टेंडर कोकोनट

Submitted by आशूडी on 22 November, 2010 - 01:48

"मधुरा ... मधुरा.. ए, मधू, लवक्कर खाली ये!"

एवढ्या बेदम हाका म्हणजे अवंतीच. धावतच गॅलरीत गेले. खाली खास पुणेरी जामानिमा करुन स्कार्फ, सनकोट, हँडग्लोव्ह्ज, गॉगल्सने आपल्या उजळ कांतीचा कण न कण भगभगत्या उन्हातून झाकत मॅडम त्यांच्या काळ्या घोड्यावर स्वार होत्या.

"अवंती, वर ये की! "
"नाही, तूच खाली ये. वर नको." मगाचच्या हाकांच्या पीचमध्ये कणभरही फरक न करता शब्द आदळले.
पटकन खोलीतली ओढणी खांद्यावर टाकून स्कार्फ, सनकोट असा युध्दावर जायचा पोषाख करुन जाता जाता आईच्या कानावर घातलं, "आई, अवी आलीये, मी आलेच."

दरवाजा लावून घेता घेता आईचं सुरु झालंच होतंच.. "कुठे चालले आहे सांगायचं नाही, कधी येणार आहे सांगायचं नाही. ती चल म्हणाली की ही निघाली. बर्‍या भेटल्यात एकमेकींना. जेवायला येणारेस का?"
"सांगता येत नाही गं, तू थांबू नकोस." जिन्याच्या दोन दोन पायर्‍या एकदम ओलांडत पर्समध्ये मोबाईल, वॉलेट आहे का ते पाहिलं. अवीने स्कूटीला किक मारली. बटनस्टार्ट बंद पडून जमाना झाला होता. हेडलाईटला मस्त तिरका क्रॅक गेला होता. मागचा इंडिकेटर गाडीपासून काडीमोड घ्यायला तयार नसल्यानं वायरीच्या जीवावर तग धरुन होता. शिवाय गाडी चालू केली की इंजिन, हॉर्नसोबत अजून बरेच काही काही आपखुशीने वाजत रहायचे. हे सारे संस्कार गाडीवर होताना मी कित्येकदा 'चश्मदीद गवाह' झाले आहे. तो आँखो देखा हाल बघताना माझेही हाल झालेच होते. सुरुवातीला मागे बसताना जीव मुठीत गोळा व्हायचा पण आता मलाही या अ‍ॅडव्हेंचर ड्राईव्हमधल्या 'थ्रिल'ची सवय झाली होती. 'थ्रिल' हा अवीच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. तिला कशातही 'थ्रिल' वाटायचं. जीन्स टॉपवर चप्पट तेल चोपडून वेणी घालून कॉलेजला येणं, घरामध्येच लहर आली की साडी नेसून दिवस दिवस वावरणं, मध्यरात्री दूधभात खाणं किंवा कॉफीत पोळी बुडवून खाणं. एकदा तर तिने लख्ख पिवळ्याधमक पितळ्याच्या पानाच्या टपरीवर जाऊन 'काय हो, इथे शंकराचीच मूर्ती का नेहमी? गणपती, मारुती का नाही?' असे विचारले तेव्हा तो टपरीवाला सटपटलाच होता. अवी अनाकलनीय आहे हे सिध्द झालं होतं. कधी बाय कॉन्ट्रॅडिक्शनने तर कधी सटसट थेरमने.

"एवढ्या चांदण्यात कुठे?"
"तू आधी बस. मग बोलू."

हे नेहमीचंच. म्हणजे डोक्याला शॉटमय काही झाले असेल की अवीचा हा पवित्रा असायचा. लवकर काही बोलणार नाही. नमनाला घडाभर मौन. आठवडाभर नोटिस लावून जर्नल्स सबमिशनची लास्टडेट उद्या आहे हे आज समजलंय,इंटर्नल्स च्या तारखा लागल्यात, अटेंडन्स पुरेसा नसल्यानं ब्लॅकलिस्ट मध्ये नावं आली आहेत अशा सगळ्या सनसनाटी बातम्या आमच्या ग्रुपमध्ये सर्वात आधी अवीलाच समजायच्या. तिचा पीआर तसा दांडगा होता. शिवाय मोकळा स्वभाव, आकर्षक व्यकिमत्व यामुळे सर्वांना तिच्याशी बोलायला आवडायचं. पण आज काय झालं असेल? यातली काहीच बातमी असायची शक्यता नव्हती. जर्नल्स सबमिशन, इंटर्नल्स, प्रॅक्टिकल्स झाले होते. आता फक्त परीक्षेला दोन आठवडे शिल्लक होते. सध्या सगळं टेन्शनात्मक शांत शांत होतं. शिवाय ही परीक्षाही शेवटची. मग आम्ही मास्टर्स इन सायन्स होणार. मग काय झालंय? घरी काही? पुन्हा ब्लँक कॉल्स? देवा, परीक्षेत आणखी कटकटी नको रे आता. वळता वळता कोपर्‍यावरच्या जाळीबंद गणपतीला नमस्कारही केला. सटसट सदाशिव पेठेतल्या गल्ल्यांतून गाडी काढत आम्ही जे एम रोडवरच्या नॅचरल्सच्या समोर!

"आत्ता?"
"मग? समोर संभाजी बागेतल्या भेळेच्या गाडीपुढे नाही उभं केलंय तुला दीड वाजता. आईस्क्रीम खायची वेळ असते?" अवी शांतपणे गाडीची चावी काढत होती. तापमान जरा जास्तच होतं.
डिकीमध्ये अंगावरची चिलखत शस्त्रास्त्रे उतरवून आम्ही आत गेलो. एसीच्या थंडगार झोतांमुळे आणि तिथल्या रंगीबेरंगी फळांच्या चित्रांमुळे क्षणात बाहेरचा रखरखाट विसरलो.
"दोन टेंडर कोकोनट वॅफल कोन."
माझं आणि अवीचं फेवरिट. आईस्क्रीम घेऊन बाहेर सावलीत बसलो.
"हं. व्हा सुरु." मी शांतपणे आईस्क्रीमची पहिली टेस्ट घेतली.
"मला बघायला आलेत घरी." अवी.
"क्काय!!??"
माझा आवाज केवढा होता ते तिथल्या वळलेल्या मानांनी सांगितलं. तरी ती शांतच. आईस्क्रीमकडे बघत. जशी काही मी समोरच्या रस्त्यावरच्याच कुणावर ओरडले आहे. एकदम नव्वद अंशात तिच्याकडे वळत मी शक्य तेवढा आवाजावर कंट्रोल ठेवत म्हणाले, "अगं, मग तू इथे काय करतेस? आणि हे अचानक काय होतं तुझ्या घरच्यांना मध्येच? "
"तेच तर. मला नाही करायचं लग्नबिग्न. इथे परीक्षा तोंडावर आली आहे आणि यांचं भलतंच! मी घरात थांबणार नाही सांगून आले आहे निघून."
"अगं पण... असं कोण आलं अचानक बघायला?"
"कुणीतरी औरंगाबादचे आहेत. पुण्यात आलो आहोत तर बघून जाऊ का म्हणे मुलीला. अरे मुलगी म्हणजे काय भाजी आहे का साडी?"
"......."
"मला नाही करायचंय गं लग्न मधु.. "एकदम माझ्याकडे पाहत हातातला हात घट्ट दाबला होता. डोळ्यात पाणी तरारलं होतं अवीच्या. अगदी आतपासून गलबललं मलाही. तिला असं पहायला खरंच नको वाटतं. नेहमीची खेळकर, 'थ्रिलींग' अवी पार कुठेतरी पळून जाते हा विषय निघाला की. तिच्या आई वडीलांचंही बरोबरच होतं. पंचवीस क्रॉस केलं होतं अवीने जानेवारीतच. टायफॉईडमुळे शाळेचं एक वर्ष वाया गेलं होतं. त्यांच्या सोनार पांचाळ समाजात तर बावीस तेवीसाव्या वर्षीच मुली लग्न होऊन जातात, प्रीतीच आता तेवीसची होईल काकू एकदा सांगत होत्या. आता हिचं हिनेच ठरवलं असतं तर प्रश्न नव्हता, पत्रिका, घरदार, पैसा अडका सगळं बघायचं म्हणजे वर्ष सहा महिने जातात. आता बघायला सुरुवात केली तर होईल सारं वेळेत. तूच समजाव अवंतीला, तुझं ऐकेल ती असं त्यांचं म्हणणं होतं. आमच्या ग्रुपमध्ये कुणाच्या घरी अजून रणशिंग फुंकले नव्हते म्हणून आम्ही सुपात होतो. पण येत्या सहा-आठ महिन्यात हे 'बघणं' प्रकरण अंगाशी येणार अशी धास्ती आम्हालाही होतीच. तिला काय समजावणार आम्ही! पण आता अवीशी गोड बोलून तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजावून घेणं महत्त्वाचं होतं.

"अवी, रडू नकोस. हे बघ, आता तर तू माझ्यासोबत आहेस ना? मला नीट सांग बरं काय वाटतं तुला? लग्नाला का नाही म्हणतेस?"
"मला नकोय लग्न. अजिबात."
"अगं पण का?" तिचं दुसर्‍या कुणावर प्रेमबीम असतं तर ते मला माहितच असतं. इथे काहीतरी बेसिकमे झोल वाटत होता.
"मला भीती वाटते.. "
"भीती? कशाची..."
"तुला नाही वाटत?? कुणीतरी अनोळखी.. ज्याला ना कधी पाहिला ना कधी ज्याच्याशी दोन शब्द बोललो... त्याची आपली पत्रिका, जात पात, आर्थिक स्तर, कौटुंबिक वातावरण जुळते म्हणून आयुष्याशी बांधून घ्यायचं. आपलं घर दार माणसं सगळं सोडून मातीतून उपटलेल्या रोपट्यासारखं तिकडे जायचं. जिवाचा आटापिटा करत त्या मातीशी मिसळत रहायचा प्रयत्न करायचा.. ज्याचा हात धरुन तिथं रुजायचं त्या हातातही अनोळखीची थरथर.. कसं जमणारे हे? नो. नो. आय कान्ट."
"भीती तर वाटतेच गं.. पण आई म्हणते येतं निभावता. "
"कसं? आणि मुख्य गोष्ट... लग्नानंतरची... ते तर मला एक दिव्य वाटतं गं. ज्याच्यासाठी इतके वर्ष आपल्या मनात कणभर जागा नव्हती त्याला एकदम ध्रुवपद द्यायचं? सगळं सगळं 'स्वाहा' करायचं? इम्पॉसिबल! मला झेपतच नाही हे. अगं, रस्त्याने जाताना साधा धक्का जरी लागला तरी लाही लाही होते. आणि इथं तर समर्पयामि! याची.. खरंतर याची भीती आहे! मला नाही कल्पनाही करता येत तर मी तरी काय करु? मी तयार नाहीये अजून लग्नाला आणि यांचं सारखं वय वय.. घरी तेच दारी तेच. कुठं लग्नाकार्यात जायची खोटी की नजरांवर तोलणं मापणं सुरु. आडून चौकशा. तुम्हाला काय करायचंय? असं एकदा ओरडणारच आहे मी.. " आता ते मगाशी पापण्यांशी हिंदकळणारं पाणी ओघळलंच. तिला खांद्यावर थोपटलं.
"..अवी, डिअर होल्ड होल्ड! अगं राणी, अशी काय करतेस? जितका तो तुझ्यासाठी अनोळखी, परका आहे तितकीच तूही त्याच्यासाठी. त्याच्याही आयुष्यात हे तितकंच महत्त्वाचं वळण असतं. कदाचित जास्तच. कारण तू त्याच्या भरवशावर त्याच्याच माणसात रहायला जाणार आहेस मग आधी तुझ्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण करण्याची केवढी मोठी कामगिरी आहे त्याच्यावर वेडाबाई! तुझ्या मनाविरुध्द तो काही करणार नाही एवढा तरी विश्वास ठेवशील सुरुवातीला? आणि मुळात तुम्ही एकमेकांना आवडल्याशिवाय होणारे का लग्न? तुझ्या होकाराशिवाय आईबाबा पुढे पाऊल टाकणार नाहीत हे लक्षात ठेव. नातेवाईक तर वात आणतात अगदी, पण हसून दुर्लक्ष करायचं गं.."
"मधु, लव्हमॅरेजमध्ये सोपं असतं का गं? निदान ते दोघं एकमेकांना ओळखत तरी असतात. ताई आणि जीजूंचं लव्हमॅरेजच ना गं? "
"हो, मलाही वाटायचं तसं. ताईला विचारलं तेव्हा ती म्हणाली, सुरुवातीला थोडं सोपं वाटतं कारण मुळात तुम्हाला एकमेकांच्या थोड्या तरी आवडीनिवडी ठाऊक असतात. पण तरी एखाद्याला दिवसभरातून काही वेळ भेटणं आणि दिवसाचे चोवीस तास त्याच्यासोबत असणं हा फरक आहेच. त्या दोन तासाच्या खिडकीतून व्यक्तिमत्वाचा काही भाग दिसत असतो जो नेहमी आपल्याला हवाहवासा वाटतो. तेव्हा तुम्ही एकमेकांना आवडेल असंच वागत असता कधी मनाला मुरड घालून. पण एकदा लग्न झालं, की दोघंही 'आहे हे असं आहे' वर कधी येतात ते कुणालाच समजतही नाही.. "

एव्हाना कोनमधलं आईस्क्रीम वितळून कोनबाहेर चाललं होतं ते पटकन हात जितक्या अंशातून फिरेल तितका फिरवत अवीने संपवलं. हळूहळू कोन खाताना मॅडमच्या डोक्यात चक्र चालूच होती. मी ही माझं आईस्क्रीम संपवत होते.

"हं.. हे तर जास्तच अवघड... आणि मुळात आपली निवड, आपला निर्णय निभावून नेण्याची मोठी जबाबदारी असतेच डोक्यावर. पण इथे ही दाखवादाखवी.. श्या:! काय बोर!!"
"हे बघ अवे, लग्न करायचंच नाही असं तर नाहीये आपलं. घरच्यांसारखीच तुझ्या माझ्याही काही इच्छा आहेत, स्वप्नं आहेत.. असतं आपलं कुणावर प्रेम तर हा प्रश्नच उद्भवला नसता.." मी हळूहळू अवीचा अंदाज घेत होते. थोडी शांत झाल्यासारखी वाटत होती. एखादं मोठ्ठं गणित सुटताना शेवटच्या पायर्‍या काळजीपूर्वक सोडवताना जी मग्नता येते ती दिसत होती तिच्या चेहर्‍यावर.
"हं..! बरोबर आहे तुझं. लग्नाला ना नाहीये, बट गोईंग थ्रू ऑल धिस इज लाईक सफरिंग फॉर मी."

समोरच्या लँपशेडच्या दुकानातल्या सुरेख दिव्यांकडे पाहत होती अवी. हे दुकान तिला फार आवडायचं. त्याचं इंटेरियर इतकं अप्रतिम होतं की भर दुपारीही तिथल्या एक से एक रंगीबेरंगी लँपशेडसच्या प्रकाशानं आत आत शांत, प्रसन्न वाटत राहायचं. दिवाळीतली पहिली पणती लावताना वाटतं तसं. अवीनं एकदा हे मला सांगितलं होतं तेव्हापासून नॅचरल्सला आलो की हीच जागा पटकावायचो.
तिची तंद्री भंग न करता हळूच तिचा हात हातात घेत म्हटलं, "पण आजकाल 'मुलगी पाहणं' प्रकरण तितकं किचकट आणि वैतागवाणं राहिलं नाहीये अवी.. मुलाकडच्यांनाही कल्पना असते थोडीफार. त्यांच्याही घरात मुली असतील की आपल्यासारख्या. आणि आपण सांगूया घरच्यांना. खास त्यासाठी म्हणून काही आम्ही साडी नेसा, चालून दाखवा, पोहे न्या- करणार नाही. आम्हाला वाटलं तर करुही, अगदीच नाही असं नाही. पण करायला हवं म्हणून करा असेल तर मुळीच नाही. आणि तिथे चार लोकात लाजेकाजेस्तव निमूट बसणार नाही. मी तरी ठरवलंय तिथेच सर्वांसमक्ष नोकरी, करियर, शिक्षणाचं विचारुन घ्यायचं.. मागून झिगझिग नको. "

शिक्षण आणि करियर हे शब्द ऐकतानाच अवीचा चेहरा फुलून आला.. अगदी नेहमी असतो तितका उत्साही!
"हो, आणि आपल्या आईबाबांना निदान आपलं एवढं तरी ऐकायलाच हवं. एवढं शिकवलंय, स्वतःचं मत मांडण्यासाठी कॉन्फिडन्स मिळालाय, विचार करण्याची क्षमता दिलीये ती आता नाही वापरायची तर कधी?"
"एक्झॅक्टली. शिक्षणातून नुसती पदवी, नोकरी, पैसा मिळवून उपयोग नसतो गं, अ‍ॅप्लिकेशन, अ‍ॅप्लिकेशन इज इम्पॉर्टंट!"
दोघींनाही अ‍ॅप्लिकेशनची कास धरणारे परांजपेसर आठवले आणि गंभीर चर्चेत एकदम हास्याची कारंजी उडाली.

"मधु, मला हे सारंच आता जाम थ्रिलींग वाटायला लागलंय! आपल्या प्रोजेक्ट सारखं. डोळ्यासमोर काहीच क्लिअर पिक्चर नाही. नुसत्या अंधुक कन्सेप्टस. त्याही इतर कुणीतरी वापरलेल्या, आय मीन इथे इतर कुणीतरी जगलेल्या. त्या कन्सेप्टस वरुन आपल्याला आपलं स्वत:चं असं काहीतरी उभं करायचंय. जे आपोआपचं इतरांपेक्षा निराळं बनत जाणार आहे. कारण यात आपण स्वत: असणार आहोत..आपल्या कल्पना, आपली जडणघडण, राहणीमान यांचं त्यावर प्रतिबिंब पडत राहणार आहे."
"येस्स. म्हणजे ट्रेझर हंट इतकं थ्रिलींग म्हटलंस तरी चालेल. शोधायचंय काहीतरी एवढंच माहीत आहे. कोणते क्ल्यू हाती लागतील, ते आपल्याला कोणकोणत्या वेगळ्या वाटा दाखवत नेतील, आपण बरोबर आहोत की चूक हे कुणीच सांगणारं नाही, प्रत्येक पाऊल विचार करुन जपून आपल्या जबाबदारीवर टाकत खजिन्यापर्यंत पोहोचायचंय.. तो आपल्याला मिळेल न मिळेल माहीत नाही, त्यात काय असेल हेही माहीत नाही.."
"पण हा शोध मात्र डेंजरसली एक्सायटिंग आहे. प्रचंड थ्रिल! आयुष्यभरासाठी पुरेल असं!"
"मग!! घ्यायचा चॅलेंज? आर यू रेडी?"
"येस्स! पण परीक्षेनंतर.."
"ग्रेट! आपण बोलूया उद्या काकूंशी. आता घरी गेलीस तर औरंगाबादकर वाट पाहत असतील."
"घरी कोण जातंय? कॉलेजमध्ये जाऊन हॉलटिकीट्स आलेत का पाहू."
"ओके. पण त्याआधी और एक टेंडर कोकोनट हो जाए?"
"नेकी और पूछ पूछ?"
"दोन टेंडर कोकोनट वॅफल कोन..!"

आत ऑर्डर गेली आणि टाळ्या देत, हसत पुन्हा एकदा गप्पांना पूर आला. गप्पांच्या या खळखळाटात एका प्रश्नाचा नारळ फुटला होता अन सापडलेल्या उत्तरांचं पांढरंशुभ्र खोबरं वाटीभर हसत होतं..

गुलमोहर: 

छान फुलवलीये कथा.. आवडली Happy

लग्नाळू वयात प्रत्येकाला पडणारे प्रश्न.. आणि त्याची योग्य उत्तरं शोधणं, कन्विन्स होणं मस्त उतरलंय कथेत.

छान लिहिली आहे कथा!

रच्याकने, माझंपण टेंडर कोकोनट अ‍ॅट नॅचरल्स लाडकं आहे. Happy

<< गप्पांच्या या खळखळाटात एका प्रश्नाचा नारळ फुटला होता अन सापडलेल्या उत्तरांचं पांढरंशुभ्र खोबरं वाटीभर हसत होतं.. >> हे तर खासच.

अगदी हलकी फुलकी, खळाळती आणि फ्रेश. Happy हा फ्रेशफील थेट शीर्षकापासूनच सुरू होतो तो थेट शेवटपर्यंत. दोन मैत्रिणींचं जिव्हाळयाच्या विषयावरचं हितगुज आणि अवघ्या तासाभरात सारेच संदर्भ बदलतात, आणि बघण्याचे दृष्टीकोनही. व्हेरी स्वीट!

आणि ते शेवटचं वाक्य खूप आवडलं. अगदी चपखल आणि गोड.

(पूनमच्या त्या 'क्लिक'ची आठवण अगदी अपरिहार्य. दोघींच्या आशयातले आणि शैलीतले वेगळेपण लक्षात घेऊनही.)

छान फुलवलीये कथा.. आवडली
साजीराला अनुमोदन मला पण वाचताना पूनमच्या त्या 'क्लिक'ची आटावण झाली.

मस्त.. सहज सोपी.... फ्रेश...

पूनमच्या त्या 'क्लिक'ची आठवण अगदी अपरिहार्य. दोघींच्या आशयातले आणि शैलीतले वेगळेपण लक्षात घेऊनही.<< याबद्दल साजिर्‍याला अनुमोदन. Happy

मस्त जमलय आशू, हा प्रश्न सगळ्यानांच भेडसावत असतो लग्नाआधी पण प्रत्येकाला उत्तर मिळतच अस नाही. Happy

गप्पांच्या या खळखळाटात एका प्रश्नाचा नारळ फुटला होता अन सापडलेल्या उत्तरांचं पांढरंशुभ्र खोबरं वाटीभर हसत होतं.>>> ya Vaakyane kathela prabhavi shevat dila aahe. katha aavadli. Sadiccha!!!

फाराच सुरेख लिहिला आहे. नाण्याच्या दोन्हि बजु समाजावून सागनारा प्रयात्न अवाडला.

छाने Happy

क्लिक मध्ये आई आणि लेकीचं गुज होतं ना ? त्या गोष्टीचा विषय आशय सगळच वेगळं होत बर्का.

Pages