खरं तर आता शोध लागल्या सारखा वाटतो !
पण तसं नसतं, खूप लांब असलेलं धेय, अगदी जवळ
आल्यासारखं वाटत, तसा अंधारात चालताना मी सावध असतो,
पण अंधार त्याहूनही सावध, फक्त घनदाट काळोख दाखवतो,
मग स्वप्ने तुमची तुम्हीच पहा,
रात्र आणि स्वप्ने हे गणित तुमच्यासाठी,
स्वप्नांना काय ? तुम्ही रात्री बघा नाही तर दिवसा,
टाळु म्हणता न टाळता, काट्याची वाट धरायची,
काटा का ये म्हणतो ? तरी पण जाणून न जणल्यासारखे
करायचे, भांपकपणा दुसरे काय !
आता मला काय वाटते आणि शरीराला काय वाटते ?
ह्याचा विचार मी करायचा की शरीराने ? पण नाही,
शरीराचा विचार न करता मी काटे वेचले तर काय होणार !
नुस्ती कुचंबणा ,
सिगारेटी फुंकल्या तर धूर येणारच मग
धुराबरोबर तुम्ही फीरा हा काय नियम आहे का ?
आणि धूर दिसलाच पाहिजे हा ही नियम नाही,
तरी अंधारात सिगारेट ओढायची भीती, न जाणो
धूर न येताच सिगारेट शिलगावली तर, समाधान मिळणार नाही,
कितीही दंगली होवोत, आम्ही आढ्याकडे डोळे लाउन
समाधित जाणार, ज्ञानेश्वरांची महानिद्रा घेणार,
न सोयर न सुतक,
काळोख, काटे सिगारेट हेच सोबती
माणसाचे भय वाटायला लागले आहे.
गार सर्प अंगावरून जावे, साले तसे काहीसे विचित्र विचार
झोपेत साल्या त्या नट्या त्यांचा कार्यभाग उरकतात
आम्ही डोळे उघडले की ह्या धुम ठोकतात कुठे जातात ?
देवाच जाणे !
देवाने जाणायला साले देवाला कुणी बघितले आहे,
आईने म्हणावे हात जोड की आम्ही जोडायचे,
फिदीफिदी हसायचे आणि झालेच तर
प्रसादावर एक डोळा ठेवून दुसरा मीचकावायचा,
असले छचोर बालपण, कोण लक्ष्यात ठेवणार,
मस्त छात्या बघत आप्पांच्या बिड्या ओढायाच्या
उरलेल्या, म्हातार्याला सुगावा न लागता कधी तरी
आख्खीच उचलायची, साला बीडीचा वास चोरी पकडून द्यायचा,
मार मार खा.... पण बीडी काही सुटायची नाही
शहरात येताना तो एस. टी चा प्रवास आठवतो,
बसायला जागा नाही, भांड्यांच्या पोत्यावर बसून
बूड घाईला आलेले.
घर सोडताना सगळे रडत होते, चुलत भाउपण,
आईने घेतलेले दागिने पाहून जास्तच रडला असेल,
मी नाही रडलो, मार खाण्यापेक्षा शहरात बरे ना !
गाडी धूळ उडवत पुढे पुढे, विंध्यावासीनीला नमस्कार केला,
पिराला टाटा, शेत ओढा, डोंगर सगळे मागे टाकून
तेव्हा काही ही वाटले नाही,
आज कळते वहिवाट सोडली तर काय होते!
परत मागे जायचे नाही असे तेव्हा वाटले नाही.आता वाटच बंद झाली
नखानी खुरायाला इथे साली माती पण नाही सिमेंट काही केल्या उकरत नाही.
सगळा स्वप्नाचा प्रवास, कुठे येऊन थांबलाय!
मी मात्र मग आणखीन एक सिगरेट शिलगावतो
धुरात सगळे कसे वाहून जाते काही काही मेंदूत शिल्लक राहत नाही.
भानंगासारखा मग कोपरा गाठायचा.....
बस्स............. बाकी काही नाही......................
विजयकुमार........
19 / 12 /2008
गावात थंडी तशी सपाटुन पडायची.
गावात थंडी तशी सपाटुन पडायची. नदीत, दगडी वळवंटात, डोंगरात अगदी करवंदीच्या जाळ्यात पण, सकाळी लवकर उठायचे आणि घमेले शोधून त्यात धन्याच्या पेंढ्या घालायच्या शेकोटी म्हणून ! म्हातार्याआईच्या शेजारी बसायचे मग ती काही बाही सांगत बसायची. बम्बात टाकलेल्या ढपल्यान्चा उग्र वास नाकात शिरायचा आणि तापलेल्या पाण्याचा उबदार असा वास. आंघोळीच्या आधी नुसतेच बादलीत हात घालून बसायचे, सगळी उब हातावाटे शरीरात शिरायाची, आंघोळ नको वाटे. कधी कधी आप्पा बरोबर घ्यायचे आंघोळीला, त्यांच्या अंगाखाली उभे राहायचे , त्यांच्या अंगावरून ओघळणारे
पाणी वेगळाच उबदारपणा घेऊन अंगावर पडायचे. अप्पान बरोबर आंघोळ उरकली की मग खंडॉबाचे दर्शन न चुकणारे आणि मग जगमाच्या हॉटेलमधे भाजी किवा शिरा तो ही रंगीत लालसर. घरी तसा बनवित नसत.
अश्याच थंडीत म्हातारी आई आजारी पडली. चांगलीच इतकी की शेकोटीला पण येईनासी झाली. परसदारी आम्हीच फक्त मी आणि माझ्या बहिणी , भाउ.
मग तिला सोबतीला सेवेला तिची मुलगी जिला आम्ही चुत्तड आत्या म्हणत असु ती आली. आता म्हातार्या आईच्या जागी चुत्तड आत्या. खरे तर तिनेच तिला हे नाव घेतले दिले होते. तिला खरे तर गावापासून दूर दिले होते. फारसे दूर असे नाही पण आजच्या मानाने दूरच. कधी तरी यैईची बिचारी. एक आत्या
तिची सख्खी बहीण गावातच होती. तिला वाटायचे ती जास्त जवळची आणि ही लांब मग चिडून ही म्हणायची ती सख्खी आणि मी चुत्तड म्हणजे चुलत आत्या.
गोष्टी रंगवून सांगण्यात आत्याची मोठी हातोटी. पण म्हातार्या आईची जागा काही तिला भरताच आली नाही.
सगळ्याच आठवणी सकाळच्याच! का कुणास ठाउक ? म्हातार्या आईच्या सेवेला आलेली आत्याच आजारी पडली. आई तिला पाणी पाजत होती. सकाळचा उन्हाचा सुमार सुरू झाला होता. आई आणि बाळु आमचा गडी अत्याच्या तोंडात पाणी घालत होते चमच्याने मी ही बघत होतो नवीनच होते सगळे त्या वयाला.
आत्याच्या तोंडात पाणी गेलेच नाही. बाहेर आले. आई रडायला लागली. आप्पा आले. म्हणाले जास्त गहीवर घालू नका. म्हातारीला कळले तर ती पण मरेल मग दोन प्रेते न्यावी लागतील. म्हातार्या आईला कुणी कळवलेच नाही. आत्याला सगळे घेऊन गेले. तरी म्हातारी आई विचारात होती. कुंडलकरीन कुठे गेली. कुणी काहीच बोलले नाही.
दुसर्या दिवशी शेकोटीला जास्तच गर्दी होती. नाना प्रकारच्या गप्पा चालल्य होत्या. आत्याबद्दल कुणीच बोलत नव्हते. धान्याच्या पेंढ्या घमेल्यात जळत होत्या आणि अत्याचा पाट कोपर्यात केरसुनी बरोबर उभा होता.
विजयकुमार........
20 / 12 /2008
सह्ह्ह्ह्हीएत..........!!!!!!
सह्ह्ह्ह्हीएत..........!!!!!!!!!
असेच काहिसे लिहित जाईन ते
असेच काहिसे लिहित जाईन ते सगळे इथेच पोस्ट करत जाइन कारन ते एकाच विषयाशी संबधीत आहे.
सगळच बळ ओढून ताणून आणलेलं
सगळच बळ ओढून ताणून आणलेलं असतं. तसा दिवस आपल्या परीने जात असतो. उगाचच चिमण्या मोजायाच्या. कुठे तरी पेपरमधे वाचलेलं चिमण्यांची संख्या कमी होते आहे. आता मुंग्या पण मोजायच्या का ? मनात वात्रट विचार. पण मुंग्या मोजायची कल्पना फारशी वाईट नाही. वेळ तरी जाईल आणि मुंग्यांच्या संखेत आपल्या लेखी तरी भर पडेल. नको म्हन्टले तरी आठवणी यायच्या थांबत नाहीत.
मीही आडवत नाही. आठवणी तरी कश्या चिमण्यान्सारख्या इवल्याश्या. कुठे ही फारसा फाफटपसारा न मांडता सरळच येतात. ती वेडी बघताना उगाचच वेड्या मामीची आठवण का यावी ? पण आलीच !
मामांची पहिली बायको वेडी झाली मग त्याने दुसरी केली मग सहा माम्यात ही सातवी आणि नावही तयार शहाणी मामी. काय साली गंमत पण करतात लोक.वेड्या मामीची आठवण तशी गमतीशीरच. एकदा रात्री आम्ही सगळे पटांगणात झोपलो होतो. फारशी रात्र झाली नसेल. आरडा ओरडा सुरू झाला.
कोणी तरी मामेभाउ किंचाळला यडी काकू पळाली. तिच्या मागोमाग सगळीच पळायला लागली पण अंधारात कोण कुठे पळत होते. कुणालाच काही कळत नव्हते. पण त्यावेळी असं पाळायला मजा वाटली. रानात छपरा खाली पळुन थकलेली मामी बसली होती. कसे बसे करून तिला परत आणले.
आम्ही गाढावाच्या शेपटिला डबा बांधून त्याला पळवायचो तसे काहीसे राहून राहून वाटत होते. का कुणास ठाउक ? पण रात्री झोप काही आली नाही.
मग मामीच्या वेडाच्याच गप्पा रंगल्या. ऐकता ऐकता कधी डोळा लागला कळले नाही. स्वप्ने ही तशीच काही तरी. मला शेपूट आले आहे आणि सगळे त्याला डबा बांधून मला पळवत आहेत.
सकाळी परसदाराकडे गेलो तर मामी. माझ्याकडे बघून मंद हसली. तेल लाउन नीट वेणिफणी करून नीटसे कुंकू भाळी रेखाटुन. बसलेली. आढ्याकडे नजर लावून. मनावर तिच्या कपाळावरील रूपाया इतक्या कुंकवाचा छाप मनात डागला गेला. नुसताच तिच्याकडे बघत राहिलो. मागे गोठ्यात बांधलेल्या
गाया आणि माझी मामी. तशी ती फारसा त्रास द्यायची नाही पण मधेच कधी माधी तिला वेडाचे झटके यायचे.
पहाटेच जाग यायची. कळश्यांचा खड्खडाट . राघ्या पाणी सोडायला जायचे नाय का ? असल्या हाकात अंगाणात झोप उडून जायची. परसादारी परत . मामी दिसेलच ह्याचा नेम नसायचा. मग ताईमामीच्या हाताची पिठल भाकरी नाही तर गोड सांजा असं काही तरी खायचे. मामाला खेटून बसून.
आमचे जावाई आलो हो म्हणत प्रेमाने मामी ही प्रेमाने पुढ्यात ठेवायची.
मग सगळ्यानी उगाचच आपले चींचेचे झाड गाठायचे. शेत डोलत असायची. पाण्याचे इंजिन चालू असले आणि त्यात भर म्हणून जर का वानरे असली तर मग धम्माल विचारायला नको. इंजिनाच्या आवाजाला घाबरून वानरे उड्या मारायची आणि मग हिरव्या कच्च चिंचा टपा टप पडायच्या.
काही करावे असा नेम नव्हता...
पण नेमाने चिचे चे झाड गाठणे. शेतात जाणे. असे काही बाही चालूच असायचे ....
क्रमशः........
22 / 12 / 2008
परसदारी गोठ्याला लागूनच पागा
परसदारी गोठ्याला लागूनच पागा म्हणता येणार नाही पण २ घोडी बांधायची जागा होती. वाहतूकीची साधने कमी मग सगळा व्यापार माल घोड्यावरून लादून केला जायचा. थोडी वाहतूकीची साधने वाढली खरी पण घोड्याचे महत्व मामाच्या लेखी आजही तेच होते. माझा मावस भाउ संजय माझ्या इतकाच अवखळ. नाना प्रकार शोधून काढणार आणि खोड्या करणार. त्याच्याच डोक्यातून घोडा बाहेर काढायची कल्पना निघाली. पांढरा शुभ्र उमदे जनावर. उंच असा की अरबी घोडा संजाने दावणीचे सोडले लगाम हातात धरला आणि मला म्हणाला बस मागे. मीही तयारच होतो. हा हा म्हणता स्वार झालो संजा पुढे आणि मी मागे त्याच्या पोटाला धरून बसलो. परसदार ओलांडले की मागेच त्याला लागून शेत चालू होते. उन्हाळ्याचे दिवस. बीन पिकाचे ढेकळांचे काळे कभिन्न रान. घोडा निघाला. मागे सगळे मावस आणि मामे भाउ आणि काही बहीणी. आता सहा मामा आणि पाच मावश्या त्यामुळे सगळ्यांची गणती कोण ठेवणार ?
सगळे मागे पळायला लागले. घोडा बिथारला. वार्याशी स्पर्धा करत पळु लागला मला तोल सावरता येईना. थोडा पुढे गेलो असें तर मी घोड्यावरून खाली पडलो. घोडा जोरात पळत कुणाच्या तरी परड्यात शिरला. गवताच्या गंजीत संजा पडला आणि ते जनावर आपल्या वेगाने निघून गेले. भीतीने पोटात गोळा. मामाला कळले तर काय होणार. एवढ्याश्या वाडीत फोडणीचा वास लपत नाही तिथे असले आक्रीत कसे काय लपणार ?
मामा आला तोच हसत आणि मला आणि संजाला जवळ घेतले. आणि प्रेमाने म्हणाला पोरानो मी शिकवतो घोडा कसा फिरवायचा. आणि मग आमची घोडेस्वारी सुरू झाली.
असे हे घोडे प्रकरण. घोड्याच्याच कथा इतक्या असायच्या की ज्याचे नाव ते ! कराडचे काका म्हणजे माझ्या मावशीचा नवरा आणि संजयचा बाप. तेही असाच व्यापार करायचे घोड्यावरून. डोंगर, जंगल पार करून गावोगावी व्यापारासाठी फिरायचे. एकदा त्याना तांबव्याच्या विष्णूबाळा ने हटकले होते
ह्यानी बेधडक पणे सांगितले विष्णू भाउ आम्ही व्यापारी. मग त्याने ह्याना सोडले. विष्णू बाळाचे नाव त्याकाळी भलतेच गाजले होते. सहा खून करणारा म्हणून. मग आम्ही अधिकच आग्रहाने काकाना सांगायचो आणखीन काही सांगा. आता पुरं, रात झाली, उद्या सांगतो की म्हणून काका घोरायला लागायचे.
घोड्याच्या आठवणी तश्या भरपुर. घरात सगळ्यात लहान म्हणून किती तरी चुलतभाउ आणि मामाच्या लग्नात हक्काने घोड्यावर बसलो आहे नवरदेवाच्या पुढयात. माझ्या वडिलांच्य़ा घरी म्हणजे आमच्या घरी माझे चुलतमामा म्हणजे हरी मामाचा घोडा प्रत्येक लग्नात असायचा. हरीमामा मला ह्याचसाठी आवडत
कारण त्यांच्याकडे घोडा असे. माला का कुणास ठाऊक घोड्याचे प्रचंड आकर्षण होते. आज सुध्दा माथेरानला गेलो की आवर्जून घोडेस्वारीचा आनंद घेतो.
मामाच्या वाड्याच्य बाहेर पडले की उजवीकडे विठ्ठल रखुमाइचे मंदिर साधेसेच जिथे माझा धाकटा मामा श्रावणात ज्ञानेश्वरीचे पारायण करीत असे. आजही करतो. चार घरे संपली की वाडी पण संपली इतके छोटे गाव ज्याला गाव पण म्हणत नसत वाडी म्हणत असत. उजवीकडचा रस्ता मोठ्या गावाकडे जात असे आणि डावीकडचा रस्ता ओढ्याकडे जातां डावीकडेच लक्ष्मी आईचे मंदिर लागूनच प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा. पुढे पाच सहा चिंचेची झाडे आणि मोठ्या डगरीवरुन खाली उतरले की ओढा. खळखळ वाहणारा. आजूबाजूला दाट झाडी. उन्हाळ्याच्या दिवसात एकाच काम. ओढ्याकाठी जायचे खाड्डे करायचे आणि झरे काढायचे. चिंचेखाली बसायचे आणि मग उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा. नेमक्या भुता खेताच्याच जास्त.संध्याकाळी ही तेच शाळा बंद असायची मग शाळेच्या ओसरीत बसायचे. गुडुप अंधार असायचा. मग सगळी भुते, मुंजे लावसाटनी बाहेर यायच्या आणि स्वप्नात शिरून माझ्या झोपेचे खोबरे करायच्या.
vijaykumar.............. 26/12/2008
इथे आमच्या गावातही भुते,
इथे आमच्या गावातही भुते, मुंजे आणि लावसाटनी काही कमी नव्हत्या. आमच्या शाळेला लागूनच एक पार होता पिंपळाचा त्याच्यावर म्हणे एक मुंजा राहत असे आणि कधी मधी कुणाला तरी दिसतही असे. शाळा मारुतीच्या देवळाला लागूनच होती. मागे हाकेच्या अंतरावर नदी. वर पूल. मधे दगडी वाळवंट.
चैत्रात खंडोबाची जत्रा असायची. पै पाहुणे, लांबचे जवळचे नातेवाईक. नुसतेच ओळखीचे, कुणी कुणाच्या ओळखीने आलेले. अश्या बर्याच लोकानी घर भरून जायचे. मग आमची रवानगी माडीत व्हायची. सगळ्या बहिणी आणि भाउ एकत्र झोपत असु. आणि मी आयता त्यांच्या तावडीत सापडत असे. माझ्या बहिणीनी भांबड नावाचे एक भूत शोधून काढले होते. मग रात्री त्या मला त्याच्या गोष्टि सांगायच्या आणि मग मी वाकळीतुन डोके न काढता त्या भीत भीत ऐकत असे. थंडी मरणाची असे. नदीजवळचे गाव. गारठा मी म्हणत असे. थंडीने अंग फुटत असे. शेकोट्यांचे फड जमत असत. मोठ्यांच्या शेकोट्या वेगळ्या आणि आमच्या लहानांच्या वेगळ्या. प्रत्येकाने सासू आणायची असते जाळायला. सासू म्हणजे काही तरी ज़ाळायल घेऊन या रिकामे येऊ नका. चैत्र पौर्णिमा जशी जशी जवळ यायला लागायची तशी गर्दी ठासून भरयची. पायर्या, ओसर्या, देवळे, पटांगणे माणसांनी भरून जायची. रात्र र शेकोट्यांचा धूर गावाला वेढा घालत असे. घरातल्या बायका चुलीपाशी आणि पुरूष दुकानात गर्दी करून राहात. आमचे लाड कोड पुरवायला आता कुणालाच वेळ नसे.
एकदाचा जत्रेचा दिवस उजाडत असे. सकाळी लवकर उठावे लागे. नैवद्याची लगबग सुरू झालेली असे. दुकान खाली वाळवंटात गेलेल असे तिथे पाल घालून दुकान थाटले जायचे. इथे वर गावात माझे चुलतभाउ आणि बहिणी दुकान चालवत असत. भंडारा मोठ्या प्रमाणात आणला जायचा. खोबर्याच्या वाट्या. खोबर्या चे तुकडे. आणि भंडारा मिसळुन विकला जायचा. देवाच्या अंगावर उधळायला. आत स्वयंपाकघरात चहा रटरटत असे. येणारे चहा घेत. आणि जेवायालाच थांबत. अशी गंमत असे. मग थोडे उन्ह वर आल्यावर म्हणजे दहा आकाराच्या सुमारास आमचा नैवद्य तयार व्हायचा. मग अस्मादिक तयार होत. लहान मुलानी नैवद्य न्यावा अशी काही रीत नव्हती परंतु आम्ही पडलो रिकामटेकडे मग ती जबाबदारी आमच्यावर येऊन पडत असे. मग आम्ही सगळे लहान मित्र मंडळी नैवद्य घेऊन एकत्र देवळात जात असु. कितीही गर्दी असली तरी गावकरी म्हणून आम्हाला सरळ प्रवेश असे. गुड्घ्यपर्यन्त पंचा, अंग उघडे, अनवाणी अश्या थाटात आमची स्वारी निघत असे. थोडे पाय भाजत परंतु मारुतीचे देउळ मागे टाकले की नदी लागत असे. आम्ही पुलाचा वापर न करता तिथुनच जात असु. पाय पाण्यात
बुडवून चालायला मज्जा येत असे. जर नदीला पाणी कमी असले तरच ही मज्जा आणि कोणी मोठे बरोबर नसले तर म्हणजे बहुतेक पाहुणे मंडळीना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यावरच येऊन पडत असे. ह्या आधी हे काम माझा मोठा भाउ करत असे मग ते माझ्यावर येऊन पडले. आता बहुतेक माझा पुतण्या करत असेल चुलत भावाचा मुलगा. नक्की माहीत नाही..
बरोबर एकच्या सुमारास छबिण्याचा हत्ती निघत असे. पुलावरून निघून देव हत्तीवर बसून बोहल्याकडे येत असे. खंडोबाची जी प्रसिध्द स्थाने महाराष्ट्रात आहेत त्या पैकी आमचे गाव एक येथे चैत्रपौर्णिमेला देवाचे लग्न म्हाळसा बाईशी होते. . खन्डोबाच्या तश्या दोन बायका. पहिली म्हाळस आणि दुसरी प्रेमाची ती
बाणाई . मारुतीच्या देवळासमोरुन पाराकडे जाणार्या रस्त्याने देव बोहल्याकडे जात असे. बोहला नदीच्या समोर होता आणि नदी बोहल्याच्या समोर. आम्ही कापडी पिशवीत भंडारा आणि खोबरे नेत असु. सगळीकडे हळदीच्या सोन पिवळ्या रंगाने गाव नटलेले असे. एकदाचा देवाचा हत्ती मारुतीच्या देवळासमोर आला की रिंगण सुरू होत असे. हत्तीवर गावाचा मानकरी पाटील देवाला घेऊन बसलेला असे. आणि पाटलाच्या घरातील मोठा मुलगा किवा मुलगी मानाच्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन. हत्तीच्या पुढे चालत असे. तिथे हत्ती थांबत असे आणि मारुतीचे दर्शन घेत असे अशी काहीशी पध्द्त होती. तिथे रिंगण पडे. गावाच्या म्हारकीचे वतनदार हातात काठ्या घेऊन लढत असत. एक प्रकारचा खेळच असे तो.
मग उल्कापात व्हावा तसे काहीसे होत असे. नारळाच्य वाट्या, भंडारा ह्यांची उधळण सुरू होत असे. सगळा आसमंत पिवळ्याजर्द रंगाने भरून जात असे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणानी. आसमंत दुमदुमत असे. नगारे ताशे हलगी वाजायला लागायची. वातावरण चेकाळल्यासारखे होत असे.
भारले पण येत असे. लोक चेव खाउन खोबरे भंडारा उधळत असत. काही टारगट खोबार्याच्या वाटीत दगडी गोटे घालून मारत असत. पाटलाशी ज्यांचे वैर आहे असे लोक ही संधी दवडत नसत. पाटील मंडळी ही पूर्ण जय्यत तयारीनीशी हत्ती घोड्यावर बसत असत. काठ्या नाचायला लागत. आबदगीरी, झेंडुच्या फुलानी सजलेल्या छत्र्या आकाशात उसळ्या मारुन नाचायला लागत. आपट्बार आतिषबाजीने आसमंत दुमदुमायला लागे. सर्वत्र माल्हारी म्हाळसाकांताचे पिवळे आणि म्हाळासाबाईच्या सोनेरी दागिन्यांचे अस्तित्व प्रत्येक स्त्री पुरूष भाविकाच्या अंगाखांद्यावर विलसत असे.सगळा आसमंत पिवळसर झालेला असे.
पिवळ्या रंगाची उधळण करून तो परमेश्वर जणूकाही संदेश देत असे. की सगळे एकाच रंगाचे आहेत. कोणताही भेद नाही. मीच सर्वत्र आहे. चराचर व्यापलेला. तो राजेशाही लग्नाचा थाट लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडत असे. चैत्रातल्या वसंताचे वैभव तिथे नांदत असे. अश्या लवाजम्यासह हत्ती देवाला घेऊन बोहल्याकडे प्रस्थान करत असे.
विजयकुमार...............
03 / 01 / 2009
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=826350&tid=528135238862129...
आठवणी तश्या धुरकट असतात. कधी
आठवणी तश्या धुरकट असतात. कधी तरी धुक्याने भरलेल्या दरीवर सूर्याची किरणे पडावी आणि धुक्याची चादर बाजूला होऊन काही हिरवे, काही उजाड तर काही नुसतेच खडक दिसावे तश्या आठवणी बाहेर येतात.घाटातला रस्ता जवळ जावे तसा नागमोडी होत वाढत जातो तसे हे सगळे असते. पाउस मी म्हणून गावावर कोसळायचा. सगळा गाव गारठुन जायचा. दोन्ही गावाला छेदुन जाणारी नदी कधी तरी पावसाळ्यात गावाला भेटायाला गावाच्या मारुती मन्दिरा जवळ येऊन जायची. नदीच्या दोन्ही बाजूला बंधीव घाट. उतरायला पायर्या . दगडी बुरुंज बुरूंजाच्या खाली शनीचे मंदिर. आताश्या नदीच्या गाळाने पायर्या मातीत गेल्यात अन् शनिही अभावानेच कोणी गाळ काढला तरच दिसतो. नदीत पाय बुडवून जर का पुढे गेलो तर डावीकडे पार, चिंचेची झाडे, आणि कुणाच्या पूर्वजांच्या अनामिक समाध्या. चिन्चोळा रस्ता उजवीकडे काही मुसलमानाची घरे आणि समोरच डावीकडे मारुतीचे मंदिर वेशीचे रक्षण करणारे. आता गाव इतके वाढले आहे की मारुतीची वेस ओलांडून गाव नदीकडे धावत गेले आहे असे वाटते. आत शिरले की परत डावीकडे काही तेल्याची घरे, मारुतीच्या देव्ळाला लागून प्राथमिक शाळा अन् मधून एक रस्ता जातो पिंपळाच्या पाराकडे तोच रस्ता पुढे परत नदीकडे.
जुनचे दिवस असावेत. आकाश फोडून पावसाचे झरे गावावर कोसळायला सुरूवात झाली. भर दुपारी अंधार दाटून आला. पावसाच्या तडाख्यातून वाचत एक एक करत गावकर्यानी घर गाठायला सुरूवात केली. वाहत्या पाण्याशिवाय रस्त्यावर चिटपाखरु दिसायचे बंद झाले. कुणी एखादा चुकार वाटसरु अथवा गावकरी पावसाचा मारा चुकवत खालून वर येताना दिसत होता. माडीवरच्या सज्जातून आम्ही सगळी चुलत भावंडे पावसाची मजा बघत होतो. लालसर असे पाणी मारूतीला वेढा घालायला लागले. बघता बघता मारुतीच्या देवळात पाणी शिरून कळसापर्यन्त चढायला लागले. तांब्या पितळेची भांडी आणि कळश्या पाण्यावर दिसायला लागल्या. बिळात पाणी शिरल्यावर उंदीर बाहेर यावेत तशी माणसे जिवाच्या भीतीने बाहेर यायला लागली.पाणी घरात शिरणार ह्या भीतीने सगळीच किडुक मिडुक वाचवायच्या नादाने धडापडू लागली. आधी तेल्याची माणसे समानासह बाहेर येताना दिसू लागली. जेवढे हाती येईल तितके सामान हातात घेऊन आपल्या वेशीकडील घराकडे तेल्याची माणसे जात होती. आम्हाला मजा वाटू लागली होती ते दृष्य तसे नवीनच होते आणि बालमनाला त्यातील व्यथा कळत नव्हती. अचानक अघटित घडले. शाळा सुटल्यावर मुलांचा लोंढा बाहेर पडावा तसा पाण्याचा लोंढा गावात शिरला आणि बघता बघता मारुतीच्या कळसाला पाणी जाऊन भिडले.
एक पांढरी आकृती समोरून पाणी चिरत येताना दिसली जशी जशी जवळ येऊ लागली तसे लक्ष्यात आले. सदातेली ढसाढसा रडत वर येत होता. नुकताच वेगळा राहायाला गेलेला सदातेली सर्वस्व पाण्यात विसर्जित करून सडाफटिंगासारखा वरच्या घरी चालला होता. इतक्यात खाली ओसरीवर कालवा उसळला. आम्ही खाली धावलो. बाळुगडी मोठ मोठ्याने सांगत होता आपल्या खालच्या दुकानात पाणी शिरले. मारुतीच्या देवळाजवळच आमच्या मोठ्या चुलत्यांचे घर आणि दुकान होते. आम्ही त्याना भाऊ म्हणत असु. मग जी काही धावपळ उडाली त्यात आमच्यावर कुणाचेही लक्ष राहीले नाही. मीही बाळु बरोबर त्याच्या छत्रीतून बाहेर गेलो हे कुणाच्याहि लक्षात आले नाही. समोरच्याच बोळातुन मी आणि बाळु आणि माझा दुसरा चुलत भाऊ आम्ही निघालो. सोनारआळीतुन पुढे जाऊन भाऊंच्या परसदारी उभे राहिलो. गुडघाभर चिखलात माझी काकी कमरेला पदर खोचून एक एक सामान बाहेर काढत होती.त्यापुढे खाली दुकानात भाऊ कमरेभर पाण्यात उभे राहुन हाताला लागेल ते ओढत होते. बाळु पुढे गेला आणि भाऊना ओढु लागला. गुराच्या आकांताने ओरडत भाऊ त्याचा हात झिडकारु लागले पण जोर करून बाळुने त्याना बाहेर खेचून आणले. काकी घर सोडायला तयार नव्हती. ती रडतच मटकन पाण्यात बसली. डोळ्यादेखत भरला संसार असा गौर पाण्यात सोडावी तसा वाहून चालला होता आणि पाणी भरल्या डोळ्याने काकी फक्त बघूच शकत होती काहीही न करता. भाऊ, काकी आणि त्यांचा धाकटा, माझा चुलत भाऊ अण्णा ह्याना सगळ्यानी बाहेर काढले. त्यांच्या पैकी कुणाचाही पाय घराबाहेर निघायला तयार नव्हता. तरीही जोर लावून सगळ्यानी त्याना बाहेर काढले. आमची भिजलेली वरात फाटलेल्या आकाशा खालून डोक्यावर तेराव्याचे पाणी घेत घराकडे निघाली.
समोरून वाहणारे पाणी पुढे जाऊ देत नव्हते आणि भाऊ, काकीचे पाय तर लोखंडाचे झाले होते. जितक्या लवकर आम्ही भाऊंच्या घरी गेलो होतो तितक्याच वेगाने घरी येताना जाणवले रस्ता अंतर वाढवत आहे. आकाशातुन कोसळत नव्हता तितका पाऊस काकीच्या डोळ्यातून झरत होता. भाऊ आणि सदातेली ह्यांच्यातला फरक पावसाने एका फटक्यात दूर करून माझ्यासाठी सगळेच सारखे असा सांगावा सगळ्या गावाला दिला होता.उंबरठा ओलांडून जसे आत शिरलो तसे आईने हंबरडा फोडला आणि काकी आईच्या गळ्यात पडून आसवे गाळु लागली. विमनस्क अवस्थेत भाऊ खाटेवर जाऊन बसले आणि आप्पा भाऊंच्या खांद्यावर पडून धाय मोकलु लागले. आख्ख्या घराला प्रेतकळा प्राप्त झाली. माझा चुलत भाऊ अण्णा खंबाला टेकून उभा होता एखादे भिजले कोकरू थंडीने थरथरते तसे थरथरत मूक आसवे गाळत होता.
क्रमशः
विजयकुमार...........
06 / 04 / 2009 , मुंबई
पाउस गेला पण मागे बरेच कवित्व ठेऊन. पुराने होत्याचे नव्हते झाले होते. भरलेल्या गावाची ओसाडवाडी झाली होती. मातीच्या आधाराने उभी राहिलेली घरे माती सुटल्यामुळे उन्मळून पडली होती. काहींचे पत्रे खाली आले होते तर काही ठिकाणी फक्त घराच्या आठवणी करून देणा-या भिंतीच उभ्या होत्या. ज्यांची घरे पडली नव्हती ती गाळाने भरून गेली होती. अर्धा गाव पाण्याने ओढून नेला होता. आणि आता पाणी डोळ्यावाटे वाहत होते. भाऊंचे घर आणि दुकान साफ पडले होते. सगळा माल चिखलात रुतला होता. धान्य कुजले होते. शाळा सुरु झाल्यावर जी वह्या पुस्तके मुलांच्या हाती जायला हवी होती ती चिखलात रुतली होती. गमतीचा भाग म्हणजे ह्यातील काही म्हणजे कित्येक वह्या आम्ही पुढील दोन वर्षे वापरल्या. लाल झालेल्या. उन्हात सुकवून त्या खरे तर पुन्हा विकण्यास ठेवण्यात आल्या परंतु त्याला कोणी
गी-हाईक हात लावत नव्हते मग त्या आमच्या बोकांडी आल्या. येणारे प्रत्येक नवे शाळेचे वर्ष आम्हाला पुराची आठवण करून देत होते. कुजलेला एक विचित्र वास सर्वत्र पसरला होता. त्यात भर होती ती चिखलाच्या वासाची. पुरातून आलेला चिखल व गाळ बरोबर एक विचित्र वास घेवून आला होता. मेल्या जनावरांचा सडका वासही त्यात भरून राहिला होता. पुराची बातमी कळल्याबरोबर काका ( माझे वडील ज्याना आम्ही काका म्हंतो कारण माझे सगळे चुलत भाऊ त्यांना काका म्हणत असत त्यामुळे ती आम्हास सवय लागली) मुंबईला होते ते मिळेल त्या वाहनाने गावाकडे आले. एकत्र कुटुंब आणि नात्याची वीण त्याकाळी इतकी घट्ट होती कि सगळ्यापेक्षा कुटुंब मोठे मानले जाई.
एक वेगळेच सुतकी वातावरण आख्ख्या गावात भरून राहिले होते. लहान असूनही आम्हास त्याची जाणीव सतत होत होती. गमतीचा भाग म्हणजे माझी शाळा मारुतीच्या देवळाला लागुनच होती. जसा पावसाचा जोर वाढला तसे देशपांडे बाईनी आम्हास लवकर घरी सोडले आणि त्यात भर म्हणजे. काही मुलांचे पालक त्यांना नेण्यास आले होते व मला नेण्यास आमचा गाडी बाळू आला होता. त्याच्या कमरेवर बसून मी छत्रीतून घरी आलो होतो तोपर्यंत ह्या सगळ्याची आम्हास गम्मतच वाटत होती. पण आज तसे नव्हते. भाऊ, काकी आणि आण्णा निट धडभले जेवलेही नव्हते. सधन असल्या कारणाने आम्हास झाल्या नुकसानीची तितकी चिंता करायचे कारण नव्हते तरीही घरात चिंतेचे वातावरण होते. जे घर धंदा उभे करण्यास इतके परिश्रम घेतले गेले ते सगळे आपल्या डोळ्यादेखत मातीमोल झाले. गंगार्पण झाले. हा धक्का सगळ्यात मोठा होता. आता गरज होती ह्यातून सावरायची. दुस-या दिवशी सकाळी अप्पा काका, भाऊ आणि सगळे गडी मिळून दुकानाकडे गेले. आता सगळे पाणी ओसरले होते. आणि आभाळ्ही मोकळे होते जणू काही घडलेच नाही अश्या अविर्भावात. माल फारसा हाती लागलाच नाही. जे काही हाती लागले तेच घेवून आम्ही आमचे नवे घर रिकामे केले. आमचे मूळ घर व भाऊंचे दुकान ह्या मध्ये आमचे एक आणखीन घर होते ते नवे बांधल्यामुळे आम्ही त्यास नवे घर म्हणत असू. त्याचा वापर माल ठेवण्यासाठी केला जात असे. ओघळून आलेले पाणी तेथे होते त्यामुळे. तिथे गुळाच्या ढेपा होत्या त्या गळाल्या होत्या आणि गोदामात असतो तसा कुबट वास तिथे ही भरून राहिला होता.
भाऊंच्या दुकानाची तात्पुरती व्यवस्था नव्या घरात करण्यात आली. सगळे स्थिर स्थावर झाले परंतु काही किंतुही घरात शिरले. आधी जरी दोन दुकाने होती तरी ती दूरवर असल्यामुळे तसा त्यांचा एकमेकांवर काहीही फरक पडत नव्हता. परंतु नवे घर हे मूळ जुन्या घराच्या अगदी शेजारी असल्यामुळे जवळजवळ दोन दुकाने झाले तीही एकाच कुटुंबाची. मोठ्ठी काकी म्हणजे भाऊंची बायको तशी थोडी नामानिराळी राहणारी आपले पाहणारी. तिच्यामुळेच भाऊ वेगळे राहत होते. लौकिकार्थाने भाऊ वेगळे नव्हते घर एकाच होते परंतु आधी काकीने भाऊसाठी खालच्या घरी म्हणजे दुकानी कोफी बनवायला सुरुवात केली आणि चहाकोफी ने सुरु झालेला संसार तिने वेगळे जेवण तिथेच बनवायला सुरुवात करून तिथेच थाटला. अप्पाना आणि घराच्या बाकीच्या ना हे फारसे पसंत नव्हते. तरीही घर एकाच होते. दिवाळी,दसरा आणि गावाची जत्रा ह्याप्रसंगी इच्छा नसूनही लाजेकाजेखातर काकी वर येत असे. त्यात दर आमावस्येला घरी सत्यनारायणाची पूजा असे त्यासाठी तर यावेच लागे. दोन वेळचे जेवण एकत्र असे. सगळे घर गावकरी आणि शाळेतले काही शिक्षक जेवायला असत. नाही म्हटले तरी चांगली सत्तर ऐशी पाने उठत. त्यात गड्यांची भर. बाळू धरून दुकानातले चार. पाणी भरणारा कक्या बामन आणि जे वेळेला हजर होतील ते. अश्या वातावरणात काकीला सवतासुभा मांडता येत नसे आणि भाऊही तो मांडून देत नसत. अश्या काकीने एक गोष्ट केली जी करायला पाहिजे नको होती. पुराच्या धावपळीत काकीने आपले दागिने शेजारी एका मुसलमान शेजारणीकडे ठेवायला दिले हेतू हाच की ते आम्हास कळू नये. किती होते ते आणि काय दागिने होते ते. काकीने एकत्र कुटुंबात राहूनही त्याचा नियम मोडला होता. भाऊ जरी मोट्ठे असले तरी मधले काका ज्याना आम्ही अप्पा म्हणत असू ते पूर्ण घर सांभाळत असत. सगळे व्यवहारही त्यांच्याकडेच असत. जसे इतर एकत्र कुटुंबात असत. हा अपरोक्ष झालेला व्यवहार अप्पांच्या कानी गेला आणि तिथे सारे बिनसले अप्पाना काकीचे हे वागणे पसंत पडले नाही व घरात कुरबुरी सुरु झाल्या.. परंतु ह्या प्रकारात कोणी काहीही बोलले नाही. पुढे त्या मुसलमान शेजारणीने दागिन्यान बाबतीत कानावर हात ठेवले.
विजयकुमार.........
१७ / ०६ / २००९
क्रमशः
सुंदर लिहीता आहात आपण. थोडेसे
सुंदर लिहीता आहात आपण.
थोडेसे संपादित केलेत आणि व्यवस्थित भाग पाडलेत तर..
खुप छान आहेत आठवणी. लिहित रहा
खुप छान आहेत आठवणी. लिहित रहा प्लीज
खूप छान .ओघवती भाषा
खूप छान .ओघवती भाषा .चित्रदर्शी ,नेमकेपणा .,वास्तवाच सहज दर्शन सगळ सगळ आवडल .मस्त.
रुमाल टाकतोय!
रुमाल टाकतोय!
तो रुमाल सोडा.
तो रुमाल सोडा.
आधी तुम्ही लिहिते व्हा!
आणि दंडवत घ्या!
हे वाचलं नव्हतं आधी. खूप छान
हे वाचलं नव्हतं आधी. खूप छान आहेत आठवणी.
आठवणी अजून लिहित्या होऊद्या
आठवणी अजून लिहित्या होऊद्या पुन्हा विजयकुमार
रुमाल टाकतोय!
रुमाल टाकतोय!
Submitted by जव्हेरगंज on 22 January, 2019 - 20:22
तो रुमाल सोडा.
आधी तुम्ही लिहिते व्हा!
आणि दंडवत घ्या!
Submitted by अज्ञातवासी on 23 January, 2019 - 00:18
बरोबर