सचित्र वृत्तांत - बारा गटग, जुलै २०१०

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

२४जुलै, २०१०.
न्यूजर्सी.

मी आणि रुनी बरोब्बर अकरा वाजून ६ मिनिटांनी स्वातीच्या घरी पोचलो. (डीसी गटगला बाराकर साडे अकराला आले होते)

रुनी शुक्रवारी रात्रीच माझे बटाटेवडे तळून संपत असताना (बरोब्बर) आली. मदत लागणार नाही, तेव्हा लवकर नाही आलीस तरी चालेल असे मी तिला सांगितले होते. ती शहाणी मुलगी आहे, सांगितलेलं ऐकते. आम्ही झालेले वडे मोजले मग नितीनला म्हटले तुला खायचेत का? घे, आहेत बरेच. तरी मग त्याने एकच घेतला(नितीनपण शहाणा आहे). रुनी पाटव-ड्या घेऊन आली होती त्या टेस्ट केल्या. शनिवारी लवकर उठून, आवरुन गाडी लोड करुन आम्ही साडेसहा पावणेसातच्या दरम्यान निघालो. रुनी हल्लीच भारतवारीहून परत आली असल्याने तिला बरेच अपडेट्स द्यायचे होते पण गाडीत फारसे बोलणे झाले नाही (जे बरेच झाले असे नंतर वाटले). नेहमीची रेडिओ स्टेशन्स वाजेनाशी झाल्यावर एकच कॅसेट होती ती परत परत ऐकत चाललो. रुनी अधूनमधून डुलक्या काढत होती असा संशय आहे. वाटेत एकदा थांबावे की काय असा विचार करत होतो पण सर्विस एरिया पसंत पडत नव्हता. 'हा नको, हा नको' असं करत करत स्वातीचे घरच जवळ येऊ लागले मग थेटच गेलो.

'अवतीभवती डोंगर झाडी' अश्या त्या घरी पोचल्यावर यजमानीणबाई स्वाती (इथून पुढे नुसते 'बाई') स्वागताला हजर झाल्या. बाईंना एकदम नऊवारी, नथ वगैरे पोषाखात बघून आम्ही घाबरलो! घरात प्रवेश मिळतो की नाही असे वाटले. पण द्वारपाल विनय अजून आलाच नव्हता त्यामुळे प्रवेश मिळाला. बाईंची नऊवारी (शिवलेली असूनसुद्धा) छानच दिसत होती. वर्ख वगैरे लावून गुलाबपाकळ्यांसह चांदीच्या तबकात ठेवलेल्या 'चितळे आंबा बर्फी'सारख्या दिसत होत्या बाई! त्या नटूनथटून नुसत्या बसल्या नव्हत्या काही! त्यांनी लगेच आमच्यासाठी \चहा ठेवला. आम्ही सर्वात आधी पोचल्याने आम्हाला सकाळचा \चहा, भडंग, बाकरवड्या असा फराळ मिळाला (धन्यवाद!).

mango.jpg

मग मेधा आली. तिच्याबरोबर दोन मोठ्या पिशव्या होत्या. लाल येश्टीने कोकणांतून आली असावी असं वाटावं असलं सामान त्यात होतं. मासे, झाडं, बिया, पुस्तकं न काय काय! ( मासे आणले होते ते नंतर तळायला मी तेच खात खात तिला मदत केली. मस्तच होते! त्याबद्द्ल मी तिला असामीने माझ्यासाठी आणलेल्यातले थोडे कोलंबीचे लोणचे घेऊ दिले.)

बाकी लोकही येऊ लागले आहेत असं कळल्यावर मी कपडे बदलून ( तसलेच) दुसरे घातले आणि जरा नट्टापट्टा केला. पाहुणे केदार यांच्याशी ओळख करुन घेतली. विनय आल्यावर त्याच्याकडून बटाटेवड्यांचा फोटो काढून घेतला. भाईंनी सर्व पुरुष मंडळींच्या वतीने धोतर, झब्बा, पगडी इ. वेष केला होता. नंतर एकदोन नुसतेच झब्बेवाले नग दिसले. (खाली धोतराऐवजी जीन्स होती!)

मी, मेधा, रुनी आणि इतर काही बाया(अर्थातच) किचनमध्ये वडे गरम करणे, मासे तळणे आणि इतर सटरफटर कामे करत होतो. बाकीचे बरेचसे एका टेबलाभोवती जमून खात होते. एक पुरुषांचा ग्रूप पीत होता आणि एका ग्रूपमध्ये दोन पुरुष काहीबाही बोलत होते आणि बाकीचे नुसतंच मॅडसारखं त्यांच्या तोंडाकडं बघत ऐकत होते.

झक्कींनी वड्यांबद्दल विचारपूस केली, 'कधी केले एवढे वडे?' इ. मग मी सांगितले की गुरुवारीच थोडी तयारी करुन ठेवली होती वगैरे तर ते म्हणाले, 'वा वा मग चांगले मुरले असतील नाही सगळे!' ( ते काय लोणचं आहे का? पण झक्कीही 'मुरलेले' आहेत तेव्हा हा टोमणा असावा की काय ते नीट कळले नाही, मग मी नुसतीच हसले.)

vade.jpg

नंतर ते बोलले की स्त्रियांवर काही अन्याय वगैरे होत नसतो. उदाहरणादाखल ते म्हणाले, "नुसता 'जरा चहा (त्यांना बहुतेक \चहा म्हणायचे असावे) देता का' असं म्हटलं तर लगेच बायकांना अन्याय वाटतो. नका देऊ चहा! राहूदे. पण लगेच अन्याय कसला आलाय त्यात!" यावर हसावे की रडावे कळले नाही, पण तरी सगळ्या हसल्याच!

पहिल्यांदाच भेटणार्‍यांपैकी एक 'माणूस' होता. मीच ओळख करुन घेतली आणि करुन दिली. तो म्हणाला, "अरे! तुम्ही लालू का? नाही, म्हणजे..मी तुमच्या मुलाचा फोटो बघितला होता" आता या दोन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध? पण मी तो माझ्या सोयीप्रमाणे लावून घेतला. बाईमाणूस स्मार्ट आहे. आणि धाडसी पण! तिने नंतर नाव घेण्याच्या कार्यक्रमात संयुक्ता भगिनींच्या गराड्यात बसून "...मंगळसूत्र हाच माझा अलंकार" असा दणदणीत उखाणा घेऊन टाळ्या मिळवल्या. तिने पगीलाही उखाणा शिकवला. नंतर ग्रूप जॉइन करण्याची इच्छा दर्शवली. त्यावेळीच 'संयुक्ता'चे भविष्य उज्ज्वल आहे याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही.

खरं तर स्त्रियांना लहानसहान गोष्टींसाठी झगडावे लागते याचा प्रत्यय तिथेही आला. बरेच बाप्ये खुर्चीवर बसले होते आणि पंखा आपल्या बाजूला फिरवून घेतला होता. आम्ही सगळ्या जमिनीवर होतो, उकाडायला लागले म्हणून माझे पंख्याकडे लक्ष गेले तेव्हा मी सांगितल्यावर आमच्या बाजूला फिरवला. नंतर विनय हळूच खुर्चीवरुन उठून जमिनीवर फॅनसमोर येऊन बसला. बाजूला असामी येऊन बसला.

मी आणि असामी कॉन्स्टन्ट राहून माझ्या उजव्या बाजूला बसलेली व्यक्ती सारखी बदलत होती. हे बाईंच्याच लक्षात आले. तिथल्या व्यक्तीप्रमाणे आम्हां तिघांतला बोलण्याचा विषय बदलत होता. तिथे एकदा मैत्रेयी बसली होती तेव्हा 'क्लासिफाईड' चर्चा झाली. मग फचिन आला, तो लावलेल्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी गजर होणार्‍या घडयाळाबद्दल सांगत होता. मी त्याला पालिन, टी पार्टी, मध्यावधी निवडणुका, सेकन्ड टर्म याबद्दल काहीतरी सांगितले. मग पग्या आला. त्याने पगीने आणलेले (धन्यवाद) टी शर्टस दिले. ते उघडून लेडीज कोणता यावर आडाखे बांधले कारण कट जवळपास सारखेच दिसत होते. पण छान आहेत, माझ्याकडे एक ज्यादा होता तो लोकांनी लिलाव करुन विकावा असे सुचवले पण मी नकार दिला! मग खुद्द बाईच येऊन बसल्या. बाईंनी २० डॉलर्स भारत सरकारला देऊन, स्वतःच्या हाताने भरलेले आणि कॉन्सुलेटमधून शिक्का मारुन घेतलेले सरेंडर सर्टिफिकेट दाखवले. विनय आणि पग्यानेही ते कौतुकाने पाहिले. बाईंसाठी मी राजन खानचे पुस्तक आणले होते ते दिले. राजन खानच्या कथांवर असामीने एक्स्पर्ट कमेन्ट्स केल्या. जी कथा वाचून अमृता बेशुद्ध पडली होती ती खरं तर बोअरिंग आहे असे त्याने सांगितले.

असामीलाही मी पहिल्यांदाच भेटत होते. इथे काहीबाही बोलून सारखी खॅ खॅ हसणारी स्मायली टाकतो त्यामुळे त्याची वेगळीच इमेज मनात होती पण तो फारच मृदुभाषी, गोड बोलणारा, साधा निघाला. जिलबीसारखा. पण डॅम्बिस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मठ्ठयात बुडवलेली जिलबी.

jilebi.jpg

केदार जोशींच्या अखंड संभाषणकौशल्याबद्दल काय बोलावे! यावेळी विनयच्या 'उभ्या उभ्या विनोदा' ऐवजी तो गेल्यावर केदारचा 'उभ्या उभ्या चर्चे' चा कार्यक्रम झाला. पण केदार मध्येच त्याने न आणलेल्या अति अति गोड म्हैसूरपाकासारखा वाटला. दर काही वाक्यांनंतर आपलं, 'मी हे उदाहरण देतोय हं, राग मानू नका. चेष्टेत बोलतोय हं राग मानू नका..राग मानू नका' असं बोलत होता. या 'राग मानू नका' ने अक्षरशः वैताग आला आणि चिडचिड होऊ लागली. त्यामुळे तो मुद्दाम राग येण्यासाठी म्हणतोय की काय असा संशय येऊ लागला. अति गोड बोलणार्‍या लोकांचा मला संशय येतो! पण एवढे सोडले आणि बोलण्याबरोबरच मध्ये मध्ये त्याने जरा दुसर्‍यांचे ऐकूनही घेतले तर तो आयुष्यात कुठल्या कुठे पोचेल.

जेवणाचा कार्यक्रम छानच झाला, सगळे पदार्थ उत्तम होते. मी झुणकाही करुन नेला होता. सिंडी म्हणाली तिचे रावण पिठले जास्त छान लागते. यावर मी तिला काही बोलले नाही. पुढच्या जीटीजीला तिला करुन आणायला सांगायचे आणि तेव्हाच बोलायचे असे ठरवले.

सायोचे भरले वांगे भाकरीबरोबर मस्त लागले. भाकरीचा आकार सोडला तर त्या छान होत्या. ग्रहण लागलेल्या नव्हत्या (मैत्रेयीने आणल्या होत्या ना!) . बाईंनी केलेली अंबाडीची भाजी एकदम चवदार.. आधी मला त्या म्हणत होत्या की गोळाभाजी असणार आहे तर झुणका कशाला? मी म्हटलं झुणका तसा कोरडा असेल. आणि होताच पण बाईंनी केलेली भाजी मात्र 'गोळा' नव्हती जरा पाणी जास्त असलेली होती. ती मला अगदी पग्यासारखी वाटली. आंबटगोड आणि ताटात वाढली तर पसरेल आणि ताट कलेल तशी वहात जाईल अशी!

ambadi.jpg

वृंदांची ख्याती ऐकली होती त्याप्रमाणेच त्यांनी आणलेले मलई सँडविच, दही-भात, कोथिंबीरीचे लो़णचे मस्त होते. लोणचे खरं प्राचीने केले होते. वृंदा म्हणाल्या तिने 'रुचिरा' त बघून केले, पण केले हे महत्त्वाचे. तसे 'रुचिरा' तर सिंडीच्या बुकशेल्फवरही आहे! (हे सिंडीनेच सांगितले). आईप्रमाणेच मुलगीही एकदम सुगरण. कोणी मनातल्या मनात जोड्या जुळवत असाल तर हे नाव लक्षात ठेवा.

lonache.jpg

सगळ्या नव्या-जुन्यांना भेटून छान वाटले. छोट्या छोट्या कंपूंनीही गप्पा झाल्या. त्यात जोधाच्या भाज्या, तुळस, कोरफड, आयफोन, आयफोन कशासाठी?, बिग बँग, वर्महोल, ब्लॅक स्मोक ('लॉस्ट' फेम), वेद, व्हेगासचे शोज इ. विविध विषयांवर चर्चा झाली.

मी आणि रुनी त्यादिवशी बाईंकडेच मुक्काम करणार होतो. सगळे गेल्यावर अजय (बाईंचे यजमान) म्हणाले की मी तुम्हाला टीव्ही लावून देतो, काय पहाणार हिन्दी सिनेमा लावू का? टीव्ही पहा म्हणजे थोडा वेळ तुम्ही काही न बोलता बसाल. पण मग बाई म्हणाल्या की तसे होईलच असे काही सांगता येत नाही. पण यावरुन अजय आणि आदित्यला दिवसभरात किती कलकलाटाला कान द्यावे लागले असतील याची कल्पना यावी.

पुन्हा एकदा तिघींनी थोडी 'चर्चा' केली आणि अकराच्या सुमारास, म्हणजे तसे लवकरच झोपलो. सकाळी साडेसहाच्या सुमारास जाग आल्यावर आवरुन, बॅग भरुन बाईंची लायब्ररी धुंडाळली. हवी ती पुस्तकं घेतली. 'मी ही पुस्तके नेत आहे' असे मेधाने लिहून ठेवलेला लिस्ट्चा कागद मिळाला त्यातच माझी, रुनिची पुस्तके अ‍ॅड केली. बाईंनी आम्हाला ब्रेकफास्ट्ला छान गरमगरम उपमा केला. जाता जाता देशी दुकानात जायचे होते, ते उघडण्याची वेळ होईपर्यंत थांबलो तेव्हा आदित्य ने 'रज्जनी' च्या एका चित्रपटातील काही गाणी आणि सीन्स दाखवले! मारामारीनंतर हात झटकतात तसे पाय झटकण्याचा सीन रिवाईंड करुन पुन्हा दाखवला. तेव्हा हा वेळ एकदम सत्कारणी लागला!

पुन्हा मजल दरमजल करत दुपारी घरी पोचलो. संध्याकाळचे ट्रॅफिक, पाऊस, थंडरस्टॉर्म चुकवण्यासाठी लवकर निघालो खरं पण घराच्या अगदी जवळ आल्यावर वादळाने गाठलेच. आमचे कुटुंब टोरनॅडो येतो की काय म्हणून तळघरात जाऊन आम्हाला सारखे फोन करत बसलेले. पण तसे काही झाले नाही, थोडा वेळ तुफान पाऊस आणि वारा, विजा झाल्यावर सगळे थांबले.

नितीन रुनी घरी गेल्यावर आता न झोपता आस्वपू आणि इतर कामांना लागायचे असे ठरवूनही थोडावेळ विश्रांती घ्यायला आणलेल्यातले एक पुस्तक घेऊन आडवे झाल्यावर झोप लागलीच. लाँग ड्राईव्ह, दिवसभर बसून आणि उभे राहून असणे याचा इतका वेळ कल्लोळात मनाला विसर पडलेला होता पण मग शरीर जाणीव करुन देऊ लागले. उठल्यानंतर बाईंना फोन केला पण रुनीने आधीच पोचल्याचे कळवले होते.

ऐनवेळी जीटीजीची जागा बदलूनही उत्तम ते पार पाडल्याबद्दल बाई आणि कुटुंबियांना मनापासून धन्यवाद! Happy

(प्रकाशचित्रे-वृंदा, बर्फी फोटो ढापलाय.)

विषय: 
प्रकार: 

मला मजकुराचा फारसा सन्दर्भ लागला नाही पण छान लिहीलाय
फोटो मस्तच Happy
बाकी यात कुणी कुणाला काय बोल्ले हे आले नाहीच, पण कुणी कुणाच्या पाठीमागे काय बोलले हे तर अजिबात आल नाहीये! Proud

वा! बवडे अगदी फर्मास दिसताहेत. तों पा सु. मसँ चा फोटो नाही? बाकी सगळ्या प्रचिच्या पाकृ येऊद्यात.. जिलबीसकट Wink

>>>नितीनला म्हटले तुला खायचेत का? घे, आहेत बरेच. तरी मग त्याने एकच घेतला(नितीनपण शहाणा आहे).>>> तू नेहमीप्रमाणे 'हुकुमावरुन' म्हणाली असशील नाहीतर त्याला ती घोड्यावरुन तलवार चालवणारी स्मायली दाखवली असशील. तर काय करतो बिचारा. Proud
>>>पण केले हे महत्त्वाचे. तसे 'रुचिरा' तर सिंडीच्या बुकशेल्फवरही आहे! (हे सिंडीनेच सांगितले). >>> सिंडी, पुढच्या वेळी रुचिरात बघून पदार्थ करायचं मनावर घेच.

बाकी वृत्तांत, पंचेस छान.

लई भारी !
एक पुरुषांचा ग्रूप पीत होता आणि एका ग्रूपमध्ये दोन पुरुष काहीबाही बोलत होते आणि बाकीचे नुसतंच मॅडसारखं त्यांच्या तोंडाकडं बघत ऐकत होते. >>>> Lol

खास लालू श्टाईल . बोले तो झकास . Happy ( लिंबू म्हणतोय तसं काही गोष्टी संदर्भ माहित नसल्याने डोक्यावरून गेल्या , तरीही मस्त वाटलं . )

मी बाकीच्या खादाडीचे माझ्याकडे असलेले फोटो टाकतेय. लालू, माईंड नॉट.
भरली वांगी- सायो bharli vaangi.jpg
चिकन करी- बुवा chicken curry-buva.jpg
दहीभात-कुटाच्या मिरच्या -वृंदाताई dahibhaat-kutachya mirchya-vrindatai.jpg
काहीतरी- परदेसाई pardesai-kahitari.jpg
प्रॉन्स करी- अनिलभाई prawns curry-anilbhai.jpg

कुणी राहिलं असल्यास क्षमस्व. सर्व प्रचि वृंदाताईंच्या कॅमेरातून.

सगळे गेल्यावर अजय (बाईंचे यजमान) म्हणाले की मी तुम्हाला टीव्ही लावून देतो >> Lol

मजा आ गया, लालू तु साक्षात 'देवी' आहेस बघ Happy

ती मला अगदी पग्यासारखी वाटली. >>>> हो हो भाजी अगदी माझ्यासारखीच होती.. ताट कुठेही वळवलं तरी "कोणाकडेही" न वळणारी आणि मुख्य म्हणजे कुठल्याही भोकांमधून न "गळणारी".. Happy

लालू तु साक्षात 'देवी' आहेस बघ >>>>> Lol

लालवाक्का, वृत्तांत एकदम झकास हो. गटग चुकल्याची हळहळ वाटतीय...
लालू तु साक्षात 'देवी' आहेस बघ >>> म्हणजे चार हात, तलवार आणि त्रिशूल घेतलेली का? Wink
पग्याचं वर्णन एकदम बरोब्बर Proud

लालू, छान लिहिले आहे.

पग्याला नावं ठेवायच्या आधी त्याच्याकडून सगळ्या पदार्थांचे फोटो घ्यायचे नाहीत का? त्याने काढले होते. (अशाने हिलरीबाई जिंकणार नाहीत) Proud

ते अलार्म घड्याळ मी तुला सांगत होतो ते हे आयफोन अ‍ॅप आहे:

http://www.mdlabs.se/sleepcycle/index.html

मी सांगेपर्यंत असाम्याने केदारच्या आयफोनवर ते टाकले सुद्धा.. आता केदार उठत असेल रात्री-अपरात्री अचानक.. Proud

Lol Lol

सही वृत्तांत. सही पंचेस्!
(मैत्रेयीबरोबर 'क्लासिफाईड' गप्पा काय झाल्या? मेल टाक. :P)

मस्त वॄत्तांत.. (देर आये दुरूस्त आये)... Happy

बाईंनी दारवान यायच्या आधी तुम्हाला एंट्री दिल्याबद्दल बाईंचा निशेध.. Lol

सही वृत्तांत लालू!!!
एका ग्रूपमध्ये दोन पुरुष काहीबाही बोलत होते आणि बाकीचे नुसतंच मॅडसारखं त्यांच्या तोंडाकडं बघत ऐकत होते. >> Lol हे दोन पुरुष म्हणजे बोवाजी आणि इतिहासकार जोशी होते का?
सगळे पदार्थ तोंपासू आहेत!!

Pages