नॉर्वेच्या दरीखोर्यातून.... भाग १
रेल्वेने ऑस्लो मागे टाकले. आता सहा तास रेल्वेतून नॉर्वे बघायचा होता. चित्रातल्या सारखेच दिसत होते सगळे. नॉर्वे ही सुजलाम् भूमी आहे. इतके पाणी मी कुठेच नाही पाहिले. सहजतेने निर्माण झालेली विशाल सरोवरं सर्वत्र दिसत होती. आणि त्या सरोवराच्या काठाशी बिलगलेली नॉर्वेजियन खेडी. लांबच लांब कुरणे हिरव्यागार गवतावर पावसाने मोती शिंपडल्यासारखी चमचमत होती. मध्येच एखादा अवखळ झरा खळाळत यायचा. थोडी जागा सापडली की विसाव्यासाठी पाणी थांबून तळे तयार झालेले असायचे. त्या भोवती आनंदात हसणारे एखादे शेत. शेताच्या एखाद्या कोपर्यात कौलारू घरे. त्या दोनचार घरांची वाडी बघताना राहून राहून "पाडस" मधले ज्योडीचे घर आठवत होते. अगदी तस्सेच दृश्य दिसत होते.
लोकवस्ती खूप विरळ दिसत होती. इथे सरासरी ४ किमी स्क्वेअरमध्ये १२० लोक राहातात म्हणे ! सरोवरांच्या काठावर कितीतरी सुबक घरे दिसत होती. इतक्या काठावर की घरामागच्या पायर्या पाण्यात दिसायच्या. त्या प्रत्येक घराचे वैशिष्ट्य म्हणजे घराजवळ बांधलेली छोटीशी होडी. अगदी हौसेने रंगरंगोटी करून सजवलेली. उन्हाळ्याच्या ४ महिन्यात मासेमारी करून ताज्या माशांनी पोटं नि मनं तुडुंब भरत असावीत. हा भाग सामन माश्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे म्हणे. सामन मासे समुद्रातून नदीत प्रवाहाच्या विरुद्ध पोहत येतात आणि मग अंडी घालतात. त्यामुळे या लहान मोठ्या तळ्यांच्या नि नद्यांच्या प्रदेशात त्यांचा सुकाळ असतो. मत्स्याहारी लोक दुरून येतात ताजे सामन खायला. अर्थात आम्हाला शाकाहारी असल्याने त्याचा काही लाभ घेता आला नाही.
लोकांचे रहाणीमान मात्र सधन असल्याचे जाणवत होते. या खेड्यांमधल्या प्रत्येक घरापुढे आधुनिक कार, स्पोर्ट्सकार आणि बाईक्स दिसत होत्या. तळ्याकाठच्या एका घरासमोर तर चक्क एक छोटेसे खाजगी विमानही होते ! घराच्या अंगणात वेगवेगळ्या आकाराचे पोहण्याचे तलाव निळ्याशार रंगाने उठून दिसत होते. घराजवळ गोठा. त्यात गायी, हरणं आणि घोडे. याशिवाय कोंबड्या सश्यांची खुराडी आणि कुत्री होतीच. कसे दिसत असतील या घरात रहाणारे लोक ? अंहं ! एकही माणूस दिसायला तयार नाही. हे समोरचं निसर्गदृश्य एखाद्या लँडस्केप सारखं माणसाच्या चित्राशिवाय दिसत होतं.
एका बाजूला उंचच उंच लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा, त्यातून खेळत येणारे झरे, नद्या, त्यावर बांधलेले चित्रमय पूल आणि लखलखणारी तळी ! एवढा वेळ भान हरपून हे चित्र बघत होते. त्या सौंदर्याची गुंगी यायला लागली. त्यात काल रात्री ४ च तास झोप मिळाली होती. पण पोटात काहीतरी गेल्याशिवाय झोप लागणार नव्हती. सोबत शिदोरी भरपूर होती. तरीपण गरम काही मिळते का बघितले. पॅन्ट्रीत गरम गरम स्पिनॅच पाय मिळाले. शाकाहारी हा एकच पदार्थ होता. ( त्याच्या नावात 'पाय' ! ) पालक आणि चीज भरलेले हे गरम गरम पॅटीस पोटात गेले नि झोपेने जोरदार आक्रमण केले. मन झोपायला तयार नव्हते. आणि शरीर जागे रहायला. बाहेर निसर्गाचा एवढा उत्सव मांडलेला दिसत असताना झोप येणे म्हणजे करंटेपणाच ! बराच वेळ नुसत्या डुलक्या काढल्या. बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. आता आमचे स्टेशन जवळ आले होते.
स्वभावानुसार रेल्वेच्या डब्यात पसरू दिलेला सहा तासांचा संसार गोळा केला नि उतरलो. आजून मुक्कामाचे ठिकाण दोन तास बस च्या अंतरावर होते. जिथे उतरलो ते स्टेशन अद्नाल्स्नेस. समोर एक मोठ्ठे सरोवर आणि तीन दिशांना डोंगर रांगा. क्यामेरे सरसावले. १० मिनिटात किती बघू नि काय काय टिपून घेऊ असे झाले. शेवटी बसमध्ये बसावेच लागले. आता आम्ही पठारी प्रदेश सोडून पर्वतीय प्रदेशात जात होतो. नदीला नि सरोवरांना अगदी लगटून आमचा रोड वळणे घेत होता. मध्येच बोगद्यातून बस जात होती. ड्रायवरमामा खुषीत दिसत होते. सोबतच्या प्रवाश्यांशी नॉर्वेजियन भाषेत गप्पा मारत होते. बसमध्ये बरेच पर्यटक होते. मध्येच एखादे सुंदर दृश्य बाहेर दिसायचे नि "वाव ! ऑसम् ! ग्रेट ! " असे उद्गार ऐकू यायचे. लगेच बाकी सगळे क्यामेरे तिकडे जायचे ! आपल्याला मिळणारा आनंद असा सहजतेने वाटला जात होता. दुणावत होता. माझ्या पुढच्या सीटवर एक अमेरिकन काका नि एक जपानी काका यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या. अमेरिकन बडबडे असतातच पण जपानी काकांना स्वतःचा कंपू सोडून गप्पा मारताना बघायला छान वाटत होते. निसर्गाची जादू असेल ही !
मुक्कामाचे गाव आले. आलेसुंद. या गावाच्या नगरपालिकेत पाच आयलंड्स येतात. लोकसंख्या ४२०००. एकूण सात बंदरे असल्याने हे नॉर्वेतले एक महत्त्वाचे मत्स्यव्यापार केंद्र मानले जाते. गिरिंजर फियॉर्डशी जोडले गेले असल्याने पर्यटन व्यवसायातही या गावाचे स्थान महत्वाचे आहे.
आमच्या बसच्या ड्रायवरमामांना आमच्या हॉटेलचा पत्ता माहीत होता. त्यांनी उतरल्यावर कुठून कसे जायचे ते सांगितले. गावात प्रवेश करताच एका सरकारी इमारतीसमोरच्या पुतळ्याने लक्ष वेधले. मासे धरायला गेलेल्या आपल्या प्रियकराची वाट बघणारी एक तरूण मुलगी होती ती. या पुतळ्याच्या चेहर्यावरचे भाव आणि वाट बघणारी मुद्रा एवढी बोलकी होती ! कन्याकुमारीची गोष्ट आठवली नि क्षणभर व्याकूळच झाले.
आज मात्र हातातल्या नकाशाने आणि ड्रायवर काकांनी मदत केल्याने हॉटेल लगेच सापडले. हॉटेलकडे जाणारा रस्ता समुद्राच्या काठानेच जात होता. सध्या तिथे खाद्यमहोत्सव चालू होता. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वाईन्स चा वास वातावरणार भरलेला होता. लोक त्या वेगवेगळ्या पदार्थांवर रांगा लावून तुटून पडत होते. ( हो, हो, आठवले मला पुण्यातले असे महोत्सव ! ) इथे काही शाकाहारी आहे का विचारले असते तर लोक दगड घेऊन स्वतःचे डोके फोडत बसले असते असे वाटले. एवढे तल्लीन होऊन सगळे मासे खात होते. ( इथे शाकाहारी मागणे म्हणजे एखाद्या डिस्को बँडला 'देहाची तिजोरी" वाजवायला सांगणे झाले असते ! )
सामानाचे ओझे हॉटेलवर टाकून परत येऊ असे म्हणून हॉटेलवर पोहोचलो. सामान लावताना डब्यातल्या मेथी पराठ्यांचा घमघमाट आला. मग काय सोबत शेंगादाण्याची चटणी, पराठे आणि वर कणीक लाडू असा उभा आडवा यथेच्छ समाचार घेऊन सगळे ताजेतवाने झालो.
जवळच एका टेकडीवरून संपूर्ण गाव आणि समुद्र असे सुंदर दृश्य दिसते असे कळाले. तिथे गेलो तर काय ओबडधोबड रस्त्यावर टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ५०० पायर्या बांधलेल्या होत्या. आमच्या सोबत सगुणा. तिला उचलून चढणे किंवा बाबागाडी चढवणे दोन्ही शक्य दिसत नव्हते, म्हणून आम्ही दोघे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या बागेत थांबलो नि सोबतचे गीता-माँटी टेकडी चढायला गेले.
थोडावेळ खेळल्यावर तो कन्याकुमारीचा पुतळा जवळून बघून गावात एक चक्कर मारू असा विचार करून निघालो. गाव डोंगरात असल्याने सगळे रस्ते चढउतारांचे होते. काही ठिकाणी दगडी पूल आणि पायर्या बांधून दोन डोंगर जोडले होते. आम्ही मुख्य रस्त्याला लागलो नि पावसाला सुरुवात झाली. हे अनपेक्षित नव्हतेच. हे गाव पावसाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे म्हणतात. एक विनोदही सांगतात. एकदा एका पर्यटकाने गाईडला विचारले, काय रे, पाऊस कोणत्या काळात नसतो ? यावर गाईड उत्तरला , " मला काही कल्पना नाही बुवा. कारण मी फक्त २४ वर्षांचा आहे ! "
तर अशा या पावसाने चांगलीच झोडपायला सुरुवात केली. एका दुकानासमोर निवार्याला उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी पाऊस थांबेना. कमी पण होईना, शेवटी टॅक्सी केली. १ कि मी च्या अंतरासाठी भरपूर पैसे मोजून हॉटेलवर परतलो. खिडकीतून रिमझिम पाऊस, समुद्रावर पडणारा दिसत होता. मावळतीचा सूर्यप्रकाश वातावरण अजून भारून टाकत होता. परतणार्या नौका, परतणारे पक्षी आणि परतणारा सूर्य ! मन काही क्षण नि:शब्द झाले.
एवढ्यात माँटी-गीता परत आले. मग कॉफी ( ही हॉटेलमध्ये रहाणार्यांसाठी चक्क फुकट होती ! ) गप्पा, आणि गाण्याच्या भेण्ड्या. ४ वाजता पोटभर खाल्ल्याने उगाच काहीतरी खायचे म्हणून पावसात बाहेर जाण्याची कोणाची तयारी नव्हती. सामान आवरून ठेवले आणि झोपलो.
उद्या निसर्गदेवतेचा एक चमत्कार पहायला जायचे आहे. गिरिंजर फियॉर्ड !
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो मितान !
सुंदर फोटो मितान !
सगळेच फोटो अप्रतिम. मला
सगळेच फोटो अप्रतिम. मला शेवटून दुसरा फाSSSSSSSSSSSSर आवडला!!! जवाब नाही असा आलाय अगदी.
मस्त फोटो आणि वर्णन .. भाग १
मस्त फोटो आणि वर्णन ..
भाग १ मध्ये पण काही फोटो होते का? दिसत नाहियेत की हेच फोटो होते?
फ्रेम करुन भिंतीवर लावावेत
फ्रेम करुन भिंतीवर लावावेत असे अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो आणि ओघवतं
अप्रतिम फोटो आणि ओघवतं वर्णनं.
सुंदर !!! एकदम परीकथेतलं गाव
सुंदर !!!
एकदम परीकथेतलं गाव वाटतय :).
अप्रतिम फोटो अन् मस्त लेखन
अप्रतिम फोटो अन् मस्त लेखन शैली...आवडला भाग...
तुझ्या गोड गोड गोष्टींमधलं
तुझ्या गोड गोड गोष्टींमधलं गाव वाटलं.. सुर्रेख
मस्त फोटो स्वर्गच जणू. त्या
मस्त फोटो स्वर्गच जणू. त्या मुलीचा पुतळा किती गोड आहे ग.
मितान, तुम्ही जो नजारा
मितान, तुम्ही जो नजारा कॅमेर्यात बंद केलायत तो ऑस्सम आहे खरंच, वर्णनही झक्कास.
मितान, सुंदर वर्णन आणि फोटोज
मितान, सुंदर वर्णन आणि फोटोज
मलाही वर्णन व फोटोज प्रचंड
मलाही वर्णन व फोटोज प्रचंड आवडले!! मस्त दिसतोय हा भाग!!
सुरेख!
सुरेख!
लै झ्याक!
लै झ्याक!
वाह.. अशक्य सुंदर फोटो आहेत!
वाह.. अशक्य सुंदर फोटो आहेत!
निसर्ग अप्रतिम आणि तुमचे
निसर्ग अप्रतिम आणि तुमचे लिखाणही! डोळ्यासमोर नॉर्वे चे हुबेहुब चित्र आणि उत्कंठा उभी केलीत. धन्यवाद!
प्रचि २ मधिल डोंगराची
प्रचि २ मधिल डोंगराची घसरगुंडी मस्तच
सगळेच प्रचि आणि वृत्तांत भारी
मस्त वर्णन. युरपच्या प्रवासात
मस्त वर्णन. युरपच्या प्रवासात सगळीकडे असेच देखणे दिसत राहते. आपल्या उच्छवासाने पण ते रंग विस्कटतील असे वाटत राहते.
माया.. खर्या अर्थाने WOW हे
माया.. खर्या अर्थाने WOW हे उद्गार काढावे असा नजारा.. मस्तच गं ....
सुं द र !!! काय मस्त फोटोज नि
सुं द र !!! काय मस्त फोटोज नि मस्त वर्णन !! सह्ही !
फार छान आहेत गं फोटो.... आणि
फार छान आहेत गं फोटो.... आणि वर्णन झ्याक! तो हिरवा, निळा रंग पिऊन टाकावासा वाटतोय....
त्या तरुणीचा पुतळा फारच भावस्पर्शी!
मस्त फोटो आणि वर्णन ..
मस्त फोटो आणि वर्णन ..
अप्रतिम फोटो आणि वर्णन
अप्रतिम फोटो आणि वर्णन