श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 29 July, 2010 - 07:03

हॉटेल! हॉटेल नावाचा एक प्रकार असतो अन तो आपल्याला आपल्या बाबांनी कधीही कळू दिला नाही हे मोठेच शल्य गट्टूच्या मनात रुतून बसले.

कालच त्याला मधूकाकाने सुजातामधे वडा खायला नेले होते. तो प्रमिला अन समीरला घेऊन जात असताना गट्टूने सहज 'मी पण येऊ फिरायला?' असे विचारले अन मधूने कसलाही विचार न करता त्याला बरोबर घेतले.

गट्टूच्या मनात वेगळीच आशा होती. कदाचित आज हे बागेत वगैरे जातील अन खारे दाणे खायला मिळतील किंवा खेळायला मिळेल. या आशेने प्रश्न विचारताना त्याला समीरदादाची मात्र भीती वाटत होती. आपण प्रश्न विचारणे हे त्याला चुकीचे वाटले तर म्हणायचा... "कुणीही बाहेर चालले की काय रे विचारतोस, मी येऊ का, मी येऊ का" म्हणून!

पण समीरला स्वतःलाच माहीत नव्हते की जायचे कुठे आहे. त्यामुळे खरे तर त्याला जायचेच नव्हते. वाड्यात खेळणे बरे असा त्याचा विचार होता. पण प्रमिलाने डोळे वटारल्यावर त्याला बाहेर जायचा प्रस्ताव मान्य करायला लागला. त्यातच गट्टू येणार म्हंटल्यावर उलट त्याला जरा बरेच वाटले. आई बाबांबरोबर उगाच कंटाळून कुठेतरी फिरत बसण्यापेक्षा गट्टूही असला तर जरा मनोरंजन तरी होईल असे त्याला वाटले. दोघांनीही समीरकडेच हात पाय धुतले. समीरने कपडे बदलले. पण गट्टूला वर जाऊन आजीकडून किल्ली घेऊन, कपडे बदलून मग यांच्याबरोबर निघण्यात एक मोठा धोका वाटत होता. तो म्हणजे काही कारणाने आजीने जाऊ दिले नाही तर आपण इथेच बसायचो आपले! त्यामुळे त्याने घाबरत घाबरत प्रमिलाकाकूला सांगीतले की तो तसाच येणार आहे. प्रमिलाला आत्ता तरी गट्टू कसा दिसत आहे याबाबत फारशी चिंता नव्हती.

त्यामुळे शेवटी ते निघाले. चालत चालत जात असल्यामुळे अन तेही ओंकारेश्वराकडून बालगंधर्वकडे, म्हणजे थोडक्यात संभाजी बागेकडे न वळता सदाशिवपेठेकडे जाणार्‍या रस्त्यावर वळल्यामुळे आता गट्टूच काय, समीरही वैतागला. याला काय अर्थ आहे? तुम्ही आमचे खेळणे बंद करणार, आम्हाला दटावून स्वतःबरोबर यायला भाग पाडणार आणि मग हे असे रखडत रखडत कुठेतरी नेत बसणार, स्वतः मात्र गप्पा मारत चालणार! आमच्याकडे लक्षच नाही. बर! जायचं कुठे तेही सांगायचे नाही. याला काही अर्थच नाही. चांगले खेळत होतो. तर म्हणे चला! जायचं असेल कुठल्यातरी ओळखीच्यांकडे! मग उगाच यांच्या तासभर गप्पा! आम्ही आपले वैतागत बसायचे.

समीरचा स्वभाव गट्टूपेक्षा वेगळा होता. गट्टूही याक्षणी कंटाळलेला असला तरीही आपणच काकूला 'मी पण येऊ का' असे विचारलेले असल्याने सारखे 'कुठे जायचंय, कुठे जायचंय' विचारणे बरोबर नाही अन तसे विचारले तर आपला अपमान होईल. आपल्याला म्हणतील 'तू अजून एवढासा, तुला कशाला हवंय कुठे जायचंय ते? आणि चालायचा कंटाळाय तर कशाला आलास?" म्हणजे झालं का? आपलीच चूक झाली. आधी विचारायला हवं होतं! पण तेही विचारले की म्हणतात जाणार्‍याला 'कुठे चाललात' विचारायचे नसते.

नारायणपेठेचा रस्ता क्रॉस झाला तरी अजूनही वाच्यता नाही म्हणजे काय? आता रस्त्यात धावाधावी करण्याचा, एकमेकांशी बोलण्याचाही गट्टू अन समीरला कंटाळा आलेला होता. आता मात्र समीर चिडला.

समीर - अगं कुठे जायचंय आई?
प्रमिला - समीर.. आई बाबा बोलत असताना सारखं ओरडायचं नाही..
समीर - पण कुठे जायचंय?? मी नाही येणार..
प्रमिला - मग जा घरी...

'जा घरी'??? सरळ जा घरी म्हणतायत आपल्याला? समीरने आणखीनच धुसफूस केली तसा मात्र मधूने एक धपाटा ठेवून दिला त्याला. आता गट्टुसमोर हा अपमान कसा काय सहन होणार? त्यामुळे समीर फक्त अबोल झाला. वास्तविक आज गट्टूलाही समीर जे प्रश्न विचारत आह ते विचारलेच पाहिजेत असे वाटत होते. त्यामुळे समीरदादाला धपाटा मिळालेला पाहून मात्र गट्टू हादरला. हा यांचा मुलगा आहे तरी याला मारले. बरे झाले आपण नाही विचारले.

एक मिनिटाने पुन्हा 'अमर, अकबर, अ‍ॅन्थनी'मधे काय काय आहे यावरच्या गप्पा चालू झाल्या. पाहिला कुणीच नव्हता. पण वैशालीताई अन संजयदादाकडून काय काय ऐकायला मिळायचं! या पिक्चरमधे म्हणे विनोद खन्ना अमिताभचा मोठा भाऊ आहे अन इन्स्पेक्टर आहे. त्यामुळे त्यानेच अमिताभला मारलंय! खरी फायटिंग झाली असती तर अमिताभ कसला भारीय विनोद खन्नाहून.. वगैरे वगैरे! 'अमर, अकबर' मधल्या वयाच्या क्रमानुसार हिरॉईन झालेल्या शबाना, परवीन आणि नीतू या विषयावर बोलण्याचे वय अजून यायचे होते. ऋषी कपूर नुसता फोफशा आहे. त्याने एकही फायटिंग केलेली नाही. फक्त शेवटी एकदा समोरच मार खाऊन पडलेल्या जीवनच्या डोक्यात आपले ढोलके घातलेले आहे. खरी फायटिंग अमिताभनेच केलेली आहे. शेवटी तर अमिताभने वरच्या मजल्यावर्न सरळ खाली उडी मारली आहे. एका वेळेस तीन तीन जणांना धुतलंय वगैरे वगैरे! मग 'कसे धुतले असेल' यावर काही काल्पनिक प्रात्यक्षिके होईपर्यंत पत्र्या मारुती मागे पडला होता. पुण्यातील मारुती आणि गणपती यांची बारशी करणारा या शतकातील सर्वात प्रतिभावान साहित्यिक ठरायला हवा. अर्थात, जर गेल्या शतकात ठरला नसेल तर! जिलब्या काय, आपला काय, डुल्या काय, सोन्या काय! ही काय मारुतीची नावे आहेत? 'दक्षिणाभिमुखी मारूती'! हे कसे भरभक्कम वाटते. मारुतीला साजेसे! एक तर भिकारदास मारुती आहे. पुर्वी म्हणे पुण्यातल्या मारुती अन गणपतींच्या नावाच्या भेंड्या खेळू शकायचे.

लक्ष्मी रोड आला! सायंकाळचे सात वाजलेले होते. इथे उंबर्‍या गणपती आहे. उंबर्‍या! हे काय नाव आहे? पण आहे! आता दिसणार नाही म्हणा! पण पुर्वी अगदी चौकातच एक मोठे झाड होते. त्या झाडाखाली हे गणेशराव निवांत चोवीस तास बसलेले असायचे. शगुन दुकान झाल्यावर साड्या 'नुसत्या पाहायला अन चिवडायला' येणार्‍या बायकांची वर्दळ वाढली तसे त्यांना आपल्या सिंहासनाची लाज वाटली अन मग 'हे झाड आता पाडा' असा आदेश नगरपालिकेला देऊन ते एका बोळात आतमधे बसून राहिले ते आजतागायत!

चौक म्हणे मोठा झाला खूप! वाहतूक म्हणे अडेनाशी झाली आता! हो ना? मग आता शगुन चौक असे नामकरण का बरे करत नाही? छे! अजूनही तो उंबर्‍या गणपती चौकच! त्यामुळे गणेशराव अभिमानात आत बसून राहतात. पुर्वीचे निष्ठावान भाविक आतच येतात दर्शनाला!

आता मात्र समीरने सरळ ओरडायला सुरुवात केली. चालायचे, चालायचे म्हणजे किती? तेही दिशाहीन? का म्हणून? त्याने बंड पुकारल्यावर 'मग वडा मिळणार नाही हां?' अशी एक धमकी ऐकायला आली तेव्हा कुठे....

जर्रा जर्रा.. म्हणजे.. अगदी जर्रा जर्रा कल्पना आली... 'आपण कुठे चाललेलो असू याची!'

आणि मग काय विचारता? खार्‍या दाण्यांऐवजी सरळ वडा? लय भारी! आता दोघेही नि:शब्द झाले. आत्तापर्यंत आपण उगीचच तक्रार करत होतो हे त्यांना जाणवले अन पश्चात्ताप वाटला. आता ते दोघे एकमेकांशीही बोलत नव्हते. समीरला काही फार हॉटेलचा अनुभव होता असे नव्हे. यापुर्वी तोही एकदाच मुंबईच्या एका हॉटेलात गेलेला होता. पुण्यात हॉटेल कसे असते वगैरे त्याला फार माहीत नव्हते. पण आता दोघांच्याही मनात कारंजी उडू लागली होती. त्यातील रंग वेगवेगळे होते. समीरला 'आपण हॉटेलमधे चाललेलो आहोत' याची कल्पना होती तर गट्टूला 'आज आपल्याला बटाटेवडा मिळणार आहे' याची! हॉटेल हे स्थान गट्टूला माहीत नव्हते. त्याला माहीत होते पेशवाई जिथे फक्त मोठी माणसे कधीकधी जातात अन तिथे अत्यंत जहाल तिखट मिसळ मिळते एवढेच!

आणि कुमठेकर रोडचा 'सदाशिव पेठ हौद' चौक आला आणि पाटी दिसली! 'भालाकार भोपटकर पथ'!

समोरच काशीविश्वेश्वराचे सुंदर मंदीर!

मधू - पेशवाई इकडेय..
प्रमिला - मला माहितीय..
मधू - तुला कसं माहिती?
प्रमिला - उमाचे यजमान सारखे जातात.. ती सांगत होती..

एखादीच्या 'यजमानांनी' सारखी पेशवाईतील मिसळ खाणे हा त्या काळात 'पुणेरी गुन्हा' ठरू शकला असता. पण 'पेशवाई इकडेय' हे वाक्य बोलून बाबा उलटीकडे का वळतायत हे काही समीरला समजेना! गट्टूलाही नेमका तोच प्रश्न पडला असावा. त्याला वाटले बहुधा शंकराचे दर्शन वगैरे घ्यायचे, तिथे जरा वेळ बसायचे अन मग जाताना ते पेशवाई का काय तिथे वडा असेल!

पण तसे काहीच झाले नाही.

'स्वागत आहे... मात्र त्याचा अर्थ कितीही वेळ येथे बसावे असा नाही.. हे ध्यानात ठेवा...'

ही पहिली पाटीवजा धमकी आणि 'स्वागत खरच आहे का?' असा प्रश्न मनात निर्माण करणारा हळुवार, नाजूक संदेश वाचला तेव्हा कुठे जाणीव झाली की संपूर्ण हिरव्या रंगात रंगवलेल्या अन बाहेरून काहीही अंदाज येत नाही अशा एक वास्तूत आपण चाललो आहोत अन जसजसे पाऊल आत टाकत आहोत, आतून कधी न अनुभवलेले असे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे गंध आपली चलबिचल करत आहेत.

हॉटेल सुजाता...

बटाटेवडा नावाचा पदार्थ विकत मिळतो अन तो घरच्याहून इतका.. इतका म्हणजे इतका.. अप्रतिम असतो...

आज ज्ञानात काय काय भर पडत होती.

मस्तपैकी टेबले, खुर्च्या! लोक काय काय खातायत आपले! याची डिश बघू की त्याची? ते काय असावे? काहीतरी पातळ, गोलाकार! चटणीशी अन आतल्या बटाट्याच्या भाजीशी खातोय तो माणूस!

'एका डिशमधे दोघांनी खाऊ नये.. दुप्पट आकार आकारला जाईल'

वा वा! हॉटेल सुजाता आहे की 'हॉटेल कधी जाता?'

'सांडू नका'

सांडू नका म्हणजे काय? स्वतःहून कोण सांडतो? सांडले चुकून तर काय करणार?

पुण्याचे एक आहे. येथे विक्रेत्याच्या मताने गिर्‍हाईक वागते.

'अन्न हे पूर्णब्रह्म"

बर बाबा! आम्ही कुठे अर्धवट ब्रह्म म्हणतोय? पण ऑर्डर तर घ्याल का नाही?

मधू - तुला? डोसा?
प्रमिला - (कुजबुजत) जाणार नाही..
मधू - मग? ईडली?
प्रमिला - (कुजबुजत) एकच सांगा..
मधू - एक कशी मिळेल?
प्रमिला - (कुजबुजत) तुम्ही घ्या ना उरलेली..
मधू - समीर तुला वडा ना?
समीर - ते.. ते काय आहे?
मधू - हां! असं दुसर्‍याच्या डिशकडे पाहायचे नाही..
समीर - वडा नाही..
मधू - मग?
समीर - ते..
मधू - (कुजबुजत) अरे तो मसाला डोसाय.. जाणार नाही तुला..
समीर - जाईल..
मधू - प्लेन घे तू..
समीर - म्हणजे?
मधू - म्हणजे भाजी नसते त्यात.. भाजी फार खारट असते..
समीर - नाही.. मला तेच हवंय..
मधू - गट्टू तुला??

आयुष्यातील आजवरचा सर्वात महत्वाचा प्रश्न! 'गट्टू तुला??'

'काय खाणार आहेस' हा प्रश्न विचारला जातो अन त्याला उत्तर द्यायचे असते! माहीतच नाही.

रात्री बाबा करतील त्या आकाराच्या पोळ्या अन कोणतीही भाजी! ती भाजी तशीच लागते इतकेच माहीत! शाळेतही कुणी आजवर 'असं काही असतं अन तिथे इतके पदार्थ मिळतात' यावर बोललेलं नाही. खूप पुर्वी ट्रीपलाही गेलो होतो तेव्हाही शाळेने जे ठरवलेले असायचे तेच खायचे असायचे!

दुपारी किंवा संध्याकाळी घरी असलो तर आजी जे करेल ते! तारामावशीनेही कधी नेले नाही अशा ठिकाणी! आता मी काय बोलणार? 'काय खायचे आहे'... हे.... आपण सांगू शकतो? खरंच? मग.. मग आजवर मला.. कुणीच का नाही विचारले की तुला.. तुला.. काय खायचे आहे रे????

केविलवाणे हसून गट्टूने समीरकडे पाहिले. समीरने फार काळजी असल्यासारखा चेहरा करत सांगीतले..

समीर - याला पोळी भाजी वगैरे घ्या.. इथलं तिखट सोसायचं नाही...

हे काळजी घेणं आहे की हेवा आहे हेच गट्टूला माहीत नव्हते. त्यामुळे तो असहाय्य होता. तसाच मधूकाकाकडे बघत होता.

वेटर आल्यावर मधूने ऑर्डर दिली.

मधू - एक मसाला डोसा, एक इडली सांबार, एक वडा सांबार... गट्टू.. तुला वडा चटणी चालेल ना??

गट्टूची मान नेमकी कशी हालली हेही न पाहता मधूने वेटरकडे पाहून मान डोलावली आणि वेटर निघून गेला.

प्रमिला - किती पाट्या आहेत नाही इथे?
मधू - सुजाता त्याच्याचसाठी फेमस आहे.
प्रमिला - तुम्ही येता वाटतं बर्‍याचदा..
मधू - चहा वगैरेच घ्यायला.. खात नाही मी इथे फारसं!
प्रमिला - आता हे वाढलेले चारशे कसे गुंतवायचे?
मधू - आधी एक सायकल घेतली पाहिजे चिरंजिवांना.. नाहीतर डोकं फिरवतील..

हा संवाद डायरेक्ट समीरसमोर झाल्यामुळे समीरला अत्यानंद झाला.

समीर - कधी घेणारात सायकल?
मधू - बघू.. आधी हातात येऊदेत पैसे..
समीर - फिलिप्स..
मधू - अंहं! उंची पुरणार नाही तुझी.. आत्ता लहान घेऊ..
प्रमिला - एकदाच काय घ्यायची ती घेऊ ना? वाढतं वय आहे..
गट्टू - सायकल घेणारेत तुला?

समीरने गट्टूकडे पाहिलेही नाही. 'समीरदादाला सायकल घेणे' या चर्चेत आपण फारच लहान आणि अनावश्यक आहोत इतके त्याला समीरने दुर्लक्ष केल्यामुळे समजले.

समीरदादाला एकदा का सायकल घेतली की तो आणि आपण मनाने खूप खूप दूर जाणार हेही गट्टूला समजले. कारण मग सायकल चालवण्याच्या नादात तो पार हरिहरेश्वरापासून ते ओंकारेश्वरापर्यंत फिरणार आणि आजी काही आपल्याला त्याच्याबरोबर जाऊ देणार नाही. तोही आपल्याला सायकलला हात लावू देणार नाही. यावर तोडगा एकच! राजश्रीताई हीच आपली एकमेव मैत्रीण! नाहीतर मग प्रसाद आला की त्याच्याशी खेळायचे. पण म्हणजे.. म्हणजे दादा खूपच मोठा होणार! ... संपलंच की सगळं!

आणि हे विचार होतात न होतात तोच.. आहाहाहाहाहा! व्वा! काय दिसतात हे सगळे पदार्थ एकत्र!

यातले आपले काय आहे हा प्रश्न पडण्याचे कारण नव्हते. कारण वडा सांबार आणि वडा चटणी या दोन डिशमधेच 'वडे' आहेत हे गट्टूला समजलेले होते. पण त्या दोन मधले आपले काय हे मात्र त्याच्या लक्षात येत नव्हते. तेवढ्यातच प्रमिलाकाकूने वडा चटणी त्याच्या समोर ठेवली.

आणि मग आडवा हात मारला सगळ्यांनी! प्रमिलानेही नाही नाही म्हणत अख्खे इडली सांबार संपवले. गट्टूला आधी वाटले होते त्यापेक्षा ते दोन वडे संपवणे तसे जिकीरीचेच होते. एक तर वडे मोठे होते. त्यात हॉटेलमधे अधिक सोडा घालून पदार्थ केल्यामुळे ते पदार्थ लगेच पोट भरल्याची जाणीव देतात. त्यामुळे दुसरा वडा कसाबसा अर्धा खाल्यावर गट्टूच्या देहबोलीत 'खरे तर मला आता हे नकोय, पण सांगायचे कसे, काय म्हणतील मला, आणि रागवले तर?' असे विचार स्पष्ट दिसू लागले होते. त्याच्याकडे लक्ष गेल्यावर मधूने त्याला 'काय रे? नकोय का? जात नसले तर ठेवून दे' असे प्रेमाने सांगीतले. पण समीरने त्यातही शहाणपना केलाच!

समीर - जात नाही तर एवढं मागवायचं कशाला? आता गेले वाया पैसे!

यावर प्रमिलाने असा काही चेहरा करून समीरकडे पाहिले की समीर चूपचापच झाला. पण व्हायचे ते झाले होतेच. गट्टूला अत्यंत अपराधी वाटत होते. त्याने अक्षरशः कसाबसा तो उरलेला वडा खायचे ठरवले. मात्र तो प्रयत्नपुर्वक स्वतःवरचा डाग धुवायच्या मागे आहे याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. कौतूक मात्र कमी मिळते माणसाला! टीका लगेच! शेवटी वड्याचा अगदीच लहानसा तुकडा तेवढा राहिल्यावर गट्टूने अभिमानाने तिघांकडे पाहिले तर कु़णाचे लक्षच नव्हते. मधूकाका बिल देऊन टीप ठेवत होता. 'हे टीप किती ठेवतायत बघू' या उत्सुकतेने प्रमिला मधूच्या हालचालींकडे बघत होती. आणि समीर मात्र अजूनही शेजारच्या टेबलवरील माणसाने मागवलेल्या साबुदाणा वड्याकडे पाहात होता.

चौघेही बाहेर आले तेव्हा 'आज कसली अचाट धमाल आली' या विचारात गट्टू आनंदात चाललेला होता तर समीरला आता चालायचा कंटाळा आलेला होता. तो कटकट करत कसाबसा चालला होता.

रात्री साडे आठ वाजता सगळे वाड्यात पोचले तेव्हा समोरच बाबांना बघून गट्टू प्रेमभराने हासला. श्रीपण प्रेमाने हसला. समीरने सांगीतले आम्ही सुजातामधे गेलो होतो म्हणून! मग मधूची आपुलकीने चौकशी करून श्री गट्टूला घेऊन घरी निघणार तेवढ्यात समीर म्हणाला..

समीर - याला बटाटेवडा घेतला.. तर अर्धाच खाल्ला.. बाकी दिला टाकून...

गट्टूने अत्यंत भीतीने व अपराधी चेहर्‍याने श्रीकडे पाहिले. श्रीने सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता. गट्टू बाहेर जाऊन काहीतरी खाऊन आलेला आहे याचा त्याला खरे तर राग आला होता. पण 'पोरगं आहे, खाणारच की' अशा विचाराने तो गट्टूला सोडून देण्याच्या विचारात होता. प्रमिलाने समीरच्या पाठीत घातलेल्या धपाट्याचा आवाज हवेत विरतो न विरतो तोच समीरने पुढचे विधान केले..

समीर - टाकायचे असले तर मागे कशाला लागायचे?? मी येतो, मी येतो म्हणून...

धिस वॉज टू मच! श्रीला या गोष्टीची अजिबात कल्पनाच नव्हती. त्याला वाटले होते की मधू अन प्रमिलाने लाडाने समीरबरोबर गट्टूलाही नेले होते. पण गट्टूनेच हट्ट केला असेल असे त्याला वाटलेच नव्हते. ते समजल्यावर मात्र श्रीने गट्टूला जवळ ओढले अन खाडकन त्याच्या गालांवर आपला पंजा मारला. असला अपमान कोणता बाप सहन करणार मुलामुळे? मी चांगला कमवतोय, गरीब आहे, पण माझे माझे करून माझ्या मुलाला खायला घालतोय! अन हा माझा मुलगा? दुसर्‍यांकडे हट्ट करणार अन वर अन्न पानात टाकून येणार?

काहीही कळायच्या आत श्रीचे किमान चार, पाच धपाटे गट्टूच्या पाठीत बसले तेव्हा समीर अत्यंत कडवट चेहरा करून गट्टूला बसणार्‍या माराकडे पाहात होता. आणि मागून प्रमिलाने समीरला धरले अन गट्टूपेक्षाही जास्त बडवत घरात नेले अन दार आतून लावून घेतले. मधू श्रीची समजूत काढत होता. लहान आहे, मारतोस कसला, वगैरे!

खूप बोलल्यावर श्रीने गट्टूला घरात नेले. मावशी वरून श्रीकडे बघत होत्या ते पार तो जिना चढून येऊन त्यांच्याकडे बघत आपल्या घरात जाऊन घराचे दार लावेपर्यंत!

आत गेल्यावरही गट्टू रडतच होता. आता श्री त्याला 'भात खाणार आहेस का?' वगैरे विचारत होता. पण गट्टू नाहीच म्हणत होता. श्रीलाही आता जेवायची इच्छा उरलेली नव्हती. पोरगं रडत असताना कुठला बाप जेवेल? मग श्रीने गट्टुला जवळ घेतले. तर गट्टू चिडून बाजूला झाला. गट्टू हे काही आता बाळ नव्हते ज्याला चिमणाळे दाखवावे अन हसवावे! आता तो चवथीत होता. पुढच्या वर्षापासून साहेबाची भाषा शिकायला लागणार होता. अ‍ॅडमिशनचा प्रश्न होताच म्हणा! कारण पाचवीपासून गट्टूला अभिनवमधे नाही ठेवायचे असा एक निर्णय श्रीने घेऊन टाकलेला होता.

गट्टूला पुन्हा जवळ घेतल्यावर श्री बोलू लागला.

श्री - गट्टू! ऐक! मी काय सांगतो ते ऐक! हे बघ! मी रागवत नाहीये! नीट ऐक! तू खूप शहाणा मुलगा आहेस. खूप हुषार पण आहेस. मागच्याच वर्षी पहिला आलास की नाही? मग? आता याही वर्षी येशीलही कदाचित! पण तरीही मी काय सांगतो ते ऐक! पहिली गोष्ट म्हणजे आपणहून कधीही म्हणायचे नाही की 'मला हे देता का'! कधीही दुसर्‍याकडे खायला मागायचे नाही. ते वाईट असते. समजा दुसर्‍याने स्वतःहून दिले तर दोन, तीनदा नाही म्हणायचे. तरीही ऐकत नसले तर मग थोडेसे खायचे. हे बघ बेटा! हॉटेलमधे जायला खूप पैसे लागतात की नाही? बाबा तरी कधी जातात का? आपण साधी माणसे आहोत की नाही? हॉटेलमधले पदार्थ खायला खूप छान लागतात बाळ! पण त्यांनी पोटाला त्रास होतो. हॉटेलमधे घरासारखी स्वच्छता नसते. पदार्थ खूप महागही असतात. खूप खूप पैसे लागतात. तुला वाटत असेल मी रागावलो. पण मी का रागावलो माहीत आहे? कारण तू मधूकाकाला स्वतः म्हणालास की मी येऊ का म्हणून! हो की नाही? आता तू म्हणालास की मधूकाका नाही पण म्हणू शकणार नाही. हो की नाही? मग आपल्यामुळे उगीचच मधूकाकाला पैसे खर्च करायला लागतात की नाही? हे चांगले आहे का? तू मला म्हणाला असतास तर पैसे आपलेच गेले असते. पण तू मधूकाकाला म्हणाल्यामुळे? पैसे त्यांचे गेले. त्यात परत तू नीट खाल्ले नाहीस ना? टाकून दिलेस की नाही? मग आपण घरी असे टाकतो का पानातले? मग तिथे कसे काय टाकलेस? म्हणजे मधूकाकाचे किती नुकसान उगीचच झाले की नाही? आता रडू नकोस. पूस बरं डोळे! हे बघ! तुला आवडते म्हणून आज उडदाची आमटी केलीय मी! वरणभात खातोस ना? अं? खातोयस ना? मग तू खाल्ले नाहीस तर मला तरी वाटेल का जेवावेसे? अं? असं नाही करायचं! बाबांवर रागवायचं नाही! बाबा चांगल्यासाठीच सांगतात की नाही? आणि रात्री झोपायच्या आधी दोन घास भात खाल्लेला चांगला असतो. झोप चांगली लागते. ताकद येते. चल.. चल थोडेसे खाऊन घेऊ..

गट्टू काही न बोलता पानावर बसला. श्रीने वाढलेला भात त्याने कसाबसा गिळला. एक शब्दही तो बोलत नव्हता.

दार वाजले. श्रीने दार उघडले तर दारात मावशी! अबोलपणे त्या आत आल्या. एक पोळीचा लाडू त्यांनी गट्टूपुढे ठेवला अन त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्या निघू लागल्या.

श्री - मावशी.. तुम्हीपण रागावलात ना माझ्यावर? मी गट्टूच्या चांगल्यासाठीच सांगतोय ना??
मावशी - ...
श्री - मावशी.. स्वतःहून 'मी हॉटेलमधे येऊ का' असे विचारणे वाईट आहे की नाही? सांगा बरे..

अबोल आजी अन तोच तोच मुद्दा परत परत बोलणारे बाबा या दोघांकडेही पाहात गट्टूने ते वाक्य उच्चारले..

गट्टू - आजी... मला माहीतच नव्हते मधूकाका हॉटेलमधे नेणार आहे ते... मला वाटले ते फिरायला जातील अन ... खारे दाणे घेऊन देतील.. आणि.. बाबा... मी.. मी काही टाकले नाही.. दोन्ही वडे पूर्ण खाल्ले..

उभ्या उभ्या आपला जीव जावा असे श्रीला वाटत होते ते ऐकून...

त्याने खळ्ळकन पाणावलेल्या डोळ्यांनी बसलेल्या गट्टूकडे धाव घेतली अन त्याला मिठीत घेऊन तो मूकपणे आक्रंदत असतानाच...

मावशी - ए प्रमिले.. बाहेर ये... ये बाहेर.. ये मध्या.. नालायका.. ऊठ.. झोपतोस कसला.. ऊठ ऊठ.. ए प्रमिले..

मधू अन प्रमिलाच नाहीत तर सगळेच उठून खाडकन बाहेर आले. गट्टुही हादरून गॅलरीत आला अन श्रीपण! प्रमिला अन मधू हादरून मावशींकडे बघत होते.

मावशी - स्वतःच्या मुलाला अक्कल शिकवा आधी.. दुसर्‍याच्या मुलांना हॉटेलमधे न्यायच्या आधी..

श्री मधे पडला. 'अहो मावशी.. अहो मावशी' करत असतानाच तो मधूला 'तुम्ही आत जा, तुम्ही आत जा' अशा खुणा करत होता.

मावशी - तू गप रे अर्धवट! बाप आहेस का तांबट? ठोकतोस ते आपला कधीही स्वतःच्याच पोराला? लाजा वाटत नाहीत? ए प्रमिले.. नटून मुरडून हॉटेलमधे जातेस नवर्‍याबरोबर... चार संस्कार नाही करता येत स्वतःच्या दिवट्यावर? किती पैसे झाले रे मध्या या गट्ट्याचे? हे घे.. हे घे मी देते..

मधू - अहो मावशी.. काय बोलताय तुम्ही? गट्टू माझाच मुलगा नाही का? त्याचे मी पैसे घेईन का?

मावशी - माझाच मुलगा? स्वतःचा मुलगा म्हणतोस तर स्वतःच्या पोटच्या पोराला चार शब्द का सुनावत नाहीस?

तितक्यात समीर बाहेर आला. हा समीर दिड वर्षाचा असताना बावचळून मावशींकडे बघत असताना 'आत्तापासूनच बायकांकडे बघतो' म्हणून मावशींनी प्रमिलाच्या अन मधूच्या सात पिढ्यांचा उद्धार केला होता. आता समीर अकरा वर्षांचा होता. पण मावशी तशाच होत्या.

मावशी - बघतोस काय रे खोकडा? वर येऊन नमस्कार कर श्री काकाला! म्हणाव गट्टूबद्दल खोटे बोललो म्हणून माफ करा! आई बापांना लाजलज्जा नाही म्हणून तूही तसाच? यांचे होणार कौतूक अन दुसर्‍याला भोवणार चूक??

अघटित घडले. आजवर सगळे सोसणार्‍या प्रमिलाचा 'आईबापांना नाही लाजलज्जा' हे विधान ऐकून भडका उडाला. कसलाही विधिनिषेध न बाळगता प्रमिला खच्चून ओरडली.

प्रमिला - तुम्ही कोण माझ्या मुलाला बोलणार्‍या? स्वतःचे वागणे बघा आधी! नालायक बाई कुठली! आमच्या घरातल्या भानगडींशी तुमचा संबंध काय?

'तुमचा संबंध काय' या शब्दांमधील 'काय' हा शब्द वाड्याला ऐकूच आला नव्हता. कारण संतापातिरेकाने मधूने प्रमिलावर उगारलेला हात जरी हवेत असला तरी त्या अ‍ॅक्शनमुळे झालेला अपमान सहन न होऊन प्रमिला ओक्साबोक्शी रडत समीरला घेऊन आत पळाली होती. आणि आता मधू स्वतःच्याच घराच्या बाहेरून स्वतःच्याच घराच्या दाराकडे पाहात ओरडत होता.

मधू - कुणाला बोलतेस तू? आं? कुणाला बोलतेस? काही वाटत नाही जीभ उचलायला? सासू आहे तुझी ती! तुझ्या खर्‍या सासूला जेव्हा पडल्यामुळे जिना चढणे, उतरणे शक्य नव्हते ना, तेव्हा याच बाईने स्वतःचे घर रिकामे करून स्वतः वर एका खोलीत राहायला गेली अन या खोल्या आपल्याला दिल्या. नंतर भाडेपावत्या बदलून घेतल्यात आपण! पुन्हा मावशींना बोललीस तर याद राख...

आत समीर अन प्रमिलाला ही नवीनच माहिती मिळाली होती. गट्टूला आपण कायम 'आमच्या दोन खोल्या आहेत' म्हणून सांगतो त्या दोन खोल्या खरे तर आजीकडे होत्या अन आपल्याकडे एकच खोली होती हे रहस्य सगळ्या वाड्यासमोर गट्टूला समजल्यामुळे समीरला अत्यंत मनस्ताप झालेला होता. आणि आपल्या लग्नाआधी झालेल्या या गोष्टी आपल्या नवर्‍याने आपल्याला वेळीच का सांगीतल्या नाहीत हे प्रमिलाला समजत नव्हते.

मधू - मावशी.. मी.. प्रमिलाच्या वतीने मी माफी मागतो.. आम्हाला माफ करा.. रागवू नका..

आता श्री मधे पडला..

श्री - मधू.. अरे काय लावलंयस हे? वहिनींची चूक झाली.. त्यांनी मावशींना बोलायला नको होते... पण त्यांच्यावर हात काय उगारतोस तू? आं? आपण वाड्यात राहतो अन भांडतो कसले एकमेकांशी? मावशी.. तुम्हीपण आता मोठ्या मनाने सगळे सोडून द्या.. चला.. चला आपण वहिनींना भेटू..

मावशी चक्क निघाल्या. सगळ्यांना वाटत होते की मावशी आणखीन काहीतरी भीषण बोलून स्वतःच्या घराचे दार खाडकन लावून आत निघून जातील. पण.. मावशी चक्क खाली निघाल्या...

मधूच काय, सगळा वाडाच पाहात राहिला. या बाईने खरच प्रमिलाला माफ केले की काय??

श्री अन मावशी मधूच्या दारात आले. गट्टू वरून बघत होता.

मावशी सरळ आत गेल्या. समीर पलंगापाशी उभा होता. एकाचवेळेस तो रागावलेलाही होता अन बाबा बाहेर असतानाही मावशी सरळ आत आल्या आहेत हे पाहून घाबरलेलाही होता. प्रमिला पलंगावर उशीत तोंड खुपसून मुसमुसून रडत होती. आईला रडताना समीरन पहिल्यांदाच पाहिलेले होते. त्यामुळे तोही जरा बावचळलेलाच होता. मावशी प्रमिलाशी बोलू लागल्या. त्यांचा स्वर शांत होता.

मावशी - प्रमिले... ए प्रमिले.. ऊठ.. ..मी.. तुला बोलायला नको होतं मी.. तुझं घर वेगळं... माझ वेगळं.. मी काय! एक आपली.. साधी विधवा.. आयुष्यात काहीच चांगले न झालेली बाई मी.. त्यामुळे.. कायम दुसर्‍याला बोलण्यातच आनंद मिळतो मला.. ए प्रमिले... प्रमिले.. ऊठ.. आज.. मी.. ए प्रमिले.. आज मी .. कधीच जे बोलले नाही ... ते... ते वाक्य बोलते.. ऊठ .. मी आज ते वाक्य पहिल्यांदा बोलते प्रमिले.. माझं.. माझं चुकलं...

'माझं चुकलं'!

दास्ताने वाड्याच्या भिंती चक्रावून त्या माउलीकडे पाहात होत्या. त्या भिंतींना डोळे असते तर त्यांच्या अश्रुंच्या सरी दिसल्या असत्या जगाला! पवार मावशी म्हणत होत्या.. 'माझं चुकलं'!

आणि.. ते मात्र प्रमिलाला सहन झालं नाही.. एकवेळ सगळ्यांसमोर मधूने मारलं असतं तरी चाललं असतं! पण.. आपल्यासारख्या लहान वयाच्या बाईसमोर.. तेही वाड्याच्या सुनेसमोर.. पवार मावशींनी चूक कबूल करावी??

ते शब्द ऐकले अन प्रमिलाने उठून मावशींना घट्ट मिठी मारली. दोघींच्या खांद्यावर एकमेकींच्या अश्रूंच्या सरी ओघळत होत्या.

प्रमिला - चुकले मी मावशी.. खरच चुकले..

प्रमिलाने फाड फाड स्वतःला मारून घेतले.

त्याच वेळेस मधू प्रमिलाच्या पाठीवर थोपटून 'शांत राहा, शांत राहा' म्हणत होता..

रात्रीचे पावणे दहा झालेले होते.. नंदाने दिंडी दरवाजाही लावलेला होता वाड्याचा.. चितळे आजोबा गेल्यापासून ते काम तिच्याकडे आलेले होते..

आणि प्रमिलाच्या घरात रडारड चाललेली असताना.... गट्टूला इतकेच कळाले होते की...

हॉटेलमधे खाणे चविष्ठ असले तरीही बाबांच्या दृष्टीने वाईट असते कारण आपले बाबा आपल्याला कधीही हॉटेलमधे नेऊ शकत नाहीत, त्यांना ते परवडतच नाही...

आणि त्याचवेळी दिंडी दरवाजा वाजत होता...

खुन्या मुरलीधरापासच्या एका भाड्याच्या अंधार्‍या खोलीतून किरकोळ कारनावरून हाकलून दिलेले राजाराम शिंदे, त्यांची पत्नी शीला आणि एक आठ वर्षांची गोंडस मुलगी नैना..

नंदाने उघडलेल्या दिंडी दरवाजातून आत येऊन सामान टेकवत विचारत होते..

इथे दरवाजातली एक खोली रिकामी आहे असे समजले.. ती दास्तान्यांकडून आम्ही घेतली आहे.. आजपासून.. मी.. राजाराम शिंदे... ही मिसेस.. आणि.. ही नैना..

चितळे आजोबांच्या रिकाम्या खोलीत नवीन भाडेकरू आल्याच्या घटनेकडे मावशी अन प्रमिलाही बघत असताना...

गोरी पान नैना मात्र वर गट्टूकडे पाहात... छानपैकी हसत होती...

गुलमोहर: 

मी मायबोली वर बरेच लेख वाचले पण मला जे क्रमश असतात त्याचे पुडचे भाग मला बरयाचदा मीळ्त नाहित... फार वाइट वाट्ते... आशि काय सोय आहे का ज्यामुळे मला ई-मेल येइल नवीन भाग आला की...
सध्या मी श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १५ - बेफ़िकीर ह्यांच्या भाग १५ नंतर च्या भागांची लिंक नाहिये भेट्त हो... कोणी करेल का मद्त...!!

छान लिहिले आहे
पवार आजी व प्रमिला सारखी चुका समजून मान्य करणारी माणसे आता फार कमी दिसतात
पुलेशु

बेफिकीरजी,
तुमचे लेखन कौशल्य हे निव्वळ अप्रतिम आहे. खरं तर मी प्रतिक्रीया द्यायला खूपच उशीर केलाय. कारण मी २ वर्षांपासून तुमचे ललित लेखन व कविता अतिशय आवडीने वाचतोय. इतकी छान वाचन पर्वणी दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !
असेच उत्तरोत्तर छान लिहीत रहा. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा !!!

बेफिकीरजी,
तुमचे लेखन कौशल्य हे निव्वळ अप्रतिम आहे. खरं तर मी प्रतिक्रीया द्यायला खूपच उशीर केलाय. कारण मी २ वर्षांपासून तुमचे ललित लेखन व कविता अतिशय आवडीने वाचतोय. इतकी छान वाचन पर्वणी दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !
असेच उत्तरोत्तर छान लिहीत रहा. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा !!!

Pages