अमुश्या पोर्निमा जवळ या लागली कि कमळीचा जीवला निस्ता घोर लागुन र्हाई. आता कमळी म्हंजी कुनी येरीगबाळी न्हवं. शाण्णव कुळीची ल्येक अन पैलवानगड्याची बाईल. येळला वागाच्या नाकात वेसण बांदील अन शेरडं न्यावीत तशी वडुन नील. पर ह्या सुक्काळीच्या शेंवंतेनं तिच्या गळ्याला तात लावल्याला.
आता असं मदनच सांगूनश्यान, तूमच्या डोस्क्यात काई शिरनार न्हाई, समदं कसं बैजवार सांगाया पायजे.
तर हि कमळी म्हंजी शिरगावच्या म्हैपती पाटलाची ल्येक. शिरगाव म्हंजी काई खेडेगाव न्हवं. आनि म्हैपती पाटील म्हंजे कुनी वसाडगावचा पाटिल न्हवं. निस्ती जिमीनच चार कमी पाच विसा एकराची. खंडानं दिल्याली आनकि. धाबारा गुरं गोट्यात. अर्द्या गावात दुदाचा रतीब, थोडीबहुत सावकारी. तालुक्याच्या कोर्टात एक न्हवं दोन न्हवं आट केसी चालल्याला. तर अश्या तालेवार घरातली कमळजा. रुपानं देकणी. चंद्राला म्हनं उगवु नगं अन सुर्व्याला म्हनं मावळु नगं.
रंगानं म्हनाल तर मैद्यावानी पांडराफ़ेक. डोळं अक्षी हरनावानी, व्हटावर निस्ती डाळिंब फ़ुटल्याली. पोपटाच्या चोचीवानी नाक.
आता केसाचं काई सांगता येनार न्हाई, कारन तिच्या डूईचा पदर कदी खांद्यावर सुदिक आल्याला कुनी बगितल्याला न्हाई.
तरिबी कामाला वागीन. डुईवर हंडा अन काखत कळशी घिऊन, पान्याला जानार. आता अशी रुपागुनाची खाण वाटं जाया लागली म्हंजी गावकर्यांची दिलाची दैना झाल्याबिगर र्हाती व्हय. पर कमळी काई त्यातली न्हवं. कुनाच्या मागे जानारी न्हवं. पर तशी ती वाईटबी न्हवं. कुनी बोलाया आलाच तर त्याच्याशी चार शबूद बोलल्याबिगर म्होरं जानार्यातली न्हवं.
बोलतानं बी, काय दादा, काय अन्ना, काय भाऊ असं बोलनारी. उगा कुनी लगट केली तर निस्त्या नदरनं त्याला गप बशिवनारी.
तर शिरगावच्या जत्रंला कोपरगावच्या म्हादेव पैलावानाची म्हातारी आल्याली. पैल्या नजरतच, तिला कमळी आवाडल्याली. तिनं लगोलग बंदा रुपाया दिऊनश्यान कमळीला मागनीच घातल्याली.
आता ह्यो म्हादेव पैलवान म्हंजी कोन, ते सांगाया पायजे. नायतर म्हनशीला, का रामाची शिता कोन ? तर ह्यो म्हादेव पैलवान म्हंजी कोपरगावच्या बेडके पैलवानाचा शागिर्द. गडी अंगानं हुबा नि आडवा. त्येच्या रुपात गावरान गोडवा. धा कुस्त्या मारल्याल्या. येरवाळीच हुटुन तालमीत घुमल्याबिगर त्याला आन्न ग्वाड लागायचं न्हाई. तालमीस्न आल्यावर अक्की दुदाची घागर नरड्यात पालथी करनारा. त्यो नदीवर अंगुळीला ग्येला कि आयाबायाना धुणी बडवनं सुदरायचबी न्हाई. कुनी तर पाय घसरुन पान्यातबी पडल्याल्या. मंग तो वागानं शेरडु धरल्यागत त्या बाईला, पान्यातनं वडुन काडायचा.
तर त्यो आल्याला कमळीला बगायला, म्हातारीसंगं. कमळीनं सोता खपुन पुरनावरनाचा सैपाक केल्याला. तिच्या हातची पोळी म्हंजी कशी मखमालीवानी मऊशार. आटीव दुदावानी ग्वाड. त्वांडात घातली कंदी अन प्वॉटात गेली कंदी ते सुदिक कळू ने. म्हादेवानं पाच का सा खाल्या त्ये त्याला बी आटवना. त्येची म्हातारी बगत व्हती. ती म्हनं पोळी बगावी काठात अन पोरगी बगावी व्हटात.
तर ह्या म्हादेव पैलावानाचं लगीन शिरगावच्या कमळीशी लागल्यालं. अक्का गाव लोटल्याला. कुनीबी घरात चुल पेटवायची न्हाई, असं त्येच्या म्हातारीनं सांगावा धाडल्याला. समदं गाव तीन दिस, बुंदीचं लाडु खाईत व्हतं.
तर कमळी आली कोपरगावात. पाच परतावणं झाल्याल अन गोंधळ बी झाल्याला. देवदर्शनाला म्हनुन्श्यान दोगं ज्योतिबाच्या डोंगराला बी गेल्याली. अंबाबाईची वटी बी भरल्याली.
म्हादेव पाटलाची म्हातारी लय श्यानी. तिनं त्या दोगास्नी, शिवारातल्या घरला लावुन दिल्यालं. म्हनली राजारानीचा सौंसार करा. अडल्या नडल्याला आम्ही हायेच की.
आता राजारानीचा सौंसार सुरु झाल्याला. पर पैलवान गडी त्यो. तालीम कशी चुकविनार ? अन कुटं जत्रा असली, फ़ड असला. म्हंजी जानारच कि त्यो. आता जत्रा म्हनली म्हंजी त्येचं दोनचार दिस जानारच कि.
तर त्यो असाच गेलेला. शुक्कीरवारी येनार म्हणुन कमळीला सांगुन गेल्याला. कमळीनं पुरनावरनाचा सैपाक केल्याला. निवद म्हनुन न्हवं तर म्हादेवासाटी म्हनुन. ती आपली सोप्याला बसल्याली. तेवड्यात शेवंती दारात हुबी राह्यल्याली. आता कमळीला काय म्हाईत हि शेवंती कोन ती आणि तुमालाबी काय म्हाईत ह्या शेवंतीची भानगड काय ती.
तर आता शेवंतीची डिटेल ष्टोरी सांगाय पायजे का नको ? तर हि शेवंती म्हनंजी कुनी भायेरची न्हवं. तिची मावळण र्हाईत हुती म्हादेवाच्या आळीत. म्हंजे आक्षी आळीत न्हवं म्हादेवाचं घर मधल्या आळीत अन हिची मावळण खालच्या आळीत. तर ती आल्याली मावळणीकडं. ती नदीवर जायला अन आपला म्हादेव पैलवान अंगुळीला जायला एक गाठ पडल्याली. त्येला बगुन हिच्या काळजात निस्त दुकु लागल्यालं. तिची नजर काई हटना.
पर आपला म्हादेव काई त्यातला न्हवं. त्यो कुनाच्या भानगडीत पडनारा न्हवं. त्यो कस्याला बगतोय हिच्याकडं. पर हिचा जीव काई र्हाईना, गेली त्येच्याम्होरं आणि ईच्यारलचकी डायरेक. म्हनाली माज्याशी लगीन करशीला का ?
ह्यो गडी बावचाळल्याला. त्येला कुनी असं ईच्यारल्यालंच न्हाई आजवर. त्यो म्हनाला, माज्या म्हातारीच्या शबूदाभाईर मी जानार न्हाई. ती म्हनली गोट्यातल्या गाईशी लगीन कर, तर त्ये बी करीन.
शेवंती खुळावली, म्हनली गाईपरास मी काई वंगाळ न्हाई. आत्तीला पाटवते तुझ्याकडं
फुडं तिच्या मावळणीही अन म्हादेव पैलवानाच्या म्हातारीची काय बोलाचाली झाल्याली त्ये काय कुनाला म्हाईत न्हाई. समद्याना एवडंच कळल्यालं कि म्हादेव पैलवानाचं लगीन कमळीशी लागल्यालं.
आता समद्या गावाला कळल्याला म्हंजी शेवंतीच्या मावळीणीलाबी म्हाईत पडलंच कि. आनि तिला म्हाईत पडलं म्हंजी शेवंतीलाबी म्हाईत पडलंच की.
तर ह्या शेवंतीची ष्टोरी आनकी हायेच फ़ुडे. तर या शेवंतीनं येरवाळीच हुटुन हिरीत जीव दिल्याला. आता तिनं का जीव दिल्याला त्ये कुनालाच म्हाईत न्हाई. कुनी म्हनं काय तर कुनी म्हनं काय.
तर हि शेवंती, कमळीच्या दाराम्होरं हुबी र्हायल्याली. आत्ता घ्या आनकी. मेल्याली बाई कशी यील म्हनुन काय ईच्यारता राव ? आमी सांगु ने आणि तुमी ऐकु ने. येवडंबी कळंना झालय व्हय ?
तर ती शेवंती आल्याली. म्हनं, पुरनावर्नाचा सैपाक केलेला हाईस तर मला वाड. मी काय खाल्ल्याबिगर हितनं जानारी न्हाई. कमळी काय करत्ये ? तिनं आपलं वाढल्यालं. तिची एक पुरनाची पोळी गडीमानसाला खानं अवगड हुयाचं तितं ह्या बाईला, काय सपनार ? पर तिन बसल्या जागंवरुनच दुरडीतल्या समद्या पोळ्या वडुन घेटल्या. कमळीनं आक्षी सोताच्या डोळ्यानं बघितलं न्हवं. तिनं एवडा तिच्या धन्यासाटी, पुरनावरनाच्या सैपाक केलेला, आनि या बयेनं समदा गिळुन टाकल्याला कि. कुनाला सांगती ती, तिनं परत भाकर्या बडवल्या आनि सांडग्याचं कोरड्यास केलेलं. म्हादेव आल्यावर दोगबी जेवल्याली. तिनं त्येला कायबी सांगितल्यालं न्हाई.
आनकी पंदरा दिवसानंबी तिच गत. समद्या पुरनपोळ्या शेवंतीनं नरड्याखाली घातल्याल्या. मग मातुर कमळी कावली. त्यी बी पैलवानाची मर्दिनी व्हती. पर तिला कायबी सुदरना की. त्यी गेली म्हादेव पैलवानाच्या म्हातारीकडं. तिनं सगळं बैजवार सांगितल्याल. म्हनली, कायतरी विलाज करा. म्हातारीनं तिला युगत सांगितली, अन मग त्यानंतर कवाबी शेवंती आल्याली न्हाई. म्हंजी तशी एकडाव आल्याली, मागनं म्हातुर न्हाई.
आता घ्या. ती युगत सांगितल्याबिगर काय तुमी मला सोडनार हात व्हय. रियल ष्टोरी हितनं फ़ुडच हाये. आतापातुर सांगीत व्हतो त्ये नुसतं ट्रेलर व्हतं, न्हवं का.
तर काय सांगित व्हतो. ती कमळी सोप्याला बसल्याली. तिनं काय आज पुरनावरनाचा सैपाक केलेल्याच न्हाई. तशी गुमान सोप्याला बसल्याली. तोवर शेवंती आल्याली. काय गं ए कमळे, पोळ्या कुटं हाईत माज्या ?
कमळी म्हनाली, तुझीच वाट बगत हुते. हितं माज्या जिवाला बरं न्हाई. जाती का र्हाती त्ये म्हाईत न्हाई. तुला आनकी पोळ्या कुटनं करुन द्याच्या त्या.
शेवंती म्हनली. व्हय गं. काय झाल्यालं म्हंते मी.
कमळी म्हनाली. का उपेग तुला सांगून तु काय करनार हैस ?
शेवंती म्हनली, तसं न्हवं गं. भनीवानीच कि आपन दोगी.
कमळी म्हनाली. मग का येति हितं. काय शेर हाये तुजा हितं.
शेवंती म्हनली. तुज्या धन्यावर माजं पिरेम व्हतं. तेनं तुझ्याशी पाट लावला आणि मला काय करमना.
कमळी म्हनली, मग माजा जीव घिनार हैस का आता
शेवंती म्हनली. घिनार व्हते पर तुज्या पुरनाच्या पोळ्याने मला अडिवलं बग. आता त्या खाऊ घातल्यास तर माजा काई तरास हुनार न्हाई बग तुला.
कमळी म्हनाली. दिल्या असत्या कि, पर आज माज्या जीवाला बरं न्हाई. आजच्या दिस दम धर कि.
शेवंती म्हनली, आता मला कुटं दम निगायला. देती का न्हाई त्ये सांग आदी ?
कमळी म्हनाली. आता तु माज्या थोरल्या भनीवानी. एकांद्या दिशी कळ काडशिला का न्हाई ?
शेवंती म्हनली. माजी कायबी विच्चा पुरी झाल्याली न्हाई. मला पुरनाची पोळी आयती मिळत व्हती, तीबी का सोडु, म्हंते मी ?
कमळी म्हनली उगा माज्या भरोश्यावर र्हाऊ नगस. मी काय आज हाये उद्या न्हाई. मी गेल्यावर तुला कोन पोळी करुन घालनार हे ?
शेवंती म्हनली. मग काय करु म्हंतेस ?
कमळी म्हनाली, आता कसं शान्या मानसावानी बोललीस. तुज्या तुच का करुन घिनास ? पायलीभराच्या कर न्हाईतर मणाच्या कर. आपल्या आपन करुन घे, म्हंते मी.
शेवंती म्हनली, आत्ता गं बया. मला सुदरना म्हनुन तर तुज्या मानगुटीवर बसती न्हवं का मी.
कमळी म्हनली, व्हय ग मर्दिनी, हाताला चटकं बसल्याबिगर पोळी खाया मिळती व्हय. मी सांगती. हे बग आदी पायलीभर चन्याची डाळ घ्याची.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, मग ती एकदोन येळंला धुन घ्याची.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, मग बग जरा मोट्या टोपात घालुनश्यान चुलीवर चडवायची.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, पानी वाईच जास्त घाल बर का. कट नगु का.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, नीट ध्यान ठिवाय लागतय बग डाळीकडं. इस्तू बी नीट द्या लागतोय.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, मग बग उलीसा मैदा अन त्येवडाच रवा घिऊन तो पान्यान भिजवायचा. उलीसं मीठ घालाय विसरु ने.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, मग त्येला त्येल पानी लावुनश्यान तिंबून घ्या लागतय.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, मग त्याला चांगली तार या पायजे. अन पुरनाला विसरु ने. त्याकडेबी ध्यान द्या लागतय.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला
कमळी म्हनली, मग पायलीभर पिवळाधम्मक गुळ घिऊनश्यान त्या डाळीत घालायचा.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला
कमळी म्हनाली, पर त्या अगुदर डाळ नीट शिजल्याली हे कि न्हाई ते बगा लागतय. आनि कट बी वतून घ्या लागतोय.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, आता ते पुरन बग कसं रटाअटा शिजाय पायजे. पानी र्हाता कामा ने त्यात आनि खाली लागताबी ने.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला
कमळी म्हनली, मग बग त्ये पाट्यावर नीट वाटाय पायजे. हात नीट चालवाय पायजे. एकांदा डाळीचा दाना र्हाता कामा ने.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला
कमळी म्हनली, तु लईच हुषार कि गं. आता एवडं सांगती मी, आता कर्शीला त्या मला दावशीला का न्हाई ?
शेवंती म्हनली, तर गं. तुला दावल्याबिगर कुटं जायाची न्हाई.
कमळी म्हनली, बगं आपल्या आईबाची असशीला तर दिला शबूद मोडनार न्हाईस.
शेवंती म्हनली. व्हय गं. मी बी तुला करुन दावल्याबिगर, हितं यायचीच न्हाई. पर आता म्होरं सांगशीला का न्हाई.
कमळी म्हनाली, व्हय कि. आता ह्ये बग. पुरन घ्याचं. तेचा हे एवडा गोळा घ्याचा. त्याचा करायचा उंडा.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, आनि त्या उंड्यात रवा मैद्याचा उलीसा गोळा भरायचा.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, अन मग निस्त्या त्येलावर बग तो गोळा लाटायचा.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला.
कमळी म्हनली, अन झालं. निस्ती भाजायची. ते लाटायचं तेवडं जरा बग. म्होरं काई न्हाई बग.
शेवंती म्हनली, त्ये म्हैत हे कि मला. आत्ता अशी जाती आणि घिऊनच येते तुज्यासाटी.
कमळी म्हनली, बग गं मर्दिनी शबूद दिला हाईस. इसरु नगस.
तवाधरनं बगा शेवंती पोळ्याच्या मागं लागल्याली हे, आणि कमळी चा संसार सुकानं चालु हे.
दिनेशदा
दिनेशदा मस्तच. जाम मजा आली वाचताना.
बाकी तो फसलेल्या मोदकांचा प्रयोग माझ्या सासुबाइ अगदी निगुतीने करुन वाढतात. छान लागतो तो पदार्थ. इराडे अड्ड्या असं नाव आहे त्याचं तुळु भाषेत.
अरे वा,
अरे वा, रमणी. चाखायला पाहिजे. सारण तसेच असते का ?
मस्त कथा.... गावरान भाषेत तर
मस्त कथा.... गावरान भाषेत तर आणखी मजा आली.. !!
लय झ्याक. असली पुरणपोळी करून
लय झ्याक. असली पुरणपोळी करून बघायला पाहिजे आता.
दिनेशदा, मस्तच जमल्ये ही कथा.
दिनेशदा,
मस्तच जमल्ये ही कथा. गावरान भाषेमुळे खुपच मजा आली. मस्तच. पु.ले.शु.
दिनेशदा, ही स्टुरी यकदम येगळी
दिनेशदा,
ही स्टुरी यकदम येगळी आणि लई भारी वाटली बघा !
कमळी आणि शेवंती !!
दिनेशदा, सहि जमलिय कथा
दिनेशदा,
सहि जमलिय कथा
दिनेशदा शंकर पाटलांची आठवण
दिनेशदा शंकर पाटलांची आठवण करून दिलीत राव !!खूपच सुंदर अक्खा गाव आणि त्यातलं वातावरण उभं राहिलं डोळ्यासमोर
लय झ्याक
लय झ्याक
दिनेशदा भारी लिवलय, आधी मी
दिनेशदा भारी लिवलय,
आधी मी रेसेपी असेल म्हणून घाई घाई ने उघडायला गेले
(No subject)
लय आवडली पुरनाची पोळी
लय आवडली पुरनाची पोळी
Pages