अशोक, तू कुठे आहेस?

Submitted by ठमादेवी on 4 December, 2010 - 04:13

ही रूढ अर्थाने कथा आहे की नाही हे मी सांगू शकणार नाही... तिला आपण शोकांतिका म्हणू शकतो... पण आम्हा मित्रांच्या दृष्टीने ती अजून संपली नाहीये... ही सत्यकथा आहे मात्र खरं...

मे १९९९, सुट्टीचे दिवस होते... मी सेकंड इयर बीएला होते... सुट्टीसाठी मामाकडे इचलकरंजीला गेले होते... एक दिवस दुपारच्या सुमारास फोन वाजला... "अशोक घरातून बेपत्ता झाला आहे. तो मुंबईला आला तर त्याला थांबवून घे आणि त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे," जालन्याहून आमचा एक लाडका मित्र अशोक जेधेचे वडील बोलत होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभरात अशोकचा चेहरा, त्याच्यासोबत घालवलेला काळ डोळ्यांसमोर आला आणि मी बसकण मारली. आमचा प्रिय मित्र असा काही क्षणांत बेपत्ता झाला होता. आज १२ वर्षं झाली या गोष्टीला. ना अशोकचा पत्ता लागलाय ना त्याची काही माहिती मिळाली आणि तो गेला म्हणावं तर त्याचं प्रेतही मिळालं नाहीच...

अशोक, आमचा अत्यंत उमदा मित्र... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनात त्याच्या कवितेला उत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला. त्याच्या त्याच कवितेला नंतर साहित्य अकादमीनेही गौरवलं.
सारी एकदाची पेर
पार पडली जोमानं
आता भरल्या ढगाला
बाप देतो आवतन

सारी भेगुळली भुई
आग पोटात घेऊन
घुमू लागला पावशा
गानं ओठात ठेवून

तहानेजलं वासरू
वळूवळू वर पाहे
असं निर्दयी आभाळ
मुकं मुकं खाली जाये

गेला आषाढ श्रावण
दारोदार भुलाबाई
पसाभर पाण्यासाठी
मुकी मोट गानं गाई

डोळे लागले आभाळा
कुटं पाऊस दडला
डोळे लावून रानात
बाप मुक्यानं रडला

दे रे पांडुरंगा आता
पावशाच्या ओठी गाणी
माझ्या दारी वाहू दे रे
देवा तुझी इंद्रायणी..... ही ती कविता... ती ऐकून आम्ही सगळे ढसाढसा रडलो होतो.. रत्नागिरीत एकदा ओझरती भेट झाल्यावर अशोक मला पुण्याच्या प्रतिभा संगममध्ये भेटला. समोरच्या माणसावर खूप जीव टाकायचा. मी, मंदार भारदे, पंकज, आसाराम लोमटे, केशव खटिंग, स्वप्नील बापट असे सगळे त्याच्या खूप जवळचे... त्याचा स्वभावही दिलदार. कुणाला खिशातलं पेनच दे, कुणाला कविताच लिहून दे, कुणाला गाण्याच्या कॅसेटस दे, असं करायचा... अक्षर तर मोत्यांसारखं देखणं... इतकं की माझ्यासोबत माझी आईही त्याच्या पत्रांची वाट पाहायची... मग तिच्या वर्गावर ते पत्र घेऊन जायची. अक्षर असावं तर असं, शिक काही मित्राकडून असा ओरडा नक्की असाय्चा मला. त्याच्या पत्रांमधून तो कविता पाठवायचा. त्याची शेवटची काही पत्रं आली तेव्हा तो खूप आजारी होता.. मलेरिया, टॉयफॉइड झालेला. मला पत्रात म्हणायचा, (त्याचं पत्र गप्पा मारल्यासारखंच असायचं) संगीत ऐकावं माणसाने.. चांगल्या संगीतात खूप ताकद असते... एकदा पत्रात म्हणाला, तू माझा मैत्रीण (एकमेव) म्हणून सांगतो. तुला काहीतरी खूप सांगायचं आहे.... पण हे सांगण्यापूर्वीच तो असा अचानक गेला...

तो बेपत्ता झाल्यावर एकदा त्याच्या मित्राचा फोन आला... म्हणाला, "त्या दिवशी अशोकचा खूप रात्री उशिरा फोन आला. मी अंबडहून घरी यायला स्टॅंडवर आलो. तेवढ्यात माझ्या तोंडावर कुणीतरी रूमाल धरला आणि बेशुद्ध झालो. आता मी कुठेय मला माहीत नाही. मला वाचवा" त्यानंतर काही अशोकचा फोन आला नाही आणि तोही नाही.. मंदारला ही गोष्ट सांगितली. तोही हबकलाच.
अशोकच्या जाण्याबद्दल खूप वेगवेगळे प्रवाह आहेत. कुणी म्हणतं त्याचं त्याच्या गावच्या पाटलाच्या मुलीशी प्रेम होतं म्हणून त्याला मारलं. कुणी म्हणतं तो सतत आजारी होता म्हणून निराश होऊन निघून गेला. कुणी म्हणतं त्याला एचआयव्ही झाला म्हणून त्याने आत्महत्या केली. तर कुणी म्हणतं तो कवी म्हणून प्रस्थापित होत होता हे तिथल्या एका मोठ्या कवीला पाहवलं नाही म्हणून त्याला मारलं... एका साहित्य संमेलनात तेव्हाचे गृहमंत्री किन्हाळ्कर यांना महावीर जोंधळे या कवीने खुलं आव्हान दिलं होतं... आमच्या मित्राला शोधा म्हणून... पण काहीही झालं नाही.
अशोकचं नेमकं काय झालं हे कुणालाच आजही माहीत नाही. त्याला मला काय सांगायचं होतं हेही मला माहीत नाही. पण आजही मंदार आणि मला वाटतं, तो इथेच आहे, आमच्या जवळ्पास... कधीतरी समोर येईल आणि त्याच्या त्या काळ्या चेहर्‍याला शोभणारं हास्य आणून म्हणेल, मी अशोक- ओळखलं की नाही मला?
काल सहजच जुनं काही चाळत असताना अशोकची पत्रं आणि कविता मिळाल्या. हे सगळं डोळ्यांसमोरून झरझर गेलं. अवघ्या काही महिन्यांची मैत्री, पण खूप गहिरी होती. आजवर अशोकच्या जाण्याने मला जितका चटका लागलाय तो दुसर्‍या कशानेही नाही.. त्यानेच पाठवलेली एक कविता सतत माझ्या मनात असते आणि त्याची आठवण ताजी करते...
ओल्या तुझ्या आठवणी
सार्‍या आभाळी पांगल्या
सारं आभाळ सांडून
सये काळजा गोंदल्या...

किंवा
तिचं हळदीचं अंग, डोळे पाऊस पाऊस
पाल उठून गेलेत, सारा उदास ऊरूस

अशोक, तू कुठे आहेस?

गुलमोहर: 

ओह..... अशोकचं जाणं चटका लावणारं आहे...... काही बरंवाईट झाल्याचं कळलं की आपल्या शोधाचा अंत तरी होतो.... पण अन्यथा त्याच्याशी संबंधित प्रत्येक अमूर्त वस्तु मधून त्याचीच आठवण येत रहाते.... आणि तो कुठे असेल? काय करत असेल ही रुख्रुख लागून जाते. Sad

किती मनस्वी व्यक्त्तिमत्व? एकदम चिं.त्र्यं ची आठवण झाली. तो ही एकदम म्रूत्युला सामोरा गेला. वाईट आहे हे सारं.

Sad Sad

:अरेरे:...

तिचं हळदीचं अंग, डोळे पाऊस पाऊस
पाल उठून गेलेत, सारा उदास ऊरूस
>> मस्त ओळी आहेत.. तो नक्की परतेल ..

Happy वाईट वाटलं वाचून.

दे रे पांडुरंगा आता
पावशाच्या ओठी गाणी
माझ्या दारी वाहू दे रे
देवा तुझी इंद्रायणी....किती सुंदर ओळी आहेत ह्या !

कोमल, मी समजू शकतो तूझ्या भावना. माझाही एक जिवलग मित्र असाच सोडून गेला अचानक, त्याने आत्महत्या केली, त्याला जिवंत बघितलेला मी शेवटचा, त्या भेटीत त्याने काहीही सूतोवाच केले नव्हते आणि त्यानंतर ३ तासात त्याने आत्महत्या केली. मी मायबोलीवर लिहिले होते त्याच्याबद्दल.

अरे रे! खूप वाईट वाटल हे वाचून. अस बेपत्ता होण ही एक न भरून येणारी जखम आहे. आपल्या जवळच्या माणसाच काय झाल हे माहीत नसण्याने closure येत नाही. जवळच्या माणसाची आत्महत्या सुद्धा याच मनस्थितीत नेउन ठेवत असणार. का? कशाला? कशासाठी? हे अनुत्तरीत प्रश्न मेंदु पोखरून काढत असणार. अपघाती मृत्यु, अकाली मृत्यु हे मान्य करून आप्त्-स्वकीय मनाची कवाड बंद तरी करतात.
कोमल के, तुझ्या मित्राची गोष्ट वाचून खूप विषण्ण झाल मन.

कोमल,
तुझ्या नंतर आम्ही स्पर्धांना सुरूवात केली. आमच्यावेळीही अशोकची आठवण प्रत्येक स्पर्धेला निघायची. त्याच्या कवितांची तर पारायण व्हायची. स्पर्धकांच्या विश्वातलं त्याचं स्थान प्रत्येक बॅचने आहे तसे जपले आहे. फक्त अशोकच्या कवितांचा कार्यक्रम करता येईल का? असा विचारही माझ्या मनात बर्‍याच वेळा आला. पण त्याच्या किती कविता उपलब्ध आहेत हे व त्यांच्या चाली काय होत्या याची थोडीशी माहिती मिळाली तरी खूप होईल. मी माहिती जमवतोय. आपण हे नक्की करू. अशोक जर या जगात असेल तर त्याला वक्तृत्व, काव्य स्पर्धांसाठी महाराष्ट्रभर जाणार्‍या स्पर्धकांचा प्रेमाचा सांगावा आहे. समोर ये दोस्त तुझ्या कविता तुझ्या आवाजात ऐकण्यासाठी हजारो कान प्रतिक्षेत आहेत.

आम्ही त्याला पाहिलेही नव्हते तरी आम्ही त्याची वाट पाहतो आहोत. तू तर त्याची मैत्रीण आहेस. तुझी ओढ मी समजू शकतो. अवचित एखाद्या दिवशी टपोर्‍या अक्षरातलं पत्र घेऊन अशोक तुझ्या समोर येवो हीच इश्वरचरणी प्रर्थना!

ह. बा. मला माहीत नाही अशोकच्या किती कविता कुणाकडे आहेत... माझ्याकडे सुमारे ६-७ असतील...
बाकी इंद्रजीत भालेरावांना, आसाराम, महावीर, केशव आणि मंदार यांना विचारायला हवंय... आणि मला एवढं माहिती आहे की अशोकचे वडील राजेश टोपे यांचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत... आपण करूया प्रयत्न शोधायचा... नक्कीच...

अशोक जर या जगात असेल तर त्याला वक्तृत्व, काव्य स्पर्धांसाठी महाराष्ट्रभर जाणार्‍या स्पर्धकांचा प्रेमाचा सांगावा आहे. समोर ये दोस्त तुझ्या कविता तुझ्या आवाजात ऐकण्यासाठी हजारो कान प्रतिक्षेत आहेत.>>>> खरंच आहे... त्याने महाराष्ट्रातल्या स्पर्धक मित्रांच्या मनावर गारूड केलंय हे नक्कीच...

अशोक राजा माणूस. त्याची आठवण तर कायमच ताजी आहे... ती कधीच पुसली जाणार नाही... धन्स सगळ्यांना प्रतिसादासाठी...

बाप रे कोमल.. वाईट वाटलं वाचून.. त्याच्या आईवडिलांची अवस्था काय भयंकर झाली असेल कल्पनाही करवत नाही Sad

Pages