शेरलॉक होम्सच्या कथा, मालिका जगात सगळीकडे उपलब्ध आहेत - कुणालाही त्या वाचता, पाहाता येऊ शकतात आणि त्यात रंगून जाता येते. शेरलॉक होम्सच्या समग्र कथांचा अनुवाद गजानन जहागिरदार यांनी केलेला आहे आणि जालावरच्या काही हौशी अनुवादकांनीही मस्त अनुवाद केले आहेत. ते इथे, इथे आणि या इथे आणि हे इथे एक वाचायला मिळतील.
म्हणून मी शेरलॉक होम्सच्या कथा भाषांतरीत न करता शेरलॉक होम्सबद्दल, त्याच्या जगाबद्दल लिहू इच्छितो. हे रसग्रहण नाही हेही मागच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. बर्याच मायबोलीकरांनी मागच्या पोस्टला दिलेल्या प्रतिसादात डिटेलमध्ये लिहीयला सांगितले आहे. हे लिखाण होम्सने निर्माण केलेल्या पूर्वसंचितामुळे सगळ्यांना आवडले आहे. काही चतुर वाचकांना शेरलॉकबद्दल लिहीताना मला किती अक्कल पाजळता येईल याची उत्सुकता लागुन राहिली आहे (मला स्वत:ला सुध्दा!!) पण माझी अक्कल मला दिसत नसल्यानं ती किती आहे आणि पाजळताना कितीवेळ जळेल, मध्येच संपली तर काय? याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही. संपेल तेव्हा निश्चितच माझ्या अगोदर ते तुम्हाला कळेल !
शेरलॉक होम्स आणि त्याचे जग हे एका माणसाचे स्वप्न होते जे नंतरच्या बर्याच माणसांना पाहायला आवडते कारण ते सुंदर आहे. तो गूढ वाटणार्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो कारण ते गूढ काल्पनिक आहे आणि ते गूढ नसून सत्यच असल्याचा भास उत्पन्न करणारी जबरदस्त शैली सर ए. सी. डॉयलकडे होती.
जिज्ञासूंना शेरलॉक होम्सच्या जन्माची कथा खुद्द सर आर्थर कॉनन डॉयलच्या तोंडून इथे ऐकायला मिळेल.
शेरलॉक होम्स च्या निर्मात्याला वास्तविक गूढे किती उकलता आली असती हेही एक गूढच आहे. मला आता नेमका संदर्भ आठवत नाही, पण लोकमान्य ते महात्मा या सदानंद मोरे यांच्या ग्रंथात इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपली क्रांतीकारक मंडळी रचत असलेल्या कटांचा (अर्थातच साहेबाच्या नजरेतून), इंडिया हाऊसपासून जवळच असलेल्या २२१बी, बेकर स्ट्रीटला पत्ता नव्हता असा एक टोला हाणलेला पुसटसा आठवतो (मराठी लंडनर्स, थ्रो लाईट प्लीज!) . इथे सदानंद मोरेंचा नेमका रेफरंस पॉईंट काय आहे हे ज्यांच्याकडे लोकमान्य ते महात्माचे खंड आहेत त्यांनी सांगावे.
होम्सच्या कथांचा सूत्रधार असणारा डॉक्टर वॉटसन हे पात्र दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सर डॉयल हे आहेत. तेच खरा शेरलॉक होम्सदेखील आहेत. पण तसा त्यांनी दावा केला असता तर आफत झाली असती (खर्या क्लाएंट्सची रांग लागली असती दारासमोर) कारण होम्सची कथामालिका स्ट्रॅण्डमधून प्रकाशित होत असताना लंडनवासियांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. सर ए.सी. ना होम्स या पात्राच्या निर्मितीची प्रेरणा जोसेफ बेल या वैद्यकिय प्राध्यापकाकडून मिळाली जे त्यांच्या रूग्णांबद्दल फक्त त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या रोगाचे निदान करीत, त्याचे राष्ट्रीयत्व, व्यवसाय, पूर्वेतिहास सांगत.
ही पोस्ट इथेच थांबवतो. पोस्ट छोटी झालीय पण इथे रात्र फार झालीय आणि उद्यापर्यंत ही पोस्ट अशीच इथे राहिली तर ती नंतर मला टाकावी वाटणार नाही.
शेरलॉक होम्सचे जग: भाग ३
Submitted by यशवंत कुलकर्णी on 20 August, 2010 - 17:24
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा