गुरुवारी मायबोलीकर किरुचा मेसेज.. "सॉरी यार.. मला नाही जमणार" आधीच त्याने त्याच्या दोन मित्रांची नावे रद्द केली होती.. आता तीन गळाले.. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मायबोलीकर योगेश२४ चा फोन.. "उद्या कामावर बोलवलेय सो येत नाही आम्ही.. " झाले.. तो नि त्याचे तीन मित्र असे आणखीन चारजण कटाप.. रात्री उशीरा अजुन एक मायबोलीकर 'योगायोग' चा फोन.. "सॉरी रे.. नाही जमणार".. कालपर्यंत 'आम्ही नक्की' म्हणणारे बारा मायबोलीकर्स होते.. पण अचानक कॅन्सलेशन्सचे अनपेक्षित कॉल्स नि मेसेज आले नि मायबोलीकरांची संख्या झाली 'नौ'.. थोडी निराशा झाली खरी.. पण उर्वरीत मायबोलीवीरचा उत्साह मात्र काही कमी झाला नव्हता.. निमित्त होते शनिवारी १४ ऑगस्ट रोजी 'ट्रेकमेटस' या ग्रुपने आयोजित केलेला ' वॉटरफॉल रॅपलिंग इवेंट'.. स्थळ होते.. मुंबई नाशिक रोडवरील 'विही' नावाच्या गावाकडील 'विही' धबधबा ! उंची तब्बल १२० फूट !! खळखळाट करत १२० फुट उंचीच्या कड्यावरुन खाली झेप घेणार्या धबधबा नि त्याच धबधब्याच्या पाण्यासंगे दोरीच्या मदतीने वाटचाल करत आपण खाली उतरायचे असा हा धाडसी, थरारक खेळ.. पण तितकाच सुरक्षितदेखील.. मध्यम ते कठीण श्रेणीच्या ढाक बहिरीला शुर मायबोलीवीर जाउन आले होते... नंतर "कॅनियॉन व्हॅली" ला उन्हाळी वर्षाविहाराचा ट्रेक केला होता.. नि आता पुन्हा एका धाडसी खेळाच्या निमित्ताने मायबोलीकर एकत्र आले होते.. पण यावेळी मायबोलीवीरांची संख्याही वाढली.. म्हणाल तर शूर मायबोलीकर्स रिटर्न्स.. !
सगळ्या उत्साही मायबोलीकरांना दोन आठवड्यापुर्वीच मेल पाठवुन नावे कंफर्म करायला सांगितली होती.. पण शुक्रवार संपेपर्यंत नऊ जणांचीच नावे उरली.. शनिवारी पहाटे 'देवनिनाद' हा आणखीन एक ऐनवेळी ठरलेला टांगारु... मायबोली नि टांगारु हे गणित कधीच सुटणारे नाही..
सकाळी दादरहुन ठिक सहा वाजता बस सुटणार होती.. नि ही बस सुटेपर्यंत सहभागी होणार्या मायबोलीकरांच्या अंतिम यादीत खालील शुरवीरांचा समावेश होता..
१. इंद्रा(१५ ऑगस्टच्या एक दिवस आधीच होम मिनीस्टरपासुन तात्पुरते स्वातंत्र्य मिळावणारा..) ,
२.गिरीविहार (आदल्या रात्री हैदराबादहुन कंपनीचे काम फत्ते करुन येणारा..),
३. विन्या ('फक्त वीस फुटांची रॅपलिंग आहे' असे आपल्या होम मिनीस्टरला समजावून परवानगी घेणारा !!! ),
४.सम्या (खास रॅपलिंगसाठी पुण्याहुन एक दिवस अगोदरच मुंबईत उतरलेला..),
५. आनंदमैत्री (लग्नानंतर जरा जास्तच स्वातंत्र्य उपभोगताना दिसणारा..!! ),
६. नविन ( 'आज जरा बाहेर फिरायला जातो' असे म्हणत होम मिनीस्टरला गंडवणारा.. !!)
७. कौतुक ('फु बाई फू' च्या सेटवरुन... रॅपलिंगला येणारा..)
८. यो रॉक्स ( 'होम मिनीस्टर'चा पत्ता नाही म्हणून अजुनही स्वातंत्र्य उपभोगणारा..)
९. सुन्या ( 'आपले 'अहो' ट्रेकपिडीत आहेत ' हे कळुन चुकल्याने होम मिनीस्टरकडुन सवलत मिळणारा)
याव्यतिरीक्त केदार नि गिरीश जोशी हे दोन माझे मित्रही मायबोलीकरांच्या टोळीत सहभागी होणार होते..
वरीलपैंकी सुन्या हा ट्रेकमेटसतर्फे co-ordinator चे काम करणार असल्याने तो आम्हाला थेट विहीलाच भेटणार होता.. तर गिरीविहार नि आनंदमैत्री ठाण्याला बसमध्ये चढणार होते... ट्रेकमेटसवाले मिळुन बसमधली संख्या २५-३० च्या आसपास होती.. मुंबईहुन ३० जण, नाशिकहुन दहा जण असे मिळुन जवळपास ४०-४५ जणांचा सहभाग होता..
आमची दादरला भेटण्याची वेळ सकाळी सहा वाजता होती.. पण 'हा येतो तो येतो' करेपर्यंत सात- साडेसातच्या सुमारास बस निघाली.. अर्थातच सव्वासातची वेळे दिलेले ठाणेकर आमची वाट बघत बसले होते.. तासभरातच बस ठाण्याला पोहोचली.. सगळे आले. हजेरी झाली.. नि 'गणपती बाप्पा मोरया' चा गजर करत आम्ही प्रयाण केले.. मायबोलीचे टिशर्ट मिरवणारे विन्या, सम्या, मैत्री, इंद्रा नि गिरीविहार यामुळे जणू वविच्या बसचेच स्वरुप आले होते.. बस सुरु झाली नि आमच्या टोळीने प्रथेनुसार भक्तीगीताने सुरवात करत धमालगाण्यांच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला.. आमच्या आवाज बघून बसमधील इतर ट्रेकमेटस चिंताग्रस्त नि तितकेच चकीत झाले नसतील तर नवलच.. नि आमची गाण्यांची कॅसेट सुरु झाली की काही थांबत नाही हे त्यांना माहित नव्हते.. काही घोषणा करायची म्हटली तरी बसमधील co-ordinators ना बरेच कष्ट पडत होते.. कशाला.. तर आमच्या गाण्यांना pause करायला.. ! आमची गाणी पॉज करुन चालत्या बसमध्येच ओळखपरेड झाली.. ओळखपरेडमध्ये कळले बरेचजण पहिल्यांदाच रॅपलिंग करणार आहेत.. साहाजिकच विन्या, सम्या नि नविन हे खूपच खूष झाले.. ओळखपरेड संपली नि आम्ही पुन्हा 'प्ले' बटन सुरु केले.. बसमधील बरेचसे ट्रेकमेटस मराठीच होते पण काही अमराठीदेखील होते.. त्यामुळे साहाजिकच हिंदी गाणीदेखील म्हणावीत असा आग्रह केला गेला.. पण आमचे मराठीपण भलतेच जागृत झाले असल्याने शेवटी हिंदी वि. मराठी अशी अंताक्षरी खेळावी असा तह करण्यात आला.. आमच्यासाठी आव्हान कठीण होते पण आनंदमैत्री, विन्यासारखे पठ्ठे असल्याने चिंता नव्हती.. उलट समोरच्या गटाला टेंशन नि संयमाची गरज होती कारण त्यांचे गाणे एकदोन वाक्यात संपत होते.. तर आमचे गाणे सुरु झाले की ते लोक्स 'आता पुरे.. पुढचे अक्षर द्या' म्हणेपर्यंत काही संपत नव्हते.. इतकेच नव्हे तर मराठी गाण्यांचा खजिना किती मोठा आहे या गोष्टीचादेखील सर्वांना साक्षात्कार झाला.. ट्रेकमेटसमधील माझे काहि मित्र तर मला येउन सांगु लागले.. अरे काय भारी लोक्स आहात तुम्ही.. !
कसारा घाटाच्या अलिकडे चहापाण्यासाठी गाडी थांबवण्यात आली.. तिकडेच कळले गाडीत बिघाड झाला आहे.. वेळ जाणार होता.. नाश्तापाण्याची सोय ट्रेकमेटसने केली होती पण जेवण प्रत्येकाने घेउन यायचे असे सांगितले होते.. तरीदेखील आमच्या टोळीत विन्या, इंद्रा नि गिरीविहार वगळता कोणीच काही आणले नव्हते.. तशी म्हणा विन्याने सोय केली होती.. तिकडे धबधब्यापाशी शेकोटी करुन बटाटे, कांदे इति भाजुन खायची त्याची योजना होती.. त्यासाठी लागणारी सळई, मसाला लावुनच आणलेले बटाटे, कांदे, टोमॅटो इति साहित्य घेउनच आला होता.. वर जाळ करण्यासाठी कोळसे आणण्याचे काम सम्याला दिले होते ! फक्त आणले नव्हते ते रॉकेल.. नि तिकडे झोपडी मिळेल या आशेवर हा सारा प्लॅन होता.. नाहितर पावसात बोंबला ! आता इकडे वाया जाणारा वेळ सत्कारणी लावावा म्हणुन आम्ही जवळच असणार्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल घेउन आलो.. ! आमचे खाण्याचे टेन्शन आम्ही तात्पुरते तरी मिटवले होते..
नशिबाने तासभरातच गाडी सुरु झाली नि आम्ही अर्ध्यातासातच 'विही' गावात प्रवेश केला.. दुतर्फा असणार्या हिरवळीतून आम्ही चिखलवाट तुडवत पुढे निघालो.. सभोवताली वातावरणदेखील मस्त होते.. दहा पंधरा मिनीटातच आमच्या कानावर खळखळाट ऐकु आला.. नि काहि क्षणातच धबधब्याच्या ठिकाणी येउन पोहोचलो..
आम्हाला बसमध्येच रॅपलिंगसाठी क्रमांक देण्यात आले होते.. त्या क्रमांकानुसार तीन-तीन जण उतरायचे ठरले होते.. आम्ही पोहोचल्या लागलीच तयारीसाठी सुरवात झाली.. सर्वप्रथम तीन देवीया होत्या.. त्यानंतर मी, इंद्रा नि विन्या अशी क्रमवारी होती.. मग मागोमाग एकेक मायबोलीकर्सच उतरणार होते.. त्यामुळे पटकन आटपुन जेवण बनवण्याचा प्लॅन आम्ही लोकांनी शिजवला..
आमच्यात इंद्रा नि मला "चड्डी" "हॅल्मेट" "ग्लोव्ज" इत्यादी रॅपलिंगसाठी आवश्यक अशी वस्त्रे देण्यात आली जी आम्हाला काहि घालता येत नव्हती..
अर्थातच मेकअपसाठी ट्रेकमेटसचे लिडर होतेच.. पण काही म्हणा ती वस्त्रे परिधान केली की एक आगळाच जोश येतो.. आम्ही सगळे तिथुन खाली उतरलो जिथे कड्यावरुन पाणी खाली कोसळत होते.. बर त्या कड्यापर्यंत जाण्याची चिखलवाट देखील चांगलीच निसरडी बनली होती.. साहाजिकच इथेच काहिजणांना आपले बुट कितपत साथ देतील याची जाणीव झाली.. तर काहिजण इकडेच घसरतोय मग धबधब्यात काय असा प्रश्ण पडला..
खाली उतरलो.. इथेच एक अंदाजे दहापंधरा फुटाचा छोटा पण अतिशय सुंदर असा धबधबा होता.
त्याच पाण्याचा प्रवाह पुढे या कड्यावरुन कोसळणार होता.. पण सध्या आमचे त्या धबधब्याकडे दुर्लक्ष करणे भाग होते.. कारण इथे रॅपलिंगवरच सर्वांनी लक्ष एकाग्रीत केले होते.. त्या तीन देवींनी चांगलेच टेंशन घेतले होते..
पाण्याचा जोरकस प्रवाह नि उंच कडा हे पाहुन तर टरकल्याच.. पण 'डरकेना नही, हम है तुम्हारे पिछे' म्हणत आम्ही पोकळ प्रोत्साहन देउ लागलो.. इकडे इंद्रा नि विन्याला 'आपण संसारी आहोत' याची आठवण झाली.. विन्याने तर आपल्या बायकोला जेमतेम एकमजली धबधबा सांगितले होते.. ! आता ती फोटो बघेल तेव्हा आपली काही खैर नाही हे विन्याला पक्के ठाउक झाले..
''उतरताना पाय घसरणार का..'' ''काटकोनात उलटे चालताना चुकुन आपण पुर्ण पलटी तर नाही ना होणार.. " अशा अनेक प्रश्णांचे वादळ प्रथमच रॅपलिंग करणार्या या शुरविरांच्या मनात उभे राहिले.. गिरीविहार नि मला अनुभव होता.. सुन्या तर अगदी मन लावुन तिथे काम करण्यात मग्न होता..
सुन्या दि ग्रेट !
तसे बघितले तर धबधब्याचा आकारमानच असा विशाल होता की फ्रेशरलोकांना धडकी भरलीच समजा..
त्या तीन देवीयांची उतरतानाची धडपड बघुन शुरवीरांचे टेंशन नक्कीच वाढले होते.. पण उत्साह कायम होता.. धबधब्यातून उतरण्याची माझी देखील पहिलीच वेळ होती.. दोन पायांमध्ये समान अंतर ठेवुन काटकोनात मागे वाकायचे नि उतरायला सुरवात करायची अशी पद्धत होती.. कितीही खोल दरी जरी असली तरी पुर्णतः सुरक्षितरित्या केले जाणारे हे धाडस होते.. फक्त तुमचा आत्मविश्वास नि उतरण्याची पद्धत यांवर सारे अवलंबुन असते.. पण इथे गंमत अशी होती की बर्याच जणांचे पाय जमिनीवर उभेच राहत नव्हते.. त्यातच पाण्याचा जोरकस प्रवाह.. त्यामुळे झिप झॅप घसरुन पडण्याची शक्यता होती..
------------
( ये तो फिसल गयी..)
यांच्यानंतर माझा नि इंद्राचा नंबर आला.. प्रारंभी तसे सोप्पे नि मस्तच वाटु लागले.. सुरवातीचा भाग उतरणीचा होता पण खरी कसोटी कड्यावरुन थेट खाली सरकताना होती.. एकदा का कडा पार केला की मग वरती असणारे co-ordinators च्या नजरेआड होणार होते.. मग तिकडे फक्त तुम्ही नि धबधबाच असणार होता.. त्या धबब्याच्या मध्य भागी पोहोचलो नि मग सुरु झाला एक विलक्षण अनुभव.. तो अनुभव खरेतर शब्दांकन करणे कठीण आहे..
डोक्यावरील हॅल्मेटवर टपटप पडणारे धबधब्याचे टपोरे थेंब नि त्याचा आवाज... कोसळत्या पाण्याने घातलेला विळखा... साहाजिकच डोळ्यातही अधुनमधून जाणारे पाणी.. वरती ढुंकुन बघायलादेखील न मिळणारी उसंत .. नि खाली अधुनमधून वाकुन पाहिले तरीही खोलीचा न येणारा अंदाज.. चोहीकडे पाण्याचा फवारा नि फवाराच.. फक्त हातातील दोरीचेच भान राहिले होते..
इतका सुंदर अनुभव घेत पाय धबधब्याच्या पायथ्याशी कधी लागले ते कळलेच नाही.. इथेही धड उभे राहणे कठीणच होते.. छातीपर्यंत पाणी होते.. तिथेच बाजुला दोरी होती तिला पकडुन त्या पाण्यातून बाहेर आलो नि वर डोकावुन पाहिले.. तेव्हा अविश्वसनीय अशा वाटचालीबद्दल अभिमान दाटुन आला.. ! ! माझ्या पाठोपाठ इंद्राही खाली उतरला.. त्याच्या चेहर्यावरही विजयी मुद्रा खुलली होती.. नि आमच्यापाठोपाठ उतरलेल्या प्रत्येक मायबोलीवीराने हाच अनुभव घेतला.. प्रत्येकाच्या मुखी एकच उद्गार.. "yesssss !!! " "सssssहीsss !!" "जबरी ! "
ह्या अनुभवाची काही क्षणचित्रे.. :
(यो रॉक्स नि इंद्रा..)
--------------------------------------
(मग माझी हिरोगिरी.. )
-----------------------------------------
(हसते हसते.. इंद्रदेव.. )
------------------------------------------
(मायबोलीवीर.. )
-----------------------------------------------
मग आले फु बाई फू च्या सेटवरुन कौतुक शिरोडकर..
---------------------------------------------------------
-----------------------------------------------------------
(कडेलोट होताना कौतुक.. वरती बघतच नव्हता.. )
----------------------------------------------------------------
( मेरा नंबर कब आयेगा म्हणणारे विन्या नि आनंदमैत्री..)
-------------------------------------------------------------------
(आनंदमैत्री नि विन्या कूच करताना..)
--------------------------------------------------------------
(मैत्री उतरताना..)
---------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------
(विन्या.. आरामात उतरताना.. ह्याचे लक्ष खालीच.. :P)
--------------------------------------------------------------
(मग हे गिरीविहार धबधब्यातून विहार करताना.. )
-----------------------------------------------------------------
(मग वरच्या बाजुस सम्या, मध्ये नविन नि मागे मित्र गिरीश.. तिनो एकसाथ. ! )
----------------------------------------------------------
(नविन.. जबरी..)
--------------------------------------------------------
(सम्या.. चोहोबाजुंनी पाण्याने वेढलेला.. )
-----------------------------------------------------
(सम्या कडेलोट होताना..)
--------------------------------------------------------
(सगळ्यांचे फोटो काढले मग सुन्याचा नको का.. म्हणुन त्याचा एक फोटू.. )
-------------------------------------------------------
आता कडेलोटनंतर काय स्थिती असावी हा अंदाज खालील फोटोवरुन येइलच.. मी वरती वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय पण कितीही सांगितले तरी प्रत्यक्षात अनुभवण्याची मजा काही औरच..
------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
ह्या रॅपलिंगचा आनंद, आवेश इतका जबरदस्त होता की पुन्हा खालुन वरती चढुन येताना लागणार्या थकव्याकडेसुद्धा दुर्लक्ष झाले होते..
आमचे हे रॅपलिंग प्रकरण दुरुन त्या गावचीच एक महिला बघत होती.. नक्कीच तिच्या मनात ही शहरी लोक येडी की खुळी असा विचार चालला असावा..
------------------------------------------------------
एव्हाना या रॅपलिंगमुळे आम्ही मायबोलीकर्स विखुरले गेलो होतो.. आमच्या टोळीचे रॅपलिंग सेशन संपले.. नि एकत्र जमलो.. एव्हाना आमची भूकही चाळवली ! जेवणाची सोय करुया, खाउया नि मग मस्तपैंकी डुंबायचे असे ठरले.. नि मायबोलीकर्स वाटेला लागले.. फक्त सुन्या सोडून.. त्याला तिथे दोरीला बांधुन ठेवले होते.. म्हणजेच त्याला दिलेली मदतनीसची जबाबदारी सोडण्याजोगे नव्हते.. त्यामुळे त्याला 'येतोच खाउन' असे टोमणे मारत आमची टोळी निघाली.. जवळपास कुठे आसर्याची सोय आहे का बघु लागले.. पण माझ्याकडील कॅमेर्यामुळे मला काही लगेच निघायला मिळाले नाही.. 'आमचापण फोटो हवा' अशी मुलींनी विनंती केल्यावर मान द्यावाच लागतो ना..
--------
(कॅमेर्याकडे बघताना घसरणारी.. :P)
--------------------------
पण जल्ला हे फोटोसेशन काही थांबत नव्हते नि इथे माझी भुकही वाढत होती.. त्यात आमचे भुकेले मायबोलीवीर खाण्यासाठी काहि शिल्लक ठेवणार नाहित ह्याची मला पक्की खात्री होती.. त्यामुळे शेवटी "बॅटरी लो" हे बचावात्मक कारण त्या मुलींना देउन मी तिकडुन कलटी मारलीच..
वरती शोधत गेलो तेव्हा आमच्या टोळीला एका गावकर्याच्या घरात आसरा मिळाला होता.. एक पिटुकले पण ऐसपैस असे घर होते .. मी गेलो तेव्हा इंद्राने नुकतीच चुलीवर बनवलेली मॅगी समोर ठेवली ! एकीकडे विन्या नि सम्या कोळश्याने जाळ करण्याच्या प्रयत्नात होते.. तर मैत्री, गिरीविहार, कौतुक गायब होते.. कळले तर गावातील बच्चे कंपनीबरोबर खेकडे आणायला गेले होते !!! खेकडे म्हटले नि तोंडाला पाणी सुटले..
काही अवधीतच खेकडेदेखील आले.. त्या बच्चेकंपनीला खाउसाठी पैसे दिले गेले.. मग त्या घरात सगळ्या मायबोलीकरांची वर्दळ सुरु झाली.. त्यात श्रावणवाले, शाकाहरीवाले विरुद्ध मांसाहरी असे गट पडले.. पण सगळेजण कामाला लागले.. आग पेटवली पण सम्याने आणलेले कोळसे काही पेट घ्यायल्या तयार नव्हते.. अखेर फुकणीच्या सहाय्याने बर्याच परिश्रमानंतर कोळसे पेटले.. मग एकीकडे बटाटे,कांदे,टोमॅटो सळईवर भाजु लागले.. भाजण्याचे काम प्रामुख्याने विन्या नि गिरीविहार करत होते.. तर एकीकडे मैत्रीने अगदी सफाईने खेकडे साफ करुन घेतले..
(हा खेकडा असा खाणार तरी कसा हे कुतूहलाने पाहणारे ते त्या घरातील छोटे मुल नि आमचे मैत्रीसाहेब..)
--------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
(कट्ट्याचे मालक.. चुलीवरती..)
-----------------------------------------------------------------
आम्ही दोन्ही पाककृतीला मसाला एकच वापरणार होतो जे पुर्वनियोजीत असे काहीच नव्हते.. विन्याने घरातूनच बटाटा, कांदे इत्यादीला मसाला लावून एका डब्यातून आणले होते.. त्याच डब्यातील उर्वरीत मसाला खेकड्यांना लावुन घेतला.. दोन चुलीपैंकी एका चुलीवर भाजणे चालुच होते.. त्यात मग वेरायटी म्हणुन ब्रेड मध्ये बटाटे, टोमॅटो घालुन त्याला टोस्ट सँडविचचे स्वरुप दिले.. तर दुसरीकडे खेकडे तसेच भाजुन घायचा विचार होता.. पण आकाराने छोटे नि तसे कमीच होते.. पण वाटले तेलात फ्राय करुन घ्यायचे.. पण तेल कुठून आणणार.. नि त्या दादांना (ज्यांनी आसारा दिला होता) जास्त त्रासही द्यायचा नव्हता.. शेवटी आमची नजर उरलेल्या मस्काकडे गेले.. मग त्यातुनच "बटर- खेकडा" डिश तयार झाली ! (कृपया ह्याची पाककृती विनय भीडे चांगल्याप्रकारे सांगतील.. त्यांच्याच हस्ते खेकडे फ्राय झाले होते..) खेकड्यांचा खमंग वास सुटला नि आमचा मांसाहरीचा गट तुटून पडला.. काहिही म्हणा.. इतक्या पटकन नि ते देखील स्वादिष्ट असे खेकडे पहिल्यांदाच खाल्ले होते.. त्या घरात राहणार्या दादाचे पैसे देउन आभार मानले नि पुन्हा धबधब्याकडे वळालो.. !
एव्हाना तीन साडेतीन वाजले होते.. नि आमचे भीजणे अजुन बाकी होते.. तिथे अजुनही रॅपलिंग चालुच होते.. सुन्या अजुन होता त्याच ठिकाणी होता (मित्रा, तुझी खरच कमाल आहे).. तसे तिथे देखरेखसाठी वरती ५-७ जण नि खाली ४ जण असे एकुण १०-१२ जणांचा ताफा होता.. तिथे एकूण तीन जागा होत्या.. एक तो विशाल धबधबा, दुसरी जागा म्हणजे अंदाजे दहा - पंधरा फूटी असणारा धबधबा नि तिसरी जागा डुबण्यासाठी अशी मस्त होती जिथे छोटे धरण बांधले होते..
(वरील फोटोत मोठा धबधबा दिसत नाहीये.)
--------------------------------------------
(थोडे झूम करुन..)
---------------------------------------
तिकडे पोहोचलो नि आम्ही त्या छोट्या धबधब्याकडे भिजण्यासाठी वळालो.. या धबधब्याचे बदाबदा पडणारे पाणी अंगावर झेलणे म्हणजे दगडधोंडे मारुन घेतल्यासारखे होते.. इथे आम्ही मस्तच धुमाकूळ घातला... कौतुक, इंद्रा दूरच राहिले.. तर गिरीविहारने संक्षिप्त स्वरुपात भिजणे पसंद केले..
----------------------------------------------
इथे मनसोक्त भिजुन घेतले नि मग आम्ही वरच्या बाजूस असणार्या धरणाजवळील तळ्यात डुंबायला गेलो.. इथे
आमच्या ग्रुपमधील दोन ज्युनिअस ट्रेकमेट्स आपल्या परिने धबधब्याची मजा लुटत होते..
------------------------------------
इथे त्या छोट्या तळ्यात डुंबताना मात्र इंद्रा, गिरीविहार , आनंदमैत्री नि नविन या मायबोलीकरांचा इतरांसमवेत डुबण्यात पुढाकार होता ..
पुरेपुर डुबून घेतले नि मग आम्ही ट्रेकमेटसने ठरविलेल्या ठिकाणी ओले कपडे बदलुन नाश्त्यासाठी हजर झालो.. तिथेच चहा- पोह्यांचा नाश्ता झाला..
(नाश्त्यासाठी बसलेले मायबोलीकर.. )
सुर्यास्ताची वेळ झाली नि आतापर्यंत दिवसभर रॅपलिंगसाठी देखरेख करणारे परतून आले.. त्यात सुन्यादेखील होता.. ह्यांचे हात नि पाय दिवसभर पाणी नि दोरीच्या संपर्कामुळे पांढरे फिक्के झाले होते.. तिथे येताच सुन्याने आमची भेट घेउन आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारुन घेतल्या.. बिच्चारा.. दिवसभरच्या मजेला मुकला होता.. नि परतीच्या प्रवासातील गंमतीला देखील मिसणार होता.. त्याचे कारण ट्रेकमेटस ने हा रॅपलिंगचा कार्यक्रम १४-१५ ऑगस्ट असा दोन दिवस ठेवला होता.. त्यामूळे तो तिथेच रात्री वस्तीला होता..
काहीवेळेतच आम्ही वस्तीला राहणार्या सगळ्या ट्रेकमेटसचा निरोप घेउन बसने आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो.. परतीच्या प्रवासात देखील धमालगाण्यांचा कार्यक्रम सुरुच होता.. ज्यात मायबोलीकरच अग्रेसर होते.. येताना गाणी इतकी रंगात आली होती की पुढच्या सीटवर बसलेल्यांमधून Requests येउ लागल्या..पुढचे सगळेजण श्रोत्याची भुमिका बजावत होते पण दादही देत होते.. (जल्ला 'मायबोली बँड' काढायला काही हरकत नाही.. ) या गडबडीत आमचा स्टॉप कधी आला ते कळलेच नाही..
खरच.. दिवसभरात भरपुर गंमती अनुभवायाला करायला मिळाल्या.. ट्रेकमेटसबरोबर ट्रेक करतो तेव्हा मजा असतेच पण मायबोलीकर सोबतीला असले की धमालमस्तीचा कळसच गाठला जातो..!! मायबोलीकरांव्यतिरीक्त बसमधील असलेल्या नव्या ट्रेकमेट्सबरोबर मैत्री झाली तर जुन्या ट्रेकमेटसबरोबरची मैत्री दृढ झाली.. पण सार्या मायबोलीवीरांनी ह्या "वॉटरफॉल रॅपलिंग" चे धाडसी आव्हान सहजगत्या पेलले यातच खुप आनंद मिळाला.. "वॉटरफॉल रॅपलिंग" करुन नुसती कमालच केली नाही तर मौजमस्ती करत धमाल पण केली.. ह्या शूर मायबोलीकरांचे अभिनंदन !! आता वेध पुढच्या प्लॅनचे ! ढॅणट्याणॅन !
--- समाप्त -----
* वरील सर्व फोटो जरी माझ्या कॅमेर्यातले ('बसलेले मायबोलीकर' सोडुन) असले तरी ते आमच्या टोळीतील "ह्याने नि त्याने " काढलेत..
* अधिक फोटोंसाठी पिकासावरील लिंक देत आहे..
http://picasaweb.google.co.in/yo.rockks/Rappling#
* ईंद्राच्या कॅमेर्यातून घेतलेली काही चलचित्रे..
http://www.youtube.com/watch?v=LtILFMdg3To
मस्तच रे. किती नियमीत तुम्ही
मस्तच रे. किती नियमीत तुम्ही हे सगळे करता याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
मस्त फोटो आहेत! वर्णन वाचून
मस्त फोटो आहेत! वर्णन वाचून मग लिहीतो.
मस्त वर्णन!! स्वतःच रॅपलिंगचा
मस्त वर्णन!! स्वतःच रॅपलिंगचा अनुभव घेऊन आल्यासारखे वाटले.
यो, कूल फोटोज !
यो, कूल फोटोज !
काय राव... आम्हाला सुद्धा
काय राव... आम्हाला सुद्धा कळवले असते तर .... पुढच्या वेळेला सांगा नक्की... यायला आवडेल.. २-३ वर्ष झाली आता हा असला उद्योग करून..
जबरी रे !! ते धबधब्याचे फोटो
जबरी रे !!
ते धबधब्याचे फोटो पाहून लगेच त्या दोरीला लटकावं असं वाटलं..
सही रे !फोटोज आणि विडिओ पण
सही रे !फोटोज आणि विडिओ पण सही आलेत.
मस्त फोटो आणि वर्णन... मस्त
मस्त फोटो आणि वर्णन... मस्त मजा केलीत तुम्ही...
मस्त फोटो आहेत. आख्ख्या
मस्त फोटो आहेत. आख्ख्या धबधब्याचा 'कडेलोट' वाला...
सssssही आहे... लय भारी,
सssssही आहे... लय भारी, तोडलस भावा....
आमच्यात इंद्रा नि मला "चड्डी"
आमच्यात इंद्रा नि मला "चड्डी" "हॅल्मेट" "ग्लोव्ज" इत्यादी रॅपलिंगसाठी आवश्यक अशी वस्त्रे देण्यात आली जी आम्हाला काहि घालता येत नव्हती.. >>>> बरं झालं वस्त्रे घातलीत ते नाहीतर "आम्ही पाहीलेले टार्झन अन मोगली" असा काहीतरी वृत्तांत आला असता...
मी miss केलं. योरा, इंद्रा, सम्या, विन्या, आनंदमैत्री... झक्कास रे मित्रांनो... no one can return like you all.
(No subject)
धमाल केलीत रे लोको... मस्त
धमाल केलीत रे लोको... मस्त मस्त मस्त
यो... सहि मज्जा.. बघतान इतकं
यो... सहि मज्जा.. बघतान इतकं छान वाटतय तुंम्ही अजुन एंजॉय केल असणार नक्कीच .. मस्त रे
भयानक जळफळाट होतोय हे फोटो
भयानक जळफळाट होतोय हे फोटो पाहून...
फोटो पाहूनच इतकी मजा आली तर प्रत्यक्षात किती आली असेल?
यो खूप मस्त फोटो आणि वर्णन सुद्धा...
मस्त, जबरी आहे. पुढच्या वेळी
मस्त, जबरी आहे. पुढच्या वेळी आमचा पण विचार करा
सगळं वाचुन/पाहुन माझी
सगळं वाचुन/पाहुन माझी प्रतिक्रिया
जबरदस्त :: काय सही
जबरदस्त ::
काय सही एक्स्पिरीयन्स आहे
मज्जा करताय लेको
प्रचे पण मस्त
सही...मायबोलीकर
सही...मायबोलीकर जिंदाबाद!!
सूर्यकिरण:-टार्झन अन मोगली" >>>>
यो जबरी वॄतांत
यो जबरी वॄतांत ..नेहमीप्रमाणे...
शेवटी बसमधून उतरतानाची गाणी टाकायच विसरलास...:फिदी:
श्रावणात खेकडे जास्त चवदार लागत होते हां पण
यो२४ तुला मिसल रे आम्ही...तु असतास तर फोटो पण अजुन भरपूर आले असते...
no one can return like you
no one can return like you all. >>हो आम्ही शाबूत आलो परत तेच महत्वाचे
विन्या.. दोर्या लावून
विन्या.. दोर्या लावून उतरताना.. काय फाटली असेल नाय
विनय पुढच्या वेळी आम्हा
विनय पुढच्या वेळी आम्हा पुणेकरांचा पण विचार करा हो ना रे सुर्यकिरण
दोर्या लावून उतरताना.. काय
दोर्या लावून उतरताना.. काय फाटली असेल नाय >>.अरे उतरायच्या आधीची लोकांची पडझड पाहूनच मी गांगरलेलो.पण म्हणल जे होइल ते होइल...
पुढच्या वेळी आम्हा पुणेकरांचा पण विचार करा >>अरे मी तर म्हणतो माबोच्या जास्तीत जास्त लोकांनी हे अनुभवाव.:स्मित:
दोर्या लावून उतरताना.. काय
दोर्या लावून उतरताना.. काय फाटली असेल नाय >>.अरे उतरायच्या आधीची लोकांची पडझड पाहूनच मी गांगरलेलो.पण म्हणल जे होइल ते होइल... <<< विन्या.. हुषार आहेस.. इथे सगळे वाचतायेत म्हणून लिहिलस ना
विन्या.. नेक्स्ट टाईम नक्कीच...
कोणी कायकिंगसाठी प्लॅन करेल का ?
आधीच्यांची पडझड पाहून
आधीच्यांची पडझड पाहून भल्याभल्यांची प्रतिक्रिया...:फिदी:
विन्या बरोबर.. दोन ठिकांणाची
विन्या बरोबर.. दोन ठिकांणाची काळजी वाटायला लागली होती रे तूला मानेवरचं मडकं अन बुड ...
याsssर!! काय सही धम्माल केलीय
याsssर!! काय सही धम्माल केलीय तुम्ही...
योग्या, जल्लां मला नाय विचारत कधी येणार का म्हणून.....
रॅपलिंगचं यथोचित ट्रेनिंग घेतलंय मी........ वीस वर्षांपुर्वी
पण एकदा शिकलेलं विसरता येत नाही..
फोटो पाहून माझा जळलेला कोळसा झालाय...
अरे सही रे... मस्त फोटो!
अरे सही रे...
मस्त फोटो!
फोटो जबर्या. नंतर वाचन करतो.
फोटो जबर्या. नंतर वाचन करतो.
Pages