महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||
दोडके गिलके भेंडी मटार
शेवगा भोपळा वाल गवार
सार्यांनीच मार्केटात संप केला आज
कसली भाजी करू मी आज ||१||
बटाटे आणले सगळेच संपले
फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले
काय! चिकन करू म्हणता ताजं?
कसली भाजी करू मी पतिराज ||२||
८० रुपये किलो आहे तुरदाळ
असलीच महाग झाली मुगदाळ
महागाईने केला कसला हा माज
कसली भाजी करू मी आज ||३||
साखरेची तसलीच गत झाली
तेलातुपाविना रयाच गेली
खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस
कसली भाजी करू मी आज ||४||
काय करू मी आज सैपाकाला
भाजी नाही आज डबा करायला
रोजचीच कटकट झाली आहे मज
कसली भाजी करू मी आज ||५||
गहू तांदूळाने केली फार दैना
एका पगारात कसा काढावा महिना
काहीतरी आणा घरी कामकाज
कसली भाजी करू मी आज ||६||
जे आहे ते सुखाने खाऊ
महागाईचा नका करू बाऊ
चैनीचा परवडणार नाही माज
कसली भाजी करू मी आज ||७||
अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/१०/२०१०