चार आठवडे कसून अभ्यास करून संगीता इथले ड्रायविंग लायसेंस मिळवण्यासाठी आवश्यक असलेली लेखी परिक्षा पास झाली होती. भारतातले लायसेंस जर असेल, तर रोड टेस्ट देण्याची गरज नव्हती. फ़क्त लेखी परिक्षेत ९०%च्या वर गूण मिळवले पाहीजे हीच अट होती. आणि संगीताला अभ्यासाचा जणू तापच चढला. पुस्तक आणले आणि रात्रंदिवस तयारी करून तिने परिक्षा दिली. थोडेथोडके नव्हे चांगले ९८% गूण मिळवले. लायसेंस देणे हे जरी पुर्वी ट्रॅफ़ीक पोलीसांचे काम होते, तरी त्यांनी आता ते काम एजंट कंपनीला आउटसोअर्स केले होते. भारतीय लायसेंसचे इथल्या ड्रायवींग लायसेंसमधे रुपांतर करता येत होते.
संगीता लगेच सगळी कागदपत्रे घेऊन एजंट कंपनीच्या ऑफ़ीसमधे गेली. दोन तीन तास लायनीत उभे राहिल्यावर कौऊंटरवरच्या खडूस बाईने संगीताला धुडकावून लावले. घरी आल्यावर हे सांगतांना संगीता जाम चिडली होती. पण खोडकर समिर वेगळ्याच मूड मधे होता.
"नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न!" संगीताला चिडवायची एक देखील संधी समिर सोडायचा नाही. लग्न झाल्यावर परदेशात आल्यावर वर्ष उलटले होते. त्यामुळे संगीताला समिरच्या चिडवण्याची चांगली सवय झाली होती. तसेच त्याला चूप बसवण्यासाठी नेमके काय करायचे ते देखील वर्षाच्या अनुभवाने ती शिकली होती.
"हे पहा इतर काहीही असेल, पण मी नकटी मुळीच नाही. आपले तरतरीत उंच नाक आणखीनच उंच करून संगीता फ़टकारली. "आणि माझ्या लग्नाला विघ्नही आले नव्हते. उगाच काहीतरी बोलू नकोस."
तिचा आक्रमक नूर पाहून समिरने ओळखले. ड्रायविंग लायसेंस मिळण्याच्या मार्गातल्या अडचणी पाहून आज तिचा पारा आधीच चढला आहे. "अग तू येवढी काय चिडतेस? मी येतो तुझ्याबरोबर उद्या. आपण पुन्हा जाऊ. मी बघ कसा आर्ग्यु करतो ते. माझं आर्ग्युमेंट ऐकून लगेच तुला लायसेंस देतील की नाही बघ."
समीरचे समजावणे ऐकूनही संगीताचा मूड ठीक झाला नाही. "काय करणार आहेस तू येऊन? उगाच आणखी भांडशील तिथे.
"काही भांडायची गरज नाही. नियमात बसणारे हवे ते पेपर दिले, की सगळी कामे इथे व्यवस्थीत करतात. भारतासारखे नाही. कचेरीत नुसत्या खेपा घालत बसा. काम कुठे होणार, काय पेपर लागतील, काय अडचणी आहेत, कशाकशाचा पत्ता देखील लागू देणार नाहीत."
"इथे सुद्धा तर काहीच ठीक होत नाहीये. येवढे सगळे पेपर देऊनही ते आणखी काही काही मागत रहातात." संगीता ऐकायला तयार नव्हती. तिने बाबांना मधे घातले. "बाबा तुम्हीच या माझ्या बरोबर उद्या. आपण एजंट कंपनीत न जाता, ट्रॅफ़ीक पोलीस कचेरीतच जाऊ. समिर आला तर उगाच तिथे भांडत बसेल."
बाबा आणि आई आत्ता पर्यंत शांतपणे ह्या दोघांची वादावादी ऐकत होते. शहाण्याने नवरा बायकोंच्या वादात पडू नाही हा शहाणपणा ते शिकले होतेच. आपलाच मुलगा सून ह्यांच्या वादात तर काही ऐकायला आलेच नाही असे दाखवणे फ़ारच उत्तम. त्यामुळे मुद्दामच बाबांनी विचारले. "काय समस्या आहे? मला जरा नीट सगळ सांगशील कां?
संगीताने तिचे रडकथा ऐकवली. "मी इतके दिवस रात्र अभ्यास करून लेखी परीक्षा पास झाले. एजंट कंपनीवाले म्हणाले होते की लेखी परीक्षा पास झाल्या्चा दाखला, आणि भारतातले लायसेंस घेउन ये. लगेच इथले मिळेल. रोड टेस्ट वगैरे काही नाही. अशीच पद्धत आहे."
"हो, तसच असतं" बाबांनी दुजोरा दिला.
"हो ना. पण मी तिथे गेले. दोन तास लाईन मधे उभी राहीले. अन तिथली बाई म्हणते "हे तुमच भारतातलं लायसेंस चालणार नाही."
"चालणार नाही?"
"पहा ना! का विचारलं तर म्हणे ’तुमच हे लायसेंस मुंबईच, पण बूकलेट फ़ॉर्म मधे आहे. आता मुंबईत स्मार्ट कार्ड लायसेंस मिळतं. ते आणा. तरच इथलं मिळेल."
"अग पण स्मार्ट कार्ड तर नुकतच सुरू झालय. तुला मिळालं तेव्हा थोडीच स्मार्ट कार्ड होतं? आणि तुझ बूकलेट फ़ॉर्म देखील व्हॅलीड लायसेंसच आहे ना? त्यांनी ह्यावर देखील दिलंच पाहिजे!" बाबांना काही कळेना. ती एजंटबाई लॉजीकल नक्कीच नव्हती.
"तेच तर! पण मी असं म्हटलं तर ती बाई म्हणाली.. "No, Mumbai issued smart card licenses even in 1983! I recommend you get a smart card license first, then I can convert it to local license." तिने मला एक १९८३ चे मुंबई- कार्ड लायसेंस आणून पण दाखवले. मग मला काहीच बोलता आले नाही."
समिर उसळला. "तू नीट पाहीलंस का तिने दाखवलेलं कार्ड लायसेंस? I can bet, Mumbai police did not issue any smart card license back in 1983! त्यावर १९८३ तारीख खरच होती?"
"हो. १९८३ लिहीलं होतं"
बाबा - "हे कसं शक्य आहे? १९८३ मधे कार्ड लायसेंस नव्हतचं. त्या बाईची काही चूक झाली आहे."
संगीता आता रडायच्या बेतात. "पण मी पाहीलं ना. तिने एक कार्ड लायसेंस दाखवलं त्यावर १९८३ तारीख होती."
"म्हणून तर म्हणतो, तिची काही चूक झाली असेल. १९८३ इश्यु तारीख नाही, लायसेंस होल्डरची जन्म तारीख असेल. ते जाऊ दे." समीरने नवीन कल्पना दिली. "अग तू उद्या पुन्हा जा. पुन्हा प्रयत्न कर. कदाचित तिला चूक कळेल आणि ती लायसेंस करून देईल. कोण जाणे? उद्या दुसरीच बाई असेल. तुझे काम नक्की होईल."
"एकदा त्यांनी रिजेक्ट केलेलं असलं की त्यांच्या कॉम्प्युटरमधे नेगेटीव चिन्ह असतं तुम्ही पुन्हा गेलात तर ते लगेच परत धाडून देतील. माझ्या मैत्रीणीचे असेच झाले होते. ती वर्ष दीड वर्ष पुन्हा पुन्हा जाऊन आर्ग्यू करत होती. तिला लायसेंस नाही म्हणजे नाही कनव्हर्ट करून दिले. आईने तत्परतेने माहीती पुरवली. आईचे सोशल नेटवर्क जबरदस्त होते. कोणत्याही प्रसंगात इतर ओळखीच्या मंडळींचे किंवा अगदी ओळखीच्या ओळखीच्या मंडळींचे सुद्धा काय अनुभव होते हा डेटाबेस आईच्या डोक्यात ऑनलाईन हजर असायचा.
"तुझी ती मैत्रीण माहित आहे मला. भांडणात उस्ताद आहे असं ती स्वत:च म्हणत असते. भांडली असेल तिथे. तुला सांगतो संगीता, इथल्या कचेऱ्यांमधे भांडून कधीच कामे होत नाहीत. जो काय प्रॉब्लेम असेल तो व्यवस्थीत प्रोफ़ेशनली चर्चा करूनच सोडवता येतो. " बाबांनी इथल्या सिस्टीमचे गुणगान ऐकवले. - "पण ते जाऊदे. मलाही असच वाटतं तिने तुझ्या केसवर नेगेटीव फ़्लॅग मात्र नक्कीच घातला असेल. पुन्हा दोन तास लाईनीत उभी राहिलीस, तरी रिजेक्टच होईल. त्यापेक्षा आपण उद्या ट्रॅफ़ीक पोलीस कचेरीतच जाऊ. नाहीतरी हे मूळ काम त्यांचेच आहे. त्यांची आउटसोअर्स कंपनी ते नीट करत नाही आहे हे पटवून देऊ. म्हणजे नक्कीच काम होईल."
क्रमशः
**********************************************
छान. पुढच वाचायची उत्सुकता
छान. पुढच वाचायची उत्सुकता आहे.
छान आहे. लवकर येऊ दे ...
छान आहे. लवकर येऊ दे ...