धोंड्या - ४

Submitted by प्रकाश काळेल on 17 November, 2010 - 11:31

धोंड्या - १

धोंड्या - २

धोंड्या - ३

पान दाढंखाली सरकवून, पाटलानं मिटींगीचा ताबा घेतला.
"तर ही बघ धोंडीबा, तुला माह्यत अशीलच की आजची मीटींग बोलवायचं काय काराण हाय ती!...........पर म्या म्हंतू....धोंडीबा,लेका तुझ्यासारखा वाघ गावात असताना अशी येळ येणं मंजी लै..."
"मंजी? मला काय ठेका दीलाय का गावानं!" धोंड्या पाटलाचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तावदारला.
"आरं मंग.... घी की ठेका!"
"मला काय नगं ठेका बिका."
"धोंडीबा, लगा येवढं समदं गांव तुला मानतंय. आन त्वा असं उरफ़ाटं वागणं बरुबर न्हवं."
ह्या वक्ताला पह्यल्यांदा धोंड्याची आन पाटलांची नजरानजर झाली. पाटलाच्या नजरेत गळ टाकणार्‍याचे भाव आन धोंड्याच्या नजरेच गळात फ़सलेल्या माशाची घुसमट!

धोंड्याला बाटलीत उतरवायसाठी पाटलानं लै येळंला खेटं घातली हुती. पर आजवर कवाच त्यो हाताला लागला न्हाय.

"ही बघा...ती मला कायबी म्हाईत न्हाय.आगा सश्याची शीकार करनं येगळी गोष्ट हाय..पर लांडगं बिंडगं?...ती काय माझ्यानं हुनारं न्हाय. मला गरीबाला आपलं लोकाची मेंढरं राखून,..सुखानं चार घास खाऊ द्या की!"
धोंड्याचा आवाज घोगरा झाला.
"आरं धोंडू लेका आमी काय तुला वाघाच्या दावणीला बांधतूय व्हय? आमी हायच की लेका सोबतीला. समदी लोकं मिळून कायतर योजना बनवू....कस्सं?"
सुकानं धोंड्याची पाट थोपटत, पाटलाला डोळा घातला.
"कसली योजना?"
"ही बघ समद्या गावानं मिळून जर का लांडग्याला येडा घातला तर, कुठं पळणार हाय ती बेनं?"
"येडा घालणार कसा? लांडग्याचा ठीकाणा कुटं हाय ती कुणाला तरी ठावं हाय का?"
"आता कस्सं शान्यावाणी बोललास! आरं लगा तीच तर मदत पायजेल तुझ्याकडनं! तू लांडग्याचा ठीकाणा सोदून काड..मग समदी मिळून म्होरचा डाव आखू!"
"आगा येवढ्या जाळ्या आन बिळं हायती डोंगरात...कुटनं ठीकाणा सोदायचा म्हनं तेंचा!
ती जात काय येका ठीकाणावर र्‍हात अशील व्हय?"
"ती बी खरंच हाय की रं! म्हनूनशान तर तुझी मदत पायजेल. डोंगाराचं कोपरान कोपरा माहीत असलेला माणुस दुसरा कोण हाय का?"
"आगा तरी काय समद्या जाळ्या आन बिळं धुंडाळीत फ़ीरतूय व्हय मी? जोखमीचं काम हाय ती नाना!"
"आरं जंबेल हाय की तुझ्याकडं!"
"काय बोलतूस सुका, जंबेलच्यानं लांडगं अडणार हाय व्हय? .....आन जरी लांडग्याचा येक ठीकाणा कळला तरी बी ती काय तीतच थांबणार हाय व्हय!" भगवान ना राहून बोललाच.
"पाटील तुमच्याकडं तर लायसनची बंदूक हाय न्हवं?" भगवानच्या ह्या येकदम आलेल्या सवालानं केशव पाटील जरा बावचाळलाच.
"ती काय कामाची न्हाय रं....कवा वरातीच्या म्होरं बार उडवायला कामात आली अशील तेवढंच."
"चालंल की! निसता बंदूकीचा आवाज जरी आला तरी चालंल!"
"न्हाय रं भगवान, त्या कामाची बी न्हाय...लै वर्सापास्नं पार गंजून पड्ल्या बघ आता!"
पाटलानं आंग काढून घेतलं.

"मंग आता काय तोडगा दीसतूय? आपलं तर डोसकं चालायचं बंद झालीय बघा!"
सुकानं भरकटलेली गाडी परत मूळ मुद्यावर आणुन सोडली. सगळीजनं मग उगा आपलं येकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागली.भगवानच्या डोसक्यात येक आगळीच युगत घोळत हुती. थोडा वकूत इचार करुन मग त्यानं सबूद जमीवलं.
"बरं मंडळी...मी काय म्हणतूय...जर धोंड्याला ही कामगीरी सोपीवली. तर तेच्या मोबदल्यात त्येला काय मिळील?"
भगवान नानाच्या सवालानं बाकीच्या मानसापरास धोंड्याच जास्ती हादरला. त्येनं बोलायला त्वांड उघडलंच हुतं, पर भगवाननं त्येला नदरंनच थोपीवला.
"आरं लेका मिरवणुक काडू की त्येची....पाक शिवंपासनं...वाजवत आणतू गावात!"
पाटलानं भगवानच्या सवालाच्या सवालाचा रोख बरुबर हेरला हुता. आन त्या हिशेबानंच उत्तर दीलं. आन खिडकीतनं बाह्येर पानाची पिंक टाकली.
"ती काडालंच ओ पाटील. तरीबी कामगीरीचा कायतरी खरा मोबदला पायजेलच की!"
"आरं मग तुच सांग की....तू घरनं येताना आधी खल करुनच, घीवून आलायस न्हवं त्येला!"
पाटलाचा ह्यो आता थेट आरोप हुता भगवानवर!
"आमचं असलं कायबी ठरलेलं न्हाय...भगवान नाना उगा मला अडकीवू नगा!...आपल्याला काय ही जमनारं न्हाय!" धोंड्या उठून तडक चालायला लागला.
शीरमानं उठून धोंड्याचा हात धरला.
"आर्र ऐsss धोंडू बस खाली. भगवानला काय म्हणायचं हाय, ती तरी ऐकूया की आधी! तू बोल रं भगवान.."
"ही बघा...धोंड्याची गत सगळ्या गावाला म्हायीतच हाय. कुनाचीतर चार मेंढरं राखून सोताचं आन म्हातारीचं प्वाटपानी संबाळतूय. बानं मागं ना जमीन ठीवली ना पैसाअडका. धोंड्या कष्टाळू पोर्‍या हाय....आजवर गावातल्या हरेक मानसाला त्यो कवा ना कवातर कामाला आलाय. माझं फ़कस्त येवढंच म्हननं हाय की, आता समद्या गावावर आलेली ही अडचण जर का धोंड्याच्यानं सुटीत आशील तर त्येच्यासाठीबी समद्यांनी कायतरी कराय पायजे."
"आगा करू की मंग! न्हाय कोण म्हणलंय तंवा.. धोंडू तुच सांग तुझं काय मागणं हाय ती."
"शीरमानाना, बास करा वं ...माझं कायबी मागणं न्हाय...म्या आधीच सांगीतलंय.... ही काय माझ्यानं होणारं न्हाय!"
"आत्ता रं !....तुझ्यानं झालं तरचाच इशय हाय न्हवं ?..न्हाय झालं तर सोड की मंग!" भगवान या येळंला धोंड्यावरच डाफ़रला.
"बर....म्या काय म्हंतू भगवान, तुझं बोलनं आपल्याला पटलं. जरका धोंड्याचं कायबी मागनं नशील तर मी येक बोलू का ? ....धोंड्यानं ही काम केल्याव, त्येनं माझ्या कळपातलं दाखवील ती मेंढरु त्येचं!"
शिरमानं कंडकाच पाडला. समद्या हजर धनगरांनीबी शिरमाला दुजोरा दीला. सुका पंचानं भागातल्या समद्या धनगराकडनं येक मेंढरु मिळवून द्यायचा वायदा केला. आन येवढ्यावरच मिटींग सपली.

भगवाननं कसल्या हिशोबानं ह्यो आंगलटी येनारा चाबरापना केला ती काय धोंड्याच्या डोसक्यात घुसलं न्हाय. त्येनं कुनाला काय न बोलता गुमानं घराची वाट धरली.
भगवान लगोलग तेच्या मागं निघाला हुता. शिरमानं भगवानच्या खांद्यावर हात ठीवला.
"मी वस्तीवरच चाल्लुय आता."
"ब...रं ठीकाय मंग."
तेंचं बाकीचं बोलणं फ़कस्त नजरेनंच झालं.
येकेक करुन मंग समदीच जनता पांगली. केशव पाटील निस्ता तोंडातला पानाचा तोबरा चघळत बसून राह्यला.
आता तीथं फ़कस्त पाटील, सुका आणि जगन्या तीघंच राह्यले. जगन्या दरवाज्याजवळच घुटमळत हुता.
सुका उठला, "म्या निघू का ? " पाटलानं निस्ता हात हलवून निरोप घेतला. मग दरवाजातनं बाह्येर जावून त्वांड मोकळं केलं.

"खरजुल्या कुत्र्या...नालाच्या पायताननं क्यास काडलं पायजेत,तुझ्या डोसक्याचं!....रांडंच्या..येक काम सवंनं करायचं होत न्हाय व्हय रं तुला! त्या भग्यानं आधी जावून तीथं आय घातल्या, ती सांगाय त्वांड हुतं का न्हाय?"
जगन्या अंगावर फ़ुलं पडल्यावानी बिनलाज्यासारका हसला. झिंज्या खाजवत त्येनं हळूच लेंग्याचा खिशातनं येक चपटी बाटली बाह्येर काढली.
"इंग..लीश हाय....ही आणाय गेलतू,रघ्याकडं!"
"ढोस तुच. आन लोळ जाउन उकंरड्यात...तुझ्यासारख्याला हाताशी धरण्यापरास येखादं लूद भरलेलं कुत्रं बाळगलेलं बरं!"
जगन्याची अवस्था... न्हाय तरी कुत्र्यापरास काय कमी न्हवती!

******

गोडश्याच्या बोळातनं धोंड्याची काळी आक्रुती अंधारात गायब झाली. त्येला गाठायच्या हिशोबानं शिरमानं नेटानं सायकल चढाव दामटली. खालच्या आळीत लिंबाच्या झाडाजवळ दोनचार कुत्री धोंड्यावर धावून आली. पर जवा त्येंना धोंड्याची वळक पटली तवा शेपाट हलवत गपगार झाली.
"धोंडू, आरं थांब की वाईच!"
शीरमा सायकलीवरनं खाली उतरला. मग कायबी न बोलता तेच्याबरोबर चालायला लागला.
धोंडीबा शीरमाला चांगलाच वळकत हुता. आजवर शीरमाचं आन त्येचं येकदाबी बोलनं झालेलं न्हवतं! तेच्या शेताच्या बांधावरनं चाललेल्या मानसाशीबी त्यो कवा सोता हुन कधी बोलायचा न्हाई. ना कुनाच्या लग्नात जायचा ना कधी त्येला कुनी देवाम्होरं हात जोडताना पाह्यला हुता. कापडं तर बहुत्येक ह्या दीपवाळीची त्या दीपवाळीलाच बदलत अशील...बोकुड घनल्यावानी वास यायचा जवळनं गेला तरी! कोंडा म्हणायची, किती झालं तरी...वस्तीवर र्हानारी माणसं मंजी बिना मानसाळलेलीच! शीरमा तेचं पक्कं उदारन हुता. तसा शीरमा कसाबी असला तरी, त्येच्यासाठी आन त्येच्या घरासाठी. जरी त्यो कुनाच्या नडीला पडला नसला तरी कुनाला कवा नडला बी न्हवता. ह्यायेळंला पयल्यांदा धोंड्यानं त्येला चावडीवर मानसात पाह्यला अशील. आधी जवा कवा बघीतला तवा येकतर मोटंवर असायचा न्हायतर दाराव!
त्येचं अजून काय बोलायचं राह्यलं हुतं ती धोंड्याला कळायला मार्ग नव्हता.
रामुश्याचं टेकाड लागल्यावर धोंड्याची वाट येगळी झाली आनी धोंड्या शिरमाला तीठ्यावर सोडून फ़ुडं चालायला लागला. धा-पंदरा पावलं त्यो तसाच फ़ुडं गेला अशील मंग शीरमानं मागनं हाळी दीली. आधीच चाहूल लागलेली जंबेल हाकेच्या आवाजानं धोंड्यापर्यंत पोचली.
"आय वाट बघत अशील घरात...म्या चलतू नाना."
"येक म्हत्वाचं बोलायचं हुतं."
" नाना, आजच्यापुरतं झालं की आता!" धोंड्या पाठ फ़ीरवून परत चालायला लागला.
" त्यच्याबद्दल न्हाय बोलायचं मला...सुर्‍याबद्दल बोलायचं हाय."
धोंड्या जागच्या जागीच खिळला. धोंड्यासाठी त्येचा बाप म्हंजी येक दुखरा भाग हुता. तसं त्येच्याबद्दल सांगनारा काय शीरमा पह्यला मानुस नव्हता. कायजनं त्येच्या उदारपनाबद्दल बोलायची, कायजनं त्येनं सुरवातीच्या काळात केलेल्या कुस्त्यांबद्दल बोलायची, कायजनं त्येच्या दारुच्या धंद्यातल्या अटकळीवर बोलायची. गावातला हरेक मानुस सुर्‍याबद्दल बोलून पुरी रात जागवू शकील येवड्या कथा हुत्या...काही सारख्या...काही आगळ्या! काही गोर्‍या...तर काही काळ्या! धोंड्याला सगळं ऐकुन कटाळा आला हुता.
तरीबी...शीरमासरक्या मानसाला जी काय सांगायचं अशील त्येला न्हाय म्हननं शक्य न्हवतं...आपच त्येची पावलं शीरमाच्या मागं वळली.

तरटीच्या झाडाजवळ पोचल्यावर शीरमा थांबला. सायकल टेकन्याला लावून तीथल्या खडकावर बसला. कमरंला लावलेली मळकी चंची काढली. चंचीतल्या कप्प्यातनं चिमटभर तंबाकू काढून डाव्या तळहातावर ठेवली. मग अंगठ्याच्या नखानं टोकरुन डबीतला चुना काढून त्यावर चोळला. मग थाप मारुन चिमट तोंडात टाकली. मग तीथनं दीसनार्या गावातल्या मीनमीनत्या दीव्यांच्या पुंजक्याकडं टक लावून बघत बसला. जंबेल कान टवकारुन येकदा शीरमाकडं बघत हुती येकदा धोंड्याकडं.
तसं आज पुनवंला चार रोजच झालं हुतं..चांद उगवून दोनेक कासरं वर आला हुता. आसपासच्या शेतात कापसाची फ़ुटलेली बोंडं लुकलुकत होती. जनू चांदन्या जमनीवर सांडल्यावानी शेतं चमकत हुती.आसपास बारीक झुडूप सुदा नसलेल्या या टेकडावर ही तरटीचं झाड मातूर त्येच्या जोगत्याच्या मोकळ्या सोडलेल्या बटासारक्या लोंबनार्या फ़ांद्या घेवून हुबं हुतं. धोंड्या कळायल्या लागल्यापासनं ही तरटी बघत आला अशील. तवापासनं ती झाड तेवढंच हुतं. ना वाढत हुतं ना वाळत हुतं! गावातली पोरं म्हनायची तरटीवर भुतं र्हायला असत्यात. अवसंला तीतनं भुताची पालकी निघून मसनात जात्या आन तीतनं परत हीतंच तरटीजवळ सपत्या, असल्या कायतरी कथाबी हुत्या. धोंड्याला भुताची भिती न्हवती. पर त्येला ही तरटीचं हुबं झाडच भुतावानी वाटायचं. त्या झाडाच्या असल्या दीसन्यामुळंच असल्या कथा तयार झाल्या असतील, ही मातूर खरं. त्या झाडावर नेमानं बसनारा येक पिंगळा सोडला तर दुसरं कुटलं पाकरुबी तीकडं फ़ीरकायचं नाही.

"नाना...."
"आरं टेक की वाईच खाली.... बावानी सारका हुबा घोडाच हाय का तुझा?" शीरमाच्या बोलन्यात तीरसाटपना असला तरी त्यात वल हुती.
शीरमाच्या वाक्यावरनंच धोंड्याला अंदाज आला की, कदाचित सुर्‍याला शीरमा जवळनं वळकंत असावा. आन तेचा अंदाज खरा बी हुता. त्या रातीनंतर धोंड्याला त्येच्या बाची, त्येच्याच आतली, रक्तातली वळक पटली!

*********
क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शिव्या टाळल्या असत्यास तरीपन चालल असत ना!
बाकी भारी चालुय रे....,पुढचा भाग लवकर लिही म्हंजे लिंक तुटनार नाही.

किती झालं तरी...वस्तीवर र्हानारी माणसं मंजी बिना मानसाळलेलीच!,,,

आसपासच्या शेतात कापसाची फ़ुटलेली बोंडं लुकलुकत होती. जनू चांदन्या जमनीवर सांडल्यावानी शेतं चमकत हुती ,,,,,,

हे आणी तरटीच्या झाडाचे वर्णन भारी.
Happy