कोई नाम ना दो

Submitted by दिनेश. on 22 November, 2010 - 12:28

मायबोलीवर लिहिलेली हि माझी पहिली कथा.(कथा या निकषात बसतेय का ?) कदाचित जून्या मायबोलीवर अजून असेल. त्या काळात युनिकोड नव्हते. आम्ही शिवाजी फाँट्स वापरायचो, त्यामूळे ती कथा आता वाचायला कठीण जाते.
साधारणपणे पहिले लेखन असते तशीच ही आत्मकथा. यातल्या सर्व घटना खर्‍या. यातला हिंदीचा अतिरेक कदाचित खटकेल, पण मूळ संवाद जसे घडले तसेच लिहिलेत.
या घटना परदेशात घडलेल्या. त्या काळात मोबाईल, केबल टिव्ही वगैरे काहीच नव्हते. कथेतील कुटूंबाशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे तूरळक संपर्क होता, पण मग तो पारच तूटला. त्या काळात हि कथा लिहिलेली.
पण योगायोग म्हणा किंवा संपर्काची वाढलेली साधने म्हणा, माझे हे जिवलग मला परत भेटले. आणि त्यानिमित्त..

=============

यथा काष्ठ्च असे काहीतरी शीर्षक देणार होतो पण ते ओंडके त्यांना वहात नेणार्‍या पाण्यापासूनसूद्धा
अलग राहतात तर ते एकमेकांत गुंतणे अशक्यच नाही का ?
ती माझी सखी होती पण हे मी तिला कधी सांगितलेच नाही. तिची आई मराठी होती, पण ही कथा, ती वाचेल अशी शक्यताच नाही. लीना तिचे खरे नावही नाही, खरे नाव लपवावे अशी काही
परिस्थिती नाही. पण तिने मला व मी तिला कधी खर्‍या नावाने हाकच मारली नाही.
मला सर्वजण जरी पहिल्या नावाने हाक मारत असले तरी ती माझा नावाने उल्लेख करणे शक्यच
नव्हते. पण हेही खरे की आम्ही निदान तास दोन तास गप्पा मारल्या नाहीत, असा दिवस गेला
नाही. तसा आमच्या वयात फार फरक नव्हता. ती असेल माझ्यापेक्षा दोनतीन वर्षाने लहान, पण
आव मात्र आणायची, थोरली असण्याचा.

छे, फारच गोंधळ उडतोय. तिच्याबद्दल लिहायला कुठून सुरवात करायचे, तेच कळत नाही. तिच्या
पहिल्याच भेटीत ती माझ्या घरात येऊन मला दम देऊन गेली होती, " भाईसाब, अब ईतनी देर गये, घरमे खाना बनाने की कोई जरुरत ना है. हमारे साथही खा लेना." "आपने क्यू तकलीफ़ ली ?" माझा खोटा खोटा विरोध. "तकलीफ़ कैसी ? मैने थोडीना बनाना है, नेल रोटीया बनाकरही गयी
है. सिर्फ़ सब्जी बनानी है. अनिश काट रहे है. दालचावलका कूकर चढाके आयी हू. आधे घंटेमे आ
जाना, फ़ीर नही बूलानेको आऊंगी." तिचे साधेसरळ थेट बोलणे.

अनिश तिचा नवरा. एकाच ठिकाणी आम्ही नोकरी करायचो. परदेशात एकटे राहताना ती
दोघे कधी जवळचे झाले, हे कळलेच नाही. आधी माझे घर त्यांचा घरापासून दूरच होते. पण
अनिशने आग्रह करुन, त्यांच्या शेजारी रहायला बोलावले. मी एकटाच रहात असल्याने, मलापण
सोबत हवीच होती. पण अनिशच्या शेजारी रहायला जायला जरा संकोच वाटत होता. त्याला कधी
ऑफिसमधे यायला उशीर झाला, कि आमचे जितूभाई मला म्हणायचे, "जरूर उसकी बीबीने
उसको पीटा होगा." आता त्यांच्यासारखा एक वयस्कर माणूस उगाच खोटे कशाला सांगेल, असा
विचार मी करायचो. आणि अनिशला तरी थेट कसे विचारू ? पण विचार केला की जाऊ तर खरे,
आपल्याला कूठे त्यांच्याशी घरोबा करायचा आहे. जेवढ्यास तेवढे संबंध ठेवू, पण माझा हा
निर्णय काही फार टिकू शकला नाही. घरोबा कसला, घरचाच झालो मी त्यांच्या.

रहायला गेल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळीच दूध घेऊन आलो, तर पायरीवरच ती उभी होती.
"अरे इतनी सुबह कहा होके आये ? मैने तो चाय बनाके रख्खी थी ना आपके लिये." असे
म्हणाली. मुकाट्याने चहा प्यायला गेलो. चहा मस्तच झाला होता. म्हणालो, "चाय तो बहुत
बढीया बनायी है. मेरे घरमे इतनी अच्छी नही बन सकती. मै जो दूध लेता हू, वो इतना
गाढा भी नही होता." मी बोलून गेलो.

"अरे वो दूध लेने कि क्या जरुरत है ? यहा एक आदमी रोज आके दे जाता है. आप उससे
लिया करो. एक बोतल काफ़ी है आपके लिये. लेकिन वो तो दोपहर को आता है, आप नही
होंगे घरमे. ठिक है, ऐसा करना, सुबह अपना भगोना रख जाना. मै उससे दूध लेके गरम
करके रखूंगी. शाम को जब लौटोगे, तो यहासे लेके जाना." माझे सर्वच प्रश्न सोडवायचा तिने
जणू ठेकाच घेतला होता. एरवी मी कूणाचे उपकार घेत नाही, पण तिच्या आग्रहापुढे माझे
काही चालायचेच नाही.

या दूध प्रकरणामूळे माझ्या तिच्या घरी सकाळ संध्याकाळ फ़ेर्‍या सुरु झाल्या. सकाळी भांडे
ठेवायला आणि संध्याकाळी ते न्यायला. मग त्यानिमित्त गप्पाही आल्याच. हळू हळू मने मोकळी
व्हायला लागली. जितूभाईने माझी चांगलीच फिरकी घेतली होती तर.

माझ्यावतीने दूधाचा हिशेब करुन ती पैसेही देऊन टाकायची आणि माझ्याकडून मागूनही घ्यायची.
मला रोज ताजे तापवलेले मलाईदार दूध मिळत होते. घरचेच दही, ताक, लोणी, तूप व्हायचे.
चपातीचे पीठही मी दूधातच भिजवायचो. तिला खूप कौतूक वाटायचे.

एकदा विचारलेच मी तिला, कि नावाने हाक का मारत नाहीस म्हणून. सारखे भाईसाब का
म्हणतेस. अनिशला तर नावाने हाक मारतेस ना ? तर म्हणाली, "अनिशके पिताजीका नाम
और आपका नाम एकही है. फ़िर मै आपका मान कैसे ले सकती हू. आप मूझे लीना कह
सकते हो." मग मीही तिला भाभीच म्हणू लागलो.

संध्याकाळी घरी आलो, की तिचा मुलगा, मन्नू माझी वाटच बघत असायचा. त्याच्याबरोबर
खेळणे हा माझा रोजचाच उद्योग झाला. तिलाही जरा मोकळीक मिळू लागली. माझे काम
लवकर आटपत असल्याने मी लवकर घरी येत असे, तर अनिशला यायला वेळ लागत असे.
मग त्याचा निरोप देणे हेही एक कारण झाले. तो येईपर्यंत पाऊस सुरु झालेला असायचा, मग
चहाचा आग्रह व्हायचा. मग मीच चहाबरोबरच्या खाण्याची जबाबदारी घेतली. तिचा चहा उकळेपर्यंत
माझी स्पेशल डिश तयार व्हायची. पुढे पुढे उपचारही गळून पडले. मग मी भजीसाठी कांदा काप तर तिने पिठ भिजव, अशी वाटणी आपोआप व्हायला लागली. हळूहळू तिला माझ्या पाककलेची
माहिती व्हायला लागली. तिच्या, आज क्या बना रहे हो, याला मी उत्तर दिले कि म्हणायची,
" दोपहरसे सोच रहू कि आज क्या बनाऊ, अभी तक कुछ सूझा नही और आपने आते आते ये सोच भी रख्खा है. अच्छा अब ऐसा करना, थोडा नमुना भेज देना." अगदी सहज मागणी व्हायची.

ही देवाणघेवाण मग रोजचीच झाली, कधीकधी, "आप जरा ज्यादाही सब्जी बनाना और यही ले
आना, मै रोटीया बना दूंगी" अशी ऑर्डरच व्हायची. येताना एकमेकांसाठी बाजारातून वस्तू आणणे
हेही नेहमीचेच झाले. "सुबह आप कह रही थी, कि शक्कर खत्म होने को आयी है, सो मै
ले आया." असे मी करत असे. तर ती म्हणायची, "आपने उस दिन जो भरवॉ करेले बनाये थे
ना, वो बहुत अच्छे बने थे. मै आज ले आयी हू, आप हमारे लिये भी, बना देना."

तिच्याकडून रोज दूध तापवून घेण्याच्या बदल्यात, रविवारचा नाश्ता मी बनवायचा असा करार
झाला. नाश्ता करता करता दुपारच्या मेनूची चर्चा व्हायची. मग दुपारचे जेवणही बहुदा एकत्रच
व्हायचे.
आता मीही तिच्या उपयोगी पडावे असा माझा प्रयत्न असायचा. एकदा तिथल्या थिएटरमधे
भाजी ऑन द बीच, हा सिनेमा लागला होता. मी तो बघून आलो आणि त्या दोघांनी पण
तो बघावा, असा आग्रह करु लागलो. "आप इतना बता रहे हो, तो देखनेका मन तो कर रहा
है, पर मन्नू का क्या करे ? " तिने अडचण सांगितली. चित्रपण प्रौढांसाठी असल्याने मन्नूला
नेणे शक्यच नव्हते. त्याची जबाबदारी मी घेतली. "बडा शैतान लडका है. आपको तंग करे तो
थिएटर पर आ जाना, हम आ जायेंगे. " तिने परत परत सांगितले."मेरे साथ उसकी, अच्छी निभती
है, आप बिनघोर हो आईये" असे मी सांगितले. माझ्या तोंडातून चुकून मराठी शब्द निघाला, पण
तिला तो कळला. त्याचवेळी तिने सांगितले, कि तिची आई मराठी, होती म्हणून.

माझ्यामूळे त्या दोघांना तो सिनेमा बघता आला, असे तिने सर्वांना सांगितले. आता तीपण
माझ्याशी कधीकधी मराठीत बोलायला लागली. पण माझे हिंदी सुधारावे, म्हणून मी तिच्याशी
हिंदीतच बोलायचो.

एका संध्याकाळी दूध आणायला गेलो तर ती झोपूनच होती. मी तिला न उठवता, गुपचूप तिच्यासाठी चहा, खाणे करुन आलो.
"क्यू क्या हाल है, क्या खाने को जी कर रहा है. " मी दुसर्‍या दिवशी कौतूकाने विचारले.
"अरे आपने कैसे जाना ?" तिला नवल वाटले.
" बस जान लिया, जो भी खाने को जी कर रहा है. मुझे बता देना." मी सांगितले.
"आपको थालिपीठ आता है बनाना’" तिने विचारले.
मग त्या देशात, जमतील ती धान्ये मिळवून, भाजणी केली. मिक्सरवर ती दळली, आणि
रविवारी तिला खमंग थालीपिठं खाऊ घातली. खाताना तिच्या डोळ्यात पाणी आले. मग मी
रोजच तिच्या आवडी निवडी जपू लागलो.

एका संध्याकाळी, गावातल्या एक बाई तिला भेटायला आल्या होत्या. लीनाने सहजच त्यांना
चहाचे विचारले, तर त्या चालेल असे म्हणाल्या. तिची नरम तब्येत बघून मी झटकन तिच्याच
घरात, त्या दोघींना चहा करुन दिला. त्या बाई माझ्याकडे बघतच बसल्या.

एकदा आम्हाला सगळ्यांना, एका घरी पार्टीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडे गेलो तर त्यांची
काही तयारीच नव्हती. लीना लगेच किचनमधे जाऊन पुर्‍या लाटू लागली. खरे तर तिची
तब्येत बरी नव्हती, हे मला माहीत होते. तिथून परतताना, मी विचारलेच, "आपको क्या
जरुरत थी, पुरिया बनाने की. वो लोग ब्रेड भी तो मंगा सकते थे." तर ती म्हणाली, "बडी
मनहूस घडी थी, जब मैने पहली बार बेलन पकडी. दूसरे के हाथकी रोटी कभी नसीबमे ही
नही थी. " तिच्या काहीतरी दुखर्‍या आठवणी जाग्या झाल्या होत्या. पण मग लगेच म्हणाली,
"शायद आपने वो शाप, दूर किया. "

डॉक्टरकडून तपासून आल्यावर, खूप उदास वाटली. मी कारण विचारल्यावर म्हणाली, "थोडा
डर लग रहा है. यहा कोई बडा बूजुर्ग नही है. अनिश मन्नू को छोडके इंडीया भी नही जा
सकती. वैसे वहा भी कोई नही है. "
" अरे मै जो हू. आप आधी रात भी आवाज दो, तो आ जाऊंगा. और वैसे भी ये पहला बच्चा
थोडी है, जो इतना डर रही हो. " मी धीर दिला.
" आपपे तो पूरा भरोसा है, लेकीन दिनभर मै घरमे अकेली होती हू, डर लगता है. मूझे पहले
फ़िट्स आते थे." तिची काळजी काही कमी होत नव्हती.
मग तिने आपणहूनच सांगितले. ती दहाबारा वर्षाची असताना, तिची आई गरोदर होती. तिच्या
आईची तब्येत त्या काळात खुपच ढासळली होती. म्हणून तिची मावशी त्या काळात, त्यांच्याकडे
रहायला आली होती. लीना त्या काळातही, घरातले सगळे काम आटपून शाळेत जात असे.
पण एके दिवशी, आईने जवळ बोलावून सांगितले, कि आता मावशीच तूझी आई होणार आहे.
बाबांना पण ते चालणार आहे. आणि त्यानंतर काहि दिवसातच, आई गेली. मावशी आणि बाबांनी
लग्न केले. त्या दोघांनी तिच्यावर खूप प्रेम केले, तिला काहि कमी पडू दिले नाही, पण ती
आईचे दु:ख विसरू शकली नाही, आणि तिला त्याच काळात फ़िट्स यायला लागल्या. तिच्या नवर्‍याला लग्नाआधीच तिने सगळे सांगितले होते. तिने माझ्याजवळ मन मोकळे केले. मी काही प्रतिक्रिया व्यक्त करु शकलो नाही. पण तिची जास्तच काळजी घेऊ लागलो.

त्याच दरम्यान मला मुलगा झाल्याचा भारतातून फोन आला. पहिले पेढे मी तिलाच दिले, व म्हणालो, " भाभी आपके यहा, अब बेटिही पैदा होनी चाहीये. समधी बना लूंगा आपको." मी हक्क सांगू लागलो, त्यावर ती म्हणाली, "बधाई हो, लेकीन उल्टा दहेज लूंगी आपसे."

त्याच काळात मी जबरदस्त मानसिक तणावातून जात होतो. त्यांचे घर माझ्या समोरच. एकदा घरी आलो कि माझे रुटीन ठरलेले असायचे. जेवण झाले की मी वरच्या मजल्यावर वाचत बसायचो. (डुप्लेक्स घर होते.) वेळाही ठरलेल्या असायच्या. एका दिवशी खूपच विचलीत झालो होतो, आणि खालीच बसलो होतो.
तेबढ्यात बेल वाजली. दारात भाभी उभी होती. कितीही लपवले तरी, तिच्या नजरेने माझी उदासी टिपलीच. "आप जब नीचेकी लाईट बंद करके उपर चले जाते हो, तब मै जान जाती हू के साढेआठ बज गये. आज साढेनौ बजनेको आये और आप नीचे ही हो. ईसलिये देखने को आयी हू. अरे सगे ना सही, मूहबोले तो है. जबभी अकेलापन महसूस करोगे तो गप्पे मारने आ जाना. " कुणाची माझ्यावर अशी प्रेमळ नजर आहे या कल्पनेनेच माझे अर्धे दु:ख दूर झाले.

तिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरुच असायच्या. अनिशने पण मला घरी लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या घरी यायच्या वेळा ठरलेल्या नसायच्या, मग मीच आल्या आल्या त्यांच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायचो. तिला विचारून भाजी, आमटी करुन ठेवायचो. तिला खूप संकोच वाटायचा. पण म्हणताना मात्र म्हणायची, "मैने आपके लिये जरा कुछ किया तो बोझ लगता था ना आपको ? ईसलिये उपरवाला
आपसे मेरी सेवा करवाता है. कलयूग है भाई, सभी हिसाब यही पूरा करना होगा."

"मै भला आपकी क्यू सेवा करू ? ये सब तो मै अपने बहू के लिये कर रहा हू." असे बोलून मी तिला उडवून लावायचो.

एकदा माझ्याघरी चोरी झाली. त्या देशांत त्याचे काही नवल नव्हते. विमा कंपनीकडून मला सगळे परत मिळणार होते. आम्ही तो प्रकार हसण्यावारीच नेला. त्याच्या पुढच्या आठवड्यात एका संध्याकाळी मला तिचे आणि आमच्याच कंपाऊंड्मधे राहणार्‍या एका गुजराथी बाईचे भांडण ऐकू आले. मला तिचे हे रुप
नवीन होते. मला बघितल्यावर तिने ते आवरते घेतले. मी सहज तिला म्हणालो, "क्यू छोटी छोटी बातोंमे दखल लेती हो ? इन दिनो आपको हमेशा खुष रहना चाहिये."
त्यावर ती म्हणाली, "बच्चोंकी बातोंकी मै नही दखल लेती, लेकीन वो कह रहि थी, कि आपका बेटा वहा पैदा हो गया, और यहा चोरी हो गयी. आपके बारेमे कोई ऐसा वैसा कहे, तो मुझसे बर्दाश्त नही होता." तिने भांडणाचे कारणही सांगून टाकले.

तिच्या त्या अवस्थेत अनिशने एका जर्मन माणसाला घरी जेवायला बोलावले होते. त्याला तंदूरी चिकन खायचे होते. मसाला वगैरे तयार करण्याची जबाबदारी माझी होती. त्या दिवशी नेमका अनिशला यायला उशीर झाला. चिकन कापायचे होते. ती आली माझ्याकडे. "ये तो तय नही हुआ था", मी सबब सांगून बघितली.
"भाभी के लिये, इतना भी नही कर सकते ?" असे तिने म्हणाल्यावर मला त्या चिकनवर सुरी चालवावीच लागली. अगदी लहानपणी चिकन कापताना बघण्याचे निमित्त झाले होते आणि मी कायमसाठी शाकाहारी झालो होतो. पण मला आज तेच करावे लागले. आमचे चिकन प्रकरण बरे झाले असावे. तो जर्मन माणूस
फ़ार खुश झाला. तिला तो म्हणाला, " इज हि यूवर ब्रदर लीना ? यू बोथ हॅव अल्मोष्ट सेम फ़ेस ऍंड जेश्चर्स" खरेच आमच्या हे लक्षातच आले नव्हते. त्या गावात पण आम्हाला अनेक जण हेच विचारायचे.

योग्यवेळी तिला मुलगी झाली. त्यांच्याकडे जो बाळंतीणीचा खाऊ करायचा असतो तो तिने हक्काने माझ्याकडून करवून घेतला. छोकरी गोड होती. ती लबाड मला चिकटूनच असायची. ती चाळीस दिवसांची झाल्यावर देवळात जाऊन आलो, आणि मग रोज संध्याकाळी ती माझ्याच कडे असायची. लीनाच तिला माझ्याकडे सोपवून जायची. म्हणायची, "लो संभालो आपकी लाडली को, मै जरा सोना चाहती हू."
मीच तिचे बारसे केले, तिचे लाडाचे नाव मी शालू ठेवले, आणि तेच नाव तिला चिकटले.

शेवटी आमच्या ताटातूटीचा दिवस आलाच. जाता जाता मी तिला म्हणालो, "चलो इतनाही साथ निभाना था. कहासूना माफ़ करना. आप डिलिव्हरी के लिये, इंडिया गयी होती, तो आपकी अच्छी खातिर होती." माझे बोलणे तोडत ती म्हणाली, " आपने कोई कसर नही छोडी. मुझे लगता है, मेरी मॉं आयी थी, आपके भेसमे. अपना खयाल रखना, और शुभ शुभ खबरे देते रहना."

परत आम्ही कधीच भेटलो नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा, साध्या सोप्प्या शब्दांत मांडलेली एका छोट्या भावविश्वाची भातुकली... सुंदर. इतकं सुंदर, निकोप नातं जमायला तिच्या नवर्‍याची किती समजुतदार साथ आहे...
सखी - हे नातं खरंच किती सुंदर आहे. इतक्या वर्षांनी संपर्कं नसूनही पुन्हा भेटल्यावर मधलं अंतर कधी नव्हतच... नसल्यासारखंच जेव्हा दोन जीव पुढली वाट सहज चालू लागतात ना, तेव्हा लक्षात येतं की हेच "सख्यं"!
तुमच्या इतर कथा येऊद्यात, दिनेशदा.
(आत्ता, तुमच्याच रेसिपीचं आलुमटर परमळतय घरात...)

दिनेशदा,
असा सुंदर लेख वाचत असताना संपला कधी हेच कळालं नाही, त्यामुळे माझ्याकडुन कधी नव्हे ते एखादा लेख पुर्ण वाचला गेला ..
परत आम्ही कधीच भेटलो नाही.
आपल्या आयुष्यात काही लोक भेटतात, पण पुन्हा भेट नाही झाली की हुरहुर ही लागतेच ..
Happy

Pages