लोक बिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात OPD ची वेळ सकाळी ९ ते १२ आणि
दुपारी २.३० ते ४.३० अशी असते. प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना सकाळी ६ वाजताच तपासले जाते. दिवसा, रात्री-बेरात्री येणाऱ्या अत्यावस्त रुग्णांना तात्काळ सेवा पण तितक्याच तत्परतेने दिली जाते. दवाखान्यात सध्यातरी घरचेच ४ डॉक्टर्स डॉ.प्रकाश(बाबा)-डॉ.मंदाकिनी(आई) व डॉ.दिगंत(थोरला भाऊ)-डॉ.अनघा(वहिनी) आहेत. हे चौघही M.B.B.S. आहेत. अनघा ही स्त्रीरोग तज्ञ आहे. आई भूल तज्ञ आहे. दवाखान्यात काम करणारे इतर सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. त्यांना दवाखान्यात काम करण्याचा मुळीच अनुभव नव्हता. पण त्यांची दवाखान्यात काम करण्याची तीव्र इच्छा होती. तीव्र इच्छा तिथे मार्ग असतोच. प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळातील कार्यकर्त्यांना आई-बाबांनी दवाखान्यात काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण दिले. हे सर्व दवाखान्याच्या कामात तरबेज झाले आहेत. म्हणून प्रशिक्षित परिचारिकेची उणीव आम्हाला कधीच जाणवली नाही. कारण ध्येयांनी प्रेरित झालेली ही माणसे आम्हाला कार्यकर्ते म्हणून लाभली आहेत. हे आमचे भाग्यच आहे. हे कार्यकर्ते गेली २५-३० वर्षे या दवाखान्यात काम करताहेत. दवाखान्यात काम करणाऱ्या नवीन पिढीला प्रशिक्षण देण्याचे काम आता हेच कार्यकर्ते डॉ.दिगंत आणि डॉ.अनघा यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. धडाडीचे कार्यकर्ते मिळाल्यानेच आमच्या प्रकल्पाचा फायदा या माडिया आणि गोंड आदिवासी जनतेला झाला आहे. आमटे कुटुंबाच्या सोबतीला असलेल्या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी सेवे मुळेच लोक बिरादरी प्रकल्पाचे कार्य जगाला थोडेफार माहिती झाले आहे.
सुमारे २ लाख आदिवासी बांधवांना आज पर्यंत या दवाखान्याचा लाभ मिळाला आहे. सुमारे १००० आदिवासी पाड्यातून, २०० ते २५० किलोमीटर अंतरावरून आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या तीन राज्यातून जवळपास ४५,००० आदिवासी बांधव दरवर्षी निरनिराळ्या सामान्य व दुर्धर अशा आजारावर उपचार करून घेण्यासाठी आमच्या या दवाखान्यात येतात. दरवर्षी ३५०-४०० छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया इथे होतात. दरवर्षी एकदा नागपुरातील तज्ञ डॉक्टरांचे शस्त्रक्रिया शिबीर येथे रोटरी क्लब च्या वतीने आयोजित केले जाते. दिवसेंदिवस हे कार्य वाढतेच आहे. एखादा जास्तीचा डॉक्टर आम्हाला या कामासाठी मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्या साठी आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्याला यश आले नाही. जंगलात जाऊन सेवा करायची ती पण कमी मानधनात हे गणित कदाचित नवीन पिढीला मान्य नाही. सारासार विचार केला तर या पिढीचे मत बरोबर वाटते. महागाई वाढली आहे. मुलांच्या उच्च शिक्षणाला पण बाहेर शहरात खूप खर्च येतो. आजही या दवाखान्याला कुठल्याही प्रकारचे कायमचे अनुदान नाही. दवाखान्याचा खर्च हा दानशूर लोकांच्या देणगीतून केला जातो. त्यामुळे आम्ही सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. कायम स्वरूपी अनुदान दवाखान्याला मिळाले तर सर्वांना चांगले मानधन देता येईल. किंवा या प्रकल्पासाठी चांगला CORPUS FUND जमा झाला तर त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजातून दवाखान्याचा सर्व खर्च करता येईल.
मेंदूचा मलेरिया, क्षय रोग, अनिमिया, कॅन्सर, झाडावरून पडून हात-पाय मोडणे, सर्पदंश, जंगली श्वापदांनी हल्ला करून जखमी केलेले रुग्ण, प्रसूती रुग्ण व खायला नीट पौष्टिक आहार न मिळाल्याने झालेले आजार(वेग-वेगळ्या जीवनसत्वांचा अभाव) अशा अनेक वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले रुग्ण या दवाखान्यात कायम येत असतात.
अशाच एका रुग्णाची कथा:
दिनांक १८ ऑगस्ट २०१०. दुपारचे ३ वाजले होते. दवाखान्याची OPD नुकतीच सुरु झाली होती. तेवढ्यात हेमलकसा येथून ३ किलोमीटर दूर असलेल्या भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण-वाहिका लोक बिरादरीच्या फाटकातून आत येतांना दिसली. नक्कीच कोणीतरी अत्यावस्त रुग्ण असणार याची दवाखान्यात काम करणाऱ्या सर्वांना कल्पना आली. बबन-राजू-प्रवीण हे दवाखान्यातील तीन कार्यकर्ते तातडीने स्ट्रेचर घेऊन त्या रुग्णवाहिके जवळ पोहोचले. एक १५-१६ वर्षाचा तरुण मुलगा जवळपास बेशुद्ध अवस्थेत असलेला त्यांना दिसला. सोबत त्याची आई होती. लगेच त्या मुलाला रुग्णवाहिकेतून काढले आणि स्ट्रेचर वर घेऊन त्याच्यासाठी तयार केलेल्या बेड वर आणून ठेवले. रुग्ण-वाहिका त्याला सोडून लगेचच परत गेली. तो मुलगा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला डोळे उघडता येत नव्हते. बोलता पण येत नव्हते. म्हणून डॉ.दिगंत ने त्याच्या आईला काय झाले म्हणून विचारायला सुरवात केली. त्याची आई खूप रडत होती. माझ्या मुलाला कसेही करून वाचवा अशी गयावया करीत होती. त्याच अवस्थेत तिने काय घडले ते सांगायला सुरवात केली. झारेगुडा या गावचे हे रहिवासी. हेमलकसा पासुन ६ किलोमीटर दूर त्यांचे गाव. मध्ये पामुलगौतमी नावाची नदी आहे. त्यावर पूल नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून नद्या भरून वाहताहेत. एका झाडाच्या खोडापासून बनविलेल्या डोंग्यातून-होडीतून ही नदी ओलांडावी लागते. त्यात जास्त हालचाल केली आणि तोल गेला तर होडी बुडण्याची संभवता असते. पण येथील लोकांना हे रोजचेच. त्या मुलाची आई पुढे सांगू लागली. मुलगा रात्री झोपला तेव्हा चांगला होता. त्याने नीट जेवण केले होते. सकाळी जेव्हा तो नेहमी सारखा उठला नाही म्हणून मी त्याला पाहायला गेली तर तो म्हणाला मला चक्कर येतेय, डोळे जड झाले आहेत आणि घसा दुखतोय. त्याची आई खूप घाबरली. तिचा नवरा आधीच कुठल्यातरी आजाराने मरण पावला होता. तिला हा एकच मुलगा. मग तिने आरडा ओरडा करून गावातील ४-५ लोकांना गोळा केले. त्यांनी त्या मुलाला बाजेवर टाकले आणि बाजेला दोरी बांधून त्याची डोली तयार केली. त्या मुलाला खाटेवर उचलून नदीच्या तीरावर आणले. लाकडाच्या होडीत(नाव) ती खाट व्यवस्थित ठेवली आणि जोरात वाहत्या पाण्यातून होडीचा तोल सांभाळत त्यांनी पामुलगौतमी नदी पार केली. पामुलगौतमी नदी पासुन भामरागड चे ग्रामीण रुग्णालय दीड किलोमीटर आहे. आणि आमचा दवाखाना ४ किलोमीटर. तो दवाखाना जवळ म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या मुलाला ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ वाजताच्या सुमारास भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्याला घसा दुखतो म्हणून गुळण्या करवून घ्या म्हणून सांगितले. खोकल्याचे औषध दिले. जसा जसा वेळ जाऊ लागला तशी त्याची तब्येत अजून बिघडायला लागली. त्याचे बोलणे पूर्णपणे बंद झाले. दुपारी २ च्या सुमारास त्याला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला. आता तो केव्हाही कोमात जाईल किंवा काहीतरी वाईट घडेल याची भीती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना वाटायला लागली. म्हणून लगेच दुपारी ३ वाजता इथे काही वाईट घडू नये म्हणून त्यांनी त्याला रुग्णवाहिकेत टाकून आमच्या दवाखान्यात आणून सोडले. हे सगळे ऐकल्यावर दिगंत-अनघा ला थोडा रागच आला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन मरणासन्न अवस्थेत पोहोचलेले रुग्ण आमच्या दवाखान्यात आणून टाकण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. अशा वेळेस राग येणे साहजिकच होते. नेमके असे कशामुळे झाले हे त्याला आणि त्याच्या आईलाही माहिती नव्हते. पुढे किंचितही वेळ न दवडता बाबा-आई-दिगंत-अनघा यांनी त्या मुलाच्या चेहेऱ्यावर व शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांवरून आणि अनेक वर्षांच्या अनुभवावरून त्याला मण्यार जातीचा साप चावला आहे हे नक्की केले. मण्यार हा आपल्या देशातला सर्वात विषारी सर्प आहे. हा देशात जवळपास सगळी कडे आढळतो. हा साप भक्षाच्या शोधात रात्रीचा बाहेर पडतो. मुंगी चावल्यावर जितकी आग होते तेवढीच आग मण्यार साप चावल्यावर होते. मण्यार चे विषारी दातही अगदी बारीक असतात. त्याच्या चावल्याच्या खुणा पण शरीरावर दिसणे अवघड असते. त्यामुळे न कळत त्याकडे दुर्लक्ष होते. आदिवासींची गावे जंगलात असतात. ते झोपडीत जमिनीवर झोपतात. तसेच त्यांच्या घरात वीज नसते. जंगलात कंद-मुळे गोळा करतांना, शेतात काम करतांना आणि घरी झोपडीत निवांत झोपले असतांना सुद्धा या भागात सर्पदंश होऊ शकतो. सर्पाच्या शरीरावर न कळत पाय पडला, झोपेत हात लागला किंवा त्याला आपण काडीने डीचवून त्रास दिला तरच तो चावतो.
धावपळ सुरु झाली. लगेच त्या मुलाला कृत्रिम प्राणवायू लावला. घश्यात सक्शन यंत्र लावले. सलाईन सुरु केले. आणि सर्वात महत्वाचे सर्व विषारी सापांवर चालणारे एकमेव इंजेक्शन (anti-snake venom) द्यायला सुरवात केली. त्याच्या रक्ताच्या आणि लघवीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. दुपारी ३ ते रात्री १० या काळात तब्बल ११ anti-snake venom त्या मुलाला देण्यात आले. रात्री १० च्या सुमारास त्यामुलाने पहिल्यांदा डोळे उघडले. आणि सर्वांना आनंद झाला. त्याच्या आईच्या दुखाश्रुंची जागा आनंदाश्रूंनी घेतली होती. अजून काही काळ त्याला इथे दवाखान्यात आणण्यास उशीर झाला असता आणि हे इंजेक्शन दिले गेले नसते तर कदाचित त्याला आपले प्राण चुकीच्या उपचारा अभावी नाहक गमवावे लागले असते. २१ तारखेला सकाळी त्याला दवाखान्यातून घरी जायला परवानगी देण्यात आली. माय-लेक आनंदाने आपल्या गावी परतलेत.
एका anti-snake venom ची किंमत रु.५००/- आहे. पण हे औषध म्हणजे सर्पदंशावर रामबाण आहे. अर्थात सापाने किती विष शरीरात सोडले आहे आणि रुग्णाला किती वेळाने हे औषध दिले गेले आहे या वर सर्व अवलंबून असते. जर तो रुग्ण लवकर दवाखान्यात पोहोचला तर वाचतोच. पण या भागात अशी अनेक पाडी आहेत तिथे आजही आपण पोहचू शकत नाही. ६०-७० किलोमीटर चालत त्या रुग्णाला खांद्यावर उचलून आणावे लागते.पोहोचायला २ दिवस कमीतकमी लागतात. अशा गावातील माणसाला जर विषारी सापाने चावा घेतला तर त्या माणसाचे वाचणे जवळपास अशक्य असते. बरेच वेळा दवाखान्यात उचलून आणतांनाच रस्त्यातच त्याचा प्राण गेलेला असतो.
अशा अनेक घटना इकडे घडत असता. 'प्रकाशवाटा' या बाबा (प्रकाश आमटे) च्या पुस्तकात अशा काहीच घटनांचा उल्लेख आहे. पुण्यातील समकालीन प्रकाशनाच्या आग्रहास्तव हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. १९७३ पासुन सुरु झालेल्या या प्रकल्पात अनेक थरारक घटना घडल्यात. त्याची नोंद आई-बाबांनी ठेवली नाही. कारण पुस्तक लिहावे व छापावे अशा गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही. आदिवासी बांधवांना आपला फायदा झाला. त्यांचे दुखः, त्यांच्यावरील होणारा अन्याय कमी करण्यात त्यांना आनंद होता. एका मागून एक असे अनेक आवाहनात्मक प्रसंग रोज पुढे येऊन ठाकायचे. म्हणून अनेक असे प्रसंग विस्मृतीत गेले आहे. जेवढे प्रसंग बाबांना आठवलेत, तेवढे सीमा भानू यांनी 'प्रकाशवाटा' या पुस्तकात शब्दांकित केले आहे.
अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org
Email: aniketamte@gmail.com
हाही भाग चांगला. वाचलंय
हाही भाग चांगला. वाचलंय प्रकाशवाटा. मागच्या भागात जसे जखमी माणसांचे फोटो टाकले आहेत तसेच फोटो त्यातही आहेत.
धन्यवाद अनिकेतजी, नुतन कडुन
धन्यवाद अनिकेतजी,
नुतन कडुन लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा बद्दल बरीच माहिती तिच्या सहा लेखामधुन मिळाली होती. आपण करत असलेले काम खुपच स्तुत्य आहे. भारतात आदिवासी लोक अत्यंत साध्या वैद्यकीय उपचारांपासुन वंचीत आहेत. आपल्या प्रकल्पाच्या मुळे हा लाभ त्यांना मिळतो आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
खरे आहे,आपल्या प्रकल्पाच्या
खरे आहे,आपल्या प्रकल्पाच्या मुळे हा लाभ त्यांना मिळतो आहे! सलाम तुमच्या कार्याला!!
काय लिहु दादा? भयंकर आहे
काय लिहु दादा? भयंकर आहे हे.
पण तुझं लिखाण वाचुन खुप काही करण्याची प्रेरणा मिळते हे नक्की.. धन्सं..
अरे बापरे . वैद्यकीय मदत
अरे बापरे . वैद्यकीय मदत वेळेवर मिळण सुद्धा किती कठीण आहे ते तुमच्या लिखाणावरुन जाणवतय.
अनिकेत... कसा आहेस? मला हे
अनिकेत... कसा आहेस? मला हे वाचून मी काही वर्षापूर्वी मी हेमलकसाला आले होते ती घटना आठवली... प्रकाशभाऊनी एका मुलाला मधमाशी चावल्यावर आणि ते गम्भीर झाल्यावर केलेले ऑपरेशन आणि एका छोट्या मुलाचा वाघाच्या हल्ल्यात तुटलेला हात बसवताना मला दाखवले होते... ते पाहताना मला कसेसेच झाले पण ती मुले मात्र अगदी सहजतेने उपचार घेत होती... भाऊ म्हणाले, बघ म्हणे या मुलाची सहनशक्ती किती आहे...
खरेच तुमच्या कार्याला सलाम.
खरेच तुमच्या कार्याला सलाम. असेच लिहीत जा इथे.
अनिकेतजी, दिवसेंदिवस स्वार्थी
अनिकेतजी,
दिवसेंदिवस स्वार्थी बनत चाललेल्या या जगात
तुमच्या सारखे काही लोक मात्र निस्वार्थीपणे, खुप मोठ्ठ काम करताहेत !
तुमच्या कार्याला सलाम !
अनिकेत.. तुमच्या कार्याबद्दल
अनिकेत.. तुमच्या कार्याबद्दल अजून वाचायला आवडेल.. आम्ही या कार्याला कशाप्रकारे हातभार लावू शकतो??
प्रतीक्रीयान बद्दल सर्वांचे
प्रतीक्रीयान बद्दल सर्वांचे आभार...online core banking ने आपण आर्थिक मदत करू शकता.
Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp
(A project of Maharogi Sewa Samiti, Warora)
1. Online Money transfer [Core Banking] for Lok Biradari Prakalp
(Recurring Funds Account):
Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
(Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Account Number: 20244238823
IFSC: MAHB0001108
All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act. (This account is for the donations below Rs. 5,000/-)
For the receipt - Name of the donor and Address is necessary.
**************************************************************
2. Online Money transfer [Core Banking] for Lok Biradari Prakalp
(Corpus Fund Account):
Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
(Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Account Number: 20244209993
IFSC: MAHB0001108
This account is to generate CORPUS FUND for the project. All donations have 100% exemption under section 35 AC of the Indian Income Tax Act.
(This account is for the donations Rs. 5,000/- and above)
For the receipt - Name of the donor, Address and PAN number is necessary.
**************************************************************
Details of Overseas Funds Transfer to Maharogi Sewa Samiti, Warora, through SWIFT
Beneficiary Name: Maharogi Sewa Samiti, Warora
Beneficiary Address: At & Post: Anandwan, Tah.: Warora,
District: Chandrapur, Pin code: 442914
Maharashtra State, India.
Phone: +91-7176-282034, 282425
Fax: +91-7176-282034
E-mail: lbp@sancharnet.in
aniketamte@gmail.com
Beneficiary Bank Account Number: 048010100301343
Beneficiary Bank Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
Beneficiary Bank Address: AXIS BANK, M. G. House,
Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State, India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699
Beneficiary Bank SWIFT code: AXISINBB048
MAHAROGI SEWA SAMITI,
WARORA has FCRA clearance
(Foreign Contribution Regulation Act): Registration No. 083810006
Please specify that this donation is towards Lok Biradari Prakalp, At: Hemalkasa,
Post: Bhamragad, District: Gadchiroli-442710, Maharashtra State, India.
Ph. +91-7134-220001, M - 9423208802.
Email: aniketamte@gmail.com & hemalkasa1973@gmail.com
Website: www.lokbiradariprakalp.org & www.lbphemalkasa.org.in
**************************************************************
वर काढतोय
वर काढतोय
प्रकाशवाटा मी मागे एकदा वाचलं
प्रकाशवाटा मी मागे एकदा वाचलं होतं,तेव्हा त्यात जखमींचे फोटोज बघुन काळजात चर्रर झालेलं,अजुनही होतं.
माझं एखादी भाजी चिरताना बोट चिरलं तरी चार दिवस दुखतंय म्हणुन कुरवाळायचे,आता ह्या माणसांची जबरदस्त सहनशक्ती बघुन मला स्वतःचीच लाज वाटते.