत असतात मानसिक आणि शारिरीक. माझ्या बघण्यात आलेले इच्छामरण असेच होते. कधीही अचानक उठून आज, आत्ता, ताबडतोब मला वाटले आणि मी संथारा घ्यायचे ठरवले असे होत नाही, तो आघात शरीराला सहन होणार नाही. हळू हळू एक एक पाश कमी करून, अन्न घेणे कमी केले जाते आणि हे लोक लिक्वीड डायटवर जातात. हळू हळू ते पण बंद करून मग फक्त पाणी आणि शेवटी ते पण नाही. या काळात त्यांचे शरीर कृश होत जाते आणि मग ते जातात. थोडक्यात समाधी घेण्यासारखाच प्रकार आहे हा.
Pages