मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे

Submitted by चिनूक्स on 25 August, 2010 - 09:47

लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई शिर्के, पार्वतीबाई ठोंबरे, सुनीता देशपांडे, कमल पाध्ये, सुमा करंदीकर, यशोदा पाडगावकर, रागिणी पुंडलिक यांच्या सकस आत्मचरित्रांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं 'मास्तरांची सावली' हे या समृद्ध परंपरेला अधिक श्रीमंत करणारं आत्मचरित्र.

कृष्णाबाई तळेकर यांचा जन्म गिरणगावातला. त्या वर्षसव्वावर्षाच्या असताना त्यांचे वडील वारले, आणि मग काही महिन्यांनंतर त्यांच्या आईने आत्महत्या केली. परळच्या मंगलदास चाळीत आजीनं कृष्णाबाईंना वाढवलं. घरी प्रचंड गरिबी. चारही काका व्यसनाधीन. वयाच्या आठव्या वर्षापासून धुणंभांडी, मजुरी करून कृष्णाबाई आजीला मदत करू लागल्या.

याच मंगलदास चाळीत तिसरी शिकलेला एक कम्युनिस्ट कार्यकर्ता राहत होता. वूलन मिलमध्ये काम करणार्‍या गंगाराम सुर्व्यांनी या मुलाला रस्त्यावरून उचलून आणलं होतं. या बाळगलेल्या मुलाला त्यांनी आपलं नाव दिलं. नारायण गंगाराम सुर्वे.

नारायण सुर्वे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते होते. पत्रकं वाटणं, घोषणा देणं, प्रचारसभांत भाषणं देणं ही सततची कामं. सुर्वे स्वतः तिसरी शिकले असले तरी कामगारांच्या प्रौढ साक्षरता वर्गांत शिकवत. उत्तम भाषणं करत. 'मास्तरासारखा बोलतो जणू', असं कौतुकानं सारे म्हणत. गिरणगावात मग गंगाराम सुर्व्यांचा हा मुलगा सुर्वे मास्तर या नावानं ओळखला जाऊ लागला.

नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई तळेकरांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा कृष्णाबाईंच्या घरातून विरोध झाला. दोघांच्या वयांत सातआठ वर्षांचं अंतर. शिवाय नारायण सुर्व्यांच्या जातीचा पत्ता नाही. कृष्णाबाईंनी घरातून पळून जाऊन नायगावच्या कोर्टात नारायण सुर्व्यांशी लग्न केलं. 'मनात प्रेम आहे, मग काळी पोत गळ्यात का बांधायची?' असा प्रश्न पडूनही बुधाजी गोडघाटे या सुर्व्यांच्या मित्रानं दिलेली काळी पोत कृष्णाबाईंनी गळ्यात घातली.

लग्नानंतर राहायला जागा नव्हतीच. कधी फूटपाथ, कधी कुठल्याशा झोपडपट्टीतली किंवा चाळीतली घाणीनं बरबटलेली अंधारी खोली. नारायण सुर्वे एका शाळेत शिपायाची नोकरी करत. कृष्णाबाईही एका शाळेत शिपाईण म्हणून नोकरीला लागल्या.

नारायण सुर्वे पुढे कवी म्हणून नावाजले गेले. 'ऐसा गा मी ब्रह्म', 'माझे विद्यापीठ' हे संग्रह रसिकांनी डोक्यावर घेतले. पद्मश्री, जनस्थान पारितोषिक, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद असे अनेक सन्मान सुर्व्यांना मिळाले. कृष्णाबाई शिपाईण म्हणूनच साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या. नारायण सुर्व्यांनी नवे विचार मांडले. समानता, तत्त्वनिष्ठा वगैरे मूल्यांचा पुरस्कार केला. मास्तरांच्या सावलीतून बाहेर न येता कृष्णाबाई शांतपणे ही मूल्यं जगल्या. तत्त्वनिष्ठ असणं सोपं नसतं. स्वीकारलेल्या मूल्यांशी बांधिलकी राखणं भल्याभल्यांना जमत नाही. पोटाचा प्रश्न उभा राहिला की तत्त्वनिष्ठ असणं कमी महत्त्वाचं ठरतंच. सुर्वे मास्तरांना मात्र आयुष्यभर मूल्यांशी इमान राखता आलं कारण कृष्णाबाईंची तत्त्वनिष्ठाच तितकी प्रखर होती. म्हणूनच सुर्व्यांना पद्मश्री मिळाल्यावर मुख्याध्यापकांनी बसायला दिलेली खुर्ची नाकारणार्‍या, 'मुलांची शीशू स्वच्छ करायचा मला पगार मिळतो. माझा नवरा कवी असला तरी तो तिकडे स्टेजवर. घरी तो माझा नवरा आणि शाळेत मी शिपाईण. कवीची बायको नाही. माझी ड्युटी मी इमानेइतबारे करणार कारण मी या मुलांच्या जीवावर पगार घेते', असं सुनावणार्‍या, मुलाच्या लग्नात शाळेची खाकी साडी नेसणार्‍या, 'मास्तर गेल्यावर त्यांचे शेवटचे सर्व विधी मीच करणार', असं सांगणार्‍या कृष्णाबाई 'माझ्या मास्तरांना मी घडवलं' असं सांगतात तेव्हा ते अजिबात खोटं वाटत नाही.

कुठल्याशा अंधार्‍या चाळीत राहणारे नारायण गंगाराम सुर्वे संपूर्ण भारतात महाकवी म्हणून ओळखले गेले ते कृष्णाबाईंमुळे. मास्तरांच्या जोडीनं कृष्णाबाई झणझणीत जगल्या. आलेल्या संकटांना सामोर्‍या गेल्या. मुलांची व्यसनं, तरुण मुलाचा मृत्यू हे आघात पचवले. मास्तरांना खचू दिलं नाही. मास्तरांना मोठं केलं. मास्तरांना मोठं करताना स्वतःसुद्धा खूप मोठ्या झाल्या.

कृष्णाबाई मास्तरांना उद्देशून लिहितात, 'शेवटी मृत्यू हा अटळच आहे, पण तो असा आजारीरुपात येऊ नये, आनंदात हसत हसत यावा. तुम्हांलाही आणि मलाही. म्हणूनच फक्त तुम्हांला ज्या गोष्टींत आनंद मिळतोय त्या गोष्टी मीही आनंदानं करीन. कारण मला पैसा, दौलत काहीच नकोय. फक्त माझ्या मास्तरांचं कर्तृत्व त्यांच्या मागेही समाजात राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुमच्यासोबतच तुमची सावली म्हणूनच राहणार, आणि तुमचीही सावली माझ्यावर सतत राहू दे. बाकी मला काहीही नको.'

म्हणूनच गेल्या आठवड्यात सुर्वे मास्तर गेल्याची बातमी कळल्यावर सुर्व्यांच्या कवितांआधी आठवल्या त्या कृष्णाबाई...

कृष्णाबाई नारायण सुर्वे यांच्या 'मास्तरांची सावली' या आत्मचरित्रातली ही काही पानं...

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Mastaranchi-Savali.html

mastar 010.jpg

रवी सहावीला असताना मास्तर अनेकदा त्याला घरी कविता शिकवायचे. त्यांचं वाचन अफाट असल्यामुळे आणि कवितेची विशेष आवड असल्यामुळे ते कविता, इतिहास छान शिकवायचे. माझ्या मनात यायचं, मास्तर फक्त तिसरीच शिकलेत तरीही ते सहावीच्या मुलाला इतकं छान शिकवतात. मग ते स्वत:च मास्तर का होत नाहीत? म्हणून एक दिवस मी त्यांना विचारलं, " मास्तर, शिक्षणाची किती डिग्री असते हो?''
''अगं, खूप असते. शिकावं तितकं थोडंच आहे किशा!''
''मग तुम्ही का शिकत नाही मास्तर? आता आपला रवीसुध्दा सातवीला गेला. दोघं मिळून एकत्र परीक्षा द्या ना! तुमचं वाचन, लेखन भरपूर आहे. तुम्हाला काही कठीण जाणार नाही. ''

मास्तर जरा लाजतच होते, कारण वर्गात सगळी लहान लहान मुलं आणि मास्तर म्हणजे चार मुलांचे बाप. मी त्यांना म्हटलं, '' मास्तर, लाज ठेवायची खिशात आणि बसायचं वर्गात. आपल्याला काहीतरी घडवायचंय ना! मग लाजून कसं चालेल?" मास्तरांनी मनावर घेतलं. नेटाने अभ्यास सुरू केला आणि दोघेही बापलेक सातवी पास झाले.

आज मी विचार करते, 'कृष्णाबाई, इतकं नवर्‍याला तू शिकायला सांगितलंस. पण स्वतः का नाही शिकलीस?' कधीकधी खंत वाटते, वाईटही वाटतं, पण त्यावेळची परिस्थितीच अशी होती की वावच नव्हता मला. हे घरात नसायचे, घरातली सगळी कामं, मुलांची दुखणीखुपणी, माझी नोकरी, या सगळ्यांत वेळ कसा जायचा कळायचंच नाही. आणि त्यात कधी अक्षरं गिरवायला बसले की मुलांचा कालवा, कोण पाठीवर येऊन बसतंय, अंगाशी खेटतय, असं असायचं. मग कसला होतोय अभ्यास? जेमतेम सही करायला शिकले हेच खूप होतं. आणि माझं मनही म्हणायचं, 'कृष्णाबाई, तू शिकली नाहीस म्हणून काही संसार अडणार आहे का तुझा? फक्त व्यवहार अडेल, पण बाहेरचा व्यवहार तर मास्तरच बघताहेत सगळा. आणि दोघंही शिकत राहिलात तर घर कुणी पाहायचं?' त्यामुळे मीच फारसं मनावर घेतलं नाही. आणि राहूनच गेलं शिकायचं. पण बापलेक दोघंही सातवी पास झाले याचा मनोमन मला आनंद झाला होता. मी मास्तरांना म्हटलं, "मास्तर आता इथेच थांबायचं नाही. जितकं पुढं जाता येईल तितके पुढं जा. घरची काळजी करु नका."

मास्तरांच्या शाळेत एक मुसलमान शिपाई होता. त्याच्याकडून ते उर्दू लिहायला आणि वाचायलाही शिकले. पुढे या उर्दू भाषेचा त्यांना खूपच उपयोग झाला.

मास्तर सातवी पास म्हणजे व्ह.फा. झाल्यानंतर शिरोडकर हायस्कूलला गेले. तिथे प्राथमिक शिक्षक सनद (पी.टी.सी.)चे म्हणजेच आत्ताचे डी. एड. म्हणतात ना, ते कोर्स चालायचे. सातवी पास झालेल्यांना त्यात प्रवेश मिळायचा, पण हा कोर्स पूर्णवेळ होता. नोकरी करुन तो करता येत नव्हता. म्हणजे तसा नियमच होता, पण मास्तर तर नोकरी करत होते. आणि वर्षभर रजा घेऊन किंवा नोकरी सोडून कोर्सला जाणं शक्यच नव्हतं, परवडणारंही नव्हतं आम्हांला. सगळी तारेवरची कसरत होती, पण मास्तरही धडपड्या स्वभावाचे होते. ते सरळ शिरोडकर हायस्कूलच्या प्राचार्यांना, वा. धों. कुलकर्णींना भेटले. ते स्वतःही कम्युनिस्ट विचारांचे होते, त्यामुळे त्यांनी मास्तरांना पी.टी.सी.ला प्रवेश दिला. सर्वच बाबतीत सहकार्य दिलं. मास्तर तेव्हा एल्फिन्स्टन पुलाजवळच्या शाळेत होते. मुद्दामहून त्यांनी सकाळचं अधिवेशन घेतलं होतं. एक वाजता शाळा सुटली की धावतपळत परळच्या शिरोडकर हायस्कूलला पोचायचे. शाळेतल्या मंडळींनीही 'शिपाई असून शिकतोय' म्हणून सहकार्य दिलं होतं. घरातल्या जबाबदारीतून तर मी त्यांना मुक्तच केलं होतं. सांगते काय, इतकं शिक्षण घ्यायला मी त्यांना प्रवृत्त केलं, पण घरातल्या कोणत्याच साध्या साध्या गोष्टीही मी त्यांना शिकवल्या नाहीत. ती माझ्याकडून झालेली चूकच म्हणावी लागेल. म्हणून तर साध्या चहासाठीही त्यांना दुसर्‍यावर अवलंबून राहावं लागतं, पण सतत बाहेरची कामं केल्यामुळे बाहेरचे व्यवहार छान जमतात. बाजारहाट करणं, खरेदीचे व्यवहार त्यांना छान जमतात. तर असं सगळं करत मास्तर शिकत होते, घडत होते. दुपारी १ ते संध्याकाळपर्यंत 'टीचर्स ट्रेनिंग'च्या वर्गाला बसायचं. वर्ग सुटले की तिथेच थोडा वेळ वाचायचं, अभ्यास करायचा. कारण घरात कुठला इतका निवांतपणा मिळायला? रात्री उशिराच यायचे घरी. कधीतरी मुलांना शिकवूनच 'लेसन'ची की कसली तयारी करायचे. त्या बाबतीत मास्तरांचा हातखंडाच होता. दिवसभर नोकरी आणि रात्रीचा दोनतीन तास अभ्यास असं करुन मास्तर एकसष्ट टक्के मिळवून पी.टी.सी. परीक्षा पास झाले. माझे मस्तर खरेच 'शाळामास्तर' झाले. गमतीजमतीत मी त्यांना आधीपासून 'मास्तर' म्हटलं होतं, पण खरोखरच स्वतःच्या बळावर, कष्टावर ते खरेखुरे मास्तर झाले याचा मला खूपच आनंद झाला होता, पण खरं सांगू? मला ते कौतुक बिवतुक काही करता येत नाही, कसं करायचं तेही कळायचं नाही. फक्त मास्तरांना म्हटलं, "इथवर मजल गाठलीत, आता थांबू नका. जितकं पुढे जाता येईल तितके पुढे जा."

मास्तरांचा कोर्सचा खर्च, रवीची शाळा, त्याचं पुढचं शिक्षण, घरातला खर्च या सगळ्या खर्चाची हाततोंड मिळवणी करता करता जीव थकून जायचा. रवीलाही आठवीसाठी चांगल्या शाळेत घालायचं होतं. मला मुलालाही शिकलेलं पाहायचं होतं आणि त्याच्या बापालाही शिकलेलं पाहायचं होतं, पण काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी शिरीष पै धावून आल्या. आचार्य अत्रे आणि त्यांची मुलगी शिरीष पै, दोघांचाही मास्तरांवर प्रचंड जीव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मास्तरही उतरले होते ना! आणि एक कवी म्हणूनही अत्र्यांना आणि शिरीषताईंना मास्तर आवडत होते. शिरीषताई स्वतःहूनच म्हणाल्या, "वैनी, तुम्ही काळजी करु नका. रवीच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च मी करते. मी दरमहा त्याला पंचवीस रुपये देत जाईन." खरं तर आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च दुसर्‍यांनी करावा हे मनाला पटत नव्हतं, पण काय करणार! नाईलाज होता. रवी अगदी कॉलेजला जाईपर्यंत शिरीष पैंनी त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. बोगद्याच्या चाळीत शिरीषताई आणि वासंती मुजुमदार अनेकदा खास माझ्याशी गप्पा मारायला म्हणून यायच्या. एवढ्या मोठ्या माणसाची मोठी साहित्यिक मुलगी, पण अजिबात गर्व नव्हता. खूप प्रेमाने वागायच्या त्या. मास्तर 'मास्तर' झाले याचा अत्र्यांना, शिरीषताईंना आणि इतर अनेकांना खूपच आनंद झाला होता. अगदी कपिला खांडवाला मॅडमनासुद्धा. त्यांनी तर लगेचच 'शिक्षक' म्हणून रुजू होण्याचा आदेशही दिला.

एक गंमतच होती ती. शाळेत तळमजल्याला मी 'शिपाईण' होते आणि वरच्या मजल्यावर हे 'मास्तर' आणि आमची मुलं 'विद्यार्थी'.

मास्तर नायगावच्या शाळेत 'शिक्षक' म्हणून रुजू झाले तेव्हाचे अनुभव फारच कटू होते. कारण अगदी कालपरवापर्यंत हा माणूस 'शिपाई' होता. आता त्याला एकदम 'अहो गुरुजी' किंवा 'अहो मास्तर' कसं म्हणायचं? असा प्रश्न शाळेतल्या अनेक शिक्षकांच्या चेहर्‍यावर दिसायचा. एक शिपाई तो कसला मास्तर म्हणून शिकवणार पोरांना? असा प्रश्नही अनेकांच्या मनात असायचा. पण माझी खात्री होती. याच मंडळींनी वर्गातल्या मास्तरांचा एक तास जरी ऐकला तरी चाट पडतील, असं मला मनोमन वाटत होतं, पण नुसतं मला वाटून काय होणार होतं?

पहिल्याच दिवशी, मास्तर शाळेत रुजू झाले, तेव्हा त्यांना मुद्दामहून नापास मुलांचा वर्ग देण्यात आला होता. का? तर चांगलं शिकवेल न शिकवेल. जवळजवळ पंधरा दिवस मास्तरांना नापास मुलांच्याच वर्गावर पाठवत होते, पण मास्तरांनी पास-नापास असा भेदभाव केला नाही. आनंदाने शिकवलं. त्या वर्गातल्या मुलांनीही हेडमास्तरांना 'नवे गुरुजी' चांगले आहेत, असं सांगितलं असावं किंवा हेडमास्तरांनी तशी 'चौकशी' केली असावी. नंतर हेडमास्तरांनी 'ह्यांना' बोलावून घेतलं तर त्यांनी तिथेही भाषणबाजी केली बहुधा- 'आज शिक्षणाची गरज का आहे, कशी आहे?' वगैरे वगैरे बोलले. आणि एक दिवस गुपचूप हेडमास्तरांनीही ह्यांचं वर्गातलं शिकवणं वगैरे ऐकलं आणि नंतर सन्मानाने वागणूक दिली. पण सुरुवातीच्या दिवसात मास्तरांना इतर शिक्षकांकडून जे कटू अनुभव विशेषतः जातीपातीवरून आले त्याने मास्तर व्यथित व्हायचे. मला म्हणायचे, "किशा, शिक्षक म्हणून मिरवणारी माणसं सुशिक्षित असतील; पण सुसंस्कृत असतीलच असं नाही."

मी म्हणायची, "जाऊ द्या मास्तर. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. त्याचं योग्य फळ आपल्याला मिळेलच."

आपले पप्पा 'मास्तर', 'गुरुजी' झाले म्हणून मुलंही खूष होती. सगळं कुटुंबच एका शाळेत असल्यामुळे अनेक गमतीजमती व्हायच्या. एकदा काय झालं, शाळेच्या मधल्या सुट्टीत मी काहीतरी करत बसले होते. माझी शाळा तळमजल्यावर गुजराती मीडियम आणि ह्यांची पहिल्या मजल्यावर मराठी मीडियम. शाळेत असताना मी ह्यांच्याशी बोलणं शक्यतो टाळायची. 'उगाच कशाला लोकांना दाखवा आम्ही नवराबायको आहोत ते!' असं मला आपलं वाटायचं. तर हे जिन्यात उभे होते, मला हाक मारून हे म्हणाले कसे, "ओ कृष्णाबाई, बरंय ना तुमचं?" स्वभावच ह्यांचा चेष्टामस्करी करायचा आणि मला कामाच्या ठिकाणी चेष्टा केलेली अजिबात आवडायची नाही. मी लगेच त्यांना हटकलं, "मास्तर, हे घर नाहीये तुमचं. ही शाळा आहे, याचं जरा भान ठेवा. नाहीतरी घरी माझ्याशी गाठ आहे."

"अरे हो मी विसरूनच गेलो. मागेही एकदा तू मला असं सांगितलं होतंस. विसरलोच मी, पुन्हा असं करणार नाही," असं बापुडवाणे होऊन ते बोलले आणि मलाच मग वाईट वाटलं. 'उगीचच बोलले मी त्यांना' असं मनात आलं. मुलींनाही बजावलं होतं, शाळेत सारखं आईपप्पा करायचं नाही. तुम्ही विद्यार्थी आहात. आणि ते तुमचे गुरुजी, तेव्हा त्यांना गुरुजीच म्हणायचं. माझ्या कल्पनाला तर ते वर्गशिक्षकच होते. शाळेत जरा काही बिनसलं की ही आपली पपा-पपा करायची. एकदा काहीतरी आईसफ्रूटसाठी ती त्यांच्याकडे पैसे मागत होती. सारखं आपलं वरखाली जा-ये चाललं होतं. घरी आल्यावर तिला चांगलंच सुनावलं, "तू शाळेत शिकायला जाते, की पप्पा पप्पा करायला? आज तू त्यांना पप्पा म्हटलंस, उद्या दुसरी मुलंही तुझं बघून त्यांना पप्पा म्हणतील किंवा चेष्टा करतील. चालेल तुला? ते शाळेत तुझे गुरुजी आहेत आणि तू त्यांची विद्यार्थिनी. पप्पाटप्पा काय ते घरी. जे काही खाण्यापिण्याचे हट्ट करायचे असतील ते घरी. शाळेत नाही, कळलं?" आपल्याला कुणी हसायला नको, कुणी आपल्याकडे बोट दाखवायला नको, याची मी सतत काळजी घेत असे.

शाळेची अनेकदा ट्रिप जायची. मी ह्यांच्यासोबत मुलांना पाठवायची, पण मी जायची नाही. उगीच कुणी नावं ठेवायला नकोत. 'बरंय, आईस, बापूस, पोरं दुशीकडून दोन हातांनी चापतायत आपलं', असलं काहीबाही कुणी बोलायला नको म्हणून काहीतरी कारण सांगून जाणं टाळायची. कधी कधी असंही होतं, बाहेरच्या वातावरणात गेलं की माणूस मोकळा होतो. त्याच्या वागण्याबोलण्यात सैलपणा येतो. नवरा-बायको म्हटल्यावर इतरही काहीतरी चेष्टा करणार. पिकनिकच्या मोकळ्या वातावरणात मर्यादा ही राखल्या पाहिजेत, म्हणजे आपल्यालाही कमीपणा यायला नको आणि आपल्या माणसालाही, याची मी काळजीपूर्वक खबरदारी घेत असे. पिकनिका आयुष्यभर होतील, पण एकदा का तुमचं नाव धुळीला मिळालं की पुन्हा ते मिळवणं सोपं नाही, याचं भान मला असायचं. म्हणूनच चारचौघांत पटकन मिसळायला माझं मन कचरतं, अजूनही.

सततची आंदोलनं, मोर्चे, संप, धरणी अशा वातावरणात मास्तर घरात कमीच असायचे आणि रात्री आले की वाचत बसायचे, नाहीतर लिहीत बसायचे. खूप कविता करायचे. मला काही वाचता येत नसे, पण मास्तरांनी काहीतरी लिहिलंय म्हणून ते कागद जपून ठेवायची उशीखाली. गादीखाली. शर्टपॅंटच्या खिशात अनेक चिटोरे, कागद सापडायचे. मी ते व्यवस्थित ठेवून द्यायचे, पण मास्तर कधी विचारायचे नाहीत, ’माझे कागद कुठे आहेत?’ त्यांना माहीत असायचं ’ही’ व्यवस्थित जपून ठेवणार आणि मास्तर तसे एकपाठी असायचे. कविता लिहून झाली की त्यांच्या डोक्यात फीट बसायची. विसरायचे नाहीत ते. मला याचं खूप कौतुक वाटायचं.

बर्‍याच दिवसांपासून आपल्या कवितांचा काव्यसंग्रह काढावा असं मास्तरांच्या मनात होतं, पण जमत नव्हतं. एकदा संध्याकाळी मास्तर घरी आले. गप्प गप्पच होते. म्हटलं, "काय झालं मास्तर?" तर म्हणाले, "काही नाही ग, माझ्या कवितांचं पुस्तक काढायचं मनात आहे."

"काढा ना मग!" मी म्हटलं, पण पुस्तक काढतात म्हणजे काय ते मला ठाऊक नव्हतं. आणि त्यासाठी पैसे लागतात हेही माहीत नव्हतं.

"किशा, पुस्तक काढायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. पैसे नकोत का त्यासाठी?"

"एवढंच ना! होईल सोय." असं मी म्हटलं आणि माझ्या गळ्यातला मंगळसूत्राचा एक सर त्यांच्या हातात ठेवला. तोही माझ्या काकांनी माझ्या चुलतभावांकडून माझ्यासाठी पाठवला होता. तेवढा एकच दागिना माहेरचा होता माझ्याकडे. बुगड्या तर पहिल्या बाळंतपणातच विकल्या होत्या. मनात म्हटलं, ’कृष्णाबाई, मंगळसूत्र तू केव्हाही करू शकशील नंतर, पण मास्तरांचा काव्यसंग्रह पुढे ढकलून चालणार नाही. त्यांना पुढं जाऊ दे.’

माझं मंगळसूत्र विकून पुस्तकं काढणं मास्तरांना पटत नव्हतं, पण मी त्यांना म्हटलं, "मास्तर, मंगळसूत्र गहाण टाकून कितीसे पैसे मिळणार? त्यापेक्षा ते विकून टाकलं तर बर्‍यापैकी पैसे येतील. त्यात नक्कीच पुस्तक काढता येईल."

मंगळसूत्र विकून पाचशे रुपये आले आणि त्या पैशातून मास्तरांचा पहिला काव्यसंग्रह ’ऐसा गा मी ब्रह्म’ अभिनव प्रकाशनातर्फे वा. वि. भट यांनी १९६२ला प्रकाशित केला. मला आपलं दडपणच होतं. त्यामुळे मास्तरांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असूनही गेले नाही. मनातून खूप आनंद झाला होता, पण मन म्हणत होतं, ’कृष्णाबाई, तुझे मास्तर खूप मोठे होतायत. त्या सोहळ्याला खूप मोठी मोठी माणसं येणार. तू अडाणी बाई तिथे जाऊन काय करणार? तू तिथे शोभणार नाहीस आणि पोराबाळांचं लेंढार घेऊन कुठे जातेस?’ मास्तर खूप खुशीत होते आणि मास्तरांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मीही खुशीत होते.

१९६२ साली ’ऐसा गा मी ब्रह्म’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि १९६३ला त्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. हजार रुपयांचा पुरस्कार होता. त्या सोहळ्यालाही मी गेले नाही. मनातला संकोच; दुसरं काय? आता वाटतं, त्या त्या वेळी आपण जायला हवं होतं. घरातले कुणीच जात नव्हते त्यांच्यासोबत सोहळ्याला. मास्तरांना काय वाटलं असेल तेव्हा? हा विचार मी आत्ता करते, पण त्यावेळी मी मुलाबाळांच्या संगोपनातच अधिक लक्ष घातलं. तर, हजार रुपये मिळणार म्हणजे नेमके किती? आणि ते आणायचे कसे? याचं मला टेन्शन होतं. मी आमच्या शेजारणीला शेंडेबाईंना म्हटलं, "तुम्ही जा." कारण ती म्युन्सिपाल्टीत हेडक्लार्क होती. शिकलेली होती म्हणून तिला म्हटलं, "तुमच्या घरातलं पाणी वगैरे संध्याकाळी मी भरते, बाकीची कामंही करते. तुम्ही जा मास्तरांसोबत. आणि एक पिशवी धुवून ठेवलीय. ती न्या. एवढे पैसे आणणार कशातून? मी आले असते, पण ती पैशांची पिशवी कुठे पडलीबिडली तर ’दुष्काळात तेरावा महिना.’ तुम्ही जा. मी वाट पाहते, लवकर या." तिला माझ्या बोलण्याचं हसूच आलं.

संध्याकाळी मास्तर आले. खूपच आनंदात होते. हजारांचा चेक मी प्रथमच पाहिला आणि माझ्या वेडगळपणाचं मलाही हसू आलं. काही दिवसांनी त्याच पैशातून मास्तरांनी मला चौदा कॅरेट सोन्याचं मंगळसूत्र आणि कुडी आणली. माझ्यासाठी ती अमूल्य भेट होती, कारण जवळजवळ वर्षभर मी मंगळसूत्रच घातलं नव्हतं. चाळीतल्या बायका खूप टोमणे मारायच्या. मी गळ्यात मंगळसूत्र घालत नव्हते. कपाळाला टिकली लावत होते. तीसुद्धा कधी लावली तर लावली नाहीतर नाही. ’सुर्वेबाई आता फॅशन करायला लागल्या’ असं काही बायका म्हणायच्या, पण मंगळसूत्र आणि कुंकू लावलं म्हणजे झालं? मनातल्या भावना नि श्रद्धा महत्त्वाच्या नाहीत का? पण मी काहीही उत्तर द्यायची नाही. नंतरही मास्तरांच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालं. पुरस्कार मिळाले, पण घरातला श्रीरंग वगळता कुणीच जात नव्हतं. श्रीरंगला पप्पांच्या कर्तृत्वाचं कौतुक वाटायचं. पण का कुणास ठाऊक, मला वाटायचं, मी गेले तर सर्व मंडळी मास्तरांनाच हसतील म्हणून मी जात नव्हते. मास्तरांनीही कधी फारसा आग्रह धरला नाही येण्याबाबत.

मुलांची शिक्षणं एकीकडे चालू होती. कल्पनाचा घरातल्या कामांना खूप हातभार लागत होता. ती सातवीत असल्यापासूनच घरातली सगळी कामं हौसेने करीत होती. कविताला मात्र घरकामाची विशेष आवड नव्हती. रवीची एस.एस.सी. झाली. आणि मास्तरांचा एक मित्र प्रा. डॉ. एस.एस. भोसले (संभाजी भोसले) कोल्हापूरला असायचा. त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. तो म्हणाला, मी रवीला कोल्हापूरला नेतो. मास्तरही तयार झाले आणि रवीही. मला मात्र आपल्या पोराने दुसर्‍याच्या दारात राहून शिकणं पटत नव्हतं, पण मास्तरांनी माझी समजूत काढली, "कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी चांगली आहे, रवीला चांगलं शिक्षण मिळेल तिथे." शेवटी रवी कोल्हापूरला गेला शिक्षणाला. अधूनमधून सुट्टीत राहायला यायचा, पण तो तसा दुरावल्यासारखाच वाटत होता मला. कल्पना, श्रीरंगचं, कविताचं शालेय शिक्षण संपत आलं होतं. बोगद्याच्या चाळीतली खोली अपुरी पडत होती. पुन्हा नव्या जागेत राहायला जायचे विचार मनात घोळू लागले होते.

***

मास्तरांची सावली

कृष्णाबाई नारायण सुर्वे

डिंपल पब्लिकेशन
पृष्ठसंख्या - १८३
किंमत - रुपये १९०

***

टंकलेखनसाहाय्य - श्रद्धा, अनीशा

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनुक्सा, टाईप करताना केवळ थोडासा भागच वाचायला मिळाला होता. आता बाकीचेही वाचले.
केवढं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे कृष्णाबाईंचं. फार आवडला हा भाग.
तू प्रस्तावनाही चांगली लिहिली आहेस लेखाला.

वाचायलाच हव हे पुस्तक. लोकसत्तेत देखील आला होता कृष्णाबाईंच्या ह्या पुस्तकातला एक भाग, इथे वाचा.

खूपच सुंदर आणि सशक्त व्यक्तिमत्व आहे कृष्णाबाईंचं.
परीक्षणही उत्तम. धन्यवाद.

धन्यवाद चिनूक्स,श्रद्धा आणि अनीशा.
लोकसत्तातील लेखाची लिंक दिल्याबद्दल मंगेश देशपांडे ह्यांचेही धन्यवाद.
प्रस्तावना चांगली लिहिली आहे आणि असं तुकड्यातुकड्यातून वाचूनही खूप प्रेरणादायी वाटतं आहे कॄष्णाबाईंचं व्यक्तिमत्व. वाचलंच पाहिजे असं पुस्तक !

वाह किती मस्त प्रभावी व्यक्तिमत्व आहे .... वर दिलेल्या फोटोत पण ते अगदि स्पष्ट दिसतय Happy

चिनूक्स, मनापासून धन्यवाद Happy
असे लोक जगात अस्तित्वात होते,आहेत ह्यावर विश्वास बसणे कठीण होत चालले आहे.

आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. त्याचं योग्य फळ आपल्याला मिळेलच. >>> हरवुन गेलीयेत या पिढीतली माणसं.. Sad

चिनुक्स, अजुन एका उत्कृष्ट पुस्तकाचा व प्रभावी व्यक्तिमत्वाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

चिनुक्स, धन्यवाद ईथे पुस्तकातील मजकुर लीहील्याबद्दल. हे वाचताना, आई-बाबा त्या काळातले (१९६०-७०) आपले अनुभव सांगायचे, आई अजुनही कधी कधी सांगते. त्याची आठवण सतत वाचताना येत राहीली. पुस्तक नक्कीच वाचण्याजोग आहे.

कृष्णाबाई तुम्ही वास्तव जीवनातल्या खर्याखुर्या 'हीरो'... शतशहा प्रणाम.
चिनूक्स,श्रद्धा, अनीशा धन्यवाद.

चिनूक्स, तुझे अनेक आभार (पुन्हा एकदा).
कृष्णाबाई, मोठ्या झालेल्या माणसांना संभाळणार्‍या हातांचे ठसे काळाच्या ओघात इतक्या चटकन पुसून जातात....
तुम्ही स्वतःला मास्तरांच्या सावलीत गणता आहात.... पण तुमच्या हातांचे ठसे अधिक गहिरे, अधिक मोठे असतील, मला खात्री आहे!!