नंदा आणि तिच्या काही कविता
नंदा माझ्याकडे कामाला येत असे. सकाळी सात वाजता न चुकता बेल वाजायची आणि ही आत यायची. काल माझ्याघरुन गेल्यापासुन आज येईपर्यंत मधल्या वेळात जे जे काही तिच्या आयुष्यात घडले, तो सगळा पाढा माझ्यासमोर वाचल्याशिवाय ती कामाला हातही लावत नसे.
मी ब्रश करत असेल तर ती लगेच चहा टाकणार, मी चहा केलेला असेल तर ही गरम करुन तो घेणार. मी स्वयंपाक करे पर्यंत तिथेच बघत उभी रहाणार आणि मी करत असलेली भाजी, तिच्या पध्दतीने केल्यास कशी जास्त चवदार होईल हे मला पटवुन देण्याचा प्रयत्न करणार.
मी माझे बाकीचे आवरे पर्यंत ही पेपर वाचणार. मी नाष्टा करत असताना मी आधिच वाचलेल्या पेपर मधल्या बातम्या मला ऐकवणार. तु पण खाउन घे म्हंटले तर नेहमीचे ठेरलेले उत्तर, 'चुलतीने डबा केलता, आत्ताच भाजी-चपाती खाउन आले', किंवा 'चहा चपाती खाउन आले', किंवा काही, किंवा काही. पण ही मुलगी कधिच काहीच खात नसे.
मी ऑफीस ला गेले की ही घरातल्या कामाला सुरुवात करत असे. तिचे दुसरे काम ११ वाजता असायचे. मधले दोन तास घरी जाउन येण्यापेक्षा मी तीला माझ्याच घरी बसुन पेपर वाचणे, TV बघणे असे काहीही करण्याची परवानगी दिली होती. पण याबरोबरच ती माझी उद्याची भाजी निवडुन - चिरुन ठेवणे वगैरे तीची जबाबदारी नसलेली कामे ही करत असे. मुळातच कामसु / कष्टाळु स्वभाव, स्वच्छतेची - निटनेटके पणाची आवड आणि लहानवयातच परिस्थितीने आलेला पोक्त पणा, त्यामुळे सतत हातात काम असायचे नंदाच्या.
थोड्याच दिवसात, स्वभावाने चांगली - साधी - प्रामाणीक आणि काम चोख करणारी असे काहीसे तिच्याबद्दल माझे मत तयार झाले.
एक दिवस सकाळीच मी गाणी लावली होती. बेल वाजली तेंव्हा 'मी राधीका..' चालु होते. ही आत आली आणि आल्या-आल्या चालु असलेली ओळ ऐकुन म्हणली 'मला माहीती आहे, हे अंकली टिकेकर च गाण आहे राधा-कृष्णाच, जरा आवाज मोठा करा'. मी थक्कच झाले.
ज्या वातावरणात, ज्या वस्तीत नंदा रहात होती, त्याचे वर्णन मी तिच्याकडुन अनेक वेळा ऐकले होते. त्यामुळे नुकत्याच आलेल्या हिंदी चित्रपटातले गाणे तीच्या ओळखीचे असु शकते, या पलिकडे काही अपेक्शीत असुच शकत नव्हते.
एक दिवस आल्या-आल्या बातमी दिली, 'काल मला रस्त्यात एक पुस्तक सापडले, एका माणसाचे गाडीवरुन पडले, खुप हाका मारल्या, पण तो गेलाच'.
'कालच्या काल ३० पान वाचली. एकदम आवडले, आता मागायला आला तर देणार नाही' - नंदा.
'कसले पुस्तक आहे' - मी
'माझा बाप अन मी' - नंदा
'अरे वा, छान पुस्तक आहे, पुर्ण वाच नक्की. नरेंद्र जाधवांच पुस्तक आहे ते' - मी
'माहीती आहे मला तो दाढीवाला, आमच्याच जातीचा आहे, विद्यापीठात सत्कार केला की आम्ही त्याचा' - नंदा.
हळुहळु करत पुस्तक मात्र तिने पुर्ण वाचले. आणि त्यांच्या जातीच्या दाढीवाल्याला छान जमले आहे अशी प्रतीक्रिया पण दिली.
असेच एकदा, आदल्या दिवशी आबचौ मधुन आणलेली पुस्तके सोफ्यावर तशीच होती ती तीने घेतली आणि चाळत होती, त्यात एखादे कवितांचे पण होते. वाचता-वाचता एकदम मला म्हणाली, 'हे काही खास नाही, मला नाही आवडले. माझे आवडते कवी सांगु का, कुसुमाग्रज.' मग ताबडतोब कुसुमाग्रजांची एक कविता म्हणुन दाखवली. मी पुन्हा एकदा थक्क. पुढे म्हणाली, 'मला पण येतात कविता, मी विचारले म्हणजे काय, तर म्हणाली, 'माझ्या स्वताच्या कविता आहेत'.
'अरे वा, एखादी म्हणुन तरी दाखव' - मी
आईचा चेहराही आठवणार नाही इतक्या लहान वयात जिला आई सोडुन गेली, ती नंदा मला तीची कविता म्हणुन दाखवत होती आणि मी दोन्ही डोळ्यातुन गळणारे पाणी थांबवुच शकत नव्हते.
१.मे महिन्याची दुपार
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या भईनीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळेभरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
माथ्यावरी उन, पायाखाली उन
परिस्थितीचे मनात उन
निखार्यात तापलेल्या धरणी माय
पोरीचे पाऊल कमळाचे हाय
तिच्यापावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सुर्या चंद्रमा हो
अरे तिच्या डोळ्यातली भिती पहा
घड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
तिच्या कवितेतुन थोडे सावरल्यावर मी थोडी चौकशी केली, किती कविता आहेत, कुठे आहेत ... उत्तर मिळाले, 'खुप केल्या होत्या पण आता काय आठवत नाही'. यावर मी तीला, अजुनही करत जा, आणि TV बघत बसण्यापेक्षा सगळ्या कविता आठवुन लिहुन ठेव, असा सल्ला दिला. त्याचा परिणाम म्हणुन ही कविता कायमची माझ्या डायरीत तिच्याच हस्ताक्षरात आली.
एकदा आल्या-आल्या म्हणाली, 'काल मी एका गुलछबुवर कविता केली आहे ती ऐका, खुप हसाल'. मी विचारले, 'कोण गुलछबु ?', 'आहे आमच्या वस्तीत एक, रिकामा फिरत असतो मेला' - नंदा.
मी काही खुप हसले वगैरे नाही कविता ऐकुन, पण ती मात्र खुप खुश होती तिच्या या नविन कवितेवर.
२.मोरुची मावशी
काढुन दाढी मीशी
फिरतोय गुल हौशी
बघुन ह्याला सारे
म्हणत्याती मोरुची मावशी
बाई-बाई हा मेकअप करी
मर्द गडी हा आहे जरी
कानात ह्याने घातल्या रिंगा
बोलताच भाउ ह्यो दावतोय इंगा
जिन्स याची टाईट अशी
उर्मीला मातोंडकर घालते जशी
अरे बघुन तुला सारे म्हणत्याती
आली बघा मोरुची मावशी.
चौथ्या मजल्यावर ती एका लहान मुलीला सांभाळत असे, एकदा लहान मुलीची आजी आली असताना नंदाने आजीवरच एक कविता केली.
३.भोपळा
एक होती आजी
शोधीत होती भाजी
परसात होता भोपळा
वेलीवर झोपला
आजीला हवासा वाटला
हळुच देठ काढला
घरात आली आजी
भोपळ्याची केली भाजी
भाजी घेतली ताटात
भोपळा गेला पोटात
अत्यंत चांगली स्मरण शक्ती, एखाद्या साहित्यीकाच्या घरी जन्माला आल्या सारख्या आवडी-निवडी, चांगल्या-वाईटाची समज. अशा किती गोष्टी होत्या नंदाकडे, ज्या मला नेहमीच चकीत करुन टाकायच्या.
आठवते नंदा मला. ती कविता
आठवते नंदा मला. ती कविता करायची हे मात्र माहिती नव्हते. पहिली कविता चटका लावणारी आहे
छान जमलं आहे आरती. पहिली
छान जमलं आहे आरती. पहिली कविता छान आहे.
आरती, छानच आहे गं आता कुठे
आरती, छानच आहे गं
आता कुठे असते नंदा? तिला भरपुर शुभेच्छा!
छानच लिहीलं आहेस. मला नंदा ला
छानच लिहीलं आहेस.
मला नंदा ला पाहिल्याचे आठवतच नाही आहे कुठे ती आता???
कविता खुपच छान आहेत गं!!!
खूप छान आहेत कविता, पहीली
खूप छान आहेत कविता, पहीली वाचून डोळ्यात पाणी आलं.
जाई फुलासारखी नाजुक पोर घेउन
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या भईनीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळेभरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
माथ्यावरी उन, पायाखाली उन
परिस्थितीचे मनात उन
निखार्यात तापलेल्या धरणी माय
पोरीचे पाऊल कमळाचे हाय
तिच्यापावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सुर्या चंद्रमा हो
अरे तिच्या डोळ्यातली भिती पहा
घड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
ही कविता मला ७ वि ला मराठी ला होति ...................१२ वी कविता होती बहुतेक नाव होते
झप-झप चाललेत नाजुक पाय. कवी आठ्वत नहित पण नारायण सुर्वे असावेत .........
झप झप चाललेत नाजुक पाय या ओळी
झप झप चाललेत नाजुक पाय या ओळी याआधी वाचल्याचे आठवते.
झुंबर यांना अनुमोदन. पहिली
झुंबर यांना अनुमोदन. पहिली कविता बालभारतीमध्ये होती. कवी नारायण सुर्वे.
खूप छान
खूप छान
अजुन एक ती आजीची कवीता पण
अजुन एक ती आजीची कवीता पण पारंपारीक बडबड गीते/ बालगीते या सदरातील आहे. ईथेच एका बाफवर वाचली होती. शिवाय विं दा करंदीकरांच्या 'अजबखाना' मध्ये पण आहे का? (यावर जाणकार प्रकाश टाकतीलच). तरीही नंदा ज्या वर्गातुन आली होती त्यामानाने तिचे वाचन खरच कौतुकास्पद वाटले.
आरती, नंदाचं कौतुक आहेच. अशा
आरती, नंदाचं कौतुक आहेच. अशा परिस्थितीतही या सुंदर कविता पाठ असणं हे पण जमणं कठीण आहे. त्यामुळे तिच्या आहेत असं सांगण्याचा मोह होणंही कदाचित स्वाभाविकच. तिला शुभेच्छा!
फक्त इथे ती सकाळी कविता वाचल्यापासून तपशील शोधत होते आणि सापडल्यावर आणखी कन्फ्युजन नको म्हणून फक्त खालची ओळ टाकली. बाकी लेख आत्ता निवांत वाचला. अजून लिही की.
झपझप चाललेत नाजुक पाय >> नारायण सुर्वे कवी आहेत या कवितेचे आणि ही कविता ५ वी ला होती.
अरेरे असे असेल तर आश्चर्य्च
अरेरे असे असेल तर आश्चर्य्च आअहे. तिच्या एकुण परिस्थितीला ती मला इतकी सुटेबल वाटली की मला शंका ही नाही आली, ही तीने केलेली नसावी
कविता नंदाची नसली तरी ती तिची
कविता नंदाची नसली तरी ती तिची पार्श्वभूमी बघता तिचं पाठांतर कौतुकास्पदच आहे. गायिकेचं नाव सांगणं, पुस्तकं-लेखकांची नावं सांगणं, कुसुमाग्रजांची कविता पाठ असणं हे शाबासकी देण्याजोगं आहेच.
तरीही आरती, तुझ्या मनातल्या तिच्या प्रतिमेला धक्का बसला त्याचं वाईट वाटलं.
सुर्व्यांची कविता मी पण
सुर्व्यांची कविता मी पण वाचल्यासारखी वाटतेय. पण तिला असे सांगता येईल, कि तूझ्या कविता माझ्या मित्रमैत्रीणींना आवडल्या, आणखी असतील तर लिहून दे. तिला आनंद होईल.
अजुन एक ती आजीची कवीता पण
अजुन एक ती आजीची कवीता पण पारंपारीक बडबड गीते/ बालगीते या सदरातील आहे.>>>> वत्सला यांना अनुमोदन. 'आठवणीतील बडबडगीतं' या बाफावर पहिल्याच पानावर आहे ते बडबडगीत. साधारण सारखेच शब्द आणि कल्पना आहे.
नंदाच्या पाठांतराची व वाचनाची
नंदाच्या पाठांतराची व वाचनाची दाद द्यावीशी वाटते. तिने इतर कवींच्या कविता स्वतःच्या म्हणून खपवल्या असल्या तरी त्यातही मला तिची एक प्रकारची आस जाणवते. अशा व्यक्ती अनेकदा स्वतःचे स्वप्नरंजन करता करता कधी स्वतःची आणि नंतर इतरांची फसवणूक करतात ते त्यांनाच कळत नाही! कदाचित त्यात त्यांना सभोवतालच्या वातावरणातून काही काळ सुटका झाल्याचा आनंदही मिळत असेल!! कोणास ठाऊक!
अग आरती सहज महिती साठी
अग आरती सहज महिती साठी सन्गितल मी बाकी काहिच हेतु नव्हता.......
तिने इतर कवींच्या कविता
तिने इतर कवींच्या कविता स्वतःच्या म्हणून खपवल्या असल्या तरी त्यातही मला तिची एक प्रकारची आस जाणवते.>>
तिने केले ते योग्य असे जरी मला म्हणायचे नसले तरी अरुंधती चे म्हणणे पटले. आणि बरेचदा प्रतीथ्यश म्हणवणारे पण असे करताना दिसतात. [ऐकीव अनुभव]
शाबासकी देण्याजोगं आहेच. >>
खरच आहे. मला पण नेहमीच या तीच्या गोष्टींचे फार कौतुक वाटते.
तिला आनंद होईल>>
ती आता येतच नाही माझ्याघरी. तिच्या आईप्रमाणेच बहिणीने पण लग्नानंतर जाळुन घेउन आयुष्य संपवले. त्या एकटेपणात ही कुणाच्या प्रेमात पडली. घरच्यांना त्याचा सुगावा लागला. आता तिचे घराबाहेर पडणे पुर्ण बंद आहे. नाहीतर काम सोडल्यावरही अधुन्-मधुन तीची चक्कर होत असे.
अरेरे शेवटची पोस्ट वाचुन वाईट
अरेरे शेवटची पोस्ट वाचुन वाईट वाटल आरती.
पण खरच नंदाच कौतुक आहे. तिच्या पुढच्या आयुष्यासाठि शुभेच्छा.
आणि आरती तुमचा लेख पहिल्या पानावर आल्याबद्दल अभिनंदन .:)
नंदाच कौतुक आहे. तिच्या
नंदाच कौतुक आहे. तिच्या पुढच्या आयुष्यासाठि शुभेच्छा
अरु ला अनुमोदन
आणि शेवटची पोस्ट वाचुन वाईट वाटल
धन्यवाद ... मी बघीतलेच
धन्यवाद ... मी बघीतलेच नव्हते.
नंदाचे वाचन कौतुकास्पद आहे.
नंदाचे वाचन कौतुकास्पद आहे. अरुंधती ला अनुमोदन!
"झपझप चाललेत नाजूक पाय" ही कविता मी लहानपणी "किशोर" मध्ये वाचली होती --खूप आवडली होती मला ती. मला वाटतं कवी दत्ता हलसगी कर यांची आहे ती कविता.
भोपळ्याची कविता जशीच्या तशी
भोपळ्याची कविता जशीच्या तशी माझ्या मुलीच्या मराठीच्या पुस्तकात आहे.
आई गं... ह्या मुलीची असोशी
आई गं... ह्या मुलीची असोशी किती... जsssरा परिस्थितीची जोड असती तर?
धन्यवाद सगळ्यांना. नंदा भेटली
धन्यवाद सगळ्यांना. नंदा भेटली तर तुमच्या भावना मी नक्कीच तिच्यापर्यंत पोहोचवेन.
नन्दा हि सत्य आहे कि क्ल्पना
नन्दा हि सत्य आहे कि क्ल्पना आहे. लेखन चान आहे.
नंदाचे वाचन कौतुकास्पद आहे.
नंदाचे वाचन कौतुकास्पद आहे. अरुंधती ला अनुमोदन!
"झपझप चाललेत नाजूक पाय" ही कविता मी लहानपणी "किशोर" मध्ये वाचली होती --खूप आवडली होती मला ती.
>>>> हो हो बरोबर. कवींचं नाव मात्र आठवत नाही.
आरती लेख आवडला आणि नंदा आणि
आरती लेख आवडला आणि नंदा आणि तिच्या कविताही..
नंदाचं कौतुक वाटलं
नंदाचं कौतुक वाटलं
प्रतिभा सगळीकडेच असते , शोधलि
प्रतिभा सगळीकडेच असते , शोधलि तर सापडते . पण आपण स्वतालाच प्रतिभावान समजतो . आत्मकेंद्री असल्यावर ईतरांमधले गुण कसे दिसनार . मस्तच