जीप ताकेदला पोहोचली आणि समोरचे दृश्य पाहून धसकलोच. जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी आपली वहाने पार्क केली होती आणि अक्षरश लाखोंच्या संख्येने भाविक लोक मंदिराच्या दिशेने चालले होते आणि चालणे सोडा पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती होती. आता करायचे तरी काय अशा विचारात असतानाचा मागून आलेल्या लोंढ्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली आणि पाहता पाहत आणि तिघे तीन दिशांना विभागले गेलो......
http://www.maayboli.com/node/17732
==============================================
पुढे चालू...
जिथे एरवीही अशा गर्दीत हाल होतात तिथे आमच्या अवजड सॅक घेऊन जाताना आमची काय हालत झाली असेल याची कल्पना करू शकता. पावलोपावली आम्हाला ज्यांनी ज्यांनी म्हणून ताकेदला जाण्याचा सल्ला दिला त्यांना मनोमन लाखोल्या वाहत आम्ही तिघे एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागलो. मोबाईल फोन चोरीला जाऊ नये यासाठी ते आणि अन्य मौल्यवान वस्तू याआधीच आम्ही खबरदारी म्हणून सॅकमध्ये नीट पॅक करून ठेवल्या होत्या आणि या रणधुमाळीत सॅक काढून मोबाईल शोधणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. या यात्रेत हरवलो असतो तर ट्रेकचा बट्ट्याबोळ झालाच असता पण घरी जायचेही वांदे होते. पण केवळ देवाची कृपा म्हणून मला अमेयची हॅट दिसली. गांधी टोप्या आणि मुंडाश्यांच्या गर्दीत छानपैकी उठून दिसत होती.
जीवाच्या कराराने गर्दी कापत मी कसाबसा त्याच्याजवळ पोचलो तर त्याच्याच थोडा पुढे स्वप्नीलपण दिसला. त्या ढकलाढकलीतच आम्ही पुन्हा चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे निश्चित करून निश्चिंत मनाने पुढे घुसलो. गर्दी मागून ढकलत असल्याने चालण्याचा प्रश्नच नव्हता, फक्त तोल जाणार नाही आणि मागची माणसे आपल्या सॅकवर भार देणार नाही एवढे पहावे लागत होते.
रेटत रेटत आम्ही त्या कुंडापाशी आलो आणि थोडा मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळाली. ज्या कुंडात १२ तीर्थांचे पाणी येते तिथे स्नान करायला इतकी झुंबड उडाली होती की पाणी प्रयत्न करूनही दिसून येत नव्हते.
पण तिथून शेजारच्याच तलावात पोहणाऱ्या मुलांचे फोटो काढण्यावर समाधान मानले.
आमची एकंदर वेषभूषा, सॅक आणि कॅमेरे (एसएलआर) पाहून आम्ही वेगळे असल्याचे कळत होते. त्यातच एकाने कुठूनशान आला म्हणल्यावर मी ठोकून दिले
"च्यानेलकडून आलोय. ताकेदवर डॉक्यूमेंट्री करायचीय. त्याचे फोटो काढून नेतोय,"
असे म्हणल्यावर त्याला एकदम भरते आले.
"चला चला तुमची पुजाऱ्यांशी भेट घालून देतो. ते समंदी माहीती देतील."
"नाही आधी थोडे फोटो काढून होऊदेत. काम पहिले. तुम्हीपण उभे रहा. तुमचा पण फोटो काढतो."
"आसं कसं, थांबा मोठे पुजारी कामात असतील, पण दुसरे कोनी असेल तर मी घेऊन येतो थांबा."
असे म्हणून तो गर्दीत गायब झाला. पण एकदंरीत संभाषणावरून आम्ही कोणतरी बडी मान्स आहोत हे आजूबाजूंच्याना कळले. मग काय सगळ्यांचीच कॅमेरात येण्याची धडपड. आणि त्या ढकलाढकलीत आम्हीच कुंडात पडायची वेळ आली तेव्हा आवरते घेतले आणि जसा रस्ता मिळेल तसा माघारी मोर्चा वळविला.
जाताना मुख्य रस्ता टाळून दुकाने, पाले यांच्यामधून जाणारी वाट पकडली आणि जेव्हा तासाभराने ताकेद फाट्यापाशी आलो तेव्हा घामाने चिंब होऊन गेलो होतो. तिथल्याच एका गावठी दारूच्या दुकानाशेजारी लिमकाच्या बाटल्या दिसल्या. वाहवा म्हणत त्यावर धाड टाकली आणि बाटलीत लिमकाच आहे ना याची खात्री करून घेत घसा ओला केला. (देवाशपथ्थ सांगतो, दुकानात देण्यात येणारे द्रव्य आणि आमच्या हातातील द्रव्य यांचा रंग अगदीच सारखा होता.)
आता संध्याकाळ होत आली होती. तिथून बारीला जाण्याची काहीतरी सोय पहावी लागणार होती. पण तासभर गेला तरी कोणीच तयार होत नव्हते. घोटी ते ताकेद आणि ताकेद ते घोटी असा मीटर सुरू असताना आजच्या सुगीच्या दिवशी कोण बारीला जाणार. शेवटी एकाने बारी फाट्यापर्यंत सोडायचे कबूल केले. भराभर टपावर जाऊन बसलो. (आता आम्हालाही सवय झाली होती. सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. :स्मित:)
फाट्यावरून पुन्हा एका जीपच्या टपावरून बारी गावात पोहोचलो. (हुश्श).
बारी गावाचे पहिलेच दर्शन फार सुरेख झाले. संधीप्रकाशात समोर कळसूबाईचे शिखर चमकत होते, त्याच्या कुशीत वसलेल्या बारी गावातली कौलारू घरे सावलीत गेली होती आणि वातावरणात एक सुखद गारवा आला होता. दिवसभरच्या घामट गर्दीनंतरची ती संध्याकाळ खूपच प्रसन्न भासली.
आता पुन्हा आमच्यासमोर तिढा होता. रात्रीच कळसूबाई चढायचे का मुक्काम करून पहाटे पहाटे असा प्रश्न होता. पण गावात चौकशी केल्यानंतर कळले की रात्री कळसूबाईला जाण्याचा पर्याय फारसा चांगला नाहीये. (गावकऱयांच्या मते रात्रीची जनावरे असतात) अर्थातच त्याला घाबरण्याचे कारण नव्हते पण त्यांनी सुचविलेला दुसरा पर्याय म्हणजे कळसूआईच्या खालच्या मंदिरात मुक्काम करण्याचा प्रस्ताव चांगला होता.
(माहीतीसाठी - कळसूबाई देवीची दोन मंदिरे आहेत. एक शिखरावर आणि दुसरे बरेच खाली. पण बारी गावापासून उंचावर. खालचे मंदिर त्यामानाने प्रशस्त आहे.)
त्यामुळे रात्रीच कळसूबाई चढण्याचा प्रस्ताव २-१ अशा मताने फेटाळला गेला. तरीदेखील खालच्या मंदिरापर्यंत पोचताना हाश हुश झालेच. मग मला सॅकांपाशी बसवून स्वप्नील आणि अमेय पाणी शोधायला निघाले. जवळपास अर्ध्या तासाने उगवले ते उड्या मारतच.
"अरे एक लईच भारी काम झालेय."
"काय?"
"सांगतो चल," म्हणत माझी उत्सुकता वाढवली.
थोडे पुढे जाताच एक झोपडीवजा घर लागले. घराभोवतीचे अंगण छान शेणाने सावरलेले, त्यातच एक लोखंडी खाट टाकलेली आणि बाजूलाच एक मोठा ओंडका जळत होता. ती झोपडी एका महादेव कोळी कुटुंबाची होती आणि पाणी आणायला जात असताना कुटुंबप्रमुखांनी दोघांना पाहिले आणि मुक्काम त्यांच्याइथेच करावा असा छानपैकी आग्रह केला.
"अरे त्यांनी तर सांगितलेय की तुम्ही रात्रीचे जेवण आमच्याबरोबरच करा." इति अमेय.
अरे वा मग काय झकासच, म्हणत आम्ही त्या अंगणात ऐसपैस पसरलो. ते मामा कामानिमित्त मुंबईला रहायला होते आणि आठवड्यातून एखादी चक्कर घरी मारायचे.
"बरका पोरांनो, औदांला मी लई दिसांनी घरी आलोय. म्हणूनशान रात्रीच्याला कोंबडं हाय. चालंल ना तुम्हास्नी?"
खल्लास, अस्सल गावरान कोंबडी आणि तीही अदिवासी पद्धतीने बनविलेली. त्या विचारानेच तोंडाला पाणी सुटले. पण तोंडदेखले आम्ही आपले अहो कशाला आम्ही जेवणाचे सगळे आणलेय. फक्त पाणी द्या आणि स्वयंपाक करतो इथेच. असे म्हणून पाहिले.
पण मामा ऐकेनात.
"खाता ना तुमी, मगं झालं तर."
तेवढ्यात डोक्यात किडा चावला, अरे आज तर महाशिवरात्री, आणि हे तर महादेव कोळी. मग आज उपास करायच्या ऐवजी कोंबडी.
पण म्हणलं जाऊ दे, ही देवाची ईच्छा असेल तर आपण काय करणार.
दरम्यान, त्या मामांचा एक तरूण पुतण्या बाहेर आला. ओळख-पाळख झाली. त्याच्या एकंदर बोलण्यावरून औषध प्राशन झालेले कळत होते. त्यामुळे आमचे संवाद भारीच पातळीवर चालले होते.
आधी त्याने आम्हाला काय काय शिकलाय ते विचारले. आम्ही सांगितले जर्नालिझम, ऍरानॉटीकल इंजिनिअर इ इ.
त्यावर तो उत्तरला, "वा वा म्हणजे सगळे सुशिक्षित आहात तर. मी पण आहे. फार नाही शिकलो पण आपण एकदम भारी बोलू शकतो."
मग त्यावरून गाडी शिक्षणव्यवस्था, बाजारीकरण, कुटुंबव्यवस्था यावर आली.
"आता माझ्याकडे पहा. मी यांचा पुतण्या पण आपण एकदम फ्री आहोत. आमी आतमध्ये ड्रींक्स घेतली. असा मोकळेपणा पाहीजे. नाहीतर काय खरं नाही."
आम्ही आपले हूँ हुँ करत ऐकत बसलो. मध्येच त्याला काय वाटले देव जाणे
"इथे जवळच एक पिकनिक स्पॉट आहे, हरिश्चंद्रगड म्हणून. गेलाय का कधी?"
भगवान, हरिश्चंद्रगड म्हणजे स्वप्नीलचे तिर्थस्थान. तो तिथे आठवडा आठवडा जाऊन राहीलेला. विशेष म्हणजे इंद्रवज्रही त्याने अनुभवलेले. त्यामुळे त्या भव्य गडाला पिकनिक पॉइँट म्हणल्यानंतर आम्हाला स्वप्नीलकडे पाहवेना.
पण त्याने पियेला आदमी आहे करत सोडून दिले. तेवढ्यात यजमानबाईंचा पुकारा आला.
"या रं पोरांनो, बसा ताटावर"
पटापट उठून आत चुलीपाशी जाऊन बसलो. सुदैवाने पुतणे महाराज बाहेरच्या बाहेरच कटले. त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला. आणि मग चुलीच्या उजेडात भाकरीबरोबर तो तिखटजाळ कोंबडी रस्सा चापला. त्यात मामांनी आम्ही आगदी आग्रह करकरून खायला घातले. शेवटी म्हणजे हात टेकून उठायची पाळी आली. त्या गृहदेवतेला पोटभरून धन्यवाद देत बाहेर आलो तेव्हा छानपैकी थंडी पडली होती. मग पटापट तंबू उभारला. दरम्यान आम्हाला शेकासाठी म्हणून मामांनी अजून एक ओँडका शेकोटीत टाकला.
आहाहा..त्या वातावरणात काय शाही झोप लागली.
बर एवढ्यावरच थांबलं नाही. सकाळी उठल्या उठल्या तोंड खंगाळण्यासाठी चुलवणावर तापवलेले गरम पाणी तयार होते. इतक्या आदरतिथ्याची सवय नसल्याने आपल्याला अगदीच लाजल्यासारखे होते. त्यामुळे नाष्टा करून जाण्याचा आग्रह नम्रपण नाकारत आम्ही कळसूआईच्या दिशेने सुटलो.
सकाळची वेळ असल्याने चढणीचा त्रास झाला नाही आणि भराभर बरेच अंतर चालून गेलो. पण शिड्यांच्या मार्गावर मात्र दमछाक व्हायला सुरूवात झाली.
जितक्या लवकर शिखरावर पोहचू तितके बरे म्हणत पाय ओढत राहीलो. आता आलंच अस म्हणत एकेक पाऊल कष्टाने उचलले पण एका ठराविक मर्यादेनंतर तेही त्राण संपले. तोल जाऊन पडणार असे वाटायला लागले. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी झाली. एकदम झांझावल्यासारखे झाले. तहानेने जीव व्याकूळ झाला होता आणि पाणी संपत आले होते. वर आता ऊनपण चांगलेच तापले होते. माझी इतकी वाईट अवस्था कोणत्या ट्रेकमध्ये झालेली आठवत नव्हती.
अमेय आणि स्वप्नील तर हाक मारण्याच्या अंतरापलिकडे गेले होते. जवळपास कोणी नाही.
मी तसा देव-बिव फारसा मानत नाही. पण त्यावेळी मनापासून कळसूमातेला प्रार्थना केली. तुझ्या दर्शनाला येऊ दे बाय. आणि एका खुरट्या झुडपाच्या सावलीत अंग टाकून दिले.
किती वेळ गेला आठवत नाही. पण मी दिसत नाही म्हणून अमेय मागे आल्याचे जाणवले. त्याने एक उत्साहवर्धक बातमी आणली होती. थोड्याच पुढे एक विहीर आहे. तिथे छान थंडगार पाणी मिळेल.
अंगातली सगळी ताकद एकवटून उठलो. खरोखरच थोड्या अंतरावर एक विहीर होती आणि त्याचे पाणी निव्वळ थंडगार आणि जीव थंडावला. थोडा वेळ विश्रांती घेऊन कळसूबाईच्या शिखराकडे जाणारा शेवटचा टप्पा पार केल आणि पाहता पाहत आम्ही महाराष्ट्राच्या सर्वोच्च ठिकाणी होतो.
बाजूला पाताळस्पर्शी दरी आणि डावीकडे कुलंग-मदन-अलंग लक्ष वेधून घेत होते.
हा स्वप्नीलचा शंभरावा किल्ला होता. त्यामुळे तो विशेष खुशीत होता. इट वॉज अ पार्टी टाईम.
मग येताना बरोबर आणलेले मुंबई भेळेचे सामान, शेंगदाणा लाडू आणि त्यावर कोकम सरबत असा नामी बेत होता.
मग थोडे फोटोसेशन करून खाली उतरलो.
स्वप्नील आणि अमेय त्यांचा ट्रेक तसाच पुढे चालू ठेवणार होते. त्यांना शुभेच्छा देऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. एका भल्या माणसाने त्याच्या गाडीतून कल्याणपर्यंत लिफ्ट दिली. आणि मग खचाखच भरलेल्या सह्याद्री एक्प्रेसमध्ये जीवाच्या कराराने घुसलो. बसायला सोडा उभे रहायला पण जागा नव्हती. तसाच संडासच्या दारासमोर अंग चोरून उभा राहीलो. चार दिवसाच्या ट्रेकनंतर असा उभा राहून प्रवास म्हणजे शिक्षा होती.
त्यातच मित्राचा फोन आला.
"कुठे आहेस?"
"मी गाडीत आहे, पुण्याला यायला निघालोय,"
"मी न्यायला येतो तुला, कदाचित रिक्षा मिळणार नाही."
"का काय झाले?"
"अरे वाईट बातमी आहे. पुण्यात स्फोट झालाय, जर्मन बेकरीमध्ये. आठ-दहा जण गेलेत. सगळीकडे टेन्शन आहे."
ती तारीख होती १३ फेब्रुवारी २०१०.
इनमीन- अरे आधी तो मोज्याच्या
इनमीन- अरे आधी तो मोज्याच्या वासाने बेशुद्ध पडला..मग तोच मोजा हुंगवून त्याला शुद्धीवर आणत होतो...
काट्याने काटा काढावा म्हणतात ना तो असा...
क्षमस्व....माबोच्या नविन
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले काही प्रचि काढून टाकले आहेत...
आशुचँप , हे फोटो बघितलेच
आशुचँप ,
हे फोटो बघितलेच नव्हते. तूझा खडकावरचा फोटो थर्रारक आहे.
सुरेख वर्णन आणि प्रचि.
सुरेख वर्णन आणि प्रचि.
Pages