माझा अपघात - सत्यकथा

Submitted by बेफ़िकीर on 19 August, 2010 - 04:58

ही घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे. सत्य आहे.
==========================================

२७ सप्टेंबर, २००५!

कंपनीच्या व्ही.टी. येथील ऑफीसमधून दुपारी दिड वाजताच काम संपवून मी लोकल ट्रेनने वाशीला आलो. वाशी येथील अमोल हॉटेलमधे माझे सामान व गाडी होती. चेक आऊट सकाळीच केलेले होते. हॉटेलवर येऊन दोन घास खाल्ले. साधारणपणे मी कुठेही निघताना एकदा वेळ चेक करतो, पण घड्याळ वापरतच नाही त्यामुळे मोबाईलवर चेक करतो. ३.२६ पी.एम.!

त्यावेळेस माझ्याकडे एक निळी मारुती ८०० होती.

पुण्यात त्यावेळेस सीट बेल्टचा नियम असूनही कडकपणे अमलात येत नसल्याने मुंबईला जायचे असले की लक्षात ठेवावे लागायचे की सीट बेल्ट लावायचा आहे. येताना पार वाशीच्या हॉटेलपर्यंत लावला होता. पण आत्ता कसे काय कुणास ठाऊक लक्षात राहिले नाही. हायवेला लागून दोन चौक पार झाल्यावर लांबवर पोलीस दिसले तेव्हा लक्षात आले, आपण बेल्ट लावलेला नाही. बेल्टची सवय नसल्याने बेल्ट लावणे कटकटीचे वाटायचे. पण पोलीस दिसल्यावर लावला.

पंकज उधासची मैखाना ऐकत ऐकत हायवेला लागलो अन पहिलीच पाटी दिसली.

'एक्स्प्रेस हायवेवर सीट बेल्ट लावणे हा नियम आहे'

त्यावेळेस लक्षात आले. आपण आत्तापर्यंत सीट बेल्ट लावून बसलो होतो अन मुंबई मागे पडल्यामुळे आता नाही लावला तरी चालेल.

गाडी सुसाट सुटलेली होती. बहुतांशी मधल्या लेनमधून तर ओव्हरटेक करताना एक्स्ट्रीम फास्ट लेनमधून जात होतो. माझी आवडत्या सोबतीणी गुडांग गरम आणि क्लासिक माईल्ड्स होत्याच बरोबर! त्यांचा आस्वाद घेत घेत ९० ते १०५ च्या रेंजमधे गाडी चालवत होतो.

नंतर हायवेच्या आजूबाजूचे सौंदर्य मनात भरायला लागले तसा वेग कमी केला. आता मधल्या लेनमधून आरामात ऐंशीच्या वेगाने जात राहायचे ठरवले.

'इमर्जन्सी - ९८२२० ९८२२०'

वगैरे पाट्या मधेमधे दिसत होत्या. पण त्यांची काळजी नव्हती. कारण येतानाच तो नंबर पाठ झाला होता. सोपा नंबर असल्यामुळे! आता बहुतेक तो नंबर ९८३३० ९८३३० असा झाला असावा.

खोपोली!

पहिला टोल नाका यायच्या आधी जे दोन बोगदे आहेत त्यातला पहिला मागे पडला. दुसर्‍या बोगद्यातून जातानाच पुढे लांबवर, बोगद्याच्या कितीतरी बाहेर आणि पुढे, मधल्या लेनमधे एक जीप दिसत होती.

ती जीप फारच हळू जात असावी. कारण माझा स्पीट ९० ते १०० च्या दरम्यान असूनही ती जवळ जवळ येत होती.

मी बोगदा पार करून बाहेर आलो तेव्हा जवळपास सात-आठशे मीटरवरच ती जीप होती. आता त्या जीपच्याही पुढे एक जांभळ्या रंगाची बस चाललेली मला दिसत होती. तीही मधल्याच लेनमधून चालली होती.

आत्तापर्यंतच्याच सवयीप्रमाणे मी मधल्या लेनमधून एक्स्ट्रीम फास्ट लेनमधे आलो. जीपच्या पुढे गेले की पुन्हा मधल्या लेनमधे यावे असा विचार होता.

ओव्हरटेक करण्यासाठी वेग वाढवला. जीपला हॉर्न वगैरे देत आरामात जीपच्या पुढे गेलो. आता चढण सुरू झाली होती. मात्र आधी वाटले त्याहून जीपच्या पुढे असलेली व मधल्याचे लेनमधे असलेली जांभळी व्होल्व्हो जीपपासून अगदीच जवळ होती. म्हणजे तिच्या अन जीपच्या मधे येणे शक्य होते, पण ते जीपला त्रासदायक ठरले असते व मलाही! त्यामुळे वेग तसाच ठेवून मी आता त्या व्होल्व्होच्या पुढे जायला निघालो.

हॉर्न देत होतोच! पण काय झाले ते समजले नाही. बहुधा व्होल्व्होच्याही पुढे कुठलेतरी लहानसे वाहन असावे.

कारण व्होल्व्हो अचानक फास्ट लेनमधे यायला लागली.

हा तो क्षण होता जेव्हा मला इतकेच समजत होते की आपण जाऊन व्होल्व्होवर धडकणार आहोत. प्रचंड भीतीमुळे ब्रेकवर पाय अक्षरशः दाबून धरताच गाडी लहान असल्यामुळे हडबडली. पण वेग शंभरच्या घरात होता. गाडीचा तोल पूर्णपणे गेलेला होता. माझ्या मनगटांनी मी स्टीअरिंग व्हील दाबून धरलेले होते अन अर्थातच ते माझ्या विरुद्ध दिशेला दाबले जात होते. माझी पाठ सीटच्या पाठीवर दाबली गेलेली होती. उजव्या पायाने शक्य तितक्या ताकदीने ब्रेक दाबलेला होता.

होल्व्हो चक्क पुन्हा मधल्या लेनमधे गेलेली होती. माझ्यासमोरची लेन आता पूर्णपणे मोकळी होती. पण मुळात गाडीच हवी तिकडे जाऊ लागलेली होती. वेग कमीच होत नव्हता. चढण असूनही, एका गावावरचा तो पूल असूनही गाडी वाट्टेल तशी जाऊ लागली होती.

त्या क्षणी माझ्या मनात आलेल्या भावना मला आजही लख्ख आठवतात. आपल्याला अपघात होणार आहे आणि चांगलाच मोठा अपघात होणार आहे.

हेही आठवते की मी खरे तर अपघाताची वाट पाहू लागलो होतो. खरच वाट पाहू लागलो होतो. कारण ती भीती इतकी होती की एकदा काय ते होऊन जावे असे वाटू लागले होते. आणि हे सगळे नऊ, दहा सेकंदांमधे घडल्याचेही आठवते.

एक्स्ट्रीम फास्ट लेनच्याही उजवीकडे एक दहा-एक फुटांचा कच्चा रस्ता होता. तो एक पूल होता व पुलाच्या चढणीवर मी होतो. काहीही अंदाज नव्हता की आत्ता आपण नेमके कुठल्या स्पॉटला आहोत. आणि गाडी त्या कच्च्या रस्त्यावर असलेल्या एका पर्पेंडिक्युलर कठड्याला जोरदारपणे धडकली.

आयुष्यात पहिल्यांदाच मी असा जीवाच्या आकांताने ओरडलो असेन! किमान आठ ते दहा किंकाळ्या फोडल्या मी! शरीरात कुठेतरी प्रचंड मोडतोड झालेली आहे इतकेच समजत होते. काय झाले आहे याचा अंदाजही येत नव्हता. जवळपास अर्ध्या मिनिटांनंतर मला ओरडूनच दम लागल्यामुळे मी ओरडायचा थांबलो.

अजूनही धपापत होतो. पाठीच्या कण्यातला सगळा जोर संपलेला होता. स्टीअरिंगवर छाती टेकवून मी काही क्ष्ण तसाच बसलो. तेवढ्यात ओठाशी ओले ओले लागले. नाकातून रक्त आलेले होते. ते आरशात पाहण्यासाठी मागे झालो तर छातीतून दोन ठिकाणी जोरात कळा आल्या. संपूर्ण ताकदीने स्टीअरिंग विरुद्ध दिशेला दाबूनही इंपॅक्टच इतका होता की छाती त्यावर धडकलीच होती. त्यामुळे नाकाची जखम सोडून छातीतील तीव्र वेदना नियंत्रीत करण्यासाठी उजवा हात छातीवर दाबला.

आत्तापर्यंत मला खरे काय झाले आहे ते माहीतच नव्हते. फक्त डाव्या पायातून असह्य वेदना होत होत्या.

आता मी पुन्हा ओरडू लागलो. रडलो कसा नाही ते काही समजत नाही. पण बहुधा एकटाच असल्याने आपोआप धीर आला असावा.

लांबवर व्होल्व्हो वळताना दिसत होती. त्या ड्रायव्हरचा भयानक राग येऊनही मी आत्ता काहीच करू शकत नव्हतो.

आत्ता प्राधान्य होते काहीही करून गाडीतून बाहेर पडण्याला!

त्यामुळे मी गाडीचा माझ्याबाजूचा, म्हणजे उजवीकडचा दरवाजा उघडायला जोर लावला. आणि तेव्हा समजले की तो दरवाजा जाम झालेला आहे. काही केल्या उघडत नाही आहे. त्याच क्षणी गाडीच्या बंपरमधून जोरात 'फस्स' असा आवाज आला आणि प्रचंड धूर बाहेर पडू लागला. मी तो धूर फक्त बघू शकत होतो आणि आणखीनच घाबरू शकत होतो. कारण काहीच करणे मला शक्य नव्हते. असहाय्यतेची जाणीव झाली.

आत्ताच्या आत्ता बायकोला अन दोन जिवश्चकंठश्च मित्रांना फोन करून तिथे बोलावून घ्यावे का असे मनात आले. पण त्याचक्षणी मी ठरवले. जोपर्यंत मी अ‍ॅम्ब्यूलन्समधे बसत नाही तोपर्यंत कुणालाही फोन करायचा नाही. कारण मी असहाय्य आहे म्हंटल्यावर ते अधिक घाबरतील आणि इथे पोचेपर्यंत तेच अर्धमेले होतील.

आई वडिलांना तर बायको अन दोन मित्रांना फोन केल्यावरच करायचे ठरवले. आधीच एकुलता एक, भाऊ ना बहीण! तयत मला अपघात झाला अन मी गाडीत अडकलो आहे म्हंटल्यावर त्यांच्यावर काय ओढवेल याची कल्पना करवत नव्हती. मुख्य म्हणजे त्यातील कुणाचीच मला आत्ता प्रत्यक्ष मदत काहीच होऊ शकणार नव्हती.

तेवढ्यात धूर यायचा थांबला. पुन्हा समोरचे दृष्य स्पष्ट झाले.

गाडीच्या दर्शनी भागाच्या उजव्या बाजूचा चुराडा झालेला होता. माझ्याबाजूचा दरवाजा उघडणे अशक्य होते.

आता डावीकडच्या दरवाज्यातून बाहेर पडावे हा पर्याय राहिलेला होता. म्हणून गीअर लीव्हरच्या पलीकडे टाकण्यासाठी डावा पाय उचलायला गेलो अन...

... खरा प्रॉब्लेम समजला.

डावा पाय उचलताच येत नव्हता. उचलायला जोर लावला की गुडघ्यात मरणप्राय वेदना होत होत्या. म्हणून दोन्ही हातांनी डावा पाय उचलायला गेलो आणि मला जे दृष्य दिसले ते नुसते पाहूनच मी घाबरलो. ते दृष्य पाहण्याची भीती त्या वेदनांपेक्षा अधिक होती हे मला आत्ताही, पाच वर्षांनीही आठवते.

माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याखालील भाग, म्हणजे पोटरी व पाऊल, गुडघ्यातून उलट्या दिशेला वळून वर आलेले होते माझ्या हातांनी उचलले जाण्यामुळे!

ते करतानाही मरणप्राय वेदना झाल्या. तो पाय तसाच पुन्हा ठेवून दिला. माझ्यामते माझ्या डाव्या पायाचा अर्धा भाग कायमचा गेलेला होता आणि आता मी सदासाठी अपंग झालेलो होतो. यापुढील आयुष्य हा एक शाप ठरणार असा विचार माझ्या मनात त्यावेळेस आला. पण आत्ताच्या परिस्थितीतून सुटका व्हायलाच हवी होती.

त्यातच डाव्या पावलातूनही असह्य वेदना होत असल्याचे जाणवले. त्या दिवशी नेमकी माझ्या गाडीत पाण्याची एकही बाटली नव्हती. आता मी क्लासिक माईल्ड्स शोधायला लागलो. बसल्या बसल्याच मी खूप शोध घेतला. मला खरोखर त्या क्षणी सिगरेटची गरज वाटत होती. पण नाही मिळाली.

शेवटचा उपाय म्हणून मी डावा हात डाव्या खिडकीतून बाहेर काढून पंजा जोरजोरात हलवत बसलो.

दुर्दैवाने माझ्या शेजारील लेन ही एक्स्ट्रीम फास्ट लेन होती. दुपारचे साडे चार झालेले होते. त्या लेनमधील वाहने १२० ते १६० च्या वेगात निघून जात होती. कुणाला समजतही नवते की आत्ता आपण पाहिलेल्या अपघाती गाडीत एक माणूस अडकलेला आहे.

त्याच प्रसंगावरील मतला माझ्या सदस्यत्वामधे मी लिहिलेला आहे...

घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी

त्यातच कोल्हापूरहून मेहुण्याचा फोन आला. 'तुझ्याशी नंतर बोलतो' असे त्याला सांगून मी फोन ठेवला. कारण त्याला सांगीतले असते तर त्याने माझ्या बायकोला लगेच सांगीतले असते अन मला नेमका नको तोच गोंधळ झाला असता.

किमान पंचवीस मिनिटे! पंचवीस मिनिटे मी सतत ९८२२० ९८२२० डायल करत होतो अन डावा पंजा गाडीबाहेर काढून हालवत होतो.

मला आठवते. बर्‍याच वेळाने सगळ्यात स्लो लेनमधून एक इंडिका थोडी पुढे जाऊन थांबली अन त्यातून काही माणसे उतरली. एक तरुण जोडपे, एक ड्रायव्हर व एक मध्यमवयीन जोडपे!

धावत सगळे माझ्याकडे आले. मध्यमवयीन जोडपे होते श्री कुलकर्णी व सौ. राजश्री कुलकर्णी! पुण्यातील पाषाण विभागात राहणारे! ते सगळेच मला देवासारखे भेटले. प्यायला पाणी मिळाले व एक पेन कीलर गोळी! पेन कीलर गोळीने काहीच होणार नव्हते हे माहीत असूनही मी ती घेतली. आणि त्या इंडिकाचा ड्रायव्हर अचानक म्हणाला..

"चलो, चले क्या हम अभी.. इन लोगोंको पहुचानेका है पूना जल्दी"

हसाल कदाचित वाचणारे! पण त्या क्षणी मात्र मी रडत अक्षरशः हात जोडले व त्यांना म्हणालो की अ‍ॅम्ब्युलन्स येईपर्यंत थांबा..

राजश्री कुलकर्णी व त्यांचे पती 'थांबायला हवे' असे म्हणाल्याने सगळ्यांनाच थांबायला लागले. माझी परिस्थितीही एकट्याला सोडून जाण्यासारखी नव्हतीच!

तेवढ्यात ही माणसे थांबलेली पाहून आणखीन एक गाडी थांबली. मला आज त्यातील कुणालाही ओळखता येणार नाही. पण त्यातल्या एका माणसाला मी म्हणालो..

'मला बाहेर काढा हो.. सहन होत नाहीये हे दुखणे..'

त्याने डावा दरवाजा उघडला अन माझा डावा पाय हातात घेताच मी खच्चून ओरडलो. त्याने तो लगेच सोडला. मग मला डाव्या पावलातल्या वेदनाही असह्य झाल्या. त्याला मी डावा बूट काढायची विनंती केली. तो बूट काढताना पोटरीपासूनचा पाय पुन्हा वर उचलला गेला अन तो माणूस मला म्हणाला..

'तुमचा पाय तुटलाय हो..'

मला त्या वाक्याची भीती वाटलेली मी त्याला दाखवलीच नाही. कारण मला ते माहीत होतं! आता फक्त पुढचं आयुष्य कसं जाणार आहे इतकीच काळजी लागलेली होती.

कोणीतरी ९८२२० ९८२२० ला फोन लावायला सुरुवात केली. मीही माझ्याकडून तोच प्रयत्न करत होतो. कुणालाच तो नंबर लागत नव्हता. शेवटी मला लागला. मला अपघाताचे स्थळ निश्चीत माहीत नसले तर मुंबईहून येताना पहिल्या टोल नाक्याच्या काहीसे आधी अपघात झालेला आहे एवढे मी सांगीतले.

आता जमलेल्या लोकांच्या चौकश्या सुरू झाल्या. मी 'सहारा' कंपनीच्या व्होल्व्होने दाबले इतकेच सांगू शकत होतो.

दहा मिनिटांनी अ‍ॅम्ब्युलन्स आली. मला गाडीतून काढताना, माझ्या पँटचा डावा संपूर्ण पाय फाडून काढताना आणि माझा डावा पाय लाकडी आधारावर बांधताना मी गुरासारखा ओरडत होतो. त्यावेळेस माझ्याकडे लॅपटॉप नव्हता. फक्त एक बॅग होती ती त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्समधे टाकली. मी कुणालातरी माझी गाडी लॉक करायला सांगीतली. त्याने ती लॉक करून किल्ली माझ्याकडे दिली.

मी राजश्री कुलकर्णींचा मोबाईल नंबर फक्त घेतला. माझे त्यांचे आजही घरगुती स्नेहसंबंध आहेत व अपघातामुळे मला एक बहीण मिळालेली आहे.

अ‍ॅम्ब्युलन्स चालू झाल्या क्षणी मी पहिला फोन दिल्लीला बॉसला केला. त्या पाठोपाठ बायको, नंतर मुजुमदार व मकरंद या मित्रांना व त्यानंतर आई वडिलांना! मला निगडीच्या लोकमान्य हॉस्पीटलमधे नेण्यात येत आहे असे सांगीतले. ते सगळेच निघाले.

अ‍ॅब्युलन्स टोलनाक्याच्या गतीरोधकावर खाडखाड करत गेली अन मी कानठळ्या बसवणार्‍या आवाजात ओरडलो. पाय तर राहूच देत, छातीतही असह्य वेदना होत होत्या.

बायपासला गाडीने एक्स्प्रेस हायवे सोडला अन अत्यंत खराब रस्त्याने ती जाऊ लागली. शेवटी मी ड्रायव्हरवर अक्षरशः ओरडलो तेव्हा त्याने गाडी हळू केली.

लोकमान्य हॉस्पीटलमधे 'ऑल डिअर वन्स' आलेले होते. आई रडत होती. मुजुमदार अन मकरंदचे चेहरे केविलवाणे झाले होते. मोहन नावाचा माझा चुलतभाऊ रडवेला झाला होता. प्रसाद नावाचा माझा अन बायकोचा मित्र मला धीर देत होता. फक्त बाबा अन बायको धीर धरून होते.

लोकमान्य हॉस्पीटल निगडी येथे मला अत्यंत वाईट अनुभव आला. एक तर आधीच्या लाकडी आधारातून पाय काढून त्याला जुजबी प्लॅस्टर लावताना किमान पाच ते सहा जणांनी माझा पाय हवा तसा हलवला. मी अक्षरशः बोंबलत होतो. त्यानंतर तेथील ट्रीटमेंट मला हलगर्जीची व दिरंगाईची वाटली. सात वगैरे वाजले असावेत. बायको अन मित्र कागदपत्रे करण्याच्या मागे होते. तेवढ्यात राजश्री कुलकर्णींचा फोन आला तो मी बायकोकडे देऊन तिला बोलायला सांगीतले.

आठ वाजता माझे स्वतःचेच तेथील प्रमुख डॉक्टरांशी जोरदार भांडण झाले. तपासणीसाठी त्यांनी इतरांना बाहेर जायला सांगीतले होते अन मला काहीतरी खुळचट प्रश्न विचारत होते. किती स्पीड होता, इन्शुअरन्स आहे का वगैरे!

बायको आत आल्या आल्या मी तिला 'मला ताबडतोब पुण्यातल्या एखाद्या हॉस्पीटलला हलव' म्हणून सांगीतले. त्यावर तेथील डॉक्टरांनी 'यांच्या डाव्या गुडघ्याचा चुराडा झालेला आहे व हाडाची पावडर रक्तप्रवाहाबरोबर हार्टमधे गेल्यास हे दगावू शकतील म्हणून हलवू नका' असा दम भरला.

मग पुण्यातील नामांकित अस्थितज्ञ डॉ. सचित तपस्वींना आम्ही फोन लावला. त्यांनी कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्समधून मला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन यायला सांगीतले. त्यांच्यापुढे काही लोकमान्यचे डॉक्टर बोलेनात. मग वरात कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्समधून दीनानाथला आली.

तिसर्‍या दिवशी माझी साडे सहा तासांची सर्जरी झाली. एक मोठा स्टील रॉड पायात बसवला जो आजही आहे. कंबरेच्या हाडाचा एक तुकडा काढून गुडघ्यापाशी बसवला जेणेकरून हाडे जुळून येणे लवकर व्हावे.

रिहॅबिलिटेशन सेंटरमधे व्यायाम सुरू झाला आठव्या दिवशी! असह्य कळा येत होत्या.

घरी आल्यावर बाबांनी माझ्याकडून रोज पाच वेळा डॉक्टरने सांगीतलेले व्यायाम प्रकार तब्बल तीन महिने करून घेतले. हळूहळू मी वॉकरवरून स्टीकवर आलो. आणि फेब्रूवारी २००६ मधे...

कित्येक महिन्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहिलो...

आजही दिवसातून कितीतरी वेळा पाय दुखतो. तीन, चार मिनिटे उभे राहिले किंवा थोडेसे चालले तरी प्रचंड दुखायला लागतो. मांडी घालता येत नाही. पळता येत नाही.

पण... तेवढे सोडले तर एकदम ठणठणीत...

१९९९ साली ज्युबिलंट या कंपनीत मी जॉईन झालेलो होतो तेव्हापासून २००६ डिसेंबरपर्यंत मी घरातूनच काम करायचो. पण जानेवारी २००७ मधे हडपसर येथील ऑफीसमधे मला बसायला सांगीतले. येथे मी एकटाच अन एक ऑफिस क्लर्क! त्यामुळे एकटा असताना बर्‍याचदा अपघाताची आठवण यायची. थोडक्यात निभावले, नाहीतर खलासच झालो असतो असे वाटायचे.

त्यातूनच हळूहळू असे वाटायला लागले की मृत्यू, जो येणारच आहे, आयुष्य म्हणजे जणू त्याच मृत्यूची वाट पाहण्याचा कार्यक्रम आहे.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात कधीतरी दोन, चार कविता केलेला मी...

ऑफीसमधे .. 'आलास तू उशीरा' ही 'मी तुझी कधीची वाट पाहात आहे' अशा अर्थाची मृत्यूला उद्देशून असलेली कविता रचली. त्या पाठोपाठ तिला चाल लावली. पाठोपाठ अनेक कविता रचण्याचा सपाटा लावला. जवळपास प्रत्येक कवितेत मृत्यूवर एक ओळ, द्विपदी असायचीच!

मग कवितेतच बुडून गेलो. कार्यक्रम करू लागलो. पुस्तके आली. बरेच काय काय!

मधे माझ्या बढतीनिमित्त २००८ मधे बायकोने सगळे नातेवाईक, मित्र यांना बोलवून एक सरप्राईझ पार्टी दिली होती. मला पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर समजले की ही आपल्यासाठी दिलेली पार्टी आहे. राजश्री कुलकर्णी व त्यांचे मिस्टरही त्या पार्टीला आलेले होते.

माझ्या दोन कविता सगळ्यांनी मला सादर करायला सांगीतल्या. 'शायरी' ही कविता सादर केल्यानंतर 'मीही तयार आहे' ही कविता सादर करताना, किंबहुना त्यातील शेवटची द्विपदी सादर करताना राजश्री कुलकर्णी गालातल्या गालात हासत होत्या. कविता संपल्यावर त्या सगळ्यांना मिश्कीलपणे म्हणाल्या...

"आत्ता अगदी म्हणतायत असं.. त्या दिवशी चेहरा पाहायला हवा होता..."

ती द्विपदी होती...

'मृत्यूस सांग माझ्या... रेंगाळला फुका तो..
मी भेटण्यास त्याला.. कधिचा तयार आहे'

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

सर तुम्ही ग्रेट आहात. जिवावर बेतले असताना कुटुंबाचा विचार केलात.
घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी
या ओळी मनात घर करुन जातात

मंजिरी सोमण व अवि,

मनःपुर्वक धन्यवाद!

(यानंतरच बेफिकीर झालो - हा हा हा! असे काही नाही. माणूस असतो तसाच असणार ना?? मी मुळातच पैसे उधळणे, सवयी - म्हणजे व्यसने, याबाबत बेफिकीर आहे. पण इतरांबाबत नाही असे मला वाटते.

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
या परिस्थितीत कुणिही पुर्ण कोलमडुन गेलं असतं
पण तुम्ही ताठ आणि धीराने पुन्हा उभे राहिलात ...

(पण हा अपघात तुमच्या वाढदिवशी झाला ?)

रिक्षा म्हणून नव्हे Happy तर साधारण याच क्षणी सहा वर्षापुर्वी हे घडले म्हणून पुन्हा वर आणावेसे वाटले. माफी!

भयंकर वर्णन !!! वाचून एकदम काळीजच हेलावले.
डावा पाय निखळला हे वाचून विन्डोच बंद्च केली. पण पुढे काय झाले असेल ते वाचायला परत open केले.
खरी story पुढे आहे हे कळले. खरच मानले बुवा तुम्हाला.
अपघात होणे आणि त्यातुन शरिर आणि मन देखिल सावरणे यासाठी "जीगर" लागते.

खरच GREAT!!!

वाचताना अंगावर शहारेच येत होते.
तुमच्या जिद्दीला सलाम.......
तुम्हाला मदत करणार्‍या सर्व मंडळींना परमेश्वर सुखासमाधानात ठेवो.
६ व्या पुनर्जन्मवाढदिवसासाठी अभिनंदन..............

बापरे, वाचताना शहारेच आले अंगावर...
अगदी मृत्यूच्या दारातून परत आलात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !!
जियो बेफि़कीर !!!

बेफिकिर,

>> "आत्ता अगदी म्हणतायत असं.. त्या दिवशी चेहरा पाहायला हवा होता..."

वेदनेमुळे चेहर्‍यावर काय भाव येतील ते सांगता येत नाही. Happy तुम्ही आधीपासूनच बेफिकीर असावेत. नाहीतर एव्हढं अचूक वर्णन करणं जमलं नसतं. हा आपला माझा कयास बरंका!

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक ओळीला श्वास कोंडत होता, जीव गुदमरत होता.... डोळे कधी भरून वाहू लागले कळालंच नाही...
आता घसा निव्वळ कोरडा आहे.... आणि डोक्यात मख्ख शांतता.

आपल्यातल्या शाब्दीक चकमकी आठवल्या...ते सगळं जागेवर विसरण्याचा तुमचा स्वभाव आणि एकूणच स्वभावातल्या बेफीकिरीमागचा माणूस आज कळाला...हे अश्रू त्यासाठी होते..

यू आर ग्रेट!

आई म्हणाली काय झालंरे ?... मी म्हणालो एका मित्राचा अपघात झाला.. दादांसारखा...आणि ती ही रडली...

एखाद्या व्यक्तीच लिखाण वाचतांना गुंग व्हायला होत… प्रत्येकच भावना इतक्या उत्कट पणे कुणी कसकाय मांडू शकतात हा प्रश्न पडतो इतक सुंदर लिखाण करणाऱ्या माणसान आयुष्याच खूप कुरूप रूप अनुभवल आहे हे वाचूनही कसनुसं व्हायला होतं…. बेफिकीर तुमच्या जीवन जगण्याच्या प्रतिभेला म्हणूनच सलाम ….

फक्त बाबा अन बायको धीर धरून होत............................

खूप प्रयत्न केला पण पुढे वाचवत नाहीये ...मी नाही वाचणार

साद जेव्हा घातली मी थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे आपले नाही कुणी

बेफिकीरीतल्या माझ्या सर्वाधिक आवडत्या शेरांपैकी एक ...त्यामागचा ट्रिगर आज कळाला ..'

..जाम तंतरली आहे

मुंबई-पुणे एकदाच गेलो होतो तेही वोल्व्होने. समोरच्या सीटवर बसुन २-४ अपघात बघितले. वोल्व्होचा वेग बघुन एसीतही घाम फुटला होता. तुमचं काय झालं असेल, याची कल्पनासुद्धा नाही करु शकत.
देव पाठीशी आहे.

थरारक अशा अनुभवातून गेलात आपण, पुन:जन्मच झाला आपला !

साक्षात परमेश्वर होता आपल्या सोबत, १०० %, म्हणून आणि म्हणूनच राजश्री ताईंचे येणे, निगडीच्या हॉस्पिटलमधुन दीनानाथमध्ये जाणे, योग्य ट्रीटमेंट होणे या घटनांची श्रुंखला घडत गेली. एक संकट आले की त्यातून बाहेर पडण्याची सोयही तो करुनच ठेवतो ते तुमच्या अनुभवातुन पुन्हा जाणवले.

आपणास जीवनदान देणार्या त्या करुणाघनाचे शतशः आभार,आपल्या धैर्याला सलाम, वाचत असताना अक्षरक्षः डोळे पाणावले.....

आजारी असलेल्या बाळाला कडू औषध देत असताना आई जशी मधाचे बोट चाटवते, तसे देवाने तुम्हाला हा काव्यप्रतिभेचा मधुरिमा बहाल केला आहे.

नुकतेच आपल्या साहित्याला पुरस्कार मिळाल्याचेही वाचण्यात आले, त्याबद्दलही अभिनंदन!!

बेफिकीर तुम्ही कमाल आहात. एव्हढ्या मोठ्या अपघातातून आणि मृत्युच्या दारातून परत आल्यावर तुम्ही बेफ़ीकिर नावाने ID काढलात ह्यात नवल नाही. पण एकूणच जीवन-मृत्यूकडे बघायचा 'बेफिकीर' दृष्टीकोन आणि त्याचबरोबर इतर लेखांमधून आणि लेखांवरच्या प्रतिक्रियांवरून दिसणारी तुमची 'फिकीर' मला खूप भावली. Hats off To you

आईग......
ह्या सगळ्यातून तुम्हि ज्या पद्दतीने सावरलात आणि त्या वेळेला जो धीर दाखवलात ते अगदि कौतुकास्पद.

बापरे! वाचताना काटा आला अंगावर. तुमची सत्यकथा एखाद्या भयकथेपेक्षा भयानक आहे. सलाम तुमच्या जिद्दीला.

बापरे..खुपच भयंकर..
बास आता ह्या मुंबई पुणे जलदगति मार्गावर थोडे सांभाळून गाडी चालवणे आहे.. हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे हे नक्कीच. इतके सारखे ऐकिवात येतंच...पण असे अनुभव म्हणजे सगळ्यांना हलवून टाकणारे...

शुभेच्छा...

वर्णन वाचून व परिस्थिती इमॅजिन करुन अंगावर काटा/शहारा आला.
कशा काय सहन केल्यात वेदना?
आईबापाची पुण्याई अन देवदयेनेच वाचलात, व तसे हातीपायी धड राहिलात. थोड देवादिकाचे कायमस्वरुपी करीत जावा

मी पण आज पहिल्यांदाच वाचला लेख. अपघाताचा प्रसंग आणि पायाचा ब्रेकवरचा जोर, स्टियरिंग घट्ट पकडलेले तुम्ही... सगळं डोळ्यासमोर उभं राहिल . डाव्या पायाचं वर्णन अगदी अंगावर आलं.
खरंच सहिसलामत बचावलात. शतायुषी भव.

अरे देवा!
Hats off to you for the courage and positive attitude that you showed while facing the accident and while recuperating...truly inspirational!!!
मिस्टर व मिसेस कुलकर्णी यांचेही कौतुक.

Pages