ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचे निधन

Submitted by समीर on 19 May, 2008 - 00:59

ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
त्याना विनम्र श्रद्धांजली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय तेंडुलकरांचे निधन झाले. त्यांची सवंग प्रसिद्धीलोलुपता, कमालीचा ब्राम्हणद्वेष व हिंदुत्वद्वेष या वादग्रस्त गोष्टी बाजूला ठेवल्या तर त्यांची नाट्यतंत्रावरची पकड वादातीत होती यात शंका नाही. दिग्दर्शकाचे काम त्यांच्या लेखणीनेच केले असायचे अशी विलक्षण ताकद. या प्रतिभावंत नाटककाराला श्रद्धांजली.

तेंडुलकरांना 'सवंग प्रसिद्धीलोलुपता, कमालीचा ब्राम्हणद्वेष व हिंदुत्वद्वेष' ही विशेषणे तुम्ही कोणत्या वाचनाने / निरिक्षणाने लावली आहेत हे काही
समजले नाही. असले वरवरचे शाब्दीक विणकाम करण्यापेक्षा उदाहरणादाखल संदर्भ द्यावेत.

समाजाच्या अंतरंगाचा, अंतर्मनाचा भेदकपणे आढावा घेणारा एक साहित्यीक. त्यांना आणि त्यांच्या निर्भयशीलतेला श्रद्धांजली.

"विजय तेंडुलकरांना भावपुर्ण श्रद्धांजली "
विजय तेंडुलकरांचा हारिस शेख यांनी करून दिलेला अल्पपरिचय
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms
...
भारतीय साहित्यात जबरदस्त वलय आणि वजन असलेल्या विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर कारकून होते. शिवाय त्यांचा प्रकाशनाचा व्यवसायही होता. घरात साहित्यिक वातावरणामुळे तेंडुलकर तरुण वयातच लेखनाकडे वळले. वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी पहिली कथा लिहिली होती.

तेंडुलरांच्या लेखन कारकिर्दीची सुरूवात वर्तमानपत्रांतून झाली. विशीत असतांना त्यांनी ‘ आमच्यावर कोण प्रेम करणार ’ हे पहिले नाटक लिहिले. त्यानंतर ‘ गृहस्थ ’ आले . मात्र १९५६ साली आलेल्या ‘ श्रीमंत ’ नाटकाने तेंडुलकरांची चांगला नाटककार म्हणून ओळख निर्माण केली. ‘ श्रीमंत ’ मध्ये त्यांनी मांडलेल्या अत्यंत उदारमतवादी विचारांमुळे मुख्यत : पुराणमतवादी विचारांच्या प्रेक्षकांना झटका बसला होता. मुंबईत चाळीत राहत असताना तिथे मध्यमवर्गीय समाजात आलेल्या अनुभवांचा त्यांनी लेखनात उपयोग केला.
त्यांच्या बहुतांश कलाकृतींचा स्रोत हा वास्तविक आयुष्यातल्या घटना राहिलेल्या आहेत.

समाजातला मध्यमवर्ग , त्यांची मानसिकता , त्यांच्यामधला नैतिकतेविषयीचा गोंधळ या गोष्टींचे सूक्ष्म आकलन करून ते लेखनातून मांडू लागले. तेंडुलकरांची नंतर आलेल्या ‘ गिधाडे ’, ‘ शांतता कोर्ट चालू आहे ’ सारख्या नाटकांनी मराठी नाटकांची दिशाच बदलून टाकली. समाजातली सांप्रदायिक , लैंगिक तसेच राजकीय हिंसा यासारखे विषय त्यांच्या नाटकात आले. कोणतीही नैतिकता न मानणारा , मात्र आपल्या सोईसाठी समाजाचा वापर करणारा ‘ सखाराम बाईंडर ’ मधला सखाराम या त्यांच्या नाटकातल्या व्यक्तिरेखांनी मध्यमवर्गाचा एक वेगळाच चेहरा समाजासमोर आणला.

तेंडुलकरांनी नाटकांद्वारे जे विषय मांडले त्यामुळे देशच नाही तर जागतिक पातळीवर त्यांची ओळख निर्माण झाली. राष्ट्रीय पातळीवर तर ते समकालीन नाटककारांच्या पंक्तीत अव्वल क्रमांकावर जाऊन बसले. अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

१९७२ साली आलेले तेंडुलकरांचे ‘ घाशीराम कोतवाल ’ हे सर्वात वादळी नाटक ठरले. अठराव्या शतकात पुण्यातल्या पेशवाई राजकारणाचा आलेख मांडताना राजकारणातील चिरंतन हिसेंचे सादरीकरण करणा-या या नाटकाचे मराठी आणि इतर भाषांमध्ये आतापर्यंत सहा हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर ‘ कमला ’, ‘ कन्यादान ’, ‘ पाहिजे जातीचे ’ अशी तेंडुलरकरांनी एकूण ३२ नाटके लिहिली. त्यात १६ बालनाट्यांचा समावेश आहे.

नाटकांसोबतच तेंडुलकरांनी लिहिलेल्या चित्रपटांच्या पटकथाही गाजल्या. ‘ निशांत ’, ‘ आक्रोश ’, ‘ अर्धसत्य ’ या हिंदी चित्रपटांशिवाय ‘ सामना ’, ‘ सिंहासन ’’ ‘ उंबरठा ’, आक्रित या लोकप्रिय चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या.

‘ महाराष्ट टाइम्स ’ मध्ये तेंडुलकरांनी लिहिलेले ‘ कोवळी उन्हे ’ हे सदर लोकप्रिय झाले होते.

तेंडुलकरांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यात ‘ कालिदास सन्मान ’, ‘ सरस्वती सन्मान ’, आणि भारत सरकारचा ‘ पद्मभूषण ’ या प्रमुख पुरस्काराचा समावेश आहे.

साहित्य निर्मिती, नाटके व एकांकिका -
http://www.esakal.com/esakal/05192008/SpecialnewsFAE850A506.htm

गृहस्थ, श्रीमंत, गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, अशी पाखरे येती, कन्यादान, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, छिन्न, माणूस नावाचे बेट, कावळ्याची शाळा, अजगर आणि गंधर्व, एक हट्टी मुलगी, भेकड, मी जिंकलो मी हरलो, सरी गं सरी, झाला अनंत हनुमंत, घरटे अमुचे छान, द्वंबदीपाचा मुकाबला, भल्या काका, भाऊ मुरारराव, बेबी, पाहिजे, कमला, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, देवाची माणसे.

एकांकिका - रात्र आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व, थीफ ः पोलिस.
बालनाट्ये - इथे बाळे मिळतात, पाटलाच्या पोरीचे लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका.
चित्रपट पटकथा - सामना, सिंहासन, उंबरठा, चिमणराव, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, आक्रीत, अर्धसत्य, २२ जून १८९७, प्रार्थना, निशांत, मंथन, आक्रोश, कमला, गहराई, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू.
मालिका - स्वयंसिद्धा.
टॉक शो - प्रिया तेंडुलकर टॉक शो.
नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी.
ललित - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर.
कथा - काचपात्रे, गाणे, फुलपाखरू, द्वंद्व, मेषपात्रे.
संपादने - दिवाकरांच्या नाट्यछटा, समाजवेध.
भाषांतरे ः वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या "स्ट्रीटकार नेम्ड्‌ डिझायर'चे भाषांतर), "लोभ असावा ही विनंती' (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर), "आधेअधुरे' (मोहन राकेश), "तुघलक' (गिरीश कर्नाड), चित्त्याच्या मागावर.
विविध लेखन - लिंकन यांचे अखेरचे दिवस.
कादंबरी - कादंबरी एक आणि दोन.
माहितीपट - तेंडुलकर आणि हिंसा (अतुल पेठे).

तेंडूलकरांबद्द्ल काय लिहायचे ?
मला वाटते, मुसाफिर या हिंदी सिनेमाची कथा पण त्यांचीच होती. अशी पाखरे येती मधल्या नायकाची पार्श्वभुमी, जी नाटकात येत नाही, ती या सिनेमात होती. नासिरुद्दिन शाह, रेखा, मुनमुन सेन आणि पंकज कपुर होते त्यात.
तसेच, अलिकडे त्यानी हिज फिफ्थ वाईफ, नावाचे इंग्लिश नाटक लिहिल्याचे पण वाचल्यासारखे वाटतेय. हि सखारामच्या पाचव्या बायकोची कहाणी. वरची यादी परिपुर्ण असावी, म्हणुन उल्लेख केला इतकेच.

अशी विशेषणे लावायलाच हवीत का? आपण कोण आहोत त्यांना जज करणारे?
आणि आता तर ते निसटून गेले आपल्यातून.

माफ करा पण इतक्या मोठ्या माणसाला आपल्या तोकड्या फूटपट्ट्यांमधे बसवता येत नाही म्हणून तो गेल्यावरही असं काही म्हणत रहायचं हे अजिबात पटण्यासारखं नाही.

आयुष्यात केवळ २ तास त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि त्या तेव्हाच्या गप्पांच्या स्मृती आजही खूप काही देत असतात. एका यःकश्चित मुलीसाठी नकळत आणि सहज असं काही झळझळीत करू शकणारा माणूस आपल्या मोजमापाच्या पलिकडचा असतो.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात
विजय तेन्डुलकरांबद्दल लिहिण्यास मी स्वतःस असमर्थ समजतो एवढेच.

आनि सर्वात वाइत ह्या गोस्तिचा वातला कि दुर् दश् न वर किवा रेदिओ वर सुधा काहि प्रोग्राम झाले नाहित त्यान्च्या साहित्यावर.... आज च्या पिधि ला ह्या गोस्ति पुर् वने हिच सगल्यात महत्वाचि श्रद्धान्जलि होइल !!!! नाहि का ?

भावपुर्ण श्रद्धांजली.

..प्रज्ञा

तेंडुलकरांबद्दल काही लिहायची योग्यता नाही,पण यावेळी एक पुस्तकाची आठवण झाली."बापलेकी".प्रिया तेंडुलकर जेव्हा आजारी होत्या तेव्हा या पुस्तकचं सम्पादन चालू होतं बहुधा.(तसा त्यात उल्लेख आहे असं वाटतं.)
दीपा गोवारिकर्,विद्या बाळ अशा अनेक "लेकीं"नी वडिलांबरोबर असलेलं नातं उलगडलं होतं.पुस्तक वाचताना "बाप" म्हणून तेंडुलकर किती हळवे आहेत हे जाणवतं.
प्रसिद्ध अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांचा नाशिकला कार्यक्रम झाला होता.तेव्हाही "घाशीराम्.."चा अनुभव आणि नाटककार म्हणून तेंडुलकरांचा लाभलेला सहवास इ.ऐकताना तेन्डुलकरान्च वेगळेपण जाणवलं होत.

>> "अशी विशेषणे लावायलाच हवीत का? आपण कोण आहोत त्यांना जज करणारे"
नीरजा -- मनापासून सहमत !!!
---------
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ह्या प्रार्थनेपलीकडे आपण काय करू शकतो?
--
संदीप

एका इन्ग्रजी वर्तमानपत्रात ( DNA)आलेली बातमी अशी.
Vijay tendulkar,iconic marathi playwright and a fearless social commentator ,passed away in Pune on Moonday morning,he was 80.
A Padma Bhushan awardee ,Tendulakar was best known for his palys Ghashiram Kotwal and Sakharam Binder,both of which ruffeled the feathers of orthodoxy.The unfavourable potrayal of Nana Padanavis,the revered satesman during peshawa rule,as a lecher who used ideologies for his own ends,did not go down well with the Brahmin orthodoxy.Infact audience used to throw eggs and tomatoes at the stage during performance but this hardly dittered Tendulakar himself borned in Brahmin family................................................
माझ्या मते प्रायोगिक रन्गभुमीला सामान्य माणसापर्यन्त तेन्डुलकरानी नेले.

त्यांच्या शिव्यांवर चिडणं सोपं होतं
ते आम्ही खवळून केलं.
त्यांच्या विचारांवर वाद घालणं सोपं होतं
ते आम्ही तावातावाने केलं.
त्यांच्या शब्दावर प्रेम करणं सोपं होतं
ते आम्ही मनापासून केलं.
त्यांच्या प्रतिभेनं दिपून जाणंही...
होय, ते आम्ही लख्खं लख्खं केलं.
ते वाचताना, बघताना, ऐकताना जे काही आलं
ते आलं अगदी आतून...हिंस्रपणे...
प्रत्यक्ष घोड्यावर बसवूनच
घोड्याच्या अर्थाचा साक्षात्कार द्यावा अंतर्बाह्य
तसंच शिकवलं त्यांनी आम्हाला
स्वतःला नागवं करायला...
आता भेटतात, त्यांनी वाट लावली असं म्हणणारे
अन् त्यांनी वाट दाखवली असं मानणारेसुद्धा...
ते सर्व पुढेही भेटत राहतील.
तें नेहमीच भेटत राहतील.

*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

जी एस वन यांनी लिहिलेले फारसे चूक आहे असे मला वाटत नाही. नाम्या ढसाळनेही आज तेन्डुलकरांबद्दल लिहिलेलेय असेच संमिश्र.तेन्डुलकरानी जेवढा पुरोगामी पणा दाखवला तेवढा प्रतिगामीपना गहराई चित्रपटात दाखवला. अंधश्रद्धेचा कळसच त्यात होता.पुन्हा त्याचे समर्थनही केले. त्यामुळे त्यांचा वैचारिक गोंधळ होताच. पण तेन्डुलकरांची समीक्षाच करायची नाही हे मात्र अनाकलनीय आहे. सार्वजनिक जीवनातील माणसाचे मूल्यमापन होणारच. त्यांच्या दोषांमुळे त्यांच्या कर्त्रुत्वाला उणेपणा थोडाच येतो.?आता जी एस वन यांची त्यांचे गुनांची दखल घेतलीच आहे की. पण संघाच्या माणसाला तो केवळ संघाचा आहे म्हणून झोडपलेच पाहिजे ही तेंडुलकरी परम्परा त्यांचे भक्त पुढे चालवीत आहेत असे दिसते....

सवंग प्रसिद्धी ही तेंडुलकरांची मानसिक गरज होती आणि व्यावसायिकही.

त्यांचे नाटकांचे विषय वादग्रस्त असले तरी त्यांची नाट्यचित्रपट माध्यमाची जाण वरच्या दर्जाची होती. विशेषतः व्हिज्युअलायझेशन.

आपल्याकडे मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणायची पध्दत आहे. त्यामुळे कुणाचे निधन झाल्यावर त्या व्यक्तीविषयी काहीही वाईट बोलता कामा नये अशी लोका.न्ची अपेक्षा बनली आहे.

एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्या.न्चे स्थान वादातीत आहे. पण मलाही विजय ते.न्डुलकर वादग्रस्त वाटतात.

माझीही त्या.न्ना श्रद्धा.न्जली.

काय सुंदर काढलंय रुपेश.. खूप दिवसांनी तुझं चित्र पाहायला मिळालं..

एखादया व्यत्कीच्या श्रद्धान्जलीच्या सभारम्भात त्या व्यत्कीवर टीका करणे बावळटपणाचे आहे.

अभिव्यक्ति स्वातन्त्र्याचा पुरस्कार करणार्‍या व्यक्तिच्या श्रद्धान्जलीच्या सभारम्भात स्वत:च्या कुवती नुसार अगदी मुल्यमापन नाही तरी मतमतान्तरे वावगी ठरु नयेत्.तुम्हीही छान आम्हीही छान सगळेच कसे छान छान हा प्रकार एखाद्या सामान्य व्यक्तिला लागु होतो.

अस्वस्थता देणारा नाटककार...

अस्वस्थता आणि असमाधान देणारा कलावंत जेव्हा आपल्याला कृतज्ञतेचाही अनुभव देतो, तेव्हा आपली सगळी भाषा कोलमडू लागते. गौरवाची भाषा आणि जवळीक यांचे साहचर्य बाजूला पडून दूरस्थतेतच आपली कृतज्ञता ओतप्रोत होते, त्या वेळी भाषा वापरणे ही मोठी अवघड गोष्ट होऊन बसते. अत्यंत जबाबदारीने अत्यंत तीव्र लेखन करणारा आणि साठीच्या दशकात मराठी नाटकाचे आधुनिक वळण निश्‍चित करणारा नाटककार, असे तेंडुलकरांचे एक वर्णन करता येईल.
वाचक किंवा प्रेक्षकांच्या "गळ्यातले ताईत' वगैरे होण्याचा विचार दुरूनही कधी त्यांनी पाहिलाच नसावा, असेच त्यांचे चित्र समकालीन नाटकवेड्या मराठी माणसांच्या मनात आहे. कसकसून लिहिणे जसे त्यांना टळले नाही, तसेच वादग्रस्त असणेही त्यांना टळलेच नाही.

लेखक किंवा कोणताही कलावंत वादग्रस्त झाला, की दोन तटांत तो पुरेशा आकलनाआधीच बंदिस्त होतो. त्याचा धिक्कार करणारे त्याला ज्या कोणत्या कारणाने टाकाऊ ठरवतात, त्यापलीकडे तपासणीच्या फंदात पडत नाहीत आणि जे तळी उचलून धरतात ते थोरवीचे वलय बाजूला ठेवायला तयार होत नाहीत. सामान्य वाचक- प्रेक्षक आवडीनिवडीवर विसंबून चालतो. जणू काही त्यांच्या नाटकांनी आम्हाला काय दिले, याविषयी गंभीर होण्याऐवजी "ग्रेट' किंवा "भिकार' अशा गटातल्या विशेषणांची फेकाफेक म्हणजेच "सांस्कृतिक' वागणूक. असल्या वागणुकीने संस्कृतीचे तुरुंग करणारांचे मात्र फावते. तेंडुलकरांसारखी माणसे जणू काही "स्वभावतःच वादग्रस्त' बनतात! पण अशी माणसे आपल्या पिढीत असणे, हे किती महत्त्वाचे असते, हे आता ती पिढी अस्ताला निघाल्यावरच जास्त चांगले कळते. त्यांना नीट समजून घेण्याची गरज प्रेक्षकांच्या वाढीसाठी होतीच. आजही आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पर्वात भारतीय रंगमंच आणि भारतीय नाटक याविषयीचे भान आणि संवाद यांचा आरंभ झाला. नाटकवेड्या मराठी माणसाचे प्रतिनिधित्व तेंडुलकरांनी केले. एकांकिका, नाटक, नाटुकली... त्यातही फार्स, तमाशा असे जुने घाट नव्याने वापरणे आणि कोणत्याही वर्गीकरणात न बसणारे स्वतःचे निर्माण करणे, ऐतिहासिक- सामाजिक- कौटुंबिक- राजकीय अशा आशयाच्या कप्प्यांऐवजी एक व्यक्ती, तिचे माणूसपण, तिची विशिष्ट परिस्थिती आणि त्यातले जीवघेणे पेच तडजोडीविना जसे भोगाला येतात तसे मांडणे, हे त्यांचे काही विशेष.

महानगरी जीवनात साध्या माणसांच्या कोमल भावजीवनाचा अस्त कसा होतो आणि "संस्कृती' कशाला म्हणावे, हा प्रश्‍नच आपल्या तोंडावर कसा आदळतो, याची अनेक चित्रे नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांनी आणली. अनेक वेळा झाले मात्र असे, की प्रेक्षकांनी आपले तोंड चुकवले आणि लेखकालाच "असंस्कृत' ठरवले. वादग्रस्त लेखकाला हे टाळता येत नाही. "गिधाडे', "सखाराम बाईंडर' आणि "घाशीराम कोतवाल' या तीनच नाटकांची आठवण केली तरी हिंसा-अहिंसा, व्यक्ती आणि समाजाची चौकट, श्रेय-प्रेय, रति-प्रीती, अशा अगदी निश्‍चितपणे "सांस्कृतिक' परिमाणांवर त्यांनी टाकलेला प्रकाश आणि घडवलेले दर्शन किती अस्वस्थ करणारे होते, हे त्या पिढीच्या आधुनिकतेला सामोरे होणाऱ्या प्रेक्षकांनी अनुभवले आहे. संपूर्ण तरुण पिढी ज्या मूळ प्रश्‍नांनी अस्वस्थ होती, असे हे पेच होते; पण त्यांना सामोरे जाण्याचे टाळून जगत राहणे अधिक सहज आणि सोपे होते. त्यामुळेच की काय, संपूर्ण समाजभानाने पडद्यामागे सारलेल्या गोष्टी पुढे आणल्यावर किती क्षोभ उसळतो, हेही सरळ समोर आले होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या बाजूला उभे राहणे, हे कर्तव्य ठरले होते आणि तेवढ्याच कर्मठपणे त्यांच्यावर चिखलफेक करणे, हेही एका गटाला तसेच प्राप्त वाटत होते. अशा सर्व इतिहासाच्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांना असलेली मान्यताही होर्डिंगवरच्या चित्राची नाही किंवा एका संकुचित संप्रदायाचीही नाही. नाटक किंवा एकूणच कलावंत मूल्यपातळीवर समाजव्यवहारात ज्या प्रतिमा दाखल करतात, तिथे आपली मुद्रा उमटवणारी प्रतिभा म्हणून आज त्यांना महत्त्व आहे. आपल्या परंपरेत ज्याला समजून घ्यायला हवे, असा हा माणूस आहे. त्याचा अभिरुचीच्या घडणीवर सतत परिणाम होत आला आहे.

असे वादग्रस्त कलावंत मनोरंजन आणि कलेने प्राप्त होणारे मूल्यभान याविषयी प्रेक्षकाला विचार करायला लावतात. व्यक्ती आणि समाज व्यवहारतः अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतून जात असताना उलगडून घेण्याचे, समजून घेण्याचे, खरे प्रश्‍न कोणते असतात याचे निर्देश करतात. एकदा तयार करून ठेवलेली व्यवस्था काही अंगभूत उणिवांमुळे वारंवार तपासावी लागते. बदलासाठी तयार व्हावे लागते. या सर्व गतीमध्ये कोणते माणूसपण सांभाळायचे आहे, याच्या निर्णयाला त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमा मोठी मदत करतात. कारण या प्रतिमा घन आणि ऋण अशा दोन्ही बाजूंनी समाजाचे आणि मानवी मनाचेही चित्रण करत असतात. गोडगोबरी चित्रे म्हणजे समग्र वास्तव नव्हे आणि प्रश्‍नांबाबत तडजोड म्हणजे सोडवणूक नव्हे, हे जाणता आल्यावरच शहाणपणाचे पाऊल म्हणून काय करावे, हे लक्षात आणून देण्याचे कार्य हे कलावंत आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमा करत असतात.
त्यासाठी आपण कृतज्ञ असतो. मग सन्मान, पुरस्कार वगैरे केवळ प्रतीके.

- श्‍यामला वनारसे

संदर्भ सकाळ ग्रंथालय

तेंडुलकर भारी होते यात वाद नाही पण टोणग्यानी लिहिलेलेही बरोबर आहे.ज्या तेंडुलकरांनी आयुष्यभर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता त्यांचेच शिष्य आता 'तेंडुलकरांना जज करणारे आपण कोण' म्हणतात यावरुनच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बेगडीपण स्पष्ट होते.रामाच्या चुका काढा,कृष्णाच्या चुका काढा पण तेंडुलकरांच्या मात्र काढु नका यातच सगळे येते.