अ नेचर वॉक विथ दिनेशदा

Submitted by जिप्सी on 7 September, 2010 - 01:35

निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप।
त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप॥

या ओळींचा पुरेपुर अर्थ समजला तो दिनेशदांसोबत भटकताना. ऑगस्ट महिन्यात दिनेशदा भारतभेटीला आले होते तेंव्हा त्यांच्यासोबत राणीच्या बागेतील काहि दुर्मिळ वृक्षांची/फुलांची/वेलींना जाणुन घेण्याचे भाग्य लाभले. प्रत्यक्षातील आमची हि पहिलीच भेट (माबोकरांच्या भाषेत "नॅनो गटग" :)) आणि पहिल्याच भेटीत त्यांचे यासर्वबाबतीतील अफाट ज्ञान जाणवले (अर्थात माबोवरच्या त्यांच्या रंगिबेरंगी पानामधुन बर्‍याच जणांना ते आधीच माहित असेल). आमच्या या नॅनो गटगमध्ये बर्‍याच दुर्मिळ आणि अपरिचित (अर्थात मला :)) वृक्षांची नावे, त्यांचा बहरण्याचा कालावधी, मुंवई/महाराष्ट्रात इतरत्र कुठे आढळतील, त्यांचे औषधी/घरगुती उपयोग यांसहित माहिती मिळाली.
कैलासपती, गोरखचिंच, गायत्री, कलाबाश, विषवल्ली, कनकचंपा, नागचाफ़ा, मणीमोहर, सुवर्णपत्र, कॅशिया, कोको, अत्यंत दुर्मिळ अशी "उर्वशी", बेल, कृष्णवड, नोनी यांची सुरेख माहिती दिनेशदांकडे होती. (यातील काहि झाडांची नावे तर दोन आठवड्याच्या आतच माझ्या विस्मृतीत गेली :(). पण इतक्या वर्षानंतरही त्यांना एकुण एक झाडांची नावे व इतर माहिती आहे. त्यांचे या विषयावर ज्ञान इतके आहे कि अगदी चालत्या गाडीतुनही त्यांनी जर एखादे झाड पाहिले तरी पटकन त्याचे नाव सांगतील.

कृष्णवडाबद्दल एक सुरेख कथा दिनेशदांनी सांगितली कि, कृष्णाला दहीलोणी देण्याकरीताच निसर्गाने याचा आकार द्रोणासारखा केला आहे. सामान्यांना मात्र प्रथमदर्शनी हे किड लागलेली पाने वाटतील पण नैसर्गिकरीत्याच याची रचना द्रोणासारखी आहे.

त्यांच्या बिझी श्येडुलमधुन वेळ काढुन हा खजिना आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल दिनेशदा यांचे खुप खुप आभार. आता ओढ लागली आहे ती या वृक्षांच्या फुलण्याच्या कालावधीची (फेब्रुवारी-मार्च दरम्यान) :-).

असा हा आमचा निसर्गाच्या सानिध्यातला "नॅनो गटग" गिरगाव चौपाटी येथील "न्युयॉर्कर" मध्ये "फलाफल, छोले भटुरे" आणि चौपाटीवरची प्रसिद्ध कुल्फ़ी खाऊन संपन्न झाला. Happy

प्रचि १ समुद्रशोक

प्रचि २ कैलासपती

प्रचि ३ कोको

प्रचि ४ कॅशिया

प्रचि ५ कॅशिया

प्रचि ६

प्रचि ७ कोको

प्रचि ८ मोठी करमळ

प्रचि ९

प्रचि १० बेल

प्रचि ११

प्रचि १२ कलाबाश

प्रचि १३ कलाबाश

प्रचि १४ कलाबाश

प्रचि १५ कृष्णवड

प्रचि १६ गोविंदवृक्ष

प्रचि १७

प्रचि १८ चंदनवेल

प्रचि १९ चंदनवेल

प्रचि २० चंदनवेल

गुलमोहर: 

४१) कांडोळ
कांडोळाला भूताचे झाड असेही म्हणतात. अंधारात याच्या फ़ांद्या एखाद्या अजस्त्र प्राण्याच्या सापळ्याप्रमाणे दिसतात. याला अगदी गुंतवळ भासेल असा फुलोरा येतो, आणि मग केसाळ पंचकोनी फळे येतात. त्यावर कुस असते. यातल्या बिया भाजून खाता येतात. यापासून मिळणारा करायागम, औषधी गोळ्यांत वापरतात. राणीच्या बागेत, प्रवेशद्वाराजवळ छोटे झाड आहे. कमला नेहरु पार्कात पण हे आहे, आणि घारापुरी बेटावर पण.

४२) करमळ
भारतातील आकाराने सर्वात मोठे फुल येणारे हे झाड असावे. पाचच पण जाड पांढऱ्या पाकळ्या (खाता येतात त्या) त्याच्या आत बदामी रंगाचे शेवंतीचे फुल असावे आणि त्यावर एखादे भरगच्च जाईचे फूल ठेवावे असे याचे रुप असते. याला छान सुगंध येतो. याची पाने खास आकाराची आणि मोठी असतात. खोड तुकतुकीत असते. फ़ळे मोठी असतात आणि ती संदलांची बनलेली असतात. हि संदले खाता येतात. आंबट लागतात. राणीच्या बागेत हे झाड आहे. (चोर्ला घाटात, याची दुर्मिळ असणारी पिवळी
जात मी बघितली होती.)

४३) करंजा
तुकतुकीत पानांचे हे झाड अनेक ठिकाणी दिसते. चेंबूर हायस्कूलच्या आवारात हि झाडे आहेत. उन्हाळ्यात याला पांढरा जांभळा मोहोर येतो आणि कुरमुऱ्यांसारखा याचा सडा झाडाखाली पडलेला असतो. याला करंजीच्या आकाराच्या शेंगा लागतात. त्यातल्या बियांपासून तेल काढतात. या तेलाला उग्र दर्प येतो. वंगणासाठी ते वापरतात तसेच ते तेल अंगाला लावल्यास किटक चावत नाहीत.

४४) केवडा
केवडा हे तसे समुद्रसपाटीवरचेच झाड (पण अंबोलीत आढळते) मुंबईला मनोरी किनाऱ्यावर तसेच राणीच्या बागेत याचे मोठे बन आहे. केवड्याच्या सुगंधाचे आपल्याला वेड असले तरी आफ़्रिकेत ते त्याच्या फ़ळांसाठी जोपासतात. त्याला अननसासारखी फळे लागतात आणि ती गोड लागतात. गणपतिच्या दिवसात माटुंगा परिसरात, केवड्यांच्या सुंदर पताका लावलेल्या असतात.

४५) कृष्णकमळ
निळ्या शंभर पाकळ्या, त्यात उभा कृष्ण आणि त्याभोवती फ़ेर धरलेले पाच पांडव असे रुप असलेले हे देखणे फुल, कमला नेहरु पार्कात आहे. याच पॅसिफ्लोरा कुळात, माझ्या आवडत्या पॅशनफ्रुटचा वेल येतो. हा वेलही मुंबईत काही लोकांकडे आहे.

४६) कृष्णवड
हा वडाचाच एक प्रकार आहे पण याचे प्रत्येक पान गुंडाळल्याप्रमाणे त्याचा द्रोण झालेला असतो. त्यात यशोदा कृष्णाला दही देत असे, असा समज आणि म्हणून हे नाव. आणि हेच नाव लॅटीनमधे सुद्धा. राणीच्या बागेत, बार्किंग डिअरच्या पिंजऱ्याजवळ टेकू दिलेल्या अबस्थेत हे आहे.

४७) कुंकू
कुंकवाचे किंवा अनोटाचे झाड, चेंबूरच्या प्रियदर्शिनी सर्कलमधे बघितल्याचे आठवतेय. याची पाने पिंपळासारखीच असतात. फुले पांढरी वा जांभळी असतात. याला त्रिकोणी केसाळ फळ लागते आणि आतल्या बियांपासून खाद्यरंग करतात. या रंगाला अनोटा असा शब्द आहे आणि तो औषधे सौंदर्यप्रसाधने यात पण वापरतात.

४८) मणिमोहोर
राणीच्या बागेत, वरच्या कृष्णवडाच्या झाडाजवळच मणिमोहोराचे झाड आहे. हे झाड एरवी गुलमोहोराच्या झाडासारखेच दिसते, पण याचा फुलोरा खुप देखणा असतो. केशरी रंगांच्या मण्यासारख्या पुष्पकोशात लाल पाकळ्या असे याचे रुप असते.

४९) मोह
मोह म्हंटला कि मोहाची फुले, मोहाची दारु आठवणारच. या मोहालाच मोहट्या नावाची फळे लागतात आणि त्यातल्या बियांची पण भाजी करतात. यापासूनच खाद्यतेल काढतात आणि त्याचा उपयोग साबण वगैरे करण्यासाठी पण होतो. याचे एक झाड पनवेलच्या रेशीमगाठी शुभकार्यालयाच्या समोर आहे. के.ई.एम. हॉस्पिटलच्या आवारात पण आहे.

५०) मुचकुंद
कापसाच्या पानासारखी पाने असणारे हे झाड उंच वाढते. याला एखादे केळे सोलुन ठेवावे तसे फूल येते. हे फूलही पांढरे आणि देखण्या रुपाचे असते. पुर्वी रुईया कॉलेजच्या मागे याचे झाड होते. सध्या राणीच्या बागेत आहे.

५१) मुरुडशेंग
याचे झुडुप असते. मान ऊंचावलेल्या बदकाच्या आकारची फुले येतात याला. ती आधी लाल, मग पिवळी आणि मग जांभळी होतात. मुरुडशेंग एखाद्या सुतळीच्या तूकड्यासारखी दिसते. आणि बाळगुटीमधे ती असते. ही झाडे बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधे आहेत.

५२) नागचाफा
नागचाफ्याचे फ़ूल चार पांढऱ्या पाकळ्यांचे असते. आत पिवळे पुंकेसर असतात. याला एक खास गंध असतो. हे पुंकेसर मसाल्यात नागकेशर म्हणुन वापरतात. याची पाने काळसर हिरवी असतात. राणीच्या बागेत ही झाडे हारीने लावलेली आहेत.

५३) निलगिरी
हे झाड आपल्याकडे ऑष्ट्रेलिया मधून आले. तिथे याचे काही वेगळे प्रकारही आहेत. निलगिरी डोंगरावर याची लागवड झाल्याने, त्याला हे नाव पडले. याच्या पानांच्या खास गंधामूळे आपण याला ओळखतो. पण याच्या लागवडीचा सध्या अतिरेक झालाय. राणीच्या बागेत, निलगिरीचा एक पुरातन बृक्ष आहे, कदाचित तो पहिल्या पिढीतला असावा.

५४) नोनी
नोनीला हिरवट पिवळे फळ लागते. त्या आधी त्यावर पांढरी छोटी फुले असतात. लहानपणापासून मालवणच्या किनाऱ्यावर हि झाडे बघत आलोय. पण अलिकडेच या फळांचा रस फ़ार औषधी असल्याचा शोध लागला. राणीच्या बागेत, गर्दीत हे झाड आहे.

५५) ओक
इंग्लीश पुस्तकात नेहमी डोकावणारे ओकचे झाड मुबईत कमला नेहरु पार्काच्या मागे आहे. आईस एज मधे
ज्या अकॉर्न फ़ळांवरुन मारामाऱ्या होतात, ते ओकचे फ़ळ. खारिंमुळेच त्याचा प्रसार होतो. इंग्लंडमधे अनेक
पार्कात हे झाड असते, मुंबईतले झाड मात्र, वयाने अजून खुप लहान आहे.

५६) पाचुंदा
राणीच्या बागेत जिथे कृष्णवड आहे तिथेच, पाचुंद्याचे झाड आहे. या झाडाची फुले फ़िक्कट पिवळ्या रंगाची
पण आकाराने अत्यंत मनोहर असतात.

५७) पर्जन्यवृक्ष
हा सर्वपरिचित वृक्ष. पोद्दार आणि रुइया कॉलेजच्या मधे याची खुप झाडे आहेत. त्याला पांढरी गुलाबी अशी
भरपूर फुले येतात. पाऊस यायचा असेल तर याचे झाड पाने मिटून घेते. आणि या झाडाखाली उभे राहिल्यास, अंगावर पाण्याचे शिंतोडे उडतात (ते या झाडावरील किटकांचे उत्सर्जन असते) म्हणून हे नाव. यांच्या शेंगातील चिकट गराने, रस्ता खराब होतो.

५८) पायमोज्याचे झाड
बाबुलनाथाच्या देवळापासुन, मलबार हिलवर जायला ज्या पायऱ्या आहेत, त्या वाटेवर हे झाड आहे. याची फळे थेट पायमोज्यासारखी दिसतात म्हणुन हे नाव. खरे तर स्टॉकिंग ट्री चे हे शब्दश: भाषांतर.

५९) पिंपळ
पिंपळाच्या झाडाची काही मी नव्याने ओळख करुन द्यायची गरज नाही. पण हार्बर लाईनवरच्या डॉकयार्ड
रोडजवळून, जो बी पी टी रोड जातो, त्याच्या कडेला एका पिंपळाच्या खोडातून नऊ गणपतींचे चेहरे
निर्माण झाले आहेत, ते बघण्यासारखे आहेत.

६०) पुत्रंजीव.
रस्त्याच्या कडेला आणि कार्यालयात पण लावण्यासाठी पुत्रंजीव फ़ार लोकप्रिय आहे. काळाचौकी जवळ
रस्त्याच्या मधोमध जे उद्यान आहे, तिथे काही झाडे बघितल्याचे आठवतेय. या झाडाची पाने कायम चमकदार असतात. याला पारंब्या पण असतात. लहानमुलांना नजर लागु नये म्हणून याच्या बियांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. (म्हणुन हे नाव. लॅटिनमधे पण तेच नाव) पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री या माळा विकायला असतात.

६१) रतनगुंज
शिवाजी पार्काच्या मागे, महापौर निवासाचा जो बसस्टॉप आहे, त्याला लागूनच रतनगुंजेचे झाड आहे. मला
अजूनही त्या उचलून घ्यायचा मोह होतो. मलबार हिलवर, बाबूलनाथाजवळपण हि झाडे आहेत.
हे झाड तसे बेंगरुळ दिसते. शेंगांचे उकललेले भाग पण झाडावर तसेच असतात. याला पिवळे तूरे पण
येतात. एकाच बिंदूतून अनेक धुमारे फुटलेले दिसतात.

६२) रिठा
मालाड पुर्वेला, टॅंक लेनमधे एक दारुचा गुत्ता होता, त्याच्या बाजूला एक रिठ्याचे झाड होते. या फळांतील
रासायनिक द्रव्याने साबणाचे काम होते. दागिने साफ़ करायला पण हे वापरतात. माझ्या शाळेच्या वाटेवरचे
हे झाड. आम्ही रिठे खायचोसुद्धा. गोड लागतात. रसगुल्ले करताना पण पाकात रिठ्याचे पाणी घालतात.

६३) रुद्राक्ष
राणीच्या बागेत रुद्राक्षाचे पण झाड आहे. त्याखाली नेहमी लोकांची शोधाशोध चाललेली असते. याची
फुले पण सुंदर दिसतात.

६४) समुद्रशोक
रुईयाच्या प्रवेशद्वाराजवळ, राणीच्या बागेत तसेच कुलाब्याला नेव्हीनगरमधे समुद्रशोकाची झाडे आहेत.
खुप मोठ्या आकाराचे, पांढरे गुलाबी फुल लागते याला. ते खाली कोसळताना, शटल कॉकसारखे पडते.
याला चौकोनी फळे लागतात. याच्या पानांचा उपयोग, मासे पकडण्यासाठी सौम्य विष म्हणून करतात.

६५) सप्तपर्णी
नावाप्रमाणेच सात पाने असणारे हे झाड उंच वाढते. याला सैतानाचे झाड पण म्हणतात. तसेच स्लेट ट्री
पण. (याच्या खोडांपासून पाटीच्या कडा करत असत.) पण याच्या मोहोराने दमेकऱ्यांना त्रास होऊ शकतो. तसेच अनेकजणांना सर्दी होऊ शकते. आमच्या कॉलनीत हे झाड आहे.

६६) सीता अशोक
अनेकजण रुक्मीणी किंवा पिटकुळीलाच अशोक समजतात. पण या झाडांत खुप फ़रक आहे.
अशोकाचा बहर खोडालाच येतो. याच्या पाकळ्या टोकेरी नसून गोल असतात. पुंकेसर मोठे
असतात. एकाच गुच्छात लालपिवळी फुले असतात. ही झाडे राणीच्या बागेत, व सायनच्या
किल्ल्यावर आहेत.

६७) शिरिष
शिरिष म्हणजे पर्जन्यवृक्षाचा जूळा भाऊ. फ़क्त शिरिषांची पाने काळसर आणि फुले हिरवी असतात. त्यांना
मंग सुगंध येतो. याच्या शेंगा सोनेरी रंगाच्या असून त्यांचा खळखळ आवाज येतो. पर्जन्यवृक्ष बाहेरून आला
तरी शिरिष आपला. अनेक काव्यात उल्लेख झालेला. रुईयाच्या कोपऱ्यावर असलेला शिरिष, नष्ट झाल्यावर
तो मला मुंबईत दिसलेला नाही.

६८) शिसम
शिसम म्हणजेच शिसवी. (अर्थात फ़र्निचर ). निळसर हिरव्या पानांचे हे झाड त्यावरच्या सळसळणाऱ्या
शेंगांमूळे सहज ओळखता येते. धारावीच्या निसर्ग उद्यानात ही झाडे आहेत. फ़र्निचरसाठी उपयोग व्हायला
झाड ६० वर्षांचे व्हावे लागते.

६९) शिवण / गंभारी
राणीच्या बागेत हत्तींना जिथे ठेवलेय त्यासमोर हे झाड आहे. एखाद्या ऒर्किडची असावीत तशी पिवळी
तपकिरी फुले याला येतात. याला फ़ळे धरतात आणि त्यापासून तेल काढतात. दशमूलारिष्ट या
औषधात याचे मूळ वापरतात.

७०) सोनटक्का.
सोनटक्क्याचे फ़ूल म्हणजे जणू रंगहीन फुलपाखरु. अगदी पंख मिश्यांसकट तोच आकार. ही झाडे मोठ्या
संख्येने कमला नेहरू पार्कात आहेत.

७१) सुरु
समुद्राचा वारा अडवण्याचे महत्वाचे काम सुरुचे झाड करते. आणि समुद्रकिनारी ते व्यवस्थित वाढूही शकते. मढ आयलंडवर हि वरीच झाडे आहेत. अनेक सिनेमांत यानी आपल्याला दर्शन दिले आहे.

या लेखाचा बाकीचा भाग उद्या पोस्ट करतो.

जग्गुचे फोटोज मस्तच् नेहमीप्रमाणे ...
----------------------
दिनेशदा आपण ज्ञानाचे सागर आहात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल Happy

उत्कृष्ट माहिती दिनेशदा... तुमची ज्ञानसंपदा अफाट आहे. इथे आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Happy

मफो... फोटो नेहमीप्रमाणेच... जबरदस्त Happy

७२) सुवर्णपत्र
सुवर्णपत्र म्हणजे क्रायसोफॉयलम चे भाषांतर. हि झाडे फाऊंटनला, अमेरिकन एक्स्प्रेस बॅंक जिथे आहे, त्या कोपऱ्यावर
तसेच तिथल्या सिग्नलजवळ आहेत. वरुन गडद हिरवी आणि खालून अक्षरश: सोनेरी पाने असतात हि.
याला पोपटी रंगाची फुले येतात आणि मग किरमीजी रंगाचे, प्लम सारखे दिसणारे फळ लागते. या फळात
ताडगोळ्यासारखा आणि आकाराने आमलकासारखा दिसणारा गर असतो. तो चवीला ताडगोळ्यासारखाच लागतो.

७३) ताडगोळे
मुंबईहून गुजराथकडे निघालो, कि रस्त्याच्या आणि रेल्वे लाईनच्या आजूबाजूलापभ ताडगोळ्याची झाडे दिसतात.
अगदी मुंबईतपण ही झाडे बरीच आहेत. यात नर आणि मादी असे दोन प्रकार आहेत. मादी झाडाला, भल्या मोठ्या
वांग्यासारखी दिसणारी ही फळे लागतात. (ही झाडे कोकणात मात्र फारशी दिसत नाहीत.)

७४) तामण
तामण म्हणजे आपल्या राज्यवृक्ष. यात गुलाबी, जांभळा आणि पांढरा रंगही दिसतो. सांताक्रुझ वांद्रे रस्त्यावर हि
झाडे छान फुललेली दिसतात.

७५) तिवरांची झाडे
खाडीच्या किनाऱ्याने या झाडांचे जंगल असते. हि झाडे खारट पाण्यावर वाढतात. यांची मुळे जमिनीपासून जरा
वरच असतात. या मुळांच्या आधाराने मासे अंडी घालतात. मुंबईला माहीमच्या खाडी परिसरात, तसे वांद्राच्या
पुर्वीच्या ड्राईव्ह इन थिएटरच्या बाजुला ही झाडे आहेत. डॉ. सलीम अलींनी या भागाला पक्षी अभयारण्य
घोषित करण्याची सूचना दिली होती, आणि तसा फलकहि तिथे लागला होता. तो फलक आता गायब
झालाय. (तिवरांची झाडे, हि अनेक प्राकरची असतात.)

७६) ट्रॅव्हलर्स पाम
बुंधा नारळाच्या झाडासारखा आणि पाने केळीच्या पानासारखी (तीसुद्धा जपानी पंख्यासारख्या रचनेत)
अशी झाडे गोरेगावच्या आरे कॉलनीमधे आहेत. अनेक जून्या चित्रपटांचे चित्रीकरण या भागात झाले आहे.
याचे पान तोडल्यास त्यातून बरेच पाणी निघते आणि वाटसरुची तहान भागते, म्हणून हे नाव.

७७) ऊंबर
मालाडला दत्त मंदीर रोडवरच्या देवळामागे, तसेच जिथे जिथे दत्ताचे देउळ आहे अशा सर्व ठिकाणी
उंबर दिसतो. उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खावे असा प्रघात आहे. त्यात किडे
असले तरी, ते फ़ुंकून फळ खाता येते. उंबरठ्याचे लाकूड पुर्वी उंबराचेच असे, म्हणून ते नाव.
उंबराच्या झाडाजवळ खणल्यास पाणी लागते, असाही समज आहे.

७८) उंडी
उंडी हे खास समुद्रकिना़ऱ्यावरचे झाड. याला पांढरी नाजूक फुले येतात. या फुलांचे देठही
पांढरे असतात. याचे लाकूड खुप टिकाऊ असते व होडी बांधण्यासाठी वापरतात.
राणीच्या बागेत, जिथे लहान मूलांसाठी झोपाळे आहेत, तिथे याचे झाड आहे.

७९) उर्वशी
१९८० ते १९९० काळात जर कुणी मुंबई विद्यापिठाच्या रस्त्यावरुन नियमित जाणारे असेल
तर त्यांना तिथले उर्वशीचे झाड आठवत असेलच. एरवी झाड साधेच असते. पण साधारण
फ़ेब्रुवारी मार्च मधे फुलावर आले, कि त्यावर नजर ठरत नसे. झाडावरुन खाली लोंबणारे
केशरी रंगांचे झुंबर आणि त्यावर अत्यंत मोहक आकाराची फुले असत यावर. ते झाड आता
तिथे नाही. राणीच्या बागेत जो बंगला आहे, तिथे एक मोठे वाढलेले झाड आहे.
आणि बार्किंग डिअरच्या पिंजऱ्यासमोर तीन नव्याने जोपासलेली झाडे आहेत. त्यांना अजून
खुप बहर येत नाही, पण सौंदर्याची कल्पना येऊ शकते. हि झाडे ब्रम्हदेशातून आपल्याकडे
आणली गेली.

८०) विषवल्ली
राणीच्या बागेतील सिंहिणीच्या पिंजऱ्यावर ही वेल आहे. याला मस्त आकाराची पांढरी फुले
गुच्छाने येतात. सर्व वेलच फुलांनी भरुन जाते. पण या वेलीला हे नाव का पडले याची
कल्पना नाही.

८१) वावळा
कींग्ज सर्कलला, अरोरा थिएटरच्या समोर, फ़्लायओव्हरला लागून, दोन मोठी वावळ्याची
झाडे आहेत. वर्षभर ती हिरवीगार असतात. आफ्रिकेत त्यांना मस्त पिवळा बहर येतो.
हि दोन झाडे मात्र तितकी बहरत नाहीत. पण एवढ्या धबडग्यात ती तिथे तग धरुन आहेत
हे विशेष.

मुंबईतील आठवतील तितक्या झाडांबद्दल लिहिले आहेच. अतिरेक झालेली गुलमोहर, पीतमोहर
आणि सर्वपरिचीत, वड, कडुनिंब यांचा उल्लेख केलेला नाही. माझे भटकंतीचे श्रेय तसे मर्यादीत
असल्याने, याव्यतिरिक्त, किंवा खाजगी जमिनीवर जी झाडे आहेत, तीसुद्धा राहिलीच असतील.
या बहुतेक झाडांचे फ़ोटो माझ्याकडे आहेत, ते सवडीने इतरत्र टाकतो.

हि सर्व माहिती एका वेगळ्या बीबी वर असावी असे निरोप येत आहेत. त्याचे स्वरुप काय असावे ते अवश्य कळवा. या बहुतेक झाडांचे मी काढलेले फोटो माझ्याकडे आहेत. शिवाय मुंबईबाहेरच्या झाडांचे पण आहेत (इथे फक्त मुंबईतील झाडांचाच विचार केलाय.) पण ते फोटो मात्र मी इतर पोष्टीन.
माझ्या जून्या लेखांच्या लिन्क्स मिळाल्या तर त्याही बघतो. (तिथे मी बरेच सविस्तर लिहिले होते.)

योगेश, प्रचि ६ मधल्या झाडाचे नाव मला आठवत नव्हते, ते आता आठवले
Castanospermum australe असे त्याचे नाव आहे. त्याला अतिशय सुंदर असा फूलोरा येतो. पिवळा, केशरी रंगाचा. (हे झाड व्होल्टासचा वॉटर कूलर आहे त्याच्या बाजूला आहे.) पण ते जरा अवघड ठिकाणी आहे. दाट पर्णसंभारामुळे त्याचा फोटो मला नीट काढता आला नव्हता. आता तूझ्याकडून अपेक्षा आहे.

माहिती छान आहे...पण फोटो आजुन छान काढता आले असते. ( स्पष्ट लिहिले म्हणून रोष नसावा ). खुप ठिकानी Focus and Exposure proper नाहि आहे...हा Pocket Camera आहे का ?

दिनेशदा!!! किती सखोल ज्ञान आहे तुम्हाला... योगेश, आवर्जून ही प्रचि आणि लेख आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आभार!!!! Happy

अरेच्या आकाशनीम म्हणजेच बूच का? गुगल केलं तर बुचाचे झाड दाखवते. वावळ्याला लहानपणी आम्ही बदामाचे झाड म्हणत असू. त्याला इतके क्युट नाव आहे माहीत नव्हते.
काय खजिना आहे हा धागा म्हणजे किती समृद्ध निसर्ग आहे आपल्याकडे.

Pages