अस्वस्थ आई

Submitted by श्यामा on 18 September, 2010 - 05:22

अस्वस्थ आई

प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येणारी कल्याणला जाणारी जलद लोकल आज प्लॅटफार्म क्रमांक चारवर येत आहे. स्टेशनवर घोषणा झाली रात्रीचे १० वाजत होते आधीच ट्रेनस् लेट त्यामुळे लोक आम्ही शिणलेलो...२ नंबरच्या फलाटावरची सगळी गर्दी यंत्रमानवाला आदेश झाल्यासारखी ४ नंबरवर निघली.पण दिपाली चरफडली. आणखी उशीर होणार. आज मी म्हटलं होत शशांकला लवकर येते म्हणून त्याने परीलाही पाळणाघरातून लवकर घरी आणली.. पण नाहीच जमलं..नेहमीप्रमाणे नाहीच जमलं. बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि पुढचं सगळे प्लॅनस् कोसळले. चील यार होता है...मी तिची तकलादु समजुत काढली. पण दिपुच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आलं.
दिपाली माझी मैत्रीण..म्हणजे माझी सिनियर कलिग.मिडियात काम म्हणजे काही काळवेळ नाहीच. तसं आजकाल कुठल्याच नौकरीच्या वेळा निश्चित नसतात म्हणा. पण रिपोर्टींग दिपालीच पॅशन..वेड...ध्येय्य सारं काही. आणि नौकरी करणं तिची आर्थिक आणि बौद्धिक गरजही. आईबाबाही तसे परंपरावादी. त्यांनाही हिची सात दिवस चोविस तासांची नौकरी पटत नव्हती. लग्नाला दोन वर्ष होउन दिपाली आणि शशांकच्या आयुष्यात परी आली. आता परीही सहा बर्षांची झाली आणि दिपालीची घालमेल पराकोटीची वाढली.
मुग्धा कशासाठी करतो ग आपण हे सगळं नेमकं कशासाठी हे कळेनास होतं कधीतरी. खूप प्रयत्नांनी मी माझं करीयर घडवलं. त्यात पत्रकारीता तर माझा जीव आहे. आजवरची सगळी व्यावसायिक धडपड ही आत्ताची पोझिशन मिळवण्यासाठी केली. खूप मेहनत केली. पण आता सोडवतही नाही आणि धरवही नाही असं वाटतं. चल ए एक दिवस थोडा उशिर झाला तर केवढा इशु करते आहेस...मी मनात म्हटलं पण दिपाली गंभीरच होती. माझं करियर मला प्रचंड प्रिय आहे. झपाटल्यासारखं काम करणं ही कामाची आणि माझीही गरज आहे. मी स्त्री पुरुष समानता मानते आणि पाळतेही. आणि शशांकही तसाच आहे. मग प्रॉब्लेम कुठं आहे. प्रॉब्लेम हा आहे की मला कशालाच वेळ नाही. अगदी कशालाच नाही. ना घरासाठी ना स्वतःसाठी ना कशासाठी... एकटा जीव होता तेव्हा काहीच वाटलं नाही. नंतर नवरा ही समजुदार त्यानेही कधी तक्रार केली नाही.. पण आता वाटतं घराला वेळ द्यावा. घरच्यांच हवं नको ते बघावं. सणावाराला घरी राहावं. पण हा मिडीयातला जॉब आणि जवाबदा-यांमुळे काही सुद्धा शक्य होत नाही. सुरवातीला या ग्लॅमरच सगळ्यांनाच कौतुक वाटतं ग. पण नंतर तेच कुरकुर करतात. गेले ४ वर्ष मी दिवाळीही घरी साजरी केलेली नाही.तरी मी जमेल तितकं सगळं करते घरासाठी.. नव्हे माझ्या समाधानासाठी...आम्ही दोघही धावतोय. घर म्हणजे रात्री अंग टेकायची सोय झालीय फक्त. आपण कितीही म्हटलं स्त्रियांच्या आयुष्यात त्यांच्या करियरचा आणि कौटुंबिक जीवनाचा पिक पॉईंट एकाच वेळी येतो. दोन्ही आघाड्यांवर लढता लढता बाई बिचारी केविलवाणी होऊन जाते.
एनी वे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है..आय वॉन्ट टू रिच द टॉप...आणि त्यासाठी हे सगळं करावच लागेल. महत्वाकांक्षी दीपाली पुन्हा जागी झाली.
तिने मला नव्हे स्वतःलाच समजावलं आणि गप्प झाली. काही वेळ शांतता
परी मात्र तक्रार करते ग. तिला तिची आई हवी असते. तिला गाणी शिकवायला तिच्या शाळेतल्या गमती जमती सांगायला, छान छान खाऊ घालायला, आईच्या मउ कुशीत झोपायला. तिची आई नसतेच घरी. बिचारी तीन महिन्याची होती तेव्हापासून पाळणाघरात आहे. तिथल्या ताईंनी तिला आईला ऑफिसाला जातांना टाटा करायला शिकवलाय. सुरवातीला ती आनंदानं टाटा करायची पण आता ती रडते. खूप रडते. रोज ऑफिसला येतांना माझ्या लेकीचे अश्रू सोबतीला आणते.ती आजारी असली की नेमकं ऑफिसमध्ये नवी जवाबदारी येउन पडते. मला उशीर होतो. हिरमुसून निजलेली लेक पाहण्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नसतो ग. सकाळी आठला घर सोडल्यावर परतायला रात्रीचे दहा होतात कमीतकमी. दोन्ही वेळेला परी झोपलेलीच. मग परीही चिडचिड करते. तिच्या मैत्रिणींच्या आया घरी असतात. एकदा ती म्हणाली सोड नौकरी पण माझ्यापाशी रहा. मी म्हटलं सोनु तुला डॉक्टर व्हायच आहे ना म्हणुन मी पैसे जमवतेय नौकरी करुन. तर म्हणाली मला शिकायचच नाही डॉक्टर तर मुळीच व्हायच नाही. मी तुला चॉकलेटही मागणार नाही पण ऑफिसला जाउ नको.. खूप असाहय्य वाटतं ग अशावेळी. कधीकधी वाटतं मोठी होउन ही मला जाब विचारेल. तिला गरज असतांना माझ्या अनुपस्थितीसाठी मला गुन्हेगारच समजेल. आपल्या आर्थिक, वैचारीक स्वातंत्र्यासाठी आपण आपल्या लेकीला नको त्या वयात स्वतंत्र, एकटं करुन टाकल्यासारखं वाटतं
आपलं बालपण किती छान होतं नाही. आई कायम घरीच.आईशिवाय पानही हालत नसे आपलं. आपल्या आईने आपल्याला अक्षरशः घडवले. कुठ चुकलं माकलं तर सावरलं. मला जमेल ना ग हे सगळं करायला. फिल्डवर आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्वाने भल्याभल्यांना चित करणारी दिपाली मुसमुसत होती..
अग परी थोडी मोठी झाली की तिलाच कळेल सगळं...
ना धड लहान ना धड मोठी या अर्धवट वयात तर तिला माझी आणखीनच गरज असेल ना. तेव्हा काय करणार आहे मी. नौकरी तर करायचीच आहे मला. करावीच लागेल. पण थोडा कमी वेळ घेणारी आणि कमी व्याप असणारी नौकरी शोधावी म्हणते. पैसा आणि प्रोफाईल थोडं कमी असलं तरी चालेल. पत्रकारीता नकोच आता. इलेक्ट्रोनिक मिडीया तर नकोच. परीला वेळ देणं जास्त महत्वाच.. हे बोलतांना करियरिस्टीक दिपालीची वेदना स्पष्ट दिसत होती, दिपालीच स्टेशन आलं आणि ती उठली. कुठल्याश्या निर्धाराने. मला बाय करायचय हे विसरुन ती चालत राहीली. मी तिच्या पाठमो-या आकृतीकडे बघत राहीले.वाटलं ही लौकरच राजिनामा देणार.. आमच चॅनल एक स्टार रिपोर्टर गमावणार. दिपालीतली कर्तृत्ववान पत्रकरापेक्षा तिच्यातली आई जास्त महान आणि महत्वाची आहे हे मी मान्य करुन टाकलं. पण तसं काही झालं नाही. दिपाली काम करत राहीली. मी तिच्याशी परत या विषयावर बोलले नाही. मी तिला काही विचारलं तर तिच्या जाण्याची मी वाट पाहतेय असा अर्थ काढला जाउ शकला असता. एक दिवस दिपाली मोठ्या खुषीत माझ्याजवळ आली. तिच्या लेकीने गिचमिड अक्षरात लिहीलेला माझी आईचा निबंध दाखवला.
माझी आई खूप छान आहे
ती टिव्हीवर दिसते
तिला सगळे ओळखतात
ती सकाळी ऑफिसला जाते.
पण मला शाळेत न्यायला डब्बा देते
ती घरी नसते तेव्हा मला रडू येतं
माझी आई मला खूप आवडते
बघ किती समजुतदार आहे तुझी लेक मी म्हटलं. दिपाली नुसतच हसली. त्या दिवशीची असहाय्यता पुन्हा तिच्या चेह-यावर दिसली......पण क्षणभ-यासाठीच.....

गुलमोहर: 

शामा मायबोलीवर स्वागत्... Happy
फार छान लिहले आहे, आईच्या मनातल्या भावना छान टिपल्या आहात..
नोकरी करणार्‍या आईंच्या मनात असेच विचार घुमत असतात

छान लिहीले आहे.. माझी maternity leave संपून आता दोन दिवसात कामावर रुजू व्हायचं आहे, तान्ह्या बाळाला घरी ठेवून.. माझ्याच भावना टिपल्या आहेत जणू...