त्या आधीच्या ग्रूप कथेचा शेवट मी सुखांत केला... तसा अजून एक शेवट केला... वास्तवाला जास्तं जवळचा. पण इथ पोस्टताना, पहिलाच पोस्टला... मला आवडतो असा... सुखांन्त.
इथे तीच कथा फक्तं वेगळ्या शेवटासह देतेय... संपूर्ण कथा तीच... फक्तं एअरपोर्टवरचा सीन वेगळा... त्यामुळे तितकाच देतेय.
बघा कितपत पटतेय... आवडतेय?
मूळ कथा: http://www.maayboli.com/node/2023
बदललेला शेवटः
**************************************************************************************
एअरपोर्टवर येऊन तासतरी झाला होता. अजून अनूचा पत्ता नव्हता. दिल्या, गुरू काहीतरी बोलून ताण हलका करायचा प्रयत्नं करत होते. विनीचं ’विशूदा’ला बिलगुन एकदा मुसमुसून झालं होतं.
’हिला त्रास दिलास ना, तर माझ्याशी गाठ आहे...जरा बरा झालो की आधी तुला ठोकून काढेन...’ हे ऐकल्यावर गुरूचं आधी गडगडून हसणं आणि मग गदगदणारे खांदे लपवत डोळे पुसून झालं होतं.
मैत्रेयी माहेरी गेली होती पण सकाळपासून चारदा फोन झाला होता. दिल्या सगळ्यांत बलदंड पण भावूक म्हणायचा.... तोच जरा धीर धरून असल्यासारखा वरवर तरी बोलत होता.
’हल ए, तू कुठे जात नाहीस साल्या. बरा झालास की तुझं मुटकुळं बांधून आणतो मी... काय नाय म्हणतोस ते बघतो ना...’ असं बोलतानाही कावराबावरा होऊन शोधत होता... सगळ्यांचा आधार.. अनू... ती कुठे दिसत नव्हती. तिचा मोबईलही बंद होता. ’ही अनुरडी कुठे र्हायली... कुणास ठाऊक. आयत्यावेळी वेळेवर आल्या तर त्यांना पोरी कशाला म्हणायचं? ह्या दिप्याच्यात अडकली नव्हती तेव्हाच बरी होती... साला ग्रूपमध्ये मेजर राडा होतोय तेव्हा नेमकी ही गायब....’
गुरूही सुटलाच मग, ’मी सांगतो तुला, अरे गेली असेल... फुलांचा गुच्च नायतर फ़ेअरवेल कार्डं असलं कायतरी घ्यायला... इकडे आम्ही उल्टे टांगलेले आणि तिकडे ह्या पोरी मॅचिंग ओढणी शोधण्यात...’
इतक्यात विशूने आपली चाकांची खुर्ची गर्रकन फिरवली आणि लांबून त्याला अनू-दिपू येताना दिसले... म्हणजे दिपू अनूला चालवत आणत होता... नाहीतर जणू कोसळलीच असती अनू...
विशू वळला म्हणून त्यांना अनू-दिपू दिसले. विशूला सोडून सगळेच अनूभोवती जमले... मंद हसत ती नुस्तच ’अरे, काही नाही रे, साधंच... श्रमाचाच ताप असणार... हा विश्या जातोय त्याचंही असेल.. दु:ख का काय म्हणतात ते’, असलं बोलत राहिली.
होता तिथेच थांबून विशू अपलक बघत राहिला... तिच नसणं, तिचं येणं, तिचं असणं... सगळंच खोलवर बाणासारखं रुतलं... अगदी खोल... डोळे मिटून त्यानं मग त्या आठवणीची हलक्या हाताने घडी घातली... दोन प्राजक्ताची फुलं त्यावर ठेवून तो कप्पा आपल्या हातांनी बंद केला...
...आणि डोळे उघडले... त्याला दिसला तो आपल्या वेगळा आपला जीवाभावाचा ग्रूप... अनूच्या भोवती जमा झालेला... त्या सगळ्यांना जवळ धरणारी... बांधणारी अनू.... एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांच्या आधाराने ’एक’ झालेला... ग्रूप!
आपण करतोय ते किती किती बरोबर आहे हे त्याला अगदी पहिल्यांदा मनोमन पटलं. आता....एकेक पान खुडत, फांदी फांदी वर घाव घालून, मुळन मूळ तोडून ह्या प्राजक्ताचं उच्चाटन करायचं. मनाच्या मातीला लागलेला प्राजक्ती दरवळाचा शेवटचा कण जाळून रान मोकळं होईपर्यंत आता परत येणं नाही.... एकच चांगलय की अजून कुणालाच ह्याची पुसटशीही कल्पना नाहीये...
अनूसह सगळेच जवळ आले... दिपू आणि अनूचं भांडण झालं होतं.. विशूने अचानक कुणा आत्ये-बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्यावरून... अनूने आपल्याकडे रहायला येण्याचा इतका जोर लावला नसता तर विशू शेवटी ऐकला असता वगैरे वगैरे.... ह्यावर कधी नव्हे ते अनू काही बोललीच नाही... नेहमीसारखी आपलं मत हिरीरीने मांडत भांडलीच नाही... त्यावरूनही दिपू चिडला होता...
’साल्या, तू सुद्धा असा आहेस ना, नेमका हवा तेव्हा वंटास हो, रे... तुम्ही आणि तुमची प्रिन्सिपल्स.. का काय म्हणायची ती... बोडक्याची प्रिन्सिपल्स. अख्ख्या ग्रूपला नष्टं करणारी कसली आलीत तत्वं.... तुमचा इगो... साल्यांनो... ही सुद्धा कमीची नाहीये... इतरांना हज्जार गोष्टी ऐकवेल... आता स्वत:च्या अंगाशी आलंय... तर...’, दिपू चिडून रडवेला झाला होता. फुटणार्या ग्रूपकडे बघून हवालदिल झाला होता... कुणाला दोष द्यावा ते कळंत नव्हतं त्याला... लहान मुलासारखा त्रागा चालला होता.
’दिपू, गप्पं बस. जरा स्वस्थं बस... मी कुठेतरी चंद्रावर वगैरे कायमचा जात नाहीये. हा दिल्या नाहीका जातंय बदली होऊन? तसंच समज... आणि मी अनूवर चिडून जात नाहीये... उगीच तिला छळू नकोस. पूर्ण बरा झालो की भेटूच रे... काय लहान मुलासारखं करतोस?’, विशूने दिपूला समजवायचा प्रयत्नं केला.
अनूही गप्प गप्पंच होती.... थोडेतरी सैलावू म्हणून.... विशूजवळ अनूला ठेवून कॉफी-खायला आणायला गेले सगळे... अनूने विशूची खुर्ची ढकलत मोठ्ठ्या काचेच्या खिडकीशी आणली. त्याच्या बाजूला दुसरी खुर्ची ओढून घेऊन नुस्तीच बसली.
खिडकीबाहेर बघत विशू काही-बाही बोलत राहिला. तो तिच्यावर रागावून जात नाहीये, स्वित्झर्लंडला जास्त चांगले डॉक्टर्स आहेत, ती आत्ये बहीणही बोलावतेय अनेक वर्षं, ह्या सगळ्याबद्दल, ग्रूप बद्दल, तिच्या-दिपूच्या लग्ना बद्दल, गुरू-विनीच्या बाळाच्या नावाबद्दल, दिल्या-मैत्रेयीवर लक्ष ठेवण्याबद्दल, तिने दिपूचा मूर्खपणा समजून घेण्याबद्दल, अधून मधून त्यांनी भेटण्याबद्दल, तो पूर्ण बरा झाला की त्याच्या परत येण्याबद्दल... इथलं-तिथलं बरचसं....
अनूही खिडकीबाहेर बघत शांतपणे ऐकत राहिली. शेवटी तिला असह्य झालं.... किती लपवणार हा... ह्या पुरुषांना कळत नाही... की असलं काही आम्ही मुली... त्यांच्याही नकळत त्यांच्या मनातलं.... वाचू शकतो... परवा हॉस्पिटलमध्ये तर खात्रीच झाली... कितीही खोल गेले डोळे तरी.. नजर? ती खोटं बोलत नाही रे...
न राहवून अनू वळली, ’विशू...’
ती पुढे काही बोलू जाणार इतक्यात सगळे परत आलेच...
’काय रे, मिटलं का भांडण तुम्हा दोघांचं?’ दिप्याने आल्या आल्या सुरूवात केली. ’विश्या, इथेच काय तो सीन होऊन जाऊदे. नायतर तू गेल्यावर ही मानगुटीवर बसेल रे... आणि सोडवायला तू ही नाहीस... अरे..’
कधी नव्हे ते दिल्या दिप्याच्या बाजूने बोलला, ’हो रे, तुला अजून अण्भव नाहीये. एक घाव दोन तुकडे जमत नाहीत ह्यांना.. पोरी, एकच एक पॉइंट घेऊन चावत बसतात....’
’चावत नाही कुरतडत... किची... किची....’, गुरूने विनीचा हात उचलून तिची नखं कुरतडण्याची ऍक्शन करीत म्हटलं... विनीने उरलेल्या हाताने त्याला धपाटा घातला.
’ए, भांडण नव्हतंच काही. उगीच नसताना आता लावून देऊ नका... काय अन्नपूर्णादेवी?’, विशू ने हसून अनूला तिच्या चिडवण्याच्या नावाने हाक मारली...
नाटकच वठवायचय आता... मनात म्हणत अनूने नेहमीचा रागावलेला चेहरा केला....
’ही तुझी कोल्ड कॉफी... माते, प्रसाद स्वीकार आणि लेकरावर दया कर... कोपू नकोस... शांत हो माते...थंड हो, देवी...हू हू हू’, गुरूने नेहमीचं अंगात आल्याचं नाटक सुरू केलं....
ग्रूप नेहमीच्या रस्त्याला लागला होता... तीच धमाल, तीच फंटरगिरी... वर वर नेहमीचं नाटक करीत अनू विचार करीत राहिली...
विशू बरा होऊन परत येईल तेव्हा काय?... बाकी कुणालाच काही फरक पडत नाही.. उलट परत एकदा ग्रूप कंप्लीट झाला म्हणून आनंदतील सगळे...
आपलं काय? त्याच्या आपल्या निखळ मैत्रीला आलेला हा वेगळा भडक... रंग निवळला.... पुसला गेला असं गृहित धरून नेहमीसारखा विशू म्हणून वागू शकेन मी त्याच्याशी?
आत्ता जशी दिपूच्या विरुद्ध तक्रारी करते त्याच्याकडे, मित्रं म्हणून त्याच्या खांद्यावर मान ठेवते, त्याच्या कडे हट्ट करत्ये, हक्काने मागून घेते, प्रेमाने त्याचे लाड पुरवतेय, त्याच्या सत्सदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवतेय...
ह्या त्याच्या आपल्यासाठीच्या खास भावना... सगळं आपल्याला माहीत नाही... असं पुसून टाकून वागायला जमेल आपल्याला?
आणि विशू? त्याचा तो तुकड्याचा फंडा? सगळ्यांनी थट्टा केली तरीही त्यावर हटून बसलेला, त्यावर पूर्णं विश्वास ठेवून... अडैल! तो असंतसं विसरू शकेल आपल्याला? विसरता येईल एकवेळ... मुळीच संबंध ठेवला नाही तर.... पण परत येऊन, परत एकदा एक नुस्ती मैत्रीण म्हणून पहिल्यापासून वाट चालता येईल... त्याला काय कुणालाही?
विश्वास... मैत्रीत किती महत्वाचा... त्यात पण, परंतू आलं की संपलच सगळं... मैत्रीतला विश्वास.... तलवारीच्या पात्यावर चालल्यासारखं... एकदा तोल गेला आणि जखम झाली की संपलच... परत त्या धारेवर चालता येणार नाही... जखम टाळून कसं चालायचं? जगाला दाखवता येणार नाही अशी जखम... दिपूलाही दाखवता येणार नाही अशी...
छ्छे... आपल्याला नाही जमणार असं वागायला...
अनू भानावर आली तेव्हा बाहेरचं नाटक शेवटच्या अंकावर आलं होतं... अतिशय अतिशय शूर चेहरा ठेवून विशू कस्टम्स मध्ये चालला होता.
सगळ्यांच्या बरोबर तिनेही गळामिठी घेतली. विनी जरा जरा हसायला लागली होती, पोरं चेकाळली होती...
’आम्ही येतोच रे हनीमूनला.... युरोपचं नंदनवन...नक्की’, दिपू
’आम्ही दुसया हनीमूनला... किंवा आमचं पहिलं पोरगं बनवायला...’, दिल्या
’विशूदा, चॅटवर येरे जमेल तेव्हा’, विनी
सगळ्यांना हात् करीत विशू दरवाज्याआड जाणार इतक्यात् अनू धावली त्याच्याकडे....
’हिचा पेशल निरोप... घ्या... आता काय र्हायलं अजून?’, दिप्या बोललाच.
’औषधं वेळेवर घे, ताकदीची औषधं घे, ती सुद्धा वेळेवर घे... असलं कायतरी असणार... पोरींचं दुसरं काय?’ दिल्या पचकलेलाही अनूला ऐकू आलच...
’विशू, मी... मला कळलय तुझी तडफड.... तू बोलला नाहीस, दाखवलं नाहीस तरी... मला... मला कळलय’ विशू चमकला...
’पण... मी... माझं... सॉरी, अनू... खरच माफ...’ इतकच पुटपुटत त्याने वेदनेने डोळे मिटून घेतले.
अनू त्याच्यासमोर् गुढगे टेकून बसली... विशूने डोळे उघडले.
’नको रे.... तू खरंच ग्रेट आहेस... माझ्यासाठी... माझ्यामागे तू होतास पहाडासारखा.... तुला हे सगळं एकट्यानेच निस्तरायचंय, विशू... सोप्पं नाहीये... आणि मला दिपूच्याबद्दल वाटलं तेव्हढं हे खरं असेल ना, तर शक्यही नाहीये.... तुझ्यामते तुझा हरवलेला तुकडा जर मी असेन... तर... परत येऊन ग्रूपमध्ये... शक्यच नाही ते....’
कसाबसा स्वर संभाळत तिने विशूचे हात हातात घेतले,’ विशू, परत यायचं की नाही ते तूच ठरवू शकतोस... माझं, दिपूचं कल्याण ज्यात आहे, ग्रूपचं चांगलं ज्यात आहे, तेच करशील तू.... विश्वास... विश्वास आहे माझा... तेच करशील ना?’
ती उठली आणि मागे वळून् न बघता ग्रूपकडे चालू लागली..
विस्फारलेल्या डोळ्यांनी, उघडं सत्य पाठमोरं होऊन जाताना बघणार्या विशूला.... ग्रूप काही दिसेना... दिसेचना....
समाप्त.
मला आधीचा
मला आधीचा शेवट जास्त आवडला ... कदाचीत मला तोच शेवट वास्तव आहे अस वाटत.
खूप खूप
खूप खूप सुंदर आहे कथा..
पण मलाही तोच शेवट जास्त आवडला.. !
क्या बात
क्या बात है!
एक न् एक शब्द कसा चपखल!
मला हा शेवट जास्त आवडला... अनुचं स्वगत काय लिहिलं आहेस दाद! तूच असं लिहू शकतेस गं!
हम्म! मला
हम्म! मला पहिला शेवट जास्त आवडला. पण हा बुद्धीला जास्त पटला. कथेची मांडणी इथेही अप्रतीम आहे. hats off!!
मलाही हा
मलाही हा शेवट आवडला दाद..... विशूचं समतोल व्यक्तिमत्व ह्या शेवटात व्यवस्थित हायलाइट होतंय.....
Mala adhichaach shevat
Mala adhichaach shevat avadala....................to jast khara vatala.....................
baki daad, tu farach chhan lihites..........
आधीचा
आधीचा जास्त खरा वाटला हा थोडा जास्त मेलोड्रामा असं वाटलं..
विशेषत: निर्णयाची जबाबदारी वरकरणी त्याच्यावर टाकून 'नको येऊस' असं सुचवणं..
असो. तू लिहितेस खास त्यामुळे कुठलाही शेवट गुंगवतो एवढं नक्की.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला पण
मला पण आधीचाच आवडला ग. विशेषत: अनुचं व्यक्तिमत्व पाहाता, ती असा negative विचार करेल असं वाटत नाही. अशुभाच्या केवळ संकल्पनेने आपला जीवाभावाचा प्रिय मित्र कायमचा गमावणं ती स्विकारेल असं मला वाटत नाही. कथेतून प्रकट होणार्या तिच्या मनोवृत्तीशी पहिला शेवट जास्त सुसंगत वाटतो.
पण तू नेहमीसारखच अप्रतिम लिहीलं आहेस, यात वादच नाही.
दाद,
दाद, आधीचाच शेवट आवडला. लिखाणतर अगदी दाद टच आहेच.
दाद, मलाही
दाद, मलाही पहिलाच शेवट आवडला. पण हा वास्तवाला जवळचा असेल तर तो स्वीकारायलाच हवा.
हे दोन
हे दोन 'शेवट' नाहीत. मला तर दोन कथा वाचल्याचा आनंद मिळाला.
आवर्जून
आवर्जून कळवलत... कोणता शेवट आवडला... धन्यवाद. मला वाटलच होतं, बर्याच जणांना माझ्यासारखा सुखांन्त आवडतो... पण माणसाला 'इन्सिक्युअर' करणार्या भावना असतात ना, त्या त्याला ह्या शेवटातल्या अनू सारखं वागायला भाग पाडतात... असं माझं मत.
मी ज्या पद्धतीने अनू दाखवलीये... ती तितकी मनस्वी, 'सच्ची मैत्रिण' आजारी विशूच्या खांद्यांवर परत येण्या-न येण्याचं ओझं टाकेल, किंबहुना येऊ नकोस असं आडून सुचवेल असं वाटत नाही... हे ही तितकच खरं आहे, नाही?
असो... शेवटी माणसं नक्की कशी वागतिल ते सांगता येत नाही हेच खरं.... आपल्या कथेतल्या पात्रांना आपण आपल्याला हवं तसं वागायला भाग पाडू शकतो :).
सुखांत
सुखांत नेहमीच सगळ्यांना आवडतो... पण पहील्या शेवटासोबतची कथा मला तरी कळली नव्हती... कदाचित पटली नव्हती... माझ्या मते हाच शेवट योग्य आहे कथेसाठी... आणि वरवर जरी हा कथेचा दुखांत वाटत असला, तरी... बरं होउन परत गृपमधे येऊन गृप तोडण्यापेक्षा... लांब राहुन गृप बांधुन ठेवण्यातच सगळ्यांच भल आहे ना???... जीवाभावाचे मित्र असच करत असतील ना???....
सुरेख
सुरेख दाद!!!
मला दोन्ही शेवट आवडले, दोन्ही पटले.
दाद, हा
दाद, हा शेवट जास्त सच्चा आहे. या शेवटामुळे कथा जास्त परिणामकारक ठरली आहे माझ्यामते.
तू म्हटलीस तसं <पण माणसाला 'इन्सिक्युअर' करणार्या भावना असतात ना, त्या त्याला ह्या शेवटातल्या अनू सारखं वागायला भाग पाडतात...<> हे मला अगदी पटलं. आणि विशूच्या भावनांची खोली इतकी जास्त असेल तर ते जाणणार्या अनूला या शेवटात वर्णन केलेली असुरक्षित भावना येईलच. मग तिचा मूळ स्वभाव कसाही असो.
असो. कथा आवडली हे वेगळं सांगायला नकोच.
मला हाच
मला हाच शेवट आवडला. आधीचा शेवट खुपसा नव्हता पटला. तुझ्या आधीच्या कथांच्या मानाने ही कथा मात्र मला "खास दाद टच " असलेली वाटली नाही. तुझ्या आधीच्या कथांनी मनाचा तळ अगदी ढवळुन काढला होता तसे यावेळी झाले नाही. कॉलेज सोडुन खुप वर्षे झालीत त्याचाच परिणाम असावा :))
तु यावेळी आई आणि मुल व्यतिरिक्त दुसरा विषय हाताळलास हे पण छानच
-प्रिन्सेस...
दोन्हि
दोन्हि शेवट आवडले...दुसरा जास्त परिणामकारक वाटला..कथा तर सुरेख आहेच.
अप्रतिम
अप्रतिम लिहिलयस दाद. मला पहिलाच शेवट आवडला पण.
दोन्हि
दोन्हि शेवट आवडले, पण हा जरा खास वाटला,कारण तो वास्तवाशि जास्त जवळ वाटला.
रचना
मला आधीचा
मला आधीचा शेवट कुठे वाचायला मिळेल? मी वाचला नाहिये.
अनघा
शेवट पहिला
शेवट पहिला जास्त आवडला, पण लिहिण्याची श्टाईल दोन्हीची पण छानच.
आता पुढची कथा/ललित केव्हा?
अप्रतिम !!
अप्रतिम !! जुने दिवस आठवले. मला दोनिहि शेवट आवडले. पण हा शेवट प्र्यक्टिकल वाटला.
सुंदर कथा आणि पात्र सुद्धा .....
दाद, आधी
दाद,
आधी जेव्हा कथा वाचली होती तेव्हा तु केलेला पहिला शेवट छान वाटला होता पण हा शेवट वाचल्यावर हा जास्त योग्य किंवा तार्किक वाटला.
तुझ्या कथा नेहमीच 'हिला दिया' प्रकारच्या असतात, ही पण त्यातलीच.
पहिला शेवट
पहिला शेवट आवडला आणि हा पटला. पण आवडले दोन्ही! अप्रतीम!
दोन्ही
दोन्ही शेवट आवडले वेगवेगळे. पण कोणता व्हावा अस वाटल मनाला अस विचारशील तर पहीला असच म्हणेन.
मलाही
मलाही पहिला शेवट जास्त आवडला. दोघांमध्येही लिहिण्याची शैली तर जबरदस्त आहेच, त्यात काय बोलायचंच नाही, आखीर दाद दाद है
*****************
सुमेधा पुनकर
*****************
सुमेधा,
सुमेधा, आभार! ('दाद दाद है' काय? .... बस्स काय?)
कथा
कथा अप्रतिम आहे...दाद चि कथा असल्यावर ती दाद देण्यासारखि असणारच...
पहिला शेवट चांगला वटतो..दुसर्यात अनु अगदि सेल्फिश वटते...तिच स्वरुप नुस्त स्वतःपुर्त विचार करणार जाणवत..मग ति ग्रुप चि व्याख्याच बदलते.