ज्याची त्याची बांधीलकी

Submitted by मंदार-जोशी on 15 October, 2010 - 05:36

स्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.

विषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).

वक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, "काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो?"

आलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे "मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो", "मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो", "मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो", वगैरे.

"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही", एक कर्मचारी उत्तरतो.
झटक्यात सगळ्यांच्या नजरा 'हा आहे तरी कोण प्राणी' हे बघायला त्याच्याकडे वळतात.

"मला समाजसेवेत आनंद मिळत नाही", तो पुन्हा बोलतो.

"तुम्ही तुमचं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगाल का?" आता समुपदेशकाची उत्सुकताही चाळवली गेली असते.

"मला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.
मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधीलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, कारण माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy."

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत? हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का? एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच. तुम्हाला काय वाटतं?

गुलमोहर: 

समाजसेवा ही प्रत्येकच वेळेला शोधलेली पळवाट नसते. काही जेन्युईन लोक अगदी मनापासून स्वत:च्या आनंदापेक्षा इतरांच्या उपेक्षेचा विचार करून त्यांना मदत करतात.

अगदी खरं आहे तुझं दक्षिणा, प्रत्येक वेळेला नाही. पण इथे मला जे लोक असं करतात ते बरोबर की नाही हा प्रश्न पडला आणि हा विचार आला मनात. Happy

पुन्हा वाचला शेवटचा पॅरा...
कुणितरी दु:खी झालं तर त्यावर माझा आनंद अवलंबुन आहे हा विचार एकांगी वाटतो
नाण्याची दुसरी बाजू अशी पण असू शकते की मी कुणाचं तरी दु:ख दूर करू शकतोय ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. Happy

दक्षिणेला अनुमोदन........

शेवटी समोरचा "दु:खी" आहे हे वाटणे सुध्द्द व्यक्तीसापेक्ष आहे....... तेंव्हा कधी कधी सुखा-दुख्हापेक्षा माझ्ह्याकडे जे जास्त आहे ते ज्याच्याकडे कमी आहे त्याला देणे आणि देण्यातले समाधान अनुभवणे हा देखील हेतू असु शकतो.

दक्षिणाशी सहमत... नेहमीच '' नवनिर्मीती'' करुन आनंद ,समाधान मिळेल असं नाही...... दु:ख हे तिन्ही त्रिकाळचं शाश्वत सत्य आहे.... ते दूर करण्यात ही आनंद मिळायलाच हवा. खूप छान लेख मंदार. Happy

मला असं म्हणायचंय की या गोष्टी करून आनंद मिळाला (by-product) तर त्यात काही चूक नाही.
पण आनंद मिळवणे हाच हेतू असू नये, नाहीतर तो स्वार्थ ठरतो असं मला वाटतं.

म्हणूनच शक्यतो असे काही करताना ते कुठेही नाव येऊ न देता "गुप्तदान" करावे..... आणि आपणही त्याची वाच्यता करू नये.......
देवाधर्माच्या ठिकाणी लावलेल्या देणगीदारांच्या पाट्या हा तर शुध्द वेडेपणा वाटतो मला..... कशाला हव्या त्या पाट्या कुणाच्या पणजोबाच्या नावाने कोणी किती दिले???? काय पणजोबाला दाखवायचे असते का कि बघा आजही तुमची आठवण म्हणून मी देणग्या देतो...... करा ना गुप्त्दान????
समाधान महत्वाचे की नावाची पाटी?????

गुप्तदान करणारेही आहेत, त्याचे मार्केटींग करणारेही आहेत. पहिले शुध्ददान, दुसरे स्वार्थीदान.

राजे, बरोबर्...खरेतर गुप्तदान करणार्‍यांनी "मी गुप्तदान करतो" असे सांगणेही चुकिचे आहे......
मनापासून करा आणि विसरून जा असे असले पाहिजे...... हे आपले माझे वैयक्तिक मत.... Happy

छान विषय मांडलास मंदार!! आजकाल 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या' नावाखाली काहीही सुरु असतं त्यांना फक्त पेपरात नाव यायला पाहिजे असतं! म्हणुन मेडीयाचा ताफा घेउन फिरतात हे लोक.

आता विषयच निघाला म्हणुन सांगते, आमच्या मेकॅनिकलच्या स्टुडंट्सला आता एक अगदी प्रसिद्ध कंपनी ट्रेनिंग देणार आहे, त्यांच्या कॉ. सो. रि. च्या सेलतर्फे. त्यांचे म्हणे रिप्रेजेंटेटीव येणार....मग त्यांना दूर पडते म्हणुन आमच्या पुण्याजवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा मेकॅनिकलची सग्ळी मशिनरी इथे पुण्यात आणुन ठेवा म्हणाले!!! कसली डोंबल्याची कॉ.सो.रि.!!!

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत? हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का? एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच.
असेच काही प्रकार तुला आपल्या अवतिभवती पाहायला मिळतील जे खोटी समाज सेवा करुन वाहवा मिळवतात्,त्यात बिचारी गरिब जनता भरडल्या जाते. ऊत्तम लिहले आहे

मुळात सुख - दु:ख या कल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहेत. सुख-दु:खाची जी व्याख्या माझी आहे ती इतरांची असेलच असे नाही. आणि सेवा मग ती कुठल्याही प्रकारची का असेना ती कर्तव्य म्हणुन किंवा बांधिलकी म्हणून असु नये कारण मग तिच्याशीदेखिल कर्तव्यपुर्तीच्या भावनेचा स्वार्थ बांधला जातो. सेवा ही सदैव निरपेक्षच असावी.
तसेच आनंदाचे आहे, कुणाला कशात आनंद मिळेल हे सांगता येत नाही. वरील मजकुरातील व्यक्तीची भुमिका पटते पण ती प्रत्येकालाच लागू होइल असे नाही.
उदा. बाबा आमटेंनी जेव्हा आनंदवनाचा पाया घातला तेव्हा तो हे माझे कर्तव्य आहे असे मनाशी ठरवून नाही घातला किंवा त्यातुन मला आनंद मिळेल या भावनेनेही नाही घातला तर कुष्ठरोग्यांच्या दयनीय अवस्थेने त्यांचे मन द्रवले म्हणुन त्यांनी आनंदवनाची निर्मिती केली . एकंदरीत काय तर पुन्हा आनंद, समाधान यादेखिल व्यक्तीसापेक्ष संकल्पनाच आहेत Wink

पण एक पॉझिटिव्ह साईड पण मांडतो.

सगळीकडे असे नाहिये. काही मंडळी मनापासून समाजसेवेची कामे करतात कुठेही आपली नावे येऊ न देता. माझ्या ओळखिचे काही मराठी उद्योजक आहेत, ज्यांनी "गावे दत्तक" घेतलियेत्...आणि कुठेही मिडियाला एक्स्पोज न करता ते आपले समाजकार्य पार पाडातायत्..... फुटेज खायची हौस न बाळगता.

समाजसेवा वगैरे उत्तरे देणार्‍या सगळ्यांना कॉन्फरन्स रुमच्या बाहेर कुठेतरी म्हणजे कॅफेटेरियात किंवा ऑफिसबाहेरच्या टपरीवर हाच प्रश्न विचारुन बघ.... खरीखुरी उत्तरे मिळतील Wink

समाजसेवेत एक समाधान असू शकतेच म्हणा! प्ण खरोखर त्या समाधानासाठी लोक ती करतात की नाव मिळवण्यासाठी हा प्रश्न नक्कीच आहे.

मला तरी व्यक्तीशः त्या विशिष्ट माणसाचे उत्तर आवडले. तो खरे बोलला असे वाटले.

मंदारराव,

छानच चर्चा काढलीत! एकदम कुणालाही आम / आपली वाटावी अशी!

अभिनंदन!

-'बेफिकीर'!

"तुम्ही शेतकर्‍यांच्या भल्यासाठी सेवाकार्य करता काय" असे थेट प्रश्न एकदा मला विचारण्यात आला होता.
त्यावर
" नाही मी कुणाच्या भल्यासाठी, कुणावर उपकार करावे, म्हणुन हे कार्य करत नाही तर मला यात परमोच्च आनंद मिळतोय, म्हणून मी करतो" असे मी उत्तर दिले होते.

एक माणुस दुसर्‍या माणसावर उपकार करू शकतो, ही कल्पनाच अमानुष आहे.
माणसाने फक्त माणुसकी,मानवता पाळायला शिकले पाहीजे, ती त्याची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याला "बांधिलकी" म्हणायची सुद्धा गरज नाही कारण ते "कर्तव्य" आहे.

मेवा खाण्याची अपेक्षा बाळगणारेच "सेवा" किंवा यासारखे शब्द वापरतात.

ज्याला माणुसकीची कर्तव्ये पार पाडता येत नाही त्याला "माणुस" तरी का म्हणावे?

बेफिकीर यांच्याशी सहमत.
मला त्या माणसाचे उत्तर आवडले. मी तर त्यापुढेही जाऊन म्हणतो की समाजसेवेतून 'आनंद' मिळवणार्‍यांपेक्षाही त्याची समाजसेवा श्रेष्ठ आहे- कारण तो हे काम निरपेक्ष भावनेने करतो आहे. त्यातून त्याला काहीही मिळत नाहीये.

याच अनुषंगाने थोडासा वेगळा विचार असाही येतो की प्रत्येकाने सतत कुणा ना कुणाची 'सेवा' करत रहावे- ही परिस्थितीही फारशी आदर्श किंवा भूषणावह नाही. 'उद्धरेत आत्मनात्मानाम्' हेच खरे. आमटे किंवा बंग दांपत्य करतात तशा प्रकारचे 'समाजकार्य' केले पाहिजे, 'समाजसेवा' नव्हे.
भुकेल्या माणसाच्या ताटात मासळी आणून वाढण्यापेक्षा त्याला मासे पकडायला शिकवणे हे जास्त श्रेयस्कर काम आहे.

मंदार, चांगला विषय... चर्चा आवडली.

समाजसेवा ह्या विषयाला अनेक पैलू आहेत. आपल्या आजूबाजूची माणसे अडचणीत सापडली आहेत, म्हणून त्यांना व्यक्तिगत स्वरुपात मदत करणे ही एकप्रकारची समाजसेवा, तर आपण ज्यांना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही अशा लोकांचा उत्कर्ष व्हावा म्हणून प्रयत्न करणे ही झाली दुसर्‍या प्रकारची समाजसेवा.

अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता आंदोलन, एडसविरुद्ध जनजागृती इ. ह्या त्या दुसर्‍या प्रकारच्या समाजसेवा झाल्या... ह्या सगळ्या समाजसेवेत बांधिलकीची गरज असते... यात काम करणार्‍या बर्‍याच कार्यकर्त्यांना त्यातून आनंद मिळेलच असे नाही...पण आपण आपल्या समाजाला सुधारण्यासाठी काहीच करत नाही याचं दु;ख आणि अपराधी भाव मात्र त्यांच्या मनात राहतो आणि तो जावा म्हणून काम करणारे लोकही आहेतच...

शेवटी, आपल्या घराच्या पलिकडेही एक जग आहे, ज्यात लोक रहातात आणि त्यांनाही अडचणी आहेत, याचा विचार करणे महत्वाचे. जे समाजकार्य आवडते असे म्हणतात, त्यांना किमान काहीतरी करावे अशी कळकळ तरी वाटते. आवडतच नाही म्हणून हात झटकणे फारच सोपे... तसेही आपल्या कुणीही मागे लागत नसते, की तुम्ही समाजसेवा करा म्हणून...
जर मनापासून वाटत असेल तर, समाजाच्या गरजा काय आहेत हे जाणून आपल्याला जमेल ते, झेपेल ते काम आपण करावे. त्यात आनंद, दु:ख वगैरे शोधण्याचा प्रयत्न करु नये. कोणाच्या सदहेतूबद्दल शंका घेऊ नये. कोणी नावासाठी म्हणून का असेना, सामाजिक संस्थेला देणगी देत असेल तरी आपली हरकत नसावी... शेवटी त्यातून गरिबांनाच मदत मिळते ना?

दक्षिणाला माझे अनुमोदन...

माझ्या वरील पोष्टच्या सदर्भात थोडा खुलासा.

एखाद्याने स्वतःविषयी बोलणे, या अनुषंगाने माझी पोष्ट आहे.

उदा. गोपिचंदने मी समाजसेवा करतो, असे म्हणणे मला संयुक्तिक वाटत नाही.

गोपिचंद समाजसेवा करतो, असे इतरांनी म्हणणे, याला आक्षेप नाही.

......................................................................................
<<अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता आंदोलन, एडसविरुद्ध जनजागृती इ. ह्या त्या दुसर्‍या प्रकारच्या समाजसेवा झाल्या... ह्या सगळ्या समाजसेवेत बांधिलकीची गरज असते... यात काम करणार्‍या बर्‍याच कार्यकर्त्यांना त्यातून आनंद मिळेलच असे नाही..>>.

हे कार्य करतांना जर त्याला काहीच आनंद मिळत नसेल तर तो करतो कशासाठी?
इतरांवर उपकार करण्यासाठी का?

माझ्या मते त्याला हे कार्य करतांना आनंद / मानसिक समाधान मिळतच असते.

असो. वरील सर्वच्या सर्व पोष्ट जवळपास सारख्याच आहेत. अर्थ काढण्यात तेवढे फरक आहेत. Happy

हे कार्य करतांना जर त्याला काहीच आनंद मिळत नसेल तर तो करतो कशासाठी?
इतरांवर उपकार करण्यासाठी का?>>>> मुटेजी, त्याचे उत्तर त्याच पॅरेग्राफ मधल्या पुढच्या ओळीत आहे...
पण आपण आपल्या समाजाला सुधारण्यासाठी काहीच करत नाही याचं दु;ख आणि अपराधी भाव मात्र त्यांच्या मनात राहतो आणि तो जावा म्हणून काम करणारे लोकही आहेतच...

अर्थातच, तुमच्या "वरील सर्वच्या सर्व पोष्ट जवळपास सारख्याच आहेत. अर्थ काढण्यात तेवढे फरक आहेत." या वाक्याशी १००% सहमत आहे... Happy

मंदार...तुझी पोस्ट काही अंशी पटली आणि काही अंशी अजिबात पटली नाही.
मी एक कथा वाचली होती. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिग्टन (चूभूद्याघ्या) हे आपल्या मित्राना सांगत असत की जगातली कोणतही कृती निस्वार्थी असू शकत नाही. एकदा ते घोडागाडीतून चालले असताना चिखलात अडकेलेल कुत्र्याचे पिल्लू त्यांना दिसते. त्याबरोबर ते गाडी थांबवून उतरतात आणि आपला किंमती कोट खराब होण्याची पर्वा न करता ते त्या पिल्लाला बाहेर काढतात.
घोडागाडीत परतल्यानंतर त्यांचा मित्र त्यांना विचारतो. तुझ्या आत्ताच्या कृतीमागे कोणता स्वार्थ दडलेला होता.
तर त्यांचे उत्तर असे आहे, मी जर त्या पिल्लाकडे बघून काही न करता निघून गेलो असतो तर माझे मन मला खात राहीले असते. मला रात्री नीट झोप लागली नसती. मला रात्री शांत झोप लागावी म्हणून मी हे केले.
आणि मला वाटते की बर्याच समाजकार्य करणाऱ्यांचे हेच असेल. आपल्या आजूबाजूला अत्यंत हलाखीत, शरिराची लक्तरे झालेली, जीवन हे वरदान नाही तर शाप मानणारी माणसे असताना त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नसू तर आपल्या धडधाकट शरिराचा आणि आपल्या सुखकारक जिवनाचा उद्देश्य काय असे त्यांना वाटत असेल. आणि असे लोक हजारातून एखादेच जन्माला येतात.
मला वाटत नाही समाजकार्यात कोणाला आनंद वाटत असेल, समाजकार्यात मिळते ते समाधान. आनंद नव्हे. यात खूप फरक आहे. डॉ. बाबा आमटे, डॉ. अल्बर्ट श्वाईट्झर, डॉ. कोटणीस अशा अनेक महान पुरुषांनी त्यात आनंद नाही तर ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजासाठी काही तरी केल्याचे समाधान मानले. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट अधिकाधिक मिळावी असा प्रयत्न असतो. तसे गृहीत धरले तर समाजात अशा लोकांची संख्या वाढावी जेणेकरून आपल्याला अधिक समाजसेवा करता येईल असा विचार करण्यासारखे आहे.

(मुळात समाज समाज आपण जे म्हणतो तो काय आहे. आपल्यासारखीच हाडा मासाची माणसे...त्यांचा एक विशिष्ट समूह...अजून बऱयाच व्याख्या होतील. माझ्या मते सर्वात सोपी व्याख्या म्हणजे आपण, आपले कुटुंबिय आणि मित्रपरिवार यांच्यावतिरिक्तची माणसे म्हणजे समाज. आपण आईवडीलांचे, भावा बहिणींचे किंवा मित्राचे काम करताना किंवा त्यांच्यासाठी काही करताना समाजकार्य करत नाही. बरोबर?)

आशुचे पोस्ट अतिशय आवडले... त्याचे विचार म्हणजे माझ्या पोस्टचेच अधिक स्पष्ट, सविस्तर आणि मुद्देसुद रुप असे मला वाटते... Happy

तेंव्हा कधी कधी सुखा-दुख्हापेक्षा माझ्ह्याकडे जे जास्त आहे ते ज्याच्याकडे कमी आहे त्याला देणे आणि देण्यातले समाधान अनुभवणे हा देखील हेतू असु शकतो.
>>> अनुमोदन

भुकेल्या माणसाच्या ताटात मासळी आणून वाढण्यापेक्षा त्याला मासे पकडायला शिकवणे हे जास्त श्रेयस्कर काम आहे. >>> अनुमोदन. फुकटचं फक्त स्वकष्टांनी जे चरितार्थ चालवू शकत नाहीत अशा वृद्धांना, अपंगांना द्यावे. बाकिच्यांना स्वतःच्या पायावर उभं रहाण्यासाठी मदत करावी.

सानीच्या २०.३८ च्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन.

आशुचँपची अख्खी पोस्ट आवडली.

जर मनापासून वाटत असेल तर, समाजाच्या गरजा काय आहेत हे जाणून आपल्याला जमेल ते, झेपेल ते काम आपण करावे. त्यात आनंद, दु:ख वगैरे शोधण्याचा प्रयत्न करु नये. कोणाच्या सदहेतूबद्दल शंका घेऊ नये. कोणी नावासाठी म्हणून का असेना, सामाजिक संस्थेला देणगी देत असेल तरी आपली हरकत नसावी... शेवटी त्यातून गरिबांनाच मदत मिळते ना?
------------------------------------------------------------------------------------------------------
सानी, मी लिहिणार होतो ते जसेच्या तसे तुम्ही लिहिले आहे. Happy
खरे आहे. बिल गेट्स आणि वॉरन बुफे यानी आपली ८५% संपत्ती दान केली आहे. त्याची जाहिरात चर्चा इ सुरु असते. त्यातुन त्याना कदाचित टॅक्स चा लाभही मिळत असेल..पण तरीही त्यातुन अनेकाना लाभ मिळत आहे हेही खरे आहे. शेवटी समाजाचे भले होणे हे मह्त्त्वाचे..काहीजण गुप्तपणे काम करतात आणि काहीजण गाजावाजा करुन करतात इतकेच.

Pages