लोकसत्ता बालविभागात १२-सप्टेम्बर-२०१० रोजी प्रकाशित.
गणपतीच्या वेळी तिथे प्रकाशित केली होती त्यामुळे त्याचवेळी मायबोलीवर प्रकाशित करता आली नव्हती. आणि नंतर राहुन गेली.
------------------------
सायुरीच्या सोसायटीमध्ये नुसती धावपळ चालू होती. का म्हणून काय विचारता अहो गणपती येणार म्हणजे तयारी नको का करायला? सोसायटीमध्ये असलेल्या गणेश मंदिरासमोरच मोठा मंडप घातला होता. सगळे ताई आणि दादा गणपतीची आरास , मखर यात गुंतले होते. गणपतीची गाणी लावण्यासाठी स्पीकर , म्युझिक सिस्टीम आणून ठेवली. कुठली गाणी कधी लावायची यावरही जोरदार चर्चा व्हायला लागली होती. पण या सगळ्यात सायुच्या बच्चेकंपनी ग्रुपला मात्र कोणी मध्ये घेत नव्हते फारसे. त्यामुळे ते आपले उगीचच इथेतिथे लुडबुड करायचे आणि कधीकधी एखाद्या दादा कडून रागावूनसुद्धा घायचे.
दुपारी असच खेळता खेळता सायु गणपतीच्या देवळात गेली. हात जोडून नमस्कार करतेय तितक्यात तिला गाभाऱ्याजवळ असलेल्या मागच्या दरवाज्याजवळ जरा हालचाल दिसली. कोण असेल तिथे अस म्हणून ती दबक्या पावलांनी दरवाज्याजवळ गेली. तर कुणीतरी अजूनच लगबगीने पुढे गेलं. तशी सायु पुन्हा एकदा पुढे गेली आणि तिने जोरात विचारलं "कोण आहे तिकडे?" ती व्यक्ती दचकून थांबली आणि वळून सायुकडे बघायला लागली.
आता मात्र आश्चर्याचा धक्का बसायची पाळी सायुची होती.काय गणपतीबाप्पा? चक्क इथे आपल्यासमोर ? तिला काही बोलायला सुचेचना. तेवढ्यात बाप्पाच म्हणाला "हळू बोल ना ग. कोणीतरी पाहिलं म्हणजे." आता सायुला गम्मतचं वाटली गणपती बाप्पा अस म्हणतोय म्हणजे काय!
तिनेही मग खुसुखुसू हसत त्याला हळूच विचारलं. "बाप्पा तू इथे काय रे करतोयस? देवळात छान नैवेद्य घेऊन येतील काकू आता. तिथेच थांबना."
"मी पुढच्या दहा दिवसांसाठी पळून जातोय, जंगलात." बाप्पाने सांगितले?
"तू पळून जाणारेसं? आणि उद्या संध्याकाळी आम्ही मूर्ती आणणार त्याचं काय? तुझी पूजा करणार त्याचं काय? सगळे छान छान प्रोग्राम करतील, गाणी लावतील , छान छान खाऊ देतील तुला आणि तू म्हणतोयस मी पळून जाणार?"
"मग करणार तरी काय ग? तू बघितल नाहीस का ते मोठमोठे स्पीकर आणून ठेवलेत सकाळीच. माझे कान इतके मोठे मोठे कारण सगळ्या भक्तांनी केलेली प्रार्थना ऐकू जायला हवी मला. मग मला सांग, ही मोठ्ठ्याने ढणाढणा लावलेली गाणी मला किती जोरात ऐकायला येत असतील बरं? कान दुखून जातात माझे अगदी. फुलं घालून बंद केले तरी सुध्दा गाणी ऐकू यायची थांबत नाहीत.आजकाल मात्र मी पळूनच जातो या दहा दिवसात. छान पैकी जंगलात शांतपणे राहतो. आणि मोदक काय एरवी संकष्टीला सुद्धा मिळतात."
गणपतीबाप्पाचं दुख्ख ऐकून सायुला पण खूप वाईट वाटलं. पण तरीही बाप्पा पळून जावे हे काही तिला आवडलं नाही. तिने बाप्पाला खूप विनवणी केली. "प्लीज ना बाप्पा तू नको ना रे जाउस. तू सांगत का नाहीस या लोकांना मग सरळ सरळ?"
"अग माझीच पूजा , मग मी कस सांगणार कशी करा आणि काय करू नका ते? अस चालत नाही मी सांगितलेलं. आई रागावेल मग मला."
"हम्म, मग अस करूयात. मीच सांगते सगळ्यांना गाणी बंद करायला. मग थांबशील का तू?"
"अग सायु पण तुझ कोणी ऐकल नाही तर?"
"बाप्पा मी प्रयत्न तरी करते ना. त्यानंतरही गाणी लावली तर तू जा मग जंगलात. चालेल?"
हा प्रस्ताव बाप्पाला पटला. आणि गणपतीबाप्पा परत देवळात जाऊन बसला.
सायु लगेच घरी आली. ती बाप्प्पाला म्हणाली होती खर कि गाणी बंद करायचं सांगून बघते पण तिला हेही माहीत होतं कि अस काही सांगितलं तर सगळे किती हसतील आणि वर्षभर चिडवत रहातील ते वेगेळेच. घरी जाऊन ती विचार करत बसली. तेवढ्यात सायुची मावसबहीण सानिका कॉलेजमधून घरी आली. ती कॉलेज जवळ पडतं म्हणून इथेचं मावशीकडेच राहायची. आणि ती इथे रहायला आल्यापासून सायुला घरात जरा जास्तच मस्ती करता यायची.
सानिताई आल्या आल्या सायु तिच्या मागेच लागली. आणि तिला घाईघाईत गणपती बाप्पाची गोष्ट सांगून टाकली. हे ऐकून ताई जोरजोरात हसायला लागली.
"काय ग ए सायटले! दिवसा पण स्वप्न बघतेस कि काय?"
"ए ताई मी खरच सांगतेय ग. जा तू. तुला बघ गणपती बाप्पा स्वप्नात येऊन सांगेल कि नाही ते."
मनोमन सायुने गणपतीची प्रार्थना करून त्याला ताईच्या स्वप्नात जायची विनवणी केली.
संध्याकाळभर ताईने सायुला खूप चिडवलं. आणि सायु नुसतीच फुरंगुटून बसली.
दुसऱ्या दिवशी सक्काळीच पहाटेचं ताई उठली ती द्चकुनच. तिला खरच स्वप्नात गणपती आला होता. आणि त्याने सायुने जे सांगितलं तेच परत सांगितलं. ताईने गदागदा हलवून सायुला उठवलं आणि स्वप्नाबद्दल सांगितलं.
आता मात्र एकदम विजयी मुद्रा करून सायु म्हणाली "बघ मी सांगितलं होतं कि नाही?"
"हो हो बाई. तूच खरी कि नाही. पण आता काय करायचं ते सांग." ताईने लगेच माघार घेतली.
"तू जाऊन सांग ना तुझ्या मित्र मैत्रिणींना."
"बरी आहेस कि. मला हसतील नाही का सगळे."
"ह्म्म् मग आता? गाणी लावली कि बिचारा गणूल्या जाईल ग पळून." हिरमुसली होऊन सायु म्हणाली.
ताई विचारात पडली आणि अचानक तिला काहीतरी सुचलं
"चल, चलं सायु,जास्त वेळ नाही आपल्याकडे. अजून सूर्य उगवला नाही तोवर जाऊन येऊया गुपचूप."
सायुला कुठे जायचं असा प्रश्न विचारायालाही वेळ न देता ताईने ड्रॉवर मधला एका स्क्र्यू ड्रायव्हर आणि कटर घेतलं आणि चप्पल घालून निघाली. तिच्या मागे सायुही धावत निघाली.
मग ताई हळूच स्पीकर ठेवलेल्या जागेकडे आली. अजून सूर्य न उगवल्याने निळसर अंधार होता सगळीकडे. इकडे तिकडे बघत तिने स्क्र्यू ड्रायव्हरने अलगद स्पीकरचा मागचा भाग उघडला. आतल्या वायर कापून टाकल्या आणि परत बंद करून ठेवला. सगळे स्पीकर असे बिघडवून ती सायुचा हात धरून धावत घरी परत आली.
"तू आता मला सांगणार आहेस का काय केलस ते? ते स्पीकर बंद करून काय उपयोग? तो दुकानदार लग्गेच दुरुस्त करेल."
"सायु, अग आता गणपतीच्या दिवसात दुकानदाराला खूप काम असणार, इथले स्पीकर दुरुस्त करायला नक्कीच लवकर येणार नाही तो. बघच तू." सायु आपल्या ताईकडे अभिमानाने बघत राहिली. आणि तेवढ्यात आत आलेल्या आईला आज या दोघी इतक्या लवकर कशा काय उठल्या याचच आश्चर्य वाटलं.
संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे सगळेजण गणपतीची मूर्ती आणायला गेले.टाळ, झांज वाजवत गाजत मूर्ती येऊन गेट मध्ये आल्यावर मस्त पैकी जोरदार गाणे लावायचा बेत होता मुलांचा. त्याप्रमाणे गाणे वचालू केले पण आवाज येईच ना. सगळ्या वायरी कनेक्शन नीट बघितलं तरी आवाज काही येईना. इकडे गणपतीवाले गेट मध्ये ताटकळत उभे. शेवटी ते असेच धमाकेबाज गाणी न लावता आत आले. बाकीच्या पोरांनी त्या स्पीकर वाल्याला फोन केला तर त्याने ताईच्या अंदाजाप्रमाणे "इतक्यात यायला वेळ नाही, खूप काम आहे" असच सांगितलं. एकंदर दादा लोकांचा जरा मुड गेलाच पण इलाजचं नव्हता.
गणेश पूजनाची आदली रात्र एवढी शांततापूर्ण असल्याने सोसायटीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. बाजूच्या सोसायटीमधली दोन चार मुल तर विचारायला सुद्धा आली कि काय तुमच्या गणपतीला यंदा काहीच धमाका नाही. आता त्यांना घाईत काय उत्तर द्यावे हेचं कुणाला कळेना. खर सांगितलं तर टिंगल होणार हे ठरलेलंचं. तेवढ्यात सानिका म्हणाली "हो हो आमचा गणपती यावर्षी ध्वनीप्रदूषण मुक्त करण्याचे ठरवले होते आम्ही". तिच्या या उत्तरावर सगळे अगदी अवाकच झाले. पण एकदम झ्याक उत्तर दिल म्हणून लगेच ग्रुपमध्ये कौतुकही झालं.दुसऱ्या दिवशीची पूजा सुद्धा अशीच शांततेने झाली आणि शेवटी सगळ्यांनी मस्तपैकी टाळ वाजवत आरत्या म्हटल्या.
आजोबांच्या ग्रुपने तर येऊन मुलांचे स्पेशल आभार मानले. म्हणाले "एवढा शांततापूर्ण कार्यक्रम बघून छान वाटलं बघा मुलांनो. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ठ गणपतीसाठी तुमच नाव नक्की सुचवणार बर आम्ही." हे ऐकून तर मुलांचा आनंद अगदी गगनात मावेना. इकडे सायु आपल्या सानीताईला डोळा मारून कशी गंमत झाली अस खुणावत होती. रात्री स्पीकरवाला स्पीकर दुरुस्त करायला आल्यावर तर सगळ्या मुलांनी अगदी एकमताने स्पीकर परत देऊन टाकले. हे बघून तर सायु एकदमच खुश झाली.
त्यादिवशी रात्री जेवायच्या वेळेला अचानक सायु धावत बाहेर गेली. आई हाक मारतेय पण ऐकेल तर ती सायु कसली! तशीच धावत ती गणपतीच्या देवळात गेली. तिथे बाप्पा तिची वाटच बघत होता. सायु आल्या आल्या बाप्पाने तिला छानपैकी थॅन्क्यु म्हटलं आणि आपल्या सोंडेने समोरच्या ताटातले दोन मोदक तिच्या हातात ठेवले.
--------------------
सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य
---------------------
अशा इतर गोष्टी इथे हि वाचता येतील
http://gammatgoshti.blogspot.com/
कित्ती गोड
कित्ती गोड
खुप छान
खुप छान
सावली दोनही गोष्टी छान आहेत!!
सावली दोनही गोष्टी छान आहेत!!
प्रियदर्शनी, जिप्सी, रोचिन
प्रियदर्शनी, जिप्सी, रोचिन धन्यवाद