*कथा जुनीच आहे, परागच्या नवीन बाफसाठी पुन्हा इथे देत आहे.
गूळ
'नक्की हेच करायचं ठरवलयेस का तू अभ्या?'
गावाबाहेरच्या पडक्या 'देवरा' गडाच्या 'आगरी' माचीवर सुसाट वार्यात सिगरेट पेटवतांना समोर आडव्या पसरलेल्या गावाकडे जळजळीत नजरेनं बघणार्या अभ्याकडे डोळ्यांच्या कोनातून बघत विक्या म्हणाला.
'का? बामणाच्या पोरानं धंदा केला तर गाव बाटेल काय तुझा? का त्या भडव्याच्या घराला भिकेचे डोहाळे लागतील..?' विक्याला सिगरेटीऐवजी अभ्याचे डोळे शिलगलेले दिसले.
'साल्या आजकाल डागण्या द्याव्या तसा बोलतो तू....काही साधं विचारलं तरी सुन्या न्हाव्यासारखी सपसप जिभेची कैची चालवतो....मेंदूचा भाता लई तापला तर स्फोट होईल एखाद्या दिवशी..........ती खालची दरी दिसते ना 'थोरल्या हणम्याची' तिथल्या तळ्यात गाडीन तुला आणि इथून माझा कडेलोट करीन.... फिरून जर तुझं माझं केलं तर'.....अभ्याच्या 'तुझा' या शब्दावरून विक्याच्या डोक्यात तिडिक गेली. अभ्याचं आणि आपलं नशीब सोडून अजून काहीतरी वेगळं आहे ही कल्पनाच त्याला खूप जिव्हारी लागली.
हातातला दगड दरीत भिरकावून अभ्या कडयावरून तिरिमिरीतंच उठला.....
'भिकारचोट आहे ही दुनिया ....सालं..काम करायला गेलं तर हात तोडून मागते आणि भीक मागायला गेलं तर झोळीत शेण ओतते....ती वरती घिरट्या घालणारी गिधाडं तरी बरी निदान मेलेल्याचेच लचके तोडतात.....ही दुनिया तर खेकड्याचे आकडे आणि विंचवाच्या नांग्या घेऊनच जन्माला आलीये...थोडे पंख पसरले तर हातात मशाली घेऊन जाळायला निघाली.....हरामखोरांची औलादं सगळी........दहावीला बोर्डात आलो तेव्हा हीच दुनिया मला डोक्यावर घेऊन नाचली होती...गुलाल उधळंत होती....ढोल ताशे बडवत होती आणि आता....आणि आता....आयुष्य उधळायला निघालीये माझं साली...पायदळी तुडवायला निघालीये मला.........पण तिला काय वाटलं नुसता उर बडवून गप पडेन मी....अरे एकेकाला पुरून उरेन मी....नाही या गूळपेठेत दहा ट्रक गूळ लिलावात उभा केला तर जोश्यांच नाव लावणार नाही फिरून.....' अभ्या थरथरंत होता त्याचा गोरा चेहरा रागानं लालेलाल झाला होता..नाकातून गरम फुत्कार निघत होते....कानशिलं तापून रक्ताळली होती...त्याचे रेशमी केस वार्यावर मागे उडत होते....हातात येईल तो दगड तो कड्यावरून गावाच्या दिशेनं भिरकावंत होता. तांबड्या क्षितिज्यावर लख्ख विजेने तांडव करावं तसं ग्रीष्मातल्या त्या संध्याकाळी अभ्या आगरी माचीवर थयथयाट करीत होता.
मागच्या वीस वर्षात आपल्या जिगरी मित्राचं हे रूप विक्यानं कधीच पाहिलं नव्हतं.....तो अवाक होऊन अभ्याचा त्रागा बघत राहिला......हा धुमसता ज्वालामुखी आज या माचीवरच ओसंडून नाही वाहिला तर उद्या गावातलं एकेक घर तो जाळीत निघेल हे विक्याला माहीत असावं....तो अस्वस्थपणे माचीवरून पाय सोडून सिगरेटचे झुरके घेत बसला.
त्याला पहिलीच्या वर्गात पहिल्यांदा पाहिलेला त्यावेळच्या गावच्या नवीन पोस्टमास्तर जोशींचा गोरा- तरतरीत अभय आठवला..........१५ ऑगस्टला जोरदार भाषण ठोकणारा....गणितात नेहमी पैकीच्या पैकी काढणारा....काळे मास्तरला 'विक्याला इंग्रजीत पास करा' म्हणून तीनदा त्याच्या घरी जाऊन बजावणारा....दहावीला गावाचं नाव पेपर मध्ये छापून आणणारा.....बापाची परिस्थिती नाही म्हणून शहरातल्या कॉलेज्यात न जाणारा....पण बापाशी का कुणास ठाऊक नेहमीच फटकून वागणारा....टोकाचा नास्तिक असणारा...इलेक्शनच्या प्रचारानंतर पाठीवर आण्णा पाटलाची थाप मिळवणारा....B.Com. करतांना फीच्या पैशांसाठी रसिकशेठच्या गुळाच्या आडतीवर हिशेब लिहिणारा.....सुमीची छेड काढणार्या टेम्पो ड्रायवरला भर बाजारात उसाच्या दांडक्याचे फटके ओढणारा......कुलकर्णी मास्तरच्या सुशीवर जीव टाकणारा.....आणि दीड वर्षांपासून गावातल्या पतसंस्थेतली फडतूस वाटणारी नोकरी सोडून गुळाचा धंदा करण्यासाठी रक्ताचं पाणी करत झपाटल्यागत वणवण भटकणारा....
'दुनिया मुठीत करण्याच्या जिद्दीचा आपला दोस्त आज दुनिया जाळायची जिगर उरात धरून आहे?'... जाणून विक्या चांगलाच चपापला...'आपल्याला साली नेहमीच अभ्याच्या वेड्या जिद्दीची भिती वाटते ह्या जिद्दीपायी सगळंकाही पणाला लावल्यासारखं निघालेला हा बामण गावातल्या बाकीच्या नेभळट पोरांपेक्षा वेगळा आहे हे आपल्याला पहिलीत पहिल्या दिवशीच कळलं होतं....माझ्यासारखा तालेवार मराठ्याच्या घरी जर हा जन्मला असता तर त्या थेरड्या आण्णा पाटलाऐवजी इलेक्शनला उभा करून जितवला असता साल्याला......' सिगरेट संपल्यानंतर विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलेल्या विक्याने अभ्याकडे नजर टाकली तेव्हा तो 'धान्ती' बुरूजावर गुडघ्यांवर हातांचा विळखा घालून समोर मावळणार्या सूर्याकडं एकटक बघत बसला होता. माची उतरून चालत विक्या अभ्याजवळ गेला...अभ्याचे रेशमी केस वार्यामुळे मागे उडतांना त्याने पाहिले............
विक्या बुरुजाला पाठ लाऊन खिशात हात घालून उभा राहिला.....अभ्या आता शांत झाल्यासारखा वाटला.....सूर्यावरची आपली नजर किंचितही न हलवता अभ्या म्हणाला......
'विक्या....माझ्यासारख्याचं आयुष्य गुळाच्या ढेपेसारखं......कडक, बदामी रंगाची गोड कोल्हापुरी गुळाची ढेप......उस पिळवटून पिळवटून रस काढतात ना तशी ही परिस्थिती आयुष्याला पिळवटून काढते.....संकटांची,अपमानांची भट्टी तापते आणि आयुष्य त्यात ओतलं जातं.....यात गमावलेलं सगळं म्हणजे मागं राहिलेलं चिपाड,चोथा......भट्टीतून सही सलामत घडलात, सुटलात तर एका ढेपेच्या आकारात आयुष्य बंद....मग त्याला ठेवतात दुनियेच्या गूळ गोदामात...नंतर जबाबदार्यांचे मुंगळे चिकटतात...दु:खाच्या गांधीलमाशा येतात....गूळ आतून कडक असेल तर ढेप टिकते रे नाही तर दुनियेच्या ओझ्याने ढेप बसली तर तिला पायदळी तुडवून पाठवतात हातभट्टीसाठी....आणि सुरू होते आयुष्याची ससेहोलपट.....आणि ढेप नाहीच बसली तर शकलं शकलं होईपर्यंत आयुष्य फुटंत राहतं.........पण काहीही झालं तरी मी माझं आयुष्य बसू देणार नाही त्याला हातभट्टीत जाऊ देणार नाही....मग...मग...कितीही शकलं झाली तरी बेहत्तर'
अभ्याचं ते अगम्य तत्वज्ञान ऐकल्यानंतर एकदम अनोळखी वाटणार्या अभ्याला पाहून एक भयप्रद शिरशिरी विक्याच्या मस्तकात उमलून विझली......'च्यायला तू एकदम तत्वज्ञानी व्यापारी झालास की रे अभ्या काय वेद बिद, पुराण बिराण वाचून आलास की दुनियेबद्दल, आयुष्याबद्दल बुध्दासारखा साक्षात्कार झाला तुला धान्ती बुरुजावर बसून सिगरेट पिता पिता? हां ?'.....शक्य तेवढं सावरत विक्या म्हणाला.
अभ्या अजूनही एकटक पार मावळलेल्या सूर्याकडे बघतंच होता.....शेवटचा किरण त्याच्या रेशमी केसांवरून ओघळला तसा तो उठला...'चल निघूयात.... मला सुशीने बोलवलंय....ती देवळात माझी वाट बघत असेल'.
बुरुजावरून उतरणार्या अभ्याकडे विक्या धावलाच आणि खसकन त्याच्या दंडाला धरून त्याने अभ्याला मागे वळवला....'अभ्या साल्या....बर्या बोलानं मनसूखशेठला सुनावण्याचा हट्ट सोडून दे नाही तर मी आज तुला या गडाच्या खाली पण नाही जाऊ द्यायचा...कशावरून तुझ्या बाबांना पोस्टात मिळालेली चिठ्ठी मनसूखशेठनेच पाठवली'.....एक त्रासिक आणि धारदार कटाक्ष विक्याकडं टाकून अभ्याने आपला दंड सोडवला आणि तो भरभर गड उतरू लागला. आता आज अभ्याच्या जिद्दीपुढे आपला नाईलाज आहे हे ओळखून विक्याही त्याच्या मागोमाग गड उतरू लागला. पायथ्याशी लावलेली बाईक स्टार्ट करून तो पुढे पोहोचलेल्या अभ्याजवळ थांबला....'आता आमच्यावर थोडा उपकार करा आणि मागे बसायची तसदी घ्या महाराज....'
अभ्याला देवळात सोडून....चिठ्ठी प्रकरणात गूळपेठेतल्या दोस्तांकडून खाजगीत काही माहिती मिळतेय का हे बघण्यासाठी तो तडक गूळपेठेकडे वळला खरा....पण वळतांना अभ्याला एक कडकडून मिठी मारावी असं उगीच त्याला वाटून गेलं.
------***------
'अभय अरे किती उशीर? किती वाट बघायची तुझी? कुठे होतास तू? सुमी आणि बाबा केव्हाचे थांबलेत जेवायचे तुझी वाट बघत...आवर लवकर मी पानं घेते वाढायला...सुमे....ए सुमे....दादा आला बघ..पुरे आता अभ्यास... चला जेवायला'.....आईचा आजही उपवास आहे हे अभयला लगेचच कळले.
'का? बाबांना नव्हते माहित मी कुठे होतो ते...त्यांनीच तर पाठवले होते सुशीला.....' अभयचं वाक्य पूर्णही झालं नव्हतं तसे नारायणराव ताडदिशी म्हणाले....'हो मीच सांगितलं सुशीला तुला समजावयाला....आपल्या आईबापाचं ऐकण्यात अपमान, कमीपणा वाटतो ना तुला, वाटले आमचा नाही तर निदान त्या कोवळ्या पोरीचा विचार करून तरी तू तुझा हा अट्टहास आवरशील आणि आम्हाला या विवंचनेतून सोडवशील.....' नारायणरावांचा वेगाने चढलेला आवाज तेवढ्याच जलद कष्टाने भरून गेला आणि आतून येणारे भांड्यांचे आवाज एकदम थांबले.
'तुम्ही सुशीच्या आडून का बोलता आहात बाबा? मी तुमचं ऐकत नाही असं तुम्हाला वाटतं....ठीक आहे .... पण मी तुमचं ऐकत नाही कारण मला ते पटत नाही आणि तेच मला सुशीनं सांगितलं तर पटेल असं जर तुम्हाला वाटंत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे....'
'गैरसमज...? तुझ्या पेक्षा पंचवीस पावसाळे जास्त पाहिलेल्या....तुटपुंज्या पगारात या कुटूंबाचा चरितार्थ चालवणार्या तुझ्या थकलेल्या आईबापाला तू आता समज गैरसमज म्हणजे काय शिकवणारेस का? ........आत्तापर्यंत का कमीवेळा तुझ्या उसळत्या रक्ताला तुझ्या जिद्दीला समजून घेत आलो आहोत..... मायेचे धागे फार घट्ट असतात रे पोरा त्यांना समजुतीचे कितीही पीळ दिले तरी ते तोडता नाही येत.'
'तुम्हाला काय म्हणायचंय बाबा मला तुमच्याबद्दल आईबद्दल माया नाही, प्रेम नाही? सुमीची मला काळजी नाही? सुशीवर माझी प्रीती नाही? तुमचाच मुलगा आहे ना मी बाबा तुम्ही मला आजिबातंच नाही ओळखलंत का हो आत्तापर्यंत?'........अभयचा आवाजही आता दु:खाने कापरा झाला होता.
अभयचा हा अगतिक प्रश्न ऐकून नारायणरावही निरुत्तर झाले आणि जड पावले टाकीत खूर्चीत जाऊन बसले.
सांगाना बाबा कितीसा कळलोय मी तुम्हाला...मी नास्तिक आहे याचे तुम्हाला वाईट वाटते...तुम्ही घरोघरी पुजा सांगायला जाता आणि लोक माझ्याबद्दल विचारतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटते....माझी तत्वे परखड आहेत, जहाल आहेत आणि कुलाला न साजेशी आहेत त्याचे तुम्हाला वाईट वाटते...बालपणी तुम्ही केलेले संस्कार मी पायदळी तुडवतोय असे बोलून तुम्ही आईजवळ नेहमी कष्टी होतात...संस्कार म्हणजे तरी काय बाबा...विवेकाने आणि न्यायाने वागण्याची शिकवण...मग मी कधी अविवेकाने तुमच्या संस्कारांची पायमल्ली केली सांगा ना...आणि तुम्ही नेहमीच याचा अर्थ काढता की तुमच्या तत्त्वांबद्दल मला आदर नाही अणि मला तुमच्याबद्दल माया नाही....असंच ना बाबा...बोला ना....' ........अभयचे प्रश्न ऐकून नारायणरावांची अस्वस्थता वाढतच होती.
'हे बघ अभय मला तुझ्यासारखं स्पष्ट बोलता येत नाही.....हवं तर आपल्या म्हातार्या बापाला तू मुखदुर्बळ समज....वादविवादाच कौशल्य आणि ताकद दोन्ही नाहीये माझ्यात...कठीणतम प्रसंगी जी तत्वे मी प्राणपणाने जपली किंवा जे जपण्यास जमले तेवढ्यालाच मी तत्व म्हणत असेल आणि ते तुला पटत नसेल तर ठीक आहे...पण हे........' आणि नारायणराव बोलताबोलता अचानक शब्द न सुचून थांबले.
'पण काय बाबा?....सांगा ना....आज आलेल्या निनावी चिठ्ठीबद्दलंच बोलताय ना?....आपल्या मुलापाशी एका चिठ्ठीचा उल्लेखही तुम्हाला स्पष्टपणे करण्यास जमू नये...का ही दुर्बलता?....कोण कुठला हरामखोर......
'अभय...या घरात शब्द जपून वापर..'....आईच्या करड्या आवाजाने अभय मध्येच थांबला.
'हेच ते...का म्हणून नेहमीच सोज्वळ रहायचं...सोबरच वागायचं...का म्हणून कोषातच सुरक्षित मानून घेत जगायचं......का नेहमीच बाहेरच्या दुनियेची भिती बाळगायची...का लढायला घाबरायचं...'अरे' ला 'कारे' का नाही करायचं....का हा भिडस्तपणा नेहमीच बाबा....का ब्राम्हणांच्या रक्ताला उसळी माहीत नाही...इतिहासात कितीतरी दाखले आहेत....ते कमी का पडलेत बाबा पुन्हा सांगायला आणि उगळायला?...स्वातंत्र्यलढ्यात आजोबांनी घेतलीच होती ना उडी....ब्रिटिशांच्या अत्याचाराला कवडीची भीक घातली नाही त्यांनी...का त्यांना नव्हता संसार?....त्यांना नव्हती मुलाबाळांची माया..त्यांना नव्हती तत्वे....सांगा ना बाबा मी चुकीचं बोलतोय का काही?....सांगा ना ?
का म्हणून धंदा आपल्या रक्तात नाही असं तुम्हाला वाटावं....धंदा म्हणजे मारवाड्या, गुजराथ्यांची मक्तेदारी....तो आपला प्रांत नव्हे.....का असा न्यूनगंड ठेवायचा?...काळजीपोटी पोराला या सगळ्यांपासून परावृत्त करायला निघालात तुम्ही...त्याची भरारी आवरायला निघालात...हेच का तुमचं प्रेम...हीच का तुमची सदोदित मागे ओढणारी माया...असेल दुनिया विखारी पण मग आपण या वारुळात रहातंच नाही अशा अविर्भावात का म्हणून जगायचं?....डसू देत मला ही दुनिया...पण कोषातल्या बोचर्या अज्ञानापेक्षा ते सत्याचे दंश बरेच सुसह्य असतील माझ्यासाठी..............
पतसंस्थेतली नोकरी मी धंद्यासाठी सोडून दिली तेव्हा का तुम्ही अबोला धरलांत माझ्याशी....सुमीची छेड काढणार्या त्या नराधमाला वाजवत होतो तेव्हा का धरलात माझा हात....का मला इलेक्शनच्यावेळी प्रचारसभेत बघून तुम्ही रस्ता बदललात सांगा ना बाबा?
"पोराला गुळाच्या आडतीच्या धंद्यात येण्यापासून थांबवा नाहीतर परिणाम वाईट होतील."
अशीच होती ना ती चिठ्ठी.....म्हणून त्या धमकीला घाबरून मी माझ्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीला बासनात गुंडाळून विहिरीत लोटून देऊ....माझ्या कल्पनांचा, जिद्दीचा, आत्मविश्वासाचा कडेलोट करू....माझ्या स्वप्नांना मुरड घालू.... का?...नाही मला तुमच्यासारखी कारकुनी करायची...तुटपुंज्या पगारात नाही मन मारत जगायचं...उद्योगाचं साम्राज्य उभं करायचंय मला.....नाही...मी आता मागे फिरणार नाही आणि आता मला थांबायलाही जमणार नाही.........'....... अभय तावातावाने बोलतंच होता. याआधी आपण बाबांशी अशा चढ्या स्वरात कधीच बोललो नाही...असे खडे बोल त्यांना कधीच कुणी सुनावले नाहीत हे तो जाणून होता पण आज त्याच्यातला धुमसता ज्वालामुखी तो काही केल्या थोपवू शकत नव्हता.
अभयचा प्रत्येक प्रश्न प्रत्येक वाक्य नारायणरावांना वर्मी लागत होतं त्यांचे डोळे पाणावले...डोळ्यांवरचा चष्मा काढून हतबल होऊन ते खूर्चीत मागे टेकले आणि स्वतःशीच बोलत राहिले...
'खरं बोललास तू पोरा.....खरं बोललास...आहेच तुझा हा बाप भ्याड आणि मवाळ...कुठल्याही अवघड डोंगराला नाहीच देऊ शकला कधी आव्हान...सरळसोट चढायची हिंमत नव्हतीच कधी तुझ्या बापात...वळसे वळसे घेतच चढत राहिला तो...त्याने नेहमीच मध्यम मार्ग निवडला.....गांधीवादी विचार डोक्यात पक्के रुजलेले....पण दंडुक्यांचा मार सोसण्याची हिंमतच नव्हती रे कधी....एका गालावर वाजवली तर दुसरा पुढे करा....पण आम्ही नेहमीच खाल मानेने जगत राहिलो....गाल कधी पुढे केलाच नाही....जबाबदार्यांचं कारण मात्र तेवढं नेहमीच पुढे केलं......पण मनगटात रग नव्हती की...उरात धमक नव्हती हेच खरं...तुझ्या आजोबांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेडापायी सगळ्या कुटूंबाची झालेली वाताहात पाहिली...साहिली....आणि त्यांच्या अस्थिंबरोबरच माझा स्वाभिमान मी गंगेच्या पाण्यात सोडून दिला.....आज माझ्या तरण्याबांड पोरात माझा स्वाभिमानी बाप फिरून दिसतोय मला...मी तेव्हाही तेवढाच असहाय्य होतो आणि आजही तेवढाच हतबल...नेहमी पिचूनच जगत आलोय...गुळाच्या बसलेल्या ढेपेसारखा...त्यात कधी कडकपणा नव्हताच........कर तू तुला हवं ते पण मला नाही सहायचं ते कधीच....या जुन्या खोडाचा भिडस्त स्वभाव मेल्याशिवाय जायचा नाही आता.....आणि तुला तसाही या खोडाचा काही अधार वाटायचा नाही....तू माझ्यासारख्या भित्र्या ब्राम्हण बापाच्या घरात जन्मायला नको होतास....'...... नारायणरावांच्या बोलण्यात व्याकुळता,काळजी, निराशा होती...बोलतांनाच त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातून दोन आसू ओघळले.......धावत जाउन अभयला उराशी कवटाळावे त्याच्या रेशमी केसांतून हात फिरवावा अशी इच्छा त्यांना अनावर झाली होती. पण का कुणास ठाऊक खूर्चीतून उठण्याचं बळ त्यांच्या पायात आलंच नाही.
नारायणरावांचे ओघळलेले अश्रू पाहून अभयच्या ह्रदयात खोलवर एक तीव्र भावनातिरेकाचा डोह उचंबळला. आपल्या दु:खी बापाला जाऊन धीर द्यावा त्याच्या मांडीवर दोन क्षण डोकं ठेऊन भरलेल्या डोळ्यांनी त्याला सांगावं.... 'असू देत बाबा...पोटच्या पोरांसाठी....संसारासाठीच तुम्ही असे पिचत राहिलात.........माहितेय मला.....असे पिचून जाऊन तग धरण्यालाही खूप मोठी ताकत आणि हिंमत लागते...माझी काहीही तक्रार नाही.....पण मला असं नाही पिचायचंय..माझा गूळ कडकंच उतरला पाहिजे... तुम्ही मला जाऊदेत माझ्या मार्गाने....जाऊदेत मला...'....
पण बाबांच्या दिशेनं पुढे पडलेले पाऊल का कुणास ठाऊक अभयने पुन्हा मागे ओढलं..आणि भावनांना मुरड घालत तो आत जाण्यास वळला....स्वयंपाकघरात त्याला आई आणि सुमी एकमेकींना बिलगून रडतांना दिसल्या....आणि त्याच्या ह्रदयातल्या भावनांचा डोह उचंबळून बाहेर सांडतो की काय असं त्याला वाटून गेलं.....त्याची चाहूल लागताच सुमी त्याला येऊन बिलगली...
'तू बाबांना असं नको बोलू रे दादा....मला खूप भिती वाटते...' सुमी रडता रडताच त्याला सांगत होती आणि तो निर्विकारपणे डोळे टिपणार्या आईच्या दु:खी चेहर्याकडे पहात राहिला.
------***------
'मनसूखशेठ वो बामणरो छोरो आयो है...' चुनीलालने आत येऊन वर्दी दिली.
'कुणता बामणरो छोरो..चुनी..?' मनसूखशेठने चोपडीतली नजर चुनीलालकडे न वळवता त्रासिक सुरात विचारले.
'वो...जिने गूळरा आडतरो लायसेंस लियो है...जिका बापने आपण काले चिठ्ठी भेजी हुती...' है ऐकताच मनसूखशेठ मनोमन चपापला.
'अकेलोच है की?...हाथ मे कै है?.....साला हरामखोररी इत्ती हिंमत...' मनसूखशेठचा घाबरलेला अविर्भाव पाहून चुनीलालला आपल्या शेठची मनोमन लाज आणि किळस वाटली.
'जा उने केयजो मनसूखशेठ घरमें ना है.......अं.....नहीतर इसो कर...भेज उन्हे माईमे...आणि तू पण आठेच उभो रेहजो...'...मनसूखशेठचा चोपडीवरचा लिहिता हात आता थरथरत होता.
'अरे पधारो पधारो अभय बेटा......आज कसा काय सकाळच्या टाईमला गरीबाच्या झोपडीकडे वाट वाकडा केला...ब्राम्हणाचे पाय लागून आमचा झोपडी धन्य झाला बघ....'मनसूखशेठच्या नेहमीच मीरपुड ओकणार्या तोंडातून गुळासारख्या गोड शब्दांचे सारण बाहेर पडतांना ऐकून चुनीलाल अवाक झाला...पण त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं मुळीच....मनसूखशेठची जीभ सरड्याच्या कातडीची आहे हे तो ओळखून होता. व्हरंड्यातून आत येणार्या अभयच्या रेशमी केसांकडे तो बघतंच राहिला.
'मनसूखशेठ बास झाली ही मखलाशी....तुझ्या वाणीतला गूळ तू पेठेतल्या बाकीच्या लोकांशी बोलायला राखून ठेव....माझ्याशी बोलायला तुझी ही गंजलेली जिभेची कट्यार तुला उपयोगी नाही पडायची....'...अभयने व्हरंड्यातून आत येतांना कोचावर चोपडी घेऊन बसलेल्या मनसूखशेठवर डोळे रोखत घणघणाती तोफ डागताच मनसूखशेठ मनातून चरकला. दाराजवळ चुनीलालला उभा बघून स्वत:ला सावरतंच तो म्हणाला....
'अरे काय बोलतो तू अभय बेटा....काय झाला तू असा गुळाच्या भट्टीवाणी तापला'
'तूच पाठवलीस ना चिठ्ठी माझ्या बाबांना पोस्टामध्ये?....मनसूखशेठ.....तू या बामणाला नीट ओळखलं नाहीस पण मी तुझी सापाची जात चांगलाच ओळखून आहे....तुझा मोठा भाऊ रसिकशेठ भला माणूस होता....मी त्याच्याकडे गुळाच्या आडतीवर दोन वर्षे हिशेब लिहायचो...या धंद्यातला तोच आपला बाप आणि तोच आपला गुरू....त्यानेच आपल्याला गूळाच्या आडतीतलं मर्म शिकवलं.....सगळे छक्के पंजे शिकवले...आपल्या हुशारीवर कायम खूष असायचा रसिकशेठ....हापूड कोणता गावराण कोणता....गुळात खारीक आणि खजूर माल कुठला...चाकू माल कुठे आणि किती विकतो....आडतीतली टक्केवारी, सेस किती ...शेतकर्यांनी पेठेत आणलेल्या मालाचा दर्जा कोणता...किंमत खरी की खोटी....लिलाव कसा करायचा..हात एक, वक्कल दोन काय असतं....गूळ किती टेंपरेचरला बसतो....बसलेला गूळ मध्यरात्री टेम्पोत लादून..चोरून हातभट्टीवाल्यांना कसा पोहोचतो....अरे सगळं माहितेय मला...' शब्दागणिक अभयचा आवाज चढत होता...त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर मनसूखशेठच्या अंगावर भितीचा शहारा उठत होता. चुनीलाल दारात उभा आहे यावर तो डोळ्यांच्या एका कोनातून लक्ष ठेऊन होता. या बामणाच्या पोराला आता आवरलं पाहिजे असं वाटून उगीच तो बोलला...
'अरे मला सांगायचा रसिकशेठ हा पोरगा लई तेज आहे....याने मारवाड्याच्या घरी जनम घेतला असता तर कऱोडपती झाला असता....रसिकशेठ गेल्यावर तू कायला लाईन सोडला मी दिला असता ना तुला काम..मेहनती लोकांचा कदर हाये मनसूखशेठला.'
'अरे हट..तू मला काय काम देणार...ती तुझी लायकी नाही....रसिकशेठने कधी तुझ्यासारखी शेतकर्यांशी आणि धंद्याशी बेईमानी नाही केली....आणि तू......केसानं गळा कापलास तू रसिकशेठचा....धंद्यावर हुकूमतीच्या लालसेपोटी सख्ख्या भावालाच डसलास की रे तू.....रसिकशेठला हार्टअॅटॅक आला तेव्हा मुद्दाम शहरातल्या दवाखाण्यात नेण्याचं नाटक करून तू रस्त्यात वेळ काढलास.....रसिकशेठ बोलायचा माझ्याकडे तुझ्या आततायी आणि स्वार्थी स्वभावबद्दल....पण तू असा वार करशील त्यालाही नसेल वाटलं' अभय तारस्वरात फुत्कारत होता.
'ए..ए...ए बघ अभय ..तू लई जास्ती बोलतेय....तू माझ्या डोक्यावर काय बी पाप लादू नकोस...माझा भगवान साक्षी हाये...माझ्या चोपडीची कसम खाते मी...असा काय बी नाय केला मी....'मनसूखशेठ उसनं अवसान आणून अभयवर डाफरायचा प्रयत्न करीत होता.
'तू धुतल्या तांदळासारखा निष्पाप आहेस तर मग असा घाम का सुटावा रे तुला?......शब्द का अडखळतायेत बोलतांना..हां?.....मनसूखशेठ.....तुझ्या हाताला आणि मेंदुला सुटलेला कंप आवर आणि मी काय बोलतोय ते नीट ऐक.......गरीब शेतकर्यांचा उन्हामुळे बसलेला गूळ कमी भावात विकत घेऊन हातभट्टीवाल्यांना विकता यावा म्हणून रातोरात पेठेतल्या गूळ गोदामांचे सिमेंट पत्रे बदलून तू लोखंडी पत्रे करवलेस...तुझी खांडसरी आणि नवसागराची छुपी गोदामेही माहितीयेत मला.....शेकडो टन गूळ बसल्यामुळे किती शेतकरी कर्जबाजारी झालेत ठाऊक आहे तुला?.....तुला रे त्यांची काय किंमत म्हणा......मी तुझं हे बिंग फोडलं....प्रतिष्ठित व्यापार्याचं तुझं पितळ उघडं पाडलं...तुझ्या चेहर्यावरचा सोज्वळपणाचा हा बुरखा ओरबाडून काढला तर?....तर खडी फोडायला जाशील तू मनसूखशेठ....लोक आग लावतील तुझ्या या हवेलीला, पेढीला आणि गोदामांना..............
मला आडतीचे लायसेंस मिळू नये म्हणून किती पैसे चारलेस रे तू अधिकार्यांना....पतसंस्थेने कर्ज मंजूर करू नये म्हणून किती दबाव आणलास रे तू....मी तुझ्या धंद्यातला हिस्सा खाईन....तुझा धंदा बसेल...तू भिकेला लागशील म्हणून एवढारे घाबरलास तू?....सगळीच कामं पैशानं होत नाहीत मनसूखशेठ..... पतसंस्थेत कारकुनी करायला आणि उन्हातान्हात आण्णा पाटलाचा प्रचार करीत हिंडायला मी काय तुला रिकामटेकडा आणि खुळा वाटलो काय......?' ....मनसूखशेठ आ वासून अभयचा रुद्रावतार बघतंच राहिला....त्याचे सर्वांग घामाने निथळत होते....त्याच्या चेहर्यावर प्रचंड भितीचे सावट स्पष्ट दिसत होते. पोटावरल्या चोपडीवर लवंडलेली दौत उचलून ठेवण्याचेही भान त्याला उरले नाही.
'तू कारण नसतांना पेठेतली स्पर्धा माझ्या घरापर्यंत..माझ्या बाबांपर्यंत नेलीस मनसूखशेठ...म्हणून तुझ्या घराची पायरी आज मला चढावी लागली....पण याद राख जर माझ्या घरात तुझ्यामुळे कुणाला त्रास झाला तर गाठ या बामणाशी आहे....आणि हा बामण धंद्यात दयामाया नसते हे तंत्र पक्क्या मारवाड्याकडून शिकलाय. मी पुन्हा तुला समजावयाला येणार नाही ध्यानात ठेव....नाही पुढल्या महिन्यात गूळपेठेत एकट्यानं दहा ट्रक गुळाचा लिलाव पाडला तर तुझ्या ढांगेखालून जाईन मी....बघशीलंच तू'....आणि आला तसा अभय ताडताड पावलं टाकीत दिवाणखाण्यातून चालता झाला. चालतांना हवेबरोबर उडणार्या त्याच्या रेशमी केसांकडे चुनीलाल अजूनही एकटक बघतंच होता.
एका झंझावातासारखं वाटेतलं सगळं काही उध्वस्त करीत आलेल्या आणि अतिप्रचंड अश्निप्रमाणे घणघणाती उल्कापात करीत रोरावत निघूनही गेलेल्या पाठमोर्या अभयकडे मनसूखशेठ गर्भगळीत होऊन पहातंच राहिला......आपण आत्ता साक्षात काळालाच पाहिले की काय अशी त्याची चर्या मृत्यूच्या छाया पडल्यासारखी पांढरीफटक पडली होती...........पण कितीही भयभीत झाला तरी जहाल सर्प फणा काढण्याचे आणि डसण्याचे विसरतो काय?...वास्तवाचे भान येताच क्षणार्धात मनसूखशेठच्या चेहर्यावरचे भयप्रद भाव जाऊन त्याजागी कपटी, कावेबाज, खुणशी चरबीची पुटं चढली....त्याच्या ओठांची डावी कड आणि डावी भुवई राहून राहून उडत होती. मनात चार धंदेवाईक गणितांची आणि उत्तरांची जुळणी करून मनसूखशेठने काहीतरी निर्मम आणि पाशवी निर्णय घेतल्याचे चुनीलालने त्याच्या डोळ्यात बघूनच ताडले..........
मनसूखशेठने चुनीलालला जवळ बोलावले आणि त्याच्या कानात हातभट्टीवर गूळ पोहोचवणार्या टेम्पो ड्रायवरला सांगावा धाडण्यास बजावले.
मनसूखशेठ अधमपणाच्या या थराला जाऊन असा रक्तपिपासू बनेल याची चुनीलालला प्रचंड घृणा वाटली.......धंदा, पैसा, हुकूमत आणि स्वार्थासाठी एका कोवळ्या प्रामाणिक मुलाचा मनसूखशेठ बळी घेणार? रसिकशेठला आपल्या सख्ख्या भावालापण मनसूखशेठनेच मारलं?......आणि अशा अघोरी नराधमाचे आपण पाईक आहोत?....मनसूखशेठचाच नव्हे तर चुनीलालला स्वतःचाच प्रचंड तिरस्कार वाटतोय हे त्याची नजर साफ सांगत होती....
------***------
"दगडी पुलावर पोराला उडवण्यासाठी टेंपो निघाला आहे....पोराला वाचवा."
पोस्टातल्या घड्याळ्याच्या बरोबर दोनच्या ठोक्याला ही निनावी चिठ्ठी नारायणरावांच्या हातात पडली आणि .................... ग्रीष्मातल्या दुपारी गूळपेठेच्या रस्त्यावरून दगडी पुलाकडे धावतांना नारायणरावांच्या धुरकटलेल्या डोळ्यांसमोर राहून राहून अभयचे हवेवर उडणारे रेशमी केस तरळत होते.
समाप्त.
मस्त लिहिलयसं रे !
मस्त लिहिलयसं रे !
ही तेव्हाही आवडली होती! तुझा
ही तेव्हाही आवडली होती!
तुझा आधी आयडी वेगळा होता का?
आधी ह्या कथेचं शीर्षक वेगळं
आधी ह्या कथेचं शीर्षक वेगळं होतं ना?
मस्त....
मस्त....
मलाही बस्के आणि मंजुडी सारखच
मलाही बस्के आणि मंजुडी सारखच वाटतय
मस्तच!
मस्तच!
मी पण वाचलेय आधी. आय्डी+
मी पण वाचलेय आधी. आय्डी+ कथेचे शिर्षक याचं कॉम्बि वेगळं वाटंतय खरं..
आयडी 'बो-विश' होता आधी. कथेचं
आयडी 'बो-विश' होता आधी. कथेचं नाव हेच होतं बहुधा.
मस्त कथा हीही. कॅरेक्टर्स काय उभी केली आहेस, वा. अभय तर डोळ्यापुढे उभा राहतो.
चमन, अजून एक कथा फक्त दोन भाग लिहून अर्धवट ठेवली आहेस.. ती पूर्ण कर प्लीज..
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
मस्तच पूर्वी वाचली होती.
मस्तच पूर्वी वाचली होती. शीर्षक हेच होतं तेव्हा.
(जुना आयडी बो_विश असेल तर मग) चमन, तुझी 'बेनिटा' या शीर्षकाचीही एक कथा होती ना? (दक्षिण अमेरिकेतली पार्श्वभूमी होती. ती पण मला जाम आवडली होती. त्याची लिंक पण टाक तिकडे.)
मस्त लिहिलय...... आवडली
मस्त लिहिलय...... आवडली
खुप मस्त वाटली... जणु काय
खुप मस्त वाटली...
जणु काय सगळा प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे..
आधी पण आवडली होती .. आत्ता पण
आधी पण आवडली होती .. आत्ता पण आवडली..
वाह!!!! छान कथा. आवडली.
वाह!!!! छान कथा. आवडली.
छान आहे कथा... आवडली , काल
छान आहे कथा... आवडली , काल वाचली घाईघाईत म्हणून आज परत वाचली पण
शेवटच्या ओळींमुळे मला तरी ती अपुर्णच वाटली जरा... दोनदा वाचूनही...
अभयच्या जिद्दीचे पुढे काय ?
नारायणरावांना पुन्हा एकदा हतबल निराशपणाची भावना मनात येणार ?
पुन्हा टाकल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा टाकल्याबद्दल धन्यवाद
ओह... बो-विश का? ही सुद्धा
ओह... बो-विश का?
ही सुद्धा कथा आठवली. पुन्हा तितकीच आवडली.
आज परत एकदा इतक्या वर्षांनी
आज परत एकदा इतक्या वर्षांनी वाचली. जुन्या मायबोलिवर तुझ्या जुन्या नावावर असताना वाचली होती. आजही तितकीच आवडली! आहेस कुठे? मायबोलिवरुन गायब आहेस सध्या! मिसिंग यु माय फ्रेंड!