झाले मोकळे आकाश

Submitted by rupalisagade on 20 May, 2008 - 14:01

नमस्कार मंडळी,
मायबोलीवर प्रथमच लिखाण टाकत आहे. आणि कथा लिहिण्याचा ही हा पहिलाच प्रयत्न. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. सुचनांचे स्वागत आहे.
**********************

झाले मोकळे आकाश
**********************
अभि आज जरा खुशीतच होता.खुशीत असण्याचे कारण ही तसेच होते, त्याला अचानकच खूप वर्षांनी नितीकाचा शोध लागला होता!
-----------------------------------------------------------------------
अभि.. अभिजीत जोशी. एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करत होता.
दिसायला स्मार्ट, आणि कामातही तितकाच हुशार. त्याच्या नेतेगिरीवर त्याच्याबरोबर काम करणारे लोक खूश असायचे. नुकताच त्याच्या प्रोजेक्टचा क्लायंट त्यांच्या ऑफिसला भेट देवून गेला होता आणि त्यानंतर
प्रोजेक्टची रिक्वायर्मेंट वाढली होती म्हणून तो मनुष्यबळ शोधत होता. मनुष्य पुरवठा विभागाने, त्याला पाच-पंचवीस लोकांचे रिझ्युम पाठवले होते. मागच्या आठवड्यात ते रिझ्युम डोळ्याखालून घालताना,
एका नावापाशी तो थबकला.. Nitika Kulkarni, B.E. Computer, ३ yrs Exp in J2EE. त्याचे डोळे एकदम चमकले ! नितीका आपल्याच कंपनीत आहे... आणि मला माहितीही नाही ! पुढची पाच मिनीटे तो स्वत:मधेच हरवला होता..नितिका.. त्याच्या डोळ्यासमोर नितूचा चेहरा आला.! त्याचे त्यालाच हसू आले. ही आपलीच नितू असेल तर.. त्याच्या मनात विचार आला. ’पण ही तीच असेल कशावरुन..?’ त्याच्या दुस-या मनाने आपले डोके वर काढलेच..! असली तर असू दे, हिचा इंटरवह्यु घ्यायला काय हरकत आहे..तसेही हिचे प्रोफाईल मॅच होतेच आहे..त्याने तिचे नाव शॉर्टलिस्ट केले.
’काय अभि, कुठे हरवला आहेस..? गेले पाच मिनीटे मी तुझ्या मागे येवून उभा आहे.. आणि तुझे लक्ष ही नाही !’ ’हा काय रिझ्युम वाटतं... आणि तो ही मुलीचा... पोरीने काय फोटू-बिटू पाठवलाय की काय.. एवढे टक लावून बघतो आहेस..?’
’काही नाही रे, दुपारचे जेवण जास्त झालयं बहुतेक, चल जरा चहा घउन येउ..’. मनातले भाव चेह-यावर न येउ देता अभि खुर्चीतून उठला.
-----------------------------------------------------------------------
त्या रात्री ऑफिसमधून येताना, त्याचे मन तिच्या आठवणीत हरवून गेले. कार मध्ये CD वर ट्रॅक सुरु होता..’पल पल दिल के पास..’. .नितू..नितिका कुलकर्णी. अभिचे पहिले प्रेम ! ते प्रेम होते की आणखी काही कुणास ठाउक, पण या आठ वर्षात तो नितूला जराही विसरला नव्ह्ता. खरंतर नितीकानंतर कितीतरी मुली त्याला भेटल्या, तिच्याहून लोभस, हुशार आणि सूंदर..पण कुणीही तिची जागा घेवू शकले नाही.
ड्राईव्हिंग करता करता तो नऊ-दहा वर्षे मागे गेला..

-----------------------------------------------------------------------
त्यांच्या बंगल्याशेजारच्या अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर एक छोटा फ्लॅट होता. बरीच वर्षे तो फ्लॅट बंद होता. त्याच्या खोलीच्या अगदी खिडकीसमोर त्या फ्लॅटची खिडकी होती. त्याला कायम वाटायचं, या फ्लॅट मध्ये कोणी रहायला आले तर किती छान होईल.. अभ्यासचा कंटाळा आला की हळूच समोरच्या खिडकीतून पलिकडे डोकावता येइल..पलिकडे कोणी असेल तर मस्त गप्पा मारता येतील.. अगदीच नाहीतर टिव्ही दिसला तरी चालेल..पण हाय.. ! ती खिडकी कधीच उघडली नाही.

अभि आता इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. बारावीची सुट्टी मनसोक्त उपभोगल्यानंतर कॉलेज नुकतेच कुठे सुरु झाले होते. एका दुपारी कॉलेज मधून आल्यावर तो पलंगावर लोळत पडला होता. अचानक त्याला समोरची खिडकी उघडलेली दिसली.
’आजी..अंग समोरच्या फ्लॅटच्या खिडकी उघडली आहे आज..कोणी रहायला आलं वाटतं इथे?’
त्याने तिथूनच आजीला हाक मारली.
तिच्या उत्तराची वाट न बघता, तो खिडकीतून डोकवू लागला. समोरच्या घरात सामानाची आणि माणसांची गजबज होती.. कोणीतरी काकू सामान लावण्याच्या सुचना देत होत्या...
’चला.. आता थोडे दिवस तरी अभ्यास करता करता टाईमपास करता येइल..’अभिने विचार केला.

एक-दोन दिवसात त्याला जाणवले, समोर फक्त दोनच व्यक्ती रहायला आल्या आहेत.एक मध्यमवयीन काकू आणि एक मुलगी.. बहुदा माय-लेकी असाव्यात. त्याच्या कल्पनेप्रमाणे पलिकडचा टि.व्ही वगैरे काही दिसत नव्हता..’so boring ! काही उपयोग नाही समोरची खिडकी उघडून !’ तो जरा वैतागलाच !

आजीने तिच्या सवयीप्रमाणे माहिती काढलीच.
जेवताना कधीतरी आजी आईला सांगत होती, ’ब्राम्हणाचे कुटुंब आहे बरं..कुलकर्णी आडनाव आहे.’
’हे बरं झालं.. उगीच नको नको ते वास सहन करायला लागायचे नाहीतर..’ इति आई !
’दोघीच मायलेकी आहेत. नव-राची बद्ली झालीय तिच्या, तिकडे गुजरातला.लेकीच्या शिक्षणासाठी इथे राहिल्यात दोघी. कंपनीचे घर सोडावे लागले, म्हणून इथे राहिल्या आल्यात..’ आजीनी सविस्तर माहिती सांगितली..

समोरच्या खिडकीत एक टेबल खुर्ची लागली. आणि मग ती मुलगी त्याला त्या खुर्चीत रोज दिसू लागली. ती तिची खोली होती बहुतेक.. कधी रेडिओचा आवाज यायचा.. तर कधी एखाद्या गाण्याबरोबर तिचाही आवाज ऐकू यायचा. त्याला जाणवलं, बरंच बर गाते ही !
हल्ली तिचं दर्शन रोजच घडत होतं...कधी-कधी सोसायटीतल्या मुलींच्या घोळक्यात तर कधी सायकलवरुन जाता-येता.. नकळत केव्हातरी नजरेला नजर भेटली.. आणि मग त्याला छंदच जडला, नजरेचा खेळ खेळायचा..तिलाही कदाचित ते जाणवत होतं. तिला बावरायला व्हायचं एकदम..नजर चोरुन ती हळूच हसायची..
'आयला! ! काय गोड हसते ही...!’ अभिला वेड लागले होते तिच्या हसण्याचे..
गप्पा मारतानाही अभिची नजर काय शोधत असते हे एव्हाना मित्रांच्याही लक्षात आले होते...
ती मैत्रिणींबरोबर जवळपास असली की मग ह्यांना चिडवण्याला जोर यायचा, त्याला ऐकवलं जायचं.. ’मेरे सामने वाले खिडकी में...’!

-----------------------------------------------------------------------

'May I speak to Nitika?'
'ya, speaking..'
'Nitika, this is Abhijit joshi, leading xyz project team. we are looking for a abc skilled resouce, and received your resume. Is this a good time to talk to you?'
'Yes, we can continue abhijit..'
अभिने नितीकाचा technical interview घेतला. interview त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला झाला.
’Is it feasible for you to meet personally day after tomm..?'
'sure, at what time?'
'11.00 am?'
'ok, I will reach there.'
'ok then see u..'
'bye, Nice Speaking with you Abhijit..'

----------------------------------------------------------------------------

फोन ठेवता क्षणी, नितीकाच्या लक्षात आले, अरे आपण आत्ता ’अभिजीत जोशी’ नावाच्या व्यक्तीशी बोललोय! तिच्या उदास चेह-यावर हलकेसे हसू आले..
’त्यात काय एका नावाची कितीतरी माणसे असतात, आणि हे नावही किती common आहे ! हा अभिच असेल कशावरुन?’ तिने स्वत:लाच विचारले !
’पण आवाज तर त्याच्यासारखाच वाटला..’ नितीकाचे खोल गेलेले डोळे, अचानक चमकले.
’असेलही कदाचित..’ तिने पुन्हा ई-सकाळ मध्ये डोके खुपसले.

-----------------------------------------------------------------------

आज अभि सकाळपासूनच बेचैन होता. ऑफिसची तयारी करताना ही गोंधळला होता...आईच्याही लक्षात आले..’काही नाही ग सहजच’ म्हणून तो निघालासुध्दा..आज ११.०० वाजता नितीका इंटरव्ह्युसाठी येणार होती. परवा फोनवर तिच्याशी बोलल्यानंतर ती ’नितू’च आहे याविषयी काही शंकाच नव्हती.तोच आवाज, तिच बोलण्याची ढब..
’अजूनही तशीच असेल का ती?की बदलली असेल..?’
’ओळखेल का ती आपल्याला?’ ’की विसरली असेल..?’, ’
’तिच्या मनात आता दुसरे कुणी...’
तिच्या विचारात तो ऑफिसला पोहोचला. ’घोडयाला लगाम घालावा, तसा त्याने मनाला लगाम घातला. आणि कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करु लागला.

-----------------------------------------------------------------------

'Excuse me Abhijit'..
खुर्ची वळवत अभिने मागे पाहिले.
’हाय, I am Nitika, 'we had talked over phone day before yesterday'
'ओह, हाय...’.
नजरानजर झाली आणि नजरेला नजरेची ओळखही पटली...
’Lets go to discussion room'..

-----------------------------------------------------------------------

'कशी आहेस नितीका... किती वर्षांनी भेटतोय आपण... !’ अभिला जाणवले, ती अजुनही तशीच दिसते, वयामुळे थोडा फरक पडलाय, but she is still as charming as she was..
’कशी दिसतेय तुला...? आणि तू सांग, तू कसा आहेस...बराच जाड झाला आहेस बरं का !’
’ए.. इतक्या वर्षात एवढा होणारच ! नाही का? बर आधी काम संपवू आणि मग कॅंटीनमध्ये चहा पित निवांत गप्पा मारु.’
...
...
.
-----------------------------------------------------------------------

दुस-या दिवशी नितीकाने त्याच्या प्रोजेक्टला जॉईन व्हायचे ठरले.
दुपारचे जेवण दोघांनी एकत्र केले. त्याला असे उगीच वाटून गेले की, नितीका मोकळेपणे बोलत नाहीये. तिच्या घरच्यांची चौकशी केल्यावरही तिने उत्तर द्यायचे टाळले होते, व विषय एकदम बदलला होता.
त्याला जरा हे खटकले. ’इतक्या वर्षांनी भेटल्यामुळे कदाचित तिला संकोच वाटत असेल’, त्याने स्वत:ला समजावले.
दुपारनंतर अभिला कामामुळे क्षणाचीही उसंत नव्ह्ती. क्लाएंट कॉल संपवून तो ऑफिस बाहेर पडला, तेव्हा साडे-दहा वाजत आले होते.
कामातून निवांत झाल्याक्षणी त्याला नितूची आठवण आली. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला.
’वॉव.. she is going to work with me frm tomm..', ’पण ती इतकी तुटक का वागत होती? आणि चेहराही जरा निस्तेज वाटत होता तिचा...काय कारण असेल नक्की? त्याचे मन तिच्याच पाशी येउन थांबत होते.
त्याला नितूची आणि त्याची पहिली भेट आठवली..
-----------------------------------------------------------------------

’टिंग-टॉंग..’
’अभि जरा बघतोस का रे..’ आजीने अभिला हाक मारली.
अभि टिव्ही बघण्यात दंग होता. क्रिकेटची मॅच ऐन रंगात आली होती, सचिन ९५ वर खेळत होता.त्याच्या सेंच्युरीची वाट पहात तो एक-एक बॉलवर लक्ष ठेवून होता.
पुन्हा बेल वाजली..टिंग-टॉंग..’
’आत्ता कोण आलय त्रास द्यायला..?’ वैतागानेच तो उठला आणि दार उघडले.
दार उघडले आणि त्याला क्षणभर काही सुचलेच नाही. तिला अनपेक्षित पणे घरी आलेले पाहून तो बावरला.
’ये ना...’ त्याला म्हणायचे होते खरंतर, पण शब्द ओठावर आलेच नाहीत.
ती अजून दारातच उभी !
’कोण आहे रे अभि..’, आई हात पुसत बाहेर आली..अभिच्या चेह-यावर अजुनही गोंधळ
’काकू, मी नितीका..’, शेवटी तिनेच उत्तर दिले.
’अग ये ना, चल आत बसूया, आज कशी काय आलीस इकडे..? आणि अभि तिला असे दारात काय उभे केले आहेस..? वेंधळा आहे नुसता..’
अभिच्या लक्षात आले आणि तो एकदम बाजूला झाला. आईच्या बोलण्यावर गालातल्या गालात हसत नितीका आत गेली. ’हिच्यासमोर वेंधळा म्हणायचे काही कारण होते का आईला?’ अभिला आईचा त्याक्षणी खूप राग आला.
ती आली तशी दहा-पंधरा मिनीटानी निघून गेली. जाता-जाता अभिला एक गोड स्माईल देउन गेली..अभिला कळेना, ’हे स्वप्न की सत्य?’
’कशाला आली होती ग ती?’
दार लावता लावता त्याने आईला विचारले..
’काही नाही रे, तिला higher English जरा अवघड जातयं. मी तिची tution घेइन का हे विचारण्यासाठी आली होती. तिला टेंन्शन आलयं. पुढच्या वर्षी बारावीला English मुळे percentage कमी व्हायला नको असे म्हणत होती...’अभिची आई एका नामांकित शाळेत ईंग्रजीची शिक्षिका होती.
’मग?’
’मग काय? मी हो म्हणून सांगितले तिला..’
’अरे वा चांगलच आहे माझ्यासाठी’.. मनातून तर खूप आनंद झाला त्याला.. पण तो आईला थोडाच दाखवता येणार ! ’अच्छा.. मग तू आता घराची पण शाळा करणार का..?’ अभिने उगीच खोटा राग दाखवला..
’ए शहाण्या, एका Tution ने काही शाळा भरणार नाही ये इथे.. आणि तुला रे काय अडचण होणार आहे, मी तिला शिकवले तर?’
’मला काय त्रास होणार ?’ अभिने पुन्हा मॅचमधे लक्ष घातले.
-----------------------------------------------------------------------

आणि नितीका रोज संध्याकाळी येऊ लागली. सुरुवातीला स्माईल, नंतर येता-जाता हाय-बाय, कधीतरी क्लास नंतर पाच-दहा मिनीटांच्या गप्पा एवढी प्रगती अभिने लवकरच केली.
अभिची संध्याकाळी घराबाहेर पडण्याची वेळ बदलल्याचे आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण तिने त्याला काही दाखवले नाही. नितीका तिलाही आवडायची. हे असे घडणारच ह्या वयात.. असे म्हणत तिने त्याच्यातील बदलांकडे दुर्लक्ष केले.
गप्पाची देवाण-घेवाण पुस्तके, गाण्यांच्या कॅसेटस पर्यंत गेली. दोघांच्या आवडी जुळल्यावर मैत्रीचा वेल फुलायला वेळ कितीकसा लागतो ! चार-पाच महिन्यातच मैत्रीचे रोपटे रुजले. ती अधे-मधे त्याच्याकडे मॅथ्सचे/फिजीक्सचे प्रॉब्लेमस घेऊन यायची.. ते सोडवता-सोडवता वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही..
तिच्या इतक्या जवळ येणे अभिला एका सुंदर स्वप्नाप्रमाणेच भासायचे.. दिवसागणिक त्याची तिच्याविषयीची ओढ वाढतच होती. तिच्या मनात नक्की काय असावं याचा तो कित्येकदा अंदाज घ्यायचा. पण अजुनही काही ठाव लागत नव्हता.
एक दिवस दुपारी कॉलेजमधून येताना अभिला नितीका दिसली. तिच्याबरोबर कोणीतरी मुलगा होता.दोघे सायकल हातात घेउन गप्पा मारत चालले होते. ’हा कोण बरं असेल..?’ त्याने तिला संध्याकाळी विचारायचे ठरवले..
संध्याकाळी दोघे गच्चीवर गप्पा मारत उभे होते.
’काय मॅडम, आज दुपारच्या चांदण्यात कोणाशी गप्पा मारत चालला होता आपण? कोणी खास व्यक्ती आहे वाटतं?’
’मी?’
’मग कोण मी?मी पाहिले तुला दुपारी, F.C road war..'
'oh.. अरे तो माझा कॉलेज मधला मित्र आहे...’
’अगदी जवळचा मित्र आहे वाटंत..? इतक्या उन्हात..सॉरी चांदण्यात गप्पा मारत होता !’
नितीकाला त्याच्या बोलण्यातील रोख कळला..’ जवळचा तर आहेच.. पण...’
’पण काय?’
’पण..तुझ्यापेक्षा कमी !’ नितीका म्हणाली, आणि हळूच गोड हसली..
’ओ हो...खरं की काय?’...त्याने नकळत तिच्या हातावर हात ठेवला..
’हं...’ ती चक्क लाजली.

त्या रात्री अभिला झोपच आली नाही.. ती लाजलेली नितीका सतत डोळ्यासमोर येत होती..
नितीकाच्या खोलीतून त्याला गाणे ऐकू येत होते.. ’पहला नशा..पहला’

-----------------------------------------------------------------------

रात्रीचे जेवण एका मैत्रिणीबरोबर उरकून नितीका रुमवर आली. रेडिओ सुरु केला. मिर्चीवर ’पुराने जिन्स के पॉकेटसे’ सुरु होते. ’तुमको देखा तो ये खयाल आया...जिंदगी धूप तुम घना साया...’ जगजितजी गात होते..
नितीकाला अभिची आठवण आली. आठवायला खरतर ती विसरलीच कुठे होती त्याला? मनाच्या तळघरात त्याच्या आठवणी बंदिस्त करुन ठेवल्या होत्या... आज तो भेटला आणि त्या तळघराचे कुलूप ताडकन तुटून पडले..सा-या आठवणी पुन्हा मोकळ्या झाल्या..
तिलाही खूप छान वाटले अभिला भेटून. अनाथ-एकाकी जगताना तो असा अचानक समोर येइल असे तिला स्वप्नातही वाटले नव्ह्ते. या सुखद योगायोगाने ती खूप सुखावली होती. पण तरीही मनात भिती होतीच.. आधी रुजलेले नाते इतक्या वर्षांनी फुलेल? त्याच्या आयुष्यात आणखी कोणी मुलगी आली असेल तर? माझ्यामुळे त्याच्या मनात आता चलबिचल होणार नाही ना?
ती अकरावी - बारावीत असताना, त्या दोघामध्ये एक नाजूक बंध तयार झाला होता. दोघांपैकी कोणीही ते बंध शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही एकमेकांविषयीची ओढ वाढतच होती.मैत्रीच्याही पलिकडले नाते जुळले आहे हे त्याच्याइतकेच तिलाही जाणवत होते. पण आज न उद्या त्याचा विरह वाटयाला येणार आहे हे ही तिला माहिती होते.
तिच्या आई-बाबांचे पटत नव्हते. बाबांच्या आयुष्यात आणखी कोणीतरी आले आहे हे तिला समजले होते.वेगळे होण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली आणि आईने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तीही सरकारी नोकरीत करत होती. प्रकरण न्यायालयात गेले. नितीकाचा शिक्षणाचा हा टप्पा पार पडेपर्यंत पुण्यातच रहायचा निर्णय झाला.
आता दोघीच मायलेकी अभिच्या शेजारच्या सोसायटीत रहायला आल्या होत्या. या नव्या जागेत कुणालाही त्यांनी खरी परिस्थिती सांगितली नाही. तिची बारावीची परिक्षा झाली की मुंबईला नितीकाच्या आजोळी जायचे हे आधीच ठरले होते.
अभिशी मैत्री केल्यावरही नितीका त्याला ह्याविषयी एक शब्द ही बोलली नाही. तिचा जीव त्याच्यात गुंतत चालला होता. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता ती ते नाते जोपासत होती, शेवट दिसत असुनही ती स्वत:ला थांबवू शकली नाही. दोघेही एकत्र अभ्यास करायचे..तिला लागेल ती मदत अभि करायचा.
बारावीची परीक्षा संपली आणि त्या मुंबईला जायला निघाल्या. बाबांची मुंबईला बदली झाली आहे हे कारण सांगून तिने त्याच्या प्रश्नांमधून स्वत:ची सुटका करुन घेतली.

-----------------------------------------------------------------------

नितू मुंबईला आली त्याला दोन महिने होत आले होते. अभिचा आणि तिचा पत्रांचा खेळ सुरु झाला.
बारावीचा रिझल्ट लागला, तो आणायला ती पुण्याला गेली. तिचे मेरीट थोड्या मार्कांसाठी हुकले होते. तिने पुण्यात गेल्यावर अभिला फोन केला. दोघे भेटले. पोटभर गप्पा मारल्या.. तास- दोन तास त्याच्याबरोबर घालवून नितिका परत आली.
लवकरच तिच्या मामीला कळले की की नितूला पुण्याहून नियमित पत्र येतात. आईला ही माहिती होते पण आईला त्यात काही गैर वाटले नाही. मामीने मात्र तिला त्यावरुन बोलायला सुरु केले. मामीला त्या दोघींचे तिथे रहाणे पसंत नव्हते. नितूची आई कमावती होती, तरीही तिच्या संसारात तिला या दोघींचे अस्तित्व नकोसे वाटत होते. मामी उघड उघड बोलू लागली..’ही काय नसती थेंर ह्या मुलीची.. कोण कुठला मुलगा त्याला एवढी पत्र ! नक्कीच काही तरी लफडं असणार तुझं.. बापाने दिवे लावलेच आता पोरगी ही त्याच वळणाने जाणार का? आमच्या घरात हे असले खपवून घेणार नाही.’
नितूने मनावर दगड ठेवला आणि पत्र पाठवणे हळूहळू बंद केले.एकदा तिला वाटले की त्याला सगळे सांगावे. पण आपल्याच आई-बाबांविषयी सांगण्याचे तिला जिवावर आले. तिने तिथेच थांबायचा निर्णय घेतला.
तिला मुंबईतल्या नावाजलेल्या इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळाला. आईची नोकरी सुरुच होती.
हळूहळू मामीचा त्रास वाढला. नितूला अभ्यास करणे ही अशक्य होवू लागले. लवकरच दोघी तिथूनही बाहेर पडल्या.
-----------------------------------------------------------------------

इंजिनियरींग संपता संपताच नितीकाला कॉलेजच्या कॅंपस मधून एका मोठ्या I.T. कंपनीत नोकरी लागली. B.E. झाली की लगेच जॉईन व्हायचे होते. तिला अभिची आठवण आली. कॉलेज मधे खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या, पण अभिची जागा अढळ होती.तो खूप खुष झाला असता माझे यश समजल्यावर.
आता जरा सुखाचे दिवस आले.. आईचे कष्ट कमी झाले.ती आईच्या मागे लागली, आता नोकरी बास..घरी बसून निवांत आराम कर. पण ती ऐकेना.. म्हणायची, तू लग्न करुन गेलीस की मी एकटी दिवसभर घरी काय करु? आईचा गोरेगाव ते नरिमन पॉईंट प्रवास करणे सुरुच होते.
एक दिवस अचानक लोकलमध्ये बॉंबस्फोट झाले. आई ज्या लोकलने प्रवास करायची ती लोकलही त्या तडाख्यात सापडली. नितीकाचा एकुलता एक आधार, तिची आई..तिचे शेवटचे दर्शन ही तिला घडले नाही. नितिका अनाथ, पोरकी झाली.

-----------------------------------------------------------------------

नितीका अगदी एकाकी पडली होती. मामा मामी पंधरा दिवस राहून गेले. बाबांनी सांत्वनाचा एक फोन केला फक्त. ती सुकून गेली. कशातच रुची वाटेना. घरी सारे उदास. जिथे तिथे आईचे अस्तित्व जाणवे. घरी आले की घर खायला उठे ! मुंबईच्या गर्दीत तिचा जीव गुदमरु लागला. तिने पुन्हा पुण्यात यायचा निर्णय घेतला. कंपनीने बरेच आढेवेढे घेत शेवटी तिची बदली मंजूर केली.
नितीका पुन्हा पुण्यात आली.

-----------------------------------------------------------------------

नितीकाला पुण्यात येवून सहा महिने झाले. तिला अधून मधून अभिची आठवण यायची.
मोबाईलवर त्याचा घरचा नंबर टाईप करायची कित्येकदा, पण तिचे धाडस होत नव्हते. त्याने जर काही विचारले तर त्याला काय उत्तर द्यावे तिला समजत नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी तिला तिचा अभि भेटेल की नाही अशी शंका होतीच. त्यापेक्षा त्याच्या सुखद आठवणीत रमणेच तिला जास्त योग्य वाटले.
मुंबईचे काही मित्र मैत्रिणी पुण्यात नोकरीसाठी रहात होते. त्यांच्यात तिचा वेळ जायचा. पण तरीही एकटेपण जाणवायचे. मामाने तिला तिच्यासाठी मुलगा बघू का विचारले. तिने नम्रपणे नकार कळवला.
मधेच कधीतरी तिच्या बाबांचा तिला फोन आला. त्याना तिची गरज होती.तिचा आधार हवा होता. नितूची द्विधा मनस्थिती झाली. एकीकडे १५-१६ वर्षे त्यानी दिलेले प्रेम आणि दुसरीकडे त्यांच्यामुळे तिची व आईची झालेली होरपळ. त्यांना पुन्हा आपलेसे करावे की नाही तिला समजत नव्ह्ते.
-----------------------------------------------------------------------

आणि ग्रीष्माच्या तडाख्यानंतर वळवाचा पाउस बरसावा त्याप्रमाणे रुक्ष एकाकी आयुष्यात पुन्हा अभिचे आगमन झाले होते. तिला तो रोज भेटणार होता. दिवसाचे आठ-नऊ तास तो तिच्या डोळ्यासमोर दिसणार होता. आज खूप दिवसांनी तिला शांत झोप लागली.
-----------------------------------------------------------------------

नितीकाला अभिजीतचे प्रोजेक्ट जॉईन करुन २ महिने झाले. अभिच्या सहवासात ती तिचे दु:ख थोडेफार विसरली.अधून मधून बाबांचा फोन यायचा आणि मग ती अस्वस्थ व्ह्यायची. अभिला ते तिच्या कामातून जाणवायचे. तिला तिचे दु:ख कोणालाही सांगता येत नव्हते. आणि ती अशी उदास का हे कोडे अभिला सुटत नव्ह्ते.
त्यांच्यातला संवाद पुन्हा वाढू लागला. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचे एकत्र जेवण, जेवणानंतरच्या गप्पा.. कधीतरी रात्रीचा फोन.ती पुन्हा फुलू लागली.
दोघेही एकमेकांचा पुन्हा अंदाज घेत होते.
एकदा तिने जेवताना त्याला विचारले ,
"काय अभि लग्न कधी करतो आहेस.. म्हातारा व्हायला लागलास आता...!"
’हं करायचे तर आहे..पण कोणी होकारच देत नाही... तू हो म्हण.. लगेच करतो..." अभि पण चाचपडत होता, तिच्या मनाचा वेध घेण्यासाठी..
ती काही न बोलता हळूच गालातल्या गालात हसली, आणि अभिला गच्चीतली लाजरी नितू आठवली.

-----------------------------------------------------------------------

त्यादिवशी नितीकाच्या मनात सतत त्याचे शब्द रुंजी घालत होते. खरच होईल का माझे त्याच्याशी लग्न? तिला एकदम वाटून गेले. पण मग त्याला आपल्या बाबांविषयी सांगावे लागेल. त्याला जर कळले की आई-बाबा वेगळे झाले होते, तर त्याला काय वाटेल? तो त्याचा निर्णय बदलणार नाही ना? आणि त्याचे आई-बाबा...ते स्विकारतील का मला सून म्हणून? अणि इतके वर्ष मी त्याला माझ्या कुटुंबाविषयी खोटे सांगितले म्हणून मी त्याच्या मनातून तर उतरणार नाही ना..
असे जर काही झाले तर ते सहन करु शकेन का मी? इतक्या दिवसांच्या एकटेपणानंतर थोडा आनंद जीवनात येऊ पहातोय. पण भूतकाळाचे भूत त्याची वाट अडवून बसले आहे. काय करावे...तो नाही म्हणाला तर आहे ती मैत्री ही संपेल कदाचित.. त्यापेक्षा हे मैत्रीचे नाते जपायला मला जास्त आवडेल..
तिला काहीच सुचत नव्हते.

-----------------------------------------------------------------------

अभि थोडा अस्वस्थ होता. नितीकाच्या आयुष्यात दुसरे कोणी नसावे, त्याचे मन त्याला सांगत होते. पण मग ती मध्येच अशी तुटक का वागते.. उदास का होते... काही समजत नव्हते.
आईला जाणवले, आज अभिचे जेवणात लक्ष नाही. ताटतला पहिला भात कितीतरी वेळाने संपवून तो अर्धवट जेवण करुन उठला. तो गच्चीवर गेल्याचे तिच्या नजरेतून सुटले नाही.
स्वयपाक घर आवरुन ती वर गेली. अभि विचारांमध्ये इतका हरवला होता की, आई शेजारी उभी राहिली आहे हे ही त्याला कळले नाही. त्याचा हाता हातात घेत तिने विचारले,
’काय झालय राजा? इतका अस्वस्थ का आहेस? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का?’
अभिने थोडा विचार केला आणि आईशी बोलायचे ठरवले. त्याने तिला नितीकाविषयी सारे सांगितले, अगदी ती शेजारी रहायची तेव्हापासून तिच्याबद्द्ल असलेल्या त्याच्या भावना... आत्ताचे तिचे वागणे सारे..
’माझे प्रेम आहे गं तिच्यावर, तिला असे उदास बघून माझा जिव तुटतो तिच्यासाठी.. काय करु काहीच समजत नाही...’
आईला सारे लक्षात आले.ती त्याला म्हणाली, ’तू तिच्याशी बोलत का नाहीस एकदा..? तुला जे वाटते ते सारे सांगून टाक..नक्की काहीतरी मार्ग निघेल..

-----------------------------------------------------------------------

दोन दिवस तसेच गेले.शुक्रवार उगवला. अभिने ठरवले, नितूला उद्या संध्याकाळी भेटायचे. आणि सारे बोलायचे. जे काही होईल ते एकदाच होवून जाउ दे.
दुपारी चहाची वेळ झाली. अभि नितूकडे आला.
’चल चहा घेउन येवू..खूप झोप येते आहे..’
’चल... कालपण रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहिला वाटतं’, ती उठता उठता म्हणाली.
....
.
.
’तू उद्या संध्याकाळी काय करते आहेस..’
’काही नाही.. का रे?’
’मग उद्या ची संध्याकाळ तू मला देणार आहेस..’
’हे काय अचानक...काय विशेष?’
’ते तुला तेव्हाच सांगेन.’
अभि असे भेटायचे म्हणतोय म्हणजे ह्याला काय बोलायचे असेल ह्याची नितीकाला जरा कल्पना आली, पण तरी तिने विचार केला, जे घडते आहे ते घडू द्यावे.
’बरं बाबा.. ठीक आहे’.

-----------------------------------------------------------------------

ठरलेल्या ठिकाणी अभिजीत नितीकाची वाट पहात उभा होता. हवा जरा ढगाळच होती. पाउस पडेल की काय असे वाटत असतानाच, पाच-दहा मिनीटात नितीका आली. ती आज नेहमीपेक्षा वेगळीच भासली त्याला. खास त्याच्यासाठी तयार झाली होती ती. लेमन कलरचा नाजूक ड्रेस, जोडीला लाईट मेक-अप, केसात मोग-याचा गजरा, त्याला नव्यानेच भेटत होती ती जणू..
थोडा वेळ असाच गेला.. ऑफिसच्या गप्पा झाल्या.. अवांतर चर्चा झाली..खाण्याची ऑर्डर देवून झाली. अभि काही विषय काढेना..
’हं काय विशेष आहे ते सांगितले नाहीस तू अजून?’ - नितीका
’अं...हं सांगतो ना..काय घाई आहे... तुला घाई नाहिये ना..?’- अभि आज पहिल्यांदाच इतका नर्व्हस झाला होता.
’नाही..अजिबात घाई नाहीये..अगदी निवांत आहे मी.. आज की शाम आपके नाम..’ ती हसली..आणि तो ही..
..
.
.
’नितीका..’
’हं.. बोल ना..’
’काही सांगायचं आहे तुला... I mean काही विचारायचे आहे..’ अभि अजुनही नर्व्हस होता. त्याचे पाय थरथरत होते.. पोटात मोठा खड्डा पडला होता.
’सांगायचे की विचारायचे..?’
’दोन्ही.....नितू...नितू, मला तू खूप आवडतेस...आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे..तू माझ्याशी लग्न करशील?’ अभिने एका दमात सगळे सांगितले..
इतक्या वेळ अवखळ वाटणारी नितू एकदम गंभीर झाली. तिला अपेक्षित होते हे.तिने तिच्या मनाची तयारी केली होतीच..
’अभि, अभि मला ही तू तितकाच आवडतोस.. तू माझ्या आयुष्याचा जोडीदार होशील या सारखे सुख आणखी काय असू शकेल?पण...’ नितू पुन्हा उदास झाली.
’पण? पण काय नितू? हा पण का आहे मध्ये? असे काय कारण आहे ज्यामुळे आपण एक होवू शकत नाही?’
’कसे सांगू तुला...’ नितूचे डोळे भरले...
’जे काही असेल ते सांगून टाक बरं.. तुझं मधेच माझ्या जवळ येणं, मग अचानक असं उदास होणं, परक्यासारखं वागणं, ह्या सा-याचा मला अर्थच लागत नाहीये.’
’अभि, मी तुझ्याशी खोटं बोलले रे..’
’काय झालंय नक्की...?’

-----------------------------------------------------------------------

तिने त्याला सारे सांगितले. तिची कथा ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आले.तिने असे काही भोगले असेल, त्याचा विश्वासच बसेना. आणि आपल्याला हे कधीच कसे जाणवले नाही याचे त्याला आश्चर्य वाटत होते..त्याने स्वत:ला सावरले.
’नितू, तू जे काही सांगितलेस ते खरंच अतिशय दु:खद आहे..तू माझ्यापासून हे सारे लपवलेस ते चूक केलेस, तुझी माझी मैत्री इतकी घनिष्ट असतानाही तू मला तुझे दु:ख जाणवू दिले नाहीस याचे फार वाईट वाटते मला.. आणि याचा आपल्या लग्नाशी काय संबंध?’
'खरं सांगू का अभि, ह्या घटनेने मला खूप काही शिकवले आहे. आई-बाबा वेगळे होताना झालेला त्रास मी अजून विसरली नाहीये. अजून आठवले तरी शहारा येतो. आणि त्यांची मुलगी म्हणून मला माझ्या मामीने केलेला मानसिक छळ तर केवळ अमानुष होता. एकटी म्हणून आईला कितीतरी भोगावे लागले. . मला सांग, माझा आणि आईचा काय दोष ह्या सगळ्यात? समाजाच्या ह्या दृष्टीकोनाचीच भिती बसली आहे मनात. स्वत:ला सुशिक्षीत म्हणवणारे लोक जेव्हा एका घटस्फोटित बाई विषयी भले-बुरे बोलतात, वागतात, तेव्हा वाटते, खरंच हे लोक सुशिक्षीत आहेत?
मनात एक न्युनगंड निर्माण झालाय रे.. आपल्याला कोणी स्विकारेल की नाही? माझी कौटुंबिक माहिती समजल्यावर तू मला दूर तर करणार नाहीस ना? आपल्या मैत्रीत अंतर तर पडणार नाही ना? तुझ्या आई बाबांना काय वाटेल, अशा घरातली मुलगी, सून होवून आपल्या घरात आली तर? तुमचे नातेवाईक.. ते काय म्हणतील?’ नितूच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते, आणि मनातले प्रश्नही..
’हे बघ जे काही घडले त्यात तुझा काहीच दोष नाही...तुझा आणि तुझ्या आईचाही. मी समजू शकतो, तुम्ही काय काय सहन केले असेल. हे बघ, मी तुझ्यावर प्रेम केलयं, तुझ्या व्यक्तिमत्वावर, स्वभावावर, विचारांवर... जे काही घडले ते थांबवणे तुझ्या हातात नव्हते, बाकीचा समाज काहीही म्हणो, तुला दूर करण्याइतका वाईट मी नक्कीच नाही.आणि माझे आई-बाबाही. ते खूप समंजस आहेत. मला खात्री आहे, ते नक्की स्विकारतील तुला सून म्हणून. बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणू देत, मला देणे-घेणे नाही.
ए आतातरी रडू नकोस प्लीज...आणि आता पुन्हा कुठेही जाऊ नकोस मला सोडून...मागे गेलीस आणि इतक्या वर्षांनी भेटलीस.. आता तुला लग्नाच्या बेडीतच अडकवणार आहे मी..आणि माझ्याशी खोटं बोलल्याची शिक्षाही देणार आहे...ए अगं, आता हस ना जरा..’
नितूच्या रडून लाल झालेल्या गालावर हास्य फुलले.
हातात हात घेऊन दोघे बाहेर पडले, तेव्हा आकाश निरभ्र झाले होते.. नितिका तिचे भविष्य अभिच्या हाती सोपवून निर्धास्तपणे चालू लागली.

गुलमोहर: 

छान आहे गोष्ट.
.
शशिरही >> इथे टायपायला चुकले आहे (?) शरिरच्या जागी पार्थिव शब्द चालला असता ना ?

मला पण आवडली गोष्ट.

धन्यवाद cinderella, मी ते वाक्य आता थोडे बदलले..
"तिचे शेवटचे दर्शन ही तिला घडले नाही"" हे कसे वाटतय?
आणि Rangrao , मीनू,king_of_net , ajayjawade, सगळयांना, प्रतिसादाबद्दल आभार.

छान आहे कथा... शिर्षक अगदी समर्पक !

लेखनशैली खरंच आवडली. पहिलाच प्रयत्न वाटत नाही. कथानक नेहमीचं असलं तरीसुद्धा ते फुलवायची हातोटी चांगली आहे. अनावश्यक संदर्भ कुठेही आलेले नाहीत. असेच लिहित रहा............

खुप छान जमलीय कथा... आवडली.

गिरगाव ते नरइमन पॉइंट लोकलने फिरत नाहीत, ते गोरेगाव ते नरिमन पॉइंट हवे आहे,
कथा चांगली आहे.

नंदिनी, चूक लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.

सुरेख लिहिलि आहेस

रूपाली, छान लिहिते आहेस. कथाबीज अगदीच लहानखुरं असूनही फुलवण्याची हातोटी छान आहे तुझी. लिहीत रहा गं... माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या कथेची वाट बघते.

खरच खूप छान आहे. सत्यकथा वाटत आहे. ह्रूदयस्पर्शि....

मस्तच आहे...आवडली.
-प्रिन्सेस...

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद, आता आणखी एखादी कथा लिहायला उत्साह आला.

sumit_dusad -> नाही. सत्यकथा नाहीये.
तळटीप टाकू का - ह्या कथेतील सर्व पात्र/घटना काल्पनिक असून, काही साम्य आढळल्यास योगायोग समजावा Happy

रुपाली, कथा छान जमली आहे. पुढच्या कथेची वाट पहातो आहे.

काय लिहाव् कळतच नाहीये, अप्रतिम जमली आहे कथा.......

छान लिहिलि आहेस गं. साधाच विषय पण मस्त फुलवलीस कथा..पुढच्या लिखाणासाठी सदिच्छा! येउ दे Happy

कथा छान आहे..थोडी लांबली असं वाटलं...पण रेखाटली छान आहे. आणि दूसरं म्हणजे जर का इतका मोठा संवाद इंग्लिश मधला टाळता आला असता तर बरं झालं असतं. मराठी लेखनांत मराठीच असावं असं नेहेमीच वाटतं...हे सर्वस्वी माझं मत आहे...

दीपिका जोशी 'संध्या'

कथा छान आहे..थोडी लांबली असं वाटलं...पण रेखाटली छान आहे. आणि दूसरं म्हणजे जर का इतका मोठा संवाद इंग्लिश मधला टाळता आला असता तर बरं झालं असतं. मराठी लेखनांत मराठीच असावं असं नेहेमीच वाटतं...हे सर्वस्वी माझं मत आहे...

दीपिका जोशी 'संध्या'

साधी, सरळ, छानशी कथा Happy पुढच्या लेखनाला शुभेच्छा

मस्तंय गं......... एकदम आवडेश Happy पुढच्या लेखनाला शुभेच्छा !!

@दिपीका,
IT चा बाज असल्यामुळे, कथेला त्याचा रंग चढावा म्हणून इंग्रजीचा वापर अपरिहार्य होता.

छान लिहिल आहेस. उत्कंठा छान वाढवलीस.

Pages